Sunday, September 28, 2008

गावो विश्वस्य मातरः - भाग १


पवित्रं धार्मिक प्रतिकांची हिंदु समाजातील अवहेलना या विषयावरचा
पुण्यजला गंगा हा लेख मी आधी प्रसिद्ध केला होता. त्याच मालिकेतला हा दुसरा लेख.


कामधेनू, गोमाता अशा प्रतिमांनी गौरविलेल्या गायीला हिंदुधर्मात विश्वाची माता असे स्थान दिलेले आहे. गायीविषयी काही हिंदुधर्मियांच्या भावना इतक्या तीव्रं आहेत की "फार फार वर्षांपूर्वीचे आर्य गायींचे मांस खात होते" असे कोणी म्हंटले जरी की त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. आता आपले पूर्वज काय खात होते यासंबंधी मला अजिबात माहिती नाही. त्यांनी काय खावे हा त्यांचा प्रश्नं होता. त्यांच्या आहाराचे जाऊ द्या हो, आपला आहार हा आपल्या गायीविषयीच्या मताशी सुसंगत आहेत की नाही हा प्रश्नं आज जास्त महत्वाचा आहे. हिंदू म्हणुन गायीची आपल्याला खरोखर किती माहिती आहे?


गायीच्या दुधाचा आपण चक्कं शाकाहारात समावेश केलेला असल्याने ते कोणाला निषिद्ध तर नाहीच, उलट गायीच्या दुधाला अमृतासमान मानल्याने दूध सर्वांना हवेच असाच आपला समज आहे. गेल्या काही दशकात भारताची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे जिवनमानही सुधारते आहे. त्याप्रमाणे दुधाची मागणीही वाढते आहेच. त्यामुळे या वाढत्या मागणीला पुरवठा करणार्‍या या गायींची (अथवा म्हशींची) काय अवस्था होते हे हिंदू म्हणुन कधी कोणी लक्षात घेतले आहे का?



इतर कुठल्याही सस्तन मादीप्रमाणे गाय व्यायल्यानंतरच दूध देते. इतर सर्व प्राण्यांप्रमाणे गायीचे दुधही निसर्गाने तिच्या पाडसाच्या वाढीसाठीच तयार केले आहे. गाय साधारण चार वर्षांची झाल्यावर तिची गर्भधारणा होऊ शकते. गायीचे पाडस आईच्या उदरात नऊ महिने वाढते. म्हणजे साधारण पहिली पाच वर्षे तिला दुध येत नाही. पाडसाच्या जन्मानंतर ती साधारण दहा महिने दुध देते. त्यानंतर तिची पुन्हा गर्भधारणा होऊ शकते. गायींची आयुर्मयादा साधारण १२-१३ वर्षाची असते. त्यापैकी शेवटची ३-४ वर्षे तिला गर्भधारणा होत नाही. म्हणजे आयुष्यातल्या सुमारे १५० महिन्यांपैकी फार तर ३०-४० महिने ती दुभती असते.


असे असताना वाढत्या लोकसंख्येला दुधाचा पुरवठा, तो ही मध्यमवर्गीयांना परवडेल अशा किमतीत कसा होऊ शकतो त्याचे हे विश्लेषण:



पहिला पायरी:भेसळ


दुधात म्हणजे प्रत्यक्ष अमृतात(!?) पाणि घालणे. इहलोकात अमृत प्यायचं तर ते तितकं शुद्ध कसं असेल बरं?


दुसरी पायरी:पाडसाला गायीपासुन तोडणे






नऊ महिने पोटात वाढवल्यानंतर त्या पाडसाला त्याची माय ममतेने दुधही पाजु शकत नाही. कारण गायीच्या मालकाला ते परवडणारे नसते. बरेचदा आईपासून तोडलेले हे वासरू जगु शकत नाही. सुरूवातीला जेव्हा वासरू दुसरं काहीच खाऊ शकत नाही तेव्हा आपण खरवसासाठी चीकही चोरतो. दुध प्यायलाने आपण कोणाची हत्या तर करत नाही हे समाधानही खोटेच ठरते.


तिसरी पायरी:कृत्रिम गर्भधारणा


गायीचे दुध आटुन ती पुन्हा नैसर्गिकपणे गर्भार होण्याची वाट नं बघता दुभत्या गायीवरच गर्भारपण लादणे. म्हणजे पुन्हा नऊ महिने वाट बघायला नको. याचा गायींच्या प्रकृतीवर सहाजिकच परिणाम होऊन त्यांचे आयुर्मान कमी होते.


आदर व्यक्तं करायची ही तर्‍हा चांगली आहे! हे सगळं करताना वरून "वासराला चीक पचत नाही", "वासराला लागतं त्यापेक्षा जास्तं दुध गायींना येत असल्याने दुध काढावंच लागतं" वगैरे खोटे युक्तिवाद स्वार्थातुन किंवा अज्ञानातुन केले जातात. निसर्गाने आईच्या दुधाची निर्मितीच मुळी पिलांसाठी केली असताना वासरांना गायीचं दुध पचणार नाही असं होईल का? तुम्हीच विचार करा.


फॅक्टरी फार्म




पश्चिमी संस्कृतीमधे तर प्राणीमात्रांना तितकाही दर्जा मिळत नाही. मानवाचा जन्मं पृथ्वीवरील इतर प्राण्यांवर कुरघोडी करण्यासाठीच (डॉमिनियन) करण्यासाठी झाला असल्याची बर्‍याच ख्रिश्चनांची श्रद्धा असते. त्यात नफेखोरीची भर पडल्याने तर प्राण्यांचे जीवन असह्यच झाले आहे. प्राण्यांना "कच्चा माल" समजुन त्यापासुन खाद्य पदार्थ म्हणजे "पक्का माल" बनवत असल्याची त्यांची भुमिका असते. त्यामुळे इथे दुग्ध व्यावसायिकांच्या धंद्याला "फॅक्टरी फार्म" असेच नाव आहे.



फॅक्टरी फार्ममधे अमानुषतेच्या पुढच्या पायर्‍या गाठल्या जातात:


चौथी पायरी:गायींच्या genes मधे फेरफार करणे:


उत्पादन वाढवण्यासाठी genes मधे बदल करून संकरित गायी तयार करतात (हे काही प्रमाणात भारतातही होते). त्या संकरित गायी भरपूर दुध देतात. पण त्यामुळे गायींची जेनेटिकल एकात्मता नष्टं होण्याच्या मार्गावर आहे.


पाचवी पायरी:वाढीसाठी हार्मोन्सचा मारा:

गायीची शारिरिक वाढ लवकर व्हावी व तीने लवकर गर्भ धारण करावा म्हणुन हार्मोन्स दिले जातात. (आजकाल मुली लवकर वयात येतात हे आपण ऐकतो. का येणार नाहीत? गायींना दिलेले ते वाढीचे हार्मोन दुधातुन आपल्या मुलींना आपणच पाजतो नं?)


सहावी पायरी:हालचालींवर बंधने:

गायींना हालचाल करायला जागा देत नाहीत. याचे दोन फायदे असतात. एक तर हालचाल नं केल्याने सर्व उर्जा दुध अथवा चरबी बनवण्यात खर्च होते. दुसरे म्हणजे तेव्हढ्याच जागेत जास्तं गायी मावु शकतात.

ह्या सर्व अत्याचारांमुळे त्यांना अर्थातच अनेक असाध्य रोग होतात. पार खंगल्यामुळे तीन ते चार वर्षातच त्यांचा मृत्यु होतो. आजारी गायींवर ऍंटिबायोटिक्सचा प्रचंड मारा करतात. त्यांना दिलेले हार्मोन्स आणि ऍंटिबायोटिक्स मग दुधातही आढळतात.


गायींना या यातना आपण जन्मभर भोगायला लावतो. मग आपल्या पूर्वजांनी यदाकदाचित गायींना मारून खाल्लेही असेल तर त्यात इतके वाईट वाटण्यासारखे काय आहे?


अजुनही तुम्ही हा लेख वाचताय याबद्दल तुमचे आभार.


कोणी काय खायचे हा ज्याचा त्याचा प्रश्नं आहे. जर तुम्हाला फार विचारच करायचा नसेल, तर हा लेख अर्थातच तुमच्यासाठी नाही. पण आपल्या ताटात पडणारे अन्नं कसे तयार झाले आहे याचा विचार करणे जर तुम्हाला गरजेचे वाटत असेल, किंवा मानवतेच्या किंवा धर्माच्या दृष्टिकोनातुन आपण काही तरी अयोग्य करत आहोत ह्याची जाणिव जर तुम्हाला झाली असेल तर माझ्या पुढच्या लेखाची वाट पहा. आहार, आरोग्य आणि पर्यावरण या दृष्टिकोनातुन चर्चा पुढील लेखात.




छायाचित्रे फार्म सॅंक्चुअरीच्या सौजन्याने.

Saturday, September 27, 2008

गावो विश्वस्य मातरः - भाग २: आहार

बबनराव: डॉक्टर, हल्ली फार थकवा जाणवतो. लॅक्टोज घेत जाऊ का मी सकाळ संध्याकाळ?
डॉक्टर:(हसत) छे छे बबनराव, काही तरी काय? अहो मोठ्यांना लॅक्टोजची काही गरज नसते. चांगले जेवत जा भरपूर आणि मी हे टॉनिक देतो ते घ्या काही दिवस.
थोड्या वेळानंतर
संपतराव:डॉक्टर, हल्ली फार थकवा जाणवतो. दुध घेत जाऊ का मी सकाळ संध्याकाळ?
डॉक्टर: अवश्य!
खरं म्हणजे बबनराव आणि संपतरावांनी डॉक्टरांना एकच प्रश्न विचारला होता. (कारण लॅक्टोज हा दुधातला सर्वात प्रमुख घटक आहे.) मग डॉक्टरांनी बबनरावांना वेड्यात काढले पण संपतरावांना मात्रं मान्यता दिली असे का?


कारण "दुध प्या" असे डॉक्टर किंवा आहारतज्ञ जेव्हा तुम्हाला सांगतात तेव्हा दुधातील प्रोटीन आणि मिनरल्स (कॅल्शियम आदी) ही आवश्यक तत्वे तुम्हाला मिळतील ही त्यामागची भावना असते. मात्रं एका गोष्टीकडे डॉक्टर व आहारतज्ञ सोयिस्करपणे दुर्लक्ष करतात. ती म्हणजे दुधात जितकी उपायकारक तत्वे असतात त्यापेक्षा जास्त अपायकारक तत्वे असतात.


प्रश्नं: दुध हे खरेच अमृत आहे का?


उत्तर: होय, बैलाच्या वाढीसाठी दुधासारखे दुसरे अमृत नाही.


प्रश्न: आणि माणसासाठी?


उत्तर: हे तुमचे तुम्ही ठरवा.


प्रश्न: दुधात असते तरी काय?


उत्तर:





लॅक्टोज हे साखरेचे एक स्वरूप आहे. चरबी(फॅट)मधे कॉलेस्टरॉल असते. (आहारातुन मिळणारे कोलेस्टरॉल फक्त प्राणिजन्य पदार्थातुनच मिळते. वनस्पतींमधे कॉलेस्टरॉल नसते.)

म्हणजे उपायकारक तत्वे ४%, अपायकारक तत्वे ८% आणि उरलेले पाणी असा सरळ हिशोब आहे. शिवाय गायीला अथवा म्हशीला हार्मोन्स, एंटिबायोटिक दिले असेल तर ते ही.

उपायकारक तत्वांपैकी B12 वगळता सर्व घटक वनस्पतीजन्य पदार्थातून मिळू शकतात. फोर्टिफाईड सिरियल मधुन B12 ही मिळु शकते.

दुधातून मिळालेले कॅल्शियम हाडांसाठी चांगले नसते असे काही तज्ञ मानतात. फिजिशियन्स कमिटी फॉर रिस्पॉन्सिबल मेडिसिनने दिलेला हा लेख वाचा.

http://www.pcrm.org/resources/education/nutrition/nutrition7.html

मग असे असताना आपल्या पुर्वजांनी दुधाची इतकी भलावण का केली असावी? सर्वच परिस्थितीत दुध वाईट असते का? जेव्हा अन्नाची उपलब्धता आजच्या इतकी नव्हती आणि शारिरीक श्रम हे जिवनाचा अविभाज्य भाग होते तेव्हा दुध हे आहारतील कमतरता भरून काढू शकत होते. आपल्या सुखवस्तु शहरी रहाणीमानाला मात्रं दुधाची काडीमात्रं आवश्यकता नाही. डायबेटिस, हृदयविकार, लठ्ठ्पणा अस्थिविकार असे रोग सामान्यतः पांढरपेशांनाच झालेले आढळतात त्यामागचे एक महत्वाचे कारण म्हणजे दुध.

अर्थात आपल्या खाण्यापिण्यामधे सामाजिक आणि आर्थिक मुल्येही तितकीच महत्वाची असतात. दुध प्यायचे नाही तर चहा कसा पिणार? गोड काय खाणार असे प्रश्नं आपल्याला आणि इतरांना स्वाभाविकपणे पडणारच. हे प्रश्न सोडवणे आजच्या काळात फारसे कठीण नाही. सोया, तांदुळ, बदाम, हेम्प यापासून बनवलेले दुध -दही बाजारात उपलब्ध आहे.

मानवतेच्या किंवा प्रकृतीच्या दृष्टिकोनातुन तुमच्या ओळखीपैकी कोणी दुध घेत नसेल तर "कसलं हे फॅड?"अशी टिंगल नं करता त्यांना सहकार्य करा.

संदर्भ व अधिक माहिती:

http://www.milkfacts.info/Milk%20Composition/Milk%20Composition%20Page.htm

दुध आणि पर्यावरण पुढील लेखात.

Friday, September 26, 2008

ऑफ द ग्रिड

एकीकडे पर्यावरणाच्या प्रश्नावर जगभरातील सरकारे तसेच आंतरराष्ट्रिय समुदाय मुंगीच्या पावलानी प्रगती करत आहेत. तर दुसरीकडे काही नागरिक त्यांच्या परीने अथक प्रयत्नं करत आहेत. येथील स्थानिक व्हिजिटेरियन सोसायटीचे सदस्य श्री रॉन न्युमन हे गेल्या अनेक वर्षांपासून उर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहेत इतकेच नव्हे तर अतिरिक्त उर्जा बनवून ती विकतही आहेत. काही अगदी साधे उपाय आणि सोलर, जिओथर्मल असे एकत्रित उपाय त्यांनी केले आहेत. नुकत्याच एका कार्यक्रमात त्यांनी ह्या सर्वांची माहिती दिली तेव्हा त्याचे चित्रीकरण करण्याची संधी मला मिळाली.
यु ट्युबवर १० मिनिटांची मुदत असल्याने दोन भागात विभागलेल्या ह्या व्हिडियो बघा:







गावो विश्वस्य मातरः - भाग ३: पर्यावरण

"छ्या! काही तरी काय? इतकं चांगलं ताजं, नैसर्गिक दुध प्यायल्यानी पर्यावरणाचा र्‍हास कसा होईल? काय वेडबिड लागलंय का तुला? हे सगळं व्हेगन प्रकरण बंद कर आधी." अशा प्रकारची वाक्ये मला बरेचदा ऐकायला मिळतात.
हा विषयच चक्रावुन टाकणारा आहे. अवांतर गप्पा करताना पाच दहा मिनिटात मांडु शकेन असा हा मुद्दाच नाही. मी स्वतः अशाच प्रकारच्या साशंक दोलायमान मनस्थितीतुन गेलेली असल्यामुळे इतरांना मी समजुन घेऊ शकते, पण समजावु शकत नाही. अर्थात बहुतेकांना समजुनच घ्यायचे नसते हा भाग निराळा.
व्याख्या:(तुम्हाला पटो अथवा नं पटो) दुध हे द्रवरूपी मांस आहे. त्यामुळे यापुढे या लेखात मांस हाच शब्द द्रवरूपी किंवा घनरूपी मांसासाठी वापरणार आहे.
नोव्हेंबर २००६ मधे फुड एंड एग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन्सने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे http://www.fao.org/newsroom/en/news/2006/1000448/ या अहवालाप्रमाणे मांसासाठी पाळलेल्या प्राण्यांमुळे होणारे प्रदुषण हे वाहनांनी होणार्‍या प्रदुषणापेक्षा जास्त आहे.
आजकालचे तथाकथित पर्यावरणवादी "घरातील विजेचे बल्ब बदला", "सेल फोन चार्जरला लावून ठेवु नका" वगैरे हास्यास्पद उपाय सांगत असतात.
काही थोडा अधिक संयुक्तिक विचार करणारी मंडळी "कार चालवण्याऐवजी मी पायी चालतो/सायकल चालवतो/पब्लिक ट्रांसपोर्ट वापरतो" असे अभिमानाने सांगतात. पण हे सगळं करण्यापेक्षा किंवा करूनही मांस खाणे/पिणे सोडले तर पर्यावरणाचे कितीतरी पटीने संवर्धन होइल.
प्रश्न: खाद्य साखळीमधील मोठे प्राणि छोट्या प्राण्यांना खातात. मग आपण मांस खाल्लं तर काय बिघडलं?
उत्तर:
निसर्गाचे संतुलन हे प्रजातींच्या सुदृढ परस्परावलंबनावर(सुप) अवलंबुन असते.
या उलट रोगट परस्परावलंबनामुळे (रोप) संतुलन बिघडत जाते.
सुपचे उदाहरण: वाघाला भुक लागली. त्याने जंगलात फिरून हरणांच्या कळपाचा माग काढला. वाघाची चाहुल लागताच हरणे पळू लागली. एक म्हातारे हरिण मात्रं वेगाने पळू शकत नव्हते. ते हरिण वाघाने पकडले व खाल्ले. हरिणांच्या कळपातील ते दुबळे हरिण नाहिसे झाल्याने कळप अधिक सुदृढ झाला. तिसरीकडे हरणांच्या संख्येला आळा बसल्याने जंगलातील हिरवळ कायम टिकुन राहिली.
इथे वाघ आणि हरिण आपापले नैसर्गिक जिवन जगत आहेत. आपण हरणापेक्षा श्रेष्ठं आहोत अशा भावनेने वाघ जंगलात वावरत नाही. जगण्यासाठी आपण या हरणांवर अवलंबुन आहोत, आजुबाजुच्या हिरवळीचे ते आपल्या खाद्यात रुपांतर करतात हे वाघाला चांगल ठाऊक आहे.
रोपचे उदाहरण: वाघाला सारखी-सारखी शिकार करण्याचा कंटाळा आला. मी इतका सामर्थ्यवान असताना मला या तुच्छं हरणांच्या मागे तडमडायची काय गरज? असा विचार त्याच्या मनात डोकावु लागला. म्हणुन त्याने एक युक्ति केली. झाडे कापून एक कुरण तयार केले. त्या कुरणात हरणे आणून सोडली. हरणे पळून जाऊ नये म्हणून कुरणाला कुंपण घातले. भूक लागली की वाघ चांगले मोठे हरिण मारून खाऊ लागला.
त्यामुळे पुढची प्रजा तयार करण्यासाठी केवळ रोगट हरणेच शिल्लक राहीली. हरणांना विविध प्रकारचा पाला न मिळाल्यामुळे हरणे दुबळी झाली. त्यांचं मांस निकृष्टं चवहीन होत गेलं. पण वाघाला आता शिकार कशी करायची तेही आठवेना, म्हणून त्याने चवीकडे दुर्लक्षच केले. हरणांच्या सततच्या चरण्याने कुरणात फारसे गवत उगवेनासे झाले. मग वाघाने आणखी झाडे कापायला सुरूवात केली. हळुहळु वाघाकडे दहा कुरणे झाली. हरणांचे उरलेले मांस तो इतर वाघांना विकु लागला. आता वाघांना हवे तेव्हा हवे तितके मांस मिळू लागले. त्याचे पाहुन इतर वाघांनीही झाडे कापून कुरणे तयार केली. हरणांच्या चोर्‍यांचे प्रमाण वाढले. त्यामुळे कुरणांकडे लक्ष ठेवण्यासाठी आता आपल्याला बरीच पिल्ले व्हावी असे वाघांना वाटु लागले. त्यामुळे त्यांनी चार चार वाघिणींशी लग्नं करायला सुरूवात केली. दुसर्‍या वाघाची आपल्या वाघिणीवर नजरही पडू नये म्हणून वाघिणींवर बुरखा घालण्याची सक्ति करण्यात आली. वाघाची पिल्ले तरणी ताठी झाली तशी त्यांची कुरणे वाढू लागली. जंगल कमी कमी होत गेल्याने जंगलातील इतर प्राणि नामशेष होऊ लागले. काही हजार वर्षांनी अख्ख्या पृथ्वीवर हरिण आणि वाघ हे दोनच प्राणि शिल्लक राहिले. उरलेल्या हरणांना गवत कुठुन आणायचे असा गहन प्रश्नं समस्त व्याघ्र समुदायासमोर उभा राहिला.
तात्पर्य: मी सांगुन काही उपयोग आहे का? कोहमच्या म्हणण्याप्रमाणे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. पुढच्या पिढीला ही खोडच लागणार नाही अशी काळजी घेतली तर ते त्यांच्या हिताचे ठरेल.

Thursday, September 25, 2008

गावो विश्वस्य मातरः - भाग ४: आयुर्वेद

आयुर्वेदानुसार दूध हे अमृत आहे हे आपण नेहमी ऐकत आलो आहोत. ग्रंथांचे वाचन नं करता किंवा तज्ज्ञांना नं विचारता बहुतेकांनी त्याच्यावर विश्वासही ठेवलेला असतो. आयुर्वेदात खरोखर याविषयी काय लिहीले आहे हे जाणुन घेण्याची इच्छा होती. भारतात गेले असताना केवळ योगायोगाने औरंगाबाद येथील वैद्य श्री अनंत धर्माधिकारी यांचे नाव कळले. संपर्क साधताच त्यांनी मोठ्या मनाने, सर्वतोपरी प्रयत्नं करून माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली.

वैद्य श्री अनंत धर्माधिकारी यांचा अल्पपरिचय:

शिक्षण: आयुर्वेद विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन व पिएचडि

१९७१-१९९८ मुंबई,नागपुर व नांदेड येथे शासकिय विद्यालयात प्राध्यापक.

१९९८-२००० पोतदार मेडिकल कॉलेजचे डिन
२०००-२००४ डायरेक्टर ऑफ आयुर्वेद, महाराष्ट्र शासन.

प्रश्नोत्तरे:

प्रश्नं १: रोज दूध पिणे जरूरी आहे असे बहुतेकांना वाटते.आयुर्वेदाचा या बाबतित काय सल्ला आहे?

उत्तर: दररोज दूध पिण्याची गरज नाही. योग्य रितीने तयार केलेली भारतिय थाळी सर्व आवश्यक जिवनसत्वे(व्हिटॅमिन), रोग प्रतिकारक तत्वे(इम्युनायझर्स) व खनिजे (मिनरलस) यांनी परिपूर्ण असते. थाळीतील प्रथिने (प्रोटिन) व इतर पौष्टिक तत्वांनी आरोग्य लाभते, वृद्धिंगत होते व टिकुन रहाते. परंतु सप्लिमेंटसची आवश्यकता असलेल्यांनी खालील नियमांचे पालन करून दुधाचे सेवन करावे:

नियम क्र १: दुधाचे सेवन करण्यापुर्वी आधी खाल्लेले सर्व अन्न पचलेले असायला हवे. अर्धे पचलेले अन्नं पोटात असताना सेवन केल्यास रोगकारक अवस्था तयार होते. वात कफ व पित्त या विकारांमधे एकाच वेळी वाढ होते.

नियम क्र. २: अजिबात व्यायाम नं करणार्‍याने अजिबात दूध प्यायचे नाही.

नियम क्र ३: चांगली भुक लागल्याशिवाय कधीही प्यायचे नाही.

नियम क्र ४: दूध आणि फळं कधीही एकत्रं खायची नाहीत.

नियम क्र ५: रात्री दूध कधीही प्यायचं नाही.

नियम क्र ६: सकाळी उठल्यावर लगेच दूध प्यायचं नाही.

नियम क्र ७: व्यायामकरून भूक लागल्यावरच प्यायचं.

प्रश्नं २: वाढत्या वयाच्या मुलांनी दिवसातुन एकदा किंवा दोनदा दूध प्यावे असा सर्वसाधारण समज आहे. आयुर्वेद या बाबतित काय सांगते?


उत्तर: वयाच्या ५-६ वर्षापर्यंतच दूध द्यावे.


प्रश्नं ३: गरोदर स्त्रियांनी दूध पिणे गरजेचे असते काय?

उत्तर: सप्लिमेंटसची आवश्यकता भासल्यास गरोदर स्त्रिया दूध पिऊ शकतात, मात्रं उत्तर क्र. १ मधील नियम पाळणे आवश्यक आहे.

प्रश्न ४: स्तनपान देणार्‍या मातेला दूध पिणे गरजेचे असते काय?

उत्तर: वरील क्रं ३ प्रमाणेच

प्रश्न ५: आहारात दुग्धजन्य पदार्थांचा वापर टाळुन सुदृढ जिवन जगणे शक्य आहे का?

उत्तर: आहारातील इतर घटक कोणते यावर अवलंबुन आहे. भारतिय थाळी पद्धतीचे जेवण उपलब्ध असल्यास शक्य आहे.

प्रश्न ६: आयुर्वेदात दुधाचे पर्याय सुचवले आहेत का?

तुप, ताक,मुगडाळ, सुके खजुर,आवळे इ. द्यावे. (अपवाद पाच ते सहा वर्षापर्यंत)

प्रश्न ७: गायींचे पालनपोषण व आहार या विषयी आयुर्वेद काय सांगते?

आयुर्वेदात या विषयी जे नियम आहेत, त्यात उत्पादन वाढीपेक्षा गुणवत्तेवर भर दिलेला आहे. ते नियम खालीलप्रमाणे:

  • दिवसा गाय गोठ्यात बांधलेली नसावी. गायीला दिवसभर चरायला सोडणे आवश्यक आहे. विविध प्रकारचे हिरवे गवत जिथे नैसर्गिकरित्या उगवते तेथे गाईला चरायला द्यावे. अशा ठिकाणी सहाजिकच गवताची निवड गाय स्वतःच करते. विविध प्रकारच्या गवतामुळे दुधात आवश्यक गुण निर्माण होतात.
  • बाहेर ढगाळलेले वातावरण नसावे. दिवसभर फिरून होणारा व्यायाम व दिवसभर मिळणारा सूर्याचा स्वच्छ प्रकाश यामुळे गायीचे आरोग्य सुधारते.
  • संध्याकाळी परत आल्यावर गाईचे दूध काढावे. त्या दुधात तिखट कडु व तुरट हे आवश्यक रस भरपूर प्रमाणात आढळतात. असे दूध चवीला गोड लागते, पचायला हलके असते तसेच आरोग्यवर्धक असते. असे दूध आवश्यकतेनुसार, उत्तर क्र १ मधे सांगितलेल्या नियमांचे पालनकरून रोज प्यायला हरकत नाही.

प्रश्नं ८: वर सांगितलेले नियम नं पाळता दूध काढले असेल,उदा. गोठ्यात बांधलेल्या गाईचे दूध काढले असेल तर त्या दुधाचे तुप किंवा दही खाल्ले तर चालते का?

उत्तर: अगदी कमी प्रमाणात. दररोज ४०-५० मिली ताक पिता येईल.



क्रमशः

पुढील भागात वरील माहितीचे संदर्भ.
विशेष आभार: वैद्या सौ. चारूस्मिता शहा, अमरावती.