सतारीचा क्लास
आज सहज युट्युबवर रेंगाळताना ही व्हिडिओ सापडली:
आज सहज युट्युबवर रेंगाळताना ही व्हिडिओ सापडली:
Posted by
A woman from India
at
9/18/2007 01:45:00 PM
1 comments
Labels: indian classical music, sitar, सतार, हिंदुस्थानी शास्त्रिय संगीत
हरेकृष्णाजींनी गणेश मुर्ती बनवणार्या कारागीरांना तुमच्या समोर आणलं आहे.
त्यावरून मला काही दिवसांपूर्वी घडलेला एक प्रसंग आठवला. इथे जवळच शहिद परवेज आणि शशांक यांच्या जुगलबंदीचा कार्यक्रम होता. कार्यक्रम छान झाला. शहिदांची काळी भोर सतार फार देखणी दिसत होती. म्हणून कार्यक्रम संपल्यावर आवर्जुन त्यांना त्याविषयी विचारले. त्यांना आवडतो म्हणून सतारीला काळा रंग देऊन घेतल्याचे त्यांनी सांगितले. तोपर्यंत त्यांनी सतार गवसणीत घातल्यामुळे बनवणार्याचे नाव वाचता आले नाही. म्हणून सहजच सतार कोणी बनवली? हा प्रश्न विचारला. तेव्हा मात्रं त्यांनी फारच उडवा उडवीची उत्तरे दिली. "मी स्वतः मला पाहिजे तशी बनवून घेतली आहे. सतारीपेक्षा वाजवणारा महत्वाचा आहे. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही माझ्यासारखी सतार घेतली म्हणजे तुम्हाला वाजवता येईल?" वगैरे वगैरे असंबद्ध उद्गार काढले.
वाद्ये बनवणे ही एक कला आहे. सतारीसारखे नाजूक वाद्य बनवायला तर खासच कसब लागते. दर्जेदार,कसलेले लाकूड मिळवणे, योग्य आकाराचा भोपळा मिळवणे, वाद्याची जुळवाजुळव करणे, नक्षिकाम करणे, थाट बसवणे, जवारीचे काम करणे. ही सगळी कामे अत्यंत गुंतागुंतीची आहेत. सुमार दर्जाच्या सतारी बनवणारे अनेक कारागीर आहेत. पण उत्कृष्ट दर्जाच्या सतारी बनवणारे अगदी हाताच्या बोटावर मोजण्यासारखे आहेत. संगीतकारांच्या असतात तशाच त्यांच्याही पिढ्यानपिढ्या या व्यवसायात गुंतलेल्या आहेत. पडद्यामागच्या (अक्षरशः - की तारांमागच्या?) या कलाकारांना जराही श्रेय नं देता उलट खिजगणतीही नं करण हे मला फारच चुकीचे वाटते.
दिल्ली येथील रिकीराम घराण्याने रविशंकरांच्या घराण्यासाठी सतारी बनवल्या आहेत. आता रिकीराम यांचे सुपुत्रं श्री संजय रिकीराम ही परंपरा चालवतात. अनुष्का यांच्या सतारीही तेच बनवतात. माझी सतार त्यांच्याकडूनच घेतली आहे.
संजय रिकीरामांपर्यंत पोचण्याच्या आधी मला अनेक लोकांनी चुना लावला आहे. अमेरिकेतल्या पहिल्या गुरूंनी तर भरमसाठ (चार आकडी) डॉलर घेऊन अतिशय सुमार सतार मला विकली. सतार पहिल्यांदा घरी आली आणि उघडली तेव्हा तर मला रडूच कोसळायचे बाकी होते. कारण जिथे कारागीराचे नाव लिहिलेले असते ती पट्टीच गायब होती. इतके पैसे दिले आहेत तर चांगल्या नावाजलेल्या कारागीराचे नाव तिथे बघण्याची माझी अपेक्षा पार धुळीला मिळाली. ते माझे गुरू आहेत याचा जराही मुलाहिजा नं बाळगता सतार त्यांना साभार परत केली. स्वतः कलाकार असून इतका संकुचित दृष्टिकोन कसा काय असु शकतो?
शहिद परवेजांसारख्या कलाकारानी इतर कलाकारांचा आदर करावा. भारताबाहेर राहून ही कला पुढे नेऊ पहाणार्या माझ्यासारख्या नवशिक्या, हौशी विद्यार्थांना जमेल तितकी माहिती देऊन मार्गदर्शन करावे ही विनंती.
Posted by
A woman from India
at
7/02/2007 11:00:00 PM
7
comments
Labels: indian classical music, sitar, सतार, हिंदुस्थानी शास्त्रिय संगीत
आश्चर्य वाटलं नं?
अमरावती हे माझ्या गावाचेच नाही तर एका रागाचेही नाव आहे - रागकोष चाळता चाळता अचानक कळले.
रागकोषात याचे वर्णन असे आहे -
थाट खमाज - औडव-संपूर्ण, वादी ग संवादी ध , नि कोमल
आरोह: सा रे ग म ध सां
अवरोह: सां नि ध प म ग रे सा
गान समय : रात्रीचा दुसरा प्रहर.
Posted by
A woman from India
at
9/19/2006 09:15:00 PM
1 comments
Labels: culture, indian classical music, music, स्फुट, हिंदुस्थानी शास्त्रिय संगीत
बसंत बुखारीनंतर बागेश्री, हंसध्वनी आणि शिवाय मांड इतकं सगळं ५ दिवसात शिकुन मी शार्लेटहुन परत आले आहे. शिवाय मिंड्कारी, लयकारीचे वेगवेगळे ढंग!!! या सगळ्याची प्रॅक्टिस करायला काही महिने जातील.
इंद्रजित खुपच डाउन टु अर्थ आहेत, आणि हातचं काहीही नं राखता शिकवायला तयार.
गेल्यावर त्यांच्या पाया पडा वगैरे गोष्टी मुळीच कराव्या लागत नाहीत. एकदम इझी गोइंग.
बागेश्री हा राग माझा आवडता राग, त्यातुन हा राग मी आधी पं हबीब खानांकडुन सतारीवर आणि गाण्यात सरला बाईंकडे शिकले असल्यानी पटापट शिकता आलं. नुकत्याच एका कार्यक्रमात मी वाजवला पण होता. आता नविन शिकलेली मिंड्कारी आणि लयकारी आधी बागेश्रीतच वाजवुन बघणार आहे.
रविवारी इंद्रजितच्या शिकवणीची एक व्हिडियो पण तयार केली आहे. त्याची DVD मला लवकरच मिळेल आशी आशा आहे.
सतारी सारखं वाद्य अमेरिकेतल्या अशा छोट्या गावात शिकायचं म्हणजे असंच काही तरी करत शिकावं लागणार. डरहॅमला आल्यापासुन गाण्याचा क्लासही सुटला आहे - अवेळी सुरु केलेली ही संगीत साधना अशी अधांतरीच रहाणार आहे!!!!
Posted by
A woman from India
at
9/18/2006 11:06:00 PM
3
comments
Labels: culture, indian classical music, music, स्फुट, हिंदुस्थानी शास्त्रिय संगीत
शास्त्रिय संगीत शिकण्याचे खरे वय म्हणजे ४ ते २०. लहानपणापासुन ऐकण्याची आवड असली तरी शिकण्यावर कधी भर दिला नव्हता. एक मैत्रिणीच्या आग्रहाखातर ७-८ वर्षापुर्वी सतार शिकायला सुरुवात केली - आता या मैत्रिणिला सतार शिकायचीच का हुक्की आली, आणि तिने तिच्याबरोबर मी ही शिकायला जावे असे का ठरवले आणि त्या निर्णयाला मी का मान्यता दिली हे आम्हाला दोघींनाही सांगता येणार नाही. मैत्रिणीने सतारीला केव्हाच रामराम ठोकला आहे - मी मात्रं अजुनही काहीतरी तुणतुण वाजवायचा प्रयत्नं करते आहे.
इंद्रजित बॅनर्जी शार्लेट्ला आले आहेत म्हणुन मी ही आठवडाभर एथे मुक्काम ठोकुन आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी मला बसंत बुखारी शिकवायला घेतला. नुसता आरोह अवरोह वाजवुन दाखवत असतानाही त्यांचा प्रत्येक स्वर दमदार आणि सौंदर्याने नटलेला आहे हे माझ्या लक्षात आले. म्हणुन मी त्यांना म्हंटलं की मला फ़ार पाठांतर नं देता सौंदर्यात भर पडेल असं काही तरी शिकवा. त्यामुळे सध्या मी विविध प्रकारचे मिंड, क्रंतन ई शिकण्याचा केविलवाणा प्रयत्नं करते आहे.
त्यातुन ते भारतात परत गेल्यावर मी काय करायचं हा प्रश्नं आहेच.
हजारो ख्वाईशे ऐसी की हर ख्वाईश पे दम निकले....
रे नि सा - रे ग - ग - म ग म (क्रिंतन) ग(मिंड) सा......
- - -
Posted by
A woman from India
at
9/14/2006 12:17:00 AM
0
comments
Labels: culture, indian classical music, music, स्फुट, हिंदुस्थानी शास्त्रिय संगीत