Wednesday, February 28, 2007

समवयस्कं

येसाबाई आमच्या वाडयात कामाला यायला लागली त्याला जवळपास १७-१८ वर्षे झाली. आली तेव्हा पोटुशी होती आणि एक तान्हे मूल कडेवर होते. काम कसं, पगार किती वगैरे ठरवाठरवी करताना "कामावर लागल्यावर एक-दोन महिन्यातच बाळंतपणासाठी सुटी घेणार" या मुद्यावरही चर्चा झाली. बाळंतपण यथासांग पार पडले, फारशी रजा नं घेता येसाबाई आठवडाभरातच पुन्हा कामावर रुजु झाली. दुसराही मुलगाच झाला होता. तेव्हा "येसाबाई, आता पुरे" असा माझा आगंतुक सल्ला तिने मनावर घेतला नाही. "ताई तुमाला काई कळत न्हाई आमच्य लोकात कसं आसतं ते" असं म्हणुन मला गप्पं बसवलं.
येसाबाईने घरकामाचे करियर नुकतेच सुरू केले होते. त्याच वेळी माझेही संगणक व्यवसायात नुकतेच पाऊल पडले होते. एकीकडे माझा व्यवसाय नावारूपाला येत होता आणि एकीकडे येसाबाईचा संसार फुलत होता. अजु, विजुच्या पाठोपाठ नितु आणि रितुंचे आगमन झाले. त्याबरोबर पैशाची गरज वाढली. मग घरच्या धुणं भांड्याबरोबर माझ्या ऑफिसची साफसुफ करण्याचे कामही तिच्यावर सोपवले. कामाचा दर्जा तसा बेताचाच, उरकही फार नाही, पण नियमितपणा आणि भरोशाची या गुणावर टिकुन राहिली. दरम्यान माझ्या भावाचेही लग्नं झाले, त्याचाही संसार फुलू लागला. येसाबाईने वहिनीकडुन पोळ्या करायला शिकुन घेतल्या आणि तेही काम अंगावर घेतले.
येसाबाईला साक्षर करायचे माझे आणि वहिनीचे सगळे प्रयत्नं तिने सपशेल हाणून पाडले. पण सरकार दप्तरी तिची गणना साक्षर म्हणून आहे. रांगोळी काढायला शिकावी तसे ती आपले नाव लिहायला शकली आहे. त्यामुळे आगंठा नं लावता ती सही करते. वाचायला अक्षर मात्रं काडीचे येत नाही.
बाई तशी सोशिक, हसतमुख. कोणी काही बोललं तर फारसं मनाला लावून नं घेता, हसण्यावारी नेणारी. नवर्‍याचे पोटही हातावरच होते. हमालपुर्‍यातल्या बहुतेक बायका नवर्‍याच्या जाचाला कंटाळलेल्या असल्या तरी येसाबाईचा संसार त्यातल्या त्यात बरा चालला असावा. नवर्‍याने दारू पिऊन मारल्याची तक्रार तिने कधी केली नाही. सहसा दांड्या मारायची नाही, पण उन्हाळ्यात खानदेशात माहेरपणाला जाणे मात्रं कधी चुकायचे नाही.
मधुनच मग "तुमच्यावाणी शिकले आसते तं मी बी कुटच्या कुटं गेले आसते, म्हाया भाऊ लई तालेवार हाये, तुमच्याकडं हाये तशी फटफटी हाय त्याच्याकडं बी." असं म्हणणार, किंवा "तुमी किती साद्या हाये ताई, मी तुमच्यावाणी पैसा कमवला आसता तर लई मोठे दागीने घेतले आसते - तुमी काऊन काई घालत न्हाई अंगावर बरं?" असा टोमणा मारणार.
दुपारच्या वेळी माझ्या ऑफिसची झाडझुड करायची. फडकं घेऊन, एका हाताने साडी सावरत दुसर्‍या हाताने जरा बिचकत बिचकतच कॉम्प्युटर पुसायची. त्यावेळी मग ऑफिसमधे काम करणार्‍याला मुलींशीही गप्पा मारायची. आणि मधुनच "तुमी कवा लाडू खाऊ घालणार ताई? तुमच्या लग्नात चांगली भारी साडी घेईन" असं बजावायची. एक दिवस ऑफिसमधे काम करणारी बिजल मला म्हणाली, "मॅडम मॅडम, तुम्हाला माहिती आहे, येसाबाई आणि तुम्ही एकाच वयाच्या आहात!". "क्क्क्काय?"मी जवळ जवळ ओरडलेच. "बिजल, तुला या नस्त्या चांभारचौकशा करायची काय गरज?" असे मी वर-वर म्हणून विषयांतर केले, तरी त्या वाक्याने मला बरेच काही शिकवले. येसाबाई चाळिशीच्या आसपास तरी असावी असा माझा कयास होता. परिस्थितीने येसाबाईला पोक्तं बनवले होते. खडतर आयुष्यानी माणसं अवेळी म्हातारी होतात का?
हळूहळू तिची मुलं मोठी होऊ लागली तशा इतर वंचना वाढल्या. मुलांचे शिक्षण करता करता नाकी नऊ येऊ लागले. अडीअडचणीला पैसे उधार मागायची. प्रामाणिकपणे चुकतेही करायची. मुलं अभ्यासात फारशी रमली नाही. वहिनीने घरच्या घरी शिकवायचा प्रयत्नं केला, पण रागावण्याला घाबरून येईनाशी झाली. मी म्हणायचे, मुलींना तरी काहीतरी शिकवा, नाही तर त्याही धुणी-भांडीच करत बसतील तुमच्यासारखी. "काय वं ताई, त्यांची डोस्की चालंना." ती म्हणायची. शिक्षणाच महत्व तिला कधीच समजलं नाही.
मुली सात-आठ वर्षांच्या झाल्या तशी त्यांनाही कामावर आणू लागली. त्या तिला हातभार लावू लागल्या तेव्हा मला तिचा फार राग आला. "येसाबाई, हे तुमचे बाल कामगार आमच्या घरात आणू नका. " मी म्हणायचे. आधी ती काही बोलली नाही. मी फारच चिडले तेव्हा ती म्हणाली, "काय करू ओ बाई, आमच्या हमालपुर्‍यात पोरं लई फिरत्यात उनाडावानी - लई घोर लागते जिवाले. पोरीइची नाचक्की झाली तं कुटं जावं बाई? विजु झाला तवाच तुमी म्ह्टलं होतं आता बास म्हणुनशानी - म्याच न्हाई ऐकलं तुमचं. आता पोरं वाढा लागले तसं तरास बी वाढला" मी गप्पं झाले. अडाणी येसाबाईने मला पुन्हा एक धडा शिकवला होता. अखेर घरकामात मुलींनी हातभार लावला तरी ऑफिसचे काम येसाबाईने स्वतःच करायला पाहिजे असा नियम मी घालून दिला.
मध्यंतरी आम्ही वाडा सोडून फ्लॅटमधे रहायला गेलो. येसाबाई तिथेही येऊ लागली.
व्यवसायामुळे माझे बाहेरगावी आणि परदेशातही जाणे/रहाणे सुरू झाले तसा येसाबाईचा आणि माझा संपर्क कमी झाला. मधेच काही बारिकसारिक कुरबूर होऊन तिचे येणे ही बंद झाल्याचे मला परदेशात असताना कळले. मग काही दिवसानी ती पुन्हा कामावर रुजू झाल्याचेही कळले. एकदा भारतात गेली असताना नितूचे लग्नं झाल्याचे कळले. एरवी १२-१३ व्या वर्षी मुलीचे लग्नं लावल्याचे कळल्यावर मी तिच्यावर चांगलीच चिडले असते, पण हमालपुर्‍यात राहुन तरण्या ताठ्या मुलीची जबाबदारी ती फार काळ घेऊ शकणार नव्हतीच हे आता मी समजून घेऊ शकत होते.
एकदा मात्रं तिच्या आयुष्यात एक चांगली घटना घडली. नवर्‍याला कामाच्या ठिकाणी काही पैसे मिळाले आणि तिच्या भावाने हातभार लावला - त्या भरवशावर तिने चक्कं घर बांधले. अखेर हमालपुर्‍यातुन बाहेर पडली आमची येसाबाई. त्या वर्षी भारतात गेले तेव्हा तिच्या नविन, ऐसपैस घरात पाहुणचारही घेऊन आले.
माझं लग्नं ठरल्याचा आनंद माझ्या घरच्यांच्या बरोबरीने तिलाही झाला. रिसेप्शनसाठी आम्ही दोघं भारतात गेलो तेव्हा आपल्या बहिणीला आणि नविन जावयाला कुठे ठेऊ आणि कुठे नको अशी भावाची अवस्था. वहिनी नेहेमीप्रमाणे आल्या गेल्याचं बघायला तत्पर आणि आत चाललेली येसाबाईची लगबग. असं वातावरण होतं. येसाबाईला आम्ही अगदी घरच्यासारखं वागवतो हे बघून नवर्‍यालाही कौतुक वाटलं. नवर्‍यानी माझ्याबरोबर तिचा, ती काम करत असताना असे किती तरी फोटोही काढले. खरं म्हणजे त्यावेळी तिच्या घरातही बरीच कठीण परिस्थिती होती. नितू बाळंतपणासाठी घरी आली होती आणि स्वतः येसाबाईला एक छोटा अपघातही झाला होता. पण त्या कशाचीही तमा नं बाळगता सकाळपासून रात्रीपर्यंत ती आमच्या घरात पडेल ते काम करायची - जणु काही पुलंची "नारायणी".
मग पुढच्या दिवाळीत मी पुन्हा भारतात गेले (इटलीतुन गेले तेव्हा). लहान्या रितुचे आयुष्यही आता येसाबाईच्याच वळणावर जाणार असं दिसतं आहे. शिक्षणात तिचं मन अजिबात नाही आणि शिवणकाम वगैरे शिकण्याचे प्रयत्नंही अयशस्वी झाले आहेत. मोठी नितु अजुन अठरा वर्षाची झालेली नाही, पण एकदा अयशस्वी झाल्यानंतर दुसर्‍या खेपेला ती आई झाली आहे. मी अजुन आई झालेले नाही आणि येसाबाई मात्रं आजी झाली आहे. पिढ्या दर पिढ्यांच्या या दुष्टचक्रातून काही सुटका नाही का त्यांची? आपण दुष्टं चक्रात आहोत असं तिला वाटत असेल का? तिच्या चष्म्यातून पहाताना माझेही आयुष्य कुठल्यातरी दुष्टचक्रात गरगरताना दिसत असेल का?

Monday, February 26, 2007

पुन्हा एकदा धन्यवाद आणि अभिनंदन

माझ्या ब्लॉगला बक्षिस मिळाले नसले, तरी मला मत देणार्‍या वाचकांना धन्यवाद.
विजेत्यांचे अभिनंदन!
एकुणच या स्पर्धेविषयी माझ्या मनात संमिश्र भावना आहेत. ब्लॉगर्सची अशी एकमेकांशी स्पर्धा लावणे योग्य का अयोग्य? इतरांशी स्पर्धा करायची की सहकार्य की दोन्ही? स्पर्धा, नामांकन किंवा बक्षिस मिळणे याला कितपत महत्व द्यावे? ही स्पर्धा म्हणजे बाजारुपणा तर नाही ना? एक ना अनेक प्रश्नांनी मला ग्रासले होते/आहे. त्यामुळेच मला मत द्या असं मी कुणालाही सांगितलं नाही, इतकंच काय, मी स्वतःही मतदानात भाग घेतला नाही. गायत्री किंवा आनंदघन यांना मत द्यावे असा मोह बरेचदा झाला, पण या प्रश्नांचा उंबरठा ओलांडता आला नाही. त्याचा एक फायदा नक्कीच झाला-जी काही मते पडली (१५) ती माझा ब्लॉग खरोखर आवडणार्‍या वाचकांचीच आहेत असं मला आवर्जुन म्हणता येईल आणि म्हणुनच तुमचे विषेश आभार मानायचे आहेत.
ज्यांना नामांकन किंवा बक्षिस मिळाले नाही त्यांचेही अभिनंदन कारण-
आपले विचार शक्य तितक्या प्रामाणिकपणे,निर्भिडपणे, नेमक्या शब्दात उतरवणे ही स्वतःची स्वतःशी स्पर्धा आहे. रोजच्या रहाटीतुन जाताना डोक्यात आलेले विचार निसटायच्या आधीच बंदिस्त करायची स्पर्धा आहे. इतर अनेक भूमिका बजावताना मनाच्या कोपर्‍यातल्या लेखक/लेखिकेला जागते ठेवयाची स्पर्धा आहे. काऊच पोटॅटो नं बनता, आयुष्य खर्‍या अर्थाने अनुभवून त्याचे प्रतिबिंब लिखाणात उतरवण्याची स्पर्धा आहे. रहस्व-दीर्घाच्या चुका नं करण्याची स्पर्धा आहे असंही म्हणू का? ( मी त्यात नापास) या सर्व स्पर्धात भाग घेतल्याबद्दल प्रत्येक ब्लॉगरचे अभिनंदन!

Wednesday, February 14, 2007

माझा ब्लॉग इंडिब्लॉगीज २००६ साठी नामांकित - धन्यवाद!

वाचकांनो,
तुमच्यापैकी कोणीतरी माझा ब्लॉग http://www.indibloggies.org/ च्या स्पर्धेसाठी सुचवला आणि मला नामांकन प्राप्तही झाले आहे हे मला नुकतेच कळले (म्हणजे असा काही प्रकार आहे हे ही नुकतेच कळले.)
नामांकनाची यादी इथे वाचा: http://www.indibloggies.org/nominations-2006/
Best Indic Blog (Marathi) या शिर्षकाखाली तुम्हाला मराठी नामांकन दिसेल. त्या यादीतील ब्लॉग (एकुण १४) वाचून तुम्हाला जो आवडेल त्या ब्लॉगची निवड करा. मतदान २० तारखेपर्यंत खुले आहे.
तुमच्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.