Sunday, February 01, 2009

बाळाचे आगमन:भाग २


मे महिना आला तसा घरात बांधकामाने चांगलाच जोर पकडला. ऑफिसचे काम सासरी जाऊन करायला सुरुवात केली. नशिबाने मॉर्निंग सिकनेस अजिबात नव्हता. कधी कधी थोडीशी मळमळ व्हायची, पण त्या पलिकडे काही नाही.
आता एका चांगल्या गायनॅकॉलिस्टचा शोध सुरू झाला. त्याचबरोबर कुठल्या हॉस्पिटलमधे जायचे ते ही महत्वाचे होते. आमच्या नशिबाने इथे युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना (UNC) आणि ड्युक युनिव्हर्सिटीची अद्ययावत हॉस्पिटल्स आहेत. शिवाय इतरही चांगली हॉस्पिटल्स आहेत. कुठेतरी पाण्याखाली जन्म देण्याची सुविधा आहे असे ऐकले होते, त्यासंबंधीही माहिती काढायची ठरली. UNC मधे पाण्यात लेबर करायची सुविधा आहे पण प्रत्यक्ष जन्म पाण्याखाली होऊ देत नाहीत असे कळले. मात्रं त्याबरोबरच चॅपल हिल येथील वुमेन्स बर्थ एन्ड वेलनेस सेंटरमधे पाण्यात प्रसूती होण्याची सोय असण्याचे कळले. ही सुविधा बर्थिंग सेंटर म्हणून प्रसिद्ध असल्याचे समजले. मात्रं तिथे डॉक्टर नसून सर्व मिडवाईफ असतात आणि एपिड्युरल (एनेस्थेशिया) उपलब्ध नसते असे कळले. बर्थिंग सेंटरमधे प्रसूती नैसर्गिक प्रद्धतीने करण्यावर भर दिला जातो. काही कॉम्प्लिकेशन झाल्य़ास बाळ/बाळंतिणीला UNC मधे एडमिट करतात.
नैसर्गिक,पाण्याखाली प्रसूती हे सगळं अगदी आयडियल वाटत असलं तरी डॉक्टर नाही म्हणजे जरा भितीच वाटत होती, त्यामुळे बर्थिंग सेंटरचा विचार करायचे नाही असे मी ठरवले.

हे सगळे करता करता कॅलिफोर्नियाच्या कॉन्फरन्सची वेळ झाली तरी साधे डॉक्टरही ठरले नव्हते, हॉस्पिटल तर सोडाच.
कॅलिफोर्नियाची ट्रिप छान झाली. मी कॉन्फरन्सला जोडून सुट्टी घेतली होती. नवर्‍यानेपण माझ्याबरोबर येण्यासाठी वेळ काढला होता. लॉस एंजेलिसमधे माझ्या दिरांकडे राहिलो. त्यानंतर सॅन होजे मधे माझी चुलत बहीण शालिनीकडे राहिलो आणि शेवटी सॅन फ्रॅन्सिस्कोला पोचलो.

सॅन फ्रॅन्सिस्कोत अनेक व्हिगन रेस्टॉरेंट्स आहेत. मिलेनियम हे नवर्‍याचे जगातील सर्वात आवडते व्हिगन रेस्टॉरेंट डाऊन्टाऊन सॅनफ्रॅन्सिस्कोमधे आहे. आमचे रहाण्याचे हॉटेल तिथून अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर होते म्हणून नवरा एकदम खूष होता. शिवाय (मी कॉन्फरन्समधे असताना) त्याला त्याच्या आवडत्या शहरात भटकंती करायला मिळणार होतीच.
पहिले ट्रायमिस्टर असूनही उलट्यांचा त्रास नसल्याने त्याच्याबरोबर सर्व खादाडी करायला मी ही तयार होतेच. संध्याकाळी अनेक जुन्या मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांना वेगवेगळ्या रेस्टॉरेंटमधे आमंत्रित करण्याचा सपाटा लावला.
कॉन्फरंन्स संपल्यावर सप्ताहांत मरिन काऊंटीमधे एका सर्व्हास कुटुंबाबरोबर घालवला आणि अखेर घरी परत आलो.
या सर्व प्रवासात आमची काही "बातमी" असल्याचा कोणालाच संशय आला नाही. परत येऊन पुन्हा डॉक्टरचा शोध सुरू झाला...


क्रमशः

No comments: