फुलफ्रेम भाग ३ - आमच्या एरियलचा A Promise to the Dead - The Exile Journey of Ariel Dorfman (Work in Progress)
एरियल डॉर्फमन हे नाव डरहॅमच्या सामाजिक वर्तुळात नविन नाहीत. साधारण पासष्टी-सत्तरीतलं वय. आपल्या हसतमुख व्यक्तिमत्वाने सगळ्यांना आपलंसं करून सोडणारे. लहान-मोठ्या सगळ्यांशी तितक्याच आपुलकीने वागणारे. इथल्या ड्युक विद्यापिठात ते प्राध्यापक आहेत. एक प्रथितयश लेखक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या लिखाणावरून Death and the Meaden सारखे सिनेमे तयार झाले आहेत. तरी दरवर्षी फुलफ्रेममधे ते इतर प्रेक्षकांसारखे रांगेत बिंगेत उभे रहातात. या त्यांच्या साधेपणामुळे मला नेहेमीच त्यांच्याबद्दल जरा जास्तच आदर वाटतो. त्यांच्या मुलगा रॉड्रीग्जही सुफी कार्यक्रमात आम्हाला नेहेमी भेटतो.
त्यांच्या कुटुंबाला चिले या देशातल्या राजकिय घडामोडींमुळे देशोधडीचा सामना करावा लागला हे ही माहित होते. पण जेव्हा एरियल यांच्या जीवनावरच सिनेमा तयार होतो आहे हे कळले तेव्हा जरा आश्चर्य वाटले आणि जरा जास्तीच होतं आहे असंही कुठेतरी वाटलं - तरी उत्सुकतेपोटी गेले. थिएटरकडे जाणारा जिना उतरताना बघितले तर एरियल माझ्या बाजूलाच होते. नेहेमीप्रमाणे मनमोकळे हसले माझ्याकडे बघून.
सिनेमाबद्दल सांगण्याआधी चिलेचा थोडा इतिहास सांगायला पाहिजे.(या विषयावरचा Battle of Chile हा सिनेमा जरूर बघावा.) साल्वाडोर आलंदे हे १९७० मधे अध्यक्ष म्हणून निवडून आले, लोकशाही पदधतीने. परंतू त्यांच्या मार्कसिस्ट विचारसरणीने त्यांनी अमेरिकेचा रोष ओढवून घेतला. शितयुद्ध सुरू होतेच. त्यात आलंदेंनी क्युबा आणि उ. कोरिया इ देशाशी संबध प्रस्थापित करायला सुरूवात केली आणि प्रमुख उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरणही करायला सुरूवात केली. म्हणजे अमेरिकन कंपन्यांना आव्हानच दिले. मागे एका लेखात मी सी.आय.ए. ने इराणच्या लोकशाहीचा सत्यानाशकरून लष्करशहांना गादीवर बसवल्याचे सांगितलेच आहे. सी.आय.ए. चा ते पहिले यशस्वी सत्तांतर होते. १९७० उजाडेपर्यंत सी.आय.ए. नी ही कला अगदी हातचा मळ असल्यासारखी आत्मसात केली होती. अमेरिकेच्या मित्रं अथवा शत्रू राष्ट्रांमधे आजतागायत लोकशाहीचा दुष्काळ आहे हा योगायोग नाही. आता डिक्लासिफाईड झालेल्या कागदपत्रांवरून निक्सन यांच्या आदेशावरून हेन्री किसिंजर यांनी या कामात पुढाकार घेतला. तीन वर्ष सतत प्रयत्नं करून अखेर ११ सप्टेंबर १९७३(ह्याला दैवदुर्विलास म्हणायचे की इतिहासाने मारलेली चपराक समजायचे?) रोजी आलंदेंचे सरकार बरखास्तं करून लष्करशहा पिनोचे गादीवर बसले. आलंदेंना देश सोडून जाण्याची संधी देण्यात आली, ती नाकारून त्यांनी मरणाचा मार्ग पत्करला. आलंदे आणि त्यांच्या समर्थेकांना अतिशय हाल करून ठार करण्यात आले. बर्याच जणांच्या पार्थिवाचाही पत्ता लागला नाही.
एरियल डॉर्फमन आर्जेटिनामधे जन्माला आले. तिथल्या राजकिय परिस्थितीमुळे त्यांच्या वडिलांनी चिलेमधे आसरा घेतला. त्यांच्या विचारसरणीमुळे पुन्हा एकदा चिले सोडायची पाळी आली. एरियल लहान असतानाच अमेरिकेत आश्रय मिळाला. न्यूयॉर्कमधे एरियल लहानाचे मोठे होत असताना पुन्हा एकदा त्यांच्या वडिलांना कम्युनिस्ट असल्याच्या संशयावरून अमेरिका सोडावी लागली. मग पुन्हा कधी चिले कधी आर्जेंटिना. तरूण एरियल आलंदेंच्या विचार शैलीकडे आकर्षित झाले. विचारांचा सामना विचाराने करायचा ही आलंदेंची भूमिका त्यांना मनापासून पटल्याने ते आलंदेंच्या आंदोलनात सहभागी झाले.
आता मूळ विषयाकडे वळू या. सिनेमा सुरू होतो तेव्हा एरियल राजधानी सॅंतियॅगोमधी काही जुन्या मित्रांशी त्या काळाबद्दल बोलताना दाखवले आहेत. मग त्या आठवणी सांगता सांगता मधेच त्या काळतले फुटेज दाखवले जाते. आलंदेंची लोकप्रियता किती होती ते त्या फुटेजवरून कळते. आपण या रस्त्यावरून मोर्चा काढला, आलंदे त्या खिडकीत उभे होते अशा आठवणींच्या वेळी त्या काळातल्या फुटेजचा बेमालूम उपयोग केला आहे. मग आलंदे सत्तेवर आल्यावर आमचे एरियल सांस्कृतिक मंत्री बनले. ते मंत्रीपद मिळाल्यावरोबर पुस्तके विकत घेऊन शाळांच्या वाचनालयात प्रचंड भर टाकण्याचे काम एरियलनी सुरू केले. शिवाय स्वतःच्या लिखाणाने इतरांवर प्रभाव टाकणे सुरू होतेच. सत्तेवर आल्यानंतर आधीच्या सरकारवर कुठल्याही प्रकारचा सूड घ्यायचा नसल्याने विकास कामांना लगेच गती मिळाली. अमेरिकन साम्राज्यवादाला दूर ठेवण्यासाठी (बनाना रिपब्लिक होऊ नये म्हणून) खाजगीकरण सुरू केले आणि इथेच संघर्षाची ठिणगी पडली. कामगारांचा संप, आलंदेंच्या विश्वासातील माणसे मारली जाणे असे प्रकार घडू लागले.
ऑगस्ट १९७३ मधे एक अयशस्वी प्रयत्नं करण्यात आला. त्यावेळी आपले सरकार फार दिवस टिकणार नाही हे आलंदेंना कळून चुकले होते. अमेरिकन युद्ध नौका येऊन दाखल झाल्याच होत्या. १० सप्टेंबरला लष्कराने निरोप पाठवला. उद्या आम्ही सत्ता ताब्यात घॆणार. ते करण्यात आम्ही यशस्वी झालो तर तुमच्या सगळया मंत्री मंडळाला बोलावणे पाठवू. पुढची बोलणी करायला सगळ्यांनी येणे आवश्यक आहे.
त्याप्रमाणे ११ सप्टेंबरच्या सकाळी मंत्रीमंडळातल्या सगळ्यांना निरोप गेले - फक्त एक व्यक्ती सोडून - ती म्हणजे आमचे एरियल. ज्यांना निरोप गेले त्यातली एकही व्यक्ति जिवंत बाहेर आली नाही. त्यानंतर बरेच वर्षांनी एरियल निरोप पाठवणार्या व्यक्तिला भेटले आणि "मला का बोलावलं नाही?" असं विचारलं. त्यानी सांगितलं - "सम बडी हॅड टू टेल द स्टोरी". म्हणजे केवळ त्या एका व्यक्तिच्या भलेपणामुळे त्यांचा जीव वाचला होता. त्यानंतर चिलेमधे आलंदे समर्थकांची धरपकड सुरू झाली. बायका मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवून एरियल आर्जेटिनाच्या दूतावासात गेले. आर्जेंटिनामधे जन्म झाला असल्याने तिथे त्यांना आश्रय मिळाला. पुन्हा एकदा जीव वाचला. दोन दिवसानी आर्जेंटिनात जायचे कागदपत्रं तयार झाले आणि मग बायका मुलांना न्यायला निघाले. जाताना रस्त्यात एका ठिकाणी आलंदे समर्थक आणि लष्करात खडाजंगी सुरू होती. आता पर्यंत नशिबाने वाचवले होते. पण आता मात्रं "मी चक्कं घाबरलो म्हणून तिकडे गेलो नाही आणि पुन्हा एकदा वाचलो" अशी कबूली एरियल देतात. पण त्यानंतर मात्रं या कार्यासाठी आपला देह ठेवला त्यांच्यासाठी हा लढा सुरूच ठेवायचा निर्धार केला.
१९८९ मधे चिलेमधे पुन्हा एकदा लोकशाहीची स्थापना झाली. त्यानंतर त्यांचे पुन्हा चिलेमधे जाणे येणे सुरू झाले. मानवी हक्क संघटनांचे त्यांचे काम आजही सुरू आहे.
अशा अनेक आठवणी सांगत एरियल त्यांचा जिवनपट आपल्यासमोर मांडतात. डरहॅमच्या रेल्वे स्टेशनवर एरियल येतात तिथे सिनेमा संपतो.
सिनेमा संपल्यावर एरियल आणि सिनेमाचे डायरेक्टर पिटर रेमॉंट यांनी प्रश्नांना उत्तरे दिली. स्टेजवर बसलेल्या साधारण दिसणार्या त्या व्यक्तीकडे मी भारावल्यासारखी बघत बसले.
No comments:
Post a Comment