Showing posts with label Full Frame. Show all posts
Showing posts with label Full Frame. Show all posts

Friday, February 27, 2009

फुलफ्रेम २००८ - ट्विन टॉवरचा डोंबारी, अर्थात "मॅन ऑन वायर"

नुकत्याच झालेल्या ऑस्कर अवार्ड नाईटमधे मॅन ऑन वायरला सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार देण्यात आला. त्या निमित्त या माहितीपटावर आधीच प्रकाशित केलेला लेख पुनःप्रकाशित करत आहे:

१९६८ साल. पॅरिसमधली एक सकाळ....
लहानगा फिलिप पेटिट दातांच्या दवाखान्यात डॉक्टरांची वाट पहात बसलेला. सहज चाळायला घेतलेल्या मासिकातल्या एका लेखाकडे त्याचे लक्ष वेधले जाते - "न्यूयॉर्क शहरात जगातील सर्वात उंच इमारती बांधण्यात येत आहेत..." वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सची ती प्रस्तावित चित्रे पाहून तो इतका भारावला होता की चक्कं ते पानच फाडून खिशात घातले. घरी आणून ते चित्रं समोर दिसेल असे टांगले. मनाशी निर्धार केला - हेच माझे ध्येय.. टॉवर बांधून पूर्ण झाली रे झाली, की या टॉवरपासून त्या टॉवरपर्यंत एक दोर बांधायचा, तो ही सर्वात वरच्या मजल्यावर आणि त्यावर डोंबार्‍याचा खेळ करायचा. त्या दिवसापासूनच फिलिपचा सराव सुरू होतो.
मोठा होत होत, रस्त्यावर जादूचे, डोंबार्‍याचे खेळ करत करत, तर कधी चक्क खिसे कापत पै पै जमा करायचा. न्यूयॉर्कला जाऊन इमारतींचे बांधकाम कसे सुरू आहे ते बघायचे, तिथल्या कामगारांचा पोषाख कसा, ते वस्तूंची ने-आण कशी करतात, ऑफिसात काम करणारे कसे वागतात, इत्यादी बारीक सारीक तपशील गोळा करायला सुरूवात होते.
उद्दिष्ट सोपे तर नव्हतेच, पण बेकायदेशीरही होते, पण त्यातच तर खरी मजा होती नं! त्याची मैत्रिण व काही मित्रं खंबीरपणे पाठीशी उभे, तर काही सुरवातीला उत्साह दाखवून मधेच पाचावर धारण बसणारे. "तुझं काही बरं वाईट झालं तर माझ्यावर खापर नको" असं म्हणत माघार घेणारे काही, तर "माझ्याने हे होणार नाही" अशी स्पष्ट कबूली देणारे काही.
एका कानाची दुसर्‍या कानाला खबर लागणार नाही अशी गुप्तता बाळगायची. खोटी ओळख पत्रे मिळवून इमारतीत प्रवेश करायचा. सुरक्षा सैनिकांना चकमा देत छतावर पोचायचे व पहाणी करायची. हे सर्व करण्यात काही वर्ष जातात.
१२ ऑगस्ट १९७४, ट्विन टॉवर्सवर ढळणारी मध्यरात्रं...
कुणालाही कळू नं देता, दोन इमारतींच्या मधे ४५० पाऊंडांची केबल एका रात्रीत बांधायची. सकाळ झाली की तोल सावरत त्या दोरखंडावर प्रकट व्हायचे अचानक. नुसते चालत नव्हे तर नाच करत! सकाळी सकाळी कामाला निघालेल्या चाकरमान्यांना अगदी ध्यानीमनी नसताना एक अजब अदाकारी दाखवायची.


काय स्वप्नं पडतात नाही लोकांना? इतकं करून अगदी चांगल्यात चांगलं निष्पन्नं म्हणजे पोलिस पकडून जेलमधे टाकणार. इतर शक्याशक्यतेची तर कल्पनाही करवत नाही.

११ सप्टेंबर २००१ ट्विन टॉवर्सवर उगवत्या सूर्याची उन्हे.
या दिवशी घडलेल्या घटनेने फिलिपच्या त्या धाडसाचे, वर्षानुवर्ष उराशी बाळगलेल्या एका वेड्या स्वप्नाचे सर्व आयाम बदलले. गुप्तता तीच, कार्यपद्धतीही बहुदा तीच, हेतू मात्रं अगदी वेगळे!



"मॅन ऑन वायर" - एखाद्या हॉलीवुड थरारपटाच्या थोबाडीत मारेल असा हा माहितीपट फुलफ्रेम डॉक्युमेंटरी फिल्म फेस्टिवलमधे बघायला मिळाला. प्रेक्षकांच्या पसंतीचे बक्षीसही याच माहितीपटाला मिळाले. (माझ्या हातून सहजा-सहजी ६-७ च्या वर मार्क सुटत नाहीत, पण मीही याला १० पैकी १० मार्क दिलेत.)
फिलिप आणि त्याच्या मित्र मंडळींची मोहिमेची तयारी, भांडणे , अडचणी, कामातील जोखीम ह्या सर्वातुन हा बेत तडीला जातो का...? पुढे काय होते..? एरवी मी पूर्ण कथानक लिहीले असते, कारण इथे दाखवण्यात येणारे बरेचसे माहितीपट रिलीज होण्याची फारशी शक्यता नसते. पण तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे हा चित्रपट लवकरच येत आहे - अगदी तुमच्या जवळच्या थिएटरमधे का काय म्हणतात तसा, असं ऐकलं आहे.
अर्थातच ही सत्य घटना आहे व त्यासंबंधीची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे, पण सिनेमाची खरी मजा अनुभवायची असेल तर सिनेमा बघेपर्यंत पाटी कोरी ठेवा हा कसंकायचा अधिकृत सल्ला....


मूळ लेख प्रकाशन : ४/१०/०८ ९:४२

Tuesday, July 31, 2007

ड्युक व्हिडिओ इंस्टिट्युट - २००७

मागे फुल फ्रेम डॉक्युमेंटरी फिल्म फेस्टिवलबद्दल लिहिलं होत ते आठवतंय का? तेव्हा ते सगळे सिनेमे बघुन आपणही असं काही तरी करून पहावं असा किडा डोक्यात वळवळला. त्या किड्याने नुसती वळवळ नं करता ड्युक विद्यापिठाच्या डॉक्युमेंटरी बनवण्याच्या कार्यशाळेत प्रवेश घेतला.

http://cds.aas.duke.edu/courses/workshops.html#video

शनिवारपासून अभ्यासक्रम सुरू झाला. ८ दिवस रोज बारा तास. अमेरिकेच्या काना-कोपर्‍यातून आलेले विद्यार्थी बघुन नामांकित अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असल्याचा शोध लागला. पस्तीस एक विद्यार्थ्यांपैकी फक्तं ३ पुरूष आहेत हे एक उगाचच केलेले विशेष निरिक्षण!
व्हाईट बॅलंस, आयरिस, एक्स्पोजर, एफ स्टॉप, फोकस हे नवर्‍याच्या कोषातले अगम्य शब्दं आता मलाही कळु लागले आहेत. त्या सगळ्या शब्दांच्या व्याख्या इथे तुम्हाला सांगत बसत नाही. पण एका शिक्षकची टिपणी: वाईट व्हिडिओचे उदाहरण म्हणजे बाजूच्या खोलीत सुरू असलेल्या टिव्हीचा नुसता आवज ऐकून संपूर्ण कथानक कळु शकणे.

Thursday, April 26, 2007

फुलफ्रेम भाग ३ - आमच्या एरियलचा A Promise to the Dead - The Exile Journey of Ariel Dorfman (Work in Progress)

एरियल डॉर्फमन हे नाव डरहॅमच्या सामाजिक वर्तुळात नविन नाहीत. साधारण पासष्टी-सत्तरीतलं वय. आपल्या हसतमुख व्यक्तिमत्वाने सगळ्यांना आपलंसं करून सोडणारे. लहान-मोठ्या सगळ्यांशी तितक्याच आपुलकीने वागणारे. इथल्या ड्युक विद्यापिठात ते प्राध्यापक आहेत. एक प्रथितयश लेखक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या लिखाणावरून Death and the Meaden सारखे सिनेमे तयार झाले आहेत. तरी दरवर्षी फुलफ्रेममधे ते इतर प्रेक्षकांसारखे रांगेत बिंगेत उभे रहातात. या त्यांच्या साधेपणामुळे मला नेहेमीच त्यांच्याबद्दल जरा जास्तच आदर वाटतो. त्यांच्या मुलगा रॉड्रीग्जही सुफी कार्यक्रमात आम्हाला नेहेमी भेटतो.
त्यांच्या कुटुंबाला चिले या देशातल्या राजकिय घडामोडींमुळे देशोधडीचा सामना करावा लागला हे ही माहित होते. पण जेव्हा एरियल यांच्या जीवनावरच सिनेमा तयार होतो आहे हे कळले तेव्हा जरा आश्चर्य वाटले आणि जरा जास्तीच होतं आहे असंही कुठेतरी वाटलं - तरी उत्सुकतेपोटी गेले. थिएटरकडे जाणारा जिना उतरताना बघितले तर एरियल माझ्या बाजूलाच होते. नेहेमीप्रमाणे मनमोकळे हसले माझ्याकडे बघून.
सिनेमाबद्दल सांगण्याआधी चिलेचा थोडा इतिहास सांगायला पाहिजे.(या विषयावरचा Battle of Chile हा सिनेमा जरूर बघावा.) साल्वाडोर आलंदे हे १९७० मधे अध्यक्ष म्हणून निवडून आले, लोकशाही पदधतीने. परंतू त्यांच्या मार्कसिस्ट विचारसरणीने त्यांनी अमेरिकेचा रोष ओढवून घेतला. शितयुद्ध सुरू होतेच. त्यात आलंदेंनी क्युबा आणि उ. कोरिया इ देशाशी संबध प्रस्थापित करायला सुरूवात केली आणि प्रमुख उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरणही करायला सुरूवात केली. म्हणजे अमेरिकन कंपन्यांना आव्हानच दिले. मागे एका लेखात मी सी.आय.ए. ने इराणच्या लोकशाहीचा सत्यानाशकरून लष्करशहांना गादीवर बसवल्याचे सांगितलेच आहे. सी.आय.ए. चा ते पहिले यशस्वी सत्तांतर होते. १९७० उजाडेपर्यंत सी.आय.ए. नी ही कला अगदी हातचा मळ असल्यासारखी आत्मसात केली होती. अमेरिकेच्या मित्रं अथवा शत्रू राष्ट्रांमधे आजतागायत लोकशाहीचा दुष्काळ आहे हा योगायोग नाही. आता डिक्लासिफाईड झालेल्या कागदपत्रांवरून निक्सन यांच्या आदेशावरून हेन्री किसिंजर यांनी या कामात पुढाकार घेतला. तीन वर्ष सतत प्रयत्नं करून अखेर ११ सप्टेंबर १९७३(ह्याला दैवदुर्विलास म्हणायचे की इतिहासाने मारलेली चपराक समजायचे?) रोजी आलंदेंचे सरकार बरखास्तं करून लष्करशहा पिनोचे गादीवर बसले. आलंदेंना देश सोडून जाण्याची संधी देण्यात आली, ती नाकारून त्यांनी मरणाचा मार्ग पत्करला. आलंदे आणि त्यांच्या समर्थेकांना अतिशय हाल करून ठार करण्यात आले. बर्‍याच जणांच्या पार्थिवाचाही पत्ता लागला नाही.
एरियल डॉर्फमन आर्जेटिनामधे जन्माला आले. तिथल्या राजकिय परिस्थितीमुळे त्यांच्या वडिलांनी चिलेमधे आसरा घेतला. त्यांच्या विचारसरणीमुळे पुन्हा एकदा चिले सोडायची पाळी आली. एरियल लहान असतानाच अमेरिकेत आश्रय मिळाला. न्यूयॉर्कमधे एरियल लहानाचे मोठे होत असताना पुन्हा एकदा त्यांच्या वडिलांना कम्युनिस्ट असल्याच्या संशयावरून अमेरिका सोडावी लागली. मग पुन्हा कधी चिले कधी आर्जेंटिना. तरूण एरियल आलंदेंच्या विचार शैलीकडे आकर्षित झाले. विचारांचा सामना विचाराने करायचा ही आलंदेंची भूमिका त्यांना मनापासून पटल्याने ते आलंदेंच्या आंदोलनात सहभागी झाले.
आता मूळ विषयाकडे वळू या. सिनेमा सुरू होतो तेव्हा एरियल राजधानी सॅंतियॅगोमधी काही जुन्या मित्रांशी त्या काळाबद्दल बोलताना दाखवले आहेत. मग त्या आठवणी सांगता सांगता मधेच त्या काळतले फुटेज दाखवले जाते. आलंदेंची लोकप्रियता किती होती ते त्या फुटेजवरून कळते. आपण या रस्त्यावरून मोर्चा काढला, आलंदे त्या खिडकीत उभे होते अशा आठवणींच्या वेळी त्या काळातल्या फुटेजचा बेमालूम उपयोग केला आहे. मग आलंदे सत्तेवर आल्यावर आमचे एरियल सांस्कृतिक मंत्री बनले. ते मंत्रीपद मिळाल्यावरोबर पुस्तके विकत घेऊन शाळांच्या वाचनालयात प्रचंड भर टाकण्याचे काम एरियलनी सुरू केले. शिवाय स्वतःच्या लिखाणाने इतरांवर प्रभाव टाकणे सुरू होतेच. सत्तेवर आल्यानंतर आधीच्या सरकारवर कुठल्याही प्रकारचा सूड घ्यायचा नसल्याने विकास कामांना लगेच गती मिळाली. अमेरिकन साम्राज्यवादाला दूर ठेवण्यासाठी (बनाना रिपब्लिक होऊ नये म्हणून) खाजगीकरण सुरू केले आणि इथेच संघर्षाची ठिणगी पडली. कामगारांचा संप, आलंदेंच्या विश्वासातील माणसे मारली जाणे असे प्रकार घडू लागले.
ऑगस्ट १९७३ मधे एक अयशस्वी प्रयत्नं करण्यात आला. त्यावेळी आपले सरकार फार दिवस टिकणार नाही हे आलंदेंना कळून चुकले होते. अमेरिकन युद्ध नौका येऊन दाखल झाल्याच होत्या. १० सप्टेंबरला लष्कराने निरोप पाठवला. उद्या आम्ही सत्ता ताब्यात घॆणार. ते करण्यात आम्ही यशस्वी झालो तर तुमच्या सगळया मंत्री मंडळाला बोलावणे पाठवू. पुढची बोलणी करायला सगळ्यांनी येणे आवश्यक आहे.
त्याप्रमाणे ११ सप्टेंबरच्या सकाळी मंत्रीमंडळातल्या सगळ्यांना निरोप गेले - फक्त एक व्यक्ती सोडून - ती म्हणजे आमचे एरियल. ज्यांना निरोप गेले त्यातली एकही व्यक्ति जिवंत बाहेर आली नाही. त्यानंतर बरेच वर्षांनी एरियल निरोप पाठवणार्‍या व्यक्तिला भेटले आणि "मला का बोलावलं नाही?" असं विचारलं. त्यानी सांगितलं - "सम बडी हॅड टू टेल द स्टोरी". म्हणजे केवळ त्या एका व्यक्तिच्या भलेपणामुळे त्यांचा जीव वाचला होता. त्यानंतर चिलेमधे आलंदे समर्थकांची धरपकड सुरू झाली. बायका मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवून एरियल आर्जेटिनाच्या दूतावासात गेले. आर्जेंटिनामधे जन्म झाला असल्याने तिथे त्यांना आश्रय मिळाला. पुन्हा एकदा जीव वाचला. दोन दिवसानी आर्जेंटिनात जायचे कागदपत्रं तयार झाले आणि मग बायका मुलांना न्यायला निघाले. जाताना रस्त्यात एका ठिकाणी आलंदे समर्थक आणि लष्करात खडाजंगी सुरू होती. आता पर्यंत नशिबाने वाचवले होते. पण आता मात्रं "मी चक्कं घाबरलो म्हणून तिकडे गेलो नाही आणि पुन्हा एकदा वाचलो" अशी कबूली एरियल देतात. पण त्यानंतर मात्रं या कार्यासाठी आपला देह ठेवला त्यांच्यासाठी हा लढा सुरूच ठेवायचा निर्धार केला.
१९८९ मधे चिलेमधे पुन्हा एकदा लोकशाहीची स्थापना झाली. त्यानंतर त्यांचे पुन्हा चिलेमधे जाणे येणे सुरू झाले. मानवी हक्क संघटनांचे त्यांचे काम आजही सुरू आहे.
अशा अनेक आठवणी सांगत एरियल त्यांचा जिवनपट आपल्यासमोर मांडतात. डरहॅमच्या रेल्वे स्टेशनवर एरियल येतात तिथे सिनेमा संपतो.
सिनेमा संपल्यावर एरियल आणि सिनेमाचे डायरेक्टर पिटर रेमॉंट यांनी प्रश्नांना उत्तरे दिली. स्टेजवर बसलेल्या साधारण दिसणार्‍या त्या व्यक्तीकडे मी भारावल्यासारखी बघत बसले.

Sunday, April 22, 2007

फुलफ्रेम भाग २ - Nomadak Tx

चलापार्टा (इंग्रजी स्पेलिंग Txalaparta) नावाचे एक ताल वाद्यं आहे. दोघांनी मिळून वाजवायचे असते. हजारो वर्षापूर्वी पूर्व युरोपातील बास्क कंट्रीतील आदिवासी लोक दूरसंदेशासाठी या वाद्याचा उपयोग करायचे. मधल्या शतकात चलापार्टा जवळ जवळ अस्तंगत झाले होते. १९५० साली बास्क कंट्रीमधे केवळ २ चलापार्टा उरले होते. त्यानंतर कोणीतरी त्याचे पुनरूज्जीवन करायचे ठरवले. आज चलापार्टा वाजवणारे बरेच वादक तयार झाले आहेत. हरकाईट्झ आणि इगोर हे पंचविशीतले दोन हुन्नरी तरूण त्यातलेच. मूळ्चे आदिवासी वाद्य असल्याने खर्‍याखुर्‍या आदिवासी लोकसंगीतात याचा उपयोग करावा आणि काय होते ते बघावे असा विचार करून हे दोघे तरूण घराबाहेर पडले - आदिवासींच्या शोधात.
पहिला मुक्काम भारत. जिथे जमेल तिथे मैफिल जमवायची. मुंबईतील काही शास्त्रिय संगीत वाजवणार्‍या कलाकारांसमवेत वाजवण्याचा प्रयोग केला. एक कार्यक्रमही दिला.
नंतर गुजरातमधील एक आदिवासी खेडे तिथल्या आदिवासी संगीतात चलापार्टा अगदी चपखल बसते. पारंपारिक प्रथेप्रमाणे हे वाद्य आजूबाजूच्या परिसरात सापडणार्‍या साधनांपासून बनवायचे असते. गुजराथी खेड्यासाठी सागाच्या लाकडापासून चलापार्टा बनवण्यात आला होता.
दुसरा मुक्काम आर्क्टिक सर्कल. स्कॅंडेनेव्हियातील सामी जमात ही युरोपमधील मूळ आदिवासी जमात आहे असे मानले जाते. बहुतेक सामी आता आधुनिक झाले असले तरी काही लोक रेनडियर पालन करून उदर निर्वाह करताहेत. हरकाईट्झ आणि इगोर बर्फातून मार्ग काढत सामींना भेटायला जातात. जरा स्थिरस्थावर होतात, अंघोळी बिंघोळी आटपून लगेच कामाला लागतात.
आधी चलापार्टा बनवायला पाहिजे नाही का? तो ही आजूबाजूच्या परिसरात मिळेल ती सामुग्री घेऊन.
मग सामींबरोबर प्रॅक्टिस सुरू आणि ही बघा कार्यक्रमाची तयारी.

तिसरा मुक्काम मोरोक्को. इथे आफ्रिकेत आदिवासींची कमी नाही. शिवाय इतर भागात चाललेल्या संघर्षांमुळे सुदान, युगांडाचे शरणार्थी आदिवासीही इथे आले आहेत.

या वाळवंटात दगडाचा चलापार्टा बनवायला हवा.


चौथा मुक्काम मंगोलिया. इथले बांबू किंवा तत्सम प्रकारातून चलापार्टा बनला.


टाळ्यांच्या गजरात सिनेमा संपला. थिएटरमधले दिवे लागले - हर्काईट्झ आणि इगोर प्रत्यक्ष चलापर्टा घेऊन हजर होते. एक छोटा कार्यक्रम झाल्यावर त्यांनी प्रेक्षकांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली.

सिनेमाचे ट्रेलर इथे बघा:
http://www.nomadaktx.com/english/pelicula/principal.html
(शेवटचा फोटो नवर्‍याने काढला आहे. इतर सर्व फोटो नोमॅडक च्या वेबसाईटवरून त्यांच्या परवानगीने घेतले आहेत.)

Tuesday, April 17, 2007

फुलफ्रेम भाग १ - कॉमरेडस इन ड्रिम्स

गेल्या ४ दिवसात जवळपास २०-२५ डॉक्युमेंटर्‍या बघितल्या. भारतात असताना सिनेम्याच्या आधी "फिल्म्स डिव्हिजनकी भेंट" म्हणून बघाव्या(च) लागणार्‍या या प्रकाराकडे मी पुढे इतकी आकर्षित होईन असे वाटले नव्हते (कधी कधी ती पाच दहा मिनिटे पुढच्या पिळवणूकीपेक्षा बरी होती असे म्हणायची पाळी तेव्हाही यायची.)
माहितीपट या प्रकारात आता बरीच क्रांती झाली आहे. मायकेल मूरचा फॅरेनाईट ९/११, अल गोर यांचे इन्कन्हिनियंट ट्रूथ इ. माहितीपट थेट सिनेमा हॉलमधे प्रदर्शित झाले आहेत. आणखी एक महत्वाचा बदल म्हणजे "घडणार्‍या घटनांची नोंद करणे" ही मूळ व्याख्या आता मागे पडली आहे. डायरेक्टरने सिनेमातले एक पात्रं बनून एक नविन इतिहास बनवणे हा पायंडा पडायला सुरुवात झाली आहे. अशा प्रकारच्या माहितीपटाला काही वेगळा शब्द आहे की नाही हे मला माहित नाही. पण यंदाच्या महोत्सवात हा प्रकार प्रामुख्याने आढळला. महोत्सवाचा एक महत्वाचा भाग म्हणजे बरेचदा दिग्दर्शक उपस्थित असतात आणि सिनेमा संपल्यावर प्रश्नोत्तरांना खास वेळ दिला जातो.
For the Bible Tells Me So, The rape of Europa,Nomadak Tx, Angels in the Dust, Every Thing is Cool,The Devil Came on horseback, Run Granny Run, A Promise to the Dead,The Ants, War Dance हे माहितीपट मला विशेष आवडले. दुसरे महायुद्ध, आणि आफ्रिकेत सुरू असलेल्या संघर्षांची आता मला नको इतकी माहिती झाली आहे. आफ्रिकेतल्या कुठल्या देशात कुठली जमात कुठल्या जमातीशी मारामारी करते आहे ते कळले, इतकेच नाही तर कदाचित नुसता चेहरा पाहून जमातीचे नाव सांगू शकेन असे वाटायला लागले आहे. आता हा गमतीचा भाग सोडला तरी डोके सुन्नं करणारे ते सिनेमे पाहताना मात्रं चांगलेच डिप्रेशन आले होते.

पण आजच्या लेखामधे मी सांगणार आहे जर्मन दिग्दर्शक Uli Gaulke च्या Comrades in Dreams बद्दल.
सिनेमाचा विषय साधा - टुरिंग टॉकिजेस - फिरती सिनेमागृहे. उली आपल्याला घेऊन जातात चार वेगवेगळ्या देशांमधे - पहिले टॉकिज महाराष्ट्रातल्या वडुजच्या अनुप जगदाळेचे. दुसरे टॉकिज नॉर्थ कोरियातल्या हॅन यॉंग सुन या तरुणीचे (अर्थातच टॉकिज तिचे नाही. सिनेमे दाखवणे हे तिचे काम आहे), तिसरे टॉकिज बुर्किना फासोच्या लस्साने,ल्युक आणि झकेरिया यांचे. आणि चौथे चक्कं अमेरिकेतल्या वायोमिंग राज्यातल्या पेनीचे.
अनुपचा एक ताफाच आहे. समोर मोठ्या अक्षरात अनुप वडुज असे लिहिलेला ट्रक आणि त्याच्या मागे प्रचंड आकाराचे तंबू आणि इतर सामुग्री ने आण करायचे एक की दोन ट्रक आणि मोटरसायकलवरचा अनुप हा जथ्था बघायला मजा येते.
दिग्दर्शकाने "टायटॅनिक" ही थिम मनात ठरवली असावी. उत्तर कोरियात टायटॅनिक दाखवणे शक्यच नाही. अनुपच्यामते त्याच्या प्रेक्षकांना टायटॅनिक बघण्यात काहीच स्वारस्य असणार नव्हते. पैसे खर्च करून सिनेमा बघितल्यावर घरी येऊन स्टोरी काय सांगणार? तर म्हणे एक जहाज होते, ते आपटले आणि बुडले. ते काही पटण्यासारखे नव्हते. हे स्वतः अनुपचे स्पष्टीकरण. म्हणून त्याने काळूबाईचं चांगभलं दाखवण्याचा निर्णय घेतला. (जमलेल्या गर्दीवरून त्याचा निर्णय चुकीचा नव्हता हे पटले!) काळूबाईचे चांगभलं करणार्‍या सिनेमातले मुख्य कलाकारही या माहितीपटात हजेरी लावतात. अनुपच्या म्हणण्याला दुजोराही देतात.
उ. कोरियातला भाग अतिशय मजेदार आहे, त्यासाठी सिनेमाच बघायला हवा. आणि या देशाची माहिती असेल तर आणखीच मजा येते.
बुर्किना फासो आणि वायोमिंगमधे मात्रं टायटॅनिक दाखवला जातो. हे सगळं दाखवत असतान दिग्दर्शक ते सिनेमे पहाणारे प्रेक्षक आणि दाखवणारे मालक यांच्याभवती एक सुंदर कथा विणत जातात. प्रेक्षक म्हणजे समाज - आणि त्या पार्श्वभूमीवर अनुप आणि इतर मंडळींची वैयक्तिक आयुष्ये तुमच्या समोर येतात. २५ वर्षांच्या अनुपला लग्नं करायचे आहे तर इकडे पेनी एकटेपणा जाणवू नये म्हणून स्वतःला गुंतवण्यासाठी तीन वेगवेगळ्या नोकर्‍या करते आहे. हॅन यॉंग सुनचा नवरा त्यांचा देशाच्या "महान नेत्याला" महत्वाची मदत करण्यासाठी दुसर्‍या गावी गेला आहे. एकटेपणाला तिच्याकडे सिनेमे दाखवणे हा एक चांगला उपाय आहे. लस्साने, ल्युक आणि झकेरिया हे थिएटरचा धंदा इतका यशस्वी करण्यासाठी दिवसरात्रं झटताहेत. घरात लक्षं द्यायला त्यांना मुळीच वेळ नाही ही त्यांच्या बायकांची तक्रार.
त्या त्या देशातली अगदी प्रातिनिधिक चित्रे आहेत असे मला तरी वाटले. एकीकडे अनुपसाठी वधू संशोधन करण्यात त्याचे सगे-सोयरे गुंतले आहेत आणि दुसर्‍या टोकाला पेनीने एकटेपणाला हार मानून स्वतःला इतर व्यापात गुंतवून घेतले आहे. गरीब आणि श्रीमंत देशातला हा महत्वाचा फरक इतक्या सहजतेने मांडलेला क्वचितच आढळतो. अर्थात दिग्दर्शकाला नेमके हेच दाखवायचे होते की माझ्या वैयक्तिक अनुभवामुळे मी तसा अर्थ काढला हे सांगायला दिग्दर्शक उपस्थित नव्हते.
अधिक माहितीसाठी: http://flyingmoon.com/engl/dreams_e_neu.html
(Photo Credit:Flying Moon Filmproduktion and Axel Schneppat)