बाळाचे आगमन - भाग ७ - जन्मानंतर लागणारे तज्ञ, क्लासेस अाणि वस्तु
तज्ञ:लॅक्टेशन कंसलटंट अाणि ल लेचे लिग:
बाळाला पहिले काही महिने तरी अाईचे दूध पाजायचे असेल तर प्रशिक्षित लॅक्टेशन कंसलटंट अाणि ल लेचे लिग (La Leche League)च्या स्वयंसेविकांची मदत फारच उपयुक्त ठरते. साधारण ६-७ महिन्यात मी अामच्या भागातील ल लेचे लीगच्या मिटींगला जायला लागले. तिथे इतर बायकांचे अनुभव ऐकायला मिळाले. मुख्य म्हणजे घराबाहेर असताना दूध कसे पाजायचे, कामावर परत गेले की करायचे या संबंधी चांगले सल्ले मिळाले.
ल लेचे लिगच्या सदस्यांना वाचनालयातून पुस्तकेही घेता येतात.
पोस्ट पोर्टम डुला:
बाळ जन्माला अाल्यानंतर लागणारी मदत हवी असेल तर पोस्ट पोर्टम डुलांची मदत घेता येते. नातेवाईकांची कुमक मी कामाला जायला लागल्यावर कामी येणार होती. त्यामुळे जन्मानंतर लगेच पोपो डुला लावायचे ठरवले.
पोपो डुला बाळाचं सगळं करण्याबरोबर कपडे धुणे, स्वयंपाक करणे अशी कामंही करतात.
अाठवा महिना लागल्यावर पोपो डुलांचा शोध सुरू केला.
क्लासेस:
इथे बाळंतिण व तिचा साथीदार यांना अपत्य जन्म व पालकत्वासाठी तयार होण्यासाठी विविध विषयांचे क्लासेस असतात. ते सहसा दवाखान्यातर्फेच राबवले जातात. अाम्ही दोघेही लमाझ बर्थिंग क्लास, बाल संगोपन, स्तनपान अश्या क्लासेसला गेलो.
वस्तु:
बाळाचे कपडे, दुपटी, अंघोळीचा टब, खेळणी, पाळणा, क्रिब स्ट्रोलर, कार सीट इ वस्तु सहसा बेबी शॉवरमधेच मिळतात. इतर बहुतेक सर्व वस्तु मी क्रेगजलिस्ट वरून विकत घेतल्या. इतक्या लहान बाळांसाठी भरमसाठ किंमत मोजून नविन वस्तु घेण्यात काही अर्थ अाहे असं मला तरी वाटत नाही.
इथे एक प्रश्नं म्हणजे बाळाला तुमच्या खोलीत झोपवायचं की नाही. हा ज्याचा त्याचा प्रश्नं अाहे.
अाम्ही बाळाला अामच्या खोलीत झोपवणार होतोच. त्यासाठी तीन बाजू असलेला पलंगाला चिकटून ठेवता येतो असा Arms reach कोस्लिपर घ्यायचे ठरवले. तो सुद्धा मला क्रेग्जलिस्टवरच मिळाला.
डिस्पोजेबल डायपर का पुन्हा वापरता येण्याजोगे?
अमेरिकेत रोज ५ लाख डिस्पोजेबल डायपर फेकले जातात. पर्यावरणाची ही हानी टाळायची असेल तर अनेक पर्याय उपलब्ध अाहेत. कापडी डायपर, फ्लशेबल डायपर बाजारात उपलब्ध अाहेत. अाम्ही ५-६ प्रकारचे प्रत्येकी १-२ कापडी डायपर विकत अाणले. एक-दोनदा वापरून कुठले जे बरे वाटतील ते जास्तं अाणायचे असं ठरवलं.
कापडी डायपर घरी धुवायचे की डायपर सर्व्हिस लावायची हे ठरवता येते. वेळ वाचवण्यासाठी अाम्ही सर्व्हिस लावायचे ठरवले. सर्व्हिस लावली की डायपरही तेच देतात असे कळले.
ब्रेस्ट पंप
ब्रेस्ट पंप ही संकल्पना माझ्यासाठी नविन अाणि विचित्रं वाटणारी होती. तरी अखेर मी एक हातपंप विकत घेउन ठेवला.
नंतर कामाला सुरुवात केल्यावर मात्रं मला विजेवर चालणारा पंप घ्यावा लागला.
क्रमशः
No comments:
Post a Comment