Friday, February 27, 2009

फुलफ्रेम २००८ - ट्विन टॉवरचा डोंबारी, अर्थात "मॅन ऑन वायर"

नुकत्याच झालेल्या ऑस्कर अवार्ड नाईटमधे मॅन ऑन वायरला सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार देण्यात आला. त्या निमित्त या माहितीपटावर आधीच प्रकाशित केलेला लेख पुनःप्रकाशित करत आहे:

१९६८ साल. पॅरिसमधली एक सकाळ....
लहानगा फिलिप पेटिट दातांच्या दवाखान्यात डॉक्टरांची वाट पहात बसलेला. सहज चाळायला घेतलेल्या मासिकातल्या एका लेखाकडे त्याचे लक्ष वेधले जाते - "न्यूयॉर्क शहरात जगातील सर्वात उंच इमारती बांधण्यात येत आहेत..." वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सची ती प्रस्तावित चित्रे पाहून तो इतका भारावला होता की चक्कं ते पानच फाडून खिशात घातले. घरी आणून ते चित्रं समोर दिसेल असे टांगले. मनाशी निर्धार केला - हेच माझे ध्येय.. टॉवर बांधून पूर्ण झाली रे झाली, की या टॉवरपासून त्या टॉवरपर्यंत एक दोर बांधायचा, तो ही सर्वात वरच्या मजल्यावर आणि त्यावर डोंबार्‍याचा खेळ करायचा. त्या दिवसापासूनच फिलिपचा सराव सुरू होतो.
मोठा होत होत, रस्त्यावर जादूचे, डोंबार्‍याचे खेळ करत करत, तर कधी चक्क खिसे कापत पै पै जमा करायचा. न्यूयॉर्कला जाऊन इमारतींचे बांधकाम कसे सुरू आहे ते बघायचे, तिथल्या कामगारांचा पोषाख कसा, ते वस्तूंची ने-आण कशी करतात, ऑफिसात काम करणारे कसे वागतात, इत्यादी बारीक सारीक तपशील गोळा करायला सुरूवात होते.
उद्दिष्ट सोपे तर नव्हतेच, पण बेकायदेशीरही होते, पण त्यातच तर खरी मजा होती नं! त्याची मैत्रिण व काही मित्रं खंबीरपणे पाठीशी उभे, तर काही सुरवातीला उत्साह दाखवून मधेच पाचावर धारण बसणारे. "तुझं काही बरं वाईट झालं तर माझ्यावर खापर नको" असं म्हणत माघार घेणारे काही, तर "माझ्याने हे होणार नाही" अशी स्पष्ट कबूली देणारे काही.
एका कानाची दुसर्‍या कानाला खबर लागणार नाही अशी गुप्तता बाळगायची. खोटी ओळख पत्रे मिळवून इमारतीत प्रवेश करायचा. सुरक्षा सैनिकांना चकमा देत छतावर पोचायचे व पहाणी करायची. हे सर्व करण्यात काही वर्ष जातात.
१२ ऑगस्ट १९७४, ट्विन टॉवर्सवर ढळणारी मध्यरात्रं...
कुणालाही कळू नं देता, दोन इमारतींच्या मधे ४५० पाऊंडांची केबल एका रात्रीत बांधायची. सकाळ झाली की तोल सावरत त्या दोरखंडावर प्रकट व्हायचे अचानक. नुसते चालत नव्हे तर नाच करत! सकाळी सकाळी कामाला निघालेल्या चाकरमान्यांना अगदी ध्यानीमनी नसताना एक अजब अदाकारी दाखवायची.


काय स्वप्नं पडतात नाही लोकांना? इतकं करून अगदी चांगल्यात चांगलं निष्पन्नं म्हणजे पोलिस पकडून जेलमधे टाकणार. इतर शक्याशक्यतेची तर कल्पनाही करवत नाही.

११ सप्टेंबर २००१ ट्विन टॉवर्सवर उगवत्या सूर्याची उन्हे.
या दिवशी घडलेल्या घटनेने फिलिपच्या त्या धाडसाचे, वर्षानुवर्ष उराशी बाळगलेल्या एका वेड्या स्वप्नाचे सर्व आयाम बदलले. गुप्तता तीच, कार्यपद्धतीही बहुदा तीच, हेतू मात्रं अगदी वेगळे!"मॅन ऑन वायर" - एखाद्या हॉलीवुड थरारपटाच्या थोबाडीत मारेल असा हा माहितीपट फुलफ्रेम डॉक्युमेंटरी फिल्म फेस्टिवलमधे बघायला मिळाला. प्रेक्षकांच्या पसंतीचे बक्षीसही याच माहितीपटाला मिळाले. (माझ्या हातून सहजा-सहजी ६-७ च्या वर मार्क सुटत नाहीत, पण मीही याला १० पैकी १० मार्क दिलेत.)
फिलिप आणि त्याच्या मित्र मंडळींची मोहिमेची तयारी, भांडणे , अडचणी, कामातील जोखीम ह्या सर्वातुन हा बेत तडीला जातो का...? पुढे काय होते..? एरवी मी पूर्ण कथानक लिहीले असते, कारण इथे दाखवण्यात येणारे बरेचसे माहितीपट रिलीज होण्याची फारशी शक्यता नसते. पण तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे हा चित्रपट लवकरच येत आहे - अगदी तुमच्या जवळच्या थिएटरमधे का काय म्हणतात तसा, असं ऐकलं आहे.
अर्थातच ही सत्य घटना आहे व त्यासंबंधीची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे, पण सिनेमाची खरी मजा अनुभवायची असेल तर सिनेमा बघेपर्यंत पाटी कोरी ठेवा हा कसंकायचा अधिकृत सल्ला....


मूळ लेख प्रकाशन : ४/१०/०८ ९:४२

Sunday, February 22, 2009

बाळाचे आगमन - भाग ३

(ही मालिका कूर्मगतीने लिहिल्याबद्दल क्षमस्व. आता कामावरही रुजु झाले आहे, त्यामुळे वेळ मिळणे कठीण जाते आहे. )

माझ्या फॅमेली डॉक्टरांनी
चॅपल हिल ऑब्स्टेट्रिक्स एन्ड गायनॅकॉलोजीच्या डॉ. पॅट चॅप्पेल यांचे नाव सुचवले. त्यांची अपॉईंटमेंट घेतली.
पहिल्या अपॉईंटमेंटमधे डॉक्टरीण बाई आवडल्या. त्यांना मनातल्या अनेक शंका विचारल्या. बाईंना डरहॅम रिजनल हॉस्पिटलमधे एडमिटींग प्रिव्हिलेजेस आहेत असे कळले. जवळची सर्व हॉस्पिटल्स आधी बघून मग कुठल्या हॉस्पिटलमधे जायचे ते आम्ही ठरवणार होतो. त्यामुळे डरहॅम रिजनल आवडले नाही तर नंतर डॉक्टर बदलायची असं ठरवलं.
चॅप्पेल बाईंना अनुभव बराच होता. खाणे पिणे, व्यायाम काय करायचा असे बरेच प्रश्न विचारले. शिवाय "आम्ही व्हिगन आहोत, त्याबद्दल तुम्हाला काही आक्षेप तर नाही ना?" असेही विचारले.त्यावर त्या म्हणाल्या, "व्हिगन पेशंट इतरांपेक्षा खूप जागरूक असतात. काळजीचं अजिबात काही कारण नाही"

प्रिनेटल व्हिटेमिनच्या गोळ्या आधीच सुरू केल्या होत्या. बाजारात उपलब्ध असलेले सर्वच ब्रँड व्हिगन नसतात, पण व्हिगन ब्रॅंडही सहज उपलब्ध आहेत.
इतर खाणेही वाढले होते कारण भूकच जास्त लागत होती. वजनही जरासे वाढले. अर्थात या स्टेजमधे वजन फारसे वाढत नाही.
प्रेग्नंट झाल्याचे कळल्याबरोबर मी चहा कॉफी घेणे बंद केले. एखादा कप चहा कॉफी घ्यायला हरकत नाही असे डॉक्टर सांगतात. खाण्यापिण्याच्याबाबातीत एक नियम मी स्वतःच बनवला होता - "बाळाला जे खाऊ घालायचे नाही, ते आपण खायचे नाही".
व्यायाम जमेल तितका करत रहा असे त्यांनी सांगितले. त्यानुसार मी पोहणे, चालणे व सायकल चालवणे सुरू ठेवले. अर्थात जितके मानवेल तितकेच.
करता करता तीन महिने संपले. ह्या काळात एक अल्ट्रासाऊंड झाला होता. बाळाची हालचाल पाहताना आम्हाला खूप मजा आली.
नवर्‍याला अल्ट्रासाऊंडचे फार अप्रूप. त्यामुळे पुढचे अल्ट्रासाऊंड केव्हा असे त्याने विचारले. १५ व्या आठवड्यात एम्निओसिंटेसिस ही ऐच्छिक चाचणी आहे. या चाचणीत बाळाला काही जन्मजात दोष असणार आहेत का हे कळते. त्यावेळी अल्ट्रासाऊंड होते असे कळले. या टेस्टबाबत विचार करायचे ठरले.
आता बारा आठवड्याचा धोक्याचा काळ संपला होता. एकदाही उलटी बिलटी नं होता दुसरे ट्रायमिस्टर सुरू झाले म्हणून मी आनंदात होते. दोघांच्या आई वडिलांना ही गोड बातमी सांगून विश्वासात घेतले. बाकीच्यांना मात्रं इतक्यात सांगू नये असे ठरवले.
एम्निओसिंटेसिसबद्दल आम्ही बराच विचार केला. नवर्‍याचा एकूण कल चाचणी करावी असा होता. म्हणून करायचे ठरवले.
त्याप्रमाणे डॉक्टरांना फोन केला. मग त्यांनी चाचणी करायची तारीख दिली. त्याशिवाय जेनिटकल काऊंसेलरची भेट घ्यायलाही सांगितले. चाचणीच्या आधी काऊंसेलरनी सर्व समजाऊन सांगितले.
अखेर चाचणीचा दिवस आला. आम्ही दोघेही लॅबमधे गेलो. नर्सने अल्ट्रासाऊंडकरून बाळाची पोझिशन कुठे आहे ते डॉक्टरांना दाखवले. त्यानुसार डॉक्टरांनी बाळाला इजा होणार नाही अशी खात्री करून गर्भाशयातील पाणी काढले.
चाचणीचा निकाल हातात यायला दोन आठवडे लागतात. हे दोन आठवडे फारच नर्व्ह्सनेस होता. पण त्याहीपेक्षा मला फारच अपराधी वाटायला लागलं. मी नवर्‍याला तसं बरेचदा बोलून दाखवलं. शेवटी त्यानी माझी समजूत काढली की चाचणीमधे बाळाला काही दोष असल्याचं कळलं म्हणजे आपण काही गर्भपातच करणार आहोत असं नाही. पण तसा दोष असेल तर आपली आधीपासूनच मानसिक तयारी करायला आपल्याला वेळ मिळेल.
अखेर जिनकेअर या चाचणी करणार्‍या संस्थेकडून फोन आला व त्यांनी सर्व नॉर्मल असल्याचे कळवले.
आम्हाला मुलगा होणार की मुलगी हे जाणून घ्यायचे नव्हते. सर्व नॉर्मल होते हेच खूप होते...

क्रमशः

Monday, February 09, 2009

नंदिता शहा यांची Peas Vs Pills कार्यशाळा पुन्हा मुंबईत

नंदिता शहा यांनी ही माहिती पाठवली आहे:

Peas vs Pills

The Peas vs. Pills workshop is about preventing and reversing illnesses through the understanding of human anatomy, physiology and nature's laws. Nature's wisdom surpasses that of any doctor. Learn how to understand what your body is telling you and how to respond accordingly. Discover what is the ideal healthy diet for a human being and learn how to prepare healthy, tasty meals that heal. Become aware of how to live holistically and in harmony with the environment.
The workshop will cover:
1. Health, disease and the scope of medicines.

2. What is the healthiest diet for our species? Understanding our anatomy, physiology and real nutritional needs.
3. Why the foods we are eating today cause disease.
4. Results of diet change.
5. The relation between diet and stress.
6. The relation between diet and our environment.
7. How to manage making the transition without missing the foods we are used to.
8. How to handle social situations related to dietary changes.
Date: Sunday, 15th MarchTime: 9 am – 5 pm
Venue: Nalanda World Wisdom Centre,
Times Tower, 6th floor, Training Room,
LP Kamala Mills compound
Senapati Bapat Marg,
Lower Parel,
Mumbai
400 013
Fees: Rs 1750 inclusive of breakfast, lunch, a snack and course materials. Early bird discount for registrations before 1st March – Rs 1500.
All meals will be strict vegetarian. If you have any dietary restrictions please inform us in advance. If you decide to participate, please mail cheque for the same amount favoring "SHARAN" to following address.
Please include your complete name, address and contact numbers.
SHARAN22 Matru Chhaya,
70 Marine Drive,
Mumbai 400 020
For reservations or enquiry, please contact Mr Surendra Shah:surendratshah@gmail.com or 22812167 or Nandita Shah: nandita@sharan-india.org For more information see our e-brochure: http://sharan-india.org/files/2009/02/peas-vs-pills-e-brochure.pdf

Friday, February 06, 2009

मी फार बिझी आहे??

एका महोदयांची आणि माझी ब्लॉगच्या निमित्त्याने इ-ओळख झाली. त्यांना काही माहिती हवी होती म्हणून इमेल पाठवली. त्यादिवसापासून त्यांनी मला रोज डझनावारी जंक मेल फॉरवर्ड करायला सुरूवात केली. "कृपया तुमच्या जंकमेल पाठवायच्या यादीतून माझे नाव काढून टाका" अशी विनंती मी त्यांना केली. त्यानंतर इमेलची संख्या अर्ध्याने कमी झाली!!! हल्ली पुन्हा एकदा सांगितले की हे सगळं वाचायला मला मुळीच वेळ नसतो कृपया इमेल पाठवू नका. त्यानंतर ती संख्या एक-दोनवर आली.
गेले वर्षभर रोज एकदा तरी इमेल चेक करायच्या आधी या महाशयांच्या आलेल्या इमेल चरफडत डिलीट कराव्या लागताहेत.
मग एक दिवस मी त्यांना विचारलं - काय हो, माझा ब्लॉग वाचलाय का एव्हढ्यात? उत्तर नाही, पुन्हा विचारणा केली, तरी उत्तर नाही. तिसर्‍यांदा मी ब्लॉगची लिंक पाठवली त्यावर त्यांनी काय उत्तर द्यावे?
मी फार बिझी आहे.....!!!!!?????

Wednesday, February 04, 2009

मराठी ब्लॉग्ज आणि साहित्य संमेलन

मागे मी मराठी साहित्य संमेलनात मराठी ब्लॉग्जची दखल घ्यावी अशा आशयाचं
हे पोस्ट टाकलं होतं. त्यावर नुकतीच श्री प्रसन्न जोशी यांची प्रतिक्रिया आली आहे, ती इथे जशीच्या तशी देते आहे.
"नमस्कार,मी प्रसन्न जोशी.
स्टार माझा याचॅनलसोबत काम करतो. वेब माझा हा संगणक व इंटरनेट विश्वाशी संबंदित कार्यक्रमाची निर्मितीही मी करतो. नुकतीच आम्ही मराठीतील पहिली ब्लॉग स्पर्धाही घेतली.साहित्य संमेलनाने ब्लॉग या माध्यमाची दखल घ्यावी. हा विचार मी यापूर्वीच केला होता. त्यानुसार, मी व माझ्या काही मित्रांनी मार्चमध्ये भरणा-या अ.भा.म.सा.संचे अध्यक्ष आनंद यादव यांची भेट घेतली. त्यांना आम्ही ब्लॉग या माध्यमाची दखल अध्य़क्षीय भाषणात घेण्याची विनंती केली आहे. ते आता कसा प्रतिसाद देतात ते पाहायचे. पण, जर मराठी ब्लॉगर्सनी त्यांना जास्तीत जास्त पत्र पाठवली (त्यांचा ई-मेल नाही.)तर, ते ब्लॉगला गांभीर्याने घेऊ शकतात.
त्यांचा पत्ता-आनंद यादव
संमेलनाध्यक्ष,
अ.भा.म.सा.संमेलन (महाबळेश्वर)
भूमी बंगला,
कलानगर,
धनकवडी,पुणे 43.
माझा मेल- prasann.joshi@gmail.com9422321772
"
कृपया शक्य असल्यास श्री यादव यांना पत्रं पाठवा, तसेच ही माहिती अधिकाधिक वाचाकांपर्यंत पोचेल असा प्रयत्न करा.

Sunday, February 01, 2009

बाळाचे आगमन:भाग २


मे महिना आला तसा घरात बांधकामाने चांगलाच जोर पकडला. ऑफिसचे काम सासरी जाऊन करायला सुरुवात केली. नशिबाने मॉर्निंग सिकनेस अजिबात नव्हता. कधी कधी थोडीशी मळमळ व्हायची, पण त्या पलिकडे काही नाही.
आता एका चांगल्या गायनॅकॉलिस्टचा शोध सुरू झाला. त्याचबरोबर कुठल्या हॉस्पिटलमधे जायचे ते ही महत्वाचे होते. आमच्या नशिबाने इथे युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना (UNC) आणि ड्युक युनिव्हर्सिटीची अद्ययावत हॉस्पिटल्स आहेत. शिवाय इतरही चांगली हॉस्पिटल्स आहेत. कुठेतरी पाण्याखाली जन्म देण्याची सुविधा आहे असे ऐकले होते, त्यासंबंधीही माहिती काढायची ठरली. UNC मधे पाण्यात लेबर करायची सुविधा आहे पण प्रत्यक्ष जन्म पाण्याखाली होऊ देत नाहीत असे कळले. मात्रं त्याबरोबरच चॅपल हिल येथील वुमेन्स बर्थ एन्ड वेलनेस सेंटरमधे पाण्यात प्रसूती होण्याची सोय असण्याचे कळले. ही सुविधा बर्थिंग सेंटर म्हणून प्रसिद्ध असल्याचे समजले. मात्रं तिथे डॉक्टर नसून सर्व मिडवाईफ असतात आणि एपिड्युरल (एनेस्थेशिया) उपलब्ध नसते असे कळले. बर्थिंग सेंटरमधे प्रसूती नैसर्गिक प्रद्धतीने करण्यावर भर दिला जातो. काही कॉम्प्लिकेशन झाल्य़ास बाळ/बाळंतिणीला UNC मधे एडमिट करतात.
नैसर्गिक,पाण्याखाली प्रसूती हे सगळं अगदी आयडियल वाटत असलं तरी डॉक्टर नाही म्हणजे जरा भितीच वाटत होती, त्यामुळे बर्थिंग सेंटरचा विचार करायचे नाही असे मी ठरवले.

हे सगळे करता करता कॅलिफोर्नियाच्या कॉन्फरन्सची वेळ झाली तरी साधे डॉक्टरही ठरले नव्हते, हॉस्पिटल तर सोडाच.
कॅलिफोर्नियाची ट्रिप छान झाली. मी कॉन्फरन्सला जोडून सुट्टी घेतली होती. नवर्‍यानेपण माझ्याबरोबर येण्यासाठी वेळ काढला होता. लॉस एंजेलिसमधे माझ्या दिरांकडे राहिलो. त्यानंतर सॅन होजे मधे माझी चुलत बहीण शालिनीकडे राहिलो आणि शेवटी सॅन फ्रॅन्सिस्कोला पोचलो.

सॅन फ्रॅन्सिस्कोत अनेक व्हिगन रेस्टॉरेंट्स आहेत. मिलेनियम हे नवर्‍याचे जगातील सर्वात आवडते व्हिगन रेस्टॉरेंट डाऊन्टाऊन सॅनफ्रॅन्सिस्कोमधे आहे. आमचे रहाण्याचे हॉटेल तिथून अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर होते म्हणून नवरा एकदम खूष होता. शिवाय (मी कॉन्फरन्समधे असताना) त्याला त्याच्या आवडत्या शहरात भटकंती करायला मिळणार होतीच.
पहिले ट्रायमिस्टर असूनही उलट्यांचा त्रास नसल्याने त्याच्याबरोबर सर्व खादाडी करायला मी ही तयार होतेच. संध्याकाळी अनेक जुन्या मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांना वेगवेगळ्या रेस्टॉरेंटमधे आमंत्रित करण्याचा सपाटा लावला.
कॉन्फरंन्स संपल्यावर सप्ताहांत मरिन काऊंटीमधे एका सर्व्हास कुटुंबाबरोबर घालवला आणि अखेर घरी परत आलो.
या सर्व प्रवासात आमची काही "बातमी" असल्याचा कोणालाच संशय आला नाही. परत येऊन पुन्हा डॉक्टरचा शोध सुरू झाला...


क्रमशः