Monday, April 06, 2009

बाळाचे आगमन - भाग ६ - तज्ञांची निवड

गर्भारपण व प्रसूती सोपी जावी म्हणून इथे अनेक तज्ञ तुमच्या मदतीला असतात, फक्त त्याची माहिती असायला हवी. या व पुढील लेखात आम्ही कोणकोणत्या तज्ञांकडे गेलो व त्यांची निवड कशी केली ते सांगणार आहे.


१. डॉक्टर का मिडवाईफ?


मिडवाईफसना प्रसूतीला नैसर्गिकरित्या सहाय्य करण्याचे प्रशिक्षण दिलेले असते. नैसर्गिक प्रक्रियेमधे हस्तक्षेप करण्याचे प्रशिक्षण त्यांना नसते. अमेरिकेत प्रत्येक राज्यात मिडवाईफससाठी वेगळे कायदे आहेत. सहसा त्यांना एखाद्या डॉक्टरशी संबधित असावे लागते. हस्तक्षेप करण्याची गरज पडल्यास त्या डॉक्टरांचे सहाय्य मागतात. बरेचदा हॉस्पिटल्समधेही मिडवाईफ्स असतात. आमच्या इथे UNC हॉस्पिटल्समधे मिड्वाईफ्स होत्या.


डॉक्टरांना अर्थातच प्रक्रियेमधे हस्तक्षेप करण्याचे प्रशिक्षण दिलेले असते. उदाहरणार्थ एपिड्युरल देणे, सिझेरियन करणे, कळा सुरू होण्याचे औषध देणे हे डॉक्टर किंवा त्यांच्या हाताखालील प्रशिक्षित नर्सच करू शकतात.


मिडवाईफ्सबद्दल मला खूप उशीरा कळ्ले. आम्ही UNC व बर्थिंग सेंटरच्या मिडवाईफ्सना जाऊन भेटलो. त्यांनी माझ्या प्रश्नांची जितकी चांगली उत्तरे दिली तितकी माझ्या चॅप्पेल बाईंनी कधीच दिली नव्हती. मुख्य म्हणजे मला एकूण लेबर आणि बाळाचा जन्मं याविषयी मनात खूप भिती होती. लहानपणी आमच्या घरी काही अप्रिय घटना घडल्याचे ऐकल्याने त्याचा मनावर नकंळत परिणाम झालेला होता. ती भिती काढायला मिडवाईफ्सनी खूप मदत केली. "निसर्गाने तुला क्षमता दिली आहे, त्यावर तू विश्वास ठेव. तुला भिती वाटली तर लेबर मधेच थांबेल. तुझ्या मनाने शरीराला त्याचे काम करण्यात सहाय्य करायला हवे" असे त्यांनी अगदी पटवून सांगितले. लेबर सुरू झाल्यावर प्रत्येक स्टेजला मिडवाईफ काय करणार, मी काय करायचे हे ही समजावून सांगितले.

२. दवाखाना, बर्थिंग सेंटर का घरच्या घरी?


बाळाचा जन्म सर्व सुविधांनी सज्ज असलेल्या दवाखान्यात करायचा की मिडवाईफ चालवत असलेल्या बर्थिंग सेंटरमधे करायचा की मिडवाईफला बोलवून घरीच करायचे हे ही ठरवता येते.


दवाखाना:
हॉस्पिटलमधल्या बर्थिंग सुविधा दाखवण्यासाठी इथे नियमितपणे टूर आखलेले असतात. जर्मनीतून परत आल्यावर आम्ही भराभर ते टूर घेऊन सर्व फॅसिलिटीज पाहून घेतल्या. हॉस्पिटलची निवड करताना आपल्या कल्पनांची अंमलबजावणी करता येईल असे हॉस्पिटल बघावे. म्हणजे कळा येत असताना इकडे तिकडे जरा चालू देतात की पलंगावरच झोपून ठेवतात. बर्थिंग बॉल, पाण्याचा टब आहे की नाही. तुम्हाला एपिड्युरल घ्यायचे असेल तर ते तिथे उपलब्ध आहे की नाही, बाळंतिणीबरोबर किती लोकांना खोलीत थांता येते असे प्रश्नं विचारावे. सर्वं हॉस्पिटल्समधून आम्हाला UNC हॉस्पिटल आवडले होते. त्यामुळे तिथल्या मिडवाईफ्सकडे जावे असा माझा विचार बरेच दिवस होता.


बर्थिंग सेंटर
बर्थिंग सेंटरचे तत्वज्ञान: गर्भारपण, बाळंतपण हा रोग नाही, ते स्त्री शरीराचे नैसर्गिक कार्य आहे. त्या कार्यात काही स्रियांना वैद्यकिय सहायाची गरज पडू शकते, पण बहुतेक स्त्रिया कुठल्याही वैद्यकिय मदतीशिवाय बाळाला जन्मं देऊ शकतात आणि देत आल्या आहेत. बर्थिंग सेंटरमधे बाळ झाल्यावर ६ ते ८ तासात बाळ बाळंतिणीला घरी पाठवतात. पुढील तपासण्यांसाठी मिडवाईफ्स घरी येतात.
आमच्या इथे एकच बर्थिंग सेंटर आहे. आधी सांगितल्याप्रमाणे तिथे आधुनिक सुविधा व डॉक्टर नसल्याने मला जरा भिती वाटत होती. तिथला टूर घेतला तेव्हा तर ते फारच आवडले होते, पण तरीही तिथे जायचा धीर होत नव्हता. तिथे गेलेल्या अनेक जणींनी त्यांना खूप चांगला अनुभव असल्याचे सांगितले. माझ्या एका मैत्रिणीची मैत्रिण एशली तिथे नर्स म्हणून काम करते असे कळले. एशली मला भेटून माझ्या सर्व शंका दूर करायला तयार झाली. बर्थ सेंटरला स्वतःचे रेप्युटेशन कसे महत्वाचे आहे आणि त्यामुळे त्या जराही रिस्क नं घेता योग्य असेल तेव्हा बाळंतिणीला UNC मधे घेऊन जातात हे तिने सांगितले. वेळ पडल्यास बर्थिंग सेंटरमधून निघून हॉस्पिटलमधे एडमिट व्हायला दहा मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो हे तिने खात्रीने सांगितले. त्याशिवाय प्रत्यक्ष UNC तल्या मिडवाईफ्सनी बर्थिंग सेंटरची खूपच तारीफ केली.अशी सगळी माहिती काढल्यावर, अनेक चौकशा केल्यावर अखेर बर्थिंग सेंटरमधे जायचे ठरले.


घरच्या घरी?


या खेपेला तरी तसे करायची आमची हिम्मत नव्हती. तरी तो अनुभव घेतलेल्या बर्‍याच बायांना भेटून त्यांचे अनुभव ऐकले.३. डुला (Doula)


बाळंतिणीची घरातली व्यक्ती बहुदा तिचा नवरा व आई किंवा एखादी व्यक्ती सहाय्यक म्हणून असते. या व्यक्तिला लेबर व जन्माच्या वेळी मार्गदर्शन करण्यासाठी डुला मदत करते. डुलांना दुखणे कमी करण्याचे (pain management) प्रशिक्षण दिलेले असते. लेबर रूममधे बाळंतिणीला हवे तसे पोषक वातावरण तयार करणे, तिला मसाज करणे, तिला काय हवे नको ते बघणे, तिच्या वतीने डॉक्टर किंवा मिडवाईफशी बोलणे अशी कार्ये त्या करतात. बाळंतिणीला कळा सुरू झाल्यापासून त्यांचे काम सुरू होते आणि बाळाचा जन्म झाला की ते संपते. डुला बाळंतिणीला बर्थ प्लॅन बनवायला मदत करते.

आम्ही इंटरनेटवरून इथे असलेल्या डुलांची माहिती काढली व इतर मैत्रिणींनीही काही नावे दिली. दोन-तीन डुलांना भेटून आम्हीस स्टेसी गुंटरला आमची डुला म्हणून निवडले.

४. लॅक्टेशन कंसल्टंट
बाळाला जन्म देण्याच्या दिव्यातून पार पडल्याबरोबर बाळंतिणीवर नवीन जबाबदारी येऊन पडते ती म्हणजे त्या चिमुकल्या जिवाची काळजी घेणे, त्याचे आरोग्य राखणे व त्याच्यासाठी जे योग्य ते सर्व करणे. त्यातील सर्वात महत्वाचे काम म्हणजे बाळाला मातेचे दूध सुरू करणे. हल्ली जन्मानंतर दोन-तीन तासाच्या आतच स्तनपान सुरू करण्याचा सल्ला दिला जातो. स्तनपान हे नैसर्गिक असले तरी म्हणावे तितके सोपे नसते. या बाबतीत स्त्रीला वेळोवेळी योग्य तो सल्ला मिळावा म्हणून लॅक्टेशन कंसल्टंटस असतात. हल्ली सर्व हॉस्पिटलमधे लॅक्टेशन कन्स्लटंट तैनात असतात, पण आपण स्वतःची कंसल्टंट नेमू शकतो. ती घरी येऊन मदत करते हा सर्वात मोठा फायदा असतो. आम्ही लॅक्टेशन कंसल्टंट निवडली नव्हती. त्याची मला गरज वाटली नव्हती, पण तो निर्णय कसा चुकीचा होता ते पुढे कळेलच.

क्रमशः2 comments:

HAREKRISHNAJI said...

well written. Most of the part is unknown here. This will help .

HAREKRISHNAJI said...

Hello. How are you and little princess ? Your email address pl