Tuesday, June 26, 2007

परतिबाताई राष्ट्रपती होनार?

"आवं तात्याबा कुटं गेल्ता? कवाधरून शोधू रायली तुमाले? येक टाप बातमी सांगायची व्हती - आपल्या परतिबा ताई राष्ट्रपती होते म्हंते" बायजाक्का
"बायजाक्का, ते म्या आधीच वाचलं म्हनून तर गेल्तो चौकातल्या विंटरनेट कापेमधे - म्या कांप्युटर उघडून आपल्या सद्याचे राष्ट्रपतीच र्‍हावू द्या म्हनून सांगूनशानी आलो" तात्याबा
"आता बाई! आवो, परतिबा ताई आपला इकडच्या हाये" बायजाक्का
"आसन आसन, पण त्याहीनं काय दिवे लावले आतापर्यंत? आपल्या अमरावती जिल्ल्याच्या पर्तिनिधी आसताना कधी डुंकून बी बघंनात आपल्याकडं! आपल्या शयराची, जिल्ल्याची काय बी प्रगती झाली नाई त्याईच्या टायमात."
"आवं पन सोनियाबाईनं परतिबा ताईचंच नाव फुडं केलं म्हंते ना?"
"आता बायजाक्का, येक इद्वान, पारमानिक मानूस पहिल्याच टाइमाले राष्ट्रपती झाला त्याले कायच काढाव म्हनतो मी? कलाम सायेब लई हुशार हायेत त्यायची राष्ट्रपती होन्याआधीची कामगिरीबी लई मोठी हाये. लहान-पोरासोरांना बी लई चांगला उपदेश करते ते. त्यायच्या मुळं आपल्या गावची शेंबडी पोरंसोरंबी त्याइच्यावानी थे सायंटिस का काय होतो म्हंते. परतिबा ताईची येकबी कामगिरी न्हाई."
"आवं परतिबा ताई लई भाविक हायेत - त्याईला कोन्या बाबानं सांगितलं हाये म्हने " बायजाक्का
" थोच तं फरक हाये बायजे, कलाम सायेब बाबाच्या भरोशावर सोडनार न्हाईत देशाले. आपुन सोताच हातपाय हलवा लागते."
"आवं पन आपल्या कॉंग्रेसच्या निष्ठावान उमेदवार हायेत ना वं त्या?"
"नेत्याईची निष्ठा जन्तेशी हाये का ते बघा लागते. आनीबानीच्या टाईमात परतिबा ताईनं जन्तेले दिलं लोटून आन केला खुर्चीशी लाळघोटेपना. लोकाईची इच्छा तं बगायला पाहिजे होती कॉंग्रेसनं. दुसरा उमेदार काऊनच उबा केला?"


http://timesofindia.indiatimes.com/Pratibha_claims_divine_premonition_on_greater_role/articleshow/2151402.cms

Friday, June 22, 2007

पुण्यजला गंगा

हिंदू धर्मात ज्या गोष्टी अतिशय पवित्रं मानल्या जातात त्या गोष्टींची स्वतःच अक्षम्य अवहेलना, विटबंना करायची हा आपला खाक्या आहे. पावित्र्यं आणि स्वच्छता याचा अर्थाअर्थी काही संबंध असल्याचे आपल्याला वाटत नाही. या उलट इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळी जाऊन पहा. शांतता,स्वच्छता, प्रसन्न वातावरण हे तिथे अनुभवायला मिळते.
गंगेचे उदाहरण घ्या. गंगा ही आपल्याला पूजनीय असल्यामुळे या विषयावर अनेक श्लोक आणि काव्ये रचली आहेत. गंगेच्या काठावर काय करू नये ते आपल्या पूर्वजांनी पुराणात सांगितले आहे:
गंगा पुण्यजला प्राप्य त्रयोदश विवर्जयेत।
शौचमाचमनं चैव निर्माल्यं मलघर्षणं॥
गात्रसंवाहनं क्रीडा प्रतिग्रहमथो रतिम।
अन्यतीर्थरतिं चैव अन्यतीर्थप्रशंसनम॥
वस्त्रत्यागमथाघातं सन्तारं च विषेशतः।
नाभ्यंगित प्रविशेच्च गंगाया न मलार्दित:॥
न जल्पन्न मृषा वीक्षन्न वदन्न्नृतं नर:।
स्वैर अर्थ:
पुण्यजला गंगेमधे मल-मूत्रत्याग, तोंड धुणे, दात घासणे, चुळा भरणे, निर्माल्य फेकणे, मळलेले अंग घासणे इ करू नये. स्त्री पुरूषांनी जलक्रीडा करू नये. दानाचे ग्रहण करू नये. अन्य तीर्थांची स्तुती करू नये. घातलेले कपडे गंगेत सोडू नयेत, पाण्यावर आघात करू नये तसेच पोहू नये. अंगाला तेल लावून अथवा मळलेल्या अंगानी गंगेच्या पाण्यात प्रवेश करू नये. गंगा किनार्‍यावर वृथा बडबड, खोटारडेपणा करू नये व अपदृष्टीने पाहू नये.
इतकं सगळं अगदी तपशीलात लिहिणार्‍या आपल्या पूर्वजांनी आपलं आताचं वर्तन पाहिलं तर ते काय करतील?
साबण लावून लावून कपडे धुणे,केस कापणे, मृतदेह टाकणे, शहरातील तसेच कारखान्यातील सांडपाणी सोडणे - अशी सर्व तर्‍हेनी चालेलेली ही विटबंना पाहून ते जीवच देतील (गंगेत नव्हे).
आपल्या स्वार्थासाठी धर्माचा वाट्टेल तसा अर्थ लावणारे पंडे आणि डोके नं वापरता, एकही प्रश्न नं विचारता त्यांच्यावर विश्वास ठेवणारे ते भाविक थोर आहेत!
धन्य गंगा धन्य तीचे भक्तं!


संदर्भ:


"श्री गंगाजी का दुरुपयोग":कल्याण मासिक वर्ष ८१, अंक सहा:गीताप्रेस, गोरखपुर

Wednesday, June 20, 2007

गुगल रिडर - तुमच्या आवडत्या ब्लॉग्जचा इन बॉक्स

आवडत्या ब्लॉग्जची यादी करायची आहे? तुमच्या आवडत्या ब्लॉगवर नविन लेख आला आहे का हे बघायचे आहे? गुगल रिडर वापरा.
http://www.google.com/reader/
आजकाल काही लोक ब्लॉगवर जाहीराती टाकू लागले आहेत. गुगल रिडरवर लेख वाचला की त्या जाहीरातींपासून सुटका होते. मी अशा ब्लॉगवर वेगळ्या खुणाच करून ठेवल्या आहेत.

Friday, June 15, 2007

अंतिम युद्ध:वाचकांच्या प्रतिक्रियांची उत्तरे

अंतिम युद्धाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. वाचकांच्या प्रतिक्रियांमधे एक समान धागा आहे.
अश्विनी:काय गं? एकदम असा ऍब्रप्ट का शेवट केलास?बरचसं तू वाचकांच्या तरल का काय कल्पनाशक्तीवरच सोडून दिलेलं दिसतंस.पण आम्हाला थोडा एक्सप्लिसिट शेवट आवडला असता. भले अजून एक भाग का लागेना.
हरेकृष्णाजी:मधेच जरासे डोक्यावरुन जाते
हर्षद:I think you are suggesting about the problems we are facing nowadays because of pollution and all. You should go beyond it and let them show the way to save the mother Earth.

अश्विनी, शेवटाला मिळालेली नेमकी हीच प्रतिक्रिया अपेक्षित होती.खरं म्हणजे मला इतकंही स्पेल आऊट करायचं नव्हतं. फार जड वाटतील असे लेख लिहायचे नव्ह्ते म्हणून कथेचे माध्यम निवडले. काही तरी रोमांचकारी,रहस्यमय लिहून वाचकांचे मनोरंजन करण्याचा माझा कुठलाही उद्देश नव्हता. उलट वाचकांना सगळंच आवडू नये,बराचसा भाग वाचून त्यांनी बेचैन,अस्वस्थ व्हावे,विचार करावा हा खरा उद्देश होता. (कोणीतरी चांगली जळजळीत प्रतिक्रिया लिहावी ही माझी अपेक्षा मात्रं पूर्ण झाली नाही)
हरेकृष्णाजी, वाचकांच्या डोक्यावरून जाणारे काही लिहिण्याचा उद्देश नव्हता. ती माझ्या लेखनातली उणीव आहे हे मात्रं खरे.
हर्षद, भविष्यातील हे युध्द टाळण्यासाठी आपण काय करावे हा प्रश्नं महत्वाचा आहे. या विषयावरचा माझा इंग्रजी ब्लॉग वाचा: http://planetatpeace.blogspot.com/.
आपल्या विचारसरणीत अगदी मूलभूत बदल झाल्याशिवाय इतर बाह्य उपायांचा विशेष उपयोग होणार नाही. आपली आक्रमणकारी असल्यासारखी वृत्ती आधी बदलायला हवी. मानव-केंद्रितता सोडून पृथ्वी-केंद्रितता अंगिकारायला हवी. प्रगतीपेक्षा टिकणे/टिकवणे जास्तं महत्वाचे आहे.पृथ्वीवरील इतर प्राणिमात्रांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात अमूलाग्र बदल व्हायला हवा. प्राण्यांचा उपयोग आपल्या क्षुल्लक गरजा भागवण्यासाठी करायला नको. निसर्गाचे संतुलन राखण्याची एक मोठी जबाबदारी मानव सोडून इतर प्राणी लक्षावधी वर्षांपासून पार पाडत आले आहेत. याबाबतीत ते आपल्यापेक्षा खूप अनुभवी आणि कार्यक्षम आहेत. या महत्वाच्या जबाबदारीतून बाहेर काढून आपल्या ताटातले,कपातले पदार्थ बनण्याचे क्षूद्रं काम त्यांना देऊ नये. आपल्या पाळीव प्राण्यांमुळे जैविक-विविधता धोक्यात आली आहे, जंगलांची प्रचंड हानी होते आहे. इतकंच काय, त्यांच्या चरण्यामुळे शेतीसाठी उपयुक्त असलेला मातीचा वरचा थर (टॉप सॉईल) ही नष्टं होतो आहे.
वनस्पतींचीही तीच अवस्था आहे. फुलांनी डवरलेल्या बागा,घरासमोरचे लॉन,फुलांच्या दुकानातले सुंदर गुच्छ इ बघून हरखून जाऊ नका. बहुदा ती फुलवण्यासाठी वापरण्यात आलेल्या किटकनाशकांनी पाणी प्रदूषित आणि जमिन निकृष्टं झाली असावी. मागच्या व्हॅलेंटाईन डेला तुम्ही विकत घेतलेल्या गुलाबाच्या गुच्छाने खोल समुद्रातले एखादे कोरेल नष्टं झाले असण्याची दाट शक्यता आहे. जिथे मानवाचा हस्तक्षेप झाला तिथे विनाश झालाच म्हणून समजा.
आपल्या साध्या जगण्याने आकाश,जमीन आणि पाणी या तत्वांचा नायनाट होतो आहे - हे जगणेच बदलले पाहिजे हे सांगण्याचा खरा उद्देश होता. केवलला जशा दोन्ही बाजू ऐकून निर्णय घ्यायचा आहे तसाच आपल्यालाही घ्यायचा आहे.

Thursday, June 14, 2007

अंतिम युद्धं - भाग ८ (शेवटचा भाग)

कम्युनमधून निघून निलोने धावत पळत डॉ. लेकशॉंचे घर गाठले. काही तरी कारण काढून ती केवलला त्याच्या खोलीत घेऊन गेली. नविन सदस्य फॉर्मची मेमरी स्टिक केवला दिली.
"केवल तुझा निर्णय झाला असेल तर हा फॉर्म भरून दे मला जायच्या आधी. पण जरा सांभाळून. संध्याकाळी पार्टीच्या निमित्त्याने अनेक महत्वाच्या व्यक्ति येणार आहेत. ते कारण साधून ब्युरो ऑफ इडियटसच्या कारवाया वाढतील."
"ब्युरो ऑफ इडियटस?" केवल
"ज्याला तुम्ही ब्युरो ऑफ इंटेलिजन्स म्हणता ते." निलो "आता तुला संघटनेतले नविन वाक्प्रचार कळू लागतील."
"बरंय - मी बघतो. फार वेळ गायब होऊन चालणार नाही. खाली बरीच कामं करायची आहेत. पण आज जमलं नाही तर पुढच्या वेळेला आणू भरून?" - केवल
"नाही. ते फारच धोक्याचं आहे. तू भरणार नसलास तर मी त्यातली माहिती लगेच नष्टं करेन. नियमच आहे तसा." - निलो
"दादा, दादा, तुला बाबा बोलावतायेत ..." आंद्रेशा दारावर जोरजोरात थापा वाजवू लागली.
संध्याकाळ झाली तशी पाहुणे यायला सुरूवात झाली. शासकिय अधिकारी, अंतराळ संशोधन केंदातील शास्त्रज्ञ, संरक्षण विभागातील अधिकारी, पत्रकार, विद्यापिठातील प्रमुख मंडळी अशी दिग्गज मंडळी जमली होती. बहुतेकांच्या संभाषणात दोनच गोष्टी होत्या- डॉ. लेकशॉंचे संशोधन आणि दहशतवाद. डॉ. लेकशॉंशी प्रत्यक्ष बोलायची संधी मिळण्याची बरेच लोक वाट पहात होते. एका कोपर्‍यात मात्रं जरा वेगळ्या विषयावर चर्चा सुरू होती.
विरिता: आज दुपारपासून तुमच्या निलोने खूप मदत केली हं आम्हाला.
नि.ची आई: अहो त्यात काय, मीच सांगितलं होतं तिला तुम्हाला जरा हातभार लावायला.
दुसर्‍या कोपर्‍यात जाऊन सलगी करणार्‍या निलो आणि केवलच्या जोडीकडे कौतुकाने बघत विरिता म्हणाली: किती भराभर मोठी होतात नाही का ही मुलं! अगदी कालची गोष्टं असल्यासारखं ह्यांचं बालपण मला आठवतं आहे.
नि.ची आई: हो ना, पण मोठे झाले की काळजी लावतात जीवाला. जीव भांड्यात पडला या दोघांची गाडी रूळावर येतेय ते बघून. तिचं ते कम्युनमधे जाणं कमी झालं तेव्हापासून एक मोठ्ठं संकट टळल्यासारखं वाटतंय मला. सुंठेवाचून खोकला गेला. कसलं गं बाई ते कम्युन! शी! -अगदी जनावरांसारखं रहाणं!
"हॅलो यंग कपल, हाऊ डू यू डू? मी कॅप्टन गोर्की!" स्वतःची ओळख करून देत कॅप्टन गोर्कींनी केवल आणि निलोशी हास्तांदोलन केले.
निलो आणि केवलने आपापली ओळख करून दिली.
"अरे वा, मग इतक्या मोठ्या शास्त्रज्ञांचे नातू म्हणजे तुमच्याकडूनही बर्‍याच अपेक्षा आहेत आमच्या..."
"आमच्या? " केवलने प्रश्नं केला.
"आमच्या म्हणजे आमच्या संरक्षण विभागाच्या! तरूणांनी चुकीच्या मार्गाला लागू नये ही आमची जबाबदारी समजतो आम्ही." कॅप्टन गोर्की.
"अरे वा - मग तुमच्या या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे?" निलो (वरकरणी)
"हो का? इडियट भामट्या, आमचा मार्ग चुकीचा का? बघच आता." निलो (मनात)
"संरक्षण विभागाने एक कार्यशाळा आयोजित केली आहे पुढच्या महिन्यात. त्यामधे तरूणांना अतिरेकी संघटनांपासून स्वतःचे कसे संरक्षण करावे त्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे." कॅप्टन गोर्की.
"अरे वा - फारच छान - आम्हाला प्लिज कळवा हं. जाऊ यात का केवल? " निलो (वरकरणी)
"शहरातल्या सगळ्या सदस्यांना घेऊन येते तुमच्या या रिक्रूटिंग ड्राईव्हमधे. करा पैसे खर्च आमच्यावर! हॅ हॅ हॅ" निलो (मनात)
"दादा दादा, आजोबा बोलावतयेत" आंद्रेशा बोलवायला आली.
"माफ करा, मी येतो हं जरा. निलो, कॅप्टन साहेबांकडून माहिती घे हं" असं म्हणत केवल मध्यभागी बसलेल्या आजोबांकडे जायला वळला.
"आणि हा माझा नातू केवल" डॉ लेकशॉं "केवल, हे माझे बालमित्रं एडमिरल बिर्मन्डी, पण मी मात्रं याला अजूनही टर्क्या म्हणूनच हाक मारतो!"
"टर्क्या, माझा हा नातू फार हुशार आहे असं मला नुकतंच कळलं आहे - बेट्याला आमच्याच विभागात विशेष प्राविण्यासहित प्रवेश मिळाला आहे. " डॉ लेकशॉं
"अरे वा - म्हणजे आजोबा आणि नातवाच्या हातात मानव जातीचं भविष्य सुरक्षित बनतं आहे! फारच छान! अशाच आदर्श तरूणांची आज आपल्याला गरज आहे. तुमचं काम हे फार महत्वाचं आहे. तुमच्या मार्गातले सर्व काटे दूर करायला संरक्षण विभाग रात्रंदिवस झटत असते." सात मजली आवाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेत एडमिरल बिर्मन्डी म्हणाले.
"कशाला वटवट सुरू आहे याची - ही पार्टी आहे, भाषण करायची जागा नाही. संधी मिळाली की लागले कंठशोष करायला - मार्गातले काटे दूर करतो म्हणे!चढलेली दिसतेय चांगलीच" निलो (मनात)
"अतिरेकी संघटनेची आम्हाला खडानखडा माहिती आहे. योग्यवेळ आली की आम्ही त्यांचा केवळ काही दिवसात नायनाट करू. त्यावेळी मात्रं कोणाचीही गय केली जाणार नाही - मग ती व्यक्ति कितीही मोठ्या पदावर असो. मानवी प्रगतीच्या आड येणार्‍या सर्वांना नामशेष व्हावेच लागेल." सगळ्या उपस्थितांना ऐकू जाईल अशा आवाजात बिर्मन्डी गरजले.
"टर्क्या, अरे पुरे तुझे भाषण, तुझ्यावर हा विश्वास आहे म्हणून तर माझ्या नातवाने माझ्याच विषयात संशोधन करायचे ठरवले आहे. हो की नाही केवल? " खो खो हसत डॉ लेकशॉ म्हणाले.
"अर्थातच!" खिशातली मेमरी स्टिक चाचपडत केवलने एक कटाक्षं डॉ लेकशॉंकडे टाकला आणि दुसरा निलोकडे.


समाप्तं....

Wednesday, June 06, 2007

अंतिम युद्धं - भाग ७

व्याख्या:
कम्युन: सामान्य लोकांची रहाण्याची जागा. इथे प्रत्येक जोडप्याला 5x10चे एक कुपे भाड्यानी दिले जाते. अविवाहित व्यक्ती व ५ वर्षाच्या वरील मुलांना डॉर्मिटरीमधे बर्थ भाड्यानी दिले जातात. त्याशिवाय सार्वजनिक स्वयंपाकघर, करमणूक घर,वाचनालय,बाथरूम्स इ वापरायला मिळतात. कम्युनच्या आवारातच सरकारी शाळाही भरतात.

रविवार सकाळ:
निलोची लाल रंगाची गाडी तिवसा कम्युनच्या आवारात शिरली तशा अनेक नजरा तिच्याकडे वळल्या.
"कोणी तरी बडी असामी दिसतेय" बर्‍याच चेहेर्‍यांवर कुतुहल स्पष्टं दिसत होत. गाडी गेट्रियममधे शिरताच कम्युनमधल्या राफाईश आणि किरेंब्लिक या दोन भाडेकरूंच्या नेटवर्क मेसेजिंग सिस्टिममधे "नोटेबल इव्हेंट" रजिस्टर झाले.
"अरे बापरे. मेलो. ही बला आता मला पार खतम करणार की काय? आता काय हवंय हिला माझ्याकडून? माझ्या प्रेमाचा पार धुव्वा उडवलाय, पण माझा पिच्छा मात्रं सोडायला तयार नाही...." राफाईशच्या मनात विचारांचे काहूर माजले.
किरेंब्लिकनी मात्रं लगेच आपल्या पोर्टेबल ग्लोबल सर्चवर भराभर कळा दाबायला सुरूवात केली. हातात आलेली माहिती बघून तो जवळ जवळ उडालाच. आपल्या कुपेमधे जाऊन त्याने लगेच वरिष्ठांशी संपर्क साधला. "सर, वॉच ऑब्जेक्ट ६५३८ तिवसा कम्युनच्या आवारात आहे. काल रात्रंभर ऑब्जेक्ट डॉ.लेकशॉंच्या घरी होते. त्याआधी ऑबजेक्ट आणि डॉ.लेकशांचा नातू हे ४ तास ३७ मिनिटे बरोबर होते. त्यावेळच्या ट्रेसमधे काही दिसत नाहीये."
"बातमी महत्वाची आहे. डॉ. लेकशॉंच्या घरात किडे शिरायला नकोत. पण ऑबजेक्ट ६५३८ आणि डॉ. लेकशांचा नातू एकाच वर्गात शिकल्याचे दिसते आहे, वैयक्तिक ओळखीमुळे लगेच काही कारवाई करता येणार नाही. पण अधिक बारकाईने लक्षं ठेवा."
निलो गाडीतून उतरून सरळ करमणूक विभागात आली. "नॅनो स्पिटिकलवरील पर्यटन स्थळे" हया पुस्तकाची सिम्युलेशन आवृत्ती तिने वाचायला घेतली.
पुस्तकातील पहिले प्रकरण होते "क्झोटिसॉर्सच्या पाठीवरबसून ग्रेट स्पिटिकल लेक्सची सफर". ते शिर्षक वाचूनच तिच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. "दुष्टांनो,आता तरी ही मग्रूरी सोडा. तुमच्यापेक्षा कितीतरी गुणवान आणि बलवान आहेत ते" मनातल्या मनात चरफडत ती म्हणाली. पण वरकरणी मात्रं खळखळून हसत सफरीचा आनंद घेऊ लागली.
किरेंब्लिकनेही कुठलेसे पुस्तक घेतले आणि दुसर्‍या कोपर्‍यात जाऊन बसला.
"मॅडम तुम्ही नविन दिसताय इथे, आधी कधी बघितलं नाही तुम्हाला" मार्दवी आवाजात एक आगंतूक व्यक्ति निलोला म्हणाली.
"नाही, मी इथे माझ्या एका मैत्रिणिला भेटायला आले आहे." निलोने उत्तर दिले.
"खूप छान पुस्तक आहे तुम्ही वाचताय ते - मी बरेचदा वाचले आहे."
"हो का? मी पहिल्यांदाच वाचते आहे. फारच छान आहे" असे ती वरकरणी आणि "दुसर्‍या कोणावर जाऊन लाईन मार" असे मनातल्या मनात म्हणाली.
तेव्हढ्यात चंद्रमेरी निलोला शोधत आली. थोडा वेळ अवांतर गप्पा केल्यानंतर चंद्रमेरीने तिच्या बॅगेतून भरतकामाचे रूमाल बाहेर काढले आणि ती निलोला प्राचिन काळातील स्त्रियांचे नक्षिकाम शिकवू लागली.
"अरेच्या तुम्हाला प्राचिन कलाकुसरीमधे रस आहे वाटतं?" आगंतूक म्हणाला. "मी सद्धा इस २००० मधले मैदानी खेळ शिकतो आहे"
"अरे वा, आमची ही कलाकुसरही साधारण त्याच काळातली आहे" चंद्रमेरी म्हणाली.
"ए चंद्रा मला तो सिंधी टाका म्हणालीस तो दाखव ना गं?" निलो म्हणाली.
"अगं बाई, मग आधी सांगायचंस नं? ते डिझाईन माझ्या कुपेमधे आहे. चल मग तिकडे जाऊ यात." चंद्रमेरी
त्याबरोबर दोघी तिथून उठल्या. त्या बाहेर पडल्या तसा किरेंब्लिकने आगंतुकाला इशारा केला. आगंतुक दोघींच्या नकळत त्यांचा पाठलाग करू लागला.
वाटेत प्रार्थनेची जागा आली. दोघी आत शिरून प्रार्थना केल्याचे नाटक करू लागल्या. तेव्हढ्यात आरती सुरू झाली.
"श्रद्धा .. हा प्रकार मला फारसा कळत नाही. ह्या श्रद्धेमुळेच लोक तर्काशी फारकत घेत असतील का? 'राजाभोवती सूर्य चंद्र तारे फिरतात' ही श्रद्धा असणार्‍यांनी 'पृथ्वी सूर्याभोवती फिरते' हे विधान करणार्‍यांना जीवे मारले. श्रद्धा आणि तर्क एकत्रं राहू शकत का? श्रद्धेने तर्कावर पडदा पडू शकतो हे लक्षात का घेत नाहीत ही मंडळी? एव्हढी कशाची प्रार्थना सुरू आहे या लोकांची? काय हवं आहे यांना? नोकरी? प्रमोशन? ऑक्सिजन? लॉंजिटिव्हिटी ड्रग? क्झोटिसॉर्सच्या पाठीवरची सफर? एखादा तरी या पृथ्वीच्या कल्याणाची प्रार्थना करत असेल का? नुसती प्रार्थना केल्याने मिळणार आहे का ते? जे हातात आहे ते सोडून नाही त्याचा ध्यास कशासाठी?..."
"राफाईशला तुझे येणे पसंत पडलेले नाही" चंद्रमेरीच्या वाक्याने निलोची विचारांची तंद्री तुटली.
"मलाही काही फार हौस नव्हती इथे येण्याची - पण कामच तितकं महत्वाचं आहे." निलोने उत्तर दिले.
चंद्रमेरी कुपेकडे जायला वळली आणि निलो तिच्या मागून चालू लागली.
चंद्रमेरीने कुपेचे दार उघडले आणि दोघी आत शिरल्या. कोपर्‍यात दडून बसलेला राफाईश बाहेर आला. एकाच वेळी राग आणि प्रेम त्याच्या मनात उफाळून आले होते.
"बोल" नजर खाली ठेवत, निलोकडे नं बघताच तो म्हणाला.
"मला निदांना भेटायचं आहे" - निलो
"क्क्काय?" - राफाईश
"होय" - निलो
"वेड-बिड लागलंय की तुला? आणि निदांना भेटायचंय तर माझ्याकडे कशाला आलीस?" राफाईश
"कारण संघटतेन माझ्या ओळखीमधे तू सर्वात वरच्या पदावर आहेस" - निलो.
"बाई गं - इथे मोठ्यापदावर असलो तरी निदांपर्यंत पोचायची माझीही ताकद नाही." राफाईश
"माझ्याकडे असलेल्या माहितीच्या आधारावर तुलाही निदांपर्यंत पोचता येईल" - निलो.
"हे बघ - तुझे हे कसले डावपेच चालले आहेत याची मला काही कल्पना नाही. माझ्यापुरते बोलायचे झाले तर मला निदांना भेटण्याची काहीच गरज नाही." - राफाईश
"पण मला आणि त्यांना एकमेकांना भेटायची नितांत गरज आहे" - निलो
"अच्छा? निदांना तुला भेटायची काय गरज आहे?" राफाईश
"लॉंजिटिव्हिटी ड्रगचा डोस आणि चिरनिद्रा ड्रगचा फॉर्म्युला मिळवून देणार्‍या व्यक्तिला भेटायची निदांना इच्छा असेल नाही का?" - निलो.
"काय सांगत्येस काय? हे सगळं तू बोलतेयेस ते खरं आहे का तुझं डोकं फिरलं आहे तेच मला कळत नाहीये. एकीकडे तू माझ्या प्रेमाचा त्याग केल्याने मला वेड लागायची पाळी आली आहे. पण तुझेच स्क्रू ढिले झालेले दिसतायेत. एक क्षणभर तू म्हणतेयस ते खरं असलं तरी तूच का त्यांना भेटायला हवं? " - राफाईश
"मी फार मोठी जोखीम घेऊन हे काम करणार आहे - आपल्या संघटनेसाठी, ध्येयासाठी आणि निदांसाठी. पण माहितीची गोपनियता पहाता ती मध्यस्थांच्या हातात नं पडू देण्याची अट काही फार मोठी नाही." - निलो.
"हं...आय सी..." राफाईश म्हणाला, "मी बघतो मला काय करता येईल ते. पण प्रत्यक्ष निदांना भेटण्याने तुझी जोखीम आणखिन वाढू शकते." - राफाईश
"त्याची कल्पना आहे मला. तरीही त्यांना भेटायची माझी अट आहे" - निलो
"मी निरोप पाठवतो संघटनेच्या वरिष्ठांकडे, पण खात्री कसलीच देता येणार नाही मला." राफाईश
"थॅंक्स. आणि हो - मला नविन सदस्य प्रतिज्ञा फॉर्म ही हवा आहे" - निलो.
"नविन सदस्य? हं... माझ्या प्रेमभंगाचा आणि ह्या नविन सदस्याचा काही संबंध आहे का?" राफाईश
"राफाईश... ह्या विषयावर मला बोलायचं नाही...." असं म्हणून निलो कुपेच्या बाहेर पडली.
"हे एक अतिशिष्ठं वादळ मला सारखं उध्वस्तं करून जातं..." राफाईश पुटपुटला.

Monday, June 04, 2007

युद्धं संपणार आहे. कृपया प्रतिक्रिया द्या

अंतिम युद्धं येत्या एक-दोन भागात संपणार आहे. कथा आवडणार्‍यांनी प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी नं आवडणार्‍यांनी संयम बाळ्गलेला आहे. फिक्शन लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्नं आहे. त्यामुळे तुमची प्रतिक्रिया महत्वाची आहे. काय आवडले,काय खटकले,काय पटले नाही ते बिनधास्त लिहा.. टाळ्या अथवा टिकांचे सारखेच स्वागत.

टिप: भाग ६ च्या शेवटातील निदांचे निवेदन मनासारखे उतरले नाही. ते कधीतरी पुन्हा लिहून काढणार आहे.

लिहा...