बाळाचे आगमन - भाग ३
(ही मालिका कूर्मगतीने लिहिल्याबद्दल क्षमस्व. आता कामावरही रुजु झाले आहे, त्यामुळे वेळ मिळणे कठीण जाते आहे. )
माझ्या फॅमेली डॉक्टरांनी चॅपल हिल ऑब्स्टेट्रिक्स एन्ड गायनॅकॉलोजीच्या डॉ. पॅट चॅप्पेल यांचे नाव सुचवले. त्यांची अपॉईंटमेंट घेतली.
पहिल्या अपॉईंटमेंटमधे डॉक्टरीण बाई आवडल्या. त्यांना मनातल्या अनेक शंका विचारल्या. बाईंना डरहॅम रिजनल हॉस्पिटलमधे एडमिटींग प्रिव्हिलेजेस आहेत असे कळले. जवळची सर्व हॉस्पिटल्स आधी बघून मग कुठल्या हॉस्पिटलमधे जायचे ते आम्ही ठरवणार होतो. त्यामुळे डरहॅम रिजनल आवडले नाही तर नंतर डॉक्टर बदलायची असं ठरवलं.
चॅप्पेल बाईंना अनुभव बराच होता. खाणे पिणे, व्यायाम काय करायचा असे बरेच प्रश्न विचारले. शिवाय "आम्ही व्हिगन आहोत, त्याबद्दल तुम्हाला काही आक्षेप तर नाही ना?" असेही विचारले.त्यावर त्या म्हणाल्या, "व्हिगन पेशंट इतरांपेक्षा खूप जागरूक असतात. काळजीचं अजिबात काही कारण नाही"
प्रिनेटल व्हिटेमिनच्या गोळ्या आधीच सुरू केल्या होत्या. बाजारात उपलब्ध असलेले सर्वच ब्रँड व्हिगन नसतात, पण व्हिगन ब्रॅंडही सहज उपलब्ध आहेत.
इतर खाणेही वाढले होते कारण भूकच जास्त लागत होती. वजनही जरासे वाढले. अर्थात या स्टेजमधे वजन फारसे वाढत नाही.
प्रेग्नंट झाल्याचे कळल्याबरोबर मी चहा कॉफी घेणे बंद केले. एखादा कप चहा कॉफी घ्यायला हरकत नाही असे डॉक्टर सांगतात. खाण्यापिण्याच्याबाबातीत एक नियम मी स्वतःच बनवला होता - "बाळाला जे खाऊ घालायचे नाही, ते आपण खायचे नाही".
व्यायाम जमेल तितका करत रहा असे त्यांनी सांगितले. त्यानुसार मी पोहणे, चालणे व सायकल चालवणे सुरू ठेवले. अर्थात जितके मानवेल तितकेच.
करता करता तीन महिने संपले. ह्या काळात एक अल्ट्रासाऊंड झाला होता. बाळाची हालचाल पाहताना आम्हाला खूप मजा आली.
नवर्याला अल्ट्रासाऊंडचे फार अप्रूप. त्यामुळे पुढचे अल्ट्रासाऊंड केव्हा असे त्याने विचारले. १५ व्या आठवड्यात एम्निओसिंटेसिस ही ऐच्छिक चाचणी आहे. या चाचणीत बाळाला काही जन्मजात दोष असणार आहेत का हे कळते. त्यावेळी अल्ट्रासाऊंड होते असे कळले. या टेस्टबाबत विचार करायचे ठरले.
आता बारा आठवड्याचा धोक्याचा काळ संपला होता. एकदाही उलटी बिलटी नं होता दुसरे ट्रायमिस्टर सुरू झाले म्हणून मी आनंदात होते. दोघांच्या आई वडिलांना ही गोड बातमी सांगून विश्वासात घेतले. बाकीच्यांना मात्रं इतक्यात सांगू नये असे ठरवले.
एम्निओसिंटेसिसबद्दल आम्ही बराच विचार केला. नवर्याचा एकूण कल चाचणी करावी असा होता. म्हणून करायचे ठरवले.
त्याप्रमाणे डॉक्टरांना फोन केला. मग त्यांनी चाचणी करायची तारीख दिली. त्याशिवाय जेनिटकल काऊंसेलरची भेट घ्यायलाही सांगितले. चाचणीच्या आधी काऊंसेलरनी सर्व समजाऊन सांगितले.
अखेर चाचणीचा दिवस आला. आम्ही दोघेही लॅबमधे गेलो. नर्सने अल्ट्रासाऊंडकरून बाळाची पोझिशन कुठे आहे ते डॉक्टरांना दाखवले. त्यानुसार डॉक्टरांनी बाळाला इजा होणार नाही अशी खात्री करून गर्भाशयातील पाणी काढले.
चाचणीचा निकाल हातात यायला दोन आठवडे लागतात. हे दोन आठवडे फारच नर्व्ह्सनेस होता. पण त्याहीपेक्षा मला फारच अपराधी वाटायला लागलं. मी नवर्याला तसं बरेचदा बोलून दाखवलं. शेवटी त्यानी माझी समजूत काढली की चाचणीमधे बाळाला काही दोष असल्याचं कळलं म्हणजे आपण काही गर्भपातच करणार आहोत असं नाही. पण तसा दोष असेल तर आपली आधीपासूनच मानसिक तयारी करायला आपल्याला वेळ मिळेल.
अखेर जिनकेअर या चाचणी करणार्या संस्थेकडून फोन आला व त्यांनी सर्व नॉर्मल असल्याचे कळवले.
आम्हाला मुलगा होणार की मुलगी हे जाणून घ्यायचे नव्हते. सर्व नॉर्मल होते हेच खूप होते...
क्रमशः
5 comments:
How is little princess
She is doing fine Harekrishnaji.
आपल्याला सांगायचे राहुन गेले पण माझ्याही घरी छोटुस्या पु्तणीचे आगमन झाले आहे, जवळ जवळ तेव्हाच
इथे भारतात मुलाला जन्म देतांना येवढा विचार ्फारसा कोणी करत नसावा
हरेकृष्णाजी,
तुमचे म्हणणे बरोबर आहे. विचार करत नाहीत किंवा काय विचार करायचा हे ही माहित नसते.
म्हणूनच मी ही मालिका लिहायला घेतली आहे.
Post a Comment