Saturday, March 08, 2008

दिसामाजी काहीतरी....पण काय? भाग २

ट्युलिपने हयात नसलेल्या लेखकांच्या रचनांबद्दल प्रश्न विचारला आहे. सर्वांच्या सोयीसाठी त्यासंबंधीची माहिती स्वतंत्रं पोस्टमधे देते आहे:
मी काही कोणी वकील बिकील नाही, पण इंटरनेटवर, विशेषतः
या दुव्यावर जी माहिती मिळाली ती थोडक्यात मराठीत देत आहे:
सद्ध्याचा आंतरराष्ट्रिय प्रताधिकार कायदा, ज्यावर जगातल्या बहुतेक देशांनी सह्या केल्या आहेत, त्यानुसार:
१. कुठल्याही रचनेचे प्रताधिकार रचना मुर्त स्वरूपात उतरल्या क्षणापासुन रचनाकाराच्या मृत्युनंतर ७० वर्षे पर्यंत रचनाकाराकडेच रहातात.
२. रचनाकार "ही रचना सार्वजनिक वापरासाठी आहे" असे सांगु शकतात, मात्रं तसे त्यांनी निःसंदिग्धपणे सांगितलेले असावे लागते. तसे सांगितल्यावर अर्थातच रचनाकाराच्या हयातीतही त्या विशिष्ट रचनेची प्रत करता येते.
३. रचनाकार प्रताधिकार इतरांना (वारस, ट्रस्ट किंवा प्रकाशक) देण्याचा करार करू शकतात. सर्व हक्कं स्वाधिन करण्यासाठी कायदेशीर लिखित करार करणे आवश्यक आहे.
४. प्रताधिकार वैयक्तिक संपत्तीत बसत असल्याने रचनाकाराच्या मृत्युनंतर ते हक्कं त्याच्या/तिच्या कायदेशीर वारसाकडे हस्तांतरित होतात. ह्यासंबंधी त्या त्या देशातील कायदे लागु पडतात.
५. कायदेशीर वारस नसलेले रचनाकार बहुदा मृत्युनंतरचे हक्कं प्रकाशक किंवा एखाद्या ट्रस्टकडे देऊन ठेवतात.
६. रचनाकारास कायदेशीर वारस नसेल व मृत्युनंतर हक्कं कुणला दिले नसतील तरी ही मृत्युनंतर ७० वर्षेपर्यंत कोणीही प्रती काढु शकत नाही.

Friday, March 07, 2008

दिसामाजी काही तरी...पण काय?

"दिसामाजी काही तरी लिहावे" याचा अर्थ बरेचसे ब्लॉगर "दिसामाजी काही तरी ढापावे" असा काढताना दिसत आहेत. ट्युलिपच्या लेखाची गौरवीने केलेली चोरी अयोग्य आहे.
गड्यांनो, तुम्हाला वेळ आहे, फुकट आहे, एखादी कविता/पुस्तक आवडते, कॉपी पेस्ट करता येते म्हणुन वाट्टेल ते ढापायचा अधिकार मिळत नाही.
विदग्धचे
प्रताधिकाराचे कवित्व फारच बोलके आहे.

अभ्यासु किंवा हौशी ब्लॉगर्सनी श्रेयासहित इतरांचे संदर्भ देणे ठिक आहे. परंतु तुमच्या ब्लॉगवर जाहिराती असतील तर तो चोरलेल्या मजकुराचा चक्कं व्यावसायिक उपयोग ठरतो याचे भान ठेवावे.
हयात नसलेल्या लेखकांचे/कवींचे साहित्य आपण बिनदिक्कत प्रसिद्ध करू शकतो हाही एक गैरसमज आहे. त्या रचनांचे कायदेशीर प्रकाशन हक्कं अजुनही कुणाकडे असण्याची शक्यता आहे.
प्रकाशनाचे हक्कं हे लिखित मजकुरापुरतेच मर्यादित नसतात. दृक्श्राव्य माध्यमांनाही तेच नियम लागु पडतात. बर्‍याचश्या ब्लॉग्जवर चोरलेली छायाचित्रे दिसतात. छायाचित्रं तुम्ही स्वतः काढलेले नसेल तर मुळ छायाचित्रकाराच्या परवानगीने श्रेयासहित प्रसिद्ध करावे.

Wednesday, March 05, 2008

मोकळं आभाळ:वन्यज जिवनपद्धती-भाग पाच

खरं तर ज्याच्यापासुन दूर जायचे त्याच्यासारखे पर्याय तरी का धुंडाळावेत माणसानी?पण मनाला एखादी गोष्ट पटली तरी शरीराची सवय ही सवय असते, ती जाता जाताच जाते. म्हणुन पर्याय शोधत असतो आपण. आता ह्या भागात काही मांसाहाराचे पर्याय सांगणार आहे, पण खरोखरच हे पर्याय आहेत की नाही हे मांसाहार करण्यार्‍यानेच ठरवावे. मी स्वतः कधीच मांसाहार केला नसल्याने त्याचे पर्याय धुंडाळायची कधी गरज वाटत नाही. व्हिगन बनु पहाणार्‍या मांसाहारी लोकांसाठी अनेक पदार्थ उपलब्ध आहेत. याला मॉक मिट - खोटे मास असे म्हणतात. एरवी खर्‍याच काय पण खोट्या मांसाहारी पदार्थांकडेही मी ढुंकुन पहात नाही. पण खाली दिलेले पदार्थ मात्रं त्याला अपवाद आहेत. कशाचे पर्याय म्हणुन नव्हे तर निव्वळ चांगले लागतात म्हणुन!!








सायटान/सेटान अथवा व्हिट ग्लुटन:

गव्हापासुन बनवलेले असते म्हणुन याला व्हिट मीटही म्हणतात. घरीही बनवता येते. बाजारात तयारही मिळते. सायटानचे तुकडे करून बिर्याणी, कबाब किंवा नुसती रस्सा भाजी करून बघा.

टेम्पे:
फसफसलेल्या (फ़रमेंटेड) सोयाबियांपासुन बनवलेले टेंम्पे मुळचे इंडोनेशियातले खाद्य आहे. टोफुपेक्षा टेम्पे सरस आहे कारण ते पूर्ण धान्यापासुन बनवले जाते. प्रक्रिया केलेले नसते आणि त्यामुळे पचायला सोपे असते. टेम्पेचे चौकोनी तुकडे करून जरा तेलावर परतुन घ्यावे. परतलेले तुकडे वर तिखट मिठ लावुन नुसते एपेटायझर/साईड डिश म्हणुन वाढता येतात किंवा फ्राईड राईसमधे घालता येतात.


फिल्ड रोस्ट कंपनीचे सॉसेज:
बाजारात व्हिगन सॉसेजेसचे बरेचसे प्रकार उपलब्ध आहेत. परंतु फिल्ड रोस्ट कंपनीच्या एपल सेज सॉसेजची सर कशालाही येत नाही. सॉसेजचे हव्या त्या आकाराचे तुकडे करून ते तव्यावर जरासे तेल घालुन परतुन घ्यावे. नुसते खायलाही किंवा केचप किंवा मस्टर्ड बरोबर चांगले लागतात. बारीक तुकडे करून कोरड्या भाजीत टाकता येतात, भाताच्या प्रकारात तसेच कबाबमधेही चांगले लागतात.

फिल्ड रोस्ट कंपनीचे सिलेब्रेशन रोस्ट:

सिलेब्रेशन रोस्टच्या स्लाईसेस नुसते एपेटायझर म्हणुन वाढता येतात. बर्गरची पॅटी म्हणुन किंवा झटपट चांगले पोट भरणारे सॅंडविच बनवण्यासाठीही छान उपयोग होतो.

वरीलप्रमाणे पदार्थ करून बघा. सुग्रणींनो आणि वाचकांनो स्वतःची रचनात्कमता वापरून ह्या साहित्यापासुन नविन नविन पाककृतीही करून बघा आणि तुमच्या प्रयोगाबद्दल नक्की कळवा.

अश्विनी, तु विचारलेल्या काही पदार्थांची तरी माहिती वर आली आहे. इतर पुढील भागात.