Friday, December 15, 2006

इटली - भाग ४ (फिरेंजे फिरेंजे)
१२ ऑक्टोबर २००६
आज आम्ही उफ्फिझी आर्ट गॅलरीची तिकिटे काढली आहेत. शिवाय डुओमोपण आतून बघायचा आहे. आणि उद्या सिएनाला कसे जायचे त्याची पण तयारी करायची आहे. सिएनाला खूप चांगले सर्व्हास होस्ट आहेत, पण काही कारणानी आम्हाला त्यांच्या घरी रहाता येणार नाही. पण ते तिथे आमच्यासाठी एका हॉटेलचे बुकिंग करून ठेवणार आहेत. नवरा त्यांच्याशी संपर्क साधून आहे.
हॉटेलच्या बाहेर पडून आम्ही समोरच्या बार मधे थांबून मग लगेच ट्रेन स्टेशन आणि बस स्टेशनवर एक चक्कर टाकली. गाड्यांची वेळापत्रके बघितली. हॉटेलपासून सामान घेउन चालत जाणे योग्य की टॅक्सी बोलवायची याचा आढावा घेतला. मग पुन्हा चालत डुओमोला पोचलो तेव्हा दहा वाजत आले होते. आत जाण्यासाठी बाहेर लांबच लांब रांग लागली होती. विक्रेते लायनीन उभे राहिलेल्या लोकांना रूमाल, खेळणी, ग्रीटिंग कार्ड इत्यादी विकायचा प्रयत्नं करत होते.

त्या लायनीत उभे राहण्यापेक्षा आधी वरती जाऊन यावे असे ठरवले. मिलानोचा डुओमो बघितल्यामुळे आत जाण्यापेक्षा वर जाण्याचीच मला जास्तं उत्सुकता होती. मग स्वतःकडे फोटो काढायचे काम ठेऊन, नवर्‍याने मला टेहळणीकरून वर जायचा मार्ग शोधून काढायला पिटाळले. नशिबाने वर जायला फारशी रांग नव्हती.
वरती जायला ४६० पायर्‍या आहेत. त्या चढायला सुरुवात केली. अधूनमधून कोरलेल्या झरोकेवजा खिडक्यांमधून बाहेर डोकावता येत होते. एकाला एक चिकटून असलेल्या कौलारू घरांचे शहर दर पायरी गणिक खोलखोल जाताना दिसत होते. दर शंभरेक पायर्‍यांनतर आतल्या बाजूला सज्जे काढले आहेत.


पहिल्या सज्जात पोचलो आणि भिंतीवर काढलेल्या रंगीत चित्रांनी अवाक झालो. अशा चित्रांना फ्रेस्कोज (एक वचन फ्रेस्को) असे म्हणतात. आता जर तुम्हाला शंभर एक फूट वरती चढून, घुमटावर उलटे-सरळ लटकून, चित्रं काढायला सांगितले तर तुम्ही काय कराल? मी तरी एखादं छोटंसं पान किंवा फुल काढून "झालं काम" असं मुकादमाला सांगीन. पण नाही,या डुओमोच्या या कारागीरांनी तसं केलं नाही. उलट चांगली स्वर्ग, नरक, आणि मधले जीवन यांची भली मोठी, प्रभावी चित्रे काढ्न ठेवली आहेत. कुठेही कुचराई झालेली दिसत नाही.

एव्हाना चर्च उघड्ले होते. मघाशी बाहेर रांगेत उभी असलेले सगळे लोक आता आत शिरलेले होते. आम्हाला मात्रं ते अगदी बाहुल्यांसारखे दिसत होते. ते सगळे लोक आत उभे होते तरी चर्चमधे गर्दी झाल्याचे अजिबात वाटत नव्हते, त्यावरून चर्चची भव्यता आणखीनच जाणवली.

तिसर्‍या सज्जावरून खाली बघायला जरा भितीच वाटत होती. अखेर घुमटाच्या खालच्या पायरीपर्यंत पोचलो. घुमटावर जाणार्‍या पायर्‍या उंच आणि अरुंद होत्या. जाणार्‍या येणार्‍यांची झुंबड उडू नये म्हणून उतरण्यासाठी दुसरा मार्ग काढला आहे. वरती पोचलो तेव्हा मंद सुखावह वारा वाहत होता, खाली पसरलेले फिरेंजे चहू बाजूंनी खुणावत होते. सुळ्सुळ्णारा वारा अंगावर घुमटाला प्रदक्षिणा घालुन शहराचे सगळ्या बाजूंनी दर्शन घेतले.
एव्हाना साडे अकरा वाजले होते. खाली उतरून चर्च आतुन बघण्याची औपचारिकता पूर्ण केली. बाहेर आलो तो पर्यंत सव्वा बारा झाले होते. नकाशात बघून उफ्फिझीचा रस्ता शोधून काढत होते. उफ्फिझी गॅलरी सिनोरियाच्या जवळ आहे, आणि सिनोरियाचा रस्ता मला माहित होता, पण ज्या दारातून बाहेर पडलो तिथून त्या रस्त्याला कसे पोचायचे ते नकाशात पाहून चालत चालत शोधत होते. काही मिनिटाने नवरा माझ्या मागे नाही हे लक्षात आले. मागे जाऊन त्याला शोधून काढले. त्याला म्हंटले "तू फोटो काढण्यात इतका मग्नं होतोस की स्थळाचे भान ठेवत नाहीस नी काळाचेही भान ठेवत नाहीस, मला जरा मदत हवी आहे रस्ता सापडवायला." त्यावर केवळ "मी अजून काय काय करत नाही?" असं म्हणून तो पुन्हा शांतपणे फोटो काढू लागला! मी कपाळावर हात मारून घेतला. नकाशात डोकं घालून मी सिनोरियाकडे चालू लागले. नवरा एका डोळ्याने माझ्याकडे नजर ठेवत दुसर्‍या डोळ्याने अव्याहत फोटो काढत होता. मग धावत धावत मला नजरेच्या टप्प्यात आणत होता. अशी लपाछपी खेळत आम्ही साडे बाराच्या सुमारास उफ्फिझीला पोचलो. मी तिकिटाच्या रांगेत उभी राहिले. रिझर्वेशन आधीच झाले होते, तिकिटे हातात घेतली. १ वाजता आम्हाला प्रवेश मिळणार होता त्या वेळात जवळ्च्या बार मधे जाऊन नाश्ता केला.
उफ्फिझी म्हणजे आपले ऑफिस. पूर्वीच्या काळी हे सरकारी कार्यालय होते. आता या इमारतीमधे फिरेंजेच्या प्रसिद्ध चित्रकारांच्या चित्रांचे (फ्लोरेंटाइन आर्ट) प्रचंड संकलन आहे. आत फोटो काढायला परवानगी नाही (हुश्श!!) बहुतेक चित्रे येशुच्या जिवनावर आधारित आहेत. लिओनार्डोचे एक दालन आहे, मात्रं मोनालिसा तिथे नाही. तिचे स्मितहास्य बघायला रोमाला जायला हवे. बोटिचेलीचे जगप्रसिद्ध बर्थ ऑफ व्हिनस मात्र या प्रदर्शनाची शान आहे. उफ्फिझिचे प्रचंड संकलन नुसते डोळ्याखालून घालायला आम्हाला सहा तास लागले. शेवटी चालून पाय इतके दुखले की मिळेल त्या जागी आधी आम्ही विसावलो. उफ्फिझीची अधिक माहिती इथे पहा - http://en.wikipedia.org/wiki/Uffizi
आज आम्ही केकोच्या स्टुडिओमधे जाऊन मोझेक विकत घेणार होतो. पण आता उशीर झाल्यामुळे उद्या येऊ असा निरोप विक्टोरियाला फोनकरून तिच्या मार्फत कळवला.

थकलो असलो तरी संध्याकाळ्चे साडे सातच वाजले होते. बसनी मिकेलएंजेलो पियाझ्झाला गेलो. पायी चालायची मुळीच इच्छा नव्हती. हा पियाझ्झा एका उंच टेकडीवर आहे. खरं तर इथे सूर्यास्तं बघायला यायचे होते. मिकेलएंजेलोला अर्पण केलेल्या हया पियाझ्झावर डेव्हिड्ची प्रतिकृती ठेवली आहे.

झुळ्झुळ्णारा वारा, वर विस्तीर्ण आकाशातले तारे, खाली पसरलेल्या शहराचे लुकलुकणारे तारे आणि अर्नोमधे पडलेले प्रतिबिंब. फिरेंजेचा सरताज मिकेलेंजेलोच्या स्माराकासाठी ही जागा अगदी त्याच तोडीची आहे. आपल्या कलाक्रूतीने अजरामर झालेल्या त्या कलंदर कलाकाराला अभिवादन करून आम्ही पुन्हा बसमधे बसलो.
आजची रात्रं फिरेंजेतली अखेरची रात्रं. या शहराने खुळावले आहे. जड अतःकरणाने आम्ही सामानाची जमेल तितकी बांधाबांध करू लागलो. इथे बघितलेल्या आणि नं बघितल्या गोष्टी मनात घोळत होत्या - गॅलिलिओचे संकलन बघायचे राहिले आहे - ती एक मोठीच हुरहूर आहे. पुन्हा इथे परत येण्याचा विचार पक्का केला आहे... पण उद्या मुक्काम मात्रं हलणार.....

Wednesday, November 29, 2006

इटली - भाग ३ (फेरफटका फिरेंजेचा)


रात्री साधारण ११ च्या सुमाराला गाडी फिरेंजेला पोचली. आमचे मीरा-कारा नावाचे हॉटेल स्टेशनपासून जवळच असल्याने आम्ही तिथे पायीच जायचे ठरवले. हॉटेल सापडायला फार कठीण नव्हते, पण फुटपाथ खडबडीत होता आणि आमच्या बॅगांची चाके तुटतील की काय अशी भिती वाटत होती. शहराच्या मध्यवर्ती भागातील एका बोळीतले हे इटालियन हॉटेल मी इंटरनेट्वर शोधून काढले होते. (हसू नका, नवर्‍याच्या असंभव वाटणार्‍या सगळ्या अटी पूर्ण होतील अशी जागा मिळणे किती कठीण आहे हे तुम्हाला माहित असते तर हे हॉटेल शोधून काढल्याबद्दल मी बढाया का मारते आहे हे तुम्हाला कळले असते. हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.)
आता एका दिवसात कोमो, मिलानो ही दोन शहरे बघून, दोन तास बसचा आणि तीन तासाचा आगगाडीचा प्रवास करुन रात्री बारा वाजता हॉटेलमधे स्थिर-स्थावर झाल्यावर तुम्ही काय कराल? झोपायची तयारी कराल, हो की नाही? पण यावेळी नवर्‍याच्या अंगात फार उत्साह संचारलेला होता. झोपायच्या आधी जरा फिरेंजेचा एक फेरफटका मारुन येण्याची इच्छा त्याने प्रदर्शित केली. डाऊनटाऊनमधे हॉटेल असल्याचा त्याला पुरेपूर फायदा उचलायचा होता. घासाघीस करत एका तासात परत येण्याच्या बोलीवर मी त्याच्याबरोबर जायला संमती दिली.
दोन चार पावलं चाललो असू, तेव्हढ्यात एक इंटरनेट कॅफे दिसला. तिथे जाऊन सासरी आणि माहेरी खुषाली कळवली. मग रमत गमत पुढे गेलो. चार-पाच चौक ओलांडले असतील तेव्ह्ढ्यात फ़िरेंजेचा डुओमो दिसला. (आजचा तिसरा डुओमो). डुओमो अर्थातच बंद होता, पण बाहेरच्या बाजूचे नक्षीकाम पहाण्यासारखे होते. नवरा नेहेमीप्रमाणे नुसते फोटो घेत सुटला. ह्ळुहळू माझी एक तासाची मुदत संपत आली तशी मी परत जाण्याची भुणभूण त्याच्या मागे लावली. काही वेळानी तो तयार झाला परत जायला. माझे दिशाद्न्यान त्याच्यापेक्षा चांगले असल्यानी अशा नविन गावात आल्यावर मी माग काढ्त समोर जायचे आणि त्यानी माझ्या मागे यायचे हा शिरस्ता. अशावेळी मी पण माझे कसब दाखवायला उत्सुक असते. पण यावेळी मात्रं स्वत:च्या दिशाद्न्यानाचा फाजील अभिमान मला नडला. परतीचा रस्ता काही केल्या सापडेना. नवर्‍याचं चांगलंच फावलं. मी आपली रस्ता शोधून काढायच्या प्रयत्नात भटकत होते आणि हा शांतपणे फोटो काढ्त सुटला होता. अखेरचा उपाय म्हणून आम्ही एका दुसर्‍याच हॉटेलमधे शिरलो आणि त्यांना कसं जायचं ते विचारलं. त्यांनी आम्हाला एक नकाशाही दिला. नकाशा बघून मी रस्ता का चुकत होते ते कळले. रस्ते एकमेकांना समांतर नसून वर्तुळाला छेद देणारे आहेत. आणि पावलागणिक असलेल्या पियाझ्झांमधे चार पेक्षा जास्तं किंवा कमी रस्ते मिळत असल्यामुळे फ़िरेंजेहा एक भूलभुलैया आहे हे लक्षात आले. नविन गावात गेल्यावर नकाशा घेतल्याशिवाय बाहेर पाऊल टाकणार नाही (duh...) अशी शपथ घेऊन आम्ही हॉटेलकडे रवाना झालो.
अखेर पाठ टेकली तेव्हा रात्रीचे दोन-अडीच तरी वाजले होते......

११ ऑक्टोबर २००६
सकाळी ९.३० ला नाश्ताकरुन आम्ही बाहेर पडलो (अर्थात नकाशा हातात घेऊन). १२ वाजताचे आकाडेमिया गॅलरीचे रिझर्वेशन होते. त्याच्या आधी आम्ही बरीच पायपीट केली आणि precious gems गॅलरी बघायला गेलो. या गॅलरीत मेडिची (रिनासंस) काळातील मोझेक कलाकृतींचे संकलन आहे. (आपल्याकडेही ताजमहाल आणि इतर ठिकाणी या पद्धतीची कलाकुसर आढळते.) विविध रंगी दगडांचे अगदी लहान लहान पापुद्रे काढून त्यांना एकत्र चिकटवून त्यामाध्यमात कलाकुसर केली जाते.

तुकडे मागच्या बाजूने डिंकाने चिकटवलेले असतात. वैशिष्ट्य म्हणजे बघणार्‍याला ते एकसंध चित्रं असल्यासारखेच वाटते.

मग दुपारी बाराच्या सुमाराला आकॅडेमियाच्या लाईनीत उभे राहिलो. आधीच रिझर्वेशन केले होते म्हणून बरे, नाहीतर तासन तास ताटकळत उभे रहावे लागले असते.
आकॅडेमिया हे पूर्वीच्या काळी वास्तुकला चित्रकला व शिल्पकला शिकवण्याचे ठिकाण होते. आज तिथे बहुतांशी ऐतिहासिक काळातील चर्चमधील कलाकुसरींचे संकलन केले आहे. आत जाऊन आम्ही तिथला ऑडियो टूर भाड्यानी घेतला. ते उपकरण हातात घेऊन आणि त्याला जोडलेले हेड सेट कानाला लावून आम्ही पहिल्या दालनात शिरलो. या दालनात येशूच्या जीवनावरील चित्रे आहेत. त्यातले येशूला क्रॉसवरून खाली काढतानाचे चित्रं मला विशेष आवडले. त्या दालानातील चित्रांचा आस्वाद घेऊन झाल्यावर आम्ही दुसर्‍या दालनात शिरलो. तिथली सुरवातीची एक दोन शिल्पे बघत असतानाच आमचे लक्ष दालनाच्या दुसर्‍या टोकाला गेले आणि इतर सर्व सोडून आम्ही मंत्रमुग्ध होऊन त्याच्याकडे बघू लागलो. फिरेंजेचा हिरो, ज्याला बघायाला आमच्यासारखे १० लाख लोक दरवर्षी इथे येतात आणि तासनतास रांगेत उभे रहाता - तो मिकेलएंजेलोचा डेव्हिड! साडेपाच मीटर उंचीच्या, साईड फेसिंग नग्नाकॄती पुतळ्याचा फोटो मी किती वेळातरी पाहिला आहे, पण प्रत्यक्ष बघितल्याशिवाय त्याच्या भव्यतेची आणि अप्रतिमतेची कल्पनाही करता येत नाही. संगमरवराचा तो दगड जणू युगानु-युगे मिकेलएंजेलोचीच वाट बघत होता. दोन कलाकारांनी अर्धवट प्रयत्नं करुन सोडून दिलेला तो दगड इ. १५०१ मधे मिकेलएंजेलोच्या ताब्यात आला. १५०४ मधे पुतळा पूर्ण झाला. त्याबरोबरच मिकेलएंजेलो आणि डेव्हिड हे पश्चिमी संस्कृतीचे मानबिंदु म्हणुन कायमचे इतिहासात जाऊन बसले.

उजवा पाय सरळ, डावा पाय वाकवलेला, चेहरा जरासा वळवून डावीकडे बघणारा डेव्हिड म्हणजे एक अद्भूत शिल्पं आहे. चेहर्‍यावर एकाच वेळी निरागसता आणि गोलायाथसारख्या राक्षसाला पराभूत केल्याचा आत्मविश्वास, डाव्या खांद्यावरून पाठीवर रुळून उजव्या हाताकडे येणारे वस्त्र. शारिराच्या नसा, खळगे, हाडे, मांसलभाग, भुवया, नखे इतकी हुबेहूब की हे दगडातुन साकारले आही यावर विश्वास बसणे कठिण! म्युझियममधील इतर शिल्पे व चित्रेही अप्रतिम आहेत, पण ती अक्षरश: उरकून आम्ही पुन्हा डेव्हिडसमोर येऊन बसलो. तास-दोन तास तरी तिथे बसून अखेर आम्ही बाहेर पडलो.


संध्याकाळी साडेचार वाजता इथली सर्व्हास सदस्य व्हिक्टोरिया आम्हाला सिनोरिया नावाच्या जागी भेटणार होती म्हणून आम्ही तिकडे जायला निघालो. मी नकाशामधे बघत मार्ग काढत पुढे आणि नवरा फोटो काढत काढ्त माझ्यामागे अशी आमची वाटचाल सुरु झाली. आता मला साधारण शहराच्या रचनेची कल्पना आली आहे, तरी मी सारखा नकाशा बघून खात्री करून घेत होते. ठरलेल्या जागी पोचायला जरा उशीरच झाला. व्हिक्टोरिया सिनोरियाच्या समोर आमची वाट्च बघत होती. सिनोरिया ही एक ऐतिहासिक वास्तु आहे. मिडिव्हल काळात सरकारी निवासस्थान, रिनंसन्स काळात मिडिची खानदानाचा महाल आणि आजच्या काळातील मेयरचे घर. व्हिक्टोरिया माहिती देऊ लागली. सिनोरियाच्या दारासमोर डेव्हिडच्या पुतळ्याची प्रतिकॄती आहे. मूळ कलाकॄती आधी इथेच होती, पण एका दंगलीमधे पुतळ्याची हानी झाल्यमुळे तो आकडेमियामधे हलवण्यात आला.

अर्नो नदी फिरेंजेच्या मधून वहाते. नदीवर अनेक पूल आहेत. व्हिक्टोरिया बरोबर चालत आम्ही त्यातल्या सगळ्यात महत्वाच्या पूलावर - पॉन्टेव्हॅकियो वर आलो. एकीकडे सिनोरिया आणि दुसरीकडे पिलात्झो पिट्टी या दोन राजमहालांना जोडणार्‍या या पूलाचे ऐतिहासिक महत्व इतके आहे की दुसर्‍या महायुद्धात अर्नोच्या पलिकडे असलेल्या जर्मन लोकांनी या पूलाची हानी होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली. त्यावेळच्या हाणामारीत पॉन्टेव्हॅकियो सोडून इतर सर्व पूल उध्वस्तं झाले. आज पॉन्टेव्हॅकियो पूलावर दोन्ही बाजूनी सोनारांची दुकाने आहे. त्या झगमगाटाने रस्ता उजळून निघाला होता.
पॉन्टेव्हॅकियोवरून अर्नो नदीचा काढलेला फोटो या लेखाच्या सुरवातीला दिला आहे.
अर्नोच्या पलिकडे आल्यावर आम्हाला एक मोझेक कलाकृतीचे दुकान दिसले आणि आम्ही सहज म्हणून आत शिरलो. तिथले मिझेक खूप छान होते पण फार महाग होते. शिवाय आम्हाला त्यातले काही कळत नाही. म्हणून व्हिक्टोरियाला विचारले. तर ती म्हणाली, "माझी एक मैत्रीण मोझेक बनवणार्‍या स्टुडियोअमधे काम करते. मी तिला फोन करून विचारते" त्याप्रमाणे व्हिक्टोरियाने फोन करून आम्हाला तिथे न्यायचे ठरवले. मोझेकचा तो स्टुडियो गावाच्या दुसर्‍या टोकावर होता. चालता चालता आमच्या गप्पा रंगल्या. व्हिक्टोरिया अनेकदा भारतात जाऊन आली आहे. भारतात गेल्यावर तिथले अनोळखी लोकही खूपदा तिच्याबरोबर फोटो काढून घेण्याची इच्छा प्रदर्शित करतात असं ती म्हणाली. त्याचं कारण काय हे तिला कळलेलं नाही. भारतातल्या लोकांना गोर्‍या कातडीचे खूप आकर्षण आहे असे मला सुचलेले कारण मी तिला सांगितले. (ती सांगते ते खोटे नाही हे आम्हाला माहित होते, कारण उदयपूरमधे फिरताना अनेक भारतिय प्रवासी गोर्‍या प्रवाशांबरोबर फोटो काढून घेताना आम्ही पाहिले होते.) रस्त्यात एका जिलाटेरियामधे थांबून विसावा (आणि जिलाटोही) घेतला. साधारण अर्धा तास चालल्यावर आम्ही स्टुडिअयोमधे पोचलो. तिथे जाऊन आम्ही मोझेक निर्मितीची प्रक्रिया पाहिली.
व्हिक्टोरियाची मैत्रिण योको खास ती कला शिकण्यासाठी जपानमधून इटलीमधे येऊन राहिली आहे. गेल्या काही वर्षात तिला इटालियन भाषाही चांगली अवगत झाली आहे. उद्या कदाचित पुन्हा इथे परत येऊन त्यांच्याकडून एखादे मोझेक विकत घेऊ असे ठरवून आम्ही तिथून बाहेर पडलो.


व्हिक्टोरियाचा निरोप घेऊन आम्ही पुन्हा मध्यवर्ती भागाकडे जायला निघालो. तेव्हा आमच्या लक्षात आले की स्टुडियो अगदी इटलीतल्या अस्सल पेठेत असल्यासारख्या जागी आहे. आजूबाजूला आमच्या शिवाय एकही टूरिस्ट नव्हता. व्हिक्टोरिया नसती तर अशी जागा आम्हाला कधीही बघायला मिळाली निसती. पुन्हा एकदा सर्व्हासचे गुणगान करत आम्ही वाटचाल करू लागलो.
एव्हाना चांगलाच अंधार पडला होता आणि मला जाम भूक लागली होती. आज आम्ही इथल्या शाकाहारी रेस्टॉरेंट्मधे जायचे ठरवले होते. ते अगदी दुसर्‍या टोकाला होते. तिथे जायलाच अर्धा-पाऊण तास लागणार होता. म्हणून मी नवर्‍याला म्हंटलं की तू प्लिज पावला-पावलावर फोटो काढू नकोस, आधीच भूकेने जीव कासविस झाला आहे. पण ऐकेल तर तो नवरा कसला? "आपण इथे पुन्हा कधी येणार? एक दिवस भूक सहन केली तर काही बिघडणार नाही" हे ऐकवून त्याने उलट मलाच गप्पं केले. चालत चालत आम्ही डुओमो पर्यंत येऊन पोचलो. आता तर तो अगदी पावलापावलावर थांबून फोटो काढू लागला. त्यामुळे आमच्या प्रवास जास्तच कूर्मगतीने सुरू झाला. अजून खूप पल्ला शिल्लक आहे असं मी त्याला बजावलं तरी त्याच्या चेंगटपणात काही फरक पडला नाही. असो.
जेवण यथातथाच होते, सांगण्यासारखे काही नाही. त्याऐवजी जवळच कुठे तरी जेवलो असतो तर बरं झालं असतं असं वाटलं. मग थकलेल्या पायांनी पुन्हा हॉटेलात जायला निघालो. हॉटेलच्या गल्लीच्या कोपर्‍यावर विसावून जिलाटोचा आस्वाद घेतला. उद्या उफ़्फ़िझी म्युझियममधे काय काय बघायला मिळेल त्याची स्वप्नं रंगवत असतानाच डोळा लागला.

Saturday, November 18, 2006

इट्ली - भाग २ (लेक कोमो, मिलानो व फ़िरेंजेला प्रयाण)


आता पुढचं वर्णन लिहिण्याच्या आधी मी तुम्हाला काही नविन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही नीट लक्षात ठेवा हं - कारण पुढे मी ते पुन्हा पुन्हा वापरणार आहे.

डुओमो - गावातलं मुख्य चर्च
पियाझ्झा - चौकातील मोकळी जागा. तिथे सहसा वाहनांना प्रवेश नसतो. ही जागा फ़ार मोक्याची असते. कोणाला भेटायचं असेल तर अमुक तमुक पियाझ्झाला या असं म्हणतात.
बार - इटलीतला बार म्हणजे साधे कोपर्‍यावरचे हॉटेल. त्यामुळे सकाळी सकाळी आम्ही बार मधे शिरलो असं मी लिहिलं तर चक्रावून जाऊ नका. इटलीत पावलागणिक आढळणार्‍या या बार मधे कॉफ़ी, पास्ता, आइसक्रिम असं सगळं मिळतं (बियर वगैरे सुधा मिळते, पण तो मुख्य उद्देश नाही.) सगळ्यात महत्वाची गोष्टं म्हणजे बार मधे उभ्या उभ्या खायचं. तीच वस्तु बसून खायचे दसपट पैसे पडतात.
जिलाटो - आइसक्रिम (विशेषत: दूध नसलेले आइस्क्रिम - फ़ळांचा रस आणि बर्फ़ापासुन बनवलेले).बार प्रमाणेच या जिलाटोची दुकानं जिथे तिथे आढळतात.
व्हिगन पासपोर्ट - या पुस्तकात जगातल्या प्रत्येक महत्वाच्या भाषेत व्हिगन लोकांना त्या प्रदेशात काय काय चालते आणि काय चालत नाही ते लिहिले आहे. (मराठी पानावरील "आम्हाला दह्यातली कोशिंबिर चालत नाही" हे वाक्य वाचुन माझा त्या पुस्तकावर खुपच विश्वास बसला)

१० ऑक्टो. २००६
आज सकाळी नवरा चक्कं माझ्या आधी उठ्ला. अल्बर्टोंच्या घराशेजारील चर्चने सकाळी सात वाजता जोरदार घंटानाद केल्यामुळे त्याची झोप उडाली असेल. त्याच्या पाठोपाठ मी ही उठून तयार झाले. न्याहारी करुन आम्ही बाहेर पडलो. काल काढ्लेली बसची तिकिटे घेऊन आम्ही बस-स्टॉपवर जाऊन उभे राहिलो. कालच्या सारखी आज तरी चुकू नये म्हणुन चांगले १५ मिनिटं आधी जाऊन उभे राहिलो. स्टॉपवर एक आजोबा उभे होते. आम्हाला बघताच, त्यांनी नवर्‍याला त्यांच्या जॅकेट्ची चेन लावून मागितली. मग जरा आजोबांच्या अंगात ऊब आल्यानंतर आमचा संवाद सुरू झाला - डिक्शनरीच्या मदतीनी. आजोबांना बरच काही बोलायचं होतं. बस येईपर्यंत तुम्ही कुठ्ले, आम्ही कुठले आणि कुठे जाणार याच्या व्यतिरिक्तं खालील संवाद पूर्ण झाला
आजोबा:ही तुझी बायको आहे का?
नवरा:हो.
आ:मुलं कुठे?
न:मुलं नाही - आत्ताच लग्नं झालं मागच्यावर्षी
आ:माझी बायको वारली
आम्ही दोघं: अरे अरे फ़ार वाईट झालं (मग आम्हाला एक की चेन दाखवली - त्याच्यावर आजींचं नाव लिहिलं होत.)
मधेच सायकलवरुन जाणार्‍या एका दुसर्‍या एका आजोबांना त्यांनी थांबवले आणि त्यांना ती की चेन पुन्हा दाखवली. आजोबांना आजीची बरीच आठवण येते म्हणायची - मी मनात म्हंटलं. त्या दुसर्‍या आजोबांची पत्नीपण निवर्तल्याचे या आजोबांनीच आम्हाला सांगितले, मग आम्ही पुन्हा एकदा हळ्ह्ळ व्यक्तं केली.
नवरा: आम्हाला इटालियन बोलता येत नाही, अगदी थोडं थोडं येतं.
आ:किती दिवस रहाणार आहात?
न:आठ दिवस
आ: अरे, तोपर्यंत चांगलं बोलता येईल.
एव्हढ्यात बस आली आणि आम्ही सगळे बसमधे चढलो. आत शिरताच तिकिटे यंत्रात घालून शिक्कामोर्बत करुन घेतली. बस निघाली तशा आम्ही पुढ्च्या काही अंतरावरच्या खाणाखुणा लक्षात ठेवल्या, परत येताना चुकायला नको म्हणून. साधारण तास भरात कोमोला पोचलो. कोमो अगदी स्वित्झर्लंडच्या सीमेवरचे नयनरम्यगाव. या गावावरुन स्वित्झर्लंड्च्या सौंदर्याची कल्पना करता येत होती. गावाच्या मधोमध एक मोठा तलाव आहे - अर्थातच लेक कोमो हे त्याचे नाव. बस अगदी तलावाच्या काठापर्यंत जाते. तलावापासून बाजूच्या पर्वतांवर वस्ती पसरलेली आहे. तलावावर फ़ेर-फ़टका मारून आम्ही डुओमोकडे मोर्चा वळवला.

लेक कोमो-->


कोमोचा डुओमो आणि त्याच्या बाहेरचा पियाझ्झाजिलाटोचे दुकानकोमोच्या पियाझ्झात भाजीचे दुकान, वाद्यं वाजवुन किंवा पुतळ्यासारखा वेष करुन अगदी स्तब्ध उभे राहणारे काही कलाकार होते. म्हातारी मंडळी सायकलवरुन इकडुन-तिकडे जात होती, मुले दप्तरे पाठीला अडकवुन घरी जात होती. ही सगळी चहल-पहल पाहून मी अगदी हरखून गेले. नवर्‍याला म्हंटलं, "आपण अमेरिका सोडून इथेच रहायला येऊ. मला अमेरिकेतल्या डिसकनेक्टेड आयुष्याचा अगदी कंटाळा आला आहे." माझा विचार त्याला मुळीच पटला नाही, असो. (मला तरी कुठे आवडतं त्यानी माझ्या देशाला नावं ठेवलेली?) तर गावाचा एक फ़टका मारुन आम्ही पुन्हा बसस्टॉपकडे आलो. बस तयारच होती. एक वाजता अल्बर्टोपण घरी पोचाणार होते. त्या दरम्यान कोमो बघुन येण्याचा आमचा बेत छान पार पडला. दुपारी इथून मुक्काम हलवायचा आणि जमेल तेव्हढे मिलानो पाहून फ़िरेंजे गाठायचे असा आजचा उरलेला कार्यक्रम आहे.
आम्ही घरी पोचून सामानाची आवरा-सावर करेपर्यंत अल्बर्टोपण कामावरुन परत आले. त्यांना आमच्या लग्नाची व्हिडियो दाखवली. ती त्यांना खूप आवडली. तेव्हढ्यात आमच्या गाडीची वेळ झाली. अल्बर्टोंनी आम्हाला स्टेशनवर पोचवले. गाडी आली तसा आम्ही त्यांचा निरोप घेतला. जाताना शेवटी पुन्हा त्यांच्या घरी जायचा विचार आहे.

कर्डोनाला गाडी बदलून आम्ही मिलानला पोचलो. सेंट्र्ल स्टेशनपर्यंत सब-वे नी जाऊन तिथे लॉकर रूममधे बॅगा ठेवल्या. फ़िरेंजेकडे जाणार्‍या गाड्यांची चौकशी करून पुन्हा सब-वे कडे आलो. वाटेत तोंडात टाकायला चेस्टनट विकत घेतले. हे सगळे होईपर्यंत दुपारचे ४ वाजले होते. अल्बर्टोंनी आम्हाला काय काय बघता येईल त्याची माहिती दिली होती. आधी डुओमो बघावा आणि नंतर जसा वेळ मिळेल तशी इतर ठिकाणं बघावी असा विचार करुन डुओमोकडे जाण्यार्‍या सब-वेमधे बसलो.
सब-वेतून बाहेर पडून रस्त्यावर आलो तर काय, प्रचंड आकाराचा डुओमो पुढे उभा ठाकलेला. ताजमहालाशी तुलना करता येइल इतकी भव्य वास्तु बघुन खुपच आश्चर्य वाटले. या डुओमोला जगातले चौथे मोठे कॅथिड्रल म्हणुन स्थान आहे. बाहेरुन डागडुजी सुरू आहे, तरी आत जायला परवानगी आहे. या डुओमोमधे येशूच्या क्रॉसचा एक खिळा आहे आणि कॄसिफ़िकेशनच्या वेळेचे इतर काही अवशेष जतन करून ठेवलेले आहे (असे म्हणतात) नक्षीदार भिंती, गॉथिक शैलीतल्या सुबक कमानी यांनी परिपूर्ण अशा या डुओमोच्या बांधकामाला थोडी-थोडकी नाही, तब्बल ३५० वर्षे लागलीत. आतून चर्च बघण्यासारखे असले तरी सर्वात विशेष भाग म्हणजे चर्चच्या वरच्या भागात - छतावर बनवलेली नगरी!! वरती जायला लिफ़्ट किंवा पायर्‍यांचा वापर करता येतो. आधी मला वाटलं (विशेषत: लिफ़्ट्चे सहा युरोचे तिकिट काढताना) की वरती जाण्यात काही फ़ार तथ्य नसावे - पण एकदा वरती पोचल्यावर मात्र आश्चर्यानी तोंडात बोटे घालायचीच वेळ आली. साधारण वीस मजले उंचावर असलेल्या वरच्या भागात फ़ारच कल्पक आणि भन्नाट कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. जणू आकाशात एक नगरी असावी असे देखावे तयार करण्यात आले आहे.
ह्या फ़ोटोंवरुन तुम्हाला थोडी कल्पना येईल:
या लेखातले सगळ्यात वरचे चित्रं - स्टेशनमधुन बाहेर आल्यावर दिसणारा डुओमो. (समोरचा भाग दुरुस्तीकरता झाकला आहे)

डुओमोच्यावरचे काही फ़ोटो :


वरुन दिसणारे खालचे दृष्य:


ह्ळुह्ळू चढ्त आम्ही अखेर अगदी वरती पोचलो. खाली पसरलेले मिलान शहर, डुओमोची शिल्पकृती आणि दूरवर दिसणारी आल्प्सची पुसट पर्वतरेखा. डोळ्याचे पारणे फ़िटवणारे ते दृष्य आम्ही मनात आणि कॅमेर्‍यात साठवुन ठेवले आहे. तिथे उभे राहून आम्ही ज्या काळात डुओमो बांधला त्या काळाचा आणि त्या हुन्नरी कलाकारांचा विचार करत होतो. हे सगळं असं बांधायचं असं कोणाच्या सुपिक डोक्यात आलं असेल? त्याला कोणी मान्यता दिली असेल? जिवावर उदार होऊन कोणी ती कल्पना साकारण्याचा विडा उचलला असेल? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारे डुओमो म्युझियम सद्ध्या बंद आहे. पण वेळ मिळेल तेव्हा या डुमोमोच्या प्रोजेक्ट्ची अधिक माहिती मिळवायची असं मी ठरवलं आहे.

डुओमो बघून होईस्तवर सहा वाजले होते. दुसरं काही बघायला वेळ नव्हता आणि पोटातले कावळेही जागे झाले होते. म्हणून जवळच्याच एका पिझ्झेरियात शिरलो. सेविकेला व्हिगन पासपोर्ट दाखवला. तो वाचून तिने बर्‍याच वेळा मान हलवुन "सी, सी" (होय, होय) असे म्हंटले आणि आम्हाला बसायला टेबल दिले. इटलीत हॉटेलमधे खाण्याचा हा पहिलाच प्रसंग आणि आम्ही अर्थातच पिझ्झा ऑर्डर केला.
हा पहा आमचा इटलीतला पहिला पिझ्झा:

पिझ्झा खाऊन तृप्त होऊन आम्ही पुन्हा सबवे पकडून सेंट्रल स्टेशन गाठले. सामान लॉकरमधून बाहेर काढले. फ़िरेंजेची तिकिटे काढली तोपर्यंत गाडीची वेळ झालीच. युरो-स्टार गाडीत बसून आम्ही फ़िरेंजेकडे निघालो...


क्रमश:

Wednesday, November 15, 2006

इटली - भाग १ (मिलानो)

आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस युरोपमधे कुठे तरी साजरा करायचा असं आम्ही आधीच ठरवलं होतं. म्हणजे या प्रोजेक्ट्ची कन्सेप्ट फ़ेज आम्ही आधीच पूर्ण केली होती. पण नेहेमीप्रमाणे रिसर्च मधे इतक वेळ वाया घालवला की एक्झिक्युशन करायची वेळ आली तरी आमचे बेसिक प्लॅनिंगही झाले नव्ह्ते! हो-ना करता करता, अनेक वेळा प्लॅन बदलवत (कधी कधी तर दौराच रद्द करायची भाषा असायची) अख्रेर ८ ऑक्टोबरला आम्ही विमानात बसलो.
मिलान (मिलानो)ला एक रात्रं थांबुन मग फ़्लोरेन्स (फ़िरेंजे)ला जायचे, तिथे ३ रात्री मुक्काम करुन सिएनाला जायचे, तिथुन कार भाड्याने घेऊन टस्कनी आणि अम्ब्रियाच्या कंट्रीसाईड्मधे भटकायचे असा साधारण कार्यक्रम होता. सिएना सोडुन इतर प्रत्येक ठिकाणि रहाण्याची व्यवस्था (सर्व्हास होस्ट किंवा हॉटेलचे बुकिंग ) झाली असल्याबद्द्ल आम्हाला स्वत:चाच अभिमान वाटत होता! हसु नका, मळलेल्या वाटेने जायचे नाही ठरवले की या सगळ्या गोष्टींना खुप वेळ लागतो. (इटलीचा व्हिसा मिळवण्यासाठी मी केवळ काही तास घालवुन बेस्ट वेस्टर्नची रिझर्वेशन्स केली होती, पण ते खुपच टिपिकल झाले असते, म्हणुन अर्थातच व्हिसा मिळाल्यावर ती रद्द केली. )
प्रत्येक ठिकाणी किमान एक तरी सर्व्हास होस्ट आम्हाला भेटणार आहेत, ह्याचे श्रेय माझ्या नवर्‍याला जाते. देशाटन करताना प्रेक्षणिय स्थळे व स्मारके यांच्या बरोबरच तिथले सामान्य जन-जीवन जवळुन पहाण्याची संधी मला तितकीच महत्वाची वाटते. जगभरातल्या प्रवाशांना अशी संधी उपलब्ध करुन दिल्याबद्द्ल सर्व्हासचे (http://www.servas.org) आभार मानवे तितके थोडेच!
रॅले ते मिलान विमान प्रवास विनासायास पार पडला. सकाळी ९ वाजता मिलानच्या मालपेन्झा एअरपोर्टवर उतरलो. इथे आम्ही सर्व्हास होस्ट अलबर्टो यांच्या घरी रहाणार आहोत. त्यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे आम्ही एअरपोर्टच्या बाहेर येऊन मिलान शहराकडे जाणार्‍या माल्पेन्झा एक्स्प्रेस या गाडीत बसलो. बोव्हिसोला गाडी बदलुन इन्व्हेरिगोला जाणार्‍य गाडीत बसलो. साधारण अर्ध्या तासाच्या त्या प्रवासात मी खिडकीबाहेर बघत होते, आणि नवरा त्याच्या सवयीप्रमाणे सहप्रवाशांशी गप्पा करण्यात गुंतला. बाहेर झरझर पालटणार्‍या द्रुष्यांमधे काही छोटी घरे, काही मोठी, काही अपार्टमेंट, मधेच एखादे शेत आणि अधुन-मधुन फ़ॅक्टरीवजा इमारती. प्रत्येक इमारत वेगळी. अमेरिकेतल्या सारखा साचेबंदपणा नाही.
इकडे नवरा सहप्रवाशांना त्यांच्याच प्रदेशाबद्द्ल माहिती सांगुन त्यांना ओशाळवाणे करुन सोडत होता (अशी संधी तो कधीही सोडत नाही)
इन्व्हेरिगोला गाडीतुन उतरत नाही तोच अलबर्टो हसतमुखाने फ़लाटावर आमचं स्वागत करायला आले. मग त्यांच्या कारमधे बसुन त्यांच्या घरी निघालो. मिलानच्या उत्तरेला वसलेले हे हिलस्टेशनवजा टुमदार गाव त्यावेळी अगदी झोपाळु, स्वप्नमय वाटत होते. वळणावळणाच्या अरुंद रस्त्यावरुन जाताना मला अमरावतीतल्या बुधवाराचीच आठवण आली. एका ठिकाणी तर रस्ता इतका अरुंद की विरुद्ध दिशेनी जणार्‍या गाड्या समोरा-समोर आल्या, तर एका गाडीला रिव्हर्स घ्यावे लागते. रहदारी तुरळक असल्याने ते शक्यही होते.
इन्व्हेरिगोचे अरूंद रस्ते बघा-->


घरी पोचताच हात-पाय धुवुन स्वच्छ होईपर्यंत अलबर्टोंची स्वयंपाकाची लगबग सुरु झालेली होती. इकडे नवर्‍याने सर्व्हासच्या नियमाप्रमाणे आमचे ओळखपत्र तसेच स्वत:चे खास अलबर्टोसाठी तयार केलेले पाककलेचे पुस्तक भेट म्हणन सादर केले. ते पाहुन अलबर्टो जाम खुष झाले.
इटालियन जिवनात खाणे, पिणे आणि खिलवणे याला खुप महत्व आहे (अमेरिका याच्या अगदी विरुद्ध!!) तर इकडे अलबर्टो आमच्यासाठी क्रोस्टिनि (छोट्या टोस्टवर उन्हात वाळवलेले टोमॅटो इ. ) चा पहिला कोर्स व स्पाघेटीचा दुसरा कोर्स बनवत असताना आमच्या गप्पाही चांगल्या रंगल्या होत्या. अलबर्टोना इंग्रजी बर्‍यपैकी येते आणि उरलेले संभाषण आम्ही डिक्शनरीच्या साहाय्याने पूर्ण करत होतो. अलबर्टोचे खानदान मुळ्चे इथलेच असुन त्यांचे सगळे नातेवाईक इथुन चाळीस किमीच्या परिघात आहेत. इतक्या अस्सल इटालियन माणसाच्य स्वयंपाकघरात बसुन त्याने स्वत: रांधलेले जेवण खाताना आम्ही अगदी भारावुन गेलो. पहिल्याच दिवशी इथे आल्याचे सार्थक झाले असे वाटु लागले आहे.

अल्बर्टोंची क्रोस्टीनी बघा---->


अलबर्टो हे व्हेजिटेरियन आहेत. सर्व्हासही व्हिजिटेरियन लोकांची संघटना नसली तरी त्यामानानी व्हेजिटेरियन लोकांचं प्रमाण सर्व्हासमधे बरंच आढळतं. त्यामुळे प्रामुख्याने मांसभक्षण करणार्‍या देशांमधेही आम्हाला व्हेजिटेरियन सदस्य मिळ्ण्यात कुठलीही अडचण येत नाही.

अलबर्टोंचे तीन मजली प्रशस्त घर आहे. आमच्या ताब्यात सगळ्यात खालचा मजला आहे. स्वत: इंटिरियर डेकोरेटर असल्याने घरात अपारंपारिक पद्ध्तीची अतिशय सुसंगत सजावट केली आहे. घराच्या मागे मेंढ्यांचे एक कुरण आहे. स्वयंपाकघराच्या गॅलरीतुन गवतावर चरणार्‍या मेंढ्या, पलिकडल्या टेकड्यांवरील टुमदार घरे व झाडी आणि वर मोकळे आकाश असे विहंगम दृष्य दिसते. मेंढ्यांच्या गळ्यातील घंटांचा मंजुळ आवाज वातावरणात भर घालत असतो.
जेवणे आटपल्यावर आम्ही दोघांनी परिसराचा एक फ़टका मारला. दुपारी अलबर्टोंना कामावर जायचे होते. जाताना त्यांनी आम्हाला तिथुन जवळच असलेल्या लेक कोमोला कसे जायचे ते सांगितले होते. आणि कामावर जाताना किल्ल्याही आमच्या स्वाधीन केल्या! (धन्य सर्व्हास!!!)
तर आम्ही आधी झोप काढावी की लेक कोमोला जावे यावर जरा उहापेह करुन लेक कोमोला जायचे असे ठरवले. इटली मधे बसची तिकिट सिगरेट्ची दुकाने (तबाची शॉप) किंवा बार इ मधे विकतात. ती आधी काढुन आणायची आणि मग बसमधे बसायचे. तिकिट काढताना दुकानदारिणीचे मोडके इंग्लिश आणि आमचे मोडके इटालियन यामुळे देवाण घेवाण करण्यात जरा उशीरच झाला. धावत पळत बस स्टॉपवर पोचतो तर काय, बस अगदी डोळ्यासमोरुन निघुन गेली!! मग नुसतीच इकडे तिकडे भटकंती केली. थोड्याच वेळात नवर्‍याने तो फ़ार थकला असल्याचे ऐलान केले, म्हणुन आम्ही घरी परतलो. त्याला विमानात अजिबात झोप लागत नाही, आणि मी झोपेशिवाय दुसरं काहीही करत नाही. वाचन, सिनेमा पहाणे वगैरे गोष्टी करणे म्हणजे विमानातील वेळेचा अपव्यय आहे असं माझं स्पष्ट मत आहे. बरेचदा तर विमान उडायच्या आतच माझी डुलकी सुरु झालेली असते, आणि खाण्यापिण्यासाठी मी महत्प्रयासानीच जागी असते. पण त्यामुळे मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्यावर मी आगदी ताजी-तवानी असते.
असो. नवरा झोपला असतानी मग मी रिक स्टिव्हच्या पुस्तकातुन फ़िरेंजेची माहिती वाचली आणि उद्या तिथे पोचल्यावार काय काय करायचे त्याचा साधारण आराखडा तयार केला. तिन्हीसांजा झाल्या, तशा मेंढ्यांच्या घंटाचा आवाज जोरात येऊ लागला म्हणुन गॅलरीत जाऊन पाहिलं तर काय, मेंढपाळाच्या मागुन एका मागोमाग मेंढ्या घरी जायला निघालेल्या दिसल्या. मावळतीची किरणे, हिरवे गार कुरण आणि बांधावरुन जाणारा मेंढ्पाळ, त्याची कुत्री, मेंढ्या आणि घंटाचा मंजुळ नाद - इतके विहंगम दॄष्य असुन नवरा एका संदर फ़ोटोला मुकला आहे असे वाटले. त्याला उठवावे असा (दुष्टं) विचारही एकदा मनात आला. पण एव्हाना मेंढ्या बर्‍याच दूर गेलेल्या होत्या.
अंधार पडला तसे अलबर्टो कामावरुन परत आले आणि नवराही जागृतावस्थेत परत आला. त्या दोघांची स्वयंपाकघरात लगबग सुरु झाली. मी पण लुड्बुड करुन त्यांना मदत केल्याचा आव आणत होते. हसत खेळत गप्पा करता करता जेवण सुरु झाले. इटालियन जेवणामधे सगळे पदार्थ एकदम नं वाढता एक एक कोर्स वाढायची पद्धत आहे. ऍंटिपास्तो, प्रिमो, सेकंडो अशी त्याला क्रमिक नावेही आहेत. आणि प्रत्येक कोर्स झाला की नविन बशा, चमचे घ्यायचा रिवाज आहे.
अनेक विषयांवर गप्पा ठोकुन अखेर आम्ही झोपायची तयारी केली. अलबर्टोच्या अगत्याने इट्लीतला पहिला दिवस तर फ़ारच छान गेला होता. उद्या काय काय करायचे त्याची स्वप्नं रंगवत आम्ही निद्रेच्या स्वाधीन झालो.

Saturday, November 04, 2006

पूर्बयी

मावळतीच्या वेळी पाखरं घराकडे परतु लागतात. त्याला हिंदीमधे पूर्बयी असा शब्दं आहे. इटली आणि भारताचा प्रवास आटपुन परतीच्या प्रवासात हा शब्दं आठवला, आणि डोक्यात विचारांचे काहुर माजलं. दरवर्षी नविन घरटं बनवणार्‍या पाखरांना जुन्या घरट्याची आठवण येते असेल का? माझे भारतात जाणे पूर्बयी, की तिथुन येणे पूर्बयी? (नवर्‍याला मराठी येत नाही हे एक बरंच आहे - मला असा प्रश्नं पडला आहे हे वाचुन त्याला किती वाईट वाट्लं असतं.)
नवर्‍याबरोबर इटलीची भ्रमंती करुन झाल्यावर त्याला सोडुन मी भारतात गेले. आप्तेष्टांबरोबर काही दिवस घालवुन, दिवाळी साजरी करुन परत आले. घरी आल्यावर नवर्‍याने विचारले तुला आपल्या घराची आठवण आली का? मी त्याला म्हंटलं तुझी आठवण नक्कीच आली. जिवलगांच्या सहवासात सुखसोयींचा अभाव जाणवत नाही हे त्याला अजुन अनुभवायला मिळालेलं नाही. असो.
आमचा प्रवास सुखाचा झाला, खुप मजा केली, दिवाळीचा फ़राळ, फ़टाके, रांगोळ्या, पणत्या, लक्ष्मीपुजन, पाडवा, भाऊबिज या सगळ्याचा मनमुराद आनंद घेऊन परत आले.
इटलीच्या प्रवासातील अनुभव लिहायला आता सुरुवात करणार आहे - वाचत रहा.

Friday, October 06, 2006

भेटु लवकरच!!!

आम्ही आता गावाला जाणार आहोत. सध्या सामानाची बांधाबांध सुरु आहे. या प्रवासाला लागणार्‍या वस्तु म्हणजे एक वैताग असतो. महत्वाच्या, पण कधी काळीच लागतील म्हणुन अगदी कुठे तरी कोपर्‍यात दडवलेल्या असतात. आणि गरज पड्ली तेव्हा बघायला गेलं तर कधीही सापडत नाही. शेवटी पळापळ करुन नविन विकत आणाव्या लागतात. त्यातुन आमच्या घरी वस्तु गहाळ झाल्या, की त्याचं खापर माझ्याच माथी मारलं जात असल्यामुळे बॅटरी चार्जर शोधुन काढणे किंवा नविन विकत आणणे हे माझ्या कामाच्या यादीत समाविष्टं झालेलं आहे.

तर आता या प्रवासात आम्ही काय काय केलं ते परत आल्यावर तुम्हाला सांगेनच.
पण गावाला गेले आहे म्हणुन त्या दरम्यान आपली भेट अगदीच होणार नाही असं नाही बरं का!! कुणी सांगाव? कदाचित मी तुमच्याच गावात येणार असेन?
आणि हो - जर आपली भेट नाहीच झाली आधी - तर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मन:पुर्वक शुभेच्छा!!!!

दया-रुपी पणत्यांच्या प्रकाशाने
हिंसेचा काळोख मिटुन
शांततेची दिवाळी साजरी व्हावी!!!!

Sunday, October 01, 2006

झिकर चांदण्यातले


या आठवड्यात कारबरोमधे सुफ़ी फ़ेस्टिवल होता. शुक्रवारी रुमीच्या कवितांचे वाचन आणि गायनाचा कार्यक्रम होता.रुमीच्या कविता आम्हाला दोघांनाही खुप आवडतात आमच्या लग्नाचा आणाभाका (Vows)मधे आम्ही त्यांचा समावेशही केला होता.
कार्यक्रम खुप छान झाला. शेवटी आम्ही उगाच रेंगाळत उभे होतो, तेव्हा कोणीतरी सांगितले की दरवेशी जिथे मुक्काम ठोकुन आहेत त्या गावाबाहेरच्या राहुट्यांजवळ शेकोटी पेटवुन झिकर होणार आहे. झिकर म्हणजे आपला गरबा असतो तसे गोल करुन केलेले सामुहिक न्रुत्य. त्यांचे अध्यात्मिक गुरु मधे उभे राहुन त्यांच्या भाषेतल्या मंत्राचे उच्चार करतात आणि सगळे त्यात आवाज मिसळ्तात. साथीला डफ़, इतर वाद्ये असतात. हळुहळु जसा रंग चढु लागतो तसे दरवेशी गोलामधे येउन गिरक्या घ्यायला लागतात.
सगळी हौशी मंडळीं राहुट्यांकडे रवाना झाली. आम्ही पोचेपर्यंत झिकर सुरुही झाला होता. वर आकाशात लुकलुकणारे असंख्य तारे, शेकोटीची उब, रुमीच्या कविता आणि डफ़लीवरची थाप - झिकर चांगलाच रंगला होता.
त्या तालावर आठवणींच्या लाटाही उचंबळुन येत होत्या - क्षणात मन अनेक वर्षे मागे गेले. हिमालयाच्या आणि सातपुड्याच्या भ्रमंतीमधे शेकोट्या पेटवुन म्हंटलेली वेगवेगळ्या भाषांमधली गाणि, रचलेला गर्बा , दिवसभर चालुन थकलेल्या जिवांना दिलासा देणारा बोर्नव्हिटा किंवा गरम चहाचा कप, जिवाभावाचे मित्रं मैत्रिणि...
दूर देशात राहुन, यांत्रिकी आयुष्यात तो अनुभव पुन्हा कधी येईल असे ध्यानीमनीही नव्हते....!!!


(फ़ोटो सौजन्य : http://dilipb.smugmug.com)

Tuesday, September 19, 2006

राग अमरावती

आश्चर्य वाटलं नं?

अमरावती हे माझ्या गावाचेच नाही तर एका रागाचेही नाव आहे - रागकोष चाळता चाळता अचानक कळले.
रागकोषात याचे वर्णन असे आहे -
थाट खमाज - औडव-संपूर्ण, वादी ग संवादी ध , नि कोमल
आरोह: सा रे ग म ध सां
अवरोह: सां नि ध प म ग रे सा
गान समय : रात्रीचा दुसरा प्रहर.

Monday, September 18, 2006

बागेश्री, हंसध्वनी आणि मांड

बसंत बुखारीनंतर बागेश्री, हंसध्वनी आणि शिवाय मांड इतकं सगळं ५ दिवसात शिकुन मी शार्लेटहुन परत आले आहे. शिवाय मिंड्कारी, लयकारीचे वेगवेगळे ढंग!!! या सगळ्याची प्रॅक्टिस करायला काही महिने जातील.
इंद्रजित खुपच डाउन टु अर्थ आहेत, आणि हातचं काहीही नं राखता शिकवायला तयार.
गेल्यावर त्यांच्या पाया पडा वगैरे गोष्टी मुळीच कराव्या लागत नाहीत. एकदम इझी गोइंग.

बागेश्री हा राग माझा आवडता राग, त्यातुन हा राग मी आधी पं हबीब खानांकडुन सतारीवर आणि गाण्यात सरला बाईंकडे शिकले असल्यानी पटापट शिकता आलं. नुकत्याच एका कार्यक्रमात मी वाजवला पण होता. आता नविन शिकलेली मिंड्कारी आणि लयकारी आधी बागेश्रीतच वाजवुन बघणार आहे.

रविवारी इंद्रजितच्या शिकवणीची एक व्हिडियो पण तयार केली आहे. त्याची DVD मला लवकरच मिळेल आशी आशा आहे.
सतारी सारखं वाद्य अमेरिकेतल्या अशा छोट्या गावात शिकायचं म्हणजे असंच काही तरी करत शिकावं लागणार. डरहॅमला आल्यापासुन गाण्याचा क्लासही सुटला आहे - अवेळी सुरु केलेली ही संगीत साधना अशी अधांतरीच रहाणार आहे!!!!

Thursday, September 14, 2006

बसंत बुखारी

शास्त्रिय संगीत शिकण्याचे खरे वय म्हणजे ४ ते २०. लहानपणापासुन ऐकण्याची आवड असली तरी शिकण्यावर कधी भर दिला नव्हता. एक मैत्रिणीच्या आग्रहाखातर ७-८ वर्षापुर्वी सतार शिकायला सुरुवात केली - आता या मैत्रिणिला सतार शिकायचीच का हुक्की आली, आणि तिने तिच्याबरोबर मी ही शिकायला जावे असे का ठरवले आणि त्या निर्णयाला मी का मान्यता दिली हे आम्हाला दोघींनाही सांगता येणार नाही. मैत्रिणीने सतारीला केव्हाच रामराम ठोकला आहे - मी मात्रं अजुनही काहीतरी तुणतुण वाजवायचा प्रयत्नं करते आहे.

इंद्रजित बॅनर्जी शार्लेट्ला आले आहेत म्हणुन मी ही आठवडाभर एथे मुक्काम ठोकुन आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी मला बसंत बुखारी शिकवायला घेतला. नुसता आरोह अवरोह वाजवुन दाखवत असतानाही त्यांचा प्रत्येक स्वर दमदार आणि सौंदर्याने नटलेला आहे हे माझ्या लक्षात आले. म्हणुन मी त्यांना म्हंटलं की मला फ़ार पाठांतर नं देता सौंदर्यात भर पडेल असं काही तरी शिकवा. त्यामुळे सध्या मी विविध प्रकारचे मिंड, क्रंतन ई शिकण्याचा केविलवाणा प्रयत्नं करते आहे.
त्यातुन ते भारतात परत गेल्यावर मी काय करायचं हा प्रश्नं आहेच.

हजारो ख्वाईशे ऐसी की हर ख्वाईश पे दम निकले....

रे नि सा - रे ग - ग - म ग म (क्रिंतन) ग(मिंड) सा......
- - -

Tuesday, August 22, 2006

प्रश्नं आपल्या काळातले

मागच्या लेखात म्हंट्ल्याप्रमाणे Animal Right 2006 या conference मधे मी जे ऐकले, पाहिले, शिकले त्याच्या आधारावर लिहिलेले हे एक स्वैर मनोगत.

आधीच्या पिढ्यांचा मला नेहेमीच हेवा वाटत आला आहे - त्यांच्यापुढे देशाला स्वातंत्र्यं मिळवुन देणे, किंवा संयुक्तं महाराष्ट्राचा आग्रहं धरणे अशी उदात्त ध्येये अस्तित्वात होती. स्वातंत्र्यानंतर तब्बल वीसेक वर्षांनी जन्माला आलेल्या माझ्या पिढीसाठी असे कुठलेही ध्येयं शिल्लक राहिलेल नसल्यामुळे स्वत:ची प्रगती करुन घेणे या खेरीज दुसरे काहीही काम उरलेले नाही असा माझा समज होता. जगाचं एकुण बरं चाललं आहे, बहुतेक देश स्वतंत्र आहेत, महायुद्धांची संख्या अजुन तरी २ वरच थांबली आहे (हल्ली कधी कधी तिसरे महायुद्धं सुरु आहे की काय असा संशय मात्रं येऊ लागला आहे.) गुलामगिरी, अस्पृष्यता अशा प्रथा कालबाह्य झाल्या आहेत. आणि सगळं काही आलबेल असल्यामुळे विज्ञानाची प्रगती होते आहे, त्यामुळे जगभरातल्या तरुणांना चांगल्या नोकर्‍य़ा मिळताहेत. आता बेरोजगारी, हुंडाबळी, बाल कामगार असे प्रश्नं आहेत म्हणा, पण ते कमी होण्याच्या मार्गावर आहेत. शिक्षणाचा प्रसार झाला की तेही प्रश्न निकालात निघतील म्हणुन मी गरीब विद्यार्थ्यांना मदत करणार्‍या प्रथम ईंटरनॅशनल, शंकर पापळकरांचे बालगृह अशा संस्थांना जमेल तितकी मदत करुन आपले सामजिक ॠण फ़िटले असा स्वतःचा गोड समज करुन घेत होते.

पण Animal Rights conference 2006 ला जाऊन आल्यानंतर मात्रं माझे डोळे खाडकन उघडले आहेत. माणसाची हुशारीच (ज्याचा आपल्याला फ़ार अभिमान आहे) त्याचा महशत्रू ठरणार आहे. आपल्या हातुन पर्यावरणाचा असाच र्‍हास होत राहिला, तर आपले दिवस भरलेले आहेत असे समजायला हरकत नाही. आपल्या आत्तापर्यंतच्या बेजबाबदार वर्तणुकीमुळे पुढची काही हजार वर्षे सुद्धा मानवजात टिकणार नाही अशी भिती शास्त्रज्ञांना आता वाटु लागली आहे.

पर्यावरणाच्या द्रुष्टीने खालील बाबी फ़ार निराशाजनक आहेत.
१) हुशारी हा गुण प्राण्यांचा वंश टिकण्याचा दॄष्टीने फ़ारसा महत्वाःचा नाही. पर्यावरणाच्या द्रुष्टीने गांडुळ हा प्राणी आपल्यापेक्षा फ़ारच सरस आहे. जगात एकही माणुस शिल्लक राहिला नाही तरी इतर जीवांचे काहीही बिघडणार नाही, गांडुळांशिवाय मात्रं आपण एक दिवसही जगु शकणार नाही.
२) पर्यावरणाच्या असंतुलनामुळे आपल्याला अगदी नजिकच्या भविष्यात नैसर्गिक आपत्ती, विविध रोग अशा गोष्टींना तोंड द्यावे लागणार आहे.
३) गरिबी, आतंकवाद, एड्स अशा मानवी प्रश्नांमधे आपण इतके गुरफ़टलो आहोत की पर्यावरणाचा विचार करायलाही आपल्याला वेळ नाही - त्याला महत्वं देणे तर सोडाच.
४) काही क्षेत्रात आपण अतिशय विद्वान असलो तरी ecologically आपला बुध्यांक मतिमंदांच्या गटात मोडेल. याचे कारण असे की इतर प्राणी वर्ग हे आपल्या पुढच्या पिढीला त्रास होईल अशी कुठलीही गोष्टं जाणुन बुजुन करत नाहीत. याच्या अगदी उलट आपण!!!

पॄथ्वीचे वय सुमारे ४000५00000 (४.५ बिलियन) वर्षे आहे असे समजले जाते. आधुनिक मानव वंश हा गेल्या ५0,000-६0,000 वर्षापासुन अस्तित्वात असल्याचे मानल्या जाते. गेल्या केवळ २०० वर्षाच्या काळात झालेला र्‍हास हा पृथ्वीच्या इतिहासात झालेला सर्वाधिक र्‍हास आहे.
http://www.climatecrisis.net/thescience/
http://www.globalpolicy.org/socecon/hunger/environment/index.htm


ह्या सगळ्या गोष्टींचा Animal Rights शी संबंध तरी काय?
Animal Rights Movement ची सुरुवात नैतिकतेच्या जाणिवेतुन झाली आहे. अमेरिकेतील Civil Rights Movement यशस्वी झाल्यानंतर समानतेच्या वर्तुळामधे प्राण्यांनाही सामिल करुन घेतले पाहिजे, आपल्या क्षुद्रं स्वार्थासाठी त्यांचे हाल करु नयेत अशा विचारांच्या लोकांनी हे आंदोलन सुरु केले आहे. (उद्या Tree Rights Movement सुरु झाली तरी मला आश्चर्य वाटणार नाही. मानवी आक्रमणामुळे हिसकावुन घेतलेले सर्व ह्क्कं आपण परत केले पाहिजे असे वाटणार्‍यांची संख्या कमी नाही.) आज मात्रं पर्यावरणवादी आणि प्राणि हक्कंवाले हे एका माळेचे मणी झालेले दिसुन येतात कारण त्यांना त्यामधे समान धागे सापडले आहेत.

अमेरिकेला मांस पुरवण्यासाठी, रोज कित्येक एकर ऍमेझॉन्चे रेनफ़ॉरेस्ट नष्टं होतं आहे. मांसाहारी अन्नाची निर्मिती करण्यासाठी लागणार्‍या पाणि, जमिन इ. भांडवलात त्याचापेक्षा दसपट शाकाहारी अन्न-धान्याचं उत्पादन होऊ शकते.
अमेरिकेत आज वाळवंट असलेल्या ऊटा, कॅलिफ़ोर्निया इ. ठिकाणी एकेकाळी घनदाट जंगल होतं हे आज कोणाला सांगुन सुद्धा खरं वाटणार नाही. सतत गायी म्हशींच्या चरण्याने आज त्या जंगलाचे वाळवंटात रुपांतर झाले आहे. तीच अवस्था काही वर्षात रेन फ़ॉरेस्टची होणार आहे.

इतर प्राण्यांचा नैसर्गिकपणे जगण्याचा हक्कं आपण मान्य केला आणि त्यांचे हॅबिटॅट जाणिवपुर्वक राखुन ठेवले तर पर्यावरणाचा र्‍हास बर्‍याच प्रमाणात कमी होईल.

मानववंश हा या जगात अगदी पाहुणा ठरावा इतका नविन आहे, पण आपल्या आधीपासुन इथे वास्तव्य करुन असलेल्या इतर प्रजातींचे हक्कं मात्र आपण सहजपणे हिरावुन घेतले आहेत. मानवी गरजा भागवण्यासाठी रोजच्य रोज कितीतरी प्राणि तसेच वनस्पतींचे हॅबिटॅट नष्टं होत आहे.

प्राणि हक्कं विरोधी तर्क असे आहेत.
१)मनुष्य प्राणि हा सर्व श्रेष्ठं आहे आणि Survival of the fittest हा निसर्गाचा नियम आहे, त्यामुळे इतर प्राण्यांना कसेही वागवले तरी ते नितिमत्तेत बसणारे आहे.
२)झाडांनाही जीव असतो - झाड मारले काय किंवा प्राणि मारला काय - हत्या ती हत्याच

ह्या विधानांना अनेक भुमिकेतुन विरोध करता येतो. त्या सर्व तर्कातील मला भावलेले तर्क हे पर्यावरण आणि जागतिक शांतता आणि न्यायाशी निगडित आहे.

Survival of fittest हा निसर्गाचा एकमेव नियम नाही. त्या नियमा बरोबर खालील नैसर्गिक नियमही तितकेच लागु पडतात:
प्रजातींची विविधता (Law of diversity), प्रजातींचे परस्परावलंबन (Law of Interdependance) आणि मोजकी साधन संपदा (Law of Limited Resources)
या नियमांप्रमाणे अशाच जर प्रजातींमागे प्रजाती नष्टं होत राहिल्या तर अखेर आपला विनाश अटळ आहे.
मानववंश सर्वश्रेश्ठं हा अहंकार आपण सोडला पाहिजे. चत्रेपणा करता येत नाही म्हणुन प्राणि बुद्धीमान नाहीत, हा गैरसमज दूर करायला पहिजे. इतकी विद्न्यानाची प्रगती होऊनही आपण फ़ारतर १०० वर्षे जगु शकतो - पण समुद्रातील तसेच जमिनीवरील कित्येक प्राणि पर्यावरणाशी संतुलन राखुन दोन-दोनशे वर्षे जगु शकतात, साधी फ़ुलपाखरं कुठल्याही उपकरणांच्या मदतीशिवाय दरवर्षी हजारो मैलांचे स्थलांतर करु शकतात. ही प्रगती पिढ्या-दर-पिढ्यांच्या अभ्यासाशिवाय झालेली नाही.

सामाजिक न्यायाच्या परिघामधे सर्व जीवांना सामिल करुन घेतले पाहिजे.
निसर्गाच्या संतुलन नं राखता झालेली प्रगती ही प्रगती नसुन अधोगती आहे हे आपल्याला कधी कळणार?

आपल्या परीने काही तरी नक्कीच करायला पाहिजे हे पटले तरी आपण काय करु शकतो? वाहने चालवणे थांबवु शकतो? एयरकंडिशन शिवाय राहु शकतो? कळुनही आता फ़ार उशीर तर झालेला नाही ना?????????????
हे आहेत प्रश्नं आपल्या काळातले आणि आंदोलन आपल्या पिढीचे!!!

Wednesday, August 16, 2006

प्रवास

कधी तरी घडलेली एखादी छोटी घटना - इतकी क्षुल्लक की कदचित लक्षातही रहाणार नाही अशी! पण अनेक वर्षांनंतर मागे वळुन बघितलं तर त्याच छोट्याश्या घटनेनी अख्ख्या आयुष्याची दिशा बदलली, जणु एका क्षणात नदीचा प्रवाह निश्चीत केला, असा अनुभव तुम्हाला आला आहे का?

आठ्व्या किंवा नवव्या वर्गात असतानाची गोष्टं. आईने कुठले तरी औषध आणायला डोंगरकर औषधी केंद्रात पिटाळले असावे. डोंगरकरांचे दुकान तेव्हा जुन्या जागेत - राजापेठ पोलिस स्टेशनच्या बाजुला होते. डोंगरकर काका एकटेच दुकानात होते. आई बाबा कसे आहेत इ. औपचारिक गप्पा सुरु असतानाच माझी नजर काऊंटर वर पडलेल्या "माझे सत्याचे प्रयोग" या पुस्तकावर खिळली. मी हळुच पुस्तक चाळायला लागले आणि काका म्हणाले - "घेऊन जा वाचायला". मी पड्त्या फ़ळाची आज्ञा पाळली.
एरवी समोरच्या श्रीकांत वाचनालयातील कॉमिक्स, गोष्टीची पुस्तके अगदी मुखप्रुष्ठापासुन ते मागील पानावरील झावबाच्या वाडीतल्या त्या प्रकाशकांच्या पत्त्यापर्यंत वाचुन काढ्ली असली तरी काही तरी गंभीर वाचायची ही बहुतेक पहिलीच वेळ असावी. घरी पोचताच सायकल स्टॅंड्ला लावुन पुस्तक घेऊन गच्चीत जाऊन बसले. पुस्तक एका बैठकीत संपवले की नाही हे काही आता आठवत नाही.
त्या पुस्तकातला सत्य अहिंसेचा संदेश मात्रा नं कळत कायमचा मनात घर करुन बसला आणि पुढच्या आयुष्याला मार्गदर्शक ठरला हे आता सुमारे २५ वर्षांनी लक्षात येतं आहे.
कॉलेज शिक्षण संपल्याच्या काळात एकुणच परंपरेची बंधनं कमी होऊ लागली होती आणि एरवी शाकाहारी असलेल्या आमच्या घरात चिकन-करीचा प्रवेश झाला - संदीप, अपर्णा सगळ्यांनी चाखुन बघितले, माझं मन मात्रं त्या बिचार्‍या कोंबडीला मरताना किती दु:ख झाले असेल या विचाराने अस्वस्थं झालं होतं.
चटकावलेले काही मित्रं त्यांच्या घरी चालत नाही म्हणुन आमच्या घरी आवर्जुन खायला यायचे आणि मी मात्र मुभा असुनही खात नाही हे बघुन चकित व्हायचे.
वंदना वहिनी तर एकदा म्हणाली की तुमच्या घरात येऊन आम्ही सगळ्या बाटलो आणि तूच कशी नाही बाटलीस?
पुढे अमेरिकेत आल्यावरही शाकाहारी रहाण्यासाठी चक्कं स्वयंपाक करायला सुरुवात केली.

अमेरिकेतील सहा वर्षाच्या वास्तव्यातील पाच वर्षे संपत आली आणि परतीची तयारी करत असताना तो भेटला - अनपेक्षित!!! इतरांपेक्षा अगदी वेगळा. हौशीने स्वयंपाक करुन इतरांना खाऊ घालणारा. स्वत:च्या PJs वर एकटाच खळ्खळुन हसणारा. नुसता शाकाहारीच नव्हे तर व्हिगन - कुठलाही प्राणिजन्य पदार्थ -दुध, अंडी इ. नं खाणारा, चामडं, रेशिम अशा प्राण्यांपासुन बनवलेल्या वस्तु नं वापरणारा. दया, क्षमा, शांती ही तत्वे आम्हाला दोघांनाही भावणारी. त्या धाग्य़ांवर सुरु झालेल्या मैत्रिचे हळु हळु प्रेमात रुपांतर झाले आणि माझा सहा वर्षाचा व्हिसा संपायच्या २५ दिवस आधी आम्ही विवाहबद्ध झालो.
त्याच्या बरोबरचे सहजीवन सुरु झाल्याला आता जवळ्पास एक वर्ष पूर्ण झाले आहे. या काळात त्याच्या बरोबर अनेक व्याख्याने, चर्चांमधे सहभागी झाले. त्यातुन जगातील समस्यांचे एका वेगळ्या द्रुष्टिकोनातुन आकलन व्हायला लागले आहे. लहानपणी वाचलेल्या एका पुस्तकाने प्रभावित होऊन जो मार्गं स्विकारला आहे तो केवळ व्यक्तिगत आवड निवड या प्रकारात मोड्णारा नसुन, आरोग्य, पर्यावरण संतुलन, जागतिक शांतता आणि न्यायाच्या मार्गातील एक महत्वाची जबाबदारी आहे, हे हळु-ह्ळु लक्षात येते आहे.

दरम्यान - डोंगरकर काकांच्या दु:खद निधनाची बातमी मला कळली आहे. लग्नानंतर भारतात गेल्यावर त्यांना भेटुन त्या पुस्तकाची मी त्यांना आठवण करुन दिली होती, हेच समाधान.

नुकत्याच पार पडलेल्या Animal Rights 2006 या conference मधे नवर्‍याला व्याख्यानाचे निमंत्रण आले होते. त्या चonference मधे अनेक नविन गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याबद्द्ल पुढील ब्लॉग मधे लिहिणार आहे.

Sunday, July 23, 2006

केप कॉड्ची एलिजाबेथ

माझ्या सासरच्या सगळ्या मंडळींनी जुलै महिन्यात कनेक्टिकट मधे भेटायचे असे ठरले होते. तर त्याला जोडुन केप कॉड्ला जावे असा आम्ही बेत आखला. कनेक्टिक्ट मधे वाढलेल्या माझ्या नवर्‍याने अनेकवेळा केप कॉड्मधे सायकलवरुन भ्रमंती केलेली आहे. त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्याने स्वत:ची सायकलही जाताना गाडीत कोंबली होती.

सर्व्हासचे सदस्या असल्यामुळे आम्ही कुठलाही प्रवास आखतांना आधी तिथे कोणी सर्व्हास सदस्य आहे का ते बघतो. सर्व्हास हा युनायटेड नेशन्सचा एक उपक्रम आहे. http://www.servas.org/ जगभरातील शांतीप्रिय नागरिकांचे आपसात संबंध प्रस्थापित व्हावेत, त्यातुन निर्माण होणार्‍या सामंजस्य आणि देवाण घेवाणीतुन शांतीचा मार्ग शोधला जावा, ही संघटनेची उद्दिष्टे आहेत.
तर केप-कॉड्मधे एलिजाबेथ(लिजा) आणि लिओ हे दांपत्य यादीत होते, म्हणुन नवर्‍याने त्यांच्याशी ईमेल व्यवहार (म्हणजे पत्र व्यवहार म्हणतो तसं) सुरु केला आणि काय आश्चर्य!!! आमच्या प्रमाणे ते दोघेही व्हिगन (व्हेजिटेरियन, पण कुठलाही प्राणिजन्य पदार्थ उदा. दुध, मध, अंडी इ. नं खाणारे) आहेत हे कळले. मग काय, तिथेच रहायचे असे ठरले.
लिओ रिटायर्ड शिशुतज्ञ तर लिजा फिजिओथेरपिस्ट आहे. आणि त्या दोघांनी आपापल्या क्षेत्रात खुप यश संपादन केले आहे, पुस्तके लिहिली आहेत आणि गरिब देशात जाऊन समाजकार्यही केलं आहे असं कळलं.
तर कनेक्टिकट्चा कार्यक्रम आटपुन आम्ही रमत गमत लिजा आणि लिओ यांच्या घरी पोचलो. ४ जुलै असल्यामुळे सगळ्यांनी मिळुन प्रॉव्हिन्स्टाउनला जाऊन फटाके बघायचे असा बेत होता.
तलावाच्या काठावरील प्रशस्तं घर बघुन मन प्रसन्नं झालं होतं. पुढ्चे दोन तीन दिवस लिजा आणि लिओच्या सहवासात आणि केप कॉड्च्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुट्ण्यात गेले. पण या प्रवासातील सर्वात लक्षात रहाण्यासारखी गोष्टं म्हणजे स्वत: लिजा, तिचे विचार आणि कार्य.
अमेरिकन समाजात आजही प्रचलित असलेल्या सरकमसिजन या अनिष्टं प्रथेच्या विरुद्ध आवाज उठवण्याचे काम करणार्‍या संस्थेमधे ती अनेक वर्षांपासुन सेवाभावी कार्य करते आहे.

लिजा आणि लिओ या दांपत्याने अनेक वेळा आपल्या यशस्वी प्रॅक्टिस मधुन वेळ काढुन आशिया आणि आफ़्रिकेतल्या गरिब देशात जाऊन तिथल्या लोकांना आपल्या ज्ञानाचा उपयोग करुन दिला आहे.
लिजा अनेक वेळा भारतात जाऊन आली आहे - इतकेच नव्हे, तर तिने एका हिंदी सिनेमातही काम केले आहे. (सिनेमाचे नाव मात्र तिला आठवत नाही.)

स्त्रियांची प्रसुती शक्य तितक्या वेळी घरच्या घरी व्हावी - तिच्या मुलाचा जन्मं त्यांच्या राहत्या घरातच झालेला आहे.

खाण्याचा सवयींबद्द्लची तिची मते अशी आहेत: व्हेजिटेरियन लोक दुध, तुप खाऊन स्वत:ची तब्येत खराब करुन घेतात. त्यापेक्षा आठवड्यातुन एक-दोनदा मांसाहार करणे आरोग्याच्या द्रूष्टीने चांगले. या मताचे समर्थन करण्यासाठी ती जपानचे उदाहरण देते. अमेरिकेनी युद्धानंतर जपानी लोकांना दुधाचे पदार्थ खायला शिकवले (स्वत:चा माल खपवण्यासाठी) आणि वीस वर्षानंतर जपान मधे स्त्रियांमधे पहिल्यांदा स्तनाच्या कॅन्सरच्या केसेस दिसु लागल्या.

एड्सवर उपाय म्हणुन सामान्यत: प्रचलित असलेले कॉकटेल हेच लोकांना मारण्यास कारणीभूत ठरते आहे. बिल गेट्सचे बिल ऍंड मेलिंडा फ़ाउंडेशनने हे कॉकटेल पाजुन अनेक लोकांना मारते आहे आणि त्यांना आता वॉरेन बफ़ेट्चाही पैसा मिळाल्याने जास्तीच लोक मरणार आहेत.


पाश्चात्त्यपद्धतीपेक्षा भारतीय शौचालये तब्येतीच्या द्रुष्टीने चांगली आहेत. लिजा स्वत: त्या पद्धतीचा वापर करते.

लिजाच्या या मतांमधे कितपत तत्थ्य आहे हे मला माहित नाही, पण लिजा ही वर्षांनुवर्षाचा अनुभव असलेली विदुषी आहे. यातील बर्‍याच विषयांवर तिने पुस्तकं लिहिली आहेत हे मात्रं खरे!!!!Tuesday, June 27, 2006

American Dance Festival (ADF)

डरहॅमच्या सामजिक आणि सांस्क्रुतिक जीवनात तीन वार्षिक उत्सव महत्वंपूर्ण आहेत:
Full Frame Documentary Film Festival, American Dance Festival (ADF) आणि हौशी नवर्‍याचे All Vegan Thanksgiving!!!

Full Frame साठी मी अक्षरश: दोन दिवस रजा काढली होती. सद्ध्या ADF सुरु आहे. आत्ता पर्य़ंत बघितलेल्या कार्यक्रमांपैकी खालील उल्लेखनिय वाटले.

पॉल टेलरचे बॅंक्वेट ऑफ़ व्हल्चर्स:या उत्क्रुष्ट कलाक्रुतीत नेते जगावर कसे युद्ध लादतात, त्या युद्ध्दाच्या आगीत मुळात ज्या ध्येयांसाठी युद्ध सुरु केले त्याच ध्येयांची कशी राख रांगोळी होते, आधी समाज आणि मग स्वत: नेते आणि देशही कसे बेचिराख होतात त्याचे दर्शन घडवले आहे. इराक युद्धाच्या पार्श्वभूमीवर हे कलाक्रुती अगदी आजच्या काळात चपखल बसणारी असली तरी पॉल टेलरच्या ही रचना कालतीत आहे आणि इराक युद्धावर बेतलेली नाही असे प्रश्नोत्तरांच्या वेळी सांगण्यात आले.

चित्रेश दास आणि जेसन सॅम्युएल स्मिथ यांचे रिदम सुट्सदोन वर्षांपूर्वी मी अमेरिकन डान्स फ़ेस्टिवल पहिल्यांदा बघायला गेले. त्यातली लक्षात राहिलेली रचना म्हणजे "फ़ेस्टिवल ऑफ़ फ़िट". कथ्थक, फ़्लेमेंको आणि टॅप या तीन प्रकारांमधील विलक्षण साम्य बघुन मन अचंबित झालं होतं. फ़ुट वर्कचा समान धागा साधुन कलाकारांनी उत्क्रुष्टं सांस्क्रुतिक मिलाफ़ घडावुन आणला होता. पहिल्या वर्षिचे यश दुसर्‍या वर्षी मिळवण्याचा प्रयत्नं तितकासा सफ़ल झाला नाही. पण यावर्षी मात्रं चित्रेश आणि जेसन यांनी गेल्यावर्षीच्या निराशेची भरपाई केली. चित्रेश आणि जेसन यांची गेल्यावर्षी याच उत्सवात अचानक भेट झाली. जेसन स्टेजच्या मागे प्रॅक्टिस करत असतांना चित्रेश दासांनी गंमत म्हणुन जेसनला साथ द्यायला सुरवात केली. कथ्थक या न्रुत्यप्रकाराच्या अस्तित्वाचा गंधही नसणार्‍याला जेसनला हा कोण, माणुस आपली नक्कल करतो आहे असे वाटले. पण थोड्याच वेळात पायात साधे बुटही नं घालता विलक्षण तयारीचे फ़ुट्वर्क करणारी ही व्यक्ती सामान्य नाही हे त्याच्या लक्षात आले. मग साता समुद्रापलिकड्ल्या या दोन कलांचा जो संगम सुरु झाला तो यावर्षीच्या कार्यक्रमात पुर्ण विकसित झालेला दिसुन आला.
विशेष म्हणजे या कलाकारांनी दोन शैलींचे साम्य दर्शवतांना आपापल्या परंपरांचे तंतोतंत पालन केलेले आहे. फ़्युजन नव्हे, तर एक आधुनिक जुगलबंदी बघाताना डोळ्याचे पारणे फ़िटले.

Pilobolous - पलाबुलसADF च्या चाहत्यांचा सर्वात आवड्ता ग्रुप म्हणजे पलाबुलस!! न्रुत्यं आणि जिम्नॅस्टिक यांचा मिलाप करणार्‍या पलाबुलस चा प्रत्येक नाच अविस्मरणिय, प्रेक्षणिय आणि अचंबित करणारा असतो. शरिराला कशाही प्रकारे वाकवु शकणारे हे नर्तक आपल्या कलात्मक हालचाली आणि नर्तकांच्या असंभव वाट्णार॓या मांड्णीने प्रेक्षकांना एखादी गोष्टं सांगतात. दर वर्षीप्रमाणे या वर्षीही तितक्याच कल्पकतेने सर्व रचना सादर करण्यात आल्या.

Sunday, June 25, 2006

नैसर्गिक आपत्ती

दहा जुनची पहाट. रात्रीपासुन सारखा पाऊस पडत होताच. अचानक विजेचा मोठ्ठा कडकडाट झाला आणि आम्ही दोघेही दचकुन उठलो. कुठेतरी जवळच वीज पडली असावी असा विचार मनात आला आणि पुन्हा आम्ही झोपेच्या स्वाधीन झालो. शनिवार असल्याने उठायची घाई नव्हतीच. ९-९.३० ला उठले असेन. दुसरं काही करायच्या आधी प्रॅक्टिस आटपावी म्हणुन सतार घेउन डेकवर गेले, तर तबला मशीन चालेना. मनातल्या मनात भारतात बनलेल्या वस्तु कशा बेभरवशाच्या असतात वगैरे वगैरे विचार करुन झाला. मग तानपुरा मशिन चालावुन बघितलं तर तेही चालेना - तरीही माझी ट्युब पेटली नाही, उलट या दोन्ही भारतिय वस्तुंनी एकाच दिवशी राम म्हंटला म्हणुन फारच वैताग आला.
तेवढ्यात नवर्‍याचा आवाज आला - तो गॅरेजचे दार उघडत नाही म्हणाला, आणि माझ्या डोक्यात एकदम लख्खं प्रकाश पडला!!! रात्री "जवळ्पास कुठे पडली असेल" असे वाटलेली विज चक्कं आमच्याच घरावर पडली होती!!!!!

मग एकदम धावपळ सुरु झाली. कुठे काय काय नुकसान झालं आहे ते पहायला लागलो. नशिबानी घराला काही नुकसान झालेले नाही. विजही सगळी गेली नव्हती. फक्त घराच्या बाहेरचे सर्किट निकामी झालेले होते. आमच्या घराच्या बाहेर अगदी काही फुटांवर दोन मोठ्ठी झाडं आहेत. घरापेक्षाही बरीच उंच आहेत. त्यातल्या एका झाडावर साधारण ३० फुट चीर पडलेली दिसली. त्याबिचार्‍या झाडाला तडाखा बसला आणि त्यानंतर एक छोटासा surge घरात आला आणि काही उपकरणे गारद झाली.
नशिबानी आमची बेडरुम खाली आणि विज पडली त्याच्या विरुद्ध दिशेला आहे. विज पडली त्या भागात नवर्‍याचे ऑफिस आहे. बरेचदा तो रात्रभर काम करत बसतो. पण त्यारात्री मात्रं तो जरा लवकरच झोपायला आला होता, ते ही एक नशिबच.

सगळा आढावा घेतल्यावर Garage door opener, garbage disposer in the kitchen sink, music system receiver, internet and both the phone lines ही उपकरणे चालत नव्हती.
त्या सगळ्या चालु व्हायला चांगले ५-६ दिवस लागले. Internet अजुनही पुर्ण पुर्ववत झालेले नाही. मी बहुतेक दिवस घरुन काम करत असल्यानी मला सासु-सासर्‍यांच्या घरी ठिय्या मारलेला आहे. हा ब्लॉगही तिथेच बसुन लिहिते आहे.
त्या झाडामुळे वीज पडली की झाडानी घराला वाचवले ते मला अजुन कळलेले नाही. तुम्हाला काय वाटतं?

Wednesday, June 07, 2006

पोहायला कोण कोण येतं

गेल्या दोन वर्षांपासुन मला वजन कमी करुन टिकवण्याचा उपाय सापडला आहे. Fatty and गोड पदार्थ खाऊ नये, काही दिवस अगदी फळं सुद्धा खाऊ नये आणि आठवड्यातुन किमान एक दिवस सतत एक तास नं थांबता पोहावे. हा Sangeeta's Weight Reduction Formula माझ्यापुरता तरी चांगला लागु पड्तो आहे. अरेच्चा!! वजन कमी करणे हा काही माझ्या आजच्या ब्लॉगचा विषय नाही - पण त्याचा एक भाग म्हणुन आज पोहायला गेले होते.

Charlotte मधे असताना जवळ एक public swimming pool होता. आता लग्नानंतर Durahm ला मात्र असा pool जवळ्पास नसल्याने भरमसाठ फी असलेल्या Meadowmont नावाच्या एका Gym मधे आम्हाला membership घ्यावी लागली आहे. अर्थात सुविधा अद्ययावत आहेत त्यामुळे मजा पण येते. पण निरिक्षणाचा छंद असलेल्या मला एक विलक्षण फरक दिसुन आला आहे. Charlotte च्या public pool मधे बहुतेक वयस्क आणि अ-गौरवर्णिय लोक येतात. Meadowmont मधे मला अजुन तरी एकही क्रुष्ण्वर्णिय व्यक्ति पोहताना दिसलेली नाही. आपण भारतिय लोक व्यायाम वगैरे करण्याच्या फारसे फंदात पड्त नाही - पड्लोच तर, योगा, चालणे, क्रिकेट, इ. आणि फारच झाले तर Table Tennis, Badminton jogging!!! तरी एखादं भारतिय जोडपं लहानग्यांना पोहणं शिकवायला घेऊन येतं, आणि कुठे एखाद-दुखाट oriental व्यक्तिही दिसते. बहुतेक भरणा मात्रं सुडौल, तरुण गौरवर्णियांचा!!! Class In America चं जणु काही एक उदाहरण!!!
आणखी एक आवर्जुन सांगता येण्यासारखी गोष्टं म्हणजे दोन स्त्रिया, सहा-सात महिन्यांच्या गर्भवती आहेत, आणि नियमितपणे पोहताना दिसतात!!!

आज पोहण्याच्या तासात शिकलेला धडा - पोहताना गाण्याचा प्रयत्नं कधीही करु नये.

Tuesday, June 06, 2006

Rose Show

हौशी नवरा सालाबादाप्रमाणे Rose Show मधे भाग घेणार होता. माझा मात्र हा पहिलाच अनुभव होता. आत्ता पर्यंत मी लावलेले कुठलेही रोपटे जगलेले नाही, इतकंच काय, विकत आणलेलं चांगली कळ्यांनी लगडलेली कुंडीही काही दिवसांच्या आत गतप्राण झालेली.
या वर्षी थंडी सरता सरता सुरु झालेल्या बागकामात नवर्‍याला हवी ती मदत करत होते. Lady Banks नावाच्या वेली गुलाबाचे रोप दोघांनी मिळुन लावले. त्याला छानच फुलं आली होती.
तर Rose Show मधे एक मोठी मॉडर्न अरेंजमेंट, एक मिनिएचर मॉडर्न अरेंजमेंट आणि इतर हॉर्टिकल्चर बागेत काय फुलं आहेत त्यानुसार ठेवायचे ठरवले. मॉडर्न अरेंजमेंट थोड्क्या फुलांमधे करता येते आणि शिवाय काहीतरी क्रिएटिव केल्याचं समाधान! अरेंजमेंटसाठी विषय दिले गेले होते ते गाजलेले चित्रपट. आम्ही 3 faces of eve आणि Vertigo हे दोन विषय निवडले.
एक दिवस नवरा बाजारात गेला आणि Home Depo मधुन ड्रायरची व्हेंट घेउन आला. त्याला तळाला गच्चं आवळुन ठेवेल असा एक स्टॅंडही घेउन आला. मग व्हेंट्ला स्टॅंड्मधे फिट करुन त्याला काळा रंग फासला. आणि मग त्या व्हेंटला काळजीपुर्वक वाकवुन साधारण हत्तीच्या सोंडेचा आकार तयार केला.
आश्चर्य म्हणजे जो काही आकार तयार झाला तो स्वत:ला balance करुन होता.
मग त्याच्यावर तीन फुलं लावुन 3 faces of eve करायचं ठरलं. एका प्रकारच्या फुलाच्या ३ निरनिराळ्या अवस्था दाखवायच्या की तीन वेगवेगळ्या जातींचे गुलाब लावायचे ते बहुतांश बागेत त्या दिवशी काय फुलणार, त्यावरुनच ठरणार होते.
आता प्रश्नं होता miniature arragement चा - Vertigo सिनेमामधे San Francisco शहरात होणारी रहस्यकथा दाखवली आहे. त्या द्रुष्टीने काही सापडतं का ते बघायला Michaels मधे गेलो. अगदी शेवटी माझी नजर cross-stich pad वर गेली. तिला उचलुन सहज वाकवुन बघितले तर एक interesting आकार तयार झाला. नवर्‍याला तो एकदम आवडला. मग ते घरी आणुन त्याच्यावर अनेक तास दोघांनी अनेक तास trial and error करण्यात घालवले आणि शेवटी एक conical shape ठेवायचा यावर एकमत झाले. तो आकार सॅन्फ्रॅन्सिस्को मधील उंच इमारतीसारखा दिसेल, त्याच्यावर फुलांचा एक झुपका ठेवायचा आणि एक फुल ठेवायचे - म्हणजे उंच इमारतीवरुन कोणितरी खाली बघतं आहे असा भास निर्माण होईल ??!!!
आता दोन्ही अरेंजमेंट्स्ची साधारण बांधणी ठरली, पण हे सगळं होईपर्यंत Rose Show ला जेमतेम २-३च दिवस बाकी होते. आणि मुख्य प्रश्नं म्हणजे बागेत गुलाब कोणकोणचे असणार आहेत? काही गुलाब तर आत्ताच अगदी छान फुललेले दिसत होते. ते कापुन फ्रिजमधे ठेवावे अशी कल्पना मला सुचली ती नवर्‍यालाही पटली. ते एक बरंच झालं कारण शोच्या आद्ल्या रात्री पाऊस पडुन बरंच नुकसान झालं.
ऐन शो च्या दिवशी मात्र आम्ही भल्या पहाटे उठलो. आणि बागेतले दाखवण्यालायक सगळे गुलाब कापले. ते, आणि फ्रिजमधे ठेवलेले असे सगळे गुलाब आणि इतर सामुग्री घेऊन आम्ही शोच्या ठिकाणी दाखल झालो तेव्हा सकाळ्चे ७.३० वाजले होते. बहुतांश सहभागी आमच्या आधीच तिथे आलेले होते.
मग आम्ही लगबगीने arragement करायला सुरुवात केली. ऐन वेळेवर किती चुका होतात आणि प्रश्नं निर्माण होतात त्याचा मला चांगलाच अनुभव आला. तर अरेंजमेंट्स उभ्या करुन आम्ही उरलेले गुलाब horticultrue मधे ठेवायला घेउन गेलो. तेही काम काही कमी नाही. कसंबसं वेळेचा आत सगळे गुलाब स्पर्धेसाठी तयार करुन पाठवले!!! आता वाट निकालाची. Judges आले आणि एकेका arrangement चे बारकाईनी निरिक्षण करु लागले. इतर स्पर्धकांच्या arrangements बघुन आमच्या 3 faces of eve ला दुसरं बक्षीस आणि Vertigo ला पहिलं मिळेल अशी आमची अपेक्षा होती. पण झालं त्याचा अगदी विरुद्ध!! 3 faces of eve ला पहिलं बक्षीस आणि artist award तर Vertigo ला दुसरं बक्षिस मिळालं.
(माझ्यामते judges ना आमची Vertigo ची idea काही कळली नाही - आम्ही आमची कल्पना लिहुन ठेवली असती तर त्यांनी आम्हाला नक्कीच पहिलं बक्षिस दिलं असतं. )

तर असा झाला माझा पहिला वहिला Rose Show.

आणखी फोटो - http://dilipb.smugmug.com/gallery/1501161

Sunday, June 04, 2006

अन्याय

सहन केल्यास संस्क्रुती, नं केल्यास इतिहास!!!

Wednesday, May 31, 2006

American Experience

काही काही गोष्टी इथे अमेरिकेतच होऊ शकतात. अमेरिकेत असुनही माझे सासु-सासरे अगदी कोपर्‍यावर रहातात हयाचा मला कोण अभिमान आहे!! पण ही गोष्ट कोणाला तरी कौतुकाने सांगत असतांना त्या व्यक्तिने मला डोळे बारिक करुन, ओठाचा चंबु करुन I am sorry to hear that असा शेरा मारला!!!
तर आप्तेष्टांना शक्य तितकं दूर ठेवु पहाणार्‍या या अमेरिकनांना समाज कार्याची मात्र भारी आवड आहे.
आणखी एक वाखाणण्याजोगा गुण म्हणजे कामगारांचा आदर आणि श्रमाचे मोल.

या दोन गुण विशेषांवर आधारित दोन अनुभव मला वेगवेगळ्या वेळी, पण Winston Salem नावाच्या एकाच गावात आले.

६ एप्रिल २००६, Charlotte ला काही कामानी जायचे होते. येताना माझ्या Winston Salem च्या ऑफिसमधे काही तरी काम होते म्हणुन तिथे थांबलो. नवर्‍याने मित्रांना फोन करुन Vegan Food कुठे मिळेल ते विचारले असता त्यांनी California Buffet नावाच्या खाणावळीचे नाव सांगितले. तिथे गेलो तर कळले की ही खाणावळ बहुतांश स्वयंसेवकांनी चालवली असुन सर्व मिळ्कत सेवा कार्यासाठी वापरली जाते! चविष्ट खाद्य पदार्थ आणि उत्तम सेवा यांनी आम्ही अगदी भारवून गेलो. शेवटी नं रहावुन बाजुचे टेबल पुसणार्‍या बाईशी संभाषण सुरु केले. ती एका ऑफिसमधे अधिकारी म्हणुन काम करते आणि ती आपल्या secretary मैत्रिणी बरोबर त्या ठिकाणी सेवा कार्य करायला नियमाने येते म्हणे!!!
आपल्याकडे साधे झुणका भाकर केंद्र ना नफा ना तोटा तत्वावर चालवणे कठिण!!

मे २६, २००६

दोन आठवड्यापूर्वी Winston Salem च्या ऑफिसमधे एका व्यक्तिला निरोपाचे जेवण देण्याच्या बेतावर भवती नं भवती सुरु होते. सगळे आपापल्या कल्पना सांगत असतांना आमची मॅनेजर D ला एकदम एक कल्पना सुचली. तिचा मुलगा S उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधे एका Restaurent मधे वेटर म्हणुन काम करतो. तर त्याच्याच हॉटेलमधे आपण जायचे का? असं तिनी विचारलं आणि सगळ्यांनी ती कल्पना एकदम उचलुन धरली. त्याच बरोबर चेष्टेने आधी ऑर्डर देऊन मग आपसात जागा बदलुन S ची फिरकी कशी घेता येईल याच्या योजनांमधे D सहित सगळे सहभागी झाले होते.
ठरल्याप्रमाणे २६ तारखेला दुपारी सगळे जण मिळुन ठरलेल्या ठिकाणी गेलो. आता माझे कुतुहल जागे झालेले होते. D आणि S चे काही नाते आहे हे दर्शवले जाणार की नाही? सुमारे ३० जणांची Boss असणारी D आपल्या हाता खाली असणार्‍या सहकार्‍यांचा समोर आपल्या वेटर मुलाला ओळख तरी दाखवेल की नाही हा माझ्या भारतिय मनाला पडलेला प्रश्न!!!

तर गेल्या बरोबर D ने "I am S's Mom" अशी ग्वाही देऊन टाकली. सर्व जण आपापल्या खुर्च्यांवर बसतानाच S चे आगमन झाले. त्या बरोबर D ने "Give your Mom a big hug" अशी प्रेमळ मागणी करताच S ने ती करकचून पूर्ण केली. नुकतेच मिसरुड फुटलेले आपले बाळ कसे जगात पाऊल टाकते आहे त्याचा अभिमान तिच्या चेहेर्‍यावर स्पष्टं दिसत होता.
त्यानंतर Business as usual सुरु झाला......

Monday, May 29, 2006

दिपा मेहतांचा Water

चित्रपट, दूर-चित्रण अशा मध्यमांशी आत्ता पर्यंत माझा दूरचाच संबंध होता. अनेक वाहिन्यांच्या नं संपणार्‍या रडकथां आणि जाहिरातींच्या मार्‍यापासुन सुटका झाली म्हणुन अमेरिकेत आल्यावर एक निश्वासही टाकला होता. पण हौशी नवर्‍याने नुकतेच एका मसिकासाठी चित्रपट आलोकन करायचे मान्य केल्यामुळे आम्ही दिपा मेहतांचा Water बघायला गेलो.

मेहतांच्या Earth आणि Fire, या आधीच्या दोन चित्रपटांप्रमाणेच Water सिनेमा गंभीर असणार, आषयघन आणि hard hitting असणार हे अपेक्षितच होतं. आणि भारतात कोणाला तरी हा सिनेमा काढ्णं म्हणजे हिंदु धर्माचा अपमान वगैरे होतो आहे असं वाटलं, म्हणुन मेहतांना श्रीलंकेत जावुन चित्रण करावं लागलं म्हणे. जग भर आपण आपल्या देशातल्या स्वातंत्र्याचा डंका पिटत असलो, आणि लोकशाही नसलेल्या देशांकडे (चीन आणि पाकिस्तान असे वाचावे) तुच्छ्तेनी पहात असलो तरी खरोखरच्या लोकशाहीपासून आपण कोसो दूर आहोत हेच या चित्रपटाच्या उदाहरणावरुन दिसुन येतं.

चित्रपट सुरु होतो तो सात-आठ वर्षे वयाच्या छुयीयाच्या नवर्‍याच्या अंत यात्रे पासुन. अजाण छुयीयाला आपले लग्नं झाले होते याची पुसट्शी आठवण असते. दु:खी, हताश वडिल जेव्हा "छुयीया, अब तुम विधवा हो गयी" असं तिला सांगतात तेव्हा ती "कब तक?" असं विचारते.

पुढील प्रसंगात तिला एका विधवा आश्रमात नेऊन सोडतात. आश्रम मधुमती नामक व्रुद्ध विधवेच्या देखरेखी खाली चालवलेला असतो. छुयीयाला मुळीच तिथे रहायचे नसते आणि एक दिवस आपली आई आपल्याला घेऊन जाईल असं तिला वाटत असलं तरी हळुह्ळु ती तिथे रूळ्ते. समाजाने टाकुन दिलेल्या त्या स्त्रियांची आयुष्ये, आपसातले हेवे-दावे आणि स्वभाव विशेषांचे अत्यंत प्रभावी चित्रण दिसुन येते. एकिकडे गावातील उच्चभ्रू, मधुमतीशी संगनमत करुन, आश्रमातल्या तरूण स्त्रियांचे शोषण करत असतांना, दुसरीकडे १९३८ च्या त्या काळामधे राजा राम मोहन रॉय, गांधीजी यांच्या सारख्या समाज सुधारकांमुळे प्रभावित झालेला नारायण शिक्षण संपवून घरी परत आलेला असतॊ.

नदीवर अंघोळ करायला गेलेल्या छुयीयाचा अवचित नारायणाशी परिचय होतो. पांढरे वस्त्र ल्यायलेली, वपन केलेली छुयीया आपली ओळख करुन देते, आणि नाव सांगुन झाल्यावर "मै विधवा हूं" असं पण सांगते.

चिमुरड्या छुयीयाचे निरागस, स्वाभिमानी अस्तित्व आश्रमातल्या इतर स्त्रियांना बळ देउन जाते. नारायणाच्या प्रोत्साहनामुळे कल्याणी पुनर्विवाहाचा विचार करु लागते. कल्याणीचा इरादा पूर्ण होतो का? छुयीयाचे भविष्य काय? हे जाणुन घेण्यासाठी सिनेमा बघणे जरुरी आहे.

छुयीयाचे काम करणारी बाल नायिका सरला, अभिनेत्री मनोरमा (मधुमती), सीमा बिश्वास, विदुला जवळ्गेकर, जॉन अब्राहिम यांनी प्रभावी अभिनय केलेला आहे. लिसा रे (कल्याणी) चा प्रयत्न चांगला असला तरी अशिक्षित स्त्रीचा रांगडे पणा ती अभिनयात उतरवु शकलेली नाही.

गंगेच्या काठावर घडणार्‍या या कथानकामधे पाण्याचा उपयोग फारच चांगल्या रितीने करून घेतला आहे. Beautiful compositions of the shots, effective camera angles make it a pleasant experience to watch it on the big screen.

चित्रपटात विनोदाचा प्रभाविपणे उपयोग करुन घेतला आहे. प्रसंगांमधे अतिशयोक्ति नाही, loud acting नाही तरिही हा सिनेमा मनात घर करून बसतो तो वास्तववादी कथेमुळे.

भारतातल्या लोकशाहीवादी आणि स्त्री वादी संघट्नांनी हा सिनेमा भारतात जरूर दखवला जावा अशी जोरदार मागणी करायला हवी. डोळेझाक केल्याने प्रश्न मिटत नाहीत. स्त्रियांच्या परिस्थितीत बरीच सुधारणा झाली असली तरी अजुन बरीच वाट्चाल बाकी आहे. सतीसारख्या प्रथा कालबाह्य झाल्या असल्या तरी, विज्ञानाचा दुरुपयोग करुन, स्त्रियांना जन्मं घेण्याचाच अधिकार नाकारण्यात येतो आहे.
ते ही तितकेच निंदनिय आहेत आणि दुर्दैवानी सुशिक्षित लोकही त्यात मागे नाहीत. चित्रपटाला विरोध करण्यापेक्षा या अनिष्टं प्रथांना विरोध करुन दाखवा बरं!!!!

Monday, May 22, 2006

विदर्भ

विदर्भाविषयी चर्चा करण्यासाठी एक नविन ब्लॉग बनवला आहे.

http://vidarbha-charcha.blogspot.com/


आला वसंत