Friday, May 04, 2007

अंतिम युद्धं - भाग २

"मग बाबा, कसं वाटतंय इतका मान सन्मान मिळाल्यावर? आत्ता कुठे तुमच्याशी मोकळेपणानी बोलायला मिळतंय!" गाडी हमरस्त्याला लागली तसा शिखर म्हणाला.
"छान वाटतंय". मिस्टर लेकशॉ म्हणाले.
"इतकं शांतपणे सांगितलं होतं तुम्ही मला तुम्हाला नोबेल प्राईझ मिळाल्याचं. मी असतो तर नाचलो असतो" शिखर म्हणाला.
"संशोधन अजून पूर्ण झालेलं नाही माझं. ते पूर्ण होईल तेव्हा जरूर नाचेन. पुरस्कार काय मिळतातच दरवर्षी" मि. लेकशॉ
"अरे त्यांना नोबेल काय किंवा काय काय -त्यांचे काम बरे आणि ते बरे" मिसेस लेकशॉ म्हणाल्या.
"अहो बाबा पण नोबेल मिळाल्याचा आनंद नाही तर निदान १०० वर्षाचं लॉन्जिटिव्हिटी ड्रग मिळ्णार आहे - तुम्हालाच नाही, तर आईलाही - त्याचा तरी आनंद होत असेलच ना?"
"माझं संशोधन पूर्ण व्हायला आणखी १०० वर्ष लागली नाहीत म्हणजे मिळवलं" मिस्टर लेकशॉ
"संशोधन पूर्ण होवो की नं होवो, पण माझ्या खापर-खापर नातवांना तुम्ही भेटणार हे काय कमी आहे?" शिखर म्हणाले.
"आई, मी तुझ्याजवळ बर्‍याच भेटवस्तू देऊन ठेवणार आहे आपल्या पुढच्या पिढीला द्यायला काय? कुणाचं लग्नं असलं की आपली एक वस्तू काढायची आणि शिखर पणजोबांनी दिली आहे म्हणून सांगायचस - काय?" - शिखर
"अरे बाबा असं भलतंच बोलू नकोस, आमची हयात तुमचं भलं चिंतण्यात गेली. तुझ्या बाबांचं संशोधन पूर्ण झालं की लॉन्जिटिव्हिटी ड्रगचं रेशनिंग करायची गरजच उरणार नाही" मिसेस लेकशॉ.
"मग आई, पुढची शंभर वर्ष तुम्ही काय करणार सांगा पाहू?" विरीता म्हणाली.
"बाबांची आणि तुमची काळजी वहाणार, दुसरं आणखी काय केलंय मी?" मिसेस लेकशॉ
तेव्हढ्यात गेट्रियमची दारं उघडली आणि मंडळी घरात शिरली.
"आई, बाबा, आता आम्ही आलो आहोत उद्याच्या पार्टीची काळजी घ्यायला. तुम्ही आता आराम करा." विरीता म्हणाली आणि लगेच कामाला लागली.
"बाबा, मला तुमचं ते नोबेल प्राईझ दाखवा बरं आधी .." असं म्हणत शिखर मिस्टर लेकशॉंच्या मागोमाग खाली जाऊ लागले.
"आंद्रेशा, आंद्रेशा, झोपायची वेळ झाली.. झोपायाची वेळ झाली" आंद्रेशाचा काळजीवाहक रोबो कल्टीकॅप घरात सगळी कडे फिरू लागला. पाच मिनिटानी कल्टीकॅपने जोरात अलार्म वाजवला - "आंद्रेशा दिसत नाही, आंद्रेशा दिसत नाही, आंद्रेशा दिसत नाही." असं म्हणत अलार्म वाजवत कल्टीकॅप सगळीकडे फिरू लागला.
"अगं बाई... अहो, धावा धावा, आंद्रेशा गाडीतच राहिली वाटतं" जिवाच्या आकांताने विरीता किंचाळली.
ते ऐकून सगळेच गेट्रियमकडे गेले. गाडी पुल केली आणि बेशुद्ध पडलेल्या आंद्रेशाला उचलून घरात आणले.
शिखरनी लगेच इमर्जन्सी कार्बन कमांड सेंटरला इंटिमेट करायचे बटन दाबले. आंद्रेशाला टेबलावर ठेवून ऑक्सिजन मास्क घातला.
मिस्टर लेकशॉनी प्रथमोपचार उपकरणे बाहेर काढली. मिसेस लेकशॉ आणि विरीता देवाची प्रार्थना करत त्यांना मदत करू लागल्या.
पंधरा वीस मिनिटाने आंद्रेशानी डोळे उघडले.इमर्जन्सी कार्बन कमांड सेंटरने पाठवलेले डॉक्टर आले होतेच. त्यांनी तपासणी करून घाबरण्याचे काही कारण नाही असे सांगितले तेव्हा कुठे सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.
विरीतानी रडत रडत आंद्रेशाला कुशीत घेतले. "कसं विसरलो बाळा आम्ही तुला? घाबरलीस का माझ्या बाळा? झोप लागली गाडीत? दादा नेहेमी आणतो नं तुला उचलून म्हणून आमच्या लक्षात नाही आलं बेटा हं- सॉरी. सॉरी..."
आंद्रेशाला मात्रं हे काय सुरू आहे याचा थांग पत्ता लागत नव्हता. पण आई रडते आहे हे बघून ती ही रडायला लागली.
कल्टीकॅप आंद्रेशाचा माग काढत तिच्याकडे आला. ती रडते आहे हे पाहून तिचे आवडते कार्टून त्याच्या मॉनिटरवर दाखवू लागला. ते बघून आंद्रेशाची कळी खुलली. "बेड टाईम आंद्रेशा" असं म्हणत कल्टीकॅपने तिचा हात हातात घेतला आणि दोघे आंद्रेशाच्या बेडरूमकडे निघाले.
"विरीता, देवाचा आशिर्वाद म्हणून थोडक्यात निभावलं बाई. उद्याची पार्टी झाली की परवा लगेच शेगावला दर्शनाला घेऊन जाऊ या आंद्रेशाला बरं?" विरीताच्या पाठीवर हात फिरवत मिसेस लेकशॉ म्हणाल्या.

क्रमशः

3 comments:

HAREKRISHNAJI said...

किती तरी वर्षानंतर एक सुरेख , खर्ऱ्या अर्थाची वि. कथा वाचतो आहे. बढीया.

Ashwinis-creations said...

संगीता,

फ़ारच छान लिहिते आहेस!
आणि नावंही किती वेगळी निवडली आहेस!
कुणी सुचवली तुला ही नावं?
पण मला तुझ्या कथेतल अल्ट्रा मॉडर्न वातावरण अगदी आवडलं! तू ते फ़ार उत्तम रित्या शब्दबद्ध केलं आहेस.

कीप ईट अप!

आम्ही पुढच्या भागाची वाट बघत आहोत.
मराठी साहित्य-क्षितीजावर एका नवीन फ़िक्शन राईटर चा उदय स्पष्ट दिसतो आहेच.


अश्विनी

sangeetagod said...

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. फिक्शन हा खरं तर माझा प्रांतच नाही. पण बरेच दिवसापासून ही कल्पना डोक्यात घोळत होती.
नावं मी स्वतःच बनवली आहेत.