Wednesday, May 30, 2007

अंतिम युद्धं - भाग ६

ही बघा, नॅनो स्पिटिकलवर काढलेली क्झोटिसॉर्सची व्हिडिओ पहा. घाबरू नका. दिसायला विचित्रं असलेत तरी स्वभावानी अतिशय समंजस आहेत ते. हे जे ओंगळ्वाणे दिसणारे लोंबणारे अवयव आहेत, हे त्यांचे बघण्याचे आणि ऐकण्याचे काम करणारे संयुक्त सेन्सर्स आहेत. क्झोटिसॉर्सना तीनपेक्षा जास्तं परिमिती म्हणजे डायमेंशन्स दिसू शकतात. त्यामुळे आपल्या डोळ्यांना जे कधीच दिसू शकणार नाही अशा गोष्टी ते पाहू शकतात. तसं पाहिलं तर सर्वच अवयव आपल्यापेक्षा सरस आहेत. मेंदूचा आकार आपल्या मेंदूपेक्षा मोठा आहे. म्हणजे आपल्याहून जास्तं कॉन्व्होल्युशन्स होत असल्याने ते आपल्यापेक्षा जास्तं संवदनाक्षम आहेत. हात-पायसदृश सहा अवयव त्यांच्या शरीराच्या कुठल्याही भागातून बाहेर येऊ शकतात. आवश्यकतेप्रमाणे ते द्विपाद, त्रिपाद किंवा चतुश्पाद बनू शकतात. शेपटीसारखे जे दिसते आहे ते खरे म्हणजे त्यांचे तोंड आहे. या तोडांत लहान लहान अशा शंभर एक जीभा असतात. एक दुसर्‍याला अभिवादन करण्यासाठी किंवा नविन गोष्टं आजमावण्यासाठी या तोंडानी ते समोरच्या व्यक्तिला किंवा वस्तूला विळखे घालतात. तसे केल्याने त्या जीभांमधून मग त्यांची लाल रंगाची लाळ बाहेर पडते. क्झोटिसॉर्सचे रक्तं जर्द पिवळ्या रंगाचे असते. दूधाचा रंग निळसर असतो.
आपल्या मिशन एन एस के ३२३ च्या रोबॉटसनी काही क्झोटिसॉर्सना बंदी बनवून त्यांना ५ टिलनवीर ह्या अंतराळातील प्रयोगशाळेत आणले. त्यांचा काही दिवस अभ्यासकरून त्यांनी ट्रॅकिंग कॉलर बसवून पुन्हा नॅनो स्पिटिकलवर नेऊन सोडले. त्या प्रयोगातून मिळालेल्या माहितीने तर मी अचंबित झालो.
ह्या ग्रहावरची जीवसृष्टी आपल्यापेक्षा अतिशय वेगळी आहे. नुसती वरकरणी नाही तर अगदी अंतर्भूत फरक आहेत. क्झोटिसॉर्स आणि इतर सस्तन प्राणी हे त्रैलिंगी आहेत. म्हणजे जननासाठी त्यांना तीन क्रोमोसोमची गरज असते. स्त्री,पुरूष आणि विरूष अशी तीन लिंगे आढळतात. क्झोटिसॉर्सचे सरासरी आयुष्य ५०० नॅनो स्पिटिकल वर्षांइतके (म्हणजे पृथ्वीवरच्या ६२४२ वर्षांइतके असते). वयाच्या पंच्याहत्तर ते शंभर वर्षांत त्यांना जनन क्षमता येते. गुंतागुंतीच्या समागम प्रक्रियेतून जाऊन क्झोटिसॉर्स स्त्रीची गर्भ-धारणा होते. मातेच्या उदरात ३८ नॅ.स्पि. महिने राहून बाळाचा जन्म होतो. तिघेही पालक बाळाचे चालता येईपर्यंत संगोपन करतात. त्यानंतर बाळ कळपात सामिल होते. कुटुंबामधे पुरूष आणि विरूष यांची जोडी आधी जमते. कालांतराने त्यात स्त्रीचा समावेश होतो. त्यांनंतर तिघे आयुष्यभराचे साथीदार बनतात. तिघांपैकी किमान दोन साथीदार दोन वेगळ्या कळपातून आलेले असतात.
क्झोटिसॉर्सचे सामाजिक आयुष्य समॄद्ध आहे. १.२ मायक्रो हर्ट्झ ते ८०००० मेगा हर्ट्झ पर्यंत त्यांच्या आवाजाची रेंज आहे. त्यामुळे अंतर कळप आणि आंतर कळप संदेशवहन सहज शक्य होते. एका कळपातील सदस्यांनी दुसर्‍या कळपाला भेट दिल्याचीही उदाहरणे बघायला मिळाली आहेत. या ग्रहावर इतर मांसाहारी प्राणि असले तरी क्झोटिसॉर्स मात्रं संपूर्ण शाकाहारी आहेत.
या वर्णनावरून नॅनो स्पिटिकलवरची जीवसृष्टी किती वेगळी आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल. इतर प्राणि तसेच वनस्पतीही त्रैलिंगीच आहेत. आपल्या मिशन्सनी तिथे पृथ्वीवरील झाडांच्या बिया पेरून बघितल्या पण त्यातून रोपे बाहेर आली नाहीत. आपण त्या जीवसृष्टीशी सुसंगती साधून सहजीवन करणे अशक्य आहे असा स्पष्टं निष्कर्ष आमच्या संशोधनातून निघत होता. त्यामुळे नॅनो स्पिटिकलचा विचार स्थलांतरासाठी करू नये व क्रिस्टो बिटावर जीव सृष्टी नसल्याने त्यावरच लक्ष केंद्रित करावे असे आमच्या अहवालात नमूद केले. पण त्यानंतरही नॅनो स्पिटिकलवर अंतराळ मोहिमा आखल्या जाऊ लागल्या तेव्हा मी अंतराळ संरक्षण केंद्रातील तसेच इतर संबंधित विभागातील लोकांना इन्फोटेशेन्स दिले. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. अंतराळ संरक्षण खात्याने मला दिलेले हे ठोकळेबाज उत्तर:
"नॅनो स्पिटिकलवरच्या जीवसृष्टीत समरस होणे आपल्याला फारच आव्हानात्मक आहे. शांततेचा मार्ग अवलंबिणे हाच आमचा उद्देश आहे. परंतू मानवी जीवन हे बहुमूल्य आहे. त्यावर कोणी हल्ला केल्यास त्याला उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत. आपल्या लष्करी सामर्थ्याने आपण कोठेही मानवी आयुष्याची उभारणी करू शकतो याची अंतराळ संरक्षण विभागाला पूर्ण खात्री आहे. इतर संशोधन विभागांच्या अहवालानुसार नॅनो स्पिटिकलवरवर मानवी जीवन २५००० वर्षे अधिक टिकू शकते. त्यामुळे अधिक वेळ वाया नं घालवता सर्व शक्तिनिशी नॅनो स्पिटिकल स्थलांतर मोहिमेला सुरूवात केली जाईल."
माझे मन सुन्न झाले. मानवी जीवन बहुमूल्य आहे म्हणजे काय? इतर जीवांशिवाय मानवी जीवनाची काय किंमत आहे ते आज दिसतेच आहे. त्या आश्चर्यजनक क्झोटिसॉर्सचे जीवन कमी मूल्याचे आहे काय? त्यांच्या घरात तुम्ही गेलात तर ते तुम्हाला येऊन प्रेमाने विळखा घालतील. पण त्यांची लाळ तुम्हाला विषारी आहे हा काय त्यांचा दोष? मग तुम्ही मेलात तर क्झोटिसॉर्सनी तुमच्यावर हल्ला केला असे म्हणून त्यांना मारणार? हे योग्य आहे काय? नैतिकतेमधे बसणारे आहे काय? मानवतेला धरून आहे काय?
नॅनो स्पिटिकलवरवर मानवी जीवन २५००० वर्षे अधिक टिकू शकते म्हणजे काय? एकेका ग्रहावर जायचे, तिथले कोट्यावधी वर्षांचे जीवन केवळ काही हजार वर्षात नष्टं करायचे हे तुम्हाला मान्य आहे का? अशी टोळधाड बनण्यातच तुम्ही धन्यता मानणार का?
पृथ्वी आपली माता आहे, तिला तिचे पूर्वीचे वैभव परत करायची आपल्यावर नैतिक जबाबदारी आहे. तिच्याच आश्रयात पुन्हा आपले आणि इतर प्राणिमात्रांचे पुनर्वसन करायचे माझे स्वप्नं आहे. हे स्वप्नं सत्यात उतरू शकते यावर माझा आणि माझ्या सहकार्‍यांचा पूर्ण विश्वास आहे. परंतू त्याचबरोबर अनेक गोष्टींचा त्यागही करावा लागणार आहे....

क्रमशः

Thursday, May 24, 2007

अंतिम युद्धं - भाग ५

"हे बघा २१ व्या शतकातील एक दृष्य. निळे आकाश, हिरवी झाडे, पिवळं ऊन, पक्षी, प्राणि, समुद्रं किनारा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वातावरणात असलेला प्राणवायू - ऑक्सिजन! हे सगळं जणू कायमचं असंच राहिल याच भ्रमात ही मंडळी साधन-संपदा उपभोगत राहिली. एकामागून एक प्रजाती अस्तंगत होत गेल्या पण यांनी त्याची विशेष दखल नं घेता आपली रहाणी आणि विचारसरणी तशीच कायम ठेवली. मनुष्य प्राणि हा सर्वात श्रेष्ठ आहे आणि इतर सर्व काही त्याच्या दिमतीसाठीच निर्माण करण्यात आलं आहे अशी त्यांची ठाम समजूत होती. त्या काळातला फूड ट्रॅंगल नावाचा तक्ता याचा पुरावा देतो. त्यांची ही समजूत अगदी चुकीची आहे हे आज जरी आपल्याला माहित असले तरी त्यावेळी तसे म्हणणार्‍यांना वेड्यात काढण्यात येई.
मानवाचे सुखसोयींवरचे अवलंबित्व कायमस्वरूपी करण्यात या समाजाचा मोठा वाटा आहे.
२७०० साली समुद्रातील उरले सुरले बर्फ वितळले त्याचवेळी हिमालयातील शेवटचे ग्लॅशियरही वितळले. भारत देशात अंतर्गत यादवीला सुरूवात झाली. समुद्र किनार्‍यावरून आत स्थलांतर करणारे लोक व गंगा यमुनेच्या खोर्‍यातून तापी-नर्मदा-गोदावरीच्या-कावेरीच्या खोर्‍यात स्थलांतर करणारे लोक आणि स्थानिक रहिवासी यांच्यात दंगली भडकू लागल्या. त्यात अपरिमित जिवीत हानी झाली. या काळात भारत देशाची लोकसंख्या एक चतुर्थांशहूनही कमी झाली.
खरे म्हणजे भारताची प्रचंड लोकसंख्या पर्यावरणाच्या र्‍हासासाठी बर्‍याच अंशी कारणीभूत होती आणि लोकसंख्या कमी झाल्यामुळे अखेर पर्यावरणावरचा भार कमी होणार होता. परंतू जेमतेम २० वर्षांच्या शांततेनंतर अमेरिका आणि चीन या देशात आफ्रिका खंडात सुरू झालेल्या लढाईचे सहाव्या महायुद्धात रुपांतर झाले. आधीच अंतर्गत युद्ध आणि प्रमुख नद्यांचा विनाश झाल्याने खंगलेल्या भारताला आक्रमणाची भिती वाटू लागली. त्यापुढची २० वर्षे लोकसंख्या वाढवण्यासाठी प्रत्येक स्त्रीला शक्य असेल तितके वेळा गरोदर रहाण्याची सक्ति करण्यात आली.
३००० साली गंगा यमुनेच्या पडिक खोर्‍यात युरेनियमचे प्रचंड साठे सापडले आणि जगभरातील सत्तांच्या तिथे उड्या पडू लागल्या. ३५०० साली जंगले संपत आल्याने वातावरणातील ऑक्सिजन कमी व्हायला सुरूवात झाली. त्याबरोबर वैज्ञानिकांसमोर दोन नवी आव्हाने उभी राहिली. ऑक्सिजनशिवाय जगण्याचा मार्ग शोधून काढणे आणि परग्रहावर जाण्याचा मार्ग शोधणे. परग्रहावर जाण्याचे स्वप्नं अनेक शास्त्रज्ञ हजारो वर्षांपासून बघत असले तरी अशा परिस्थितीत ती निकड तयार होईल हे अनपेक्षित होते. शेवटचा उपाय म्हणून पाळीव जनावरांची पैदास करणे थांबवण्यात आले. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा जास्तीची २०० वर्षे पुरला.
इस ४१४५ वातावरणातील प्राणवायू पूर्णतया नाहिसा झाला. ऑक्सिजन आणि खाद्यं पदार्थांची निर्मिती करण्यासाठी कारखाने सुरू झाले होते. लोकांच्या स्वातंत्र्यावर अनेक निर्बंध पडले. सामान्य लोकांना आपली घरे सोडून कम्युन्स मधे रहाणे भाग पडले. अतिमहत्वाच्या व्यक्तिंनाही इतर चार जणांबरोबर राहिल्याशिवाय स्वतंत्र घरात रहाण्याची परवानगी मिळेनाशी झाली. एके काळच्या समुद्राच्या तळाशी असलेल्या उरल्या सुरल्या उर्जास्त्रोतांवर आज आपण जगत आहोत.
अशा रितीने १५ हजार वर्षांत होमोसेपियन्सने पृथ्वीला ४६ कोटी वर्षांपूर्वीच्या प्राथमिक अवस्थेत आणून सोडले आणि स्वतःला मोस्ट एन्डेंजर्ड बनवले. ही उर्जा संपायच्या आधी परग्रहावर स्थलांतर करणे हा एकमेव मार्ग उपलब्ध होता. इंटेलिजंट स्पेसिज टिकू शकते का हया प्रश्नाने शास्त्रज्ञांना पछाडले आहे.

स्थलांतर करणे हा एकमेव मार्ग नाही आणि इंटेलिजंट स्पेसिस टिकू शकते, एव्हढेच नाही तर या पृथ्वीला पुन्हा सुजलाम सुफलाम करणे शक्य आहे हे मानणारा एक शास्त्रज्ञ ४३५० च्या सुमारास होऊन घेला. त्याचे नाव होते व्हिलोकोविस सिंगनिझी. परग्रहावर जाण्यासाठी आणि प्रस्थापित होण्यासाठी जे तंत्रज्ञान, उर्जा आणि शस्त्रास्त्रे लागणार आहेत, तीच वापरून कार्बन सायकल रिव्हर्स करता येईल हे व्हिलोकोविसने सिद्ध केले. मात्रं व्हिलोकोविसचा पर्याय अशक्य म्हणून फेटाळून लावण्यात आला. खरे म्हणजे ऑक्सिजनविरहित वातावरणात लागणारी साधन सामुग्री तयार करणार्‍या कंपन्यांनी व्हिलोकोविसच्या पर्यायाला पराभूत केले.
अंतराळातील क्रिस्टो बिटा १२ आणि नॅनो स्पिटिकल या दोन ग्रहांची स्थलांतरासाठी निवड करण्यात आली. क्रिस्टो बिटा १२ हा नॅनो स्पिटिकलपेक्षा सहापट छोटा असल्याने केवळ १३० वर्षांचे प्रवास अंतर असूनही अखेर नॅनो स्पिटिकलची अंतिम निवड करण्यात आली आहे. नॅनो स्पिटिकलचे आणखी एक वैशिष्ट्य असे की तिथे जीव सृष्टी अस्तित्वात आहे.

नॅनो स्पिटिकलच्या जीवसृष्टीचा अभ्यास करण्यासाठी एक शास्त्रज्ञ म्हणून मी वरूड अंतराळ केंद्रात रुजू झालो. तरूण वयातला उत्साह आणि मानव जातीला वाचवण्याचा ध्यास घेऊन मी पहिल्या दिवसापासूनच स्वतःला या कामात झोकून दिले.
नॅनो स्पिटिकलवरील सगळ्यात महत्वाचे प्राणी क्झोटिसॉर्स यांचा अभ्यास करण्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली. नॅनो स्पिटिकलवर गेलेल्या यानांनी पाठवलेल्या व्हिडिओंचा मी अभ्यास करायला सुरूवात केली. तोपर्यंत एक भयानक, विचित्र,निर्दयी आणि अति-विषारी म्हणून त्यांची प्रसिद्धी माझ्या कानावर आलेली होती. आपण शांततेच्या मार्गानी नॅनो स्पिटिकलवर जाणार असलो तरी क्झोटिसॉर्सनी आपल्याला जगू दिले नाही तर त्यांच्यावर विजय मिळवण्याचे मार्ग शोधण्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली. परंतू माझ्या अभ्यासाचे निष्कर्ष या प्रस्थापित मतापेक्षा वेगळेच निघू लागलेत..."


क्रमशः

Monday, May 14, 2007

अंतिम युद्धं - भाग ४

मिस्टर आणि मिसेस लेकशॉ त्यांच्या खाजगी कार्यालयात आले. पाठोपाठ विरीताही आली.
मिसेस लेकशॉ: मेक अप फार भडक नाही दिसतंय नं?
विरीता: नाही आई, तुमच्या मेक-अपची काळजी नाही मला, पण बाबा, तुम्ही थोडा तरी मेक-अप करायला हवा. एव्हढी ग्लोबल जिओटेलवर मुलाखत आहे. सगळ्या जगातले लोक बघणार आहेत.
मिसेस ले.:आणि जगाबाहेरचेही. अख्खी स्पेस कम्युनिटी कान टवकारून बसली आहे तुम्ही काय सांगताय तुमच्या संशोधनाबद्दल ते ऐकायला.
मिस्टर लेकशॉ: हो ना?मग मेक-अप नाही केला तरी ते ऐकतीलच.
तेव्हढ्यात मिटिओरा चॅनेलच्या प्रतिनिधीने संपर्क साधला. "मिस्टर लेकशॉ, नमस्कार. मी मिटिओराची प्रतिनिधी ल्युकसिमा बोलते आहे. बरोबर पाच मिनिटानी तुम्ही लाईव्ह जाणार आहात. आमच्या व्हिडिओ नेटवर्कनी अल्ट्रा-पोलिंग करायला सुरूवात केली आहे. कृपया "ए चार्टा बिट्वी फाईव्ह ३००" या सिग्नलला परवानगी द्या.
मिस्टर लेकशॉंनी त्याप्रमाणे चॅनेलला घरातल्या व्हिडिओशी कनेक्ट केले.
नमस्कार मंडळी! वेध भविष्याचा या आमच्या कार्यक्रमात तुमचे स्वागत आहे. आजच्या या विशेष एपिसोडमधे आपण लॉंजिटिव्हिटी या विषयावर चर्चा करणार आहोत. आजच्या पॅनेलचे चार सदस्य आहेत - मन्झोली येथून जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ.सुप्रियिनी प्लॅनियोतोव्हा, वडुरा येथून नोबेल पारितोषक विजेते जेनेसेसिस्ट डॉ.विधिस्तव लेकशॉ, रुमेंबेच्या आंतरराळ मोहिम केंद्रातून डॉ.अरिग्रॅव्हो केलूते आणि आशिया विभागाचे आरोग्य मंत्री श्री.चास्कोव्ह बोस्ता.
आपल्या सर्वांचे "वेध भविष्या" मधे स्वागत.
डॉ लेकशॉ, सर्वप्रथम नोबेल पारितोषिक मिळाल्याबद्दल आपले अभिनंदन.
डॉ लेकशॉ: धन्यवाद ल्युकसिमा.
ल्युकसिमा: डॉ लेकशॉ, तुमच्या नेतृत्वाखाली दिग्रस विद्यापिठाच्या लॉंजिटिव्हिटी प्रोजेक्टच्या नविन संशोधनाबद्दल आजकाल बरीच शास्त्रिय माहिती प्रसिद्ध होत असते. पण आमच्या सामान्य प्रेक्षकांना कळू शकेल अशी माहिती तुमच्या या संशोधनाबद्दल सांगता येईल का?
दृष्य बदल:
केवल: निलो, आधी अमरावतीला चल. केक पिक अप करायचा आहे.
तेव्हढ्यात डॉ. लेकशॉंचा चेहरा पडद्यावर वर झळकतो.
निलो: बघ बघ - तुझे आजोबा मिटिओरावर मुलाखत देतायेत!
केवल: अरे हो, विसरलोच होतो. बघ बघ किती स्मार्ट दिसतात नाही का माझे आजोबा आणि किती मानसन्मान आहे त्यांना?
निलो: हो हो आहेत आहेत खूप स्मार्ट आहेत बरं, पण तू आपली व्हिडिओ सुरू कर.
केवल: बरं बाई, करतो.पण आधी गाडीचं ऑडिओ आणि व्हिडियो ट्रेस बंद कर.
निलो: ते आधीच केलंय. सुरू कर नं लवकर.
केवल: आ हा... जगातल्या मोस्ट वॉंटेड अतिरेक्यावर फिदा असलेल्या तरूणीला इतकी अधिरता बरी नाही. हे घे - आधी हेडसेट लावायला विसरू नकोस - बी सेफ दॅन सॉरी.
केवल व्हिडिओ सुरू करतो.
"२० व्या शतका अखेर, दुसर्‍या महायुद्धानंतर मध्यम वर्ग नावाचा एक महत्वाचा वर्ग उदयाला आला. " निदांचे निवेदन सुरू झाले.
निलो: व्हॉट अ सिड्क्टिव व्हॉइस.. गो ऑन निदा...
"त्याकाळातील मानवी समुहांना देश असे नाव होते. काही महत्वाच्या देशांमधे लोकशाही नावाची राजकिय व्यवस्था अस्तित्वात होती. या व्यवस्थेमधे माणसांना वाट्टेल ते करायची मुभा होती. कोणी किती साधनांचा विनियोग करायचा यावर कुठलेही कायदेशीर बंधन नव्हते. ज्या सुख सुविधा आधी फक्तं मूठभरांनाच उपलब्ध होत्या त्या आता या प्रचंड मोठ्या वर्गाला उपलब्ध होऊ लागल्या. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा आकार प्रचंड वाढला. नफा वाढवण्यासाठी जगभरात मध्यमवर्गाच्या वाढीसाठी राज्यकर्ते आणि उद्योगपती प्रयत्नं करू लागले. पण हया सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे होमोसेपियन्सचे इकोलॉजिकल फूटप्रिंट प्रचंड मोठे झाले. एका दृष्टिने भौतिक सुखांना लालचवलेला मध्यमवर्ग आणि त्यांना चैनीच्या विविध वस्तू आणि सेवा विकणार्‍या बहुराष्ट्रिय कंपन्या यांनी या पृथ्वीच्या साधन संपदा ओरबाडायला सुरूवात केली. मुक्तं बाजारपेठेचा पुरस्कार करणार्‍या या समाजात प्रचंड विरोधाभास होता. एकीकडे "देअर इज नो फ्री लंच" असे ब्रिदवाक्य असलेल्या या समाजाने निसर्गाकडून घेतलेल्या संपत्तीची भरपाई कधीच केली नाही. हे सगळं जग हे मानवाने एक्स्प्लॉईट करण्यासाठी निर्माण झाले आहे अशी त्यांची ठाम समजूत होती. दुसरीकडे त्या काळात मानवी ह्क्कांच्या मूल्यांमधेही क्रांती झाली. माणसांनी माणसांची पिळवणूक करण्याचे प्रमाण बरेच कमी झाले. पण मुळात पिळवणूक हा या समाजाचा पाया असल्याने आता सर्व माणसांनी मिळून निसर्गाची आणि इतर प्राणिमात्रांची पिळवणूक सुरू केली. मानवी गरजा भागवण्यासाठी इतर प्राण्यांचे हॅबिटॅट नष्टं करणे, त्यांचे अनन्वित हाल करणे, त्यांना बंदी बनवणे यात त्यांना काहीच चुकीचे वाटत नव्हते. त्याकाळातील थोडे विचारवंत, शास्त्रज्ञ आणि इतर मूठभर लोक ही गोष्टं निदर्शनास आणून देत होते पण त्यांचा आवाज फारच दुबळा ठरला. "
दृष्य बदल:
डॉ. लेकशॉ: ल्युकसिमा, सद्ध्या मानवाचे सरासरी नैसर्गिक आयुर्मान ९५ वर्षाचे असले तरी आज उपलब्ध असलेल्या लॉंजिटिव्हिटी ड्रगमुळे ते जास्तीत जास्तं २५० वर्षांपर्यंत वाढू शकते. परंतू अनेक वर्षांपासून ही २५० वर्षाची आयुर्मर्यादा ओलांडण्यासाठी आम्ही प्रयत्नं करत आहोत. ते संशोधन सुरू असताना आम्हाला एका नविन जीन्स आढळून आले आहे. या जीन्सला लाईफसायकल पॉज जीन्स असं नाव देण्यात आलं आहे. या जीन्सला इम्युलेट करणारे चिरनिद्रा ड्रग तयार करण्यात आम्हाला यश आले आहे. चिरनिद्रा ड्र्ग घेतलेला माणूस कितीही वर्षे निद्रित अवस्थेत राहू शकतो. जिवंत रहाण्यासाठी त्याला फक्तं व्हायटल सप्लाय म्हणजे ऑक्सिजन आणि सलाईनच्या माध्यमातून दिल्या जाणार्‍या द्रवांची गरज असेल. विशेष म्हणजे निद्रेच्या काळात एजिंग पॉज झाल्यामुळे हा काळ अयुर्मानात गणला जाणार नाही. म्हणजे समजा १०० वर्षाच्या माणसाला १०० वर्षे चिरनिद्रेत ठेवले तर निद्रेतून उठल्यावर तो उरलेले १५० वर्षाचे आयुष्य तो त्यानंतर जगू शकेल.
ल्युक्सिमा: निद्रेतून उठवण्यासाठी काय करावे लागेल?
डॉ. लेकशॉ:चिरनिद्रा ड्र्गचा इफेक्ट रिव्हर्स करणारे ड्र्ग झोपलेल्या माणसाला द्यावे लागेल. अर्थात आयुर्मर्यादा वाढवण्यासाठी आमचे संशोधन सुरूच रहाणार आहे, तरीही त्या संशोधनातला हा एक मैलाचा दगड आम्ही गाठला आहे असे म्हणता येईल.
ल्युक्सिमा:धन्यवाद डॉं लेकशॉ. आता डॉ. सुप्रियिनींकडे वळू या. डॉ. सुप्रियिनी, मानसशास्त्राच्या दृष्टिने या संशोधनाचे कसे मूल्यमापन करता येईल.
डॉ. सुप्रियिनी: ल्युक्सिमा, मानसशास्त्राच्या दृष्टिने हे संशोधन फारच आव्हानात्मक आहे. म्हणजे विचार करा की शंभर वर्षे चिरनिद्रा घेतलेला माणूस एका संपूर्ण नविन जगात जागा होईल. आजूबाजूच्या घटनांचे ज्ञान त्याला नसेल. विशेष म्हणजे त्याचे समकालीन लोक त्या काळात अस्तित्वात नसतील म्हणजे टाईम मशिनमधे बसून पुढे गेलेल्या माणसासारखी त्याची अवस्था असेल. अशा परिस्थितीत त्याचे नविन काळात मानसिक आणि भौतिक पुनर्वसन करण्याची गरज असेल.
ल्युक्सिमा:धन्यवाद डॉ सुप्रियिनी. आता वळू या डॉ.अरिग्रॅव्होंकडे. डॉ.अरिग्रॅव्हो, या संशोधनाची सर्वात जास्तं दखल जर कोणी घेतली असेल तर ती अंतराळ संशोधकांनी. याचे कारण काय?
डॉ.अरिग्रॅव्हो: ल्युक्सिमा, आपल्याला माहित आहेच की पृथ्वीच्या सद्ध्याच्या अवस्थेत इथे जगणे अत्यंत कठिण झाले आहे, आणि येत्या पाचशे ते सातशे वर्षात ते अशक्यच होणार आहे. म्हणजे आपण आपल्या अस्तित्वाची अखेरची लढाई लढत आहोत. करा अथवा मरा ही उक्ति इतिहासात बरेचदा वापरण्यात आली आहे. पण दुर्दैवानी आजच्या इतकी ती कधी अक्षरशः लागू पडलेली नाही. अस्तित्वाच्या या लढाईचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मानवाला जगण्याला अनुकूल असलेल्या ग्रहावर स्थलांतर करणे. या दृष्टीने नॅनो-स्पिटिकल नावाचा ग्रह हा आपल्याला माहिती असलेल्या ग्रहांपैकी सगळ्यात अनुकूल परिस्थिती असलेला ग्रह आहे. गेल्या अनेक शतकापासून आपण या ग्रहाचा एक पर्याय म्हणून विचार करत आहोत. आपल्याकडे त्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान उपलब्धं आहेच. शिवाय या ग्रहाच्या वाटेवर योग्य अंतरावर असलेले उर्जास्त्रोत आपल्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. या ग्रहावर आपण अनेक मानवरहित मोहिमा पाठवल्या आहेत. इतके सगळे असूनही दोन फॅक्टर आपल्या विरुद्ध जाणारे आहेत. पहिला फॅक्टर म्हणजे मिशनला अतिरेक्यांचा धोका. दुसरा म्हणजे या ग्रहावर जायला ३५७ बर्षे लागतात. आणि आपली आयुर्मर्यादा अजून तितकी वाढलेली नाही. त्यामुळे प्रवासामधे लागणारे मिशन क्रिटिकल शास्त्रज्ञ हा प्रवास पूर्णत्वाला नेऊ शकत नाहीत. परंतू डॉ. लेकशॉंच्या संशोधनामुळे आम्हाला मानवी मिशनचे नियोजन करणे शक्य होणार आहे.
ल्युक्सिमा:म्हणजे नक्की काय योजना आहेत अंतराळ केंद्राच्या?
डॉ.अरिग्रॅव्हो:प्रत्येक मिशन क्रिटिकल कार्यासाठी तीन तज्ञ पाठवले जातील. सुरवातीला तीनपैकी एक कार्यरत असेल आणि दोन चिरेनिद्रेत असतील. कार्यरत तज्ञाची आयुर्मर्यादा संपत आली किंवा इतर आकस्मित कारणामुळे किंवा कार्यरत तज्ञ अतिरेकी असल्याचे लक्षात आले तर चिरनिद्रेतील तज्ञ त्याची जागा घेऊ शकतील.
दृष्य बदल: ठिकाण लेकशॉंचे रहाते घर.
केवल (कुजबुजत): निलो,धिस इज अ व्हेरी प्रोफाऊंड मॉमेंट फॉर मी. डॉ. लेकशॉंच्या घरात निदांची व्हिडिओ घेऊन आलोय मी.... इतिहास मला एक गद्दार,अतिरेकी म्हणून बघेल की एक हिरो म्हणून?
निलो: (केवलचा हात हातात घेऊन) इतिहासात जायला आपल्याला भविष्य असायला हवं ना?

क्रमशः

टिप: आमच्या घरी भारतातून पाहुणे येणार असल्यामुळे पुढील एक आठवड्यात युद्ध विराम जाहीर करण्यात आला आहे. तेव्हा भेटू या त्या पुढच्या आठवड्यात... वाचत रहा...

Wednesday, May 09, 2007

अंतिम युद्धं - भाग ३

"पृथ्वीची निर्मिती सेहेचाळीस कोटी छत्तीस दशलक्ष सातशे त्रेचाळीस हजार दोनशे एकोणिस वर्षांपूवी झाली. त्यानंतर साधारण ९ कोटी वर्षांनी पहिल्या सुक्ष्मजीवांणूंची निर्मिती झाली. त्यानंतर १६ कोटी वर्षांनी अल्जी तयार झाली. आणखी सहा कोटी वर्ष लागली पहिला प्राणी जन्माला यायला. एक कोटी वर्ष पुढे जाऊ - आता आपल्या समुद्रात मासे जन्माला आले. समुद्रातल्या प्राण्यांनी ह्ळूह्ळू जमिनीवर यायला सुरुवात केली. पुढच्या एक कोटी वर्षांनी सरपटणारे प्राणि अस्तित्वात आले.
त्यापुढचा एक कोटी वर्षांचा काळ सस्तन प्राण्यांच्या उत्क्रांतीसाठी जावा लागला. त्यानंतर डायनॉसॉर,पक्षी,डायनॉसॉरचा अंत, आदीमानव,व्हेलमासे,घोडे यांचा उदय झाला. आदिमानवांच्या अस्तित्वाचा पहिला पुरावा ६५ दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे. आपली सुंदर वसुंधरा विविध प्राणि-पक्ष्यांनी नटलेली होती." निदांची व्हिडिओ सुरू झाली. स्वतः निदांच्या प्रभावी आवाजाने भाष्य फारच परिणामकारक झाले होते.
"परंतू पंधरा हजार वर्षांपूर्वी एक महत्वाची घटना घडली - आपण म्हणजे होमोसेपियन्स अस्तित्वात आलो - केवळ पंधरा हजार वर्षांपूर्वी. इतर सर्व प्राणि आपल्या आधी कोट्यावधी वर्षं इथे रहात होते. एका अर्थाने आपण त्यांच्या घरात पाहुणेच होतो. या पंधरा हजार वर्षांत आपण शिकार,पशुपालन असे करत करत शेती व्यवसायात स्थिरावलो. आपल्या कुशाग्रं बुद्धिमत्तेने आपण निसर्गावर मात करून एका प्रगत समाजाची निर्मिती केली. शहरे वसवली,अर्थव्यवस्था,राज्यव्यवस्था,कुटुंबव्यवस्था स्थापन केली. होमिसेपियन इतर प्राण्यांपेक्षा बुद्धिमान तर होतेच. पण त्यांच्यात आणि इतर प्राण्यांमधे आणखी एक महत्वाचा फरक होता. होमोसेपियन हे मॅनिप्युलेटिव्ह होते. कपट करण्याची कला त्यांच्याशिवाय पृथ्वीवर कोणाकडेही नव्हती. आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला आव्हान देतील असे दुसरे कोणीही नव्हते. त्यामुळे मनुष्यप्राण्याची प्रगती अबाधितपणे होत राहिली.
परंतू या दैदिप्यमान प्रगतीचा आढावा घेताना एक गोष्टं विशेष लक्षात घेतली गेली नाही- ती म्हणजे प्रगती सातत्याने पिळवणूकीच्या मार्गाने होत होती. माणसं माणासांवर अत्याचार आक्रमणेकरून सत्ता मिळवत. क्षुल्ल्क स्वार्थासाठी एक दुसर्‍याला फसवणे, खून करणे अशी दुष्टं प्रवृत्ती इतर कोणत्याही अकपटी प्राण्यांमधे आढळून येत नाही. ही गोष्टं लक्षात घेऊन कुठेतरी काहीतरी चुकते आहे हे आत्मपरिक्षण केले गेले नाही. ज्यांनी लक्षात आणून द्यायचा प्रयत्नं केला त्यांना मूर्खात काढण्यात आले. अशा प्रकारच्या व्यवस्थेत अकपटी बुद्धिमत्तेला आदर अथवा स्थान मिळाले नाही. कपटीपणालाच बुद्धिमत्तेचा पुरावा समजण्यात आले." केवलने दोन मिनिटे पॉज करून काही नोटस घेतल्या.
"इ.स. अठराव्या शतकाच्या अखेर औद्योगिक क्रांती झाली. त्यानंतर उण्यापुर्‍या शंभर वर्षात पहिली दोन महायुद्धं लढली गेली. भौतिक प्रगती झाली तरी माणसांनी एकमेकांवर अनन्वित अत्याचार करणे थांबवले नाही. त्यानंतर आजपर्यंत आपण दहा महायुद्धांचा सामना केला आहे." केवलने निलोकडे बघितले आणि त्याला जोरात हसू आले.
निलो: हसतोयस काय असा? ही काय कॉमेडी वाटली की काय तुला?
केवल: निलो, भाषणाबरोबर तुझे ओठ हलतायेत - चक्कं पाठ केलंयस की काय भाषण?
निलो: (ओशाळत) - नाही रे, इतके वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकते मी.
दोघेही हसले आणि पुन्हा व्हिडीओ सुरू केली. निदांचा चेहरा पडद्यावर आला.
केवल:ओ माय गॉड निलो, लाजतेयस तू चक्कं निदांकडे बघून!
निलो आणखी लाजली.
केवल:निलो, तुझ्यापेक्षा शंभरेक वर्षांनी मोठे आहेत ते.
निलो: माहीत आहे मला. पण आय हॅव अ क्रश ऑन हिम.
केवल: (निलोचे हात हातात घेऊन) ओ माय गुडनेस! बी केयरफुल
निलो: आय नो - आय विल बी फाईन.
तेव्हढ्यात "आंद्रेशा इन डिस्ट्रेस. फर्स्ट अलर्ट." असा संदेश केवलच्या इन नेटवर्क मेसेजिंग सिस्टिमने दिला. त्याबरोबर त्याने शिखर विरीता, आणि आजी आजोबांच्या पॉकेट युनिव्हर्सवर कॉल लावून बघितले. कोणीच उत्तर दिले नाही तेव्हा आंद्रेशाचे लोकेशन मागितले. घरातच आहे समजल्यावर जरा हायसे वाटले. इन नेटवर्क व्हिडिओ रेंडिशनवर जाऊन घराच्या इंटिरियरची लाइव्ह व्हिडिओ मागितली. तेव्हा आंद्रेशाला डॉक्टर तपासत होते. त्यापुढचं सगळं दृष्य बघून त्याचाही जीव भांड्यात पडला.
अखेर शिखरनी त्याचा कॉल रिटर्न केला. आंद्रेशा गाडीत राहिल्याचे कळल्यावर केवल चांगलाच भडकला. "पण गाडीत कोणी व्यक्ति असताना गेट्रियममधून गाडी कार्बन झोन मधे जाणं शक्यच नाही - ताबडतोब बजाजला फोन करून हे कसं झालं ते विचारायला पाहिजे" म्हणत केवलने बजाजची कस्टमर सर्व्हिस ऎक्सेस केली. आंद्रेशाला झोप लागल्यामुळे ती फार खाली सरकली होती त्यामुळे ती डिटेक्ट झाली नाही अशी माहिती मिळाली. पुन्हा असं होऊ नये म्हणून कार्बन झोनमधे पुश करण्याआधी मॅंडेटरी मॅन्युअल इन्स्पेक्शनचे सिक्युरिटी सेटिंग टाकायला सांगितले.
हे सगळं करण्यात बराच वेळ गेला शिवाय उद्याच्या तयारीची कामे ही बरीच राहिली होती. त्यामुळे केवलला निघणे भाग होते.
केवल: तुझी मेमरी स्टिक डाऊनलोड करू का?
निलो: त्याचा काही उपयोग नाही. तू अजून संघटनेचा सदस्य झालेला नाहीस. त्यामुळे माझ्या उपस्थितीशिवाय ती तुला बघता येणार नाही.
केवल: मग? परवा मला फारच कमी वेळ आहे, शिवाय जायच्या आधी आणखी काही शंका असतील तर?
निलो: असं कर उद्या मी पार्टीला येईन तेव्हा घेऊन येईन. जमलं तर निदान ऑडिओ तरी ऐकता येईल तुला.
केवल: ते काही नाही - तुला आत्ताच किड्नॅप करायले हवे. मला घरी पोचव - जाताना रस्त्यात आईने सांगितलेली कामे करायची आहेत. मग उशीर झाला म्हणून माझी आई तुला रात्री आमच्याकडेच रहाण्याचा आग्रह करेल. तिने नाही केला तर मी करेन.
निलो: चांगला प्लॅन आहे. मला रात्रंभर निदांकडे बघता येईल.
केवल: यू क्रेझी गर्ल... लेटस गो...

क्रमशः

टीप: पृथ्वीचे वय साधारण ४६ कोटी वर्षे आहे असे आजच्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. ३ हजार वर्षानंतरच्या वैज्ञानिकांना ते वय अगदी निश्चित सांगता येइल या समजुतीने ४६३६७४३२१९ हा आकडा लेखिकेने रॅंडमली निवडला आहे.

Friday, May 04, 2007

अंतिम युद्धं - भाग २

"मग बाबा, कसं वाटतंय इतका मान सन्मान मिळाल्यावर? आत्ता कुठे तुमच्याशी मोकळेपणानी बोलायला मिळतंय!" गाडी हमरस्त्याला लागली तसा शिखर म्हणाला.
"छान वाटतंय". मिस्टर लेकशॉ म्हणाले.
"इतकं शांतपणे सांगितलं होतं तुम्ही मला तुम्हाला नोबेल प्राईझ मिळाल्याचं. मी असतो तर नाचलो असतो" शिखर म्हणाला.
"संशोधन अजून पूर्ण झालेलं नाही माझं. ते पूर्ण होईल तेव्हा जरूर नाचेन. पुरस्कार काय मिळतातच दरवर्षी" मि. लेकशॉ
"अरे त्यांना नोबेल काय किंवा काय काय -त्यांचे काम बरे आणि ते बरे" मिसेस लेकशॉ म्हणाल्या.
"अहो बाबा पण नोबेल मिळाल्याचा आनंद नाही तर निदान १०० वर्षाचं लॉन्जिटिव्हिटी ड्रग मिळ्णार आहे - तुम्हालाच नाही, तर आईलाही - त्याचा तरी आनंद होत असेलच ना?"
"माझं संशोधन पूर्ण व्हायला आणखी १०० वर्ष लागली नाहीत म्हणजे मिळवलं" मिस्टर लेकशॉ
"संशोधन पूर्ण होवो की नं होवो, पण माझ्या खापर-खापर नातवांना तुम्ही भेटणार हे काय कमी आहे?" शिखर म्हणाले.
"आई, मी तुझ्याजवळ बर्‍याच भेटवस्तू देऊन ठेवणार आहे आपल्या पुढच्या पिढीला द्यायला काय? कुणाचं लग्नं असलं की आपली एक वस्तू काढायची आणि शिखर पणजोबांनी दिली आहे म्हणून सांगायचस - काय?" - शिखर
"अरे बाबा असं भलतंच बोलू नकोस, आमची हयात तुमचं भलं चिंतण्यात गेली. तुझ्या बाबांचं संशोधन पूर्ण झालं की लॉन्जिटिव्हिटी ड्रगचं रेशनिंग करायची गरजच उरणार नाही" मिसेस लेकशॉ.
"मग आई, पुढची शंभर वर्ष तुम्ही काय करणार सांगा पाहू?" विरीता म्हणाली.
"बाबांची आणि तुमची काळजी वहाणार, दुसरं आणखी काय केलंय मी?" मिसेस लेकशॉ
तेव्हढ्यात गेट्रियमची दारं उघडली आणि मंडळी घरात शिरली.
"आई, बाबा, आता आम्ही आलो आहोत उद्याच्या पार्टीची काळजी घ्यायला. तुम्ही आता आराम करा." विरीता म्हणाली आणि लगेच कामाला लागली.
"बाबा, मला तुमचं ते नोबेल प्राईझ दाखवा बरं आधी .." असं म्हणत शिखर मिस्टर लेकशॉंच्या मागोमाग खाली जाऊ लागले.
"आंद्रेशा, आंद्रेशा, झोपायची वेळ झाली.. झोपायाची वेळ झाली" आंद्रेशाचा काळजीवाहक रोबो कल्टीकॅप घरात सगळी कडे फिरू लागला. पाच मिनिटानी कल्टीकॅपने जोरात अलार्म वाजवला - "आंद्रेशा दिसत नाही, आंद्रेशा दिसत नाही, आंद्रेशा दिसत नाही." असं म्हणत अलार्म वाजवत कल्टीकॅप सगळीकडे फिरू लागला.
"अगं बाई... अहो, धावा धावा, आंद्रेशा गाडीतच राहिली वाटतं" जिवाच्या आकांताने विरीता किंचाळली.
ते ऐकून सगळेच गेट्रियमकडे गेले. गाडी पुल केली आणि बेशुद्ध पडलेल्या आंद्रेशाला उचलून घरात आणले.
शिखरनी लगेच इमर्जन्सी कार्बन कमांड सेंटरला इंटिमेट करायचे बटन दाबले. आंद्रेशाला टेबलावर ठेवून ऑक्सिजन मास्क घातला.
मिस्टर लेकशॉनी प्रथमोपचार उपकरणे बाहेर काढली. मिसेस लेकशॉ आणि विरीता देवाची प्रार्थना करत त्यांना मदत करू लागल्या.
पंधरा वीस मिनिटाने आंद्रेशानी डोळे उघडले.इमर्जन्सी कार्बन कमांड सेंटरने पाठवलेले डॉक्टर आले होतेच. त्यांनी तपासणी करून घाबरण्याचे काही कारण नाही असे सांगितले तेव्हा कुठे सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.
विरीतानी रडत रडत आंद्रेशाला कुशीत घेतले. "कसं विसरलो बाळा आम्ही तुला? घाबरलीस का माझ्या बाळा? झोप लागली गाडीत? दादा नेहेमी आणतो नं तुला उचलून म्हणून आमच्या लक्षात नाही आलं बेटा हं- सॉरी. सॉरी..."
आंद्रेशाला मात्रं हे काय सुरू आहे याचा थांग पत्ता लागत नव्हता. पण आई रडते आहे हे बघून ती ही रडायला लागली.
कल्टीकॅप आंद्रेशाचा माग काढत तिच्याकडे आला. ती रडते आहे हे पाहून तिचे आवडते कार्टून त्याच्या मॉनिटरवर दाखवू लागला. ते बघून आंद्रेशाची कळी खुलली. "बेड टाईम आंद्रेशा" असं म्हणत कल्टीकॅपने तिचा हात हातात घेतला आणि दोघे आंद्रेशाच्या बेडरूमकडे निघाले.
"विरीता, देवाचा आशिर्वाद म्हणून थोडक्यात निभावलं बाई. उद्याची पार्टी झाली की परवा लगेच शेगावला दर्शनाला घेऊन जाऊ या आंद्रेशाला बरं?" विरीताच्या पाठीवर हात फिरवत मिसेस लेकशॉ म्हणाल्या.

क्रमशः

Wednesday, May 02, 2007

अंतिम युद्धं - भाग १

५ मार्च ५००७
ठिकाण:
वडुरा ट्यूब रेल्वे स्टेशन.
लोणीहून येणारी ५.४५ फ्लॅशफास्ट जराही आवाज नं करता थांबली. गाडीचे स्वयंचलित दरवाजे उघडले आणि आठ वर्षांची आंद्रेशा जवळ-जवळ उडया मारतच बाहेर पडली. प्लॅटफॉर्मवर तिचे आजी-आजोबा उभे होते. त्यांच्याकडे ती धावत धावतच पोचली. "हॅपी बर्थ डे आंद्रेशा!" आजी म्हणाली. "आजी आजी, आम्ही आज म्युझियममधे गेलो होतो!" "आंद्रेशा, थॅंक यू म्हणायचं कोणी हॅपी बर्थ डे म्हटलं की" आंद्रेशाची आई विरीता गाडीतून उतरता उतरता म्हणाली. तिच्या मागून आंद्रेशाचा मोठा भाऊ केवल आणि बाबा शिखरही उतरले. "अरे व्वा, मज्जा आहे मग एका मुलीची बा! काय काय बघितलं म्युझियममधे?" आजोबांनी विचारलं. "झाड, कुत्रा आणि गाय आणि माकड" आंद्रेशा म्हणाली, आणि ते छोटं माकड झाडावर उड्या मारत होतं अशा अशा.."
फ्लॅशफास्ट आल्या दिशेनीच जमिनीमधे लुप्तं झाली आणि सगळी मंडळी आता पार्किगकडे जाणार्‍या एस्केलेटरच्या दिशेने चालू लागली. एस्केलेटरवर उभे असतानाच स्टेशनवर घोषणा झाली. "सूर्यास्ताची वेळ". "बाई ग,वेळ कसा गेला कळलंही नाही. अजून कितीतरी कामं राहिली आहेत उद्याच्या पार्टीच्या तयारीसाठी! शिखर, उद्या सूर्योदयाची घोषणा झाल्याबरोबर मला उठव हं, आणि तू आणि केवल जरा शॉपिंग कराल का प्लिज उद्या? आणि हो, ढेरे पाटील फुड कंपनीला केक सांगायचा राहिला आहे तो पण सांग ना प्लिज." विरिता एकेक सूचना देत असतानाच एट्रियम आलं. शिखरने त्याचा रिमोट दाबला आणि काही क्षणातच कार त्यांच्या समोर येऊन उभी राहिली.
"मी समोर बसणार आणि दादा तू माझ्या बाजूला बस म्हणजे आपण सेंचूरा खेळूया घरी जाता जाता". आंद्रेशा म्हणाली. तिचं ऐकेल तो तिचा दादा कसला, पण "बस रे जरा, आज तिचा वाढदिवस आहे" असं आईने बजावल्यावर तो तयार झाला. बच्चे कंपनी समोरच्या सीटवर बसल्यावर मोठ्यांनी आपला मोहोरा मागे वळवला. केवलने डेस्टिनेशन पॅनेल मधून "आमचे घर" निवडल्यावर कार सुरू झाली. कार सुरू होऊन जेमतेम मिनिटभरच झालं असेल नसेल तेव्हढ्यात "ऑक्सिजन नियरिंग रिफिल लेव्हल. शुड आय पुल ओव्हर टू द नियरेस्ट रिफिल स्टेशन? यु हॅव १०० मोअर किलोमिटर्स टू गो विथ ऑक्युपन्सि ऑफ ८" कारनी घोषणा दिली. "य़ेस" शिखर म्हणाला. "छिछिक छिछिक" असा आवाज करत कारने मार्ग बदलला.
विरीता:आत्ता अगदी घ्यायलाच हवा का शिखर ऑक्सिजन? आधीच उशीर झाला आहे
शिखर: होय गं फर्स्ट थिंग फर्स्ट. परवा शर्मांथिल साहेबांच्या गाडीचा ऑक्सिजन इंडिकेटर खराब झाल्यामुळे त्यांना शेवटी इमर्जंसी क्रू ने रेस्क्य़ू केलं ते आठवतय ना? जवळपास बेशुद्धच पडले होते साहेब. गाडी नविन असली तरी या बजाजच्या गाड्यांचा भरोसा नाही
विरीता:मग थांबतोच आहोत तर ड्रायव्हिंग बॅटरीही रिचार्ज करून घे म्हणजे पुन्हा कटकट नको.
शिखर:चालेल.
केवल:बाबा,मला रस्त्यात निलोफरकडे सोडू शकता प्लिज?
विरीता:अरे असं आल्या-आल्या काय? तिला विचारलंयस का येऊ का म्हणून?
शिखर: सोडतो रे - अहो तुमची मात्रं कमालच आहे - हा येणार ते काय निलोला माहित नसणार की काय? मात्रं आईने सांगितलेली कामं विसरू नकोस बाबा - नाहीतर माझी वाट लागायची. निलोला आपल्या गाडीचा पोर्ट नंबर फीड करायला सांग त्यांच्या गॅट्रियममधे.
केवल: बाबा आपली गाडी त्यांच्या ट्रस्टेड कारलिस्ट मधे आधीच एंटर केली आहे.
शिखार: आs हाs - गाडी बरीच पुढे गेलेली दिसत्येय तुमची.
केवल: बाबाs
शिखर: लाजतोस काय बेट्या मुलीसारखा - जाऊ दे चांगली फुल स्पिडमधे.
आंद्रेशा:हसताय काय सगळे? दादा - खेळ ना - तुझी पाळी - नाहीतर मी जिंकेन बर?
केवलने "निलोचे घर" हा थांबा गाडीच्या रस्त्यात फिड केला.
निलोच्या घरासमोर गाडी येताच गेट्रियमचा दरवाजा उघडला. निलोफर गेट्रियममधे उभीच होती. गाडीतून उतरणार्‍या केवलने जवळपास ओढतच तिला आपल्या मिठीत घेतले आणि कपाळाचे चुंबन घेऊन "किती दिवसांनी भेटतोय तुला?" असा प्रश्नं केला.
निलोने मग इतरांना अभिवादन करून घरात येण्याचा आग्रह केला.
विरीता: आज नको गं बाई, पण आईला सांग पुढच्या वेळेला नक्की येईन. आणि शिवाय उद्या येताच आहात तुम्ही पार्टीला नाही का?
निलो: बरं.
शिखर:बरंय तर - चला आता (केवलकडे बघून एक डोळा मिचकावून )- सगळे अगदी फुल स्पिडमधे हं!! टाsटाs.
म्हणेस्तोवर गाडी गेली सुद्धा.
निलोफरने हाताची घडी घातली आणि प्रश्नार्थक मुद्रेने ती केवलकडे बघू लागली.
केवल: प्लिज असं पाहू नकोस माझ्याकडे.
निलो: केवल, गेल्या वेळी रागारागाने निघून गेलास तेव्हा आपली पुन्हा भेट होईल असं वाटलं नव्हतं मला. तू पूर्ण विचार केलायस का?
केवल:निलो, मी बराच विचार केला आहे, पण निर्णय घेण्याआधी मला अधिक माहिती हवी आहे.
निलो: म्हणजे माझ्यावर विश्वास नाही म्हणायचा तुझा?
केवल: कुठल्याही गोष्टीचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय निर्णय घेत नाही मी.
निलो: दॅटस फेयर. पण मिळालेल्या माहितीची गोपनियता ठेवायची काळजी घेतली आहेस ना?
केवल: ते तू माझ्यावर सोड. कुठल्याही इंटेलीवर्कच्या ट्रेसमधे नं येणारा इन्फोट्रिस असेंबल केला आहे मी. हवं तर तू टेस्ट करून बघ स्वतः.
निलो: ओके. चल मग माझ्या खोलीत जाऊ या.
घरात शिरताच निलोफरच्या आई-बाबांनी केवलचे स्वागत केले.
नि.ची आई: अरे या या या किती दिवसांनी आलास - ये बस.
नि.चे बाबा:अभ्यासाचा फार ताण दिसतोय हल्ली? काय घेणार थंड का गरम?
केवल: ऑलमोस्ट नॅचरल कोक चालेल.
नि.चे बाबा: निलो - तू घेणार का काही?
निलो. नको बाबा अगदी आत्ताच कॉफी घेतलीए मी.
नि.च्या बाबांनी तीन ड्रिंक्स बनवून एक केवलला दिले, एक नि.च्या आईला आणि उरलेला ग्लास स्वतः रिचवू लागले.
बरं का केवल? आमच्या क्लबचा प्रेसिडेंट झालोय मी यंदा. बरेच नविन उपक्रम हातात घेतले आहेत.
निलोफर उठून केवलच्या मांडीत येऊन बसली. त्याच्या गळ्यात हात टाकून त्याची चुंबने घेऊ लागली.
"किती वाट पहात होते मी तुझी केवल. किती जीव कासाविस झाला होता तुला भेटायला.
अरे हो - माझा नविन जिओटेल दाखवायचाय तुला - चल ना माझ्या खोलीत प्लिज. बाबा, प्लिज तुम्ही नंतर बोला हं केवलशी?सॉरी.."
"बरं बरं बेटा.." नि.चे बाबा स्मित हास्य करत म्हणाले.
निलो. ओढतच केवलला वरती आपल्या खोलीत घेऊन गेली.
"छान नाटक करता येतं की तुला" दार बंद होताच निलोच्या मिठीतून सुटलेला केवल म्हणाला.
"मग? अरे बाबांनी अजून दोन तास पिडला असता तुला त्यांच्या क्लबच्या गोष्टी सांगत. आणि तू काही कमी नाटक केलं नाहीस गाडीतून उतरताना हं?" इति निलो.
केवलने त्याच्या बॅगमधून एन्फोट्रिस बाहेर काढला. निलोने स्वतःची आय.डी. प्लग इन करून केवलच्या एन्फोट्रिसवर साइन ऑन केलं. मग स्वत:च्या एन्फोट्रिसवर साईन ऑन करून ग्लोबल आय.डी. स्कॅन एप्लिकेशन सुरू केला.
"वन ग्लोबल साईन ऑन फॉर गिव्हन आय.डी." असा मजकूर झळकला.
"गुड जॉब डियर" निलो. ने केवलचे अभिनंदन केले.
"मग आता आलो का तुझ्या विश्वासाच्या वर्तुळात?"-केवल
"अजून काही टेस्टस बाकी आहेत." - निलो.
टेस्ट सुरू करून निलो आपल्या कपड्यांच्या क्लोजेटमधे गेली. अंडरपॅंट ठेवायचा कप्पा रिकामा केला. कप्प्याचा तळ बाजूला सारून त्यातल्या गुप्त कप्प्यातून एक मेमरी स्टिक बाहेर काढली. हे सगळे केवलला दिसणार नाही याची खबरदारी घेत कपडे बदलल्याचं भासवत बाहेर आली.
एव्हाना केवलच्या एन्फोट्रिसने शेवटची टेस्टही पास केली होती.
ट्रेस ऑफकरून निलोफरने स्टिक केवलच्या एन्फोट्रिसमधे इन्सर्ट केली.
त्याबरोबर निदा एड्रियानोंचे भाषाण सुरू झाले.
"आज मी तुम्हाला आपल्या पृथ्वीचा इतिहास सांगणार आहे आणि तिचे भविष्यही..." केवल लक्षपूर्वक ऐकू लागला....

क्रमशः


व्याख्या:
एट्रियम- ऑक्सिजनेटेड झोन आणि नॉन-ऑक्सिजनेटेड झोन मधली जागा. ज्या गोष्टींना ऑक्सिजनची गरज नाही त्या इथून नॉन-ऑक्सिजनेटेड झोनमधे पुश किंवा पुल करण्याची यंत्रणा इथे सज्ज असते.
गेट्रियम: गराज एट्रियम
एन्फोट्रिस:तीन हजार वर्षांनतरचा लेटेस्ट कॉंम्प्युटर.
इंटेलीवर्क: तीन हजार वर्षानंतरचे लेटेस्ट ग्लोबल नेटवर्क
जिओटेल:तीन हजार वर्षानंतरचे टिव्हीचे लेटेस्ट मॉडेल.