Sunday, January 28, 2007

अष्टं चंग पे खेळायचं का?

युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना (UNC) च्या इंटरनॅशनल स्टुडंट प्रोग्रॅममधे होस्ट फॅमेली म्हणून दरवर्षी आमचा सहभाग असतो. परदेशातून इथे शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांना अगदी एकटं वाटू नये, इथली माहिती सांगणारं कोणीतरी असावं हा या प्रोग्रॅमचा उद्देश आहे. यंदा एक चीनी आणि एक नेपाळी विद्यार्थी आमचे गेस्ट आहेत. आम्ही होस्ट आहोत म्हणजे ते आमच्याकडे रहातात असे नाही. पण आम्ही त्यांना इथल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना घेऊन जातो किंवा काही अडलं नडलं तर शक्य तेव्हढी मदत करतो. त्यांच्यामुळे आम्हाला घर बसल्या निरनिराळ्या देशाची माहिती होते.
या प्रोग्रॅमचे डायरेक्टर "विविध देशातील बैठे खेळ" या विषयावर एक कार्यक्रम आयोजित करत आहेत, आणि भारतातील बैठ्या खेळाचे आयोजन करायची जबाबदारी अर्थातच आमच्यावर आली आहे. कुठला खेळ निवडावा ते काही आधी सुचत नव्ह्तं. बैठे खेळ म्हंटल्यावर आधी डोक्यात आलं ते बुद्धीबळ. पण ते काय सगळ्यांनाच माहिती आहे. बरंच डोकं खाजवल्यावर सुचलं - अष्टं चंग पे. लहानपणी भावंडांबरोबर किती वेळा तरी खेळले असले तरी खडूनी फरशीवर काढलेला डाव आणि चिंचोक्यांचं दान या पलिकडे काहीही आठवेना. शेवटी बाबांना, भावंडांना, विचारलं. आईला आठवत होतं. बाबांनी चांगलं ड्राईंगच काढून पाठवलं आहे.
ते वाचून एक मुख्य गोष्टं लक्षात आली की हा खेळ अगदी घरात असणारं साहित्य वापरून खेळता येतो. चिंचोक्यांचे फासे, आगपेटीच्या काड्या, खडूचे तुकडे, दाणे, छोटे दगड (किंवा असंच काही तरी मिळेल ते )यांची प्यादी! टिव्ही नसलेल्या काळात घरबसल्या मुलांचे मनोरंजन.

खेळाचे नियम:
*खेळाडूंची संख्या - कमीत-कमी २ जास्तीत जास्त ४.
*वरील चित्रात दाखवलेली आकृती फरशीवर किंवा एका मोठ्या कागदावर/कार्डबोर्डवर काढुन घ्या.
*खेळाडू त्या आकृतीच्या चारी बाजूला बसतात.
*तुमच्या बाजूचा फुली काढलेला चौकोन म्हणजे तुमचे घर.
*सुरवातीला तुमची ४ प्यादी त्या घरात ठेवायची.
*प्यादी चित्रात दाखवलेल्या दिशेनी पुढे जातात.
*मधोमध असलेले घर लवकरात लवकर गाठणे हे खेळाचे उद्दिष्टं
*दोन चिंचोके घ्या. त्यांना मधून तोडून प्रत्येकी दोन, असे चार तुकडे करा (पाण्यात भिजवले की लवकर तुटतात.)
*चिंचोक्यांचा बाहेरचा भाग काळसर आणि आतला भाग पांढरा असतो.
*ज्याची खेळी असेल त्या खेळाडूने चिंचोके फेकायचे. जितके पांढरे भाग वर असतील तितकी घरं प्यादं पुढे सरकवायचं.
*चार पांढरे आले तर मात्रं आठ घरं पुढे सरकायचं आणि एक जास्तीची खेळी खेळायची.
*चार काळे आले तर चार घरं पुढे सरकायचं आणि एक जास्तीची खेळी खेळायची.
*प्याद्याची चाल ज्या घरात पडली तिथे दुस‍र्‍या खेळाडूचं प्यादं असेल तर ते मरेल आणि घरी परत जाईल.
*दुसर्‍याचं प्यादं मारलं तर एक जास्तीची खेळी खेळायची.
*दोन प्यादी एकदम पुढे सरकवता येतात. त्यासाठी अर्धी घरं पुढे जायचं म्हणजे चार आले तर दोन प्यादी दोन घरं पुढे सरकवायची.
*घरातून जोडीने पुढे निघालेल्या प्याद्यांची जोडी तोडता येत नाही.
*जोडीने जोडी मारायची.
*****आता चिंचोके नसतील तर काय करायचं? म्हणजे, तेव्हा आम्ही काय करायचो ते नवर्‍याला सांगीतलं तर त्याला चक्करच येईल. या प्रकाराला आम्ही ओली सुकी असं म्हणायचो. चार कसलेही सपाट तुकडे घ्यायचे - तुटलेली फरशी, कौलं, बशांचे तुकडे असं काही तरी. आणि प्रत्येक तुकड्याच्या एका बाजूवर थुंकून ती बाजू ओली करायची. ओली बाजू काळी, कोरडी बाजू पांढरी.

खेळायचं का मग?

Wednesday, January 24, 2007

मराठी ब्लॉग्ज: एक निरीक्षण

गेल्या काही महिन्यांपासुन मी नियमितपणे मराठी ब्लॉग वाचते आहे. ते वाचुन माझी मराठीची भूक भागते आहे. पण तरी कशाची तरी कमतरता असल्याचं सारखं जाणवत होतं. नक्की काय ते कळत नव्हतं. काही दिवसांपासुन हिंदी ब्लॉग वाचायला सुरुवात केली आणि मराठी ब्लॉग्जमधे कशाचा अभाव आहे ते लक्षात आलं.
माझ्या मते मराठी ब्लॉग्जवर:
१. विरोधी विचारधारा अभावाने आढळतात.
२. विषयांमधे फारसे वैविध्य आढळत नाही.
३. बहुतेक लिखाण आत्मसंतुष्ट/आत्मकेंद्रित वाटतं. "बरा म्हणुनी मी हा इथे दिवा पारवा पार्‍याचा.."?
इंटरनेट या माध्यमाचा वापर करणारे मराठी लोक सुखवस्तु आहेत हे कबुल, पण समाजात रोज किती तरी बर्‍या वाईट घटना घडतात, त्यावर टिप्पणी दिसत नाही. जगाच्या रंगभूमीवर घडणार्‍या घटनांचे प्रतिबिंब मराठी लेखनात उतरत नाही.
माझ्या ह्या मताशी तुम्ही सहमत आहात काय?
सहमत असाल तर त्याच्या मागचे कारण काय असावे?

टीपा:
माझा स्वत:चा ब्लॉग याला अपवाद आहे असे मला मुळीच म्हणायचे नाही
काही मराठी ब्लॉग्जमुळे माझे अनुभव विश्वं नक्कीच जास्तं सम्रुद्ध झाले आहे.

तुलना करण्यासाठी इथे जाऊन पहा:
http://www.filmyblogs.com/hindi.jsp

Tuesday, January 23, 2007

"वॉटर" ऑस्कर नामांकित

अपेक्षेप्रमाणे दिपा मेहतांच्या "वॉटर" ला फॉरेन फिल्म गटात ऑस्कर नामांकन प्राप्तं झाले आहे.
भारतात अजुनही हा चित्रपट दाखवलेला नाही. परिपक्वं लोकशाहीच्या नागरिकांनी विचारांचा सामना विचारांनीच करायला हवा - अगदी धार्मिक भावना दुखावल्य गेल्या तरी. या चित्रपटात प्रदर्शित केलेल्या मताशी तुम्ही अगदी असहमत असलात तरी चित्रपट बघण्यालायक आहे आणि तुम्ही खुर्चीत खिळुन रहाल हे मात्रं खरे.
परिक्षण मी आधीच लिहिले आहे. ते इथे वाचा.
http://kasakaay.blogspot.com/2006/05/water.html#links

Thursday, January 18, 2007

आता तरी...

शासकिय आकड्यानुसार आमची संख्या दोन कोटी आहे. स्वातंत्र्यासाठी जीवनाची आहुती देणार्‍यांपेक्षा आमची संख्या जास्त आहे. सीमेवर शत्रूशी लढताना प्राण गमावणार्‍यांपेक्षाही जास्त आहे. मात्रं आमचं बलिदान हे सर्व अर्थानी मूक आहे, कारण हे दान आम्ही स्वेच्छेने दिलेले नाही, तर आमच्याकडून ह्कनाक घेण्यात आलेलं आहे. आमच्या आई-वडिलांनी, लोभी डॉक्टरांच्या मदतीने विज्ञानाचा दुरुपयोग करत, जन्मापूर्वीच आम्हाला खुडून टाकलं आहे, किंवा जन्मानंतर काही दिवसाच्या आतच...
गेल्या वीस वर्षात दोन कोटी चिमुकल्या कन्या ह्या भयंकर सामजिक प्रथेच्या बळी ठरल्या आहेत. आमचे आई-बाप समाजाच्या सगळ्या स्तरात आहेत, खेड्यात आहेत तसे शहरात आहेत. निरक्षर आहेत तसेच साक्षर. गरीब तसेच गर्भश्रीमंत. काश्मिर ते कन्याकुमारी, महाराष्ट्रं ते बंगाल सगळीकडे कमी अधिक प्रमाणात आहेत.
हीच का ती प्राचिन गौरवशाली संस्कॄती? हेच का ते मुक्तं करणारे ज्ञान-विज्ञान? ह्यालाच प्रगती म्हणायचे का? हयाला सामजिक न्याय म्हणायचे का? महासत्ता बनण्याची स्वप्ने बघणार्‍या समाजाची हीच मनसिकता का? हाच का राज्यघटनेने तुम्हाला दिलेला मुलभूत ह्क्कं?
आमच्या बलिदानाने काही प्रमाणात तरी लोकसंख्येला आळा बसला आहे - जाता जाता तो ही एक फायदा आम्ही देशाला करुन दिला आहे. पुरुषा-गणिक स्त्रियांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. तुमच्या ह्या स्वतंत्र देशामधे जन्मण्याचा ह्क्कं आम्हाला मिळाला नाही, तरी एक फक्त विनंती आहे - आमच्या अनेक बहिणी आहेत, ज्या जन्मल्या तर आहेत, पण त्यांची स्थिती आमच्यापेक्षाही वाईट आहे. आता तरी घेऊ द्या त्या कळ्यांना मोकळे निश्वास, आता तरी उडू द्या त्या पर्‍यांना आपल्या पंखानिशी...आता तरी नका त्यांचे श्वास कोंडु, आता तरी नका त्यांची स्वप्नं जाळू...

Wednesday, January 17, 2007

इटली - भाग ८ (अंतिम) परतीचा प्रवास - आणि मिलानोहुन प्रयाण


ऑक्टो. १६
आज इटली प्रवासाचा अखेरचा दिवस. मोंतालीहुन कारने सिएनाला जायचे, तिथे कार परत करायची. तिथुन आगगाडीने फिरेंजे. फिरेंजेला गाडी बदलुन मिलानो. आजची रात्र इन्व्हेरिगोला अल्बर्टोंच्या घरी काढायची. उद्या सकाळी दहा वाजताच्या सुमाराला आमच्या दोघांचा विरुद्ध दिशेचा प्रवास सुरु होणार - नवरा घरी परत आणि मी माहेरच्या वाटेवर - भारतात जायला निघणार.
कंट्री-हाऊस मधील नाश्त्याचा अखेरचा अनुभव घेतला. जड पावलांनी सामान गाडीत टाकले. मोंतालीच्या कच्च्या रस्त्यावरुन मार्गक्रमण सुरु झाले. एक वाजेच्या आत सिएनाला पोचायचे, नाहीतर कारचे एक दिवसाचे भाडे जास्ती भरावे लागेल. तसा वेळ बराच होता म्हणुन मोठ्या रस्त्याने नं जाता जरा आडवळणाने जायचे ठरवले. हा रस्ता नकाशात दिसत नव्हता, पण रस्त्यावर सिएनाच्या पाट्या होत्या त्याप्रमाणेच जायचे ठरवले. सर्व्हास सदस्या मोनिका सिएनामधे हर्ट्झच्या पार्किंग लॉटमधे आम्हाला भेटणार होत्या.
१२.३० च्या सुमाराला पुन्हा हायवेला लागलो. एकला दहा कमी असताना सिएनाचे एक्झिट घेतले. आता दहा मिनिटात हर्टझ शोधुन काढायचे आव्हान मला नवर्‍यानी दिले. गाव जवळ जवळ यायला लागले तसे एका ठिकाणी थांबुन कोणत्या रस्त्याने टुरिस्ट लोकांना गाड्या चालवता येतात त्याची एकदा खातरजमा करुन घेतली. आता "डावीकडे", "उजवीकडे", "मधल्या लेनमधे" अशा माझ्या सुचना नवरा अविश्वासानेच पाळत होता "आर यु शुअर?" असं सारखं सारखं विचारत होता. (आता मी काय सिएनामधे लहानाची मोठी झाले की काय? ) शेवटी एकदाची ओळखीची खुण दिसली, त्याला म्हंटले, इथुन उजवीकडे वळ आणि लगेच हर्टझ तुझ्या डाव्या हाताला येइल. तसे त्यानी केले आणि खरोखरच हर्टझ दिसल्यावर हर्षभरानी त्यानी माझ्याशी जोरात हात मिळवणी केली. एकच्या काट्याला आम्ही पार्किंग लॉटमधे शिरलो.
मोनिका आमची वाटच पहात होती. कार परत करण्याचे सोपस्कार पूर्ण केले. मग मोनिका बरोबर स्टेशनवर जाऊन वेळापत्रकं बघुन आलो. दुपारी तीनची फिरेंजे पकडायची असे ठरवले. सिएनाचा डुओमो आतुन बघायचा राहिला आहे. तो बघण्याची नवर्‍याची फार इच्छा आहे, पण मोनिकाला आणि मला वेळ कमी पडणार असे वाटत होते. डुओमोच्या आतल्या फरशा एरवी झाकलेल्या असतात. पण आता त्याच्या वरचे आच्छादन काढले आहे. त्या फरशांवरचे नक्षीकाम बघायची संधी आता उपलब्ध असताना ती वाया घालवणे योग्य नाही असे वाटल्याने आम्ही धावत पळत डुओमो बघायला गेलो. मोनिकाने आम्हाला बाहेर सोडुन ४५ मिनिटांनी परत तिथेच भेटायचे ठरवले.

डुओमो खरच बघण्या लायक आहे. फरशीवरच्या संगमरवरावर तर अप्रतिम दृष्ये साकारली आहेत. आता इथे पुन्हा वेळेचे भान ठेवायची जबाबदारी माझीच. ४० मिनिटे झाली तशी नवर्‍याला "शेवटची पाच मिनिटे" अशी सुचना दिली. बळे बळेच त्याला बाहेर काढले. मोनिका वाटच पहात होती. मोनिकानी आमच्या साठी तिच्या बागेतली चविष्ट ऑरगॅनिक सफरचंदे आणली होती आणि तिच्या घराचे फोटो वगैरे पण दाखवले. आता कोटाच्या आतुन बाहेर पडायला गेलो तर तिच्या पर्किंग तिकिटामधे पुरेसे पैसे नव्हते. म्हणजे जिथे पैसे घेणारा माणुस बसला असेल त्या दरवाजावर जायला हवं. दोन-तीन दरवाजे फिरून शेवटी एक उघडे काऊंटर सापडले. मात्रं त्या दरम्यान आमची तीनची गाडी चुकली. मग मिळेल त्या बसनी फिरेंजे गाठले.
धावत पळत बसमधुन उतरून रेल्वे स्टेशन गाठले, तर युरोस्टार अगदी डोळ्या समोरून सुटली, पकडता आली नाही. पुढची युरो-स्टार रद्द झाल्याचे कळले. मग एका पॅसेंजर गाडीत बसलो. ती थांबत थांबत खुप उशीरा फिरेंजेला पोचली. तो पर्यंत इन्व्हेरिगोला जाणारी शेवटची गाडी गेलेली होती. आता रात्री मिलान मधेच कुठेतरी घालवावी असा विचार केला. ते कळवायला अल्बर्टोंना फोन केला, तर ते म्हणालो, "तसं नका करू, मी येतो घ्यायला." आम्हाला जरा संकोचच वाटत होता. रात्रीचे बारा वाजत आले होते. पण ते म्हणाले काही काळजी करू नका. मी निघालोच, तुम्ही टॅक्सी स्टॅंडजवळ उभे रहा. त्याप्रमाणे थोड्या वेळ्यानी बाहेर पडुन टॅक्सी स्टॅंडजवळ उभे राहिलो. दहा एक मिनिटात ते आले. त्यांना पाहुन आम्हाला खुप आनंद झाला - जणु काही फार वर्षांची ओळख असलेला जुना दोस्त भेटावा तसा. त्यांनी गालाला गाल घासुन आमचे स्वागत केले. इतक्या रात्री थेट इव्हेरिगोहुन मिलानो सेंट्रलला आम्हाला घ्यायला आल्यावद्दल आम्हाला त्यांच्याबद्दल फारच आदर वाटु लागला. एखादा असता तर म्हणाला असता रहा आता मिलान मधेच. तसं करणं अगदी अयोग्यही दिसलं नसतं. पण ते आवर्जुन घ्यायला आले यातच त्यांचा मोठेपणा दिसुन आला.
घरी अर्थातच जेवण तयारच होते. चांगलं थ्री कोर्स डिनर आणि डिझर्ट.
रात्री झोपायाला चांगलाच उशीर झाला होता. जेमतेम काही तास झोपुन पहाटे साडेपाचला उठलो. तयार होऊन साडे सहाची गाडी पकडायला स्टेशनवर आलो. गाडी आली तसा अल्बर्टोंचा निरोप घेतला. त्यांनी गालावर गाल घासुन निरोप दिला आणि पुन्हा एकदा घासुन खास विदाइ दिली. गाडीत बसुन त्यांना दिसेपर्यंत टाटा केले.
कर्डोनाला गाडी बदलुन माल्पेन्झा एक्स्प्रेसमधे बसलो. यावेळी काही उशीर वगैरे नं होता साडे नऊच्या सुमाराला एअरपोर्टवर पोचलो. माझी भारतात न्यायची बॅग लॉकर रुम मधे ठेवली होती ती ताब्यात घेतली.
आपापल्या लाइनीत जाऊन चेक इन करुन आलो. ड्युटी-फ्री दुकानातुन चॉकलेटस वगैरे विकत घेतली. नवर्‍याचे विमान माझ्या आधी सुटणार होते. पण दोन्ही विमाने उशीरा सुटली. माझे तास भर उशीरा सुटले. नवरा केव्हाच गेला असावा असं मला वाटल. पण नाही. काल पासुन पाठीमागे लागलेला प्रवासातला खोळंबा अजुनही त्याच्या पाचवीला पुजला होता. मी मुंबईत पोचुन एक रात्रं काढुन सकाळच्या विमानानी नागपुरला उतरले तेव्हा कुठे नवरा घरी पोचला होता. असो.
तरीही त्याने फोटो काढणे थांबवले नाही. या लेखाच्या सुरवातीचा फोटो नवर्‍याने विमानातुन काढलेले आल्प्सचे दृष्य - उड्डाणानंतर दहा मिनिटानी घेतलेले आहे.
तर असा झाला आमचा इटलीचा दौरा.. प्रवास करण्यात जितका आनंद मिळाला तितकाच आनंद हे वर्णन लिहिताना झाला. हे लिखाणाचे काम चांगले अडीच-तीन महिने पुरले, पण त्या निमित्याने त्या आठवणींनी उजाळा मिळाला. हे वर्णन वाचुन तुमचे मनोरंजन तर झाले असेलच, पण काही नविन माहितीही मिळाली असेल अशी आशा आहे....
टाटा...पुन्हा भेटु लवकरच...

टीप:
अनमिकता राखण्यासाठी या लेखांमधील सर्व व्यक्तींची मूळ नावे बदललेली आहेत.

Tuesday, January 16, 2007

इटली - भाग ७ मोंताली आणि असीसी


ऑक्टो. १५
आज आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस! एक वर्ष कसं भुर्रकन उडुन गेलं! गेल्या वर्षात केलेल्या गमती जमती आठवत आम्ही कुटीतुन बाहेर पडलो. आता कुठे आम्हाला परिसर दिवसा उजेडी बघायला मिळत होता. स्वच्छ ऊन पडलं होतं. कंट्री हाऊसच्या परिसरात जिकडे पहावं तिकडे ऑलिव्हची झाडं आहेत. झाडांना हिरवे गार ऑलिव्ह लगडले होते. झाडावरून काढलेले ऑलीव्ह अजिबात खाण्यालायक नसतात. त्यांच्यावर योग्य ती प्रक्रिया करूनच बाजारात विकले जातात.
चार पाच कुट्या, जेवणाचा हॉल आणि ऑफिस असलेली एक छोटेखानी इमारत आणि त्याच्या शेजारचे चॅपल या इमारती, बाकी सगळे शेत. त्या स्वच्छंदी वातावरणाला एकाच गोष्टीचे गालबोट होते - ते म्हणजे मधुनच येणारे बंदुकीचे आवाज. आजुबाजुच्या जंगलात पक्षांची शिकार करायला बरेच लोक येतात. त्या सगळ्या शिकार्‍यांचे नेम चुकोत, किंवा निरपराध जीवांचे बळी नं घेण्याची सुबुद्धी होवो त्यांना होवो, अशा सदिच्छा व्यक्तं करण्यापलिकडे आम्ही काहीही करू शकत नव्हतो.
कंट्री-हाऊसच्या कुशल स्वयंपाक्यांनी केलेली न्याहारी खाऊन तृप्तं झालो. इतर पाहुण्यांबरोबर गप्पा मारायलाही मजा आली. काही काही पाहुणे तर शाकाहारीही नाहीत पण इथले शांत वातावरण आणि उत्तम जेवण इतर हॉटेल्सला मागे टाकणारे आहे.
आजच्या आमच्या सकाळच्या न्याहारीचे फोटो पहा:


जाता जाता चॅपल मधे डोकावलो आणि आश्चर्याचा धक्काच बसला. बाहेरुन चॅपल असले तरी आत चक्कं देऊळच होते. गणेशाची मुर्ती, कुठल्या तरी योगी साधुंचा फोटो आणि त्रिशुळ. इतकेच नव्हे तर बाजाची पेटी, तबला आणि तानपुराही बाजुला सजवुन ठेवला होता. कंट्री-हाऊसचे मालक भारतात जाऊन खयाल गायकी शिकुन आले म्हणे. आता ते गातबित नाहीत, पण त्या आठवणी मात्रं त्यांनी जपुन ठेवल्या आहेत.
त्या चॅपलचे तसेच बाहेरच्या परिसराचे फोटो बघा:
कंट्री हाऊसचे मालक आणि इतर पाहुणे यांच्याकडुन आजुबाजुला काय काय बघता येईल त्याची माहिती, नकाशे इ. घेतले. पाश्चिमात्य जगात शाकाहाराचे आद्य प्रवर्तक सेंट फ्रॅंसिस यांच्या असीसी या गावात जायचे ठरवले.
असिसीत पोचल्यावर आधी द बॅसिलिका ऑफ सॅंता मारिया देलि अन्जेली नावाचे चर्च लागते. हे चर्च जगातले सातवे मोठे चर्च आहे. चर्चच्या आतील पोर्झुंकोला चॅपल ११ व्य शतकात बांधले गेले. तिथेच संत फ्रॅन्सिस यांच्या कार्यामुळे फ्रॅन्सिस्कन ऑर्डरच्या जन्म झाला. इथल्याच चॅपेल्ला दि ट्रान्झिटो मधे संत फ्रॅन्सिस यांचे निधन झाले. त्यानंतर वाढत्या संख्येने इथे येणार्‍या यात्रेकरुंची सोय करण्यासाठी बॅसेलिकाचे बांधकाम सुरु झाले. बांधकामालाच मुळी शंभर वर्षे लागालीत. (इ.स. १५५९ ते १६६७). बॅसिलिकामधे बिना काट्यांच्या गुलाबांची बाग आहे. संत फ्रॅन्सिस यांच्या चमत्कारामुळे बागेतील गुलाबाचे काटे नाहीसे झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे. हा झाला बॅसेलिकाचा इतिहास. मात्रं आम्ही गेलो त्यावेळी बॅसेलिका बंद होता. त्यामुळे आम्हाला बाहेरुनच बघण्यात समाधान मानावे लागले. बॅसेलिकाच्या बाहेर काही फेरीवाले होते. तिथुन इटालियन हस्तकलेचा नमुना असलेला एक फ्रॉक माझ्या (भारतातल्या) भाचीसाठी विकत घेतला. आता आमचा इटली दौरा जवळपास संपत आला असुन मला इथून पुढे भारतात जाण्याचे वेध लागले आहेत. दिवाळीच्या सुमारास भारतात जायला मिळत असल्यामुळे निरनिराळे पदार्थ खाण्याची स्वप्ने पडु लागली आहेत. "आत्ता या क्षणी तुला पुरण पोळी किंवा इटलीतला पिझ्झा या पैकी एक काही तरी निवडावे लागले तर तू कशाची निवड करशील?" असा प्रश्न नवर्‍याने विचारला असता "अर्थातच पुरण पोळी" हे उत्तर ऐकुन त्याला आश्चर्यच वाटले. (त्या कमनशिबी खवय्याला पुरण पोळी आवडत नाही.) असो.
असिसी गाव दोन भागात विभागलेले आहे. सपाट भाग आणि डोंगराचा भाग.
सपाट भाग मागे टाकुन आम्ही डोंगरावर आलो. तिथुन डोंगराचा घेतलेला फोटो या लेखाच्या सुरवातीला दिला आहे. पार्किंग मिळणे जरा कठीणच गेले. इटली मधली इतर गावे आणि असिसी मधला मुख्य फरक म्हणजे इतर गावांमधे टुरिस्ट असतात, पण असिसीमधे मात्रं भाविक यात्रेकरू मोठ्या संख्येने येतात.
एरवी आम्ही दोघेही देव-धर्म या प्रकारापासुन चार हात दूरच असतो. पण गोरगरीब तसेच प्राणिमात्रांचे कनवाळु संत फॅन्सिस यांच्या चर्चमधे आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी येण्याचा आम्हाला विशेष आनंद वाटत होता.
एका श्रीमंत व्यापार्‍याच्या घरात जन्माला आलेल्या संत फॅन्सिस यांनी सुखांचा त्याग करून गरीबांची सेवा करायचे व्रत घेतले.
संत फ्रॅन्सिस यांच्या विषयी अधिक माहिती साठी : http://en.wikipedia.org/wiki/Francis_of_Assisi

असिसीच्या उंच सखल भागात फिरताना वाटसरुंच्या गर्दीतुन वाट काढतच जावे लागत होते. थंडगार वारा वाहत होता. पार्किंग मधुन खाली आल्याबरोबर सॅन रुफिनी चर्च लागले. काही वर्षांपूर्वी असिसीमधे एक भुकंप आला. त्यामधे चर्चचे बरेच नुकसान झाले. त्या दरम्यान चर्चच्या खाली एक प्राचीन रोमन वास्तु असल्याचे निदर्शनास आले. तो भाग लोकांना दिसावा म्हणुन मुख्य चर्चच्या फरशीला पारदर्शक काचा बसवल्या आहेत.
नवर्‍याच्या यादीत असिसीमधल्या एका व्हेजिटेरियन रेस्टॉरेंटचे नाव होते हे त्याला आठवले. चिंचोळ्या बोळीतले ते रेस्टॉरेंट शोधुन काढले. रेस्टॉरेंट अगदी बंद व्हायची वेळ आली होती, पण काही गिर्‍हाइकं रेंगाळली होती. त्यामुळे आत प्रवेश मिळाला. तिथे उम्ब्रियन पास्ता, पालेभाज्यांची परतलेली भाजी इ. खाउन जरा तरतरी आली.

आता मोर्चा संत फ्रॅन्सिस यांच्या बॅसिलिकाकडे वळवला. यात्रेकरुंच्या झुंडी आणि धर्माचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांनी बॅसिलिका गजबजलेला होता. आपल्या भारतातल्या केरळ मधुन आलेल्या अनेक नन्स देखिल दिसल्या. चर्चमधे कसली तरी सर्व्हिस (पुजा) सुरु होती. टुरिस्ट लोकांनी भाविकांच्या मधे येऊ नये म्हणुन सुरक्षा रक्षक तैनात केले होते.
चर्चच्या खालच्या भागात संत फ्रॅन्सिस यांचे पार्थिव शरीर ठेवले आहे हे ऐकुन मला धक्काच बसला. कारण आपल्या गोव्याच्या एका चर्च मधेही संत फ्रॅन्सिस यांच्या पार्थिवाचे मी याची देही याची डोळा दर्शन घेतले आहे!! नंतर माहिती काढल्यावर कळले की गोव्याचे संत फ्रॅन्सिस ते असिसीचे नसुन स्पेनमधील संत फ्रॅन्सिस झेवियर आहेत. एक उलगडा झाला. एक मात्रं खरे की असिसीच्या संत फ्रॅन्सिस यांच्या चमत्काराच्या शक्तीवर अनेक भाविकांचा विश्वास होता. ती शक्ती आपल्याला लाभावी म्हणुन त्यांचा पार्थिवावरुन काही तरी घेण्यासाठी इतके लोक प्रयत्नं करत होते की त्यांचा देह विशेष संरक्षणाखाली लपवुन ठेवण्यात आला. असो. तर संत फ्रॅन्सिस यांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेऊन (म्हणजे एका बंद शवपेटीकडे बघुन) पुन्हा चर्चच्या बाहेरच्या मोकळ्या प्रांगणात आलो.

त्यानंतर जिना चढुन तिसर्‍या मजल्यावर गेलो. "जातो" या प्रसिद्ध चित्रकारानी चितारलेले संत फ्रॅन्सिस यांच्या जिवनावरील फ्रेस्कोज तिथे बघायला मिळाले. बाहेरच्या गवतावरचे शांती चिन्ह (PAX - म्हणजे peace)आकारलेले आहे.
असिसी मधे, विशेषत: संत फ्रॅन्सिस बॅसिलिकामधे अगदी भारतिय तिर्थक्षेत्रासारखे वातावरण असल्या सारखे मला वाटले - भिकारी आणि पंडे वगळता. अर्थात मला असे का वाटते ते ही काही सांगता येत नाही. कारण भारतात फिरताना तिर्थक्षेत्रं टाळण्याकडेच माझा कल असतो.
बॅसिलिका पाहुन झाल्यावर पुन्हा गावात इकडुन तिकडे उगाच भटकलो. आता प्रवास संपत आलेला आहे. इटलीतुन चांगल्या प्रतीचे ऑलिव्हचे तेल न्यायचे होते, ते विकत घेतले.
अंधार पडायला लागला तसे परत मोंतालीकडे जायला निघालो. ट्रॅफिक सर्कलमधे गोंधळ झाल्याने चुकीच्याच रस्त्याला लागलो. नकाशात बघुन पर्यायी मार्ग शोधुन काढला.
कंट्री हाऊस मधे परत आलो ते थेट पानावरच बसलो. आजच्या आमच्या जेवणाचे काही फोटो बघा:


आता इतके सुग्रास अन्नं आणि इतर पाहुण्यांसोबतच्या गप्पा यात वेळेचे भान कोणाला रहाणार? अखेर मालकांनी जवळ जवळ जबरजस्तीने आम्हाला पानावरुन उठवले. बाहेर पडलो तेव्हा सुंदर चांदणे पडले होते. त्या तारकांकडे पहात आमच्या कुटीकडे चालु लागलो.
उद्या या स्वप्नवत दुनियेचा निरोप घ्यायचा आहे.. हे चांदणं आज अनुभवुन घेवु म्हणुन कितीतरी वेळ दोघे आकाशाकडे बघत राहिलो....

Thursday, January 11, 2007

इटली - भाग ६ टुमदार टस्कनी आणि अवखळ अम्ब्रिया

१४ ऑक्टो.
परवा रात्री चालता चालता आम्ही एका दुकानात एक 'व्हिलेज वेडिंग' नावाचे चित्रं बघितले होते. त्याचा फोटो नवर्‍याने काढला आहे. ते चित्रं इतकं छान आहे की इथे टाकायचा मोह मला आवरत नाहीये.


आज दुपारी एक वाजता आम्हाला अम्ब्रियाकडे प्रयाण करायचे आहे. एड्रियानो आणि मौरा आज आम्हाला गावात भेटणार आहेत. गावाकडे चालत जाता जाता कोटाच्या अलिकडे एक छोटेसे दुकान होते - असेच साधे घरगुती सामानचे. तिथे काय काय आहे ते बघावे म्हणुन आत गेलो. दुकानातल्या वस्तुंपैकी एक छोssटासा कॉफी मेकर मला फार आवडला. किंमतही फार नव्हती. परत येताना जमलं तर घेऊ या असं ठरवलं.

ठरल्याप्रमाणे एड्रियानो आणि मौरा आम्हाला भेटले. त्यांच्या बरोबर शहर बघण्यात फार मजा आली. ते दोघेही इथेच शिकले असल्यामुळे त्यांचे कॉलेज वगैरे त्यांनी दाखवले. एड्रियानो आणि मौरा एकमेकांना कॉलेज मधेच भेटले. मौराने मला त्यांची सगळी स्टोरी सांगितली आणि "ईट इज द बेस्ट थिंग दॅट हॅपन्ड टु मी" असं ही सांगितलं.
एड्रियानोनी आम्हाला सिएनाच्या ऐतिहासिक घोड्याच्या शर्यतीबद्दल बरीच माहिती दिली.

फिरता फिरता आम्हाला दिपा मेहतांच्या "वॉटर" सिनेमाची जाहिरात दिसली. भारतिय संस्कृतीच्या अनेक चांगल्या गोष्टी त्यांना माहित आहेतच. पण कटु भूतकाळही विसरून चालणार नाही. म्हणुन एक भारतिय असुनही तो सिनेमा त्यांनी पहावा असे मीच त्यांना आवर्जुन सांगितले.
एड्रियानोनी एक इटलियन लोक संगीताची आणि एक त्यांच्या स्वतःच्या ग्रुपची CD आम्हाला भेट म्हणुन दिली.
एव्हाना बारा वाजत आले, म्हणुन आम्ही फिरस्ती आटोपती घेतली. त्यांच्या गाडीतुन आम्ही आधी हॉटेलमधे गेलो. सामान बांधलेलेच होते.

सामान घेतले आणि तो मघाचचा कॉफी मेकर घ्यायला जरा त्या छोट्या दुकानात थांबलो. यावेळी मौरा पण माझ्या बरोबर होती. त्यामुळे दुकानदारिणीशी संवाद साधण्यात अडचण आली नाही. पुढे मिलानला गेल्यावर अल्बर्टोंनी हे मॉडेल फार आऊट डेटेड आहे असे सांगितले. तरी मला तो इतका आवडतो की आता मी रोजच्या वापरातच ठेवला आहे. आल्या गेल्याला मोठ्या कौतुकाने त्यातुन कॉफी बनवुन देणे सुरू आहे.
एड्रियानोंनी आम्हाला हर्ट्झ कार रेंटल मधे बरोबर एक वाजेच्या आधी आणुन सोडले. काल एड्रियानोंचे मुलगी क्लिओ आम्हाला भेटु शकली नव्हती. पण आह तिला इथे यायला जमणार होते म्हणुन ती आवर्जुन आम्हाला भेटायला आली. काल रात्री तिनी माझ्या सतार वादनाची व्हिडिओ बघितली होती. त्या सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही आता अम्ब्रियाच्या वाटेला लागलो. नवरा
ड्रायव्हर आणि मी नेव्हिगेटर. कार मधे ग्लोबल पोसिश्निंग सिस्टिम (जी.पी.एस)आहे वगैरे बघुन घेतले होते. पण शहराच्या बाहेर पडत नाही तोच जी.पी.एस ची बॅटरी गेली. चार्ज करायला गेलो तर चार्जरच निकामी असल्याचे लक्षात आले. हर्ट्झनी चांगलाच चुना लावला. त्यामुळे आता बाहेरचे निसर्ग सौंदर्य पहाण्या आधी नकाशात डोके खुपसणे आले. काल व्हिनिचिओंकडुन साधारण मार्ग समजुन घेतला होता आणि एक चांगला नकाशाही विकत घेतला होता, म्हणुन बरे.
आज टस्कनीची कंट्रीसाईड जमेल तितकी अनुभवुन अंधार पडायच्या आधी मॊंताली नामक आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचायचे असा आमचा उरलेल्या दिवसाचा कार्यक्रम आहे.
थोड्याच वेळात शहराची वर्देळ संपली आणि रस्ता अगदी अरूंद झाला. टस्कनीने आपले सौंदर्य प्रदर्शित करायला सुरुवात केली. त्या सौंदर्याचे वर्णन करायला माझे शब्दं असमर्थ असले तरी माझ्या नवर्‍यानी घेतलेले फोटो समर्थ आहेत.

मोकळे आकाश, दूर क्षितीजा पर्यंत पोचणार्‍या टेकड्या, सायप्रस वॄक्षांची माळ, इतस्त्तः विखुरलेली शेते. मधुनच लागणारे एखादे गाव, एखादा द्राक्षांचा मळा, रस्त्यालगतची ऑलिव्हची झाडे. हे बघण्यासाठी आम्ही व्हिनित्झिया किंवा रोमा सारखी शहरं सोडुन इथे आलो, इथला लडिवाळ निसर्ग बघुन मंत्रमुग्ध झालो.
रस्त्यात आसियानो नावाचे एक गाव लागले. आता भुका ही लागल्या होत्या. त्या निमित्याने गावात गेलो. आड रस्त्यावरचे ते झोपाळु गाव बघुन आम्ही अगदी खुश झालो. गावाच्या मधुन एकच छोटा रस्ता जातो. दुपारच्या वेळी एक बार वगळता आळीतली सगळी दुकानं बंद होती. चालता चालता दिसणारी माणसं बोनेसेरा (गुड इव्हिनिंग) म्हणुन स्वागत करत होती. वातावरण इतके छान होते की आम्ही बारच्या बाहेरच्या ओसरीतल्या खुर्च्यांवरच बसायचे ठरवले.
बारच्या बाजुचे दुकान बंद होते पण तिथल्या ओसरीवर रिटायर्ड लोकांचा पत्याचा डाव रंगला होता. बार मालकही आगत्यानी आम्हाला काय हवं नको ते बघत होता. तितक्यात एक आजोबा पत्त्यांचा डाव सोडुन आमच्या जवळ आले. आम्ही कुठुन काय आलो त्याची चौकशी करु लागले. आमच्या जवळ नेमकी डिक्शनरी नव्हती त्यामुळे प्रामुख्याने खाणाखुणा करुन बोलणे सुरु झाले. भारताचे नाव ऐकुन आजोबांचे डोळे चमकले. आणि त्यांनी स्वतःकडे बोट दाखवुन मग विमान उडाल्याची खुण केली. त्यावरून ते भारतात येऊन गेल्याचे लक्षात आले, पण कशासाठी गेले, ते पायलट होते की काय ते काही कळले नाही. आम्हाला फारसं काही कळत नसलं तरी ते बोलतच उभे राहिले. मग आमचं जेवण आल. तसे ते थोडा वेळ बाजुला झाले, पण पुन्हा आले. आजोबांच्या गप्पांमुळे जेवणाला चांगलीच रंगत आली.
शांत आसियानोचा एक फोटो पहा:

अशा रम्य गावात दुपारची न्याहारी करुन पुढची वाट धरली. वाटेत एका मोनेस्टेरीत थांबलो. आता मावाळतीला फार वेळ राहिला नव्हता म्हणुन कुठे नं थांबता मोंताली कडे निघालो.
उद्या आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. नवर्‍याने कंट्रीहाऊस मोंताली नावाचे एक व्हेजिटेरियन रिट्रीट शोधुन काढले आहे. (खरं तर आधी तिथलं रिझर्वेशन मिळतच नव्हतं, पण पुन्हा फोन केला तेव्हा नुकताच कोणीतरी बेत रद्द केला होता म्हणुन नशिब, नाही तर नेमके वाढदिवसाच्याच दिवशीचे रिझर्वेशन नाही म्हणुन अख्खी ट्रीपच रद्द व्हायची वेळ आली होती.)
व्हिगन असल्याचे अर्थातच आधीच कळवले होते.
बरीच काळजी घेऊनही आम्ही कुठेतरी एक चुकीचे वळण घेतले. रस्त्यात थांबुन हॉटेलच्या मालकांना फोन केला आणि इतर काही लोकांना विचारले आणि पुन्हा योग्य रस्त्यावर लागलो. मोंतालीला जायला मुख्य रस्त्यापासुन एका फाटा लागतो. तिथुन पुढे सात किमी कच्चा रस्ता आहे. आमचे कट्री हाऊस टेकडीच्या वरती एका ऑलिव्हच्या बागेत वसले आहे. (शेतात, बागायतीत टुरिस्ट लोकांची रहाण्याची व्यवस्था करणे याला एग्रो टुरिझम असे नाव आहे.) इन द मिडल ऑफ नो व्हेयर असलेले हे ठिकाण शोधुन काढल्याबद्दल मी नवर्‍याचे आभार मानले.
पोचे पर्यंत चांगलाच अंधार पडला होता. त्यामुळे आम्हाला आधी जेवायलाच बसवले. कंट्री हाऊसच्या मालकांना वाटले की आजच आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, म्हणुन त्यांनी खास मेजवानी आखली होती. तसे ते नेहेमीच अतिशय सुग्रास (gourmet) जेवण बनवतातच, पण आज खासच बेत होता.
आमच्या त्या जेवणाची थोडी झलक पहा:इतर पाहुण्यांबरोबर गप्पा मारत या मेजवानीचा आस्वाद घेतला. ऑलिव्हच्या दुतर्फा लावलेल्या झाडांमधुन मार्ग काढत आमच्या कुटीमधे आलो. या कुटीचे फोटो पहा:

बाहेरची पडवी:

आतले फोटो:

Thursday, January 04, 2007

..तरीही नववर्ष सुखाचे जावो

आर. के. च्या मार्मिक कार्टुनमधे दाखवल्याप्रमाणे निरपराध, सुकुमार बालकांच्या निघॄण हत्या, विमान अपघात, सद्दामांना फाशी अशा घटनांनी २००६ चा शेवट आणि २००७ ची सुरुवात गाजत असली, तरीही नविन वर्ष तुम्हाला सुखाचे जावो. या नविन वर्षात आपल्या सगळ्यांना जास्तंच सजग रहायचे आहे. जाणिवा बोथट नं होऊ देता, त्यांचे सकरात्मक कॄतीमधे रूपांतर करण्याचा निर्धार करु या....

Wednesday, January 03, 2007

सद्दामायण

नविन वर्षात गद्यावरुन पद्यावर उतरण्याचा माझा कुठलाही इरादा नाही.
माझ्या भावाने केलेली ही कविता तुमच्यासाठी इथे उतरवली आहे..

पिंजरा तेलाचा होता
फंदा फितुरीचा होता
थोट्या बिभिषणाच्या बाहीत
हात पश्चिमेचा होता.
धूर्त फुलांचा गनिमी कावा
उपटसुंभांनी सुंभ जाळावा
काट्याने काट्याचा काटा काढावा
तरीही त्याचा पीळ कायम असावा
होते राज्य वेळेचे
अन काळही सोकावला होता
बनून जल्लाद ससा
सिंहशवी नाचला होता
बुद्ध गांधींची वचने
जाता जाता यमदूत आळवीत होता.
चुकवित नजर त्याची यमराज थिजला होता
बोक्याच्या लोणकढीला
उकळी मांजरांची होती
पंचतंत्रात या लोण्यासह
माकडाचीही पडली आहुती
माकडांच्या लोण्याची
बोका देणार ढेकर आहे
लोणी तराजू माकडे व बोका
यावर सैतानाचेच राज्य आहे

इटली - भाग ५ सिएनाची सुरेल सफर


१३ ऑक्टो.
आज सकाळी धावत पळत (अक्षरश:) केकोच्या स्टुडिओमधे गेलो. त्यांच्याकडून फिरेंजे शहराचे द्रुष्य असलेले मोझेक विकत घेतले. स्टुडिओमधे एरवी मोझेकची विक्री होत नसल्यमुळे ते क्रेडिट कार्ड घेत नाहीत. एव्हाना आमच्याकडले युरो ट्रॅव्हलर्स चेक संपत आले होते. बॅंकेत जाऊन अमेरिकन डॉलरमधले ट्रॅव्हलर्स चेक देऊन रोख रक्कम काढायचा प्रयत्नं केला. पण त्यासाठी नुसते ओळखपत्रं दाखवून भागत नाही, तर पासपोर्ट जवळ असावा लागतो. तो आमच्या जवळ त्या वेळी नव्हता. म्हणून डेबिट कार्ड वापरुन एटीएम मधुन पैसे काढावे लागले.
उशीर होऊ नये म्हणून आज आम्ही बसनी प्रवास करायचे ठरवले होते, पण कुठे उतरायचे आणि चढायचे ते नीट माहित नसल्याने उलट जास्तच वेळ वाया गेला. एकदा तर बस गावाबाहेर जाऊ लागल्यावर काहीतरी घोटाळा झाल्याचे लक्षात आले.
इतकं असुनही निघण्याच्या आधी पलाझ्झो पिट्टी जमला तर बघावा म्हणुन तिथे गेलो पण तिकिट बरेच महाग होते आणि आम्हाला काही तितका वेळ नव्हता म्हणुन परतीची बस पकडली.
स्टेशनवर जायला टॅक्सी बोलवली होती. त्या टॅक्सीवाल्यानी इतका उशीर केला आम्ही पायी जायलो निघालो. तेव्हढ्यात तो आला. टॅक्सीमधे बसताच अर्थातच टॅक्सीवाल्याशी संवाद साधण्याची संधी नवरा सोडणार नव्हता. अगदी पाच मिनिटाचाच प्रवास होता तरी नवर्‍यानी मला डिक्शनरी काढायचे फर्मान सोडले. ती नेमकी आता सामानातुन शोधून काढायचा मला कंटाळा आला म्हणून मी टॅक्सीवाल्याला "पारले इंग्लिश?" (इंग्रजी येतं का?) तर तो म्हणाला हो. अडचण मिटली आणि दोघांचा संवाद सुरु झाला. तेव्हढ्यात स्टेशन आले. तिकिटे काढून बसची वाट पहात उभे होतो. मला जरा भूक लागली होती. व्हिगन पासपोर्ट घेऊन काही तरी खायला घेण्यासाठी मी स्टेशनच्या बाहेर पडले. जवळच्या एका बार मधे पासपोर्ट दाखवला आणि माझ्यासाठी स्पाघेटी आणि नवर्‍यासाठी जिलाटो घेऊन परत स्टेशनवर आले. ती चविष्ट स्पाघेटी नवर्‍याने चाखल्यावर त्याचीही भूक चाळवली. त्यावर ताव मारत असतानाच आमची बस आली. सामान डिकीत ठेऊन उरलेली स्पाघेटी बसमधे बसून खावी असे म्हणून मी चढू लागले, पण ड्रायव्हरसाहेबांना ते मुळीच रुचले नाही. इटालियन मधे काही तरी बडबड करत त्याने मला खाली उतरायला लावले. त्यावेळी माझ्या लक्षात आले की आधीही आम्ही असं बस स्टॉपवर उभ्या उभ्या खात असल्याचं पाहून लोक आमच्याकडे विचित्रं नजरेनी पहात होते. अमेरिकेत लोक सतत खाण्याचे पदार्थ हातात घेऊन इकडून तिकडे जात असतात. खाण्यासाठी वेगळा वेळ घालवणे त्यांना मुळीच आवडत नाही, पण इथे मात्रं ही कल्पना तेव्हढी मान्य नाही असे दिसते. असो. उरलेली स्पाघेटी कशीबशी घशाखाली उतरवल्यावर बसमधे चढायला मिळाले.

काही मिनिटातच शहराचा गाजावाजा मागे टाकत, डौलदार वळणे घेत आमची बस ट्स्कनी प्रांताकडे निघाली. टस्कनीचे निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी आम्ही दोघेही आतूर झालो होतो. हिरव्यागार टेकड्या, ऑलिव्हची झाडे, निमुळ्त्या पेन्सिल सारखे दिसणारे सायप्रस वॄक्ष टस्कनीच्या कंट्रीसाईड मधे आमचे आगमन झाल्याची वर्दी देऊ लागले. दोन तास कसे गेले ते कळलेही नाही.
सिएना बस स्टॉपवर उतरलो तेव्हा सर्व्हास सद्स्य व्हिनिचिओ आमची वाटच बघत होते. त्यांचे प्रसन्न व्यक्तिमत्व बघुन आमचा प्रवासाचा होता नव्हता तो शीण पार विरुन गेला. त्यांच्या गाडीत बसुन आम्ही होटेलमधे गेलो. १०-१५ मिनिटात तयार होऊन खाली आलो.
आजचा दिवस एका वेगळ्याच कारणासाठी महत्वाचा आहे आणि मी या दिवसाची आतुरतेने वाट पहात होते. का ते तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. तुर्त आम्ही व्हिनिचिओंच्या गाडीत बसुन शहराचा फेर-फटका मारायला निघालो आहोत. फिरेंजेच्या मानाने सिएना खुपच लहान आहे.
१२ व्या शतकात सिएना हे या भागातले सर्वात महत्वाचे शहर होते - फिरेंजेपक्षाही महत्वाचे. त्या काळात ही छोटी-छोटी राज्ये होती. सिएना आणि फिरेंजे ही प्रतिस्पर्धी राज्ये होती. पण १३ व्या शतकात सिएनाला प्लेगने गाठले, त्यामधे या शहराची जी हानी झाली ती आजतागायत भरुन निघालेली नाही. टेकडीवर वसलेले किल्लेवजा शहर कोटाच्या आत बंदिस्त आहे. आमचे हॉटेल कोटाच्या जरा बाहेर असल्याने आम्हाला फारच सोयीचे झाले आहे. (तो कोट आणि त्याचे दरवाजे पाहुन मला अमरावतीच्या केविलवाण्या कोटाची आठवण झाली. पण इटली प्रवास संपवुन भारतात गेल्यावर यंदा मात्रं कोटाच्या बाहेरचे अतिक्रमण हटवुन सौंदर्यीकरण केल्याचे पाहुन मला सुखद धक्का बसला). कोटाच्या आत वाहनबंदी घालण्यात सिएनाचा पहिला नंबर लागतो. ऐका, ऐका या हॉटेलमधुन कपबशांचीही किणकिण ऐकु येते आहे की नाही? इथे गाड्या असत्या तर त्या घरीघरी पुढे तुम्हाला दुसरे काही ऐकु आले नसते. आज जगातल्या किती तरी शहरांनी सिएनाचे अनुकरण केले आहे. व्हिनिचिओ अभिमानाने सांगत होते.

पहिल्या दरवाज्याच्या आत थोडे पुढे गेल्यावर पियझ्झा सेलिम्बेनि आला. इथे जगातली सर्वात प्राचीन बॅंक सुरू झाली. इस १४७४ मधे सुरु झालेली ही बॅक आजही कार्यरत आहे. व्हिनिचिओंच्या मते सलिनबेनी यांनी स्वत: ही बॅंक सुरु केली. पण मी जे काही वाचले आहे, त्यामधी तसा उल्लेख कुठेही आढळत नाही. सलिमबेनी हे एक कलाकार होते आणि बॅंकेचे प्रमुख कार्यालय सलिमबेनी पियाझ्झामधे आहे याच्यापलिकडे सलिमबेनीचा आणि बॅंकेचा संबध असल्याचे मला तरी काही सापडले नाही. वाचकांपैकी कुणाला याची माहिती असेल तर जरूर नोंद करा. फ़्रन्सिस्कन ऑर्डरच्या धर्मगुरुंनी बँकिग व्यवस्था प्रस्थापित केली. इटली मधील चर्चची भव्यता पाहुन त्यांच्या ताब्यात किती प्रचंड संपत्ती होती ते लक्षात येते. त्यामुळे धर्मगुरूंच्या अर्थकारणाच्या ज्ञानाबाद्दल मुळीच आश्चर्य वाटायला नको. त्यात असिसीचे सेंट फ्रॅन्सिस हे पददलितांचे कनवाळु होते. रिनायसंसच्या सुरुवातीच्या काळात श्रीमंत आणि गरीबांमधली दरी वाढत होती. ती कमी करण्याच्या समाजोपयोगी ध्येयाने प्रेरित झालेल्या मॅजिस्ट्रेटने या बॅंकेची स्थापना केला.

चालत चालत आम्ही पियाझ्झा डी कॅंपोमधे आलो. चारी बाजुंनी भिंतींनी वेढलेल्या या पियाझ्झामधे उतराय्ला पायर्‍या केल्या आहेत. हा पियाझ्झा सिएनाच्या जनजिवनाचा एक महत्वाचा हिस्सा आहे त्याप्रमाणे इतिहासाला जोडणाता एक महत्वाचा दुवा आहे. आजही इथे घोड्याच्या शर्यतींची परंपरा चालवली जाते. शिंपल्याच्या आकाराच्या ह्या प्रचंड पियाझ्झामधे चौपाटीवर असावे असे वातावरण होते. आजुबाजुला छोटी-छोटी खाद्यपदार्थांची दुकाने, आणि उन्हात पहुडलेले लोक हे खुणावणारे दृष्य असले तरी त्यावेळी आम्हाला तिथे थांबता येणार नव्हते.

उद्या आम्हाला कार भाड्याने घेऊन उम्ब्रिया प्रांताकडॆ रवाना व्हायचे आहे, म्हणुन व्हिनिचिओं बरोबर आम्ही हर्टझ कार रेंटल मधे जाऊन सगळं ठरवुन आलो.
संध्याकाळी व्हिनिचिओंच्या एका मित्राकडे खास आमच्यासाठी एक पार्टी आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे गावाचा फेरफटका आटोपता घेऊन आम्ही व्हिनिचिओंच्या घरी गेलो. व्हिनिचिओंची पत्नी पियेरा व मोठी मुलगी अमिलिया यांच्याशी परिचय झाला. उत्तम प्रतीच्या ऑरगॅनिक सफरचंदांच्या रसाचा आस्वाद घेतला. व्हिनिचिओं शांतीवादी तसेच पर्यावरणवादी असल्याने निसर्गाशी समतोल साधुन उत्पन्न केलेले ऑरगॅनिक खाद्यपदार्थ तसेच, नैसर्गिक संपदा कमीतकमी वापरण्यासाठी जवळपासच्या परिसरात निर्माण केलेल्या वस्तु घेण्याकडे त्यांचा कल आहे.
थोड्याच वेळात आम्ही सर्व व्हिनिचिओंच्या गाडीतुन त्यांचे मित्रं एड्रियानो यांच्या घरी जायला निघालो. एड्रियानोंचे घर गावाच्या बाहेर एका माळरानावर आहे. गाडीत गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. आश्चर्य म्हणजे छोटी अमिलियाही मोकळेपणानी गप्पांमधे सहभागी झाली होती. कारण काहीही असो, पण त्या वयातील अमेरिकन मुले मोठ्यांशी अगदी कमीतकमी संवाद साधतात. अगदी नजरही भिडवत नाहीत. त्या पार्श्वभुमीवर अमिलियाचा मोकळेपणा वार्‍याच्या झुळुकेप्रमाणे आल्हाददायी वाटला. सिएना हे टुरिस्ट आकर्षण असल्यामुळे त्यांच्याकडे महिन्यात एकदा तरी सर्व्हास प्रवासी येऊन रहातात. अशा वातावरणात वाढल्यामुळे ती काही वेगळी आहे, की सर्वच इटालियन मुले तिच्या सारखी आहेत ते मला सांगता येणार नाही, पण तिच्या निरागस वयाला शोभतील अशा शाळेतल्या गमती-जमती, पुस्तके, संगीत अशा विषयांवर गप्पा मारायला मला फार आवडले. एड्रियानो आणि त्यांची पत्नी मौरा यांच्या फार्महाऊसवर पोचेपर्यंत अंधारच पडला होता. हसतमुखाने त्यांनी आमचे स्वागत केले. एकिकडे त्यांचा दहा वर्षांचा मुलगा टिटो आणि कुमारी अलिचिया यांचे बालसुलभ खेळ सुरु झाले. मोनिका नावाच्या आणखी एक सर्व्हास सदस्याही तिथे आल्या होत्या. फळांचा रस आणि खास आमच्यासाठी केलेल्या उत्तम खाद्यपदार्थांनी केलेल्या पाहुणचाराने आम्ही भारावुन गेलो. काही वेळात पियेरा अमिलियाची छोटी बहिण एंजिलिनाला घेऊन आली. एंजेलिनाचा नृत्याचा क्लास तिथुन जवळच असतो. पण मगाशी म्हंटल्याप्रमाणे या मैफिलीचा उद्देश काही वेगळाच आहे. एड्रियानो काही वर्षांपूर्वी भारतात गेले होते, आणि तिथुन त्यांनी एक सतार आणली आहे. मी सतार वाजवते हे ऐकुन त्यांना कोण आनंद झाला होता! या दिवसाची ते किती वाट पहात होते ते त्यांच्या उत्साहावरुन लक्षात येत होते. एड्रियानो स्वत: संगितज्ञ असले तरी अनेक वर्षात त्या सतारीच्या तारा जुळवलेल्या नव्हत्या. एक तरफेची तारही तुटली होती.
ती कशी लावायची आणि पाश्चात्य पद्धतीचे सूर वापरून तारा कशा जुळवायच्या ते मी त्यांना दाखवले. त्यानंतर यमन आणि बागेश्री वाजवुन दाखवला. भारतिय व्यक्तिने आपल्या घरी येऊन सतार वाजवुन दाखवल्याचे अप्रूप त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्टं दिसत होते. त्याच प्रमाणे इटलीमधे भारतिय संस्कृतीबद्दल असलेले त्यांचे प्रेम बघुन आणि इथे येऊन चक्कं सतार वाजवायला मिळाल्यामुळे मी ही भारवुन गेले होते. शिवाय नवर्‍याने स्वत:चे पाककलेचे पुस्तक भेट देऊन सगळ्यांच्या आनंदात भरच टाकली होती.
हा कार्यक्रम संपवुन आम्ही सगळे जवळच्या एका गावात पिझ्झा खायला गेलो. अशा छोटेखानी घरगुती खाणावळीत पिझ्झा खाण्याची आमची इच्छा होतीच. आतल्या खोलीत बसलेल्या घोळक्याच्या गप्पांचा आवाज बाहेरपर्यंत येत होता. मालक बहुतेक गिर्‍हाईकांना जातीने ओळखत होते. अमेरिकेतल्या यांत्रिकी जिवनात अशी रंगत नाही असे मी नवर्‍याला म्हणायला आणि "ईट इज व्हेरी नॉयजी हियर" असे त्यानी म्हणायला एकच गाठ पडली!!
मग आमच्या इटालियन मित्रांनी खाणावळीच्या मालकांना "आमचे पाहुणे व्हिगन आहेत, त्यांना दुध, अंड चालत नाही ..." वगैरे वगैरे सांगत होते. त्यांचा मदतीने आम्ही पालकाची भाजी, मशृम पिझ्झा आणि व्हाईट पिझ्झा ऑर्डर केला.
असा पिझ्झा खाण्याचा योग पुन्हा पुन्हा येत नाही. खाता खाता अर्थातच गप्पा रंगल्या होत्या. टिटो भारतात जाऊन एक दो तीन चार ... दहा पर्यंत शिकला होता. ते त्याने आम्हाला म्हणुन दाखवले. अशा सगळ्या गमती जमती सुरु असतानाच व्हिनिचिओनी नकाशा दाखवुन उद्या मोंतालीला कसे जायचे ते मला समजवुन सांगितले.
जेवणे आणि गप्पा आटोपल्यावर व्हिनिचिओंबरोबर आम्ही हॉटेलमधे परत आलो. रात्रं बरीच झाली होती, तरी उद्या सिएना बघायला फार वेळ मिळणार नाही म्हणुन आम्ही पुन्हा एकदा शहराचा फेर फटका मारायचे ठरवले.
हॉटेलपासुन डुओमोपर्यंत चालत गेलो. निरनिराळ्या दुकानात डोकावुन बघितले, पुरातन इमारती, चर्च, अरूद पूल, बारिक गल्ल्या.. जमेल तितके सिएना बघुन हॉटेलमधे परतलो.
आजची सुरेल संध्याकाळ कायमची स्मृतींमधे कोरली आहे.