Saturday, November 18, 2006

इट्ली - भाग २ (लेक कोमो, मिलानो व फ़िरेंजेला प्रयाण)


आता पुढचं वर्णन लिहिण्याच्या आधी मी तुम्हाला काही नविन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही नीट लक्षात ठेवा हं - कारण पुढे मी ते पुन्हा पुन्हा वापरणार आहे.

डुओमो - गावातलं मुख्य चर्च
पियाझ्झा - चौकातील मोकळी जागा. तिथे सहसा वाहनांना प्रवेश नसतो. ही जागा फ़ार मोक्याची असते. कोणाला भेटायचं असेल तर अमुक तमुक पियाझ्झाला या असं म्हणतात.
बार - इटलीतला बार म्हणजे साधे कोपर्‍यावरचे हॉटेल. त्यामुळे सकाळी सकाळी आम्ही बार मधे शिरलो असं मी लिहिलं तर चक्रावून जाऊ नका. इटलीत पावलागणिक आढळणार्‍या या बार मधे कॉफ़ी, पास्ता, आइसक्रिम असं सगळं मिळतं (बियर वगैरे सुधा मिळते, पण तो मुख्य उद्देश नाही.) सगळ्यात महत्वाची गोष्टं म्हणजे बार मधे उभ्या उभ्या खायचं. तीच वस्तु बसून खायचे दसपट पैसे पडतात.
जिलाटो - आइसक्रिम (विशेषत: दूध नसलेले आइस्क्रिम - फ़ळांचा रस आणि बर्फ़ापासुन बनवलेले).बार प्रमाणेच या जिलाटोची दुकानं जिथे तिथे आढळतात.
व्हिगन पासपोर्ट - या पुस्तकात जगातल्या प्रत्येक महत्वाच्या भाषेत व्हिगन लोकांना त्या प्रदेशात काय काय चालते आणि काय चालत नाही ते लिहिले आहे. (मराठी पानावरील "आम्हाला दह्यातली कोशिंबिर चालत नाही" हे वाक्य वाचुन माझा त्या पुस्तकावर खुपच विश्वास बसला)

१० ऑक्टो. २००६
आज सकाळी नवरा चक्कं माझ्या आधी उठ्ला. अल्बर्टोंच्या घराशेजारील चर्चने सकाळी सात वाजता जोरदार घंटानाद केल्यामुळे त्याची झोप उडाली असेल. त्याच्या पाठोपाठ मी ही उठून तयार झाले. न्याहारी करुन आम्ही बाहेर पडलो. काल काढ्लेली बसची तिकिटे घेऊन आम्ही बस-स्टॉपवर जाऊन उभे राहिलो. कालच्या सारखी आज तरी चुकू नये म्हणुन चांगले १५ मिनिटं आधी जाऊन उभे राहिलो. स्टॉपवर एक आजोबा उभे होते. आम्हाला बघताच, त्यांनी नवर्‍याला त्यांच्या जॅकेट्ची चेन लावून मागितली. मग जरा आजोबांच्या अंगात ऊब आल्यानंतर आमचा संवाद सुरू झाला - डिक्शनरीच्या मदतीनी. आजोबांना बरच काही बोलायचं होतं. बस येईपर्यंत तुम्ही कुठ्ले, आम्ही कुठले आणि कुठे जाणार याच्या व्यतिरिक्तं खालील संवाद पूर्ण झाला
आजोबा:ही तुझी बायको आहे का?
नवरा:हो.
आ:मुलं कुठे?
न:मुलं नाही - आत्ताच लग्नं झालं मागच्यावर्षी
आ:माझी बायको वारली
आम्ही दोघं: अरे अरे फ़ार वाईट झालं (मग आम्हाला एक की चेन दाखवली - त्याच्यावर आजींचं नाव लिहिलं होत.)
मधेच सायकलवरुन जाणार्‍या एका दुसर्‍या एका आजोबांना त्यांनी थांबवले आणि त्यांना ती की चेन पुन्हा दाखवली. आजोबांना आजीची बरीच आठवण येते म्हणायची - मी मनात म्हंटलं. त्या दुसर्‍या आजोबांची पत्नीपण निवर्तल्याचे या आजोबांनीच आम्हाला सांगितले, मग आम्ही पुन्हा एकदा हळ्ह्ळ व्यक्तं केली.
नवरा: आम्हाला इटालियन बोलता येत नाही, अगदी थोडं थोडं येतं.
आ:किती दिवस रहाणार आहात?
न:आठ दिवस
आ: अरे, तोपर्यंत चांगलं बोलता येईल.
एव्हढ्यात बस आली आणि आम्ही सगळे बसमधे चढलो. आत शिरताच तिकिटे यंत्रात घालून शिक्कामोर्बत करुन घेतली. बस निघाली तशा आम्ही पुढ्च्या काही अंतरावरच्या खाणाखुणा लक्षात ठेवल्या, परत येताना चुकायला नको म्हणून. साधारण तास भरात कोमोला पोचलो. कोमो अगदी स्वित्झर्लंडच्या सीमेवरचे नयनरम्यगाव. या गावावरुन स्वित्झर्लंड्च्या सौंदर्याची कल्पना करता येत होती. गावाच्या मधोमध एक मोठा तलाव आहे - अर्थातच लेक कोमो हे त्याचे नाव. बस अगदी तलावाच्या काठापर्यंत जाते. तलावापासून बाजूच्या पर्वतांवर वस्ती पसरलेली आहे. तलावावर फ़ेर-फ़टका मारून आम्ही डुओमोकडे मोर्चा वळवला.

लेक कोमो-->


कोमोचा डुओमो आणि त्याच्या बाहेरचा पियाझ्झा



जिलाटोचे दुकान



कोमोच्या पियाझ्झात भाजीचे दुकान, वाद्यं वाजवुन किंवा पुतळ्यासारखा वेष करुन अगदी स्तब्ध उभे राहणारे काही कलाकार होते. म्हातारी मंडळी सायकलवरुन इकडुन-तिकडे जात होती, मुले दप्तरे पाठीला अडकवुन घरी जात होती. ही सगळी चहल-पहल पाहून मी अगदी हरखून गेले. नवर्‍याला म्हंटलं, "आपण अमेरिका सोडून इथेच रहायला येऊ. मला अमेरिकेतल्या डिसकनेक्टेड आयुष्याचा अगदी कंटाळा आला आहे." माझा विचार त्याला मुळीच पटला नाही, असो. (मला तरी कुठे आवडतं त्यानी माझ्या देशाला नावं ठेवलेली?) तर गावाचा एक फ़टका मारुन आम्ही पुन्हा बसस्टॉपकडे आलो. बस तयारच होती. एक वाजता अल्बर्टोपण घरी पोचाणार होते. त्या दरम्यान कोमो बघुन येण्याचा आमचा बेत छान पार पडला. दुपारी इथून मुक्काम हलवायचा आणि जमेल तेव्हढे मिलानो पाहून फ़िरेंजे गाठायचे असा आजचा उरलेला कार्यक्रम आहे.
आम्ही घरी पोचून सामानाची आवरा-सावर करेपर्यंत अल्बर्टोपण कामावरुन परत आले. त्यांना आमच्या लग्नाची व्हिडियो दाखवली. ती त्यांना खूप आवडली. तेव्हढ्यात आमच्या गाडीची वेळ झाली. अल्बर्टोंनी आम्हाला स्टेशनवर पोचवले. गाडी आली तसा आम्ही त्यांचा निरोप घेतला. जाताना शेवटी पुन्हा त्यांच्या घरी जायचा विचार आहे.

कर्डोनाला गाडी बदलून आम्ही मिलानला पोचलो. सेंट्र्ल स्टेशनपर्यंत सब-वे नी जाऊन तिथे लॉकर रूममधे बॅगा ठेवल्या. फ़िरेंजेकडे जाणार्‍या गाड्यांची चौकशी करून पुन्हा सब-वे कडे आलो. वाटेत तोंडात टाकायला चेस्टनट विकत घेतले. हे सगळे होईपर्यंत दुपारचे ४ वाजले होते. अल्बर्टोंनी आम्हाला काय काय बघता येईल त्याची माहिती दिली होती. आधी डुओमो बघावा आणि नंतर जसा वेळ मिळेल तशी इतर ठिकाणं बघावी असा विचार करुन डुओमोकडे जाण्यार्‍या सब-वेमधे बसलो.
सब-वेतून बाहेर पडून रस्त्यावर आलो तर काय, प्रचंड आकाराचा डुओमो पुढे उभा ठाकलेला. ताजमहालाशी तुलना करता येइल इतकी भव्य वास्तु बघुन खुपच आश्चर्य वाटले. या डुओमोला जगातले चौथे मोठे कॅथिड्रल म्हणुन स्थान आहे. बाहेरुन डागडुजी सुरू आहे, तरी आत जायला परवानगी आहे. या डुओमोमधे येशूच्या क्रॉसचा एक खिळा आहे आणि कॄसिफ़िकेशनच्या वेळेचे इतर काही अवशेष जतन करून ठेवलेले आहे (असे म्हणतात) नक्षीदार भिंती, गॉथिक शैलीतल्या सुबक कमानी यांनी परिपूर्ण अशा या डुओमोच्या बांधकामाला थोडी-थोडकी नाही, तब्बल ३५० वर्षे लागलीत. आतून चर्च बघण्यासारखे असले तरी सर्वात विशेष भाग म्हणजे चर्चच्या वरच्या भागात - छतावर बनवलेली नगरी!! वरती जायला लिफ़्ट किंवा पायर्‍यांचा वापर करता येतो. आधी मला वाटलं (विशेषत: लिफ़्ट्चे सहा युरोचे तिकिट काढताना) की वरती जाण्यात काही फ़ार तथ्य नसावे - पण एकदा वरती पोचल्यावर मात्र आश्चर्यानी तोंडात बोटे घालायचीच वेळ आली. साधारण वीस मजले उंचावर असलेल्या वरच्या भागात फ़ारच कल्पक आणि भन्नाट कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. जणू आकाशात एक नगरी असावी असे देखावे तयार करण्यात आले आहे.
ह्या फ़ोटोंवरुन तुम्हाला थोडी कल्पना येईल:
या लेखातले सगळ्यात वरचे चित्रं - स्टेशनमधुन बाहेर आल्यावर दिसणारा डुओमो. (समोरचा भाग दुरुस्तीकरता झाकला आहे)

डुओमोच्यावरचे काही फ़ोटो :






वरुन दिसणारे खालचे दृष्य:


ह्ळुह्ळू चढ्त आम्ही अखेर अगदी वरती पोचलो. खाली पसरलेले मिलान शहर, डुओमोची शिल्पकृती आणि दूरवर दिसणारी आल्प्सची पुसट पर्वतरेखा. डोळ्याचे पारणे फ़िटवणारे ते दृष्य आम्ही मनात आणि कॅमेर्‍यात साठवुन ठेवले आहे. तिथे उभे राहून आम्ही ज्या काळात डुओमो बांधला त्या काळाचा आणि त्या हुन्नरी कलाकारांचा विचार करत होतो. हे सगळं असं बांधायचं असं कोणाच्या सुपिक डोक्यात आलं असेल? त्याला कोणी मान्यता दिली असेल? जिवावर उदार होऊन कोणी ती कल्पना साकारण्याचा विडा उचलला असेल? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारे डुओमो म्युझियम सद्ध्या बंद आहे. पण वेळ मिळेल तेव्हा या डुमोमोच्या प्रोजेक्ट्ची अधिक माहिती मिळवायची असं मी ठरवलं आहे.

डुओमो बघून होईस्तवर सहा वाजले होते. दुसरं काही बघायला वेळ नव्हता आणि पोटातले कावळेही जागे झाले होते. म्हणून जवळच्याच एका पिझ्झेरियात शिरलो. सेविकेला व्हिगन पासपोर्ट दाखवला. तो वाचून तिने बर्‍याच वेळा मान हलवुन "सी, सी" (होय, होय) असे म्हंटले आणि आम्हाला बसायला टेबल दिले. इटलीत हॉटेलमधे खाण्याचा हा पहिलाच प्रसंग आणि आम्ही अर्थातच पिझ्झा ऑर्डर केला.
हा पहा आमचा इटलीतला पहिला पिझ्झा:

पिझ्झा खाऊन तृप्त होऊन आम्ही पुन्हा सबवे पकडून सेंट्रल स्टेशन गाठले. सामान लॉकरमधून बाहेर काढले. फ़िरेंजेची तिकिटे काढली तोपर्यंत गाडीची वेळ झालीच. युरो-स्टार गाडीत बसून आम्ही फ़िरेंजेकडे निघालो...


क्रमश:

1 comment:

Parag said...

Hey, Sahi...
Keep it up... Photos khup sunder ahet..
Pudhcha lekh tak lavkar.. !