Thursday, November 22, 2007

खबरदार पुनर्जन्म घ्याल तर!

तिबेटमधल्या लामांनी सरकारी परवानगी शिवाय पुनर्जन्म घेऊ नये असा आदेश चिनी सरकारनी काढला आहे. आदेश हास्यास्पद वाटला तरी चिनी सरकार मात्रं या बाबतीत गंभीर आहे. खुद्द दलाई लामांनी नियुक्त केलेला पंचेन लामा सरकारनी पळवला आहे आणि त्या जागी सरकारी उमेदवार नेमला आहे.

"श्रीमंत व्हा पण स्वातंत्र्य मागु नका" हा चीनी सरकारने जनतेला दिलेला मंत्र आहे.

चीनचे कम्युनिस्ट सरकार जनतेच्या स्वातंत्र्यावर संपूर्ण नियंत्रण ठेवते आहे यात काहीच नवल नाही. या कार्यात ते आधुनिक तंत्रज्ञानाचाही चांगलाच उपयोग करून घेतात हे ही अपेक्षितच आहे. मात्रं सिसको, याहु, गुगल,मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या पैशावर डोळा ठेवुन चीन सरकारच्या या मुस्कटदाबीत बरोबरीचे भागीदारी बनतात ही बाब फारच गंभीर आहे.

व्यक्ति स्वातंत्र्य, अभिव्यक्ति स्वातंत्र्य,लोकशाही या तत्वांवर आधारित समाजव्यवस्थेत जन्माला आलेल्या आणि वाढलेल्या या बहुराष्ट्रिय कंपन्या ह्या तत्वांशी किमान निष्ठा राखतील अशी अपेक्षा होती.

इंटरनेटसारखे खुले माध्यम जन्माला आले तो मानवजातीच्या इतिहासातला एक महत्वाचा क्षण होता. इंटरनेट खरं तर अनेक स्वप्नं घेऊनच जन्माला आले. अख्ख्या विश्वाचे एक सपाट,इवलेसे खेडे बनवण्याचे स्वप्नं. समान संधी, समान हक्कांचे स्वप्नं. जगभरातील स्वातंत्र्य प्रेमी, समता प्रेमींच्या हातात आलेले हे एक अमुल्य शस्त्रं. या आधुनिक शस्त्रामुळे स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणार्‍यांच्या मनात एक नविन उमेद निर्माण झाली. जनमानसावर आपली हुकुमत गाजवणार्‍या जुलमी सत्तांविरुद्ध संघटित होणे, आवाज उठवणे आता सामान्यांना सहज शक्य होणार होते. चीन, उत्तर कोरिया, म्यानमार या सारख्या देशांना माहितीच्या देवाण-घेवाणीवर नियंत्रण ठेवणे केवळ अशक्य होईल अशी स्वप्ने स्वतंत्र वृत्तीच्या लोकांना पडू लागली.


पण नाही, ते स्वप्न दिवा स्वप्नंच ठरले. उलट चीनी सरकार इंटरनेटचाच गळा दाबण्यात यशस्वी झाले. चीनची बाजारपेठ बहुराष्ट्रिय कंपन्यांना खुणावत होती. त्या मोहापायी चिनी सरकार जे म्हणेल त्याला या कंपन्यांनी होकार दिला. त्याही पुढे जाऊन, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मुस्कटदाबी अधिक प्रभावशाली कशी होईल त्याचे शिक्षण या कंपन्यांनीच चिनी सरकारला द्यायला सुरूवात केली!



मायक्रोसॉफ्टच्या चिनी ब्लॉग सर्व्हिसमधे व शोधयंत्रामधे स्वातंत्र्य, लोकशाही आणि मानवी ह्क्कं हे शब्द ब्लॉक केलेले आहेत. सरकारी हुकुमावरून ब्लॉगज बंद करण्याचे प्रकार सर्रास चालु आहेत.

२००५ मधे शिताओ नावाच्या एका पत्रकाराला चीनी सरकारनी शिक्षा ठोठावली. ह्या पत्रकाराच्या कारवायांची याहुने पुरवलेली माहिती त्याच्या विरुद्धचा पुरावा म्हणुन देण्यात आली.

सिसको कंपनीने चिनी सरकारला एक खास टेहळणीची यंत्रणा उभी करून दिली आहे. या यंत्रणेमुळे नागरिकांच्या इंटरनेटवरील हालचालींवर बारीक लक्ष ठेवता येणे सहज शक्य झाले आहे.

वरील सर्व उदाहरणांवरून असे लक्षात येते की आहे त्या तंत्रज्ञानाचा नुसता गैरवापर होतो आहे असे नाही. मुलभूत हक्कांवर गदा आणण्यासाठी जाणिवपूर्वक तंत्रज्ञान पुरवण्यात येते आहे.

जगभरातील जनजिवनावर प्रभाव टाकण्याची प्रचंड क्षमता बहुराष्ट्रिय कंपन्यांकडे आहे. त्यांची संपत्ती कित्येक छोट्या देशांच्या एकुण उत्पन्नापेक्षा जास्त आहे. दुसरीकडे चीन दिवसेंदिवस अधिकाधिक प्रभावशाली बनत चालला आहे. आफ्रिकेतल्या तेल विहीरी एका पाठोपाठ एक ताब्यात घेण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. अमेरिकेसारखे प्रगत देश सुदानसारख्या मानवी अधिकाराची पायमल्ली करणार्‍या देशाशी आर्थिक संबंध ठेवत नाही. परंतु चीन मात्रं कुठलाही शहानिशा नं बाळगता या देशांना तंत्रज्ञान पुरवते आहे. नायजेरियन डेल्टा व सुदान सारख्या भागांमधुन चीनची वसाहत बनते आहे. चिनी कंपन्या स्थानिक तरूणांना रोजगार नं देता चीनमधुन मनुष्यबळ आयात करत आहेत. यामुळे स्थानिक लोकांमधे बराच असंतोष आहे.


भारतात जनेतेने विरोध केल्यामुळे बरेचदा प्रकल्प रखडतात. चीनमधे तसा प्रकार नसल्याने आर्थिक प्रगतीच्या दिशेने ते भरधाव निघाले आहेत. चीन एक यशस्वी, प्रगत देश झाल्यावर ती शासन यंत्रणा आदर्श म्हणुन इतर देशात राबवली जाण्याची दाट शक्यता आहे.
शीतयुद्धाच्या काळात अमेरिकन कंपन्यांचे हितसंबंध रशियात गुंतलेले नव्हते. खुली बाजारपेठ आणि साम्यवादी अर्थव्यवस्थेची एकमेकात सरमिसळ झाली नव्हती. ती परिस्थिती आता राहिलेले नाही. त्याचे चांगले अथवा वाईट परिणाम होऊ शकतात. चीनी सरकार देशाला हळुहळु लोकशाहीकडे नेईल ही शक्यता सद्ध्या तरी दिसत नाही. उलट ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला असेच म्हणायची परिस्थिती आत्ता तरी आहे.

न्युयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमधे नोंदणी झालेल्या चिनी कंपन्यांमधे अमेरिकन गुंतवणुकदार पैसे गुंतवत आहेत. या पार्श्वभुमीवर चिनी लोकशाही चळवळीला बाहेरच्या देशातुन पाठिंबा कितपत मिळेल ही शंकाच आहे. राज्यव्यवस्थेत अमुलाग्र बदल आणायचा म्हणजे तात्पुरती का होईना आर्थिक अस्थिरता येणारच. त्यामुळे चिनी लोकांना स्वतंत्र होऊ द्यायचे की स्वतःचे आर्थिक नुकसान करून घ्यायचे हा निर्णय करायची वेळ आल्यावर आंतर-राष्ट्रिय समुदाय लोकशाहीच्या बाजुने उभा राहु शकेल का नाही ही शंकाच आहे.
कालची आर्थिक बलस्थाने स्वातंत्र्य, मानवी हक्कं व लोकशाहींचे गोडवे गात होती. उद्याची बलस्थाने मात्रं जाचक, हुकुमशाही धार्जिणी होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Thursday, November 15, 2007

पहाटेस अर्घ्य दे दोन अर्ध्या स्वरांचे

उतरवुनी ठेव गंधार अन धैवत जरासे
पहाटेस अर्घ्य दे दोन अर्ध्या स्वरांचे

पॅट मथेनींचा आणि सकाळच्या रागांचा काही एक संबंध नसावा. पण त्यांच्या कार्यक्रमात अचानक सुचलेल्या या दोन ओळी. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा कार्यक्रम फारसा आवडला नाही. गेल्या वर्षीच्या रोमांचकारी अनुभवाची आस लावुन शेवटपर्यंत ऐकला. पण अखेरपर्यंत सूर सापडला नाही. नाही म्हणायला एंतोनियो सॅंचेझने ड्रम्समधे अक्षरशः जीव ओतला.
कार्यक्रमाचं मुल्यमापन करायला वापरण्यात आलेली (अशास्त्रिय) पद्धत:
स्वरलहरींवर जीव तरंगायला लागला का?
तरंगताना तो एका अनामिक प्रदेशात भटकायला गेला का?
तिथे किती वेळ थांबला?
परतल्यानंतर काही क्षण तरी आयुष्यात सगळं भरून पावलं ही भावना मनात भरून राहिली का?
हॅंग ओव्हर किती वेळ/दिवस टिकला?

Monday, November 12, 2007

व्हेजिटेरियन थॅक्स-गिव्हिंगचे निमंत्रण व मेन्यु

भारतात दिवाळीचे दिवस सरतात, त्याच सुमाराच इथे अमेरिकेत सणासुदीचे दिवस सुरू होतात.

ऑक्टोबरच्या अखेरिस बाळ-गोपाळांचा आवडता हॅलोविन येतो.

त्यानंतर येते थॅंक्स गिव्हिंग आणि अर्थातच मग ख्रिसमस व नविन वर्षाचे स्वागत.

१६२१ साली मे फ्लॉवर या जहाजातुन आलेले यात्रेकरू व इथले स्थानिक रेड इंडियन यांनी मिळुन चांगले पीक आल्याबद्दल मेजवानीचे आयोजन केले.

त्यानंतर काही वर्षे अनियमितपणे थॅंक्स गिव्हिंग साजरे केल्या गेले. सुमारे दोनशे वर्षांनी थॅंक्स गिव्हिंगला राष्ट्रीय सण म्हणुन मान्यता मिळाली.

आजच्या काळात कुटंबातील मंडळी एकत्रं येऊन जेवणाचा आनंद घेतात. या जेवणात टर्कीचे जेवण बनवतात. त्या पाठोपाठ पम्पकिन पायचा समावेश असतो.

थॅंक्स-गिव्हिंग आणि टर्की हे आज अविभाज्य मानले जात असले तरी मूळ मेजवानीत टर्की अथवा पम्पकिन पाय या दोन्हीचा ही समावेश नव्हता. टर्की नक्की कधी पासून आणि का या सणाशी जोडली गेली याच्या बर्‍याच आख्यायिका आहेत.

स्थानिक ट्रॅंगल व्हॅजिटेरियन सोसायटीने व्हेजिटेरियन थॅंक्स गिव्हिंगचे आयोजन केले आहे. अर्थातच टर्कींचा बळी नं देता जेवणाचा आनंद घेता येणार आहे.

यंदा या मेजवानीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळातो आहे. दुपारचे बुकिंग हाऊस फुल झाले आहे. त्यामुळे संध्याकाळचे जास्तीचे सिटींग उघडण्याचा आयोजकांचा प्रयत्नं आहे.

अधिक माहिती, रिझर्वेशन तसेच मेनु बघण्यासाठी इथे क्लिक करा:

http://www.trianglevegsociety.org/thanksgiving07/index.html

Tuesday, November 06, 2007

मंजुसाठी मुलगा पहा.....

कुणासाठी स्थळबिळ बघण्याइतकी मॅच्युरिटी माझ्यात मुळीच नाही. त्यातुन या मनस्वी मुलीसाठी स्थळ बघायची वेळ माझ्यावर यायलाच नको होती. मंजु एका चांगल्या घरातली मुलगी आहे,म्हणजे तिच्या वागण्यावरूनच तसं लक्षात येतं. उंचीपुरी, देखणी आहे. मी तिच्या हातचा चविष्टं स्वयंपाक चाखला आहे, रांगोळ्या, मेंदीची कलाकुसरही बघितली आहे.
बडनेरा स्टेशन. रात्रीचे १२ वाजुन गेलेले. बडनेर्‍याचं एक बरं आहे. दोनच प्लॅटफॉर्म्स आहेत. एका बाजुला मुंबईहुन येणार्‍या गाड्या आणि दुसर्‍या बाजुला मुंबईला जाणार्‍या गाड्या. नाही म्हणायला तिसरा एक प्लॅटफॉर्म आहे - खास अमरावतीच्या गाडीसाठी!
स्टेशनवर जरा अंधारच होता. पोचे-पोचे पर्यंत आम्हाला उशीरच झाला होता. पुलावरून खाली गाडी उभी असलेली दिसत होती. प्लॅटफॉर्मवर आलो तर ही गाडी आमची नसल्याचं लक्षात आलं (नशीब लक्षात आलं !)
सेवाग्राम एक्स्प्रेसमधे आपला डबा कुठे येणार तो अंदाज करून त्या दिशेनी चालु लागलो. अंधारात समोर दोन-चार आकृत्या दिसल्या. चक्कं ओळखीच्या वाटणार्‍या. तेच का ते? जरा डोळे चोळल्यासारखे करून बघितले. हो. तेच ते. मंजुचे बाबा श्री शंकर पापळकर मंजुशी खाणाखुणा करून काही तरी बोलत होते. बरोबर आणखीही काही लोक होते. बापरे, म्हणजे ही सगळी मंडळी मला निरोप देण्यासाठी चक्कं वझ्झरहुन खास आली होती.
आम्हाला बघताच ही मंडळी पुढे सरसावली. मंजुच्या हातात फुलांचा गुच्छ होता, आणि बाबांच्या हातात तिचा फोटो. नमस्कार चमत्कार झाले.
मंजुशी बोलायचा मी एक केविलवाणा प्रयत्नं केला. तिची खाणाखुणांची भाषा काही मला येत नाही. मंजुच्या बाबांच्या मध्यस्थीनेच तिच्याशी संवाद साधावा लागतो. तिच्या बाबांनी आधी अक्षता टाकल्याची आणि मग विमान उडाल्याची खूण केली.
या क्षणी मंजुच्या डोक्यात भविष्याबद्दल काय काय कल्पना आहेत आणि माझ्याकडनं काय अपेक्षा आहेत हया विचारानी खरं तर मला दडपणच आलं. पण चेहेर्‍यावर तसं नं दाखवता तिचा फोटो नीट पर्समधे ठेवला.
"ताई, इथेच याच स्टेशनवर मंजुला पहिल्यांदा घ्यायला आलो होतो मी."मंजुचे बाबा म्हणाले.
तेव्हढ्यात कोणीतरी चहा-बिहा मागवल्यामुळे विषयांतर झाले. पापळकर जरा जुन्या आठवणींमधे रमले.
"मुंबईच्या गाड्या कमी होत्या ताई आधी. तिकीटासाठी स्टेशनमास्तरच्या खोलीत जायचो आम्ही, तेव्हा प्रतिभाताई पण असायच्या लायनीत."
गाडी हलायची लक्षणे दिसु लागताच मंजुचे बाबा पुन्हा मुळ मुद्यावर आले.

"ताई, तिकडचं एखादं स्थळ बघाच मंजुसाठी. किती मोठी गोष्ट आहे ताई, तुम्हीच सांगा, किती मोठं नाव होईल आपलं! पापळकरांची मुलगी लग्नं होऊन अमेरिकेत गेली म्हणजे आज काही साधी गोष्टं नाही..."
काय बोलावे ते मला सुचेना. मी आपलं हो ला हो लावत होते.

गाडी सुटली. वरच्या बर्थवर स्थिरस्थावर झाले. डोळ्यात जबरदस्तं झोप होती. फुलांचा गुच्छ उशाशी होता. त्या गुच्छातुन अपेक्षप्रमाणे तिखाडीच्या गवताचा सुगंध येत होता. हा सुगंध माझ्या चांगला ओळखीचा आहे. हा अगदी टिपिकल वझ्झरचा वास आहे. लोक कुलदैवताला जातात तशी मी वझ्झरला पापळकरांच्या इथे जात आले आहे. अमेरिकेत येण्याच्या आधीपासुनच तिथल्या भेटी ठरलेल्या आहेत.

मंजुचे बाबा शंकर पापळकर म्हणजे काही साधीसुधी व्यक्ती नाही. आधी एक, नंतर दोन, असे करत करत थोड्या-थोडक्या नव्हे तर शहात्तर मुलांना त्यांनी दत्तक घेतले आहे. प्रत्येक मुलाला कसले तरी शारिरिक अथवा मानसिक आव्हान आहे. काहींचा बुदध्यांक शुन्याच्या जवळपास आहे. अख्ख्या महाराष्ट्रात अपंग अनाथ मुलांसाठी असलेले हे एकमेव रिमांड होम आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातुन किंवा बाहेरूनही ही मुले इथे आली आहेत.
त्या प्रत्येकाची कथा त्यांचे बाबा सांगु शकतात. कोण अनाथ, कोणाला जन्मदात्यांनी कुठे टाकले, बाबांकडे ते कसे आले, कोण ब्राम्हणाचा मुलगा, कोण मुसलमान, कोण एड्सग्रस्त. बहुतेक मुले अगदी तान्ही असतानाच त्यांच्याकडे आलेली आहेत.
बाबांच्या संगोपनात लहानाचे मोठी होऊन बर्‍याच जणांनी आपले संसारही थाटले आहेत. मतिमंद मुली सुखाचा संसार करताहेत, त्यांना निरोगी मुले-बाळेही झाली आहेत.
त्या सर्व कथा सांगताना बाबांचा चेहेरा अभिमानानी फुलतो.


बाबांच्या पंखाखाली मंजु आली तेव्हा चौदा पंधरा वर्षाची होती. आल्यापासूनच तिने घरचा बराच भार उचलला आहे. आतलं बाहेरचं सगळंच बघण्याची जबाबदारी तिच्यावर असते. गेल्या दोन-तीन वर्षापासुन तिच्या लग्नाची खटपट बाबा करतायेत. मंजु अतिशय स्वाभिमानी आहे आणि आत्तापर्यंत दोन मुलांना तिने नाकारले आहे! त्यामुळे सहाजिकच बाबा जरा अस्वस्थ आहेत.

पापळकरांचे कार्य म्हणजे खरं तर आमट्यांच्या तोडीचे आहे. त्यांचा जग प्रसिद्ध होण्याचा दिवस यायचा आहे एव्हढेच. आनंदवनाचा जसा कुष्ठंरोग्यांनी कायापालट केला आहे, तसाच या परिसराचा कायापालटही या अनाथ,अपंग मतिमंद मुलांनी केला आहे. एकेकाळी उघडे-बोडके असलेले ते डोंगर आता विविध वृक्षवल्लींनी नटले आहेत.

बाबांचा स्वभाव प्रसिद्धि परांगमुख म्हणा किंवा प्रसिद्धीवर ते नियंत्रण ठेवतात म्हणा. परवानगीशिवाय आश्रमात कोणी आलेले त्यांना आवडत नाही. मुलांसाठी पाहुण्यांनी काय खाऊ आणावा हे सुद्धा एक जागरूक वडिल या नात्यानी तेच सांगतात.

त्यांच्याच इच्छेला मान देऊन इतके दिवस मी त्यांच्या विषयी लेख लिहिण्याचा मोह टाळत आले आहे. पण आता मात्रं त्यांनी माझ्यावर इतकी मोठी जबाबदारी टाकली आहे. ती पार पाडण्यासाठी मला तुम्हा सगळ्यांच्या मदतीची नितांत आवश्यकता आहे.

मंजुसाठी मुलगा पहा. फार पैसेवाला नसला तरी चालेल. होतकरू, सालस, गुणी मेहेनती हवा. अमेरिकेतच असायला हवा असं काही नाही हं...कृपया माझं एव्हढं काम करा. कोणी चांगला मुलगा लक्षात आला तर मला kasakaay@gmail.com वर जरूर कळवा.

Tuesday, October 30, 2007

प्रवासाचे क्षण

प्रवास करायचा म्हंटला की कोणाच्या अंगात उत्साह संचारतो तर काहींच्या अंगावर मात्रं काटा येतो. आता क्वचित कधीतरी प्रवास करावा लागण्याचे कारण खेदजनक असु शकते. पण बहुतेक वेळा मात्रं आपण नातलगांना/मित्रांना भेटायला, कुठल्याशा प्रसंगाला उपस्थित रहाण्यासाठी, नोकरी धंद्यानिमित्त किंवा नुसतंच भटकायला प्रवास करतो. त्यामुळे एअरपोर्टवर गेलं की सगळीकडे आनंदी वातावरण असायला हवं की नाही? पण प्रत्यक्षात मात्रं तसं अजिबातच दिसत नाही.

न्यूयॉर्कहुन न्याहारीकरून निघालेला सदु जेवणाच्या वेळेच्या आत शिकागोला पोचलेला असतो. हया प्रवासासाठी सदुने घोडागाडी किंवा आगगाडी ऐवजी विमानाचा वापर केल्याने त्याचे कितीतरी दिवस, किमान काही तास तरी नक्कीच वाचले आहेत. पण हा वेळ वाचल्याचा आनंद म्हणा किंवा कृतज्ञता म्हणा सदुच्या चेहेर्‍यावर कधीतरी दिसते का? सदुच काय, पण विमानातुन उतरलेली कोणतीही व्यक्ति बघा, जमिनीवर पाय पडताच अगदी सुसाट पळू लागते. जणु काय आत्ताच्या आत्ता बाहेर पडलं नाही तर हे मुक्कामाचं गावच नाहीसं होणार आहे. हातात धरलेली पुलमन बिचारी त्यांच्या मागे घरंगळत असते गरर्र्र गरर्र गरर्र आवाज करत.
बरं चालावं लागु नये म्हणून लांबच्या लांब वॉकवे म्हणजे सरकणारे पट्टे केलेले असतात. त्यावर तरी हसत खेळत शांततेने उभं रहावं की नाही? नाही, हे त्यावरूनही धावत जाणार. जणू काही तो वॉकवे कुठेतरी जमिनीच्या आत लुप्तं होणार आहे अगदी पुढच्या मिनिटाला.
बरं ह्यांच्याशी दोन शब्दं बोलावं म्हंटलं तर कानात बोळे घातलेले असतात - कापसाचे नाही, स्पिकरचे. गरम तेल ओतावं कानात तसं संगीत ओतणारे ते बोळे. समोरच्याचा आवाज बंद केला की त्याच्या अस्तित्वाची दखलही घेण्याची गरज नसते. त्यामुळी ही मंडळी निर्जन प्रदेशात एकटेच चालल्यासारखी शून्यात बघत चालत असतात.
कामकरी महिला कानात बोळे नं घालताही शुन्यात बघत चालतात. कडक इस्त्री केलेले बिझनेस फॉर्मल, इस्त्री केल्यासारखेच दिसणारे केस. चेहेर्‍यावर पदाच्या तोलामोलाचा मेकअपचा मुखवटा. ताठ मान, ताठ पाठ. उगाच वाकलं तर हाडबिड मोडायचं. नजर अगदी सरळ समोर. मागे धरलेल्या अगदी ताठ हातातून घासल्या जाणार्‍या सामानात ऑफिसच्या फायली आणि लॅपटॉप. "मी ऑफिसच्या कामाने जातेय ना? यावेळी मी आई नाही, बायको नाही आणि स्त्री तर नाहीच नाही. आत्ता मी आहे फक्त एक निर्विकार एक्झिक्युटिव्ह". उंच टाचांच्या चपलांच्या टॉक टॉक आवाजानेच त्यांना झपाटले असते बहुदा. टॉक टॉक टॉक गरर्र गरर्र गरर्र.. यंत्रवत चालणे सुरू.
अहो, सुट्टीला जात असाल किंवा कामानिमित्त जात असाल, जरा घडीभर तरी आस्वाद घ्याकी तुमच्या प्रवासाचा!
तिकडे सदुला घ्यायला येणार्‍याचीही अवस्था त्रिशंकुसारखी असते. पार्किंगला पैसे पडू नये म्हणुन आणि आपल्या सदूला अगदी मिनिटभरही जादा एयरपोर्टवर घालवाला लागू नये म्हणुन हा माणूस एयरपोर्टच्या प्रदक्षिणा घालत असतो.

तीन चकरा. आली का फ्लाईट? बरं अजुन चकरा मारतो.
दहा चकरा. सामान घेतलंस का? हं मं बाहेर ये, मी येतोच आणखी एक चक्कर मारून.
बरं प्रवासात कंटाळले असतील म्हणुन असे वागतात म्हणावं तर सुरूवात कशी होते पहा.
बोर्डिंग सुरू व्हायच्या आधीच गेटसमोर रांगेत उभे रहातील. अहो सीट नंबर मिळालाय ना? मग आता विमानात सर्वांच्या आधी चढलात म्हणून मुक्कामाला इतरांपेक्षा पाच दहा मिनिटं आधी पोचणार आहात की काय? आणि विशेष म्हणजे प्रवास जितका मोठा तितकी ही रांग लवकर सुरू होते. आठ-दहा तासाची फ्लाईट असली तरी त्या हवेतुन जाणार्‍या कोंडवाड्यात घुसायची यांना किती घाई. खरं म्हणजे बोर्डिंगच्या आधी सर्व प्रवाशांनी मिळून काही तरी व्यायाम करावा किंवा गाण्याच्या भेंड्या, मामाचं पत्रं हारवलं सारखे खेळ खेळावे. पण नाही. तिथे रांगेत उभे रहातील अर्धा अर्धा तास.

बरं आता मुक्कामाला जातील, छान निसर्गरम्य ठिकाणी. तिथे जाऊन तरी जीवाला शांतता लाभू देतील का? तो निसर्ग रम्य देखावा तासनतास नुसता डोळ्यात साठवावा, निसर्गाशी एकरूप व्हावं, अंतर्मुख व्ह्यावं. चिडीचुप राहुन पाखरांची गाणी ऐकावी. झर्‍यात पाय सोडावेत, एखाद्या कातळावर चढुन डुलकी घ्यावी, सुरेल सोबत असल्यास हात हातात घ्यावा. वारा प्यावा, मावळत्या सूर्याला निरोप द्यावा, उगवत्या चंद्राचे चांदणे अंगावर सोसावे. त्या प्रदेशाची जमेल तितकी माहिती काढावी, तिथल्या माणसांच्या संस्कृतीविषयी जाणून घ्यावे. त्यांचे रोजचे जीवन कसे असेल ते अनुभवावे.
छे छे तसं काही होत नाही आपल्या सदुच्या बाबतीत. सदु आणि मंडळी डोंगराच्या टोकापर्यंत जातील. तिथे उभे राहुन फोटो काढतील. तेव्हढ्यात कोणी तरी विचारतं तुमच्या सगळ्यांचा एकत्रं फोटो काढु का? हो, हो छान, धन्यवाद. झालं. पुरावा मिळाला जाऊन आल्याचा. आता पुढचा पॉंईट. आलो आहोत ना इतक्या दुरून, मग सगळं बघायला नको? कुणीच नं दिलेलं टार्गेट पूर्ण करायच असतं, ते ही यशस्वीपणे.
या दृष्यापेक्षा पुढचं दृष्य जास्तं चांगलं असेल. या क्षणापेक्षा पुढचा क्षण जास्तं चांगला असेल म्हणून हा क्षण सरायला हवा. आजच्यापेक्षा उद्या जास्तं चांगला असेल. या चांगल्या उद्यासाठी आजचे बलिदान व्हायलाच हवे का?






नोंद: ते आम्ही नव्हे.

Friday, October 26, 2007

वणवा

दक्षिण कॅलिफोर्नियातील आग अजुन आटोक्यात आलेली नाही. लाखो लोक विस्थापित झाले आहेत आणि अब्जावधी डॉलरची मालमत्ता आगीत भस्मसात झाली आहे. तेथील मराठी ब्लॉग लेखक, वाचक तसेच इतर सर्व या संकटातुन सुखरूप बाहेर पडतील अशी आशा करू या.
अमेरिकेसारख्या प्रगत देशालाही अशा आपत्तींचा सामना करणे शक्य नाही. आपण इथले कर्ते करविते नाही हे पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे. कॅलिफोर्निया, नेवाडा, युटा, एरिझोना, कोलोरॅडो या राज्यात असलेल्या वाळवंटी प्रदेशात निसर्गाने अनेक आश्चर्यांची मुक्त हस्ताने उधळण केली आहे. ग्रॅंड कॅनियन, ब्राईस कॅनियन या सारखी सौंदर्य स्थळे बघण्यासाठी जगाच्या कानाकोपर्‍यातुन आलेले प्रवासी इथल्या प्रतिकुल हवामानाचा सामना करत या स्थळांना भेटी देतात.
या भागात पावसाचे प्रमाण फारच कमी आहे, तरीही ही आश्चर्यकारक स्थळे निर्माण होण्याला पाणीच कसे कारणिभूत आहे हे आर्चिस नॅशनल पार्क मधे दाखवण्यात येणार्‍या माहितीपटात बघायला मिळते.
आजच्या लेखाचा विषय अर्थातच पाणि नसून आग आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगींच्या मागची कारणे काय?
दगड धोंड्यांनी भरलेला वाळवंटी प्रदेश, पाण्याचा अभाव, बहुतांश खुरटी झाडे. जमिनीच्या ज्या भागात नियमितपणे थोडेसे का होईना, पाणि झिरपत असले की त्या आधारावर थोडी फार मोठी झाडे तग धरतात. वातावरणात आर्दता नसल्याने खाली पडलेली पाने, काटक्या इ. सहजा सहजी कुजत(डिकंपोज) नाहीत. उलट वाळल्यानी ती अधिकच ज्वालाग्राही बनतात.
प्रश्नं:
लाखो वर्षांपासून जर हीच परिस्थिती आहे तर हे जंगल आधीच का भस्मसात झालं नाही?
उत्तर: त्याचं कारण आहे निसर्गानी केलेली एक सोय. अशा जंगलात जेव्हा वादळ होते आणि विजा चमकतात, तेव्हा छोट्या छोट्या आगी सतत लागत असतात. एका विशिष्टं प्रकारे झाडावर वीज पडली की त्या झाडातील सर्व बाष्प एका क्षणात बाहेर पडते आणि झाडाला आग लागते. ती आग आजूबाजूला पसरते आणि त्या परिसरातील छोटी झाडे, झुडपे व इतर ज्वालग्राही पदार्थ जळून खाक होतात. मात्रं त्याच बरोबर पाऊसही पडत असल्याने आग फार मोठी होत नाही. अशा रितीने ज्वालाग्राही कचरा वरचे वर नष्टं होतो. त्याशिवाय मोठ्या झाडांमधे योग्य अंतरही राखले जाते. ही आग नेहेमीचीच असल्याने येथील जीवसृष्टी त्यापासून आपला बचाव सहज करू शकते.
प्रश्न:
मग आताच मोठी आग का लागली? तीही मनुष्य वस्तीच्या जवळच का लागली?
उत्तर:
अशा प्रतिकुल परिस्थितीत जेव्हा प्रगत माणसे तिथे रहायला आली तेव्हा जंगलातील एकुण एक झाड आपल्या उपयोगी तरी पडावे असे त्यांना वाटु लागले. त्यामुळे त्यांनी नैसर्गिकपणे लागलेल्या या आगी विझवायला सुरूवात केली. सुरवातीला त्यामागे कदाचित चांगलीच भावना असेल. वाळवंटात झाडांना आगीपासून वाचवणे म्हणजे निसर्ग संवर्धन करणे असेही बर्‍याच लोकांना वाटणे स्वाभाविक आहे. भावना चांगल्या असल्या तरी निसर्गाच्या कामात ढवळा ढवळ करण्याचे परिणाम हानिकारकच असतात. गेल्या काही दशकात या छोट्या आगींची उपयुक्तता जंगल नियोजन करणार्‍यांच्या लक्षात आली आहे. (हल्ली जमेल तिथे मुद्दाम अशा आगी लावण्यात येत आहेत. याला प्रिस्क्राईब्ड फायर असे नाव आहे.)
पण दरम्यानच्या काळात इथे मोठमोठ्या वस्त्या उभारल्या गेल्या. विहीरी, छोटी धरणे वाढत गेली आणि शहरे वसली. कोलोरॅडो नदीवर बांधलेल्या हुवर धरणाचे पाणि आले आणि लॉस एंजिल्स, सॅन दियेगो अशी प्रचंड आकाराची शहरे तयार झाली. मनुष्य वस्तींजवळ आगी नकोत म्हणून तेथील आगी विझवण्याचे काम सातत्याने सुरू राहिले.
अशा रितीने मनुष्य वस्त्यांजवळ ज्वालाग्राही पदार्थांचा खच वाढतच गेला. एका दृष्टिने हा बॉंब बर्‍याच वर्षांपासून टिकटिक करतो आहेच. तज्ञांना ते माहिती असुनही फार काही करता येत नव्हते. त्यात कोणी नतद्रष्टं माणसांनी जोराचा वारा वहात असताना मुद्दाम तीन आगी लावल्याचा संशय आहे. आता याला काय म्हणावं?
अरे माणसा माणसा, कधी होशील माणूस?

Wednesday, October 03, 2007

टेंप्लेट मधील बदल व टयुलिपची नाराजी इ.

मी सध्या बाहेरगावी आहे. मला इंटरनेटचा अगदी गरजेपुरताच वापर करता येतो. पण त्यातही मला काही लेखांचे प्रिंट आऊट काढायचे आहे. ते नीट यावेत म्हणुन टेंप्लॆट मधे तात्पुरते बदल केले आहेत. त्याबद्दल क्षमस्व.
ट्युलिपने माझ्या आधी वंदु आणि नंतर ...? वर नाराजी व्यक्त करणारा भला मोठा लेख प्रसिद्ध केला आहे. तो
इथे वाचा.
माझ्या लेखाची इतकी मोठी दखल घेतल्याबद्दल ट्युलिपचे आभार. टाळ्या आणि टिकांचे सारखेच स्वागत.
एक समाज म्हणुन आपण प्रश्नांना थेट हात घालणार आहोत की याला काय वाटेल, त्याला काय वाटेल असा विचार करत अस्तित्वात असलेली माहितीही दाबुन ठेवणार आहोत?
प्रश्नं तुमच्यासमोर मांडला आहे पुराव्यांसहित. आता वाईट बातमी घेऊन येणार्‍या दूताचाच शिरच्छेद करा अथवा प्रश्नं मिटवण्यासाठी प्रयत्नं करा.
तुमच्या भागातील गणेश मंडळांशी संपर्क साधा. त्यांना हे फोटो पाठबा, आपल्या उत्साहाच्या उधाणाचे काय परिणाम होतात ते त्यांना कळू द्या.
ट्युलिपला या विषयावर चर्चा करायची नाही. पण तुम्हाला करायची असेल तर जरूर इथे प्रतिक्रिया द्या.
टीप:
अश्विनी अंतिम युद्धचे पुढचे भाग प्रसिद्ध करते आहे. ते मी प्रवास संपल्यावरच इथे जोडणार आहे.

Saturday, September 22, 2007

आधी वंदु आणि नंतर?

दहा दिवस सळसळत्या उत्साहाचे, चैतन्याचे. आरास,प्रसाद,आरत्या, मिरवणुका. दहा दिवस कसे निघुन जातात कळतही नाही. लगेच येते अनंत चतुर्दशी. या दिवशी आपण आपल्या भक्तिचे,चैतन्याचे आणि मांगल्याचे सार्वजनिक विसर्जन करतो. आपल्या लाडक्या गणेशाचे पुढे काय होते?
http://www.ultrabrown.com/posts/the-battle-of-kurukshetra वरून घेतलेली ही छायाचित्रे:


आक्रमणकार्‍यांनी आपले देव भ्रष्टं केले आहेत मुर्तीभंजन केले आहे हे आपल्याला कदापिही मान्य नाही.

चित्रकार हुसेन आपल्या देवादिकांची उघडी नागडी चित्रे काढतात म्हणजे काय? हा घोर अपमान आहे...

समुद्रातुन जहाजांना जागा करून देणे म्हणजे हिंदु धर्माची अक्षम्य अवहेलना आहे....

आपण आहोत तरी कोण?

Tuesday, September 18, 2007

सतारीचा क्लास

आज सहज युट्युबवर रेंगाळताना ही व्हिडिओ सापडली:

Saturday, September 01, 2007

सलमान खान व संजयदत्त यांना झाली की नाही?

सलमान खान व संजयदत्त यांना बद्धकोष्ठं म्हणजे मराठीत कॉन्स्टिपेशन झालं आहे का?

तुरूंगात सतत येणं-जाणं असलेल्या या थोर गुन्हेगारांच्या प्रकृतीबद्दल मला जरा काळजी वाटु लागली आहे. देशवासियांना त्यांच्या दिनचर्येची माहिती क्षणोक्षणी कळवण्याचे सामाजिक कार्य आपले थोर पत्रकार रात्रंदिवस करत आहेत. या दोन गुन्हेगारांनी काय खाल्ले, रात्री झोप लागली की नाही ,भेटायला कोण सगे-सोयरे आले, त्यांनी कोणाशी हास्तांदोलन केले, कोणाला मिठी मारली अशी बहुमुल्य माहिती छापायला आपली लोकहितवादी, समाजाभिमुख व स्वतंत्र बाण्याची माध्यमे तत्पर आहेतच. परंतु या सगळ्या वर्णनात या दोन गुन्हेगारांनी शौचालयाचा वापर केल्याची बातमी काही वाचनात आली नाही (तुरूंगात ती सोय असते का हो?). त्यामुळे जरा काळजी वाटु लागली आहे. माध्यमांनी जनतेच्या उत्सुकतेची दखल घेऊन कृपया खुलासा करावा.

Wednesday, August 15, 2007

बदलत्या भाषा

मराठीवर आक्रमण होत असल्याची तक्रार बरेच वर्षांपासुन ऐकायला मिळते आहे. याला आक्रमण म्हणायचे की समृद्धतेत पडलेली भर म्हणायचे या विषयी मतभेद आहेतच.
मराठीवर इंग्रजीचाच नव्हे तर मालिका आणि सिनेमांच्या माध्यमातुन सतत भडिमार झाल्यामुळे हिंदीचाही प्रभाव पडु लागला. नंतर संगणक आणि इंटरनेट वापरणार्‍या माझ्यासारख्यांनी इतर भाषेतील शब्दं वापरण्याबरोबर व्याकरणाचे नियमही सैल करायला सुरूवात केली आहे. मध्यंतरीच्या काळात बारहासारखी सुविधा अस्तित्वात नसताना बर्‍याच लोकांनी रोमन लिपीत मराठी लिहायला सुरूवात केली.
हौशी ब्लॉग लेखकांनी जर नियमांची पायमल्ली केली तर ते समजण्यासारखे आहे. मात्रं काल प्रत्यक्ष
महाराष्ट्र टाईम्स मधे "इतकी सारी कठीण परिस्थिती असतानादेखील तिच्या आईने आपल्या मुलीचं म्युझिकप्रति असलेलं पॅशन तसंच राहावं याची दक्षता घेतली" असं हिंग्लिशमधुन अनुवादित केलेलं वाक्य वाचुन मलाही गरगरलं. याला अक्ष्यमं हलगर्जीपणा म्हणावे की असे वाक्प्रचार मराठीत प्रचलित झाल्याची मान्यता म्हणावे?
अर्थात बदलत्या भाषेविषयी किंवा ती नष्टं होण्याच्या मार्गावर असल्याची भिती वाटणे हे फक्तं मराठीच्याच बाबतीत घडते आहे असे ही नाही. इथे अमेरिकेत कायदेशिर अथवा बेकायदेशिर मार्गाने येणारे मेक्सिकन लोक इंग्रजी शिकत नाहीत याविषयी बहुजनांमधे बराच असंतोष दिसुन येतो. वैश्विकीकरणामुळे सर्वच भाषांचा एकमेकांवर प्रभाव पडु लागला आहे. संगणकावर टाईप करताना you चा u आणि for चा 4 होतो. हिंग्लिश, मॅंल्गिश (मॅंडेरिन आणि इंग्लिश) आणि स्पॅंगलिश (स्पॅनिश आणि इंग्लिश) अशा संकरित भाषाही नव्याने तयार होत आहेत. आपण सगळे मिळून नकळत एका जागतिक भाषेकडे वाटचाल करत आहोत का?

Wednesday, August 08, 2007

उजळो तुझा असाच मंद प्रकाश

अमेरिकन दुतावासाने डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे यांना पुरेसे (?) उत्पन्नं नसल्याच्या कारणास्तव व्हिसा आधी नाकारला आणि मग चुक लक्षात आल्यावर ओशाळून प्रदान केल्याची बातमी कुठेतरी वाचली होती. त्यावरून अखेर त्यांचा अमेरिकेत येण्याचा मार्ग सुकर झाल्याचे कळले होते. मात्रं प्रत्यक्षात त्यांच्या भेटीचा योग येईल अशी कल्पनाही नव्हती.
रॅले येथील निशा मिरचंदानी यांनी बाबांच्या जिवनावर "विसडम सॉंग" नावाचे पुस्तक लिहिले आहे. पुस्तकाचा अमेरिकेतील प्रकाशन सोहोळा ड्युक विद्यापिठात एका छोटेखानी कार्यक्रमात पार पडला.


आपला व्यवसाय सोडून सामाजिक कार्यात उतरलेल्या निशा मिरचंदानी यांनी वेळोवेळी भारतात जाऊन बाबांच्या आणि आमटे कुटुंबाच्या सहवासात बराच काळ घालवला. त्याचेच फलित म्हणजे हे पुस्तक.

पुस्तकाचे प्रकाशन करताना लेखिका आणि डॉ. प्रकाश.


त्यानंतर आमटे कुटुंबावर केलेला माहितीपट दाखवण्यात आला कारण मुळात मितभाषी असलेल्या या दांपत्याला स्वतःविषयी बोलायला लावणे कठिणच आहे असे लेखिकेने सांगितले आणि त्याची प्रचितीही आली.

इतके मोठे काम करत असुनही अहंकाराचा लवलेश नाही. नवरा बायकोत इतके सामंजस्य की शब्दांचीही गरज पडू नये. व्यक्ति कोण आणि छाया कोण हे कळू नये इतकी एकरूपता.





छायाचित्रे नवर्‍याच्या सौजन्याने.




Tuesday, July 31, 2007

ड्युक व्हिडिओ इंस्टिट्युट - २००७

मागे फुल फ्रेम डॉक्युमेंटरी फिल्म फेस्टिवलबद्दल लिहिलं होत ते आठवतंय का? तेव्हा ते सगळे सिनेमे बघुन आपणही असं काही तरी करून पहावं असा किडा डोक्यात वळवळला. त्या किड्याने नुसती वळवळ नं करता ड्युक विद्यापिठाच्या डॉक्युमेंटरी बनवण्याच्या कार्यशाळेत प्रवेश घेतला.

http://cds.aas.duke.edu/courses/workshops.html#video

शनिवारपासून अभ्यासक्रम सुरू झाला. ८ दिवस रोज बारा तास. अमेरिकेच्या काना-कोपर्‍यातून आलेले विद्यार्थी बघुन नामांकित अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असल्याचा शोध लागला. पस्तीस एक विद्यार्थ्यांपैकी फक्तं ३ पुरूष आहेत हे एक उगाचच केलेले विशेष निरिक्षण!
व्हाईट बॅलंस, आयरिस, एक्स्पोजर, एफ स्टॉप, फोकस हे नवर्‍याच्या कोषातले अगम्य शब्दं आता मलाही कळु लागले आहेत. त्या सगळ्या शब्दांच्या व्याख्या इथे तुम्हाला सांगत बसत नाही. पण एका शिक्षकची टिपणी: वाईट व्हिडिओचे उदाहरण म्हणजे बाजूच्या खोलीत सुरू असलेल्या टिव्हीचा नुसता आवज ऐकून संपूर्ण कथानक कळु शकणे.

Wednesday, July 18, 2007

आतंकवाद आणि २१ वे शतक

इंग्लंडमधे झालेल्या अतिरेक्यांच्या अपयशी हल्ल्यात उच्चंशिक्षित भारतिय तरूण संशयित म्हणून पकडल्या गेले आहेत. हे वृत्त वाचुन काहींना आश्चर्य वाटलं असेल तर काहींना "बघा आम्ही म्हणत होतो ना? आता तरी जागे व्हा" असंही म्हणावसं वाटत असेल.
आत्मघातकी अतिरेकी म्हणजे "गरीब, अशिक्षित पाकिस्तानातल्या कुठल्या तरी गावातून आलेला, थोड्याश्या पैशांसाठी जीवावर उदार झालेला" ह्या प्रतिमेला आता तडा गेला आहे.
ही बाब फार गंभीर असल्याने जरा खोलात जाऊन कारणे आणि उपाय यावर विचार करायला हवा.
एकविसाव्या शतकातही मानवी समाज हिंसेने प्रश्न सोडवायचा प्रयत्नं करतो आहे. ठोशास ठोसा हा तर सध्याचा आंतरराष्ट्रिय न्याय किंवा परराष्ट्रिय धोरण झाले आहे.
दुसर्‍या महायुद्धाच्या सुरवातीला अलिप्तं राहणार्‍या अमेरिकेने पराभूत जपानला सन्मानाची वागणूक देऊन प्रचंड आर्थिक मदत देऊ केली आणि पुनर्निमाणात महत्वाचा हातभार लावला. त्याच अमेरिकेने आता मात्रं "प्रिएम्प्टिव वॉर" सुरू करून सद्दामांना फाशी देण्यापर्यंत पलटी खाल्ली आहे. अबु गरेब आणि ग्वांटानामोच्या तुरुंगातून लाजिरवाण्या छळ्वादाच्या कथा बाहेर येऊनही इंग्लंड आदि देशांनी त्यांना आंधळा पाठिंबा चालूच ठेवला आहे.
इकडे भारतात हिंदु शक्तिप्रदर्शन, राम मंदिर, गुजराथ हत्याकांड,गोध्रा, मुंबईतील स्फोट, स्वामी नारायण मंदिरावरील हल्ला, संसदेवरील हल्ला अशा घटनांनी मने दुभंगली आहेत. आपल्याच देशात पोरकेपणा आणि असहायतेने ग्रासलेल्या हिंदु आणि मुस्लिम समाजाच्या भावनांचा फायदा उठवण्यासाठी कट्टरपंथीय धार्मिक नेते, राजकारणी आणि आय एस आय तयार आहेतच.
युद्ध हा श्रीमंत देशांचा आतंकवाद आहे आणि आतंकवाद हे गरिबांचे युद्ध आहे ही गोष्टं लक्षात ठेवायला हवी. हिंसाचाराचे मूळ धैर्यामधे नसून भितीमधे असते. नष्टं होण्याची भिती माणसाला टोकाची भूमिका घ्यायला लावते. बहुतांशवेळा ती भिती अनाठायीच असते आणि ती दूर होण्यासाठी खरी धैर्याची गरज असते.
आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे आजची प्रसार-माध्यमे. एकतर माध्यमे बहुतांश मॅनेज केलेली आहेत. आणि दुसरे म्हणजे स्पर्धेत टिकण्यासाठी तत्वे सोडून पैशाच्या पाठीमागे लागलेली आहेत. प्रक्षोभक वक्त्यव्ये करणार्‍यांना जितकी प्रसिद्धी मिळते तितकी शांततामय मार्गाचा अवलंब करणार्‍यांना मिळत नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमांना आकर्षित करण्यासाठीही हिंसाचाराचा अवलंब केला जातो.
या परिस्थितीत आपल्या मानसिकतेचा जरा विचार करू. भारतात सुरू असलेल्या मुस्लिमेतर आतंकवादाची उदाहरणे घ्या - तामिळ दहशतवाद्यांचा राजीव गांधींवर प्राणघातक हल्ला, आसाममधे प्रांतवादातून उफाळलेला हिंसाचार, तसेच इतर भागात नक्षलवाद्यांनी आणि माओवाद्यांनी केलेले हल्ले. अशा घटनांची संख्या खरे तर मुस्लिम आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यापेक्षा जास्तं आहे. पण त्या बातम्यावाचून आपल्या भावना भडकत नाहीत. प्रसारमाध्यमेही त्याचे फार भांडवल करत नाहीत. याचे कारण काय असावे? शासन, सुरक्षा यंत्रणा अथवा लष्कर या बंडाचा आज ना उद्या बिमोड करेल असा आपल्याला कुठे तरी एक विश्वास आहे. मात्रं मुसलमान भडकले तर कोणीही आपल्याला वाचवू शकणार नाही ही भिती हिंदूच्या मनात कायम आहे. आणि हा देश हिंदुंचा असल्याने वेळ प्रसंगी आपलेच शेजारी मित्रं आपल्यावर उलटतीत आणि सरकारही आपल्या मदतीला येणार नाही ही भावना मुसलमानांच्या मनात घर करून आहे. इतिहास आणि पूर्वग्रह भितीच्या या मानसिकतेला खतपाणी घालतातच.
ही मानसिकता सोडण्यासाठी सर्व थरावर सतत सुसंवाद साधण्याची गरज आहे. मुसलमानांना हिंदु वस्तीत घर भाड्याने अथवा विकत मिळणे कठीण आहे. तसेच मुसलमान वस्तीत एकटे जायला हिंदु धजत नाहीत. ही परिस्थिती बदलायला हवी. जाती धर्माधारित वस्त्या हळुहळु कमी करत प्रसंगी कायद्याचा वापर करून नाहीशा कराव्यात. एकमेकांशी मोकळेपणाने चर्चा करण्याचे व्यासपिठ उपलब्ध असावे. अन्यायाविरुद्ध शांततापूर्ण आंदोलन उभे करावे. अविश्वास, भितीची जागा विश्वास आणि धैर्याने घ्यावी. जामा मस्जिदीतील धर्मगुरूच्या व्यतिरिक्त इतर मुसलमानांची मते जाणून घ्यायचा प्रयत्नं प्रसारमाध्यमांनी करावा. पुरोगामी विचाराच्या लोकांनी एकत्रं येऊन कट्टरपंथीयांना एकटे पाडावे. मवाळांनी गप्पं राहू नये.
उभयपक्षांनी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. विषय कठीण असला तरी पेपर सोडवायलाच हवा.

Sunday, July 15, 2007

कथा एका - नव्हे दोन लग्नांची

तो: आपल्याला एका लग्नाला जायचे आहे.
ती: कुणाच्या?
तो: जेनी आणि विनोदच्या
ती: आपण मुलाकड्चे का मुलीकडचे?
तो: जेनीची आणि माझी जुनी ओळख आहे. खरं म्हणजे जेनीच्या पहिल्या लग्नालाही गेलो होतो मी. फोटोही काढले होते तेव्हा.
ती: हं....लग्नं अमेरिकन पद्धतीचे आहे की भारतिय? काय घालायचे ते ठरवावे लागेल त्याप्रमाणे.
तो: इथले लग्नं ख्रिश्चनपद्धतीचे आहे. त्यानंतर ते भारतात जाऊन वैदिक विधी करणार आहेत.
ती: अरे वा, छान.
तो: मुलाच्या घरच्यांनी दोघांची पत्रिका जुळवून बघितली आहे. त्यानुसार इथल्या लग्नाचा मुहुर्त काढला आहे म्हणे!
ती: अय्या!! मुहुर्त काढून लावलेले हे पहिलेच ख्रिश्चन लग्न असावे. या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार असणार आहोत!
ती: अरे पण त्या जेनीच्या पहिल्या लग्नाचे काय झाले म्हंटलंस?
तो: काय झालं माहिती नाही. खरं म्हणजे जेनीपेक्षा ल्युसीचा स्वभाव खूप छान होता
ती: आता ही ल्युसी कोण आली मधेच आणि जेनीचा आधीचा नवरा कोण?
तो: जेनीचे पहिले लग्नं ल्युसीशी झाले होते - हे बघ तुला फोटो दाखवतो त्यांचे.... पण तुझा चेहेरा असा गोरामोरा का झाला आहे? बरी आहेस ना?
ती: नाही, काही नाही - पाणी प्यायलं की जरा बरं वाटेल... अं अं ...म्ह म्ह म्हणजे जेरी साईनफिल्ड म्हणतो त्याप्रमाणे "नॉट दॅट देअर इज एनिथिंग रॉंग विथ इट."

Tuesday, July 10, 2007

सिको, लेटर्स फ्रॉम इवो जिमा आणि व्हॉट अ वे टू गो...

शुक्रवारी रात्री मायकल मूरचा "सिको" बघितला. सिनेमा फार छान आहे. अमेरिकेतल्या आरोग्यसेवेची कशी वाट लागली आहे ते बघण्यासाठी अमेरिकेत रहाणार्‍यांनी आणि येऊ पहाणार्‍यांनी हा सिनेमा जरूर बघावा.
शनिवारी सकाळी इनो रिव्हर फेस्टिवलला जायचे असे नवर्‍याने जाहीर केले. त्यासाठी तो चक्कं लवकर उठलाही. मला खरं तर सतारीची प्रॅक्टिस करायची होती विकेंडला. पण हे असे प्लॅन असल्यावर कसला रियाज अन कसलं काय! अखेर लग्नाच्या ह्या साईड इफेक्टला शरण जात मी त्याच्याबरोबर जायचे मान्य केले. (लग्नं झालेले असल्यानेच खरं तर शहिद परवेजांसारखी सतार वाजवता येत नाही!) फेस्टिवल छान होता. संध्याकाळी घरी आलो आणि लगेच आर्ट म्युझियमच्या आऊटडोर थियेटरमधे "लेटर्स फ्रॉम इवो जिमा" हा तद्दन हॉलिवुडी युद्धपट बघायला गेलो. सिनेमा (माझ्यामते) टुकार असला तरी मोकळ्या मैदानात गवतावर पसरून आरामसे लोळायला मजा आली. रात्री घरी आलो तेव्हा बारा वाजून गेले होते. "उद्याचा - खरंतर आजचा रविवार मी मला हवा तसा घालवणार" असे नवर्‍याला सांगून पलंगावर अंग टाकले.
सकाळी उठून पाहिले तरे नवर्‍याची इ-मेल होती. (हो - आम्ही घरातल्या घरात एकमेकांना इमेल पाठवतो आणि फोनही करतो). एका मित्राने "व्हॉट अ वे टू गो" नावाच्या डॉक्युमेंटरीचे स्पेशल स्क्रिनिंग असल्याची माहिती पाठवली होती. "नो वे - ओळीने दोन दिवस सिनेमे पाहिले आता तिसरा नको" असं उत्तर पाठवायचे होते, पण सिनेम्याचा विषय पाहून "मे बी" असं उत्तर पाठवलं.
नवरा उठेपर्यंत जरा सतारीच्या तारा छेडल्या. दुपारी बाहेर जाऊन बाजारहाट केला, सासू सासर्‍यांची खबरबात घेतली आणि मग आता सगळी कामं झाली असल्याने गिल्ट फॅक्टर दूर झालेले होते, त्यामुळे सिनेमा बघायला गेलो.
हा सिनेमा अजुन प्रदर्शित झालेला नाही, पण कदाचित प्रदर्शित झाला आणि तुमच्या गावात आला तर जरूर बघा. सिनेमाचा विषय आहे "Life At The End Of Empire - A middle class white guy comes to grips with Peak Oil, ClimateChange, Mass Extinction, Population Overshoot and the demise of theAmerican Lifestyle"
http://whatawaytogomovie.com/
हा सिनेमा बघण्याच्या आधीच मी अंतिम युद्ध लिहिले हे बरेच झाले. नाही तर बर्‍याचशा कल्पना माझ्या स्वतःच्या आहेत असं मला म्हणताच आलं नसतं.
हा माहितीपट फार क्लिष्टं आहे. सुरूवातीलाच तशी सुचना दाखवली आहे. वैज्ञानिक, लेखक, सामान्यं माणसं यांच्या मुलाखती आणि दिग्दर्शकाचे स्वगत या माध्यमातून आपली संस्कृती आणि पर्यावरणाचा र्‍हास याविषयी संवाद घडवून आणलेला आहे. काही काही संवाद फार परिणामकारक आहेत. उदा. सुरूवातीला पेट्रोलचे साठे संपल्यावर काय होईल याचे विदारक चित्रण केले आहे. "पण मग इतर प्रश्नं इतके गंभीर आहेत की पेट्रोलचा प्रश्नं फारच क्षुल्लक आहे असं वाटायला लागतं" दिग्दर्शक म्हणतो.
त्यानंतर लगेच एक वैज्ञानिक "ग्रीन हाऊस इफेक्टमुळे हवाच नसल्यामुळे पेट्रोल जळणारच नाही - त्यामुळे साठे आहेत की नाही हा प्रश्नंच दुय्यम ठरणार आहे" असं म्हणतो. दिग्दर्शकाचे स्वगत : "बघा - आत्ताच तुम्हाला पेट्रोलच्या साठ्यांची काळजी वाटेनाशी झाल्यमुळे जरा बरं वाटतंय ना?"
आपण सर्व मानव मिळून रोज २०० प्रजातींना अस्तंगत करत आहोत यावर एक वैज्ञानिक म्हणतो - "रहात्या घराच्या रोज २०० विटा काढल्या तर घर किती दिवस घर उभे दिसेल?"

पण या सगळ्यावर उपाय काय? दिग्दर्शकाच्या म्हणण्याप्रमाणे खरं तर काहीच उपाय नाही. असला तर एकच - सर्व भौतिक प्रगतीचा त्याग करायचा. मानव शेती करायला लागायच्या आधी ज्या अवस्थेत होता त्या अवस्थेत परत जायचे. अगदी ठरवून. लोकसंख्या आधी कमी करायची. नाहीतरी हे होणारच आहे, मग आपत्तींमुळे होण्याची वाट कशाला बघायची?

बघुन मन सुन्नं झालं. बर्‍यापैकी विवादास्पद मत आहे खरं....




Monday, July 02, 2007

पडद्यामागचे कलाकार

हरेकृष्णाजींनी गणेश मुर्ती बनवणार्‍या कारागीरांना तुमच्या समोर आणलं आहे.
त्यावरून मला काही दिवसांपूर्वी घडलेला एक प्रसंग आठवला. इथे जवळच शहिद परवेज आणि शशांक यांच्या जुगलबंदीचा कार्यक्रम होता. कार्यक्रम छान झाला. शहिदांची काळी भोर सतार फार देखणी दिसत होती. म्हणून कार्यक्रम संपल्यावर आवर्जुन त्यांना त्याविषयी विचारले. त्यांना आवडतो म्हणून सतारीला काळा रंग देऊन घेतल्याचे त्यांनी सांगितले. तोपर्यंत त्यांनी सतार गवसणीत घातल्यामुळे बनवणार्‍याचे नाव वाचता आले नाही. म्हणून सहजच सतार कोणी बनवली? हा प्रश्न विचारला. तेव्हा मात्रं त्यांनी फारच उडवा उडवीची उत्तरे दिली. "मी स्वतः मला पाहिजे तशी बनवून घेतली आहे. सतारीपेक्षा वाजवणारा महत्वाचा आहे. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही माझ्यासारखी सतार घेतली म्हणजे तुम्हाला वाजवता येईल?" वगैरे वगैरे असंबद्ध उद्गार काढले.
वाद्ये बनवणे ही एक कला आहे. सतारीसारखे नाजूक वाद्य बनवायला तर खासच कसब लागते. दर्जेदार,कसलेले लाकूड मिळवणे, योग्य आकाराचा भोपळा मिळवणे, वाद्याची जुळवाजुळव करणे, नक्षिकाम करणे, थाट बसवणे, जवारीचे काम करणे. ही सगळी कामे अत्यंत गुंतागुंतीची आहेत. सुमार दर्जाच्या सतारी बनवणारे अनेक कारागीर आहेत. पण उत्कृष्ट दर्जाच्या सतारी बनवणारे अगदी हाताच्या बोटावर मोजण्यासारखे आहेत. संगीतकारांच्या असतात तशाच त्यांच्याही पिढ्यानपिढ्या या व्यवसायात गुंतलेल्या आहेत. पडद्यामागच्या (अक्षरशः - की तारांमागच्या?) या कलाकारांना जराही श्रेय नं देता उलट खिजगणतीही नं करण हे मला फारच चुकीचे वाटते.
दिल्ली येथील रिकीराम घराण्याने रविशंकरांच्या घराण्यासाठी सतारी बनवल्या आहेत. आता रिकीराम यांचे सुपुत्रं श्री संजय रिकीराम ही परंपरा चालवतात. अनुष्का यांच्या सतारीही तेच बनवतात. माझी सतार त्यांच्याकडूनच घेतली आहे.
संजय रिकीरामांपर्यंत पोचण्याच्या आधी मला अनेक लोकांनी चुना लावला आहे. अमेरिकेतल्या पहिल्या गुरूंनी तर भरमसाठ (चार आकडी) डॉलर घेऊन अतिशय सुमार सतार मला विकली. सतार पहिल्यांदा घरी आली आणि उघडली तेव्हा तर मला रडूच कोसळायचे बाकी होते. कारण जिथे कारागीराचे नाव लिहिलेले असते ती पट्टीच गायब होती. इतके पैसे दिले आहेत तर चांगल्या नावाजलेल्या कारागीराचे नाव तिथे बघण्याची माझी अपेक्षा पार धुळीला मिळाली. ते माझे गुरू आहेत याचा जराही मुलाहिजा नं बाळगता सतार त्यांना साभार परत केली. स्वतः कलाकार असून इतका संकुचित दृष्टिकोन कसा काय असु शकतो?
शहिद परवेजांसारख्या कलाकारानी इतर कलाकारांचा आदर करावा. भारताबाहेर राहून ही कला पुढे नेऊ पहाणार्‍या माझ्यासारख्या नवशिक्या, हौशी विद्यार्थांना जमेल तितकी माहिती देऊन मार्गदर्शन करावे ही विनंती.




Tuesday, June 26, 2007

परतिबाताई राष्ट्रपती होनार?

"आवं तात्याबा कुटं गेल्ता? कवाधरून शोधू रायली तुमाले? येक टाप बातमी सांगायची व्हती - आपल्या परतिबा ताई राष्ट्रपती होते म्हंते" बायजाक्का
"बायजाक्का, ते म्या आधीच वाचलं म्हनून तर गेल्तो चौकातल्या विंटरनेट कापेमधे - म्या कांप्युटर उघडून आपल्या सद्याचे राष्ट्रपतीच र्‍हावू द्या म्हनून सांगूनशानी आलो" तात्याबा
"आता बाई! आवो, परतिबा ताई आपला इकडच्या हाये" बायजाक्का
"आसन आसन, पण त्याहीनं काय दिवे लावले आतापर्यंत? आपल्या अमरावती जिल्ल्याच्या पर्तिनिधी आसताना कधी डुंकून बी बघंनात आपल्याकडं! आपल्या शयराची, जिल्ल्याची काय बी प्रगती झाली नाई त्याईच्या टायमात."
"आवं पन सोनियाबाईनं परतिबा ताईचंच नाव फुडं केलं म्हंते ना?"
"आता बायजाक्का, येक इद्वान, पारमानिक मानूस पहिल्याच टाइमाले राष्ट्रपती झाला त्याले कायच काढाव म्हनतो मी? कलाम सायेब लई हुशार हायेत त्यायची राष्ट्रपती होन्याआधीची कामगिरीबी लई मोठी हाये. लहान-पोरासोरांना बी लई चांगला उपदेश करते ते. त्यायच्या मुळं आपल्या गावची शेंबडी पोरंसोरंबी त्याइच्यावानी थे सायंटिस का काय होतो म्हंते. परतिबा ताईची येकबी कामगिरी न्हाई."
"आवं परतिबा ताई लई भाविक हायेत - त्याईला कोन्या बाबानं सांगितलं हाये म्हने " बायजाक्का
" थोच तं फरक हाये बायजे, कलाम सायेब बाबाच्या भरोशावर सोडनार न्हाईत देशाले. आपुन सोताच हातपाय हलवा लागते."
"आवं पन आपल्या कॉंग्रेसच्या निष्ठावान उमेदवार हायेत ना वं त्या?"
"नेत्याईची निष्ठा जन्तेशी हाये का ते बघा लागते. आनीबानीच्या टाईमात परतिबा ताईनं जन्तेले दिलं लोटून आन केला खुर्चीशी लाळघोटेपना. लोकाईची इच्छा तं बगायला पाहिजे होती कॉंग्रेसनं. दुसरा उमेदार काऊनच उबा केला?"


http://timesofindia.indiatimes.com/Pratibha_claims_divine_premonition_on_greater_role/articleshow/2151402.cms

Friday, June 22, 2007

पुण्यजला गंगा

हिंदू धर्मात ज्या गोष्टी अतिशय पवित्रं मानल्या जातात त्या गोष्टींची स्वतःच अक्षम्य अवहेलना, विटबंना करायची हा आपला खाक्या आहे. पावित्र्यं आणि स्वच्छता याचा अर्थाअर्थी काही संबंध असल्याचे आपल्याला वाटत नाही. या उलट इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळी जाऊन पहा. शांतता,स्वच्छता, प्रसन्न वातावरण हे तिथे अनुभवायला मिळते.
गंगेचे उदाहरण घ्या. गंगा ही आपल्याला पूजनीय असल्यामुळे या विषयावर अनेक श्लोक आणि काव्ये रचली आहेत. गंगेच्या काठावर काय करू नये ते आपल्या पूर्वजांनी पुराणात सांगितले आहे:
गंगा पुण्यजला प्राप्य त्रयोदश विवर्जयेत।
शौचमाचमनं चैव निर्माल्यं मलघर्षणं॥
गात्रसंवाहनं क्रीडा प्रतिग्रहमथो रतिम।
अन्यतीर्थरतिं चैव अन्यतीर्थप्रशंसनम॥
वस्त्रत्यागमथाघातं सन्तारं च विषेशतः।
नाभ्यंगित प्रविशेच्च गंगाया न मलार्दित:॥
न जल्पन्न मृषा वीक्षन्न वदन्न्नृतं नर:।
स्वैर अर्थ:
पुण्यजला गंगेमधे मल-मूत्रत्याग, तोंड धुणे, दात घासणे, चुळा भरणे, निर्माल्य फेकणे, मळलेले अंग घासणे इ करू नये. स्त्री पुरूषांनी जलक्रीडा करू नये. दानाचे ग्रहण करू नये. अन्य तीर्थांची स्तुती करू नये. घातलेले कपडे गंगेत सोडू नयेत, पाण्यावर आघात करू नये तसेच पोहू नये. अंगाला तेल लावून अथवा मळलेल्या अंगानी गंगेच्या पाण्यात प्रवेश करू नये. गंगा किनार्‍यावर वृथा बडबड, खोटारडेपणा करू नये व अपदृष्टीने पाहू नये.
इतकं सगळं अगदी तपशीलात लिहिणार्‍या आपल्या पूर्वजांनी आपलं आताचं वर्तन पाहिलं तर ते काय करतील?
साबण लावून लावून कपडे धुणे,केस कापणे, मृतदेह टाकणे, शहरातील तसेच कारखान्यातील सांडपाणी सोडणे - अशी सर्व तर्‍हेनी चालेलेली ही विटबंना पाहून ते जीवच देतील (गंगेत नव्हे).
आपल्या स्वार्थासाठी धर्माचा वाट्टेल तसा अर्थ लावणारे पंडे आणि डोके नं वापरता, एकही प्रश्न नं विचारता त्यांच्यावर विश्वास ठेवणारे ते भाविक थोर आहेत!
धन्य गंगा धन्य तीचे भक्तं!


संदर्भ:


"श्री गंगाजी का दुरुपयोग":कल्याण मासिक वर्ष ८१, अंक सहा:गीताप्रेस, गोरखपुर

Wednesday, June 20, 2007

गुगल रिडर - तुमच्या आवडत्या ब्लॉग्जचा इन बॉक्स

आवडत्या ब्लॉग्जची यादी करायची आहे? तुमच्या आवडत्या ब्लॉगवर नविन लेख आला आहे का हे बघायचे आहे? गुगल रिडर वापरा.
http://www.google.com/reader/
आजकाल काही लोक ब्लॉगवर जाहीराती टाकू लागले आहेत. गुगल रिडरवर लेख वाचला की त्या जाहीरातींपासून सुटका होते. मी अशा ब्लॉगवर वेगळ्या खुणाच करून ठेवल्या आहेत.