आता तरी...
शासकिय आकड्यानुसार आमची संख्या दोन कोटी आहे. स्वातंत्र्यासाठी जीवनाची आहुती देणार्यांपेक्षा आमची संख्या जास्त आहे. सीमेवर शत्रूशी लढताना प्राण गमावणार्यांपेक्षाही जास्त आहे. मात्रं आमचं बलिदान हे सर्व अर्थानी मूक आहे, कारण हे दान आम्ही स्वेच्छेने दिलेले नाही, तर आमच्याकडून ह्कनाक घेण्यात आलेलं आहे. आमच्या आई-वडिलांनी, लोभी डॉक्टरांच्या मदतीने विज्ञानाचा दुरुपयोग करत, जन्मापूर्वीच आम्हाला खुडून टाकलं आहे, किंवा जन्मानंतर काही दिवसाच्या आतच...
गेल्या वीस वर्षात दोन कोटी चिमुकल्या कन्या ह्या भयंकर सामजिक प्रथेच्या बळी ठरल्या आहेत. आमचे आई-बाप समाजाच्या सगळ्या स्तरात आहेत, खेड्यात आहेत तसे शहरात आहेत. निरक्षर आहेत तसेच साक्षर. गरीब तसेच गर्भश्रीमंत. काश्मिर ते कन्याकुमारी, महाराष्ट्रं ते बंगाल सगळीकडे कमी अधिक प्रमाणात आहेत.
हीच का ती प्राचिन गौरवशाली संस्कॄती? हेच का ते मुक्तं करणारे ज्ञान-विज्ञान? ह्यालाच प्रगती म्हणायचे का? हयाला सामजिक न्याय म्हणायचे का? महासत्ता बनण्याची स्वप्ने बघणार्या समाजाची हीच मनसिकता का? हाच का राज्यघटनेने तुम्हाला दिलेला मुलभूत ह्क्कं?
आमच्या बलिदानाने काही प्रमाणात तरी लोकसंख्येला आळा बसला आहे - जाता जाता तो ही एक फायदा आम्ही देशाला करुन दिला आहे. पुरुषा-गणिक स्त्रियांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. तुमच्या ह्या स्वतंत्र देशामधे जन्मण्याचा ह्क्कं आम्हाला मिळाला नाही, तरी एक फक्त विनंती आहे - आमच्या अनेक बहिणी आहेत, ज्या जन्मल्या तर आहेत, पण त्यांची स्थिती आमच्यापेक्षाही वाईट आहे. आता तरी घेऊ द्या त्या कळ्यांना मोकळे निश्वास, आता तरी उडू द्या त्या पर्यांना आपल्या पंखानिशी...आता तरी नका त्यांचे श्वास कोंडु, आता तरी नका त्यांची स्वप्नं जाळू...
1 comment:
vichar chaan mandale ahet...well done.....Koham
Post a Comment