Showing posts with label आंतर-राष्ट्रिय सामंजस्य. Show all posts
Showing posts with label आंतर-राष्ट्रिय सामंजस्य. Show all posts

Tuesday, January 01, 2008

विव्हर स्ट्रिट मार्केट अथवा तत्सम (विअत)

सर्वांना नविन वर्षाच्या शुभेच्छा!

विव्हर स्ट्रिट मार्केटवर लिहिलेल्या या लेखाला वाचकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. अशा प्रकारचे पर्याय (विअत) इतर ठिकाणी उपलब्ध आहेत का अशी विचारणा झाली आहे. म्हणुन हा लेख.

विव्हर स्ट्रीटसारखी सहकारी किराणा दुकाने अमेरिकेत बरीच आहेत. (अर्थात विव्हर स्ट्रिट हे सर्वात यशस्वी सहकारी दुकान म्हणावे लागेल. ) अशा दुकांनाना कोऑप किंवा नॅचरल फुड स्टोअर असे म्हणतात. तुमच्या भागात असं एखादं कोऑप आहे का ते शोधायला ही सुची बघा:


http://www.coopdirectory.org/


तुमच्या जवळपास कोऑप नसेल तर इतर पर्याय खाली देते आहे.


होल फुड्स मार्केट: Whole Foods Market ही ऑरगॅनिक किराणा स्टोअर्सची वैशिष्ट्यपूर्ण चेन आहे. ही चेन यशस्वी झाल्यावर इतर किराणा दुकानात ऑरगॅनिक वस्तुंचे विभाग सुरू झाले. (वॉलमार्टनेही लॉबिंग करून "ऑरगॅनिक" शब्दाची व्याख्या बदलवुन घेणे, नियम ढिसाळ करून घेणे असले उपाय करून घेतल्यावर "ऑरगॅनिक" पदार्थे विकायला सुरूवात केली. हल्ली तेही जमले नाही म्हणुन विकणे बंद केल्याचे ऐकले आहे.) होल फुडसची सुपिक कल्पना ज्यांच्या डोक्यातुन निघाली ते संस्थापक व CEO जॉन मॅकी यांच्या संदर्भात तुम्ही ऐकले असण्याची शक्यता आहे. आजकाल CEO च्या पगारपुढची शुन्यांची संख्या वाढत असल्याबद्दल आपण नेहेमीच ऐकतो. जॉन मॅकी यांनी मात्रं गेल्यावर्षीपासून नाममात्रं १ एक डॉलर वार्षिक पगार घ्यायचे ठरवले आहे. त्याशिवाय त्यांना होल फुडसच्या सामान्य कर्मचार्‍यांसारख्याच इतर सुविध, आरोग्य सेवा आदी मिळतात. होलफुडसमधे सद्ध्या प्राणिजन्य पदार्थांची विक्री होते. स्वतः मॅकी मात्रं व्हिगन आहेत.

होलफुडसमधे सॅच्युरेटेड फॅट असलेले तसेच जेनेटिकली मॉडिफाईड अन्नपदार्थ विकण्यात येत नाहीत. अशी उत्पादने घेण्यासाठी उत्पादकांना व शेतकर्‍यांना अर्थ सहाय्य देऊन त्यांच्या पाठीशी उभे रहायचे होलफुडसने ठरवले आहे.

अर्थात होल फुडसमधे जायचे तर जादा पैसे मोजावे लागणार ही मानसिक तयारी करूनच जायला हवे. चांगल्या आरोग्यासाठी केलेली ही गुंतवणुक आहे मी समजते. किटकनाशके फवारलेले, सॅचुरेटेड फॅट असलेले, जेनेटिकली मॉडिफाईड अन्नं खाऊन पुढे तितकेच पैसे औषधांवर खर्च करायची वेळ येऊ शकते.

होल फुडसची दुकाने प्लॅस्टिक बॅगरहित करायचा प्रयत्नं दोन शाखांमधे सुरू आहेत. तो यशस्वी झाल्यास सर्व शाखांमधे फक्तं पुनःप्रक्रिया केलेल्या कागदी पिशव्या ठेवण्यात येतील. ग्राहकांनी घरून आणलेल्या पिशवीमागे पाच ऐवजी दहा सेंटची सुट देण्याचाही विचार सुरू आहे.

एखाद्या कॉर्पोरेशनची जाहिरात करण्याचा माझा उद्देश नाही, पण ज्या चांगल्या गोष्टी त्यांनी केल्या आहेत, त्याबद्दल श्रेय द्यायला हरकत नाही असे वाटल्याने इतकी मोठा उतारा होलफुडसवर लिहीला आहे.

होलफुडसपेक्षा आकाराने बर्‍याच लहान इतरही काही चेन्स आहेत: होम इकोनॉमिस्ट(Home Economist), अर्थ फेअर(Earth Fare). त्याशिवाय वाईल्ड ओटस (Wild Oats) या चेनचे नुकतेच होल फुडसमधे विलीनीकरण झाले आहे.


तुमच्या जवळपास एखादे विअत नसेल तर त्यातल्या त्यात जिथे ऑरगॅनिक विभाग मोठा असेल अशा दुकानात जाता येईल. कुठल्याही दुकानात जाताना स्वतःची पिशवी नेण्यासारखे साधे उपाय करून बघा.

Friday, December 21, 2007

खुदा के लिये

शोएब मन्सूरचा "खुदा के लिये" हा पाकिस्तानी सिनेमा पुरोगामी मुस्लिमांची बाजू दाखवतो. इंग्लंड,पाकिस्तान, अफगाणीस्तान आणि अमेरिका अशा चार देशात कथानक उलगडते. सप्टेंबर ११ च्या पार्श्वभुमीवर मुस्लिम समाजातील अंतर्गत संघर्ष,विरोधाभास व अन्यायाचे बर्‍यापैकी परिणामकारकपणे चित्रण केले आहे. या समाजाच्या अनेक ज्वलंत प्रश्नांना हात घालत एका सुसुत्रं कथेची यशस्वी मांडणी केली आहे.
नासिरुद्दिन शहाने साकारलेला कोर्टातील साक्षीचा प्रसंग लाजवाब.
सर्वात जमेची बाजु म्हणजे संगीत. अप्रतिम.

http://mastibox.com/songs/?p=/Pakistani/Khuda%20Ke%20Liye&c=10

काही ठिकाणी दिग्दर्शन व अभिनय जरा अशक्तं वाटतात, कलाकारांना पुरेसा अनुभव नसल्याचं अधुन मधुन जाणवतं. तरीही वेगळं काही तरी दाखवणारा हा चित्रंपट आवर्जुन बघावा.

Wednesday, December 19, 2007

विव्हर स्ट्रीट मार्केट

हे चित्रं पहा:
"प्लॅस्टिक पिशवी नको मला. माझी पिशवी आणली आहे बरोबर" जरा वैतागुनच किराणा दुकानातल्या कर्मचार्‍याला म्हंटले. त्याबरोबर त्याने प्लॅस्टिक पिशवीतल्या माझ्या वस्तु बाहेर काढल्या आणि प्लॅस्टिक पिशवी कचर्‍याच्या डब्यात टाकली. हसावे की रडावे आता?

दोष त्याचा नाही. वॉलमार्ट थवा त्सम (वॉअत) दुकानात आले ही माझीच चूक आहे. हल्ली खपतात म्हणून वॉअत दुकानातही ऑर्गॅनिक भाजीपाला विकला जातो. एखाद दोनच वस्तु घ्यायच्या होत्या म्हंटलं जवळच्या जवळ जाऊन याव.

शेजारच्या गिर्‍हाईकेच्या ढकलगाडीत थोड्याथोडक्या नव्हे, २०-२५ प्लॅस्टिक बॅगा. आधीच दोन-तीन आवरणात गुंडाळलेली प्रत्येक वस्तु ठेवायला आणखी भारंभार पिशव्या. दुकानात जाताना पिशवी नेण्याची तसदी घ्यावी लागत नाही या आनंदात गिर्‍हाईके. गिर्‍हाइकांच्या हातात पिशव्या नसल्याने चोरीची शक्यता कमी झाल्याच्या आनंदात वॉअत कंपन्या.

व्यापारी कंपन्या, गिर्‍हाईक, कर्मचारी, दुकानातील माल, तो पुरवठा करणार्‍या कंपन्या इ. या व्यवस्थेतील घटक हे "मी" या एकाच सूत्राने बांधलेले असतात. "आपला" हा शब्दं सगळ्यांनीच घरी ठेवलेला असतो. "तू नही तो और सही, और नही तो और सही" हा मंत्र जपत इथले सगळे व्यवहार सुरू असतात.
कमीत कमी पगारात काम करायला तयार होणार्‍यांना नोकरी देणार्‍या या कंपन्या. कुठल्या ओळीत काय आहे ह्या पलिकडे मालाविषयी काहीही ज्ञान नसलेले निरुत्साही कर्मचारी.

त्यांनी अधिक पगार मागु नये म्हणून त्यांना फारसे व्यवसायिक प्रशिक्षण नं देता सरकारी अनुदान कसे मिळवावे याचे प्रशिक्षण दिले जाते.
आपणच भरलेल्या करातुन अप्रत्यक्षितरित्या या कामगारांचे वेतन काही प्रमाणात आधीच चुकते होते याचा गंधही नसलेली गिर्‍हाइके. आत्ता मात्रं दोन डॉलर वाचल्याच्या समाधानात बाहेर पडतात.


आता हे चित्रं पहा:
कारबरो येथील व्हिव्हर स्ट्रीट मार्केट- सहकारी किराणा दुकान. कारबरोच्या जनजिवनाचा केंद्रबिंदु

बाहेरील दृष्य:
मोठा सायकल स्टँड. छोटा कार पार्किंग लॉट. बसमधुन,पायी, सायकलवर, मित्रंमैत्रिणींचा कंपु जमवुन, लेकुरवाळी, कुत्रुळवाळी अशी येणारी गिर्‍हाईके.

दुकानाच्या बाहेर मोठ्ठे अंगण. अंगणात छोटी मोठी झाडे. झाडांखाली व अंगणात टाकलेल्या टेबल खुर्च्या. आत तयार केलेले सुग्रास,ताजे, गरमागरम पदार्थ वाढुन घेऊन भोजनाचा आनंद घेणारी मंडळी.



पोराबोळं खेळतायेत, झाडावर चढतायेत, लोंबताहेत . कधी कुत्र्या, माणसांचा फ्रिस्बी चा खेळ रंगलाय. कधी संध्याकाळी एखादा ड्रम सर्कल जमलाय. नर्तक किंवा कमरेभोवती गरगर हुलाहुप फिरवणारे कलाकार त्याच्या त्यालावर फेर धरताहेत.


आतील दृष्य:
दुधाच्या, पाण्याच्या रिकाम्या झालेल्या बाटल्या पुन्हा भरायला आणायच्या. भाज्या,फळे इ प्लॅस्टिक पिशव्यांमधे नं भरता तशाच ढकलगाडीत ठेवायच्या.
प्रत्येक वस्तु वेष्टणात बांधलेली असतेच असं नाही. बल्क सेक्शनमधुन खुले तांदुळ, दाणे,बेदाणे, तिखट, हळद,ओटमिल, सिरियल इ जिन्नस घरून आणलेल्या किंवा दुकानात ठेवलेल्या वेष्टणात बांधुन घ्यायचे. तसे करताना गिर्‍हाइकाने आधी दोन काजु चाखुन पाहिले तरी हरकत नाही.

तर्‍हे-तर्‍हेची ताजी ताजी ब्रेड, केक,बिस्किटे रोज आतच तयार होतात. एकटा जीव सदाशिव असाल तर अर्धाच ब्रेड मागु शकता.
काऊंटरवरील कर्मचारी घरून आणलेल्या पिशवीसाठी ५ सेंटची का होई ना सुट देतो.
सहकारी तत्वावर चालणारे दुकान असल्याने गिर्‍हाईक तसेच कर्मचारीही बहुधा मालकच असतात. कर्मचार्‍यांना माल कुठुन आला, कसा तयार झाला याची सर्व माहिती असते. स्थानिक मालाला प्राधान्य दिले जाते.



आपली गिर्‍हाईके, आपले व्हिव्हर स्ट्रीट मार्केट, आपले कर्मचारी, आपला माल असं मानणारे घटक इथे एकत्रं आले आहेत. आपले गाव, आपला समाज, आपला निसर्ग याची काळजी घेतल्याच्या आनंदात गिर्‍हाईक बाहेर पडतात- ते पुन्हा परत येण्यासाठी.

नोंद:वरील फोटो अज्ञात छायचित्रकारांचे आहेत त्यामुळे श्रेय देता आलेले नाही.

Thursday, November 22, 2007

खबरदार पुनर्जन्म घ्याल तर!

तिबेटमधल्या लामांनी सरकारी परवानगी शिवाय पुनर्जन्म घेऊ नये असा आदेश चिनी सरकारनी काढला आहे. आदेश हास्यास्पद वाटला तरी चिनी सरकार मात्रं या बाबतीत गंभीर आहे. खुद्द दलाई लामांनी नियुक्त केलेला पंचेन लामा सरकारनी पळवला आहे आणि त्या जागी सरकारी उमेदवार नेमला आहे.

"श्रीमंत व्हा पण स्वातंत्र्य मागु नका" हा चीनी सरकारने जनतेला दिलेला मंत्र आहे.

चीनचे कम्युनिस्ट सरकार जनतेच्या स्वातंत्र्यावर संपूर्ण नियंत्रण ठेवते आहे यात काहीच नवल नाही. या कार्यात ते आधुनिक तंत्रज्ञानाचाही चांगलाच उपयोग करून घेतात हे ही अपेक्षितच आहे. मात्रं सिसको, याहु, गुगल,मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या पैशावर डोळा ठेवुन चीन सरकारच्या या मुस्कटदाबीत बरोबरीचे भागीदारी बनतात ही बाब फारच गंभीर आहे.

व्यक्ति स्वातंत्र्य, अभिव्यक्ति स्वातंत्र्य,लोकशाही या तत्वांवर आधारित समाजव्यवस्थेत जन्माला आलेल्या आणि वाढलेल्या या बहुराष्ट्रिय कंपन्या ह्या तत्वांशी किमान निष्ठा राखतील अशी अपेक्षा होती.

इंटरनेटसारखे खुले माध्यम जन्माला आले तो मानवजातीच्या इतिहासातला एक महत्वाचा क्षण होता. इंटरनेट खरं तर अनेक स्वप्नं घेऊनच जन्माला आले. अख्ख्या विश्वाचे एक सपाट,इवलेसे खेडे बनवण्याचे स्वप्नं. समान संधी, समान हक्कांचे स्वप्नं. जगभरातील स्वातंत्र्य प्रेमी, समता प्रेमींच्या हातात आलेले हे एक अमुल्य शस्त्रं. या आधुनिक शस्त्रामुळे स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणार्‍यांच्या मनात एक नविन उमेद निर्माण झाली. जनमानसावर आपली हुकुमत गाजवणार्‍या जुलमी सत्तांविरुद्ध संघटित होणे, आवाज उठवणे आता सामान्यांना सहज शक्य होणार होते. चीन, उत्तर कोरिया, म्यानमार या सारख्या देशांना माहितीच्या देवाण-घेवाणीवर नियंत्रण ठेवणे केवळ अशक्य होईल अशी स्वप्ने स्वतंत्र वृत्तीच्या लोकांना पडू लागली.


पण नाही, ते स्वप्न दिवा स्वप्नंच ठरले. उलट चीनी सरकार इंटरनेटचाच गळा दाबण्यात यशस्वी झाले. चीनची बाजारपेठ बहुराष्ट्रिय कंपन्यांना खुणावत होती. त्या मोहापायी चिनी सरकार जे म्हणेल त्याला या कंपन्यांनी होकार दिला. त्याही पुढे जाऊन, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मुस्कटदाबी अधिक प्रभावशाली कशी होईल त्याचे शिक्षण या कंपन्यांनीच चिनी सरकारला द्यायला सुरूवात केली!



मायक्रोसॉफ्टच्या चिनी ब्लॉग सर्व्हिसमधे व शोधयंत्रामधे स्वातंत्र्य, लोकशाही आणि मानवी ह्क्कं हे शब्द ब्लॉक केलेले आहेत. सरकारी हुकुमावरून ब्लॉगज बंद करण्याचे प्रकार सर्रास चालु आहेत.

२००५ मधे शिताओ नावाच्या एका पत्रकाराला चीनी सरकारनी शिक्षा ठोठावली. ह्या पत्रकाराच्या कारवायांची याहुने पुरवलेली माहिती त्याच्या विरुद्धचा पुरावा म्हणुन देण्यात आली.

सिसको कंपनीने चिनी सरकारला एक खास टेहळणीची यंत्रणा उभी करून दिली आहे. या यंत्रणेमुळे नागरिकांच्या इंटरनेटवरील हालचालींवर बारीक लक्ष ठेवता येणे सहज शक्य झाले आहे.

वरील सर्व उदाहरणांवरून असे लक्षात येते की आहे त्या तंत्रज्ञानाचा नुसता गैरवापर होतो आहे असे नाही. मुलभूत हक्कांवर गदा आणण्यासाठी जाणिवपूर्वक तंत्रज्ञान पुरवण्यात येते आहे.

जगभरातील जनजिवनावर प्रभाव टाकण्याची प्रचंड क्षमता बहुराष्ट्रिय कंपन्यांकडे आहे. त्यांची संपत्ती कित्येक छोट्या देशांच्या एकुण उत्पन्नापेक्षा जास्त आहे. दुसरीकडे चीन दिवसेंदिवस अधिकाधिक प्रभावशाली बनत चालला आहे. आफ्रिकेतल्या तेल विहीरी एका पाठोपाठ एक ताब्यात घेण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. अमेरिकेसारखे प्रगत देश सुदानसारख्या मानवी अधिकाराची पायमल्ली करणार्‍या देशाशी आर्थिक संबंध ठेवत नाही. परंतु चीन मात्रं कुठलाही शहानिशा नं बाळगता या देशांना तंत्रज्ञान पुरवते आहे. नायजेरियन डेल्टा व सुदान सारख्या भागांमधुन चीनची वसाहत बनते आहे. चिनी कंपन्या स्थानिक तरूणांना रोजगार नं देता चीनमधुन मनुष्यबळ आयात करत आहेत. यामुळे स्थानिक लोकांमधे बराच असंतोष आहे.


भारतात जनेतेने विरोध केल्यामुळे बरेचदा प्रकल्प रखडतात. चीनमधे तसा प्रकार नसल्याने आर्थिक प्रगतीच्या दिशेने ते भरधाव निघाले आहेत. चीन एक यशस्वी, प्रगत देश झाल्यावर ती शासन यंत्रणा आदर्श म्हणुन इतर देशात राबवली जाण्याची दाट शक्यता आहे.
शीतयुद्धाच्या काळात अमेरिकन कंपन्यांचे हितसंबंध रशियात गुंतलेले नव्हते. खुली बाजारपेठ आणि साम्यवादी अर्थव्यवस्थेची एकमेकात सरमिसळ झाली नव्हती. ती परिस्थिती आता राहिलेले नाही. त्याचे चांगले अथवा वाईट परिणाम होऊ शकतात. चीनी सरकार देशाला हळुहळु लोकशाहीकडे नेईल ही शक्यता सद्ध्या तरी दिसत नाही. उलट ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला असेच म्हणायची परिस्थिती आत्ता तरी आहे.

न्युयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमधे नोंदणी झालेल्या चिनी कंपन्यांमधे अमेरिकन गुंतवणुकदार पैसे गुंतवत आहेत. या पार्श्वभुमीवर चिनी लोकशाही चळवळीला बाहेरच्या देशातुन पाठिंबा कितपत मिळेल ही शंकाच आहे. राज्यव्यवस्थेत अमुलाग्र बदल आणायचा म्हणजे तात्पुरती का होईना आर्थिक अस्थिरता येणारच. त्यामुळे चिनी लोकांना स्वतंत्र होऊ द्यायचे की स्वतःचे आर्थिक नुकसान करून घ्यायचे हा निर्णय करायची वेळ आल्यावर आंतर-राष्ट्रिय समुदाय लोकशाहीच्या बाजुने उभा राहु शकेल का नाही ही शंकाच आहे.
कालची आर्थिक बलस्थाने स्वातंत्र्य, मानवी हक्कं व लोकशाहींचे गोडवे गात होती. उद्याची बलस्थाने मात्रं जाचक, हुकुमशाही धार्जिणी होण्याची चिन्हे दिसत आहेत.