Wednesday, January 24, 2007

मराठी ब्लॉग्ज: एक निरीक्षण

गेल्या काही महिन्यांपासुन मी नियमितपणे मराठी ब्लॉग वाचते आहे. ते वाचुन माझी मराठीची भूक भागते आहे. पण तरी कशाची तरी कमतरता असल्याचं सारखं जाणवत होतं. नक्की काय ते कळत नव्हतं. काही दिवसांपासुन हिंदी ब्लॉग वाचायला सुरुवात केली आणि मराठी ब्लॉग्जमधे कशाचा अभाव आहे ते लक्षात आलं.
माझ्या मते मराठी ब्लॉग्जवर:
१. विरोधी विचारधारा अभावाने आढळतात.
२. विषयांमधे फारसे वैविध्य आढळत नाही.
३. बहुतेक लिखाण आत्मसंतुष्ट/आत्मकेंद्रित वाटतं. "बरा म्हणुनी मी हा इथे दिवा पारवा पार्‍याचा.."?
इंटरनेट या माध्यमाचा वापर करणारे मराठी लोक सुखवस्तु आहेत हे कबुल, पण समाजात रोज किती तरी बर्‍या वाईट घटना घडतात, त्यावर टिप्पणी दिसत नाही. जगाच्या रंगभूमीवर घडणार्‍या घटनांचे प्रतिबिंब मराठी लेखनात उतरत नाही.
माझ्या ह्या मताशी तुम्ही सहमत आहात काय?
सहमत असाल तर त्याच्या मागचे कारण काय असावे?

टीपा:
माझा स्वत:चा ब्लॉग याला अपवाद आहे असे मला मुळीच म्हणायचे नाही
काही मराठी ब्लॉग्जमुळे माझे अनुभव विश्वं नक्कीच जास्तं सम्रुद्ध झाले आहे.

तुलना करण्यासाठी इथे जाऊन पहा:
http://www.filmyblogs.com/hindi.jsp

14 comments:

Yogesh said...

तुमचे निरीक्षण अगदी बरोबर आहे. बहुतेक मराठी ब्लॉग्ज ठराविक विषय उदा.लहानपणीच्या आठवणी (गेले ते दिन गेले ) यातच अडकलेले आहेत.
अर्थात यात काही वाईट आहे असे नाही... पण तरीही खेद वाटतो.

Anonymous said...

Then what about manogat.com?

A woman from India said...

मनोगत मधील लेखांमधे ही याच तृटी आढळल्या.
खदखदणारा असंतोष फारसा आढळत नाही. आजुबाजुला घडणार्‍या घटना उदा. इराक युद्ध, अमेरिका-भारत यांचे संरक्षण करार, आफ्रिकेतील नरसंहार या सारख्या महत्वाच्या विषयांवर मनमोकळेपणाने विचार मांडलेले दिसत नाहीत.
परदेशस्थ भारतियांचे अनुभवही "इतक्या दूर येऊनही आम्ही महाराष्टं मंडळात जाऊन गणेशोत्सव कसा साजरा केला" या पलिकडे जात नाहीत. स्थानिक संस्कृतीचे दर्शन विशेष घडत नाही.
प्रत्यक्ष भारतातील परिस्थितीत अभूतपूर्व वेगाने बदल घडत आहेत, त्याविषयी ही टिपणी आढळत नाही.
अर्थात योगेशने म्हटल्याप्रमाणे जे लिहीले जाते ते वाईट आहे असे नाही - पण ते सर्वसमावेषक नाही याचा खेद नक्कीच वाटतो.

uday said...

मि HelloMarathi चा नियमित वाचक आहे .तेथे they r trying to touch every subject.

Tulip said...

खरं आहे. बरेचसे ब्लॉग्ज हे 'आत्ममग्न' असेच आहेत. विचार व्यक्त करणारे संख्येने खूप असले तरी 'ताज्या घडामोडी' त्यात फारच क्वचित असतात हेही खरे. पण एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहीजे की मराठी ब्लॉग्ज लिहिणारे बहुतेक सगळेच हे 'नवोदित' असे आहेत. शाळेत निबंध आणि घरी वर्षातले पहिले दोन महिने नेमाने(!) लिहिली जाणारी डायरी सोडली तर प्रथमच आपले विचार मांडण्याचे धाडस तेही सर्वांसमोर असे ते करीत आहेत. तेव्हा त्यांचे नवजात लेखन हे आधी 'आत्ममग्न' असेच जास्त रहाणार.
मराठी ब्लॉग विश्व तुलनेने नवे आणि मर्यादित आहे. पण टक्केवारीच्या दृष्टीने पाहिले तर इंग्रजी ब्लॉगर्स मधेही 'आत्ममग्न' लिहिणार्‍यांची संख्या जास्त असणार. कारण व्यक्त करताना आधी स्वत:चा आणि मग समाजाचा विचार मनात येणे ही क्रिया काहीशी नैसर्गिकरित्याच घडत असते.

आत्ता मला रिलके ने नवोदित लेखकांना प्रोत्साहीत करताना, त्यांच्यात सर्जनशिलता वाढावी म्हणून मार्गदर्शन करताना जे सांगीतले होते ते इथे लिहावेसे वाटते. तो म्हणतो...
" रोजचं जगण तुला काय देतं ते लिही, तुझी दु:खं, तुझ्या इच्छा, याबद्दल लिही. तुझ्या मनाला स्पर्शून जाणारे विचार आणि तुझा मांगल्यावरचा भरवसा- या सगळ्याचं वर्णन अगदी मनापासून कर, शांत, नम्र, प्रामाणिकपणाने. स्वत:ला व्यक्त करताना तुझ्या अवती भोवतीच्या गोष्टी, तुझ्या स्वप्नातल्या प्रतिमा, आठवणार्‍या गोष्टी यांचा उल्लेख कर. हळूहळू सामाजिक भान तुला आपोआप येत जाईल आणि ते तसे आले की तुझ्या रोजच्या जगण्याला त्याच्याशी सहजतेन ताडून बघताना आंतरीक ओलाव्याने त्याबद्दल लिहिण्यास कचरु नकोस. "

Parag said...

Hi, Your observations about these marathi blogs might be true.. Pan mazya mate blog mhanje apli "Anudini".. Agadi roj lihili geli nahi tari sarva sadharan pane aplya ayushyatlya ghatananbaddal... Mag blog amtmakendri asale tar boghadala kuthe? Ani Khed vataycha tar kahich karan nahi...Karan kityek marath bloggers Englilsh madhun hech vichar mandat astat...

A woman from India said...

आपल्या ब्लॉगवर काय लिहायचे हे अर्थातच ज्याने त्याने ठरवायचे. मी स्वतः अनुदिनी ब्लॉगवर कधीच टाकणार नाही. अनुदिनी ही स्वतःशी संवाद साधण्याची हक्काची जागा आहे. इतरांना तिथे शिरकाव नाही. शिवाय, मला आज ऑफिसमधे जास्तं काम होतं का कमी हे वाचायची कुणाला गरज आहे? इतरांच्या दॄष्टीने त्याचे मूल्य काय?
ट्युलिपच्या म्हणण्याप्रमाणे मराठी ब्लॉग प्राथमिक अवस्थेत आहेत आणि लिहिणार्‍यांचं रोजचं जगणं आपल्याला वाचायला मिळतं. त्या रोजच्या जगण्यामधे "मी आणि माझं" याच्या पलिकडे विचार केलेला दिसत नाही याचा खेद आहे.
उदय, हॅलो मराठी हा एक चांगला प्रयत्नं आहे. पण तो मुख्यतः वर्तमानपत्रातल्या बातम्यांचा साठा आहे हे विसरून चालणार नाही.
फार दूर जाऊ नका, अलीबागमधील ५०००० शेतकरी लवकरच विस्थापित होणार आहेत ही बातमी पहिल्यांदा इंग्रजीत वाचायला मिळाली.
http://inhome.rediff.com/money/2007/jan/24epw.htm
मराठी ब्लॉगवाचून महाराष्ट्रात सगळं काही आलबेल असल्याचा भास निर्माण होतो - ही बाब खेदजनकच आहे.

Abhijit Bathe said...

संगीता -

एका मैत्रिणीने तावातावाने तुझा ब्लॉग वाचायला सांगितला आणि म्हटलं बघु तरी काय 'राडा' झालाय?

सर्वप्रथम तुझं अभिनंदन.
'आवाज उठवण्याचं' डेरिंग दाखवल्याबद्दल.
त्याबद्दल तुला जाहीर आणि (मराठी स्टाईल मध्ये) कुजबुजत भरपुर शिव्या मिळतील - बट आय ऍम शुअर यू विल डु फाईन.
बाकी याचा अर्थ असा नाही कि मी तुझ्या मतांशी पूर्ण सहमत आहे.
माझ्या मते -
१) काही ब्लॉग्ज आहेत जे वाचनीय असतात. पर्सेन्टेज मध्ये म्हटलंस तर - ५ टक्के पोस्ट्स वाचनीय असतात. (त्यांच्या विषयांबद्दल नंतर). हे ही नसे थोडके.
२) खरं तर नेटवर मराठी वाचायला फारसं नसतं. ऍटलीस्ट दुधाची भूक ताकावर भागते.
३) लोक स्वत:ला एक्सप्रेस करताएत. वर्ष दोन वर्षांपुर्वी पर्यन्त असं काही माध्यम नव्हतं. फक्त एस्टॅब्लिश्ड लोकांना एस्टॅब्लिश्ड विषय लिहायचं लायसन्स असल्यासारखं....
'सांस्कृतीक बदल' हळुहळु होतात - हॅव पेशन्स! काही लोक चांगले लिहितायेत. अजुन वर्षभराने कुणी मराठी ब्लॉग्ज वाचायला लागला तर त्याला बरेच दिवस पुरेल एवढं दर्जेदार लेखन नक्कीच मिळेल.
ट्युलीप म्हणते तसं बरेच लोक नवखे आहेत - मी तरी आहे. मी अजुन 'लिहायला' शिकतोय.
अजुन थोड्या दिवसांत नक्कीच एस्टॅब्लिश्ड लोकही लिहायला लागतील. (मग मायबोली सारखी इथे 'सांस्कृतिक पोलीस भटगॅंग' सुरु झाली तर खेद होईल तरीही...)
४) विरोधी विचारधारा अभावाने आढळतात - त्या आढळायला ब्लॉग म्हणजे वृत्तपत्र थोडीच आहे?
५) विषयांमध्ये वैविध्य आढळत नाही - ही बोंब मराठीत शतकानुशतके आहे. त्याबद्दल लगेच काही होईल असं मला वाटत नाही. मी हिंदी/इंग्रजी ब्लॉग्ज फारसे वाचत नाही - त्यामुळे तिकडे काय चाललंय माहीत नाही. माझं मत असं कि - इंग्रजी, रशियन अथवा इतर युरोपीयन भाषाच काय - बंगाली, कन्नड, हिंदी, या भाषांच्या तुलनेतही मराठी साहित्य 'मागासलेलं' आहे. पण सुधारतंय - मेजर सुधारतंय.
मला वाटतं कि ब्लॉग संस्कृतीत तेच रिफ्लेक्ट होतंय. सुधारतील हळुहळू नक्कीच सुधारतील.
६) बहुतेक साहित्य 'आत्मकेंद्रित' असतं - ब्लॉग्जचं म्हणशील तर - इतरांचं असतं कि नाही माहित नाही, माझं तरी असतं. वर त्याला 'साहित्य' वगैरे म्हणणं म्हणजे अतीच!
७) समाजात बऱ्यावाईट गोष्टी - सगळ्यांना सगळ्याच गोष्टी जिव्हाळ्याच्या असतात असं नाही. प्रत्येकाचे प्रेफरेन्सेस असतात - कुठल्या गोष्टीवर 'आवाज' उठवायचा यावर. लोक लिहायला लागले कि ते ही हळुहळु दिसायला लागेल. माझ्या मते - सध्यातरी - मराठी ब्लॉग्ज वाचणारे आणि (बरेचसे) लिहिणारेही भारताबाहेर आहेत कारण भारतातल्या लोकांना मराठी वाचायला भरपुर मिळतं - दुध आहे तर ताक कशाला असं लॉजिक असावं बहुतेक. त्यामुळे कदाचित भारतातल्या सामाजिक प्रश्नांवर फारसं लिहिलं जात नसावं.
एनीवे - स्वत:च्या ब्लॉगवर काय लिहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. कुणी काही लिहीत नाही म्हणुन वैतागत असशील तर तू सुरुवात कर. लोक वाचायला लागतील, विचार करायला लागतील, रिप्लाय लिहायला लागतील आणि कुणास ठाऊक स्वत: लिहायला लागतील.....
अर्थात - तुला लिहावसं वाटलं तरच. सामाजिक बांधिलकी वगैरे मुळात मीच मानत नाही, तर तुला काय सांगणार?
८) जगाच्या रंगभूमीबद्दल - युजुअली जगात काय चाललंय याने मराठी माणसाला फारसा फरक पडत नाही. आजुबाजुचा कुणी मराठी 'पुढे' जात नाही याकडे लक्ष ठेवणं महत्वाचं! काय?
हे ही शतकानुशतके चालत आलय आणि झपाट्याने बदलतंय.
बदलेल.

या सगळ्याचं कारण विचारलंस -
या प्रश्नाशी (मी तरी) कित्येक वर्ष झगडतोय.
पण मराठी माणसाचा अनुभवाचा अभाव, वेगळ्या अनुभवाबद्दल लिहिण्याचा धाडसाचा अभाव, लिहिलेलं छापण्याबद्दल एस्टॅब्लिश्ड लोकांनी केलेला संभाव्य विरोध आणि इन जनरल मराठी माणसाचं मराठी साहित्याबद्दलचं (पु.ल., व.पु., जी.ए., दळवी सोडुन) औदासीन्य हे सगळेच मुद्दे वेगवेगळ्या प्रपोर्शन मध्ये जबाबदार आहेत. माझा व.पुं. बद्दल अथवा काही प्रमाणात पु. लं. बद्दल आकस आसण्याचं कारण असं कि त्यांनी मराठी माणसाला 'हलकफुलकं' चा प्रमाणाबाहेर डोस पाजला. अर्थात त्यांच्या इतर प्रशंसनीय लेखनाबद्दल अनभिद्न्यता हा मराठी वाचकाचा नतद्रष्टेपणा....
पण अनंत सामंत, विश्वास पाटील आणि इतर अनेक लोक - एका दशकात मराठीच्या या खंद्यांच्या निधनाने झालेली पोकळी - भन्नाट साहित्याने भरुन काढताएत.
वैयक्तिकरित्या त्यांच्या पैकी एकही कदाचित मराठीतल्या या आणि इतर दिग्गजांची उंची गाठू शकणार नाही कदाचित, पण मला तरी हल्लीची काही पुस्तकं वाचताना जबरा धमाल येतिए.

कुठेतरी वाचल्यासारखं -

खिन्न आंधळा अंधार
आता ओसरेल पार
प्रकाशाचे महादान
कणाकणात स्फुरेल

आता उजाडेल.....

अर्थात एवढं सगळं मराठी ब्लॉग्ज कडुन अपेक्षणं म्हणजे जरा अतीच...
पण चल - प्रयत्न करु.

A woman from India said...

अभिजित,
माझ्या मूळ नोंदीपेक्षा तुझी प्रतिक्रिया भन्नाट आहे. मान गये बॉस!
मुद्दा नंबर ४ चा रोख मात्रं कळला नाही. त्यात नंबर ८ सारखी खोच आहे की खरंच तुला तसं म्हणायचं आहे?
विरोधी विचार ही वृत्तपत्रांचीच मक्तेदारी का असावी? एखादी गोष्टं खटकत असेल तर त्या विषयी का लिहू नये?

Abhijit Bathe said...

गोष्ट खटकत असेल तेव्हाच कशाला - कधीही काहीही खटकलं, बोचलं, भिडलं तरी त्यावर लिहावं.
लिहावंसं वाटेल तेव्हा लिहावं.
मर्यादांचं भान न पाळता लिहावं.
आपण मूळत: बऱ्यापैकी स्टेबल असतो - त्यामुळं लेखन एकांगी होतंच असं नाही. पण माझा अनुभव असा कि - नाण्याच्या दोन्ही बाजू दाखवायच्या, कुणाला दुखवायचं नाही, माफक विनोद, फार सिरियस नको अशा आणि इतर मर्यादा आपणच स्वत:वर इतक्या लादतो - कि लिहुन झाल्यावर 'हा मीच का?' असा प्रश्न पडतो.
हे सगळे प्रश्न हे वार्ताहराला पडले पाहिजेत.
मोकळा कॅनव्हास आणि जगभराचे रंग घेऊन फिरणाऱ्या छंदींना नव्हे.
असे १००० छंदी झाले तर १०० चांगली पुस्तकं वाचायला मिळतील.
१० भैरप्पा/नरेश मेहता/जी.ए. मिळतील.
कुणास ठाऊक एखादा गार्सिया मिळेल. (गॅब्रियल गार्सिया मार्केझ म्हणतोय मी - ऍन्डी गार्सिया नव्हे)

असं मला म्हणायचं होतं.

प्रशांत said...

तुमच्या मताशी मी सहमत आहे. लेखनात वैविध्य असणं महत्त्वाचं आहे. अर्थात माझा blog तसा आहे असं म्हणत नाही, पण त्या दृष्टीने विचार करायला हरकत नाही.
तुम्हाला एक blog सांगू इच्छितो.
http://www.prasadmanohar.blogspot.com/
हा blog इंग्रजीत असला, तरी त्यात तुम्ही सुचवल्याप्रमाणे वैविध्य आहे असं वाटतं.
(The above blog belongs to my cousin, Prasad)

Anonymous said...

मी या मुळ निरीक्ष्णाशी सहम्त आहे.

मी दोन ब्लोग्स वर काम करत आहे

तन्त्रव्य tantravya.blogspot.com

indianalternativemedicine.blogspot.com

ही कमतरता जाणुनच हा प्रपंच.

पहा आणी प्रतीक्रिया नोंदवा.

Murli said...

Job and social work share kara. Friends name Rojgar milvun day.

Murli said...

Rojgar milva