Wednesday, May 30, 2007

अंतिम युद्धं - भाग ६

ही बघा, नॅनो स्पिटिकलवर काढलेली क्झोटिसॉर्सची व्हिडिओ पहा. घाबरू नका. दिसायला विचित्रं असलेत तरी स्वभावानी अतिशय समंजस आहेत ते. हे जे ओंगळ्वाणे दिसणारे लोंबणारे अवयव आहेत, हे त्यांचे बघण्याचे आणि ऐकण्याचे काम करणारे संयुक्त सेन्सर्स आहेत. क्झोटिसॉर्सना तीनपेक्षा जास्तं परिमिती म्हणजे डायमेंशन्स दिसू शकतात. त्यामुळे आपल्या डोळ्यांना जे कधीच दिसू शकणार नाही अशा गोष्टी ते पाहू शकतात. तसं पाहिलं तर सर्वच अवयव आपल्यापेक्षा सरस आहेत. मेंदूचा आकार आपल्या मेंदूपेक्षा मोठा आहे. म्हणजे आपल्याहून जास्तं कॉन्व्होल्युशन्स होत असल्याने ते आपल्यापेक्षा जास्तं संवदनाक्षम आहेत. हात-पायसदृश सहा अवयव त्यांच्या शरीराच्या कुठल्याही भागातून बाहेर येऊ शकतात. आवश्यकतेप्रमाणे ते द्विपाद, त्रिपाद किंवा चतुश्पाद बनू शकतात. शेपटीसारखे जे दिसते आहे ते खरे म्हणजे त्यांचे तोंड आहे. या तोडांत लहान लहान अशा शंभर एक जीभा असतात. एक दुसर्‍याला अभिवादन करण्यासाठी किंवा नविन गोष्टं आजमावण्यासाठी या तोंडानी ते समोरच्या व्यक्तिला किंवा वस्तूला विळखे घालतात. तसे केल्याने त्या जीभांमधून मग त्यांची लाल रंगाची लाळ बाहेर पडते. क्झोटिसॉर्सचे रक्तं जर्द पिवळ्या रंगाचे असते. दूधाचा रंग निळसर असतो.
आपल्या मिशन एन एस के ३२३ च्या रोबॉटसनी काही क्झोटिसॉर्सना बंदी बनवून त्यांना ५ टिलनवीर ह्या अंतराळातील प्रयोगशाळेत आणले. त्यांचा काही दिवस अभ्यासकरून त्यांनी ट्रॅकिंग कॉलर बसवून पुन्हा नॅनो स्पिटिकलवर नेऊन सोडले. त्या प्रयोगातून मिळालेल्या माहितीने तर मी अचंबित झालो.
ह्या ग्रहावरची जीवसृष्टी आपल्यापेक्षा अतिशय वेगळी आहे. नुसती वरकरणी नाही तर अगदी अंतर्भूत फरक आहेत. क्झोटिसॉर्स आणि इतर सस्तन प्राणी हे त्रैलिंगी आहेत. म्हणजे जननासाठी त्यांना तीन क्रोमोसोमची गरज असते. स्त्री,पुरूष आणि विरूष अशी तीन लिंगे आढळतात. क्झोटिसॉर्सचे सरासरी आयुष्य ५०० नॅनो स्पिटिकल वर्षांइतके (म्हणजे पृथ्वीवरच्या ६२४२ वर्षांइतके असते). वयाच्या पंच्याहत्तर ते शंभर वर्षांत त्यांना जनन क्षमता येते. गुंतागुंतीच्या समागम प्रक्रियेतून जाऊन क्झोटिसॉर्स स्त्रीची गर्भ-धारणा होते. मातेच्या उदरात ३८ नॅ.स्पि. महिने राहून बाळाचा जन्म होतो. तिघेही पालक बाळाचे चालता येईपर्यंत संगोपन करतात. त्यानंतर बाळ कळपात सामिल होते. कुटुंबामधे पुरूष आणि विरूष यांची जोडी आधी जमते. कालांतराने त्यात स्त्रीचा समावेश होतो. त्यांनंतर तिघे आयुष्यभराचे साथीदार बनतात. तिघांपैकी किमान दोन साथीदार दोन वेगळ्या कळपातून आलेले असतात.
क्झोटिसॉर्सचे सामाजिक आयुष्य समॄद्ध आहे. १.२ मायक्रो हर्ट्झ ते ८०००० मेगा हर्ट्झ पर्यंत त्यांच्या आवाजाची रेंज आहे. त्यामुळे अंतर कळप आणि आंतर कळप संदेशवहन सहज शक्य होते. एका कळपातील सदस्यांनी दुसर्‍या कळपाला भेट दिल्याचीही उदाहरणे बघायला मिळाली आहेत. या ग्रहावर इतर मांसाहारी प्राणि असले तरी क्झोटिसॉर्स मात्रं संपूर्ण शाकाहारी आहेत.
या वर्णनावरून नॅनो स्पिटिकलवरची जीवसृष्टी किती वेगळी आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल. इतर प्राणि तसेच वनस्पतीही त्रैलिंगीच आहेत. आपल्या मिशन्सनी तिथे पृथ्वीवरील झाडांच्या बिया पेरून बघितल्या पण त्यातून रोपे बाहेर आली नाहीत. आपण त्या जीवसृष्टीशी सुसंगती साधून सहजीवन करणे अशक्य आहे असा स्पष्टं निष्कर्ष आमच्या संशोधनातून निघत होता. त्यामुळे नॅनो स्पिटिकलचा विचार स्थलांतरासाठी करू नये व क्रिस्टो बिटावर जीव सृष्टी नसल्याने त्यावरच लक्ष केंद्रित करावे असे आमच्या अहवालात नमूद केले. पण त्यानंतरही नॅनो स्पिटिकलवर अंतराळ मोहिमा आखल्या जाऊ लागल्या तेव्हा मी अंतराळ संरक्षण केंद्रातील तसेच इतर संबंधित विभागातील लोकांना इन्फोटेशेन्स दिले. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. अंतराळ संरक्षण खात्याने मला दिलेले हे ठोकळेबाज उत्तर:
"नॅनो स्पिटिकलवरच्या जीवसृष्टीत समरस होणे आपल्याला फारच आव्हानात्मक आहे. शांततेचा मार्ग अवलंबिणे हाच आमचा उद्देश आहे. परंतू मानवी जीवन हे बहुमूल्य आहे. त्यावर कोणी हल्ला केल्यास त्याला उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत. आपल्या लष्करी सामर्थ्याने आपण कोठेही मानवी आयुष्याची उभारणी करू शकतो याची अंतराळ संरक्षण विभागाला पूर्ण खात्री आहे. इतर संशोधन विभागांच्या अहवालानुसार नॅनो स्पिटिकलवरवर मानवी जीवन २५००० वर्षे अधिक टिकू शकते. त्यामुळे अधिक वेळ वाया नं घालवता सर्व शक्तिनिशी नॅनो स्पिटिकल स्थलांतर मोहिमेला सुरूवात केली जाईल."
माझे मन सुन्न झाले. मानवी जीवन बहुमूल्य आहे म्हणजे काय? इतर जीवांशिवाय मानवी जीवनाची काय किंमत आहे ते आज दिसतेच आहे. त्या आश्चर्यजनक क्झोटिसॉर्सचे जीवन कमी मूल्याचे आहे काय? त्यांच्या घरात तुम्ही गेलात तर ते तुम्हाला येऊन प्रेमाने विळखा घालतील. पण त्यांची लाळ तुम्हाला विषारी आहे हा काय त्यांचा दोष? मग तुम्ही मेलात तर क्झोटिसॉर्सनी तुमच्यावर हल्ला केला असे म्हणून त्यांना मारणार? हे योग्य आहे काय? नैतिकतेमधे बसणारे आहे काय? मानवतेला धरून आहे काय?
नॅनो स्पिटिकलवरवर मानवी जीवन २५००० वर्षे अधिक टिकू शकते म्हणजे काय? एकेका ग्रहावर जायचे, तिथले कोट्यावधी वर्षांचे जीवन केवळ काही हजार वर्षात नष्टं करायचे हे तुम्हाला मान्य आहे का? अशी टोळधाड बनण्यातच तुम्ही धन्यता मानणार का?
पृथ्वी आपली माता आहे, तिला तिचे पूर्वीचे वैभव परत करायची आपल्यावर नैतिक जबाबदारी आहे. तिच्याच आश्रयात पुन्हा आपले आणि इतर प्राणिमात्रांचे पुनर्वसन करायचे माझे स्वप्नं आहे. हे स्वप्नं सत्यात उतरू शकते यावर माझा आणि माझ्या सहकार्‍यांचा पूर्ण विश्वास आहे. परंतू त्याचबरोबर अनेक गोष्टींचा त्यागही करावा लागणार आहे....

क्रमशः

1 comment:

Ashwinis-creations said...

संगीता
एकदम नाविन्यपूर्ण कल्पना आहे. छान स्टोरी.

परग्रहावरील जीवन .....कसेही असू शकेल!
नॉट नेसेसरी की ते मानवी जीवनाशी साधर्म्य सांगणारे असावे!

लिहीत रहा

अश्विनी