Friday, January 11, 2008

ब्लॉग - भाग दोन

ठप्प!


कळफलकातल्या डबक्यातुन फ्लश झालेला सदु जमिनीवर आदळला.


आजुबाजुला भयंकर गोंगाट होता. पण आवाज कुठुन येतोय हे त्याला कळत नव्हतं. मधेच चित्रं विचित्रं आकृत्या तयार होऊन पुन्हा अदृष्य होत होत्या. पुन्हा हातातल्या दोरीकडे त्याने बघितले. त्याच्या आवडत्या गाण्यांचे संकेतस्थळ होते ते. किती वेळा तरी हात झटकुन त्याने ती दोरी सोडायचा प्रयत्न केला. दोरीचे दुसरे टोक कुठे दिसते का ते पहाण्याचाही एक व्यर्थ प्रयत्नं करून बघितला.

अखेर दोरीचे टोक दोन्ही पंजात पकडले आणि सर्व शक्तिनिशी ते ताणुन धरले. शाळेत असताना रस्सीखेच खेळल्याचा फायदा होतो आहे असे त्याला वाटले. लहानपणच्या त्या रस्सीखेचीतल्या सर्व खेळाडु मित्रांचे चेहेरे त्याच्या डोळ्यासमोर तरळले. इंटरनेट नव्हते ना त्यावेळी. मित्रं मैत्रिणींना प्रत्यक्षात बघता येत होतं, त्यांची खरी नावं अडनावं, वडिलांच्या नावासहित माहित असायची. कधी गळ्यात गळे तर कधी गुद्दागुद्दी व्हायची... असे काहीसे विचारही उगीचच त्याच्या मनात येऊन गेले.


तेव्हढ्यात दोरी तुटली आणि तो मागच्या मागे भेलकांडत गेला.


ठक्कं!


त्याची पाठ एका मोठ्ठ्या कॉरिडॉरच्या भिंतीला आदळली.

कॉरिडॉरमधुन चालत काही पावलेच पुढे आला असेल नसेल तेव्हढ्यात काही विकृत आकृत्यांनी त्याला घेरले. भितीने त्याची गाळणच उडाली. ओरडायचा प्रयत्नं केला, पण आवाज काही केल्या फुटेना. या आकृत्या जशा जवळ येऊ लागल्या तसे त्याचे डोळे आधिकच विस्फारले. विदृप,ओबडधोबड असल्या तरी त्या सर्व त्याच्या स्वतःच्याच प्रतिकृती होत्या हे त्याही अवस्थेत त्याच्या लक्षात आले. त्याच्या अगदी जवळ येऊन त्या सर्व आकृत्या त्याच्याच पायाशी ढासळल्या. पायाजवळ त्यांचा भुसभुशीत चुरा जमा झाला. खाली बसुन सदुने तो चुरा न्याहाळला. त्याचा स्वतःचाच ब्लॉग होता तो....


क्रमश:

No comments: