Saturday, January 12, 2008

ब्लॉग - भाग तीन

स्वतःच्या ब्लॉगला मागे टाकुन सदु पुढे निघाला.

काही पावले चालल्यावर त्याला एक ओळखीचा आवाज आला... कोणाचा हा आवाज? जरा डोकं खाजवल्यावर लक्षात आलं - मायकल. हो मायकलचाच आवाज तो. मायकल हा त्याचा ऑफिसमधला सहकारी. गेली अनेक वर्षे ते एकाच प्रोजेक्टवर काम करत होते.
"मायकल, मायकल? आर यु देअर?" सदुने जोरात हाक मारली. मायकलचा आवाज आला त्या दिशेने तो धावत सुटला. एका खोलीसारख्या दिसणार्‍या जागेत काही माणसे बसलेली त्याला दिसली. यात मायकल असेल का? इतकी वर्ष एका टीममधे असुनही टोरांटो ऑफिसमधे काम करणार्‍या मायकलला सदुने कधीच बघितले नव्ह्ते. निदान त्याचा फोटोतरी बघायला हवा होता. उशीरा सुचलेल्या या बुद्धिचा आता काहीच उपयोग नव्हता.

"मायकल, आर यु इन देअर ? आय एम स्टक हिअर... प्लीज हेल्प मी" जीवाच्या आकांताने सदु ओरडला, पण घशातुन आवाज अजिबात फुटला नाही.
अचानक मिटींग संपल्यासारखी ती माणसे उठुन सर्व दिशेला पांगली.
सदु वाट सापडेल तिकडे धावत सुटला...
धावता धावता मधेच कशाला तरी अडकुन पडला तो... हे काय? अरे ही टोपली कशाची? आणि हिचा आकार ओळखीचा वाटतोय... माझ्याघरी तर अशी टोपली नाही....ही... ही.... ही... रिसायकल बिन आहे - माझ्या डेस्कटॉपवरची. तेव्हढ्यात कसली तरी गडबड ऐकु आली. काही विचित्रं आवाज आणि आणखी काही आकृत्या. सदु कोपर्‍यात एका आडोशाला जाऊन लपला. एक मोठया आकाराचे रणगाड्यासारखे दिसणारे वाहन कर्कश्श आवाज करत आले. चिर्र चिर्र असा आवाज करत थांबले. त्या वाहनातुन एक मानवी हातासारखा दिसणारा हात बाहेर आला. त्या हाताने रिसायकल बिन उचलुन रणागाड्यात रिकामी केली आणि रिसायकल बिन पुन्हा जमिनीवर भिरकावली.


घरंगळत पायाशी आलेली ती टोपली वेड्यासारखी हातात धरून सदु पुढे चालु लागला...

क्रमशः

1 comment:

HAREKRISHNAJI said...

हे मात्र खर गिळतोय खरा आपल्याला सर्वांना हा संगणक. २०-२५ वर्षे एकत्र काम करत असुन सुद्धा कार्यालयीन सहकाऱ्याच्या नावा व्यतिरीक्त काहीच माहीती नसते.

पुढे काय ?