१३ ऑक्टो.
आज सकाळी धावत पळत (अक्षरश:) केकोच्या स्टुडिओमधे गेलो. त्यांच्याकडून फिरेंजे शहराचे द्रुष्य असलेले मोझेक विकत घेतले. स्टुडिओमधे एरवी मोझेकची विक्री होत नसल्यमुळे ते क्रेडिट कार्ड घेत नाहीत. एव्हाना आमच्याकडले युरो ट्रॅव्हलर्स चेक संपत आले होते. बॅंकेत जाऊन अमेरिकन डॉलरमधले ट्रॅव्हलर्स चेक देऊन रोख रक्कम काढायचा प्रयत्नं केला. पण त्यासाठी नुसते ओळखपत्रं दाखवून भागत नाही, तर पासपोर्ट जवळ असावा लागतो. तो आमच्या जवळ त्या वेळी नव्हता. म्हणून डेबिट कार्ड वापरुन एटीएम मधुन पैसे काढावे लागले.
उशीर होऊ नये म्हणून आज आम्ही बसनी प्रवास करायचे ठरवले होते, पण कुठे उतरायचे आणि चढायचे ते नीट माहित नसल्याने उलट जास्तच वेळ वाया गेला. एकदा तर बस गावाबाहेर जाऊ लागल्यावर काहीतरी घोटाळा झाल्याचे लक्षात आले.
इतकं असुनही निघण्याच्या आधी पलाझ्झो पिट्टी जमला तर बघावा म्हणुन तिथे गेलो पण तिकिट बरेच महाग होते आणि आम्हाला काही तितका वेळ नव्हता म्हणुन परतीची बस पकडली.
स्टेशनवर जायला टॅक्सी बोलवली होती. त्या टॅक्सीवाल्यानी इतका उशीर केला आम्ही पायी जायलो निघालो. तेव्हढ्यात तो आला. टॅक्सीमधे बसताच अर्थातच टॅक्सीवाल्याशी संवाद साधण्याची संधी नवरा सोडणार नव्हता. अगदी पाच मिनिटाचाच प्रवास होता तरी नवर्यानी मला डिक्शनरी काढायचे फर्मान सोडले. ती नेमकी आता सामानातुन शोधून काढायचा मला कंटाळा आला म्हणून मी टॅक्सीवाल्याला "पारले इंग्लिश?" (इंग्रजी येतं का?) तर तो म्हणाला हो. अडचण मिटली आणि दोघांचा संवाद सुरु झाला. तेव्हढ्यात स्टेशन आले. तिकिटे काढून बसची वाट पहात उभे होतो. मला जरा भूक लागली होती. व्हिगन पासपोर्ट घेऊन काही तरी खायला घेण्यासाठी मी स्टेशनच्या बाहेर पडले. जवळच्या एका बार मधे पासपोर्ट दाखवला आणि माझ्यासाठी स्पाघेटी आणि नवर्यासाठी जिलाटो घेऊन परत स्टेशनवर आले. ती चविष्ट स्पाघेटी नवर्याने चाखल्यावर त्याचीही भूक चाळवली. त्यावर ताव मारत असतानाच आमची बस आली. सामान डिकीत ठेऊन उरलेली स्पाघेटी बसमधे बसून खावी असे म्हणून मी चढू लागले, पण ड्रायव्हरसाहेबांना ते मुळीच रुचले नाही. इटालियन मधे काही तरी बडबड करत त्याने मला खाली उतरायला लावले. त्यावेळी माझ्या लक्षात आले की आधीही आम्ही असं बस स्टॉपवर उभ्या उभ्या खात असल्याचं पाहून लोक आमच्याकडे विचित्रं नजरेनी पहात होते. अमेरिकेत लोक सतत खाण्याचे पदार्थ हातात घेऊन इकडून तिकडे जात असतात. खाण्यासाठी वेगळा वेळ घालवणे त्यांना मुळीच आवडत नाही, पण इथे मात्रं ही कल्पना तेव्हढी मान्य नाही असे दिसते. असो. उरलेली स्पाघेटी कशीबशी घशाखाली उतरवल्यावर बसमधे चढायला मिळाले.
काही मिनिटातच शहराचा गाजावाजा मागे टाकत, डौलदार वळणे घेत आमची बस ट्स्कनी प्रांताकडे निघाली. टस्कनीचे निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी आम्ही दोघेही आतूर झालो होतो. हिरव्यागार टेकड्या, ऑलिव्हची झाडे, निमुळ्त्या पेन्सिल सारखे दिसणारे सायप्रस वॄक्ष टस्कनीच्या कंट्रीसाईड मधे आमचे आगमन झाल्याची वर्दी देऊ लागले. दोन तास कसे गेले ते कळलेही नाही.
सिएना बस स्टॉपवर उतरलो तेव्हा सर्व्हास सद्स्य व्हिनिचिओ आमची वाटच बघत होते. त्यांचे प्रसन्न व्यक्तिमत्व बघुन आमचा प्रवासाचा होता नव्हता तो शीण पार विरुन गेला. त्यांच्या गाडीत बसुन आम्ही होटेलमधे गेलो. १०-१५ मिनिटात तयार होऊन खाली आलो.
आजचा दिवस एका वेगळ्याच कारणासाठी महत्वाचा आहे आणि मी या दिवसाची आतुरतेने वाट पहात होते. का ते तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. तुर्त आम्ही व्हिनिचिओंच्या गाडीत बसुन शहराचा फेर-फटका मारायला निघालो आहोत. फिरेंजेच्या मानाने सिएना खुपच लहान आहे.
१२ व्या शतकात सिएना हे या भागातले सर्वात महत्वाचे शहर होते - फिरेंजेपक्षाही महत्वाचे. त्या काळात ही छोटी-छोटी राज्ये होती. सिएना आणि फिरेंजे ही प्रतिस्पर्धी राज्ये होती. पण १३ व्या शतकात सिएनाला प्लेगने गाठले, त्यामधे या शहराची जी हानी झाली ती आजतागायत भरुन निघालेली नाही. टेकडीवर वसलेले किल्लेवजा शहर कोटाच्या आत बंदिस्त आहे. आमचे हॉटेल कोटाच्या जरा बाहेर असल्याने आम्हाला फारच सोयीचे झाले आहे. (तो कोट आणि त्याचे दरवाजे पाहुन मला अमरावतीच्या केविलवाण्या कोटाची आठवण झाली. पण इटली प्रवास संपवुन भारतात गेल्यावर यंदा मात्रं कोटाच्या बाहेरचे अतिक्रमण हटवुन सौंदर्यीकरण केल्याचे पाहुन मला सुखद धक्का बसला). कोटाच्या आत वाहनबंदी घालण्यात सिएनाचा पहिला नंबर लागतो. ऐका, ऐका या हॉटेलमधुन कपबशांचीही किणकिण ऐकु येते आहे की नाही? इथे गाड्या असत्या तर त्या घरीघरी पुढे तुम्हाला दुसरे काही ऐकु आले नसते. आज जगातल्या किती तरी शहरांनी सिएनाचे अनुकरण केले आहे. व्हिनिचिओ अभिमानाने सांगत होते.
पहिल्या दरवाज्याच्या आत थोडे पुढे गेल्यावर पियझ्झा सेलिम्बेनि आला. इथे जगातली सर्वात प्राचीन बॅंक सुरू झाली. इस १४७४ मधे सुरु झालेली ही बॅक आजही कार्यरत आहे. व्हिनिचिओंच्या मते सलिनबेनी यांनी स्वत: ही बॅंक सुरु केली. पण मी जे काही वाचले आहे, त्यामधी तसा उल्लेख कुठेही आढळत नाही. सलिमबेनी हे एक कलाकार होते आणि बॅंकेचे प्रमुख कार्यालय सलिमबेनी पियाझ्झामधे आहे याच्यापलिकडे सलिमबेनीचा आणि बॅंकेचा संबध असल्याचे मला तरी काही सापडले नाही. वाचकांपैकी कुणाला याची माहिती असेल तर जरूर नोंद करा. फ़्रन्सिस्कन ऑर्डरच्या धर्मगुरुंनी बँकिग व्यवस्था प्रस्थापित केली. इटली मधील चर्चची भव्यता पाहुन त्यांच्या ताब्यात किती प्रचंड संपत्ती होती ते लक्षात येते. त्यामुळे धर्मगुरूंच्या अर्थकारणाच्या ज्ञानाबाद्दल मुळीच आश्चर्य वाटायला नको. त्यात असिसीचे सेंट फ्रॅन्सिस हे पददलितांचे कनवाळु होते. रिनायसंसच्या सुरुवातीच्या काळात श्रीमंत आणि गरीबांमधली दरी वाढत होती. ती कमी करण्याच्या समाजोपयोगी ध्येयाने प्रेरित झालेल्या मॅजिस्ट्रेटने या बॅंकेची स्थापना केला.
चालत चालत आम्ही पियाझ्झा डी कॅंपोमधे आलो. चारी बाजुंनी भिंतींनी वेढलेल्या या पियाझ्झामधे उतराय्ला पायर्या केल्या आहेत. हा पियाझ्झा सिएनाच्या जनजिवनाचा एक महत्वाचा हिस्सा आहे त्याप्रमाणे इतिहासाला जोडणाता एक महत्वाचा दुवा आहे. आजही इथे घोड्याच्या शर्यतींची परंपरा चालवली जाते. शिंपल्याच्या आकाराच्या ह्या प्रचंड पियाझ्झामधे चौपाटीवर असावे असे वातावरण होते. आजुबाजुला छोटी-छोटी खाद्यपदार्थांची दुकाने, आणि उन्हात पहुडलेले लोक हे खुणावणारे दृष्य असले तरी त्यावेळी आम्हाला तिथे थांबता येणार नव्हते.
उद्या आम्हाला कार भाड्याने घेऊन उम्ब्रिया प्रांताकडॆ रवाना व्हायचे आहे, म्हणुन व्हिनिचिओं बरोबर आम्ही हर्टझ कार रेंटल मधे जाऊन सगळं ठरवुन आलो.
संध्याकाळी व्हिनिचिओंच्या एका मित्राकडे खास आमच्यासाठी एक पार्टी आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे गावाचा फेरफटका आटोपता घेऊन आम्ही व्हिनिचिओंच्या घरी गेलो. व्हिनिचिओंची पत्नी पियेरा व मोठी मुलगी अमिलिया यांच्याशी परिचय झाला. उत्तम प्रतीच्या ऑरगॅनिक सफरचंदांच्या रसाचा आस्वाद घेतला. व्हिनिचिओं शांतीवादी तसेच पर्यावरणवादी असल्याने निसर्गाशी समतोल साधुन उत्पन्न केलेले ऑरगॅनिक खाद्यपदार्थ तसेच, नैसर्गिक संपदा कमीतकमी वापरण्यासाठी जवळपासच्या परिसरात निर्माण केलेल्या वस्तु घेण्याकडे त्यांचा कल आहे.
थोड्याच वेळात आम्ही सर्व व्हिनिचिओंच्या गाडीतुन त्यांचे मित्रं एड्रियानो यांच्या घरी जायला निघालो. एड्रियानोंचे घर गावाच्या बाहेर एका माळरानावर आहे. गाडीत गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. आश्चर्य म्हणजे छोटी अमिलियाही मोकळेपणानी गप्पांमधे सहभागी झाली होती. कारण काहीही असो, पण त्या वयातील अमेरिकन मुले मोठ्यांशी अगदी कमीतकमी संवाद साधतात. अगदी नजरही भिडवत नाहीत. त्या पार्श्वभुमीवर अमिलियाचा मोकळेपणा वार्याच्या झुळुकेप्रमाणे आल्हाददायी वाटला. सिएना हे टुरिस्ट आकर्षण असल्यामुळे त्यांच्याकडे महिन्यात एकदा तरी सर्व्हास प्रवासी येऊन रहातात. अशा वातावरणात वाढल्यामुळे ती काही वेगळी आहे, की सर्वच इटालियन मुले तिच्या सारखी आहेत ते मला सांगता येणार नाही, पण तिच्या निरागस वयाला शोभतील अशा शाळेतल्या गमती-जमती, पुस्तके, संगीत अशा विषयांवर गप्पा मारायला मला फार आवडले. एड्रियानो आणि त्यांची पत्नी मौरा यांच्या फार्महाऊसवर पोचेपर्यंत अंधारच पडला होता. हसतमुखाने त्यांनी आमचे स्वागत केले. एकिकडे त्यांचा दहा वर्षांचा मुलगा टिटो आणि कुमारी अलिचिया यांचे बालसुलभ खेळ सुरु झाले. मोनिका नावाच्या आणखी एक सर्व्हास सदस्याही तिथे आल्या होत्या. फळांचा रस आणि खास आमच्यासाठी केलेल्या उत्तम खाद्यपदार्थांनी केलेल्या पाहुणचाराने आम्ही भारावुन गेलो. काही वेळात पियेरा अमिलियाची छोटी बहिण एंजिलिनाला घेऊन आली. एंजेलिनाचा नृत्याचा क्लास तिथुन जवळच असतो. पण मगाशी म्हंटल्याप्रमाणे या मैफिलीचा उद्देश काही वेगळाच आहे. एड्रियानो काही वर्षांपूर्वी भारतात गेले होते, आणि तिथुन त्यांनी एक सतार आणली आहे. मी सतार वाजवते हे ऐकुन त्यांना कोण आनंद झाला होता! या दिवसाची ते किती वाट पहात होते ते त्यांच्या उत्साहावरुन लक्षात येत होते. एड्रियानो स्वत: संगितज्ञ असले तरी अनेक वर्षात त्या सतारीच्या तारा जुळवलेल्या नव्हत्या. एक तरफेची तारही तुटली होती.
ती कशी लावायची आणि पाश्चात्य पद्धतीचे सूर वापरून तारा कशा जुळवायच्या ते मी त्यांना दाखवले. त्यानंतर यमन आणि बागेश्री वाजवुन दाखवला. भारतिय व्यक्तिने आपल्या घरी येऊन सतार वाजवुन दाखवल्याचे अप्रूप त्यांच्या चेहर्यावर स्पष्टं दिसत होते. त्याच प्रमाणे इटलीमधे भारतिय संस्कृतीबद्दल असलेले त्यांचे प्रेम बघुन आणि इथे येऊन चक्कं सतार वाजवायला मिळाल्यामुळे मी ही भारवुन गेले होते. शिवाय नवर्याने स्वत:चे पाककलेचे पुस्तक भेट देऊन सगळ्यांच्या आनंदात भरच टाकली होती.
हा कार्यक्रम संपवुन आम्ही सगळे जवळच्या एका गावात पिझ्झा खायला गेलो. अशा छोटेखानी घरगुती खाणावळीत पिझ्झा खाण्याची आमची इच्छा होतीच. आतल्या खोलीत बसलेल्या घोळक्याच्या गप्पांचा आवाज बाहेरपर्यंत येत होता. मालक बहुतेक गिर्हाईकांना जातीने ओळखत होते. अमेरिकेतल्या यांत्रिकी जिवनात अशी रंगत नाही असे मी नवर्याला म्हणायला आणि "ईट इज व्हेरी नॉयजी हियर" असे त्यानी म्हणायला एकच गाठ पडली!!
मग आमच्या इटालियन मित्रांनी खाणावळीच्या मालकांना "आमचे पाहुणे व्हिगन आहेत, त्यांना दुध, अंड चालत नाही ..." वगैरे वगैरे सांगत होते. त्यांचा मदतीने आम्ही पालकाची भाजी, मशृम पिझ्झा आणि व्हाईट पिझ्झा ऑर्डर केला.
असा पिझ्झा खाण्याचा योग पुन्हा पुन्हा येत नाही. खाता खाता अर्थातच गप्पा रंगल्या होत्या. टिटो भारतात जाऊन एक दो तीन चार ... दहा पर्यंत शिकला होता. ते त्याने आम्हाला म्हणुन दाखवले. अशा सगळ्या गमती जमती सुरु असतानाच व्हिनिचिओनी नकाशा दाखवुन उद्या मोंतालीला कसे जायचे ते मला समजवुन सांगितले.
जेवणे आणि गप्पा आटोपल्यावर व्हिनिचिओंबरोबर आम्ही हॉटेलमधे परत आलो. रात्रं बरीच झाली होती, तरी उद्या सिएना बघायला फार वेळ मिळणार नाही म्हणुन आम्ही पुन्हा एकदा शहराचा फेर फटका मारायचे ठरवले.
हॉटेलपासुन डुओमोपर्यंत चालत गेलो. निरनिराळ्या दुकानात डोकावुन बघितले, पुरातन इमारती, चर्च, अरूद पूल, बारिक गल्ल्या.. जमेल तितके सिएना बघुन हॉटेलमधे परतलो.
आजची सुरेल संध्याकाळ कायमची स्मृतींमधे कोरली आहे.