अंतिम युद्धं - भाग ४
मिस्टर आणि मिसेस लेकशॉ त्यांच्या खाजगी कार्यालयात आले. पाठोपाठ विरीताही आली.
मिसेस लेकशॉ: मेक अप फार भडक नाही दिसतंय नं?
विरीता: नाही आई, तुमच्या मेक-अपची काळजी नाही मला, पण बाबा, तुम्ही थोडा तरी मेक-अप करायला हवा. एव्हढी ग्लोबल जिओटेलवर मुलाखत आहे. सगळ्या जगातले लोक बघणार आहेत.
मिसेस ले.:आणि जगाबाहेरचेही. अख्खी स्पेस कम्युनिटी कान टवकारून बसली आहे तुम्ही काय सांगताय तुमच्या संशोधनाबद्दल ते ऐकायला.
मिस्टर लेकशॉ: हो ना?मग मेक-अप नाही केला तरी ते ऐकतीलच.
तेव्हढ्यात मिटिओरा चॅनेलच्या प्रतिनिधीने संपर्क साधला. "मिस्टर लेकशॉ, नमस्कार. मी मिटिओराची प्रतिनिधी ल्युकसिमा बोलते आहे. बरोबर पाच मिनिटानी तुम्ही लाईव्ह जाणार आहात. आमच्या व्हिडिओ नेटवर्कनी अल्ट्रा-पोलिंग करायला सुरूवात केली आहे. कृपया "ए चार्टा बिट्वी फाईव्ह ३००" या सिग्नलला परवानगी द्या.
मिस्टर लेकशॉंनी त्याप्रमाणे चॅनेलला घरातल्या व्हिडिओशी कनेक्ट केले.
नमस्कार मंडळी! वेध भविष्याचा या आमच्या कार्यक्रमात तुमचे स्वागत आहे. आजच्या या विशेष एपिसोडमधे आपण लॉंजिटिव्हिटी या विषयावर चर्चा करणार आहोत. आजच्या पॅनेलचे चार सदस्य आहेत - मन्झोली येथून जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ.सुप्रियिनी प्लॅनियोतोव्हा, वडुरा येथून नोबेल पारितोषक विजेते जेनेसेसिस्ट डॉ.विधिस्तव लेकशॉ, रुमेंबेच्या आंतरराळ मोहिम केंद्रातून डॉ.अरिग्रॅव्हो केलूते आणि आशिया विभागाचे आरोग्य मंत्री श्री.चास्कोव्ह बोस्ता.
आपल्या सर्वांचे "वेध भविष्या" मधे स्वागत.
डॉ लेकशॉ, सर्वप्रथम नोबेल पारितोषिक मिळाल्याबद्दल आपले अभिनंदन.
डॉ लेकशॉ: धन्यवाद ल्युकसिमा.
ल्युकसिमा: डॉ लेकशॉ, तुमच्या नेतृत्वाखाली दिग्रस विद्यापिठाच्या लॉंजिटिव्हिटी प्रोजेक्टच्या नविन संशोधनाबद्दल आजकाल बरीच शास्त्रिय माहिती प्रसिद्ध होत असते. पण आमच्या सामान्य प्रेक्षकांना कळू शकेल अशी माहिती तुमच्या या संशोधनाबद्दल सांगता येईल का?
दृष्य बदल:
केवल: निलो, आधी अमरावतीला चल. केक पिक अप करायचा आहे.
तेव्हढ्यात डॉ. लेकशॉंचा चेहरा पडद्यावर वर झळकतो.
निलो: बघ बघ - तुझे आजोबा मिटिओरावर मुलाखत देतायेत!
केवल: अरे हो, विसरलोच होतो. बघ बघ किती स्मार्ट दिसतात नाही का माझे आजोबा आणि किती मानसन्मान आहे त्यांना?
निलो: हो हो आहेत आहेत खूप स्मार्ट आहेत बरं, पण तू आपली व्हिडिओ सुरू कर.
केवल: बरं बाई, करतो.पण आधी गाडीचं ऑडिओ आणि व्हिडियो ट्रेस बंद कर.
निलो: ते आधीच केलंय. सुरू कर नं लवकर.
केवल: आ हा... जगातल्या मोस्ट वॉंटेड अतिरेक्यावर फिदा असलेल्या तरूणीला इतकी अधिरता बरी नाही. हे घे - आधी हेडसेट लावायला विसरू नकोस - बी सेफ दॅन सॉरी.
केवल व्हिडिओ सुरू करतो.
"२० व्या शतका अखेर, दुसर्या महायुद्धानंतर मध्यम वर्ग नावाचा एक महत्वाचा वर्ग उदयाला आला. " निदांचे निवेदन सुरू झाले.
निलो: व्हॉट अ सिड्क्टिव व्हॉइस.. गो ऑन निदा...
"त्याकाळातील मानवी समुहांना देश असे नाव होते. काही महत्वाच्या देशांमधे लोकशाही नावाची राजकिय व्यवस्था अस्तित्वात होती. या व्यवस्थेमधे माणसांना वाट्टेल ते करायची मुभा होती. कोणी किती साधनांचा विनियोग करायचा यावर कुठलेही कायदेशीर बंधन नव्हते. ज्या सुख सुविधा आधी फक्तं मूठभरांनाच उपलब्ध होत्या त्या आता या प्रचंड मोठ्या वर्गाला उपलब्ध होऊ लागल्या. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा आकार प्रचंड वाढला. नफा वाढवण्यासाठी जगभरात मध्यमवर्गाच्या वाढीसाठी राज्यकर्ते आणि उद्योगपती प्रयत्नं करू लागले. पण हया सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे होमोसेपियन्सचे इकोलॉजिकल फूटप्रिंट प्रचंड मोठे झाले. एका दृष्टिने भौतिक सुखांना लालचवलेला मध्यमवर्ग आणि त्यांना चैनीच्या विविध वस्तू आणि सेवा विकणार्या बहुराष्ट्रिय कंपन्या यांनी या पृथ्वीच्या साधन संपदा ओरबाडायला सुरूवात केली. मुक्तं बाजारपेठेचा पुरस्कार करणार्या या समाजात प्रचंड विरोधाभास होता. एकीकडे "देअर इज नो फ्री लंच" असे ब्रिदवाक्य असलेल्या या समाजाने निसर्गाकडून घेतलेल्या संपत्तीची भरपाई कधीच केली नाही. हे सगळं जग हे मानवाने एक्स्प्लॉईट करण्यासाठी निर्माण झाले आहे अशी त्यांची ठाम समजूत होती. दुसरीकडे त्या काळात मानवी ह्क्कांच्या मूल्यांमधेही क्रांती झाली. माणसांनी माणसांची पिळवणूक करण्याचे प्रमाण बरेच कमी झाले. पण मुळात पिळवणूक हा या समाजाचा पाया असल्याने आता सर्व माणसांनी मिळून निसर्गाची आणि इतर प्राणिमात्रांची पिळवणूक सुरू केली. मानवी गरजा भागवण्यासाठी इतर प्राण्यांचे हॅबिटॅट नष्टं करणे, त्यांचे अनन्वित हाल करणे, त्यांना बंदी बनवणे यात त्यांना काहीच चुकीचे वाटत नव्हते. त्याकाळातील थोडे विचारवंत, शास्त्रज्ञ आणि इतर मूठभर लोक ही गोष्टं निदर्शनास आणून देत होते पण त्यांचा आवाज फारच दुबळा ठरला. "
दृष्य बदल:
डॉ. लेकशॉ: ल्युकसिमा, सद्ध्या मानवाचे सरासरी नैसर्गिक आयुर्मान ९५ वर्षाचे असले तरी आज उपलब्ध असलेल्या लॉंजिटिव्हिटी ड्रगमुळे ते जास्तीत जास्तं २५० वर्षांपर्यंत वाढू शकते. परंतू अनेक वर्षांपासून ही २५० वर्षाची आयुर्मर्यादा ओलांडण्यासाठी आम्ही प्रयत्नं करत आहोत. ते संशोधन सुरू असताना आम्हाला एका नविन जीन्स आढळून आले आहे. या जीन्सला लाईफसायकल पॉज जीन्स असं नाव देण्यात आलं आहे. या जीन्सला इम्युलेट करणारे चिरनिद्रा ड्रग तयार करण्यात आम्हाला यश आले आहे. चिरनिद्रा ड्र्ग घेतलेला माणूस कितीही वर्षे निद्रित अवस्थेत राहू शकतो. जिवंत रहाण्यासाठी त्याला फक्तं व्हायटल सप्लाय म्हणजे ऑक्सिजन आणि सलाईनच्या माध्यमातून दिल्या जाणार्या द्रवांची गरज असेल. विशेष म्हणजे निद्रेच्या काळात एजिंग पॉज झाल्यामुळे हा काळ अयुर्मानात गणला जाणार नाही. म्हणजे समजा १०० वर्षाच्या माणसाला १०० वर्षे चिरनिद्रेत ठेवले तर निद्रेतून उठल्यावर तो उरलेले १५० वर्षाचे आयुष्य तो त्यानंतर जगू शकेल.
ल्युक्सिमा: निद्रेतून उठवण्यासाठी काय करावे लागेल?
डॉ. लेकशॉ:चिरनिद्रा ड्र्गचा इफेक्ट रिव्हर्स करणारे ड्र्ग झोपलेल्या माणसाला द्यावे लागेल. अर्थात आयुर्मर्यादा वाढवण्यासाठी आमचे संशोधन सुरूच रहाणार आहे, तरीही त्या संशोधनातला हा एक मैलाचा दगड आम्ही गाठला आहे असे म्हणता येईल.
ल्युक्सिमा:धन्यवाद डॉं लेकशॉ. आता डॉ. सुप्रियिनींकडे वळू या. डॉ. सुप्रियिनी, मानसशास्त्राच्या दृष्टिने या संशोधनाचे कसे मूल्यमापन करता येईल.
डॉ. सुप्रियिनी: ल्युक्सिमा, मानसशास्त्राच्या दृष्टिने हे संशोधन फारच आव्हानात्मक आहे. म्हणजे विचार करा की शंभर वर्षे चिरनिद्रा घेतलेला माणूस एका संपूर्ण नविन जगात जागा होईल. आजूबाजूच्या घटनांचे ज्ञान त्याला नसेल. विशेष म्हणजे त्याचे समकालीन लोक त्या काळात अस्तित्वात नसतील म्हणजे टाईम मशिनमधे बसून पुढे गेलेल्या माणसासारखी त्याची अवस्था असेल. अशा परिस्थितीत त्याचे नविन काळात मानसिक आणि भौतिक पुनर्वसन करण्याची गरज असेल.
ल्युक्सिमा:धन्यवाद डॉ सुप्रियिनी. आता वळू या डॉ.अरिग्रॅव्होंकडे. डॉ.अरिग्रॅव्हो, या संशोधनाची सर्वात जास्तं दखल जर कोणी घेतली असेल तर ती अंतराळ संशोधकांनी. याचे कारण काय?
डॉ.अरिग्रॅव्हो: ल्युक्सिमा, आपल्याला माहित आहेच की पृथ्वीच्या सद्ध्याच्या अवस्थेत इथे जगणे अत्यंत कठिण झाले आहे, आणि येत्या पाचशे ते सातशे वर्षात ते अशक्यच होणार आहे. म्हणजे आपण आपल्या अस्तित्वाची अखेरची लढाई लढत आहोत. करा अथवा मरा ही उक्ति इतिहासात बरेचदा वापरण्यात आली आहे. पण दुर्दैवानी आजच्या इतकी ती कधी अक्षरशः लागू पडलेली नाही. अस्तित्वाच्या या लढाईचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मानवाला जगण्याला अनुकूल असलेल्या ग्रहावर स्थलांतर करणे. या दृष्टीने नॅनो-स्पिटिकल नावाचा ग्रह हा आपल्याला माहिती असलेल्या ग्रहांपैकी सगळ्यात अनुकूल परिस्थिती असलेला ग्रह आहे. गेल्या अनेक शतकापासून आपण या ग्रहाचा एक पर्याय म्हणून विचार करत आहोत. आपल्याकडे त्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान उपलब्धं आहेच. शिवाय या ग्रहाच्या वाटेवर योग्य अंतरावर असलेले उर्जास्त्रोत आपल्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. या ग्रहावर आपण अनेक मानवरहित मोहिमा पाठवल्या आहेत. इतके सगळे असूनही दोन फॅक्टर आपल्या विरुद्ध जाणारे आहेत. पहिला फॅक्टर म्हणजे मिशनला अतिरेक्यांचा धोका. दुसरा म्हणजे या ग्रहावर जायला ३५७ बर्षे लागतात. आणि आपली आयुर्मर्यादा अजून तितकी वाढलेली नाही. त्यामुळे प्रवासामधे लागणारे मिशन क्रिटिकल शास्त्रज्ञ हा प्रवास पूर्णत्वाला नेऊ शकत नाहीत. परंतू डॉ. लेकशॉंच्या संशोधनामुळे आम्हाला मानवी मिशनचे नियोजन करणे शक्य होणार आहे.
ल्युक्सिमा:म्हणजे नक्की काय योजना आहेत अंतराळ केंद्राच्या?
डॉ.अरिग्रॅव्हो:प्रत्येक मिशन क्रिटिकल कार्यासाठी तीन तज्ञ पाठवले जातील. सुरवातीला तीनपैकी एक कार्यरत असेल आणि दोन चिरेनिद्रेत असतील. कार्यरत तज्ञाची आयुर्मर्यादा संपत आली किंवा इतर आकस्मित कारणामुळे किंवा कार्यरत तज्ञ अतिरेकी असल्याचे लक्षात आले तर चिरनिद्रेतील तज्ञ त्याची जागा घेऊ शकतील.
दृष्य बदल: ठिकाण लेकशॉंचे रहाते घर.
केवल (कुजबुजत): निलो,धिस इज अ व्हेरी प्रोफाऊंड मॉमेंट फॉर मी. डॉ. लेकशॉंच्या घरात निदांची व्हिडिओ घेऊन आलोय मी.... इतिहास मला एक गद्दार,अतिरेकी म्हणून बघेल की एक हिरो म्हणून?
निलो: (केवलचा हात हातात घेऊन) इतिहासात जायला आपल्याला भविष्य असायला हवं ना?
क्रमशः
टिप: आमच्या घरी भारतातून पाहुणे येणार असल्यामुळे पुढील एक आठवड्यात युद्ध विराम जाहीर करण्यात आला आहे. तेव्हा भेटू या त्या पुढच्या आठवड्यात... वाचत रहा...
7 comments:
Mhanje ha blog pudhacha week "Chir-Nidret" asnar tar:)
:)- Yes Anand.
वाचतच रहातॊ, वाचतच रहातो
and yes, Enjoy
!! Chir-Nidra hi concept soid aahe...
Shevatchavaakya jaam aavadla...
"इतिहासात जायला आपल्याला भविष्य असायला हवं ना?"
Ajit
Pahune yenar ahet, tar mag tyanach kamala lav na :-)
So that u can write, we can read and pahunehi khush! Eka dagadat teen pakshi!!
Thats was a good idea Theking. But we were travelling. After a tiring tour, I am back and hope to get back in the groove soon.
Post a Comment