Thursday, May 24, 2007

अंतिम युद्धं - भाग ५

"हे बघा २१ व्या शतकातील एक दृष्य. निळे आकाश, हिरवी झाडे, पिवळं ऊन, पक्षी, प्राणि, समुद्रं किनारा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वातावरणात असलेला प्राणवायू - ऑक्सिजन! हे सगळं जणू कायमचं असंच राहिल याच भ्रमात ही मंडळी साधन-संपदा उपभोगत राहिली. एकामागून एक प्रजाती अस्तंगत होत गेल्या पण यांनी त्याची विशेष दखल नं घेता आपली रहाणी आणि विचारसरणी तशीच कायम ठेवली. मनुष्य प्राणि हा सर्वात श्रेष्ठ आहे आणि इतर सर्व काही त्याच्या दिमतीसाठीच निर्माण करण्यात आलं आहे अशी त्यांची ठाम समजूत होती. त्या काळातला फूड ट्रॅंगल नावाचा तक्ता याचा पुरावा देतो. त्यांची ही समजूत अगदी चुकीची आहे हे आज जरी आपल्याला माहित असले तरी त्यावेळी तसे म्हणणार्‍यांना वेड्यात काढण्यात येई.
मानवाचे सुखसोयींवरचे अवलंबित्व कायमस्वरूपी करण्यात या समाजाचा मोठा वाटा आहे.
२७०० साली समुद्रातील उरले सुरले बर्फ वितळले त्याचवेळी हिमालयातील शेवटचे ग्लॅशियरही वितळले. भारत देशात अंतर्गत यादवीला सुरूवात झाली. समुद्र किनार्‍यावरून आत स्थलांतर करणारे लोक व गंगा यमुनेच्या खोर्‍यातून तापी-नर्मदा-गोदावरीच्या-कावेरीच्या खोर्‍यात स्थलांतर करणारे लोक आणि स्थानिक रहिवासी यांच्यात दंगली भडकू लागल्या. त्यात अपरिमित जिवीत हानी झाली. या काळात भारत देशाची लोकसंख्या एक चतुर्थांशहूनही कमी झाली.
खरे म्हणजे भारताची प्रचंड लोकसंख्या पर्यावरणाच्या र्‍हासासाठी बर्‍याच अंशी कारणीभूत होती आणि लोकसंख्या कमी झाल्यामुळे अखेर पर्यावरणावरचा भार कमी होणार होता. परंतू जेमतेम २० वर्षांच्या शांततेनंतर अमेरिका आणि चीन या देशात आफ्रिका खंडात सुरू झालेल्या लढाईचे सहाव्या महायुद्धात रुपांतर झाले. आधीच अंतर्गत युद्ध आणि प्रमुख नद्यांचा विनाश झाल्याने खंगलेल्या भारताला आक्रमणाची भिती वाटू लागली. त्यापुढची २० वर्षे लोकसंख्या वाढवण्यासाठी प्रत्येक स्त्रीला शक्य असेल तितके वेळा गरोदर रहाण्याची सक्ति करण्यात आली.
३००० साली गंगा यमुनेच्या पडिक खोर्‍यात युरेनियमचे प्रचंड साठे सापडले आणि जगभरातील सत्तांच्या तिथे उड्या पडू लागल्या. ३५०० साली जंगले संपत आल्याने वातावरणातील ऑक्सिजन कमी व्हायला सुरूवात झाली. त्याबरोबर वैज्ञानिकांसमोर दोन नवी आव्हाने उभी राहिली. ऑक्सिजनशिवाय जगण्याचा मार्ग शोधून काढणे आणि परग्रहावर जाण्याचा मार्ग शोधणे. परग्रहावर जाण्याचे स्वप्नं अनेक शास्त्रज्ञ हजारो वर्षांपासून बघत असले तरी अशा परिस्थितीत ती निकड तयार होईल हे अनपेक्षित होते. शेवटचा उपाय म्हणून पाळीव जनावरांची पैदास करणे थांबवण्यात आले. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा जास्तीची २०० वर्षे पुरला.
इस ४१४५ वातावरणातील प्राणवायू पूर्णतया नाहिसा झाला. ऑक्सिजन आणि खाद्यं पदार्थांची निर्मिती करण्यासाठी कारखाने सुरू झाले होते. लोकांच्या स्वातंत्र्यावर अनेक निर्बंध पडले. सामान्य लोकांना आपली घरे सोडून कम्युन्स मधे रहाणे भाग पडले. अतिमहत्वाच्या व्यक्तिंनाही इतर चार जणांबरोबर राहिल्याशिवाय स्वतंत्र घरात रहाण्याची परवानगी मिळेनाशी झाली. एके काळच्या समुद्राच्या तळाशी असलेल्या उरल्या सुरल्या उर्जास्त्रोतांवर आज आपण जगत आहोत.
अशा रितीने १५ हजार वर्षांत होमोसेपियन्सने पृथ्वीला ४६ कोटी वर्षांपूर्वीच्या प्राथमिक अवस्थेत आणून सोडले आणि स्वतःला मोस्ट एन्डेंजर्ड बनवले. ही उर्जा संपायच्या आधी परग्रहावर स्थलांतर करणे हा एकमेव मार्ग उपलब्ध होता. इंटेलिजंट स्पेसिज टिकू शकते का हया प्रश्नाने शास्त्रज्ञांना पछाडले आहे.

स्थलांतर करणे हा एकमेव मार्ग नाही आणि इंटेलिजंट स्पेसिस टिकू शकते, एव्हढेच नाही तर या पृथ्वीला पुन्हा सुजलाम सुफलाम करणे शक्य आहे हे मानणारा एक शास्त्रज्ञ ४३५० च्या सुमारास होऊन घेला. त्याचे नाव होते व्हिलोकोविस सिंगनिझी. परग्रहावर जाण्यासाठी आणि प्रस्थापित होण्यासाठी जे तंत्रज्ञान, उर्जा आणि शस्त्रास्त्रे लागणार आहेत, तीच वापरून कार्बन सायकल रिव्हर्स करता येईल हे व्हिलोकोविसने सिद्ध केले. मात्रं व्हिलोकोविसचा पर्याय अशक्य म्हणून फेटाळून लावण्यात आला. खरे म्हणजे ऑक्सिजनविरहित वातावरणात लागणारी साधन सामुग्री तयार करणार्‍या कंपन्यांनी व्हिलोकोविसच्या पर्यायाला पराभूत केले.
अंतराळातील क्रिस्टो बिटा १२ आणि नॅनो स्पिटिकल या दोन ग्रहांची स्थलांतरासाठी निवड करण्यात आली. क्रिस्टो बिटा १२ हा नॅनो स्पिटिकलपेक्षा सहापट छोटा असल्याने केवळ १३० वर्षांचे प्रवास अंतर असूनही अखेर नॅनो स्पिटिकलची अंतिम निवड करण्यात आली आहे. नॅनो स्पिटिकलचे आणखी एक वैशिष्ट्य असे की तिथे जीव सृष्टी अस्तित्वात आहे.

नॅनो स्पिटिकलच्या जीवसृष्टीचा अभ्यास करण्यासाठी एक शास्त्रज्ञ म्हणून मी वरूड अंतराळ केंद्रात रुजू झालो. तरूण वयातला उत्साह आणि मानव जातीला वाचवण्याचा ध्यास घेऊन मी पहिल्या दिवसापासूनच स्वतःला या कामात झोकून दिले.
नॅनो स्पिटिकलवरील सगळ्यात महत्वाचे प्राणी क्झोटिसॉर्स यांचा अभ्यास करण्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली. नॅनो स्पिटिकलवर गेलेल्या यानांनी पाठवलेल्या व्हिडिओंचा मी अभ्यास करायला सुरूवात केली. तोपर्यंत एक भयानक, विचित्र,निर्दयी आणि अति-विषारी म्हणून त्यांची प्रसिद्धी माझ्या कानावर आलेली होती. आपण शांततेच्या मार्गानी नॅनो स्पिटिकलवर जाणार असलो तरी क्झोटिसॉर्सनी आपल्याला जगू दिले नाही तर त्यांच्यावर विजय मिळवण्याचे मार्ग शोधण्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली. परंतू माझ्या अभ्यासाचे निष्कर्ष या प्रस्थापित मतापेक्षा वेगळेच निघू लागलेत..."


क्रमशः

3 comments:

Anand Sarolkar said...

Welcome Back! This is getting really interesting.

Ashwinis-creations said...

Amazing Writing!
I am impressed!
I always feel the same way.
I keep on thinking about resources, their planning, Our mentality about happiness and freedom...
कुणाला काही सांगायला जावे तर आपणच आऊट ऑफ़ द प्लेस ठरतो.
काटकसरीच्या सल्ल्याला कंजूष आणि हीन ठरविले जाते, आणि एव्हढा दूरचा विचार मुळात करतोच कोण!
आपण आपल्याच सुखा आनंदाच्या कल्पनांमध्ये मश्गुल असतो.
आणि आपल्या भारताचे इतके हॄदयद्रावक चित्र नको गं रंगवूस!

पण तुझी गोष्ट मात्र एकदम छान आहे.

आश्विनी

sangeetagod said...

Thanks for your encouraging responses.
Ashwini,
Sorry for painting such a horrific picture of future.
Given the attitude and short sight of our society, the future is not very comforting. I can only hope I am wrong.
I know it is frustrating to tell people about it. They fail to understand some basic rationale. But do not feel out of place. Do what you can to raise awareness. Take action, read, get informed, write, go to events etc.
This story is an attempt to vent out how I feel about the issue of environment.