Friday, October 23, 2009

बाळाचे आगमन - भाग ८ नविन घडामोडी

हो ना करता करता चॆपेल बाईंकडून बर्थ सेंटरमधे बदली करून घेतली, तेव्हा २८ वा अाठवडा सुरू होता. तिथे मग नियमित तपासण्या सुरू झाल्या होत्या. बर्थ सेंटरमधे तपासणी फारच चांगल्या पद्धतीने व बराच वेळ चालायची.

साधारण ३० व्या अाठवड्यात पोटात हालचाल जरा जास्तच होतेय असं लक्षात अालं. बाळ लवकर येणार अाहे, बांधकाम अाटपव असं नवऱ्याला सांगून पाहिलं पण काsही उपयोग झाला नाही. पहिलं बाळ सहसा उशीरा येतं, म्हणजे अापलंही उशीराच येणार अाहे असं मला समजावून त्याने अाणखी कामांच्या यादीत भर टाकली!!!!

३०व्या अाठवड्यात अाम्हा दोघांचा लमाझ बर्थिंग क्लास सुरू झाला. या क्लासमधे early labor, active labor अाणि pushing या स्टेजेसची माहिती सांगितली जाते. प्रत्येक स्टेजमधे काय करावे, दवाखान्यात जायची वेळ कोणती, active labor मधे साथीदाराने काय करावे, बाळंतिणीने कोणत्या positions घ्याव्यात, मदतनिसाने तिला मदत कशी करावी हे शिकवले जाते, व इतरही बरीच माहिती दिली जाते.

३५व्या अाठवड्याची तपासणी झाली तेव्हा माझं चक्कं ४ सेमी डायलेशन झालं अाहे हे मिडवाईफ लिऍनच्या लक्षात अालं.
अरे बापरे! म्हणजे चक्कं active labor सुरू होण्याची वेळ अाली होती - (बर्थिंग क्लासमधे शिकलो होतो एव्हाना!).
मिडवाईफ लिऍनने ऑन कॉल मिडवाईफला बोलवून घेतलं अाणि माझी अोळख करून दिली. माझ्या पोटाबिटात अजिबात दुखत नव्हतं. त्यामुळे त्यांनी मला घरी पाठवलं.
३७ अाठवडे पूर्ण झाले नाहीत तर बर्थिंग सेंटरमधे जन्म देता येणार नाही. दवाखान्यात जावे लागेल. पण तशी वेळ अाली तर मिडवाईफ बरोबर येईल असे त्या म्हणाल्या.

ही नियमित चाचणी असल्याने मी एकटीच अाले होते, ती ही कारने. नवऱ्याला फोन करून सांगितलं, तो म्हणाला काही हरकत नाही, घाबरू नकोस, तुझी टर्म पूर्ण होणारच, अजून एक महिना बाकी अाहे, तेव्हा घे गाडी नी ये घरी!!! काय हा अाशावाद, की अज्ञान? मी कपाळाला हात मारत गाडी सुरू केली.
घरी अाले, घरात जिकडे पहावे तिकडे बांधकाम सुरू होते. वेळ पडल्यास नविन बाळाला ठेवता येईल अशी एकही खोली नव्हती, तिऱ्हाईत माणसे सगळीकडे काम करत होती.
"कधी संपणार हे?" निराश होऊन मी नवऱ्याला विचारले.
"बाळ येण्याअाधी" त्याचे शांतपणे उत्तर!
संध्याकाळी बर्थिंग क्लास होता. तिथल्या शिक्षिकेला विचारले की या परिस्थितीत काय अपेक्षा करता येईल? ती म्हणाली काही सांगता येत नाही. अाज रात्री किंवा due date च्याही पुढे. नंतर कळले की अाम्हाला धीर देण्यासाठीच तसं म्हणाली होती. पुढच्या अाठवड्यात म्हणजे शेवटच्या क्लासला अामची उपस्थिती नसणार हे ती जाणून होती.
तो गुरूवार होता. शुक्रवार, शनिवार, रविवार गेला अाणि काहीच झाले नाही. शेवटी नवऱ्याची बत्तीशी खरी ठरेल अशी अाशा वाटू लागली.
तरीही मी दवाखान्यात जायची बॅग पॅक करून ठेवली. नवऱ्याला म्हंटलं तू ही कर ना, तो म्हणाला अजून एक महिना अाहे!
सोमवार अाला तसा ३६ वा अाठवडा सुरू झाला. अाणखी एक अाठवडा तरी कळ काढ रे बाळा, असे मी म्हणत राहिले.
मंगळवारी रात्री झोपायला गेले. बेडरूममधे जिकडे बघावे तिकडे बॉक्सेस पडले होते, चालायला सुद्धा जागा नव्हती. त्या अवस्थेत माझे नेस्टिंग इंस्टिंग्ट जागे झाले अाणि मी बेडरूममधले सगळे बॉक्सेस एक एक करत फॅमेलि रूममधे अाणून ठेवले.
अामच्या स्वयंपाक घरात सिलिंगचे काम सुरू झाले होते, त्यामुळे एक तर सासरी किंवा हॉटेलात जेवण असायचे.

बुधवारी संध्याकाळी घराजवळच्या भारतिय रेस्टॉरेंटमधे गेलो होतो. रेस्टॉरेंटची मालकिण लिंडा म्हणाली, "मी तुझी अाठवणच काढत होते कारण काल अाम्ही व्हिगन बर्फी बनवली."
बर्फी फारच चविष्ट झाली होती. जाताना मला तिने अाणखी बर्फी पॅक करून दिली.
गुरूवारी सकाळी अॉफिसचे काम करत होते, ड्रावरमधून एक फाईल काढायला खाली वाकले ते निमित्त झाले अाणि वॉटर ब्रेक झाले. खाली येऊन नवऱ्याला सांगितले.
"Congratulations!" नवरा नव्हे, सामानाअाडून डोके काढत ठेकेदार म्हणाला. मी डोक्यावर हात मारून घेतला.
"तुम्ही उद्याच्या उद्या काम संपवा" अनायसे समोर उभ्या असलेल्या ठेकेदाराला नवऱ्याने सांगितले (??!! :( ))

पुन्हा वर गेले. कामावर सगळ्यांना "जाते" असे सांगितले, त्या अाठवड्यातल्या मिटिंग्ज रद्द केल्या, अाऊट अॉफ अॉफिस मजकूर सज्ज केला.

नवऱ्याने मित्रांना फोनकरून बेबी शॉवर रद्द करायला सांगितले.

मग बर्थिंग सेंटरमधे फोन केला. डायरेक्टर मोरिन डारसी स्वतःच फोनवर होती.
"मोरिन, माय वॉटर ब्रोक."
"अार यू शुअर?"
मग फोनवरच तिने लक्षणे विचारून खात्री करून घेतली.
"हॅव यू ईटन?"
"नो"
"देन ईट अॅंड कम अॉन अोव्हर"
सासूबाईंना फोन करून सांगितले. त्या म्हणाल्या "या मग जेवायला लवकर".
सासूबाई घाबरलेल्या होत्या. त्यांना मीच धीर दिला!!!
अारामात जेवण उरकले, लिंडाची बर्फी खाल्ली.
सासू सासऱ्यंाना नमस्कार करून निरोप घेतला. जाताना सासरे म्हणाले, "मला या अाधी पाच नातवंडं झालीत, पण या बाळाप्रती काही विशेषच जिव्हाळा वाटतो अाहे, त्याला/तिला सुखरूप घरी अाण.
"अगदी जरूर!" मी अात्मविश्वासाने म्हणाले.



क्रमशः


1 comment:

Anonymous said...

Your blog keeps getting better and better! Your older articles are not as good as newer ones you have a lot more creativity and originality now keep it up!