Thursday, March 29, 2007

झगडा तुझा उमलण्याचा, फुलण्याचा

तुझ्या उमलण्याच्या मनसुब्यांबद्दल मी लिहिलं मात्रं आणि माझीच नजर लागली म्हणून की काय,अचानक पुन्हा थंडी पडली. तिकडे न्यूयॉर्कमधे प्रचंड बर्फ पडलं म्हणून. आधीच ही थंडी तुझ्या त्या कोषगर्भित अवस्थेला सोसवत नव्हती. त्यात हवामानाची ही बदफैली की आज गरम तर उद्या थंड! तुझ्याकडे पाहून जीव थोडा थोडा होई. एक-दीड आठवडा असाच गेल्यानंतर एका सकाळी तुझ्या कळ्या दिमाखाने बाहेर पडू लागल्या. असंख्या कळ्यांचा तो मोहोर मी पाहिला, पण आभाळात पाहून जीव कासावीस झाला. एक दोन कळ्या उमलल्या असतील नसतील, वरून बरसात सुरू झाली -तीही थिजवणारी. हा असा कसा रे पाऊस? नको तेव्हा येतो आणि हवा तेव्हा नेमका येत नाही? आता या गारव्यानी तुझ्या त्या नाजूक कळ्या फुलण्याआधीच गळून पडतात की काय अशी भिती मला वाटायला लागली. तू जिथल्या तिथेच गोठलास - पण तग धरलास! थोडाथोडका नाही, चांगला आठवडाभर! पाऊस गेला, वसंताच्या उन्हानी पुन्हा तुला तुझं राज्य बहाल केलं आणि तू उमललास:



रात्रीच्या वेळी तुझ्या चांदण्या अश्या चमकल्या:



तुझे इतर दोस्तं:

सुगंधी हायासिंथ:



केरिया जपानिका (जपानी गुलाब)

फ्लॉवरिंग एलमॉंड

आता उशीरा उमललास तरी तुझी अधीरता संपत नाही - जणू काही तुला आमच्या आयटीच्या प्रोजेक्टसारखी डेड लाईनच दिलेली आहे. एक आठवडा जेमतेम ते छत्रं चामर धरलंस डोक्यावर, नी लगेच तुझी पानं बाहेर यायला लागलीत. वार्‍याबरोबर पाकळ्या उधळल्यास - खच पाडलास अंगणात. पण तुझी हिरवाईसुद्धा देखणी आहे हं - मी काही तक्रार करत नाहीये - तू फुललास यातच मला सगळं काही मिळालं! तुझी मायेची सोबत अशीच आम्हाला मिळू दे....

Friday, March 23, 2007

खेळानी शरीराला व्यायाम मिळतो आणि मनाला स्फूर्ती येते (म्हणे)....

(नॉट सो)जंटलमन्स गेमचा वर्ल्डकप नावाचा पूर्व नियोजित सट्टा सद्ध्या सुरू आहे. तो पाहून किंवा खेळून जर तुम्हाला अती रक्तदाब,मानसिक दडपण,छातीत दुखणे,डिप्रेशन,पोटदुखी,उलट्या अशी लक्षणे दिसू लागलीत तर ताबडतोब डॉक्टरकडे जा. पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे व्यायाम करण्याने रोगाची तीव्रता कमी होईल - उदा.बॅड्मिंटन,टेबलटेनिस,फूटबॉल,कबड्डी,खो-खो,धावणे,चालणे,स्केटिंग करणे,पर्वतारोहण करणे ई.
साधन सामुग्रीच्या अभावी जर वरील खेळ खेळणे जमत नसेल तर घरच्या घरी बसून अष्टं चंग पे खेळावे. या खेळाची माहिती मी माझ्या ब्लॉगवर आधीच दिली आहे - http://kasakaay.blogspot.com/2007/01/blog-post_28.html

Sunday, March 18, 2007

रूमी जयंती

प्रख्यात सूफी संत रूमींची ८०० वे जयंती काल होती. त्या निमित्तानी कारबरोमधे काल एक छोटासा कार्यक्रम होता. एरवी धार्मिक कार्यक्रमापासून आम्ही जरा दूरच रहात असतो (आता मी वैदर्भिय असल्याचे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात येऊन राहिलेच असेल.) पण रूमीच्या कवितांमधील प्रेम आणि विश्वबंधुत्वाचा संदेश मात्र आम्हाला नेहेमीच आकर्षित करतो. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही प्रभावांमुळे सुफी परंपरा समृद्ध झाली आहे.
इथली स्थानिक सुफी मंडळी आता आमच्या परिचयाची झाली आहे. त्यांनीच हा छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. काव्यगायन, संगीत, आणि घुमणार्‍या दरवेशींचे झिकर असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. बहुतेक कविता पर्शियन, अरेबीक भाषेत होत्या. त्याचे भाषांतरही सांगण्यात येत होते. पण शेवटी शेवटी रात्रं जशी सूरात एकरूप झाली तशी भाषेची आडकाठीही जाणवेनाशी झाली.
एखाद्‍या कवीची आठशेवी जयंती साता सामुद्रापलिकडे साजरी व्हावी यातच या कवीची थोरवी दिसून येते. पुस्तकांचा खप आणि अनुवाद याच्या आकड्यांमाणे रूमी अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय कवी आहे. त्याशिवाय रूमी "मूळचा आमच्याच देशातला" असे छातीठोकपणे सांगणारे लोक इराण, इराक (विशेषतः कर्दिस्थान),अफगाणिस्थान,टर्की आणि ताजिकीस्थान मधे तुम्हाला भेटतील!
भारतात सूफी परंपरा अस्तित्वात असली तरी अशा प्रकारचे झिकर मी कधी अनुभवले नव्हते. मागे एका लेखामधे आम्ही अशाच एका झिकरमधे गेल्याचे मी लिहिले होते. कालच्या कार्यक्रमात नवर्‍याने काही व्हिडिओ घेतल्या आहेत. त्यावरून तुम्हाला झिकरची साधारण कल्पना येईल.

प्रमुख दरवेशींचे झिकर:



सामुहिक झिकर:


रूमीच्या कवितांचे मराठीत भाषांतर झाले आहे की नाही ते मला माहित नाही. कुणाला माहिती असल्यास जरूर प्रतिसाद द्या.
तूर्त काही इंग्रजी भाषांतर:
Cradle My Heart
Last night,
I was lying on the rooftop,
thinking of you.
I saw a special Star,
and summoned her to take you a message.

I prostrated myself to the Star
and asked her to take my prostration
to that Sun of Tabriz.
So that with his light, he can turn
my dark stones into gold.

I opened my chest and showed her my scars,
I told her to bring me news
of my bloodthirsty Lover.
As I waited,
I paced back and forth,
until the child of my heart became quiet.
The child slept, as if I were rocking his cradle.
Oh Beloved, give milk to the infant of the heart,
and don't hold us from our turning.

You have cared for hundreds,
don't let it stop with me now.
At the end, the town of unity is the place for the heart.
Why do you keep this bewildered heart
in the town of dissolution?
I have gone speechless, but to rid myself
of this dry mood,
oh Saaqhi, pass the narcissus of the wine.

From: 'Hush Don't Say Anything to God: Passionate Poems of Rumi' Translated by Sharam Shiva

Thursday, March 15, 2007

टाकुनिया घर दार नाचणार नाचणार

ही ओळ माझ्या नवर्‍याला अगदी चपखल लागू पडते. म्हणजे इतर लोक कसे (शहाण्यासारखे) विक एंड आला की आठवडा भराचा किराणा-भाज्या आण, काय बिघडले असेल ते दुरुस्तं कर, कोणाला जेवायला बोलाव, अशी उपयुक्त कामे करतात. (अशी छुटपुट कामे करण्याला इथे "रनिंग सम एरंडस" असा वाक्प्रचार आहे.). पण ह्याला मात्रं विक एंड कामे उरकण्यात दवडणे मुळीच पटत नाही.
त्यातला त्यात वर्षातले ऋतु बदलतानाचे हे थोडे दिवस- जेव्हा बाहेर ना थंडी असते ना गर्मी, स्वच्छं ऊन आणि सुखावह वारा वाहत असतो, अशा दिवसात तर त्याला चार भिंतींच्या आत मुळीच थांबायचे नसते.
मागच्या आठवड्यात त्याला एका कॉन्फरन्समधे जावे लागले. जाताना मला उपदेश करून गेला - "don't spend weekend running errands - get some good bicycline in".
आता हे आमचं सायकल प्रकरण इतकं गंभीर वळण घेईल असं मला लग्नाच्या आधी वाटलं नव्हतं. म्हणजे थोडं-फार लक्षात आलं होतं - त्याची लाडकी बाईक-फ्रायडे त्यानी चक्कं मला चालवायला दिली यावरून! पण आता मात्रं दोघांनी चालवायची सायकल (टँडम) घ्यायची त्याला घाई झाली आहे.

म्हणजे टँडम घ्यायची हे त्यानी एंगेजमेंट झाल्या झाल्या बोलून दाखवलेच होते. लग्नानंतर या ना त्या कारणानी लांबणीवर पडत होते. माझी मुख्य तक्रार - "सायकल चालवायला माझी हरकत नाही, पण मला इथल्या सायकलची सीट विचित्रंच वाटते. त्यामुळे सायकल चालवायला आवडत नाही." गेल्या महिन्यात आम्ही सायकलच्या दुकानात जाऊन अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सीट लावून पाहिल्या. त्यातली जी सगळ्यात कंफर्टेबल वाटली ती बसवून घेतली. नविन सीट आल्यापासून सारखं "जरा दूर पल्ल्यावर जाऊन पहा" असा आग्रह सुरू झाला. तेव्हढ्यात जरा अवेळीच थंडी पडली म्हणून मला निमित्तं मिळत गेलं. पण मागच्या आठवड्यात मात्रं हवा छान पडली आणि मला काही कारण उरलं नाही. तो पण कॉन्फरंसमधे असल्यामुळे शनिवारी मी एकटीनीच सायकल घेऊन भटकायचं ठरवलं.
आमच्या घरापासून जवळच "अमेरिकन टॉबॅको ट्रेल" नावाचा सायकल ट्रेल आहे. नॉर्थ कॅरोलिनाच्या ह्या भागात पूर्वी तंबाखू उद्योग फार महत्वाचा होता. (विंस्टन नावाची सिगरेट आठवते का? ते विंस्टन गाव इथून जवळच आहे). आता तंबाखूच्या दुष्परिणामांच्या माहितीमुळे हा व्यवसाय लयाला गेला आहे. तंबाखूची ने-आण करण्यासाठी एक छोटी आगगाडी पूर्वी इथून जायची. ती आगगाडी बंद पडल्यावर त्याजागी हा दुचाकीचा रस्ता केलेला आहे. म्हणून या ट्रेलला अमेरिकन टोबॅको ट्रेल असे नाव पडले.
सायकल चालवायचीच असेल तर अशा बाईक ट्रेलवर जाणे मला आवडते. कारण एक तर ट्रेलच्या दुतर्फा सहसा छान झाडी असते. शिवाय भरधाव जाण्यार्‍या मोटारी आणि त्यांचा धूर याचा त्रास होत नाही.
ट्रेलवर इतर सायकल स्वार, पायी चालणारे, स्केटिंग करणारे, आणि हे सगळं करत असताना आपल्या कुत्र्यांना किंवा लहान मुलांबाळांना बरोबर घेऊन जाणारे असे अनेक लोक भेटतात. तर गेल्या आठवड्यात मी एकटीच असल्याने अगदी रमत गमत माझ्या गतीने टोबॅको ट्रेल पूर्ण केला - जाऊन येऊन १० मैल. झुळ्झुळ्णारा शितल वारा, आजूबाजूची झाडी, पक्ष्यांचा किलबिलाट ह्या सगळ्याचा मनमुराद आनंद लुटता आला. (नविन सीटचीही करामत असेल). अरे हो एक गोष्टं सांगायचीच राहिली - एका ठिकाणी एक मोठा रस्ता क्रॉस करावा लागतो. परतीच्या वाटेवर त्या सिग्नलला थांबले होते. तिथेच एक काळे (आफ्रिकन) आजोबा उभे होते. त्यांना हॅलो म्हटले. ते माझ्याशी स्पॅनिश बोलायला लागले (हे नेहेमीचेच. माझ्या चेहेर्‍यावर भारतियत्वं फारसे दिसत नसावे). "नो इस्पॅनियोल" असं मी म्हंटल्यावर काळ्या आजोबांना फार आश्चर्य वाटले. मी त्यांना म्हंटले "I am from India". ते म्हटल्याबरोबर त्यांनी चक्कं हात जोडून "नमस्कार" म्हणून माझीच विकेट घेतली! काळे आजोबा शिक्षक आहेत म्हणे. त्यांना नीट दिसत नव्हते त्यामुळे ते रस्ता चुकले होते. त्यांना दिशा दाखवून मी पुढे निघाले.
रविवारी पाऊस धावून आला मदतीला आणि मी माझे एरंड्स रन करून घेतले.
या विकेंडला मात्रं नवरा बरोबर होता आणि हवा छान होती. त्यामुळे कुठलेही कारण चालणार नव्हते. शनिवारी डरहॅम डाऊनटाऊन मधे काही कामे होती (म्हणजे एरंडस नाही - काही आवडीची कामे). त्यामुळे पुन्हा टोबॅको ट्रेलवर गेलो. यावेळी नवरा बरोबर असल्याने "keep peddling sweetie" "Maintain a good cadence" अशा "प्रेमळ" सूचना देत होता. त्याचा परिणाम म्हणजे आम्ही लवकरच डाऊनटाऊनमधे दाखल झालो.
आवडीची कामे करत असताना एका व्यक्तीची वाट पहात होतो तेव्हा माझे लक्षं एका गॅलरीकडे गेले. त्या गॅलरीमधे Spirit of Freedon नावाचे एक प्रदर्शन आले आहे. नेल्सन मंडेला यांच्या तुरुंगवासातील चित्रांचे आणि लेखांचे. सहज म्हणून तिथे डोकावले. आतील चित्रे आणि लेख हे प्रत्यक्ष मंडेलांचे होते. रॉबेन आयलंडच्या तुरुंगात मंडेलांनी १८ वर्षे काढली. त्यावेळी त्यांना सहा महिन्यात एक पत्रं मिळू शकणार होते आणि वर्षातून एकदा कोणीतरी अर्धा तास भेटू शकणार होते. अशा परिस्थितीही हार नं मानता त्यांनी ध्येयावर आपली नजर कायम ठेवली. इतर कैद्यांना आपल्या नेतृत्वाने प्रभावित केले, बरेच लिखाण केले आणि साधा कागद व कोळसा या माध्यमातून तुरुंगाची चित्रं काढलीत. चित्राच्या खाली प्रत्यक्ष फोटो दिला असल्यानी चित्रे किती हुबेहूब आहेत त्याची प्रचिती येते. अठरा वर्षाचा बंदिवास - तुरुंगातली एक खिडकी त्या खिडकीतून दिसणारे दृष्य- आकाशाचा एक छोटासा तुकडा, किंवा एखादा ढग एव्ह्ढाच काय तो बाह्य जगाशी संपर्क!

प्रदर्शनात मंडेलांची एक व्हिडिओ आहे. त्यात ते ह्या चित्रांबद्दल माहिती सांगतात. एका क्रांतीकारी नेत्याचे ते भाषण नाही. एका कलाकाराचे, एका कैद्याचे मनाला भिडणारे ते मनोगत आहे. मंडेला बोलतात रंगांबद्दल - किंबहुना रंगहिनतेबद्दल. रंग बघण्यासाठी त्यांनी बागकाम मागून घेतले. तिथे एक केळ्याचे झाड लावले. त्याला जेव्हा केळी लागली तेव्हा अनेक वर्षांनी पिवळा रंग बघायला मिळाला तो अनुभव अंगावर शहारे आणणारा आहे. "टाकुनिया घरदार" नाचणार्‍या अशा माणसांमुळेच जग बदलू शकते नाही का?
असो. कुठे होते मी? डरहॅम डाऊनटाऊन मधे.
आवडीची कामे पूर्ण झाल्यावर एका दुसर्‍या सायकलच्या दुकानात गेलो. तिथे आणखी काही सीट पाहिल्या. त्यातली एक आताच्या सीटपेक्षाही जास्त आरामदायी वाटली म्हणून ऑर्डर केली.
रविवारी सकाळी जरा उशीराच जाग आली. नवरा उठायच्या आधी सतारीची प्रॅक्टिस आटपून घेतली. माझा हंसध्वनी चांगला तयार झाला आहे आता.
नवरा उठला तोच मुळी आज कुठे कुठे सायकलचा फेरा मारायचा त्याची यादी करत. भराभर ब्रंचची तयारी करू लागला. हवा छान पडली असल्याने पॅटिओमधे बसून पक्षांची किलबिल ऐकत जेवलो.
नकाशात पाहून साधारण कुठे कुठे जाऊ शकतो ते ठरवले. जरा कमी रहदारीचे रस्ते आणि आसपास कुठे बाईक ट्रेल आहेत का ते बघून घेतले. चॅपल हिल मधील बोटॅनिकल गार्डन, कारबरोचे विव्हरस्ट्रीट मार्केट आणि रस्त्यात लागणारे आमचे जिम असा साधारण आराखडा ठरवला. मी या रस्त्यांवरून आत्तापर्यंत सायकलने कधी गेलेले नाही. सुरुवातीला ७५१ नंबरच्या रस्त्यावरून जायचे होते. (रस्त्यांना नाव नं देता नुसता नंबर देण्याचा हा रूक्षपणा मला मुळीच आवडत नाही. रस्ता म्हणजे काय कैदी आहे की काय तुमचा? ७५१ म्हणे!). ह्या रस्त्यावरून मी जवळपास रोजच जाते. पण आज सायकलवरून जाताना मात्रं कधीही लक्षात नं आलेला उंच सखलपणा लक्षात आला. (हा रस्ता अगदी सपाट आहे अशी आत्तापर्यंत मला अगदी खात्री होती.) ७५१ वर साधारण मैल दोन मैल गेल्यावर अखेर रहदारी सोडून एका आडरस्त्यावर वळलो. आता खरी मजा येऊ लागली. नागमोडी रस्ता, बहुतांश निर्मनुष्य, दुतर्फा झाडी, मधेच लागणारे ओहोळ किंवा तलाव. मधूनच येणारी गार वार्‍याची अलवार झुळूक मोरपिसासारखी स्पर्शून जात होती. काही वेळाने घोड्यांचे रॅंचेस लागले. बहुतेक मालकांनी घोड्यांना बाहेर सोडले होते. ते दिमाखदार ऐटबाज प्राणीबघून मला खरं तर तिथे थांबायची इच्छा झाली, पण नवर्‍याला हाक मारलेली ऐकू आली नाही. त्याचं घोड्याबिड्यांकडे काही लक्ष नसावं. तो पुढे गेला तसा एका रॅंचमधले घोडे चक्कं त्याच्याशी स्पर्धा करत धावू लागले. ते दृष्य पाहून मला खूपच मजा आली. नवरा स्वतः कुठल्या तंद्रीत होता की घोड्यांच्या वास नकोसा झाला होता म्हणून इकडे तिकडे नं बघता भरधाव पुढे निघाला की काय माहित नाही, पण घोडे त्याच्या बरोबर धावत होते हे त्याला मी सांगेपर्यंत कळले नाही!
घोड्यांना मागे टाकल्यावर थोड्याच वेळात ५४ रस्त्याला लागलो. ५४ च्या बाजूनी एक बाईक ट्रेल जातो. त्याच्या वरून जाताना एका ठिकाणी सायकलस्वारांना ५४ क्रॉस करण्यासाठी चक्कं एक बोगदा असल्याचे लक्षात आले.
मग बाईक ट्रेल संपला तसे आम्ही एका छोट्या रस्त्यावर वळलो. या रस्त्यावर गोल्फ कोर्स आहे. त्याच्या बाजूनी गेल्यावर
बोटॅनिकल गार्डन आले. ही बाग आमच्या चांगली ओळखीची आहे. सद्ध्या फक्तं डॅफोडिल्ससारखे बल्ब्ज तेवढे फुलले आहेत. बाकीची झाडे नुकती जागी होतायेत. बागेचा एक फेरफटका मारून पुन्हा सायकलवर स्वार झालो. आता विव्हरस्ट्रीटवर जायला फारसा वेळ नाही म्हणून आम्ही मेडोमॉन्ट वेलनेस सेंटर नावाच्या आमच्या व्यायामशाळेत (जिम) मधे जायचे ठरवले. गोल्फ कोर्स पार करून मगाशी सांगितलेल्या त्या बोगद्यातून ५४ क्रॉस केला. बोगद्याच्या पलिकडून सुरू होणारा ट्रेल अगदी मेडोमॉन्ट वेलनेस सेंटरपर्यंत जातो. तिथे सायकली ठेवायला कपाटं आहेत. ती आज पहिल्यांदाच वापरली.
तास दीड तास व्यायाम केला. एव्हाना सहा वाजत आले होते. आता लवकर घरी जाऊ म्हणजे आपल्या घरच्या बागेतही जरा वेळ घालवता येईल असा विचार करून अंधार पडायच्या आत घरी आलो. सासू सासर्‍यांनाही गप्पा मारायला बोलवून घेतले. तिन्हीसांजा झाल्या तसा नवरा स्वयंपाक करायला आत गेला. जेवण झाल्या बरोब्बर सिनेमाला चलतेस का? असं विचारू लागला. मला आताशा त्याच्या या उत्साहाचे आश्चर्य वाटेनासे झाले आहे. पण मी खरोखरच थकले होते. त्यामुळे बाहेर सिनेमा बघायला नं जाता कुठून तरी मिळालेली एक डॉक्युमेंटरी बघत बसलो.
तर असा गेला आमचा विकेंड. आता वीक सुरू झाला आहे. ऑफिसचे काम आणि इतर एरंडस करता करता कसा भूर्रकन उडून जाईल, की शुक्रवारी संध्याकाळी आम्ही पुन्हा तयार.... का आमच्या बरोबर?


६ जून २०१०
मूळ लेख मी तीन वर्षाअाधी लिहीला होता.
अामच्या टॅंडमला अाता एक ट्रेलर लागला अाहे.




Saturday, March 03, 2007

छुपे तुझे हे मनसुबे फुलण्याचे

आमच्या अंगणातल्या चेरीच्या झाडा, तुझ्या निष्पर्ण छायेखाली बसुन मी तुझ्याशी हे हितगुज करते आहे. वसंताची चाहुल देणार्‍या आल्हाददायी वार्‍याच्या झुळुकीवर तुझ्या वाळलेल्या फांद्या डोलताहेत. त्या फांद्यांवरून खाली नजर घसरली की खालच्या गुलाबांची कोवळी पालवी उन्हात लकाकताना तुला दिसत असणार. त्याच्या पलिकडे पिवळी धम्मं फुललेली डॅफोडिल्सही ही तुला दिसत असणार. गेल्या वर्षाअखेरही जेव्हा विशेष थंडी पडली नाही, तेव्हा फोरसिथियाचे बिंग तर अवेळीच फुटले होते. तू पण झाला होतास का रे तेव्हा ऋतुबावरा? मनातल्या मनात तरी?
आता तुला या सुतार, कार्डिनल पक्षांची घरटी बांधायची लगबगही दिसत असणार. तुझ्या अंगावरच्या वाळक्या काटक्या बघून कोण्णीसुद्धा तुझ्यावर घरटं बांधायचा विचार करणार नाही.
गेल्या वर्षी लावलेली लेडी बॅंक्स गुलाबाची ती इवलीशी वेलही भराभर आपला विस्तार वाढवते आहे. ब्लू बेरीचे रोपही कळ्यांनी गजबजून गेले आहे. तू मात्रं तसाच वाळका, मिटलेला. फुलणं जणू तुझ्या गावीच नाही....
पण मला माहित आहेत तुझे छुपे मनसुबे. असंच जगाला गाफिल ठेवायच, आणि अचानक एक दिवस असंख्य कळ्यांचा मोहोर घेऊन अवतरायचं अंगणात. बघता बघता शेकडो फुलं काही तासातच फुलवायची किमया दाखवायची. मग तू आमच्या बागेची शान बनणार. येणारे जाणारे तुझ्याकडे आ-वासून बघणार. आमची बाग अख्ख्या वेटाळात म्हणजे नेबरहुडमधे सगळ्यात देखणी बाग होणार काही दिवस.
मात्रं हे वैभव जसं अचानक तू चढवणार तसंच अचानक उतरवणारही. काय रे? बोचतात का तुला स्वतःचीच फुलं? इतकी नाजुक, शुभ्रं फुलं - पण जेमतेम दोन आठवड्यातच त्यांचा सडा पाडणार खाली. मग तू पांघरणार हिरव्या पानांचा शालू. तो मात्रं रहाणार अंगावर कडाक्याची थंडीपडेस्तोवर.
यंदा तुझ्या फांद्या अगदी जमिनीला टेकतील की काय इतक्या झुकल्या आहेत. तू फुललास की छत्रीसारख्या तुझ्या आकारामूळे जणु आकाशातल्या तारकाच जमिनीवर उतरल्याचा भास होणार आहे... - आत्ता तू कितीही नाटक केलंस तरी तो दिवस फार दूर नाही. .....कदाचित उद्या, परवा किंवा पुढच्या आठवड्यात....