Wednesday, January 16, 2008

पॉलिटिकल करेक्टनेस(आणि अखेर राजेंद्रभाऊ वदले)

(अजिबात ऍब्स्ट्रॅक्ट नाही)
"दिवसातुन पाच वेळा भाज्या आणि फळे खा. जेवणात कडधान्याचे प्रमाण वाढवा" असे काहीसे लिहीलेला भला मोठा फलक आणि त्याच्या खाली एक मोठ्ठी फळांची परडी परवा आमच्या व्यायामशाळेत दिसली. ते बघताच आम्ही दोघेही गालातल्या गालात हसलो.
हल्ली अशी वाक्ये जिकडे तिकडे बघायला, ऐकायला मिळतात.
आहार, आरोग्याच्या बाबतीत नागरिकांचे हितसंबंध जपण्यासाठी विविध सरकारी खाती असतात. इथे अमेरिकेत डिपार्टमेंट ऑफ फुड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन, डिपार्टमेंट ऑफ ह्युमन सर्व्हिसेस अशा सारखी खाती आहेत. त्याशिवाय अमेरिकन कॅन्सर सोसायटी, अमेरिकन डायटेटिक असोशियन, अमेरिकन डायबेटिक असोसिएशन अशा सारख्या स्वायत्त संस्था आहेत. या संस्थांचे काम सरकारी अनुदान तसेच खासगी देणग्यांमधुन चालते.
अशा संस्थांमधुन बाहेर पडणारी माहिती खरी असणे जितके महत्वाचे असते तितकीच ती माहिती राजकिय आणि सामाजिक मान्यते्ला अनुसरणारी - इंग्रजीत ज्याला पॉलिटिकली करेक्ट म्हणतात तशी असावी लागते. या संस्था प्राणिहक्कांच्या किंवा पर्यावरण रक्षणाच्या दृष्टिकोनातुन भुमिका घेतील ही अपेक्षाही नाही व उद्दिष्टं ही नाही. नागरिकांच्या नैतिक विचारसरणीवर भाष्य करणे ही या संस्थांची जबाबदारी नाही. भारतिय आहारात गायी म्हशींचे दुध आवश्यक समजले जाते तसेच अमेरिकन आहारात गायींचे,डुकराचे अथवा कोंबडीचे मांस हे आवश्यक समजले जाते. कुत्र्या मांजरांचे दुध काढणे किंवा त्यांना खाणे हे या दोन्ही देशात अनैतिक/निषिद्ध समजले जाते. अशा प्रकारच्या प्रचलित नैतिक संवेदनांना तडा जाऊ नये ही काळजी मात्रं ह्या संस्थांना घ्यावी लागते.

या पार्श्वभुमीवर गेल्या दशकापासुन प्रचलित आहार व सवयींचे अनेक तोटे संशोधनातुन मोठ्या प्रमाणावर दिसुन आलेले आहेत. विशेषतः आहारातील प्राणिजन्य पदार्थ व रिफाईंड पदार्थ प्रकृतीला अपायकारक असल्याचे निष्कर्ष निघत आहेत. आता मैदा, साखर,मीठ,रिफांईंड तेल खाऊ नका असं सांगितल्यानी व्हेजिटेरियन लोकांच्या भावना बिवना काही दुखत नाहीत. पण दुध,मांस खाऊ नका हे जनतेला स्पष्टपणे सांगणे तितकेसे सोपे नाही.

का?

प्राणिजन्य पदार्थांचा व्यापार हा अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग आहे. कोट्यावधी लोकांना त्यातुन रोजगार मिळतो. सरकारवर प्रभाव टाकणार्‍या मोठ्या व्यापारी लॉबीज अस्तित्वात आहेतच. त्याच्याविरुद्ध कसे दंड ठोकायचे? मोठ्ठे देणगीदार नाराज झाले तर काय करायचे? उघड उघड बोलल्यास सरकारी अनुदानही बंद होण्याची पाळी येईल. रूढी, परंपरांचे काय करायचे? बरं पॉलिटिकली करेक्ट असल्याशिवाय प्रमुख प्रसार माध्यमे माहिती प्रसिद्ध करणारही नाहीत. बर्गरच्या, दुधाच्या, आईस्क्रिमच्या जाहिराती बंद झाल्या तर? थोडक्यात,"व्हिगन" "व्हेजिटेरियन" हे शब्द सद्ध्या तरी पचण्यासारखे (no pun intended) नाहीत.


मग काय करायचे?
या परिस्थितीतुन मार्ग काढायची एक युक्ति निघाली आहे. काय खाऊ नका हे सांगण्यापेक्षा काय खा हे सांगितले तर? दिवसातुन पाच वेळा फळे आणि भाज्या खा, चार वेळा कडधान्ये खा अशा सारखी वाक्ये सांगायची नामी युक्ति कोणाच्या तरी डोक्यातुन निघालेली दिसुन येते आहे.


समझनेवाले को इशारा काफी है."eat five servings of fruit and vegetables each day " किंवा "The evidence is compelling that a diet rich in whole grain foods has a protective effect against several forms of cancer and heart disease" अशा सारखी वाक्ये खरं म्हणजे "Be a vegan" किंवा "eat less meat and dairy" अशी सुधारून वाचावीत.

योगायोगाने हा लेख प्रकाशित करणार, तेव्हढ्यात पर्यावरणाचे नोबेल पारितोषिक विजेते आपले राजेंद्रभाऊ पचौरी काल पॅरिस येथे वदते झाल्याची बातमी आली. "मांसाहार कमी करा, सायकल चालवा आणि उगाचच्या उगाच वस्तु घेऊ नका" - इति पचौरी. संपूर्ण बातमी इथे वाचा. मुख्य म्हणजे पूर्वी असे काही एक म्हणण्याची IPCC ची टाप नव्हती असेही त्यांनीच कबुल केले आहे.

अखेर तथाकथित पर्यावरणतज्ञ थोडं थोडं खरं खरं बोलु लागले आहेत म्हणायचे. अल गोर हे अमेरिकन असल्याने मांस खाऊ नका असं म्हणु शकत नाहीत. कित्ती इन्कंव्हिनियंट!! (आणि ते म्हंटल्याशिवायही त्यांना पर्यावरणाचे नोबेल पारितोषिक मिळु शकते. कित्ती कन्व्हिनियंट!) तसेच आपले राजेंद्रभाऊ भारतिय असल्याने दुध पिऊ नका असेही म्हणु शकत नाहीत.

कसंकाय मात्रं तुम्हाला जे आहे ते अगदी खर्र खर्र सांगणार:

पर्यावरणाच्या दृष्टिने दुधाचे उत्पादन व मांसाचे उत्पादन यात काही एक फरक नाही.

नैतिकतेच्या दृष्टिने, आधुनिक डेअरीमधे दुध उत्पादन प्रक्रिया इतकी क्रूर झाली आहे की गायींचे मांस खाणे दुध पिण्याहुन कमी हिंसक बनले आहे. उत्पादन प्रक्रियेमधे अमुलाग्र बदल झाला असताना आपण भारतिय लोक मात्रं अजुनही त्याच गोकुळातील कृष्णाच्या गोजिरवाण्या, सुखावह कल्पना उराशी बाळगुन आहोत. बदलत्या परिस्थितीनुसार डोळसपणे आपल्या नैतिकततेही अनुरूप बदल करण्याची वेळ आली आहे. ज्यात आपला, प्राण्यांचा व निसर्गाचाही फायदा आहे अशी नविन नितीमुल्ये अंगिकायला हवी. आपण सर्वांनी हळुहळु करत प्राणिजन्य पदार्थांचा वापर कमी करावा अशी कळकळीची विनंती.

10 comments:

मन कस्तुरी रे.. said...

दह्याशिवाय जीवन व्यर्थ आहे!

HAREKRISHNAJI said...

perfect

A woman from India said...

अश्विनी,
दही सोडणे मलाही सर्वात जड गेले. अर्थातच त्याचा नंबर सर्वात शेवटी लागला.

प्रशांत said...

यापूर्वी "गावो विश्वस्य मातर:" या मालिकेतील लेख वाचल्यापासून दुग्धजन्य पदार्थ खाताना/पिताना सारखा तुमचा ब्लॉग आठवतो. त्यात आयुर्वेदानुसार दूध अमृतासमान मानल्यामुळे पंचाईत होते. म्हणजे, दुधाची गरज आहे की नाही हा प्रश्न मनाचा अर्जुन करतो. आयुर्वेदाला अभिप्रेत असलेले दुग्धजन्य पदार्थ मिळवण्याची प्रक्रिया ही पर्यावरणाचा विचार करून केलेली असावी असं वाटतं. उदाहरणार्थ, गोरक्षण संस्थान, नागपुर येथे गोसंवर्धनावर भर दिला जातो व गायींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम न होता जे काही (व ज्या प्रमाणात) काही उपलब्ध होऊ शकेल तेवढंच उत्पादन केलं जातं.
याचा अर्थ, व्यापारीकरण न केल्यास आयुर्वेदाला अभिप्रेत असलेलं दूध उत्पादन होऊ शकतं. अर्थात, होऊ शकणार्‍या सगळ्याच गोष्टी होतात असं नाही.
आयुर्वेदाला अभिप्रेत असलेल्या अनेक गोष्टी मी करत नाही, मग दूध सोडलं तर काय होणार आहे? असा प्रश्नही कधीकधी येतो. पण काय करणार? इतक्या वर्षांची सवय एकदम मोडणं कठीण आहे. पण, पायरी-पायरीने तसं करण्याचा प्रयत्न सुरू आहे. खरवस खाणं मी पूर्वीच सोडलं.("गावो विश्वस्य मातर:भाग १,२,३" वाचलेत त्यावेळी मी पुण्यात होतो व तिथे खरवस सहज मिळायचा.) त्यापुढे जायला मात्र जरा अवघडच जातंय. दुपारचा चहा लेमन-टी घेऊन दुधाचा वापर कमी केला. पण दूध व दुग्धजन्य पदार्थ पूर्णत: सुटले नाहीत. कृपया दूध व दुग्धजन्य पदार्थांसाठी पर्यायी पदार्थांविषयी माहिती द्या. सगळंच शक्य झालं नाही तरी जेवढं शक्य आहे, ते तरी करून पाहीन.

A woman from India said...

प्रशांत,
तुमची प्रतिक्रिया फारच छान आहे.
वेळात वेळ काढुन मी ही माहिती मराठीत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करते आहे. त्याचे काही तरी सार्थक होते आहे, हे वाचुन फारच समाधान वाटले.
तुमच्या सर्व शंका व अडचणी रास्त आहेत.
आनंदाची बातमी म्हणजे माझी भुमिका आयुर्वेदाशी सुसंगत आहे. भारतातील आयुर्वेद तज्ञांशी या विषयावर माझी चर्चा सुरू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आयुर्वेद ग्रंथात नक्की काय सांगितले आहे याचे विवेचन सुरू आहे. सर्व माहिती एकत्रं झाली की तो लेख नक्कीच प्रसिद्ध करणार आहे.
खरवसाबद्दल तुम्ही उल्लेख केला आहे तो फार महत्वाचा आहे. माणसांना खाण्यासाठी हमखास खरवस उपलब्ध असणे हे पाश्चात्त्य आधुनिक डेअरीतील क्रूरपणा भारतातही सुरू झाल्याचे लक्षण आहे. गाय व्यायलानंतर २४ ते ४८ तासाच्या आत तिच्यापासुन वासरू हिरावुन घेतल्याशिवाय खरवस उपलब्ध होऊ शकत नाही. अपत्यप्राप्ति ही मातेच्या दृष्टिनी सर्वात महत्वाची घटना असते. नवजात अर्भक दुरावल्यामुळे गाईंना सहाजिकच फार निराशा येते. ती निराशा घालवण्यासाठी त्यांना सर्रास ऍंटिडिप्रेसंट दिले जाते.
शिवाय मशिनने दुध काढण्यामुळे त्यांना जखमा होतात. त्या जखमातुन निघणारे रक्तं नेहेमीच दुधात मिसळते. जखमा चिघळु नये म्हणुन मोठ्या प्रमाणात ऍंटिबायोटिअक औषधेही गायींना दिली जातात.Food and Drug Administration च्या म्हणण्यानुसार मात्रं या औषधांमुळे दुधाच्या गुणवत्तेत काही फरक पडत नाही.
तुमचा शेवटचा मुद्दा म्हणजे रोजच्या सवयीत एकदम बदल करणे कठीण असते. अगदी खरंय. कुठलाही बदल हळुहळु, विचारपूर्वक करावा.
तुमच्या सुचनेप्रमाणे दुधाचे पर्याय या विषयावर लेख लवकरच प्रसिद्ध करेन.
धन्यवाद.

HAREKRISHNAJI said...

अभिनंदन आजच्या "मराठी बॉग विश्व", चतुरंग , लोकसत्ता मधे आपल्या बॉग बद्द्ल फार चांगले लिहुन आले आहे.

http://www.loksatta.com/

प्रशांत said...

आयुर्वेद तज्ज्ञांशी आपण चर्चा करीत आहात हे वाचून आनंद झाला. हा विषय बराच मोठा आहे व त्यात तुम्ही सखोल अभ्यास करून लेखन करीत आहात म्हणून एक सुचवावंसं वाटतं. या विषयासाठी स्वतंत्र ब्लॉग सुरू केल्यास बरं होईल. तुम्ही या ब्लॉगवर यापूर्वी प्रकाशित केलेले लेखही तिथे समाविष्ट करू शकता किंवा त्यांची लिंक देऊ शकता. त्या ब्लॉगवर लेखांचा क्रम मात्र विरुद्ध ठेवावा. (जुने पोस्ट सर्वात वरती). त्यामुळे सलग वाचणं सोयिस्कर होईल. त्या लेखांची लिंक या ब्लॉगवर देता येईल. तुमच्या या मिशन मध्ये आणखी कोणी असतील तर त्यांनाही त्या ब्लॉगवर विचार मांडता येतील.

A woman from India said...

प्रशांत,
तुमची सुचना अगदी योग्य आहे. सर्व माहिती एका ठिकाणी सुसुत्रपणे संकलित करणे आवश्यक झाले आहे. जरा वेळ लागेल, पण नविन ब्लॉगवर टाकायला सुरुवात करेन.

HAREKRISHNAJI said...

कॄपा करुन नविन ब्लॉग सुरु करु नकात, दोन चार बॉग संभाळणे नंतर जड जाते. किंवा आपला जो planet हा ब्लॉग आहे तो या विषयाशी अगदी चपखल आहे. त्यावर आपण फक्त पर्यावरणावर लिहीत जाणॆ.

A woman from India said...

हरेकृष्णाजी, प्लॅनेट एट पिस हा ब्लॉग मी मुख्यतः इंग्रजी लिखाणासाठी केला आहे. फार करत नसले तरी अधुन मधुन लिहीते.
वर्गीकरण करून वाचकांना माहिती सहज उपलब्ध होईल असा काही पर्याय शोधायला हवा.
विचाराधिन...