Wednesday, April 11, 2007

एक प्रदेश फुलांचा आणि कवितांचा

ओळखा पाहू हा देश - गुलाबांचा आणि कवितांचा म्हणून याची ख्याती आहे. इथल्या प्राचिन संस्कृतीचा आणि धर्माचा प्रभाव जगातल्या सर्व प्रमुख संस्कृती आणि धर्मांवर पडला आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इथल्या विचारवंतांवर साम्यवादाचा आणि धर्मनिरपेक्षतेचा पगडा होता. इथल्या पुरोगामी नेत्यांनी १९०७ साली लोकशाहीची स्थापना केली आणि १९२५-२८ या दरम्यान धर्मनिरपेक्षं घटना अंगिकारली. न्यायव्यवस्थेला धर्मगुरूंच्या कचाट्यातून मुक्तं केले. स्त्रीयांना जाचक बंधनातून मुक्तं केले. तर असा हा देश कोणता असेल?
लक्षात येतंय का? विचार करा जरा हवं तर...



लक्षात आलं असेल (किंवा नसेलही) तर उत्तर पहाण्यासाठी खाली जा....




उत्तर आहे इराण! होय इराण! तुमच्या इतकंच मी ही दचकले होते. इराण म्हटलं की डोळ्यासमोर प्रतिमा येते ती दाढीवाल्या, उग्र चेहेर्‍याच्या खोमेनीसारख्या नेत्यांची आणि बुरख्यातल्या बायकांची - किंवा फारच झालं तर नोबेल विजेत्या शिरीन इबादींची. पण ह्या स्टिरियोटाइपच्या पलिकडे जाऊन तिथल्या सामान्य माणसांचा परिचय करून दिला तो ओमिद साफि या व्यक्त्यानी. अमेरिका आणि इराणचे युद्ध होण्याची दाट शक्यता असल्याने इथल्या काही शांतीवादी संघटना सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्नं करत आहेत. त्या प्रयत्नाचा भाग म्हणून हे व्याख्यान आयोजित केले होते.
इराणच्या सद्ध्याच्या राजकिय परिस्थितीमुळे देशोधडीला लागलेल्यांची संख्या इथे खूप आहे. अशा परिस्थितीत देश सोडावा लागणार्‍या लोकांकडून तटस्थ मतांची अपेक्षा करणे जरा अतीच होते. शिवाय भारत-इराण, तसेच अमेरिका-इराण सांस्कृतिक संपर्क जवळजवळ अस्तित्वात नाहीत. त्यामुळे भारतिय किंवा अमेरिकन लोकांकडून सत्य परिस्थिती कळणे कठीणच. पण त्या दिवशीचे वक्ते मात्रं या विषयातले तज्ञ होते आणि बर्‍यापैकी तटस्थ दृष्टिकोनातून माहिती देत होते.
"मग अशा या पुरोगामी देशाचा आत्यंतिक प्रतिगामीपणाकडे प्रवास कसा झाला? कोणती परिस्थिती आणि कोणते देश याला कारणीभूत आहेत?" वक्ते ओमिद साफि श्रोत्यांशी संवाद साधू लागले.
वर उल्लेखलेली धर्मनिरपेक्ष घटना बहुतांश कागदोपत्रीच राहिली कारण इराण बनला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा बळी. एकीकडे प्रभावशाली शेजारी रशिया आणि दुसरीकडे ब्रिटीश राजवट यांच्यातील रस्सीखेचीत पार भरडला गेला. रशियन साम्यवादाचा पगडा कमी करण्यासाठी इंग्लंडने त्यावेळी अगदी प्रभावहीन असलेल्या उलेमांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली.
लोकनियुक्त प्रतिनिधी एकीकडे आधुनिकीकरणासाठी झटत असताना ब्रिटीशांच्या मदतीने उलेमांची ताकद वाढत गेली.
या खेळाचा एक महत्वाचा मोहोरा म्हणजे मोहम्मद मोसाद्दिक. शिक्षक,विचारवंत,लेखक असे अनेक पैलू असलेले हे व्यक्तिमत्व. पार्लमेंटचे सदस्य,अर्थमंत्री अशी अनेक पदे सांभाळून १९५१ साली ते पंतप्रधानपदावर निवडून आले. त्यांच्या कारकिर्दीतीत त्यांनी एकीकडे देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा प्रयत्नं केला, तर दुसरीकडे ब्रिटिश साम्राज्याला थोपवण्याचेही प्रयत्नं केले. त्यावेळी ऍंग्लो ब्रिटिश ऑईल कंपनीत ब्रिटीश सरकारची ५१% भागीदारी होती. परंतू तेलाच्या निर्मितीतून मिळालेला जेमतेम १६% नफा इराणला मिळत होता. शिवाय ब्रिटीश सरकार सतत राजकिय ढवळाढवळ करत असे. मोसाद्दिकांनी तेल व्यवसाय सरकारी नियंत्राणाखाली आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. हा निर्णय अर्थातच ब्रिटीश सरकारला मानवणारा नव्हता. त्यामुळे इराणच्या तेलावर आंतर राष्ट्रीय बंदी घालण्यात आली. ब्रिटीश युद्धनौका इराणच्या आखातात दाखल झाल्या. दुसर्‍या महायुद्धानंतर इस्त्रायलची निर्मीती झाली होती,आणि शीतयुद्धही सुरू झाले होते. या दोन कारणांसाठी अमेरिका या खेळात सामिल झाली.
अखेर १९५३ साली अमेरिका (सी आय ए)आणि इंग्लंड या दोन देशांनी मिळून मोसाद्दिकांना पदच्युत केले. मोसाद्दिक समर्थकांचे अतिशय क्रूरपणे हाल करण्यात आले. अमेरिका आणि इंग्लंडला धार्जिण्या असलेल्या शहांना सत्तेवर बसवण्यात आले. इराणी जनतेला ते पसंत नव्हते. शिवाय शहांच्या राज्यात विरोधकांना हालअपेष्टा,तुरुंगवास व तडीपारीचा सामना करावा लागला. या तडीपार लोकांमधील एक नाव म्हणजे आयातुल्ला खोमेनी. आयातुल्ला काशनी हे खोमेनींच्या क्रांतीची प्रेरणा होते. (ब्रिटीश सरकारने १९४० मधे काशनींना समर्थन दिले होते).
ओमिद साफिंच्या मते खोमेनींची क्रांती ही चुकीच्या मार्गानी गेली आहे आणि फसली आहे, तरी तिची सुरवातीची उद्दीष्टे मात्रं योग्य होती. इराणच्या इस्त्रायल द्वेषाबद्दल साफि म्हणाले की इराणी लोक एकूणच इतर लोकांना सहसा सामावून घेत नाहीत, या बाबतीत सुधारणा होण्याची नक्कीच गरज आहे. पण अशा प्रकारचे पूर्वग्रह जगात सगळीकडे आढळतात.
इराकच्या सद्ध्याच्या परिस्थितीवर ते म्हणाले अमेरिका आलीच मुळी शिया-सुन्नी या शब्दांचा जप करत. समविचारी इराकी लोकांना राजकिय पक्ष स्थापन करायची संधीच मिळाली नाही.
अशी आणि इतर बरीच नवीन माहिती मिळाली. अर्थात साफिंनी एकच बाजू मांडली हे मान्य केले, तरी एकूण अमेरिका आणि इंग्लंड या दोन देशांचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ बघितला तर हे वर्णन अगदी सुसंगत वाटते.

इराणच्या जनजिवनाची ही काही चित्रे मला एका मैत्रिणीने पाठवली आहे.













जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी सामान्य माणसं सगळी एकाच मातीची बनलेली असतात, त्यांची स्वप्नं एक सारखीच असतात. स्टिरियोटाईप तयार केले की आपले आणि त्यांचे असे भेद तयार होतात...
(Photos are from unknown source. I will be happy to credit if the source is known.)

8 comments:

Kaustubh said...

सुरेख! अशाप्रकारचे लेख लिहायला हवेत हो. तुम्ही पुढाकार घेताय याचं कौतुक वाटलं.

छान वाटलं लेख वाचून.

Anonymous said...

अप्रतीम लेख!

इराणबाबत पूर्वी उत्सुकतेपोटी विकिपीडिया वर खूप शोधले होते आणि बरीच नवी माहितीसुद्धा मिळाली होती. पण मराठीमध्ये येवढी सुरेख माहिती पहिल्यांदा वाचली.

तुमच्याकडून अशा अजून काही लेखांची वाट बघतो आहे.

कोहम said...

sangeeta...shakya zala tar kahi irani chitrapat paha....atishay ashayapurna astat....ani limited equipments cha vapar....

A woman from India said...

कौस्तुभ,कृष्णाकाठ आणि कोहम,
अभिप्रायांबद्द्ल धन्यवाद.
कोहम, मी पाहिलेल्या इराणी सिनेमांपैकी रेड बलून हे एक नाव लक्षात राहिले आहे. इतर कोणते इराणी सिनेमे बघण्यालायक आहेत?

HAREKRISHNAJI said...

विश्वासच बसत नाही हा खरच इराण आहे काय ? आधी मला वाटले हा युरोप मधिल एखादा देश आहे की काय ?

जागतीक राजकारणाने एका सुंदर देशाची किती वाट लावली. काय मिळते त्यांना ह्यातुन ?

Yogesh said...

इराणचे "रेहाने" आणि "पोएट ऑफ द वेस्ट" हे सुंदर चित्रपट बघितलेत... नक्की बघा.

Chinmay 'भारद्वाज' said...

कुठल्या विद्यर्थ्याचा पहिला क्रमांक कधी काळी येतं असेल आणि आता तो गुंड प्रवृत्तीचा व मुलींची छेड्खानी करणार इसम बनला असेल तर त्याच्या भूतकाळातील पुण्यकर्मांचा किती विचार करायचा?

मान्य आहे कि इराण रशिया व इंग्लंडच्या खेळातील प्याद ठरल पण त्या काळात प्रत्येक देशच कुठल्या ना कुठल्या युरोपियन देशाच्या खेळातील प्याद होता. पण सगळेच काही इराण सारखे धर्मांधळे झाले नाहीत. आजच्या घटकेस हेच सत्य आहे कि जर का इराणकडे अणु-स्फोट करण्याची क्षमता आली तर ते कोणावरही हल्ला करायला मागेपुढे बघणार नाहीत. अगदी भारतावरही.

आज इराण जगाला धोका आहे. आणि हेच सत्य आहे.

A woman from India said...

चिन्मय,
उपमा छान आहे.
माझ्यामते जगाला तीन मोठे धोके आहेत - पर्यावरणाचा र्‍हास,अमेरिका,चीन.
बाकी सर्व धोके क्षुल्लकच आहेत.