Sunday, January 28, 2007

अष्टं चंग पे खेळायचं का?

युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना (UNC) च्या इंटरनॅशनल स्टुडंट प्रोग्रॅममधे होस्ट फॅमेली म्हणून दरवर्षी आमचा सहभाग असतो. परदेशातून इथे शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांना अगदी एकटं वाटू नये, इथली माहिती सांगणारं कोणीतरी असावं हा या प्रोग्रॅमचा उद्देश आहे. यंदा एक चीनी आणि एक नेपाळी विद्यार्थी आमचे गेस्ट आहेत. आम्ही होस्ट आहोत म्हणजे ते आमच्याकडे रहातात असे नाही. पण आम्ही त्यांना इथल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना घेऊन जातो किंवा काही अडलं नडलं तर शक्य तेव्हढी मदत करतो. त्यांच्यामुळे आम्हाला घर बसल्या निरनिराळ्या देशाची माहिती होते.
या प्रोग्रॅमचे डायरेक्टर "विविध देशातील बैठे खेळ" या विषयावर एक कार्यक्रम आयोजित करत आहेत, आणि भारतातील बैठ्या खेळाचे आयोजन करायची जबाबदारी अर्थातच आमच्यावर आली आहे. कुठला खेळ निवडावा ते काही आधी सुचत नव्ह्तं. बैठे खेळ म्हंटल्यावर आधी डोक्यात आलं ते बुद्धीबळ. पण ते काय सगळ्यांनाच माहिती आहे. बरंच डोकं खाजवल्यावर सुचलं - अष्टं चंग पे. लहानपणी भावंडांबरोबर किती वेळा तरी खेळले असले तरी खडूनी फरशीवर काढलेला डाव आणि चिंचोक्यांचं दान या पलिकडे काहीही आठवेना. शेवटी बाबांना, भावंडांना, विचारलं. आईला आठवत होतं. बाबांनी चांगलं ड्राईंगच काढून पाठवलं आहे.
ते वाचून एक मुख्य गोष्टं लक्षात आली की हा खेळ अगदी घरात असणारं साहित्य वापरून खेळता येतो. चिंचोक्यांचे फासे, आगपेटीच्या काड्या, खडूचे तुकडे, दाणे, छोटे दगड (किंवा असंच काही तरी मिळेल ते )यांची प्यादी! टिव्ही नसलेल्या काळात घरबसल्या मुलांचे मनोरंजन.

खेळाचे नियम:
*खेळाडूंची संख्या - कमीत-कमी २ जास्तीत जास्त ४.
*वरील चित्रात दाखवलेली आकृती फरशीवर किंवा एका मोठ्या कागदावर/कार्डबोर्डवर काढुन घ्या.
*खेळाडू त्या आकृतीच्या चारी बाजूला बसतात.
*तुमच्या बाजूचा फुली काढलेला चौकोन म्हणजे तुमचे घर.
*सुरवातीला तुमची ४ प्यादी त्या घरात ठेवायची.
*प्यादी चित्रात दाखवलेल्या दिशेनी पुढे जातात.
*मधोमध असलेले घर लवकरात लवकर गाठणे हे खेळाचे उद्दिष्टं
*दोन चिंचोके घ्या. त्यांना मधून तोडून प्रत्येकी दोन, असे चार तुकडे करा (पाण्यात भिजवले की लवकर तुटतात.)
*चिंचोक्यांचा बाहेरचा भाग काळसर आणि आतला भाग पांढरा असतो.
*ज्याची खेळी असेल त्या खेळाडूने चिंचोके फेकायचे. जितके पांढरे भाग वर असतील तितकी घरं प्यादं पुढे सरकवायचं.
*चार पांढरे आले तर मात्रं आठ घरं पुढे सरकायचं आणि एक जास्तीची खेळी खेळायची.
*चार काळे आले तर चार घरं पुढे सरकायचं आणि एक जास्तीची खेळी खेळायची.
*प्याद्याची चाल ज्या घरात पडली तिथे दुस‍र्‍या खेळाडूचं प्यादं असेल तर ते मरेल आणि घरी परत जाईल.
*दुसर्‍याचं प्यादं मारलं तर एक जास्तीची खेळी खेळायची.
*दोन प्यादी एकदम पुढे सरकवता येतात. त्यासाठी अर्धी घरं पुढे जायचं म्हणजे चार आले तर दोन प्यादी दोन घरं पुढे सरकवायची.
*घरातून जोडीने पुढे निघालेल्या प्याद्यांची जोडी तोडता येत नाही.
*जोडीने जोडी मारायची.
*****आता चिंचोके नसतील तर काय करायचं? म्हणजे, तेव्हा आम्ही काय करायचो ते नवर्‍याला सांगीतलं तर त्याला चक्करच येईल. या प्रकाराला आम्ही ओली सुकी असं म्हणायचो. चार कसलेही सपाट तुकडे घ्यायचे - तुटलेली फरशी, कौलं, बशांचे तुकडे असं काही तरी. आणि प्रत्येक तुकड्याच्या एका बाजूवर थुंकून ती बाजू ओली करायची. ओली बाजू काळी, कोरडी बाजू पांढरी.

खेळायचं का मग?

2 comments:

Anonymous said...

Your game was a hit! Thanks for sharing it.

Anonymous said...

my grand-daugher is very fond of this game. we play it with Songtya and kavdya.