Showing posts with label मराठी. Show all posts
Showing posts with label मराठी. Show all posts

Saturday, March 08, 2008

दिसामाजी काहीतरी....पण काय? भाग २

ट्युलिपने हयात नसलेल्या लेखकांच्या रचनांबद्दल प्रश्न विचारला आहे. सर्वांच्या सोयीसाठी त्यासंबंधीची माहिती स्वतंत्रं पोस्टमधे देते आहे:
मी काही कोणी वकील बिकील नाही, पण इंटरनेटवर, विशेषतः
या दुव्यावर जी माहिती मिळाली ती थोडक्यात मराठीत देत आहे:
सद्ध्याचा आंतरराष्ट्रिय प्रताधिकार कायदा, ज्यावर जगातल्या बहुतेक देशांनी सह्या केल्या आहेत, त्यानुसार:
१. कुठल्याही रचनेचे प्रताधिकार रचना मुर्त स्वरूपात उतरल्या क्षणापासुन रचनाकाराच्या मृत्युनंतर ७० वर्षे पर्यंत रचनाकाराकडेच रहातात.
२. रचनाकार "ही रचना सार्वजनिक वापरासाठी आहे" असे सांगु शकतात, मात्रं तसे त्यांनी निःसंदिग्धपणे सांगितलेले असावे लागते. तसे सांगितल्यावर अर्थातच रचनाकाराच्या हयातीतही त्या विशिष्ट रचनेची प्रत करता येते.
३. रचनाकार प्रताधिकार इतरांना (वारस, ट्रस्ट किंवा प्रकाशक) देण्याचा करार करू शकतात. सर्व हक्कं स्वाधिन करण्यासाठी कायदेशीर लिखित करार करणे आवश्यक आहे.
४. प्रताधिकार वैयक्तिक संपत्तीत बसत असल्याने रचनाकाराच्या मृत्युनंतर ते हक्कं त्याच्या/तिच्या कायदेशीर वारसाकडे हस्तांतरित होतात. ह्यासंबंधी त्या त्या देशातील कायदे लागु पडतात.
५. कायदेशीर वारस नसलेले रचनाकार बहुदा मृत्युनंतरचे हक्कं प्रकाशक किंवा एखाद्या ट्रस्टकडे देऊन ठेवतात.
६. रचनाकारास कायदेशीर वारस नसेल व मृत्युनंतर हक्कं कुणला दिले नसतील तरी ही मृत्युनंतर ७० वर्षेपर्यंत कोणीही प्रती काढु शकत नाही.

Friday, March 07, 2008

दिसामाजी काही तरी...पण काय?

"दिसामाजी काही तरी लिहावे" याचा अर्थ बरेचसे ब्लॉगर "दिसामाजी काही तरी ढापावे" असा काढताना दिसत आहेत. ट्युलिपच्या लेखाची गौरवीने केलेली चोरी अयोग्य आहे.
गड्यांनो, तुम्हाला वेळ आहे, फुकट आहे, एखादी कविता/पुस्तक आवडते, कॉपी पेस्ट करता येते म्हणुन वाट्टेल ते ढापायचा अधिकार मिळत नाही.
विदग्धचे
प्रताधिकाराचे कवित्व फारच बोलके आहे.

अभ्यासु किंवा हौशी ब्लॉगर्सनी श्रेयासहित इतरांचे संदर्भ देणे ठिक आहे. परंतु तुमच्या ब्लॉगवर जाहिराती असतील तर तो चोरलेल्या मजकुराचा चक्कं व्यावसायिक उपयोग ठरतो याचे भान ठेवावे.
हयात नसलेल्या लेखकांचे/कवींचे साहित्य आपण बिनदिक्कत प्रसिद्ध करू शकतो हाही एक गैरसमज आहे. त्या रचनांचे कायदेशीर प्रकाशन हक्कं अजुनही कुणाकडे असण्याची शक्यता आहे.
प्रकाशनाचे हक्कं हे लिखित मजकुरापुरतेच मर्यादित नसतात. दृक्श्राव्य माध्यमांनाही तेच नियम लागु पडतात. बर्‍याचश्या ब्लॉग्जवर चोरलेली छायाचित्रे दिसतात. छायाचित्रं तुम्ही स्वतः काढलेले नसेल तर मुळ छायाचित्रकाराच्या परवानगीने श्रेयासहित प्रसिद्ध करावे.

Wednesday, August 15, 2007

बदलत्या भाषा

मराठीवर आक्रमण होत असल्याची तक्रार बरेच वर्षांपासुन ऐकायला मिळते आहे. याला आक्रमण म्हणायचे की समृद्धतेत पडलेली भर म्हणायचे या विषयी मतभेद आहेतच.
मराठीवर इंग्रजीचाच नव्हे तर मालिका आणि सिनेमांच्या माध्यमातुन सतत भडिमार झाल्यामुळे हिंदीचाही प्रभाव पडु लागला. नंतर संगणक आणि इंटरनेट वापरणार्‍या माझ्यासारख्यांनी इतर भाषेतील शब्दं वापरण्याबरोबर व्याकरणाचे नियमही सैल करायला सुरूवात केली आहे. मध्यंतरीच्या काळात बारहासारखी सुविधा अस्तित्वात नसताना बर्‍याच लोकांनी रोमन लिपीत मराठी लिहायला सुरूवात केली.
हौशी ब्लॉग लेखकांनी जर नियमांची पायमल्ली केली तर ते समजण्यासारखे आहे. मात्रं काल प्रत्यक्ष
महाराष्ट्र टाईम्स मधे "इतकी सारी कठीण परिस्थिती असतानादेखील तिच्या आईने आपल्या मुलीचं म्युझिकप्रति असलेलं पॅशन तसंच राहावं याची दक्षता घेतली" असं हिंग्लिशमधुन अनुवादित केलेलं वाक्य वाचुन मलाही गरगरलं. याला अक्ष्यमं हलगर्जीपणा म्हणावे की असे वाक्प्रचार मराठीत प्रचलित झाल्याची मान्यता म्हणावे?
अर्थात बदलत्या भाषेविषयी किंवा ती नष्टं होण्याच्या मार्गावर असल्याची भिती वाटणे हे फक्तं मराठीच्याच बाबतीत घडते आहे असे ही नाही. इथे अमेरिकेत कायदेशिर अथवा बेकायदेशिर मार्गाने येणारे मेक्सिकन लोक इंग्रजी शिकत नाहीत याविषयी बहुजनांमधे बराच असंतोष दिसुन येतो. वैश्विकीकरणामुळे सर्वच भाषांचा एकमेकांवर प्रभाव पडु लागला आहे. संगणकावर टाईप करताना you चा u आणि for चा 4 होतो. हिंग्लिश, मॅंल्गिश (मॅंडेरिन आणि इंग्लिश) आणि स्पॅंगलिश (स्पॅनिश आणि इंग्लिश) अशा संकरित भाषाही नव्याने तयार होत आहेत. आपण सगळे मिळून नकळत एका जागतिक भाषेकडे वाटचाल करत आहोत का?