देवमासा
व्हेल मासे. पृथ्वीवरील सर्वात मोठ्या आकाराचे प्राणी. समुद्रात रहातात म्हणुन मासे म्हणायचं. एरवी इतर माशांपेक्षा जवळीक जास्तं आपल्याशीच आहे. तासनतास पाण्याखाली राहु शकतात,पण श्वास मात्रं हवेतच घेऊ शकतात. अंडी देत नाहीत माशांसारखे. पिल्लांना जन्मं देतात माणसांसारखेच. हुशार,संवेदनक्षम,अनुभवातुन शिकणारे आणि आठवणीचे पक्के!
१८३० चा सुमार. ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण पूर्वेला इडन येथे किया नदीचे मुख. डेव्हिडसन कुटंबाची दोन घरे - मुख्य वस्तीपासुन दूर, जराशी एकटच. किलर व्हेल किंवा ऑर्निसियस ओर्का जातीच्या व्हेल माशांचा एक छोटा समुह शंभर एक मैल पोहुन इथे आलाय. समुद्रातुन ते चक्कं नदीच्या मुखात घुसतात. डेव्हिडसन कुटुंबांची घरे जवळ येताच जोरजोरात पाण्यावर शेपट्या मारून आवाज करू लागतात. तो आवाज ऐकुन घरातील माणसांची लगबग सुरू होते. वल्हवायच्या बोटी बाहेर निघतात. ८-१० जणांनी वल्हवायची एक बोट अशा दोन-तीन बोटी मोहिमेवर निघतात. किर्र अंधारी रात्रं. ओर्कांच्या चमकत्या शेपट्यांचा काय तो प्रकाश. बोटी त्या प्रकाशाच्या मागे जाऊ लागतात.खोल समुद्रात ओर्कांचा मोठा समुह या सर्वांची वाट पहात असतो. त्यांनीच खबर्या माशांना नदीवर पाठवले असते. खबर्यांचे आगमन काय सांगते? "ओर्निसियस ओर्कांनी बलिन व्हेल्सच्या शिकारीचे आयोजन केलं आहे. लवकरात लवकर मोहिमेवर या!!"
मोहिमेची आखणी आधीच झालेली असते. सावजाला कसे गाठायचे,कसे खिंडीत पकडायचे हे ठरवायचे काम ओर्कांचे. सावज समोर दिसले की माणसांनी भाल्यांनी बलिन व्हेल्सवर हल्ला करायचा. सावज मेले की माणसांनी त्याला समुद्रातच गळाला बांधुन ठेवायचे आणि घरी परतायचे. कारण शिकारीवर पहिला हक्कं ओर्कांचा. बलिनची जीभ आणि ओठ एव्ह्ढंच खाण्यात ओर्कांना रस. बाकीचा टाकाऊ भाग माणसांसाठी. दुसरे दिवशी माणसं पुन्हा येणार आणि उरलेलं सावज घेऊन घरी जाणार.
डेव्हिड्सन कुटंबातल्या तीन पिढ्यांनी ही मैत्री टिकवली व वाढवली. जखमी माणसांना संरक्षण द्यायला ओर्कांनी गोल रिंगण धरायचे. ओर्का कुठे दोरीबिरीत अडकले की माणसांनी सोडवायचे. समुद्रातील इतर वल्ह्यांमधुन डेव्हिडसन कुटंबाची वल्ही ओर्कांना सहज ओळखता येत.
एकदा डेव्हिडसन कुटंबातील एक सदस्य आपल्या लहान मुलांना घेऊन शिकारीवर आला. अपघात होऊन बोट उलटली. लहान मुलांचे देह सापडले, पण शिकार्याचा मृतदेह मात्रं सापडला नाही. दुसरे दिवशी ओर्कांनी मृतदेहाचा माग काढुन तिकडे माणसांचे लक्ष वेधले.
दरम्यानच्या काळात आधुनिक बोटी आणि तोफखान्यांनी व्हेल्सची शिकार करायचे तंत्र विकसित होऊ लागले. डेव्हिडसन कुटंबाने मात्रं अधिक हाव नं धरता आपल्या मित्रांबरोबरची पारंपारिक शिकारच सुरू ठेवली. ओर्कांनी जितके व्हेल मारले, त्यावरच कुटंबानी समाधान मानले.
१९०० साली बाहेरील एका व्यक्तिने समुद्र किनार्यावर पहुडलेल्या एका ओर्काला सुर्याने मारले. त्यानंतर ओर्कांनी किनारा सोडला. त्यावेळी समुहाची सदस्य संख्या १५ च्या वर होती. पुढच्या वर्षी त्यातील फक्तं सहाच परतले. त्या घटनेने कळपाचे विभाजन झाले असे मानले जाते.परत आलेल्या ओर्कांपैकी टॉम नावाचा ओर्का सर्वात जास्तं जगला. वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्याचे निधन झाले आणि त्याबरोबर एका कथेचा अंत झाला.
** परवा रॅलेमधे न्युस रिव्हर फिल्म फेस्टिव्हलमधे "किलर्स ऑफ इडन" हा सत्य घटनेवरील माहितीपट बघितला. (स्टोरी सांगितल्याबद्दल क्षमस्व!!) अधिक माहिती: http://www.killersofeden.com/
** माणुस आणि निसर्ग यांच्यातल्या सुदृढ परस्परावलंबनाचे (symbiotic relationship) हे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण. गांधीजींच्या म्हणण्याप्रमाणे "earth has enough to satisfy everybody's need but not anybody's greed."
** इतर शिकार्यांनी मात्रं रोगट परस्परावलंबन (Unsymbiotic relationship) कायम केले. त्याचा परिणाम म्हणजे सर्वच १९५० च्या सुमारास सर्वच जातीच्या व्हेल्सची संख्या इतकी कमी झाली की त्यांच्या संरक्षणासाठी कायदे करावे लागले.
** आंतरराष्ट्रिय दबावाला नं जुमानता जपान आणि नॉर्वे हे दोन देश अजुनही व्हेल्सची शिकार करतात. शास्त्रिय संशोधनाच्या गोंडस नावाखाली कायद्यांमधुन पळवाटा काढल्या आहेत. जपानी रेस्टॉरेंटसमधुन संरक्षित जातीच्या तसेच इतरही व्हेल्सचे मांस सर्रास विकले जाते त्यावरून मोहिमा शास्त्रिय संशोधनापुरत्याच मर्यादित नाहीत हे सिद्ध होते.
**जपानी सरकारच्या आशिर्वादाने चाललेल्या शिकारी मोहिमा व त्यांना विरोध करण्यासाठी ग्रीन पिस व सी शेफर्ड्सच्या मोहिमा दरवर्षी निघतात. बर्फाळ, खोल अंटार्क्टिक समुद्रात दरवर्षी हे नाट्य घडते. यंदाच्या संघर्षाला तोंड फुटले आहे. दोन्ही संकेतस्थळांवर त्याची माहिती वाचा.
7 comments:
Interesting information.
Thank you for sharing.
story sangitali tari harakat nahi.....eravi kuthe pahayala milala asata ha mahitipat??
interesting aahe hi mahiti. thanks for sharing.
Interesting information! and yu always write it in such a simple and an easy-to-understand language!
गाधीजींचे वाक्याचा संदर्भ अगदी चपखल.
हे जग फक्त मानवासाठीच आहे.
काश इतर प्राण्यांना मानवांचा प्रतिकार करता आला असता तर किंवा यांच्या पासुन आपले संरक्षण करता आले असते तर ?
निसर्गाने याबाबतीत मानव सोडुन दुसऱ्या जातीप्रजातीवर एक प्रकारचा अन्यायच केला आहे, मानवांपासुन आपले रक्षण करण्यासाठी त्यांना काहीच साधने दिली गेली नाहीत.
Free Willt हा चित्रपट पण मस्त होता.
Thanks for sharing this wonderful information. That's marvellous !
Fantastic piece of information!
Post a Comment