Wednesday, May 02, 2007

अंतिम युद्धं - भाग १

५ मार्च ५००७
ठिकाण:
वडुरा ट्यूब रेल्वे स्टेशन.
लोणीहून येणारी ५.४५ फ्लॅशफास्ट जराही आवाज नं करता थांबली. गाडीचे स्वयंचलित दरवाजे उघडले आणि आठ वर्षांची आंद्रेशा जवळ-जवळ उडया मारतच बाहेर पडली. प्लॅटफॉर्मवर तिचे आजी-आजोबा उभे होते. त्यांच्याकडे ती धावत धावतच पोचली. "हॅपी बर्थ डे आंद्रेशा!" आजी म्हणाली. "आजी आजी, आम्ही आज म्युझियममधे गेलो होतो!" "आंद्रेशा, थॅंक यू म्हणायचं कोणी हॅपी बर्थ डे म्हटलं की" आंद्रेशाची आई विरीता गाडीतून उतरता उतरता म्हणाली. तिच्या मागून आंद्रेशाचा मोठा भाऊ केवल आणि बाबा शिखरही उतरले. "अरे व्वा, मज्जा आहे मग एका मुलीची बा! काय काय बघितलं म्युझियममधे?" आजोबांनी विचारलं. "झाड, कुत्रा आणि गाय आणि माकड" आंद्रेशा म्हणाली, आणि ते छोटं माकड झाडावर उड्या मारत होतं अशा अशा.."
फ्लॅशफास्ट आल्या दिशेनीच जमिनीमधे लुप्तं झाली आणि सगळी मंडळी आता पार्किगकडे जाणार्‍या एस्केलेटरच्या दिशेने चालू लागली. एस्केलेटरवर उभे असतानाच स्टेशनवर घोषणा झाली. "सूर्यास्ताची वेळ". "बाई ग,वेळ कसा गेला कळलंही नाही. अजून कितीतरी कामं राहिली आहेत उद्याच्या पार्टीच्या तयारीसाठी! शिखर, उद्या सूर्योदयाची घोषणा झाल्याबरोबर मला उठव हं, आणि तू आणि केवल जरा शॉपिंग कराल का प्लिज उद्या? आणि हो, ढेरे पाटील फुड कंपनीला केक सांगायचा राहिला आहे तो पण सांग ना प्लिज." विरिता एकेक सूचना देत असतानाच एट्रियम आलं. शिखरने त्याचा रिमोट दाबला आणि काही क्षणातच कार त्यांच्या समोर येऊन उभी राहिली.
"मी समोर बसणार आणि दादा तू माझ्या बाजूला बस म्हणजे आपण सेंचूरा खेळूया घरी जाता जाता". आंद्रेशा म्हणाली. तिचं ऐकेल तो तिचा दादा कसला, पण "बस रे जरा, आज तिचा वाढदिवस आहे" असं आईने बजावल्यावर तो तयार झाला. बच्चे कंपनी समोरच्या सीटवर बसल्यावर मोठ्यांनी आपला मोहोरा मागे वळवला. केवलने डेस्टिनेशन पॅनेल मधून "आमचे घर" निवडल्यावर कार सुरू झाली. कार सुरू होऊन जेमतेम मिनिटभरच झालं असेल नसेल तेव्हढ्यात "ऑक्सिजन नियरिंग रिफिल लेव्हल. शुड आय पुल ओव्हर टू द नियरेस्ट रिफिल स्टेशन? यु हॅव १०० मोअर किलोमिटर्स टू गो विथ ऑक्युपन्सि ऑफ ८" कारनी घोषणा दिली. "य़ेस" शिखर म्हणाला. "छिछिक छिछिक" असा आवाज करत कारने मार्ग बदलला.
विरीता:आत्ता अगदी घ्यायलाच हवा का शिखर ऑक्सिजन? आधीच उशीर झाला आहे
शिखर: होय गं फर्स्ट थिंग फर्स्ट. परवा शर्मांथिल साहेबांच्या गाडीचा ऑक्सिजन इंडिकेटर खराब झाल्यामुळे त्यांना शेवटी इमर्जंसी क्रू ने रेस्क्य़ू केलं ते आठवतय ना? जवळपास बेशुद्धच पडले होते साहेब. गाडी नविन असली तरी या बजाजच्या गाड्यांचा भरोसा नाही
विरीता:मग थांबतोच आहोत तर ड्रायव्हिंग बॅटरीही रिचार्ज करून घे म्हणजे पुन्हा कटकट नको.
शिखर:चालेल.
केवल:बाबा,मला रस्त्यात निलोफरकडे सोडू शकता प्लिज?
विरीता:अरे असं आल्या-आल्या काय? तिला विचारलंयस का येऊ का म्हणून?
शिखर: सोडतो रे - अहो तुमची मात्रं कमालच आहे - हा येणार ते काय निलोला माहित नसणार की काय? मात्रं आईने सांगितलेली कामं विसरू नकोस बाबा - नाहीतर माझी वाट लागायची. निलोला आपल्या गाडीचा पोर्ट नंबर फीड करायला सांग त्यांच्या गॅट्रियममधे.
केवल: बाबा आपली गाडी त्यांच्या ट्रस्टेड कारलिस्ट मधे आधीच एंटर केली आहे.
शिखार: आs हाs - गाडी बरीच पुढे गेलेली दिसत्येय तुमची.
केवल: बाबाs
शिखर: लाजतोस काय बेट्या मुलीसारखा - जाऊ दे चांगली फुल स्पिडमधे.
आंद्रेशा:हसताय काय सगळे? दादा - खेळ ना - तुझी पाळी - नाहीतर मी जिंकेन बर?
केवलने "निलोचे घर" हा थांबा गाडीच्या रस्त्यात फिड केला.
निलोच्या घरासमोर गाडी येताच गेट्रियमचा दरवाजा उघडला. निलोफर गेट्रियममधे उभीच होती. गाडीतून उतरणार्‍या केवलने जवळपास ओढतच तिला आपल्या मिठीत घेतले आणि कपाळाचे चुंबन घेऊन "किती दिवसांनी भेटतोय तुला?" असा प्रश्नं केला.
निलोने मग इतरांना अभिवादन करून घरात येण्याचा आग्रह केला.
विरीता: आज नको गं बाई, पण आईला सांग पुढच्या वेळेला नक्की येईन. आणि शिवाय उद्या येताच आहात तुम्ही पार्टीला नाही का?
निलो: बरं.
शिखर:बरंय तर - चला आता (केवलकडे बघून एक डोळा मिचकावून )- सगळे अगदी फुल स्पिडमधे हं!! टाsटाs.
म्हणेस्तोवर गाडी गेली सुद्धा.
निलोफरने हाताची घडी घातली आणि प्रश्नार्थक मुद्रेने ती केवलकडे बघू लागली.
केवल: प्लिज असं पाहू नकोस माझ्याकडे.
निलो: केवल, गेल्या वेळी रागारागाने निघून गेलास तेव्हा आपली पुन्हा भेट होईल असं वाटलं नव्हतं मला. तू पूर्ण विचार केलायस का?
केवल:निलो, मी बराच विचार केला आहे, पण निर्णय घेण्याआधी मला अधिक माहिती हवी आहे.
निलो: म्हणजे माझ्यावर विश्वास नाही म्हणायचा तुझा?
केवल: कुठल्याही गोष्टीचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय निर्णय घेत नाही मी.
निलो: दॅटस फेयर. पण मिळालेल्या माहितीची गोपनियता ठेवायची काळजी घेतली आहेस ना?
केवल: ते तू माझ्यावर सोड. कुठल्याही इंटेलीवर्कच्या ट्रेसमधे नं येणारा इन्फोट्रिस असेंबल केला आहे मी. हवं तर तू टेस्ट करून बघ स्वतः.
निलो: ओके. चल मग माझ्या खोलीत जाऊ या.
घरात शिरताच निलोफरच्या आई-बाबांनी केवलचे स्वागत केले.
नि.ची आई: अरे या या या किती दिवसांनी आलास - ये बस.
नि.चे बाबा:अभ्यासाचा फार ताण दिसतोय हल्ली? काय घेणार थंड का गरम?
केवल: ऑलमोस्ट नॅचरल कोक चालेल.
नि.चे बाबा: निलो - तू घेणार का काही?
निलो. नको बाबा अगदी आत्ताच कॉफी घेतलीए मी.
नि.च्या बाबांनी तीन ड्रिंक्स बनवून एक केवलला दिले, एक नि.च्या आईला आणि उरलेला ग्लास स्वतः रिचवू लागले.
बरं का केवल? आमच्या क्लबचा प्रेसिडेंट झालोय मी यंदा. बरेच नविन उपक्रम हातात घेतले आहेत.
निलोफर उठून केवलच्या मांडीत येऊन बसली. त्याच्या गळ्यात हात टाकून त्याची चुंबने घेऊ लागली.
"किती वाट पहात होते मी तुझी केवल. किती जीव कासाविस झाला होता तुला भेटायला.
अरे हो - माझा नविन जिओटेल दाखवायचाय तुला - चल ना माझ्या खोलीत प्लिज. बाबा, प्लिज तुम्ही नंतर बोला हं केवलशी?सॉरी.."
"बरं बरं बेटा.." नि.चे बाबा स्मित हास्य करत म्हणाले.
निलो. ओढतच केवलला वरती आपल्या खोलीत घेऊन गेली.
"छान नाटक करता येतं की तुला" दार बंद होताच निलोच्या मिठीतून सुटलेला केवल म्हणाला.
"मग? अरे बाबांनी अजून दोन तास पिडला असता तुला त्यांच्या क्लबच्या गोष्टी सांगत. आणि तू काही कमी नाटक केलं नाहीस गाडीतून उतरताना हं?" इति निलो.
केवलने त्याच्या बॅगमधून एन्फोट्रिस बाहेर काढला. निलोने स्वतःची आय.डी. प्लग इन करून केवलच्या एन्फोट्रिसवर साइन ऑन केलं. मग स्वत:च्या एन्फोट्रिसवर साईन ऑन करून ग्लोबल आय.डी. स्कॅन एप्लिकेशन सुरू केला.
"वन ग्लोबल साईन ऑन फॉर गिव्हन आय.डी." असा मजकूर झळकला.
"गुड जॉब डियर" निलो. ने केवलचे अभिनंदन केले.
"मग आता आलो का तुझ्या विश्वासाच्या वर्तुळात?"-केवल
"अजून काही टेस्टस बाकी आहेत." - निलो.
टेस्ट सुरू करून निलो आपल्या कपड्यांच्या क्लोजेटमधे गेली. अंडरपॅंट ठेवायचा कप्पा रिकामा केला. कप्प्याचा तळ बाजूला सारून त्यातल्या गुप्त कप्प्यातून एक मेमरी स्टिक बाहेर काढली. हे सगळे केवलला दिसणार नाही याची खबरदारी घेत कपडे बदलल्याचं भासवत बाहेर आली.
एव्हाना केवलच्या एन्फोट्रिसने शेवटची टेस्टही पास केली होती.
ट्रेस ऑफकरून निलोफरने स्टिक केवलच्या एन्फोट्रिसमधे इन्सर्ट केली.
त्याबरोबर निदा एड्रियानोंचे भाषाण सुरू झाले.
"आज मी तुम्हाला आपल्या पृथ्वीचा इतिहास सांगणार आहे आणि तिचे भविष्यही..." केवल लक्षपूर्वक ऐकू लागला....

क्रमशः


व्याख्या:
एट्रियम- ऑक्सिजनेटेड झोन आणि नॉन-ऑक्सिजनेटेड झोन मधली जागा. ज्या गोष्टींना ऑक्सिजनची गरज नाही त्या इथून नॉन-ऑक्सिजनेटेड झोनमधे पुश किंवा पुल करण्याची यंत्रणा इथे सज्ज असते.
गेट्रियम: गराज एट्रियम
एन्फोट्रिस:तीन हजार वर्षांनतरचा लेटेस्ट कॉंम्प्युटर.
इंटेलीवर्क: तीन हजार वर्षानंतरचे लेटेस्ट ग्लोबल नेटवर्क
जिओटेल:तीन हजार वर्षानंतरचे टिव्हीचे लेटेस्ट मॉडेल.

2 comments:

Anonymous said...

Suruvaat tar khup chhan keliye...Khup majja aali vaachtaana...really egar to know the actual story.

One of your regular reader,
Ajit

TheKing said...

Am anxious to read the next part!

Lavkar please!!