Tuesday, January 15, 2008

ब्लॉग - निरूपण

चार भागात प्रसिद्ध केलेल्या "ब्लॉग" या मालिकेला मी Abstract असे लेबल दिले आहे. खरं म्हणजे हे लिखाण तितकंसं एबस्ट्रॅक्ट म्हणता येणार नाही. अमूर्त, निराकार गोष्टी मूर्त, साकार आहेत अशी कल्पना करून लिहिलेले कल्पित (फिक्शन) लिखाण म्हणता येईल फार तर.
मला याहुन जास्तं abstract लिहायचं आहे. पण जेव्हा जेव्हा मी तसं लिहायचा प्रयत्नं केला तेव्हा तेव्हा "म्हणजे काय?" "समजले नाही" "कोण हे अमुक तमुक"? अशा प्रतिक्रिया मिळाल्या. उदा:
पहाटेस अर्घ्य दे..अंतिम युद्धंचा शेवट इ.

(आता विषयच निघाला आहे तर...
अंतिम युद्धचा शेवट साचेबंद नं केल्याचा एक अनपेक्षित फायदा झाला तो म्हणजे ती कथा
अश्विनीने पुढे लिहायला घेतली. मी कथेचा शेवट जिथे केला तिथेच केला कारण जे सांगायचे होते ते सांगुन झाले होते. कथेच्या शेवटच्या प्रसंगात दोन्ही बाजु समोरा-समोर उभ्या आहेत. दोन्हीपैकी एका बाजुची निवड करण्याची वेळ आलेला केवल मधे उभा आहे.
केवल हा वाचकांचे प्रतिनिधित्व करतो. तिथ पर्यंतच्या कथेमधे त्याची भुमिका ही बहुतांशी श्रोत्याची आहे हे लक्षात घ्यावे. भविष्यात अंतिम युद्धचा शेवट कसा होईल हे वाचकांनी त्यांच्या आजच्या वर्तणुकीवरून ठरवायचे आहे. हे मला अभिप्रेत होते. असो...)
तर कुठे होते मी? हं... म्हणजे Abstract विचार अगदी अवास्तव किंवा काल्पनिकच असतात असे नाही. काही गोष्टी बाह्य संवेदना,जाणिवांच्या बाहेर असतात म्हणुन चटकन उमजत नाहीत एव्ह्ढेच. आधुनिक जीवनामुळे Abstract, non-abstract गोष्टींची अदला बदल झाली आहे,मानवी संवेदनांच्या व्याप्तीमधे तसेच पापुद्र्यांमधे (layers) बदल झाले आहेत.
अणु रेणुंची कल्पना एकेकाळी abstract होती, पण ती कोणी तरी आपल्याला समजावुन सांगितल्याने आता ती abstract राहिलेली नाही.
सातासमुद्रा पलिकडील व्यक्तिला आपण बघु शकतो आणि तिच्याशी संवाद साधु शकतो म्हणजे बघणे आणि ऐकणे या संवेदनांची व्याप्ती मोठी झाली आहे.
ज्यांच्याशी दैनंदिन व्यवहार करायचा ते मित्रं, ऑफिसमधले सहकारी, गिर्‍हाईके, भांडवलदार इ. पैकी काही जण दिसणे या संवेदनेच्या आड गेले आहेत. काही जण तर दिसणे आणि ऐकणे या दोन्ही संवेदनांच्या आड गेलेले आहेत. तरी त्यांच्याशी व्यवहार मात्रं सुरळित सुरू आहेत.
इंटरनेटवरील बाजारात दुकानदार आणि ग्राहक ह्या दोन्हींचे अस्तित्व एकमेकांच्या दृष्टीने abstract झाले आहे. परंतु abstract आहे म्हणजे मिथ्या आहे असे मुळीच नाही.
या पार्श्वभुमीवर abstract विचार अधिक सहजपणे करता यायला हवा असे वाटते. सरावाने ते साध्य होऊ शकते. म्हणुन abstract लिखाण हळुहळु वाढवण्याचा माझा विचार आहे. (आधीच माझे लिखाण, त्यात abstract लिहीणार, म्हणजे आधीच मर्कट सारखे काही तरी...)
गेले जवळपास वर्षभर "मानवकेंद्रितता सोडा" असे पालुपद लावले होते तरीही वाचकांची संख्या व प्रतिसाद दोन्ही वाढतच गेले आहेत. तुमचा लोभ असाच राहिल ही आशा आहे.
वाचकांना लिखाण समजावे ही अर्थातच लेखकाची जबाबदारी आहे. तरीही माझे सर्वच लिखाण बाह्य संवेदनांच्या पातळीवर समजण्यासारखे नसेल हे वाचकांनीही लक्षात ठेवावे. पुढच्या इयत्तेत जायची माझी इच्छा आहे, तुमचा पाठिंबा मिळेल असा विश्वास आहे.

5 comments:

मन कस्तुरी रे.. said...

संगीता

गरीब बिचार्‍या वाचकांना अनाकलनीय, अतर्क्यतेच्या भोवर्‍यात ढकलून देऊन स्वतःचे वाड.मयीन (सुधारणा बारहात सुचवावी) उत्थान करण्याची कल्पना चांगली असली तरी परिणामकारक असेलच असे नाही! अशा किती यत्ता पास करण्याचा इरादा आहे?
आमचा अर्थात पाठींबा आहेच. (पण शेवटी थोडा संदर्भ देत गेल्यास बरं पडेल असं वाटतं........सर्वांना सोयीसाठी)

प्रशांत said...

All the best for writting more and more fiction stories/essays.
-Prashant

Anonymous said...

ऐबस्ट्रैक्ट ची डेफीनेशन > माझ्या आजुबाजुला असलेले लोक मला व मी त्यांना सातासमुद्रा काय,सात विश्वे दुर असल्या सारखे वाटणे!
इथे लोड्शेडींग
अन अंधार तिकडे.

तिथे मलुल सुर्य
अन
इथे भगभगीत भावगीत

इथे मुक संवेदना
तिथे बाहुल्याही बोलक्या

इथे यंत्रवत मरणे
तिथे रोबोटीक जगणे

तिथे मेणाचे पुतळे
इथे पुतळ्यांचे पुळके

तिथे युरेका
इथे पुरेका ?

तिथे ऐबस्ट्र्याक्ट
इथे सबस्ट्र्याक्ट !

बस्स झाले मला वाट्टॆ !

A woman from India said...

एटम,
:D
तिथे मलुल सुर्य
अन
इथे भगभगीत भावगीत
याचा अर्थ लागला नाही. (एब्स्ट्रॅक्ट आहे वाट्टं.)

मन कस्तुरी रे.. said...

संगीता
:D
एकदा का ऍबस्ट्रॅक्ट चं लेबल दिलं की प्रतिभा कशी मुक्त विहार करु लागते नाही? काही बंधनं नकोत...प्रासाची , अर्थाची, संगतीची....
(कोण ते सारखं ग्रेस ग्रेस म्हणून कुजबुजतंय...? मला असं मुळीच म्हणायचं नाहीये...!)

पण खरंच या ओळींचा अर्थ कळला नाही!