Thursday, September 25, 2008

गावो विश्वस्य मातरः - भाग ४: आयुर्वेद

आयुर्वेदानुसार दूध हे अमृत आहे हे आपण नेहमी ऐकत आलो आहोत. ग्रंथांचे वाचन नं करता किंवा तज्ज्ञांना नं विचारता बहुतेकांनी त्याच्यावर विश्वासही ठेवलेला असतो. आयुर्वेदात खरोखर याविषयी काय लिहीले आहे हे जाणुन घेण्याची इच्छा होती. भारतात गेले असताना केवळ योगायोगाने औरंगाबाद येथील वैद्य श्री अनंत धर्माधिकारी यांचे नाव कळले. संपर्क साधताच त्यांनी मोठ्या मनाने, सर्वतोपरी प्रयत्नं करून माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली.

वैद्य श्री अनंत धर्माधिकारी यांचा अल्पपरिचय:

शिक्षण: आयुर्वेद विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन व पिएचडि

१९७१-१९९८ मुंबई,नागपुर व नांदेड येथे शासकिय विद्यालयात प्राध्यापक.

१९९८-२००० पोतदार मेडिकल कॉलेजचे डिन
२०००-२००४ डायरेक्टर ऑफ आयुर्वेद, महाराष्ट्र शासन.

प्रश्नोत्तरे:

प्रश्नं १: रोज दूध पिणे जरूरी आहे असे बहुतेकांना वाटते.आयुर्वेदाचा या बाबतित काय सल्ला आहे?

उत्तर: दररोज दूध पिण्याची गरज नाही. योग्य रितीने तयार केलेली भारतिय थाळी सर्व आवश्यक जिवनसत्वे(व्हिटॅमिन), रोग प्रतिकारक तत्वे(इम्युनायझर्स) व खनिजे (मिनरलस) यांनी परिपूर्ण असते. थाळीतील प्रथिने (प्रोटिन) व इतर पौष्टिक तत्वांनी आरोग्य लाभते, वृद्धिंगत होते व टिकुन रहाते. परंतु सप्लिमेंटसची आवश्यकता असलेल्यांनी खालील नियमांचे पालन करून दुधाचे सेवन करावे:

नियम क्र १: दुधाचे सेवन करण्यापुर्वी आधी खाल्लेले सर्व अन्न पचलेले असायला हवे. अर्धे पचलेले अन्नं पोटात असताना सेवन केल्यास रोगकारक अवस्था तयार होते. वात कफ व पित्त या विकारांमधे एकाच वेळी वाढ होते.

नियम क्र. २: अजिबात व्यायाम नं करणार्‍याने अजिबात दूध प्यायचे नाही.

नियम क्र ३: चांगली भुक लागल्याशिवाय कधीही प्यायचे नाही.

नियम क्र ४: दूध आणि फळं कधीही एकत्रं खायची नाहीत.

नियम क्र ५: रात्री दूध कधीही प्यायचं नाही.

नियम क्र ६: सकाळी उठल्यावर लगेच दूध प्यायचं नाही.

नियम क्र ७: व्यायामकरून भूक लागल्यावरच प्यायचं.

प्रश्नं २: वाढत्या वयाच्या मुलांनी दिवसातुन एकदा किंवा दोनदा दूध प्यावे असा सर्वसाधारण समज आहे. आयुर्वेद या बाबतित काय सांगते?


उत्तर: वयाच्या ५-६ वर्षापर्यंतच दूध द्यावे.


प्रश्नं ३: गरोदर स्त्रियांनी दूध पिणे गरजेचे असते काय?

उत्तर: सप्लिमेंटसची आवश्यकता भासल्यास गरोदर स्त्रिया दूध पिऊ शकतात, मात्रं उत्तर क्र. १ मधील नियम पाळणे आवश्यक आहे.

प्रश्न ४: स्तनपान देणार्‍या मातेला दूध पिणे गरजेचे असते काय?

उत्तर: वरील क्रं ३ प्रमाणेच

प्रश्न ५: आहारात दुग्धजन्य पदार्थांचा वापर टाळुन सुदृढ जिवन जगणे शक्य आहे का?

उत्तर: आहारातील इतर घटक कोणते यावर अवलंबुन आहे. भारतिय थाळी पद्धतीचे जेवण उपलब्ध असल्यास शक्य आहे.

प्रश्न ६: आयुर्वेदात दुधाचे पर्याय सुचवले आहेत का?

तुप, ताक,मुगडाळ, सुके खजुर,आवळे इ. द्यावे. (अपवाद पाच ते सहा वर्षापर्यंत)

प्रश्न ७: गायींचे पालनपोषण व आहार या विषयी आयुर्वेद काय सांगते?

आयुर्वेदात या विषयी जे नियम आहेत, त्यात उत्पादन वाढीपेक्षा गुणवत्तेवर भर दिलेला आहे. ते नियम खालीलप्रमाणे:

  • दिवसा गाय गोठ्यात बांधलेली नसावी. गायीला दिवसभर चरायला सोडणे आवश्यक आहे. विविध प्रकारचे हिरवे गवत जिथे नैसर्गिकरित्या उगवते तेथे गाईला चरायला द्यावे. अशा ठिकाणी सहाजिकच गवताची निवड गाय स्वतःच करते. विविध प्रकारच्या गवतामुळे दुधात आवश्यक गुण निर्माण होतात.
  • बाहेर ढगाळलेले वातावरण नसावे. दिवसभर फिरून होणारा व्यायाम व दिवसभर मिळणारा सूर्याचा स्वच्छ प्रकाश यामुळे गायीचे आरोग्य सुधारते.
  • संध्याकाळी परत आल्यावर गाईचे दूध काढावे. त्या दुधात तिखट कडु व तुरट हे आवश्यक रस भरपूर प्रमाणात आढळतात. असे दूध चवीला गोड लागते, पचायला हलके असते तसेच आरोग्यवर्धक असते. असे दूध आवश्यकतेनुसार, उत्तर क्र १ मधे सांगितलेल्या नियमांचे पालनकरून रोज प्यायला हरकत नाही.

प्रश्नं ८: वर सांगितलेले नियम नं पाळता दूध काढले असेल,उदा. गोठ्यात बांधलेल्या गाईचे दूध काढले असेल तर त्या दुधाचे तुप किंवा दही खाल्ले तर चालते का?

उत्तर: अगदी कमी प्रमाणात. दररोज ४०-५० मिली ताक पिता येईल.क्रमशः

पुढील भागात वरील माहितीचे संदर्भ.
विशेष आभार: वैद्या सौ. चारूस्मिता शहा, अमरावती.

29 comments:

Mints! said...

This might be very eye opening to most of the people. Specially who think drinking milk is 'essential'.

प्रशांत उदय मनोहर (Prashant Uday Manohar) said...

अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती आहे. अनेक शंका दूर झाल्यात. असं दूध भारतात लहान खेड्यांमध्येच मिळू शकेल. शहरात राहणार्‍यांनी दुधाला शक्य तेवढं दूरच ठेवलेलं बरं असं दिसतंय. दूध-फळे एकत्र करू नये हे पूर्वी वाचलं होतं. त्याप्रमाणे दही-फळं, ताक-फळं देखील अपायकारक असतात असं वाचलं होतं. तुपाचा उपयोग मुख्यत: पचायला जड असलेले पदार्थ हलके व्हावे यासाठी ऐकला होता. शक्य असल्यास दुग्धजन्य पदार्थांविषयी अधिक सविस्तर माहिती द्या.
पुण्यात असताना दैनिक सकाळची "फॅमिली डॉक्टर" नामक पुरवणी यायची त्यात आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. श्री. बालाजी तांबे ह्यांचे अनेक लेख वाचलेत. बाजारात मिळणारं तूप आयुर्वेदाला मान्य नाही असंही त्यातून समजलं. पण रात्री दूध प्यावं (अर्थात नियम क्रं १ नुसार) असं सुचवणारं एक सुभाषित एका अंकात वाचलं. त्यानुसार- रात्रीच्या अंती (सकाळी उठल्यावर) पाणी प्यावे, दुपारच्या जेवणाच्या अंती ताक प्यावे व दिवसाच्या अंती दूध प्यावे. "रात्री दूध पिऊ नये" असं वैद्य धर्माधिकारींनी म्हटलंय याचा अर्थ सूर्यास्तानंतर अजिबात पिऊ नये की झोपायच्या वेळेच्या एक-दोन तास आधी दूध पिऊ नये? कृपया याचा खुलासा करावा.

HAREKRISHNAJI said...

very informative as usual.

Ashwinis-creations said...

दुधाचा 'दु' दीर्घ काढत जा गं!
म्हणजे जेव्हा फक्त दूध असा शब्द असेल तेव्हा!

kasakaay said...

प्रतिक्रिया देणार्‍या सर्वांना धन्यवाद.
प्रशांत,
तूप व ताक थोड्याप्रमाणातच घ्यावे असे म्हंटले आहे.
रात्री दूध पिऊ नये याचा खुलासा पुढील भागात येणार आहे, तरी इथे उत्तर द्यायचा प्रयत्नं करते:
पहिले खाल्लेले पचल्याशिवाय दुसरे काही खाऊ नये. दुधाच्या बाबतीत हा नियम विशेषतः पाळावा.
सर्वात मुख्य नियम म्हणजे दूध व इतर अन्नाची पोटात सरमिसळ होऊ नये. तसे केल्याने अन्नं व दूध दोन्ही खराब होते. त्यातही ही सरमिसळ दिवसा झालेली एकवेळ चालेल, पण रात्री अजिबात होता कामा नये.
चांगली भूक लागलेली असणे याचा अर्थ आधीचे अन्न पचलेले आहे. अशा स्थितीत दूध प्यायला हरकत नाही. पण त्यानंतर पुन्हा चांगली भूक लागल्याशिवाय दुसरे काही खाऊ नये.

अश्विनी,
बर्‍याच वर्षात मराठी किंवा हिंदीशीही संबंध तुटल्याने माझ्या व्याकरणाचे अक्षरशः भजे झाले आहे. दुधाच्या दू मधे दुरूस्ती केली आहे. आणखीन चुका असतील तर सांग.

vinayak pandit said...

कसं काय आपल्या कॉमेंटबद्दल मन:पूर्वक आभार!
माझी या माध्यमात ही सुरवात आहे.नजरचुकीने ताज्या कवितांमधे कॉमेंटसचं सेटींग राहून गेलं ते आता दुरूस्त केलं आहे.
आपल्या ब्लॉग्जचा आवाका खूप मोठा आहे,त्यात वैविध्य आहे,सर्वसमावेशकता आहे आणि आशयपरिपूर्ण असं आपलं एकुणंच लिखाण आहे.मला नेहमीच आपली मदत होईल.
पुन्हा एकदा आभार,
आपला मित्र
विनायक पंडित

Ashwinis-creations said...

Not very convincing.
We are already vegetarian by birth. But Milk (May be in moderate quantities due to new age diseases)forms integral part of our food and diet and thus it in turn relates to habits and satisfaction level too.

kasakaay said...

Ashwini,
Can you please elaborate on what is not very convincing?
Is it like you are not convinced that Ayurveda says it or you are not convinced it is true even if Ayurveda says so?
The word Vegan had to be coined because people in different parts of the world convenietly call themselves vegetarian even if they eat chicken,fish,eggs,dairy etc.
(Talk about stretching too far)
You may eat some things because you like it, that is a whole different story. But I would not agree you are a "vegetarian" if you eat food that comes from animals. At best you are a lacto-ovo-vegetarian.

Ashwinis-creations said...

संगीता
वैद्यांची उत्तरे विसंगत वाटतात. दुधाचे पर्याय काय तर म्हणे तूप व ताक!
आणि इथे असेही सांगणारे वैद्य आहेत की दूध हे पूर्णांन्न आहे. दूध अतिशय आवश्यक आहे. सर्व लहान थोरांनी रोज दूध प्यायलाच हवे. यात खूप मते मतांतरे आहेत. पन बरेच लोक दूध 'आवश्यक' याच मताचे असतील.

कन्व्हिंसींग नाही म्हणजे 'वेगनिजम' कन्व्हिंसींग नाही!
इथे तर दूध न पिण्याची संकल्पनाही मान्य होऊ न शकणारे अनेक लोक आहेत. चवीचा निकष एक वेळ बाजूला ठेवला तरी थंड ताक, दही, वाफाळता चहा, पेशंटस व बालकांना दूध...हे वगळणे डिफिकल्ट आहे.
मुख्यतः असे का करावे त्याची कारणेच मला संयुक्तिक वाटत नाहीत.

अश्विनी

HAREKRISHNAJI said...

अश्विनीजी,

संपुर्ण प्राणीमात्रात फक्त मानव हाच एक असा प्राणी आहे की जो दुसऱ्या प्राण्याचे दुध पितो.

kasakaay said...
This comment has been removed by the author.
kasakaay said...

अश्विनी,
उत्तर क्रं १:
वैद्यांनी दुधातून मिळणारी पौष्टिक तत्वे इतर कुठल्या पर्यायी पदार्थातून मिळू शकतात ते सांगितले आहे. त्यात काय विसंगत आहे हे मला अजुनही कळले नाही. पण तुझा गोंधळ कुठे होत असावा त्याचा अंदाज मला आला आहे. खालील स्पष्टिकरणानी तुझं समाधान होतं का पहा:
ही मते वैद्य धर्माधिकारी यांची वैयक्तिक मते नाहीत, तर ग्रंथांमधुन काय लिहीलेल आहे तेच त्यांनी मला सांगितले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना काय वाटतं ते महत्वाचं नाही, शास्त्रं काय सांगतं ते महत्वाचं आहे.
लेखाच्या शेवटी म्हंटल्याप्रमाणे ही माहिती जिथून मिळाली त्या ग्रंथांचे संदर्भ पुढील लेखात येतीलच.
आता एक गोष्टं आणखी स्पष्ट करते. व्हिगनिजिझम या विषयावर वैद्यांची काय मते आहेत, याची मला काहीच कल्पना नाही. त्यांचा ग्रंथांचा अभ्यास दांडगा आहे हे कळल्यामुळे माझ्या जिज्ञासेमुळे मी त्यांना प्रश्न विचारले. प्रश्नांची उत्तरे गावो विश्वस्य मातरः या मालिकेत मी मांडलेल्या मतांशी इतकी सुसंगत निघतील अशी मला मुळीच अपेक्षा नव्हती.त्यांनी दिलेली ही उत्तरे वाचुन मला सुखद आश्चर्याचा धक्काच बसला.
आयुर्वेद हे त्या काळातील अतिशय प्रगत शास्त्र होते. ते शास्त्रं विगनिझमचा पुरस्कार करत नाही, त्याचप्रमाणे लॅक्टो-ओव्हो-व्हेजिटेरियनिझमचाही करत नाही. त्याचप्रमाणे मांसाहारालाही निषिद्ध मानत नाही.
या लेखात आलेल्या बारीक सारीक तपशीलातून त्यावेळच्या अभ्यासकांनी पदार्थांचा आरोग्यावर होणार्‍या परिणामांचा किती खोलात जाऊन अभ्यास केला होता ते लक्षात येते. दूध व इतर अन्नं हे पोटात एकत्रं होता कामा नये,हे फार महत्वाचे असावे, कारण एकापेक्षा जास्तं ग्रंथात तसा संदर्भ येतो.
ज्याप्रमाणे दूध कसे काढावे व कुठल्या परिस्थितीत ते पूर्णान्न ठरते हे लिहीले आहे तशाच प्रकारचा मजकूर मत्स्याहार व मांसाहाराच्या बाबतीतही आयुर्वेदात आढळतो ह्याची नोंद घ्यावी.
अर्थात माझे याविषयातले तोकडे ज्ञान पहाता याबाबतीत दुसरे मत घेण्याला माझी काहीच हरकत नाही.
आजच्या काळातील दूध काढण्याची पद्धत व आपली जीवन-शैली गृहीत धरूनही "दूध हे पूर्णान्न आहेच" असे सांगणारे वैद्य तुला माहीत असतील तर कृपया हेच प्रश्न त्यांना विचार व संदर्भासहित उत्तरे माग.

kasakaay said...

अश्विनी,
उत्तर क्रं २:
कन्व्हिंसिंग आणि संयुक्तिक कारणे इत्यादी:
बहुतेक लोकांनी गैरसमज करून घेतले आहेत म्हणुन आपणही करून घ्यावेत का?
एकीकडे आपण जन्मतःच व्हिजिटेरियन आहोत असे समजायचे व दुसरीकडे प्राणीजन्यपदार्थ खायचे समर्थन करायचे यात तुला काहीच विसंगत वाटत नाही का? मुळात जिथे व्याख्याच चुकीची आहे, त्या व्याख्येवर आधारित समज बरोबर असु शकतात का?
"थंड ताक, दही, वाफाळता चहा, पेशंटस व बालकांना दूध...हे वगळणे डिफिकल्ट आहे.
मुख्यतः असे का करावे त्याची कारणेच मला संयुक्तिक वाटत नाहीत."
हं... आता बया?
डिफिकल्ट हाये आन विसंगत आहे यात लssय फरक हाये. पर हे डिफिकल्ट बी न्हाय आन विसंगत बी नाय.
पेशंटस व बालकांना दूध यासंबंधात:
सप्लिमेंटसची आवश्यकता आहे का ते आधी ठरवावे. दिसला पेशंट की पाजले दूध हे चुकीचे आहे हे तू सुद्धा मान्य करशील. प्रोटीनची कमतरता असल्यास डाळी,हिरव्या भाज्या व सुकामेवा हे पचनशक्तीप्रमाणे खाऊ घालावे. vitamin A/D, calcium इ. ची कमी असल्यास ती कुठल्या प्रकारच्या आहारानी पूर्ण करता येईल त्याचा विचार करावा. दूध देण्यामागचे फायदे तोटे नीट लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. दुधातून मिळणारे animal protein, cholesterol, lactose हे काही आरोग्यासाठी चांगले नाही. दूधात हव्या असलेल्या गोष्टींपेक्षा नको असलेल्या गोष्टीच जास्त असतात हे लक्षात ठेवावे.
मुलांची वाढ जर नीट होत असेल तर उगाच दूध पाजुन मोठेपणी लठ्ठपणा येईल,आर्टेरीज ब्लॉक होतील अशा सवयी त्यांना लावुच नयेत.
वन्यज जीवनपद्धतीनुसार सुदृढ जीवन जगता येते हे अमेरिकन डायटेटिक असोसियेशनही सांगते.

बरं, आता दूध नको पण उत्तरे आवर असं तू म्हणायच्या आत मी थांबवते. तू प्रतिक्रिया मात्रं देत रहा. चर्चेत सगळ्यांचाच फायदा आहे.

vinayak pandit said...

प्रिय कसं काय
मन:पूर्वक आभार!

कुठल्याही ठिकाणी समानधर्मी मिळणं हा सर्वोच्चं आनंदाचा क्षण असतो,ठेवा असतो.
तुमचं म्हणणं अगदी पटलं.प्रिंट माध्यमातल्या लोकांनी हे माध्यम लवकरात लवकर आपलंसं करावं.आतापासून पुढील काळात हे आणि त्याबरोबर येणारं अधिकही काही क्रांतिकारक असं ठरणारं आहे.
आपण आवर्जून अभिप्राय पाठवता त्यामुळे खूप हुरूप येतो,तो पुढच्या कामासाठी प्रचंड बळ देतो.
आभार,
आपला मित्र

विनायक पंडित

HAREKRISHNAJI said...

अश्विनी,

दूध हे पूर्णांन्न आहे हे खरे नव्हे. दूध, दही, लोणी, तूप यातील फॅट हे सच्य्रुरेटेड म्हणून घातक आहे. ते कोलेस्टिरॉल वाढवते.
ऍसीटीडी वाढली असता ती कमी करण्यासाठी दूध पिण्यासाठी सांगत असत, पण आता लॉग रन मधे
दूध हेच ऍसीटीडी वाड्वण्यास कारणीभुत असते असे वाचनात आले आहे.

HAREKRISHNAJI said...

थोडेसे सध्याच्या आयुर्वेद बद्द्ल , या पद्धतीच्या वजन कमी करण्यासाठी घेतलेल्या उपचाराने माझ्या बायकोच्या मैत्रीणीच्या दोन्ही किडन्या वयाच्या तिशीत काम करेनाश्या झाल्या. तिची Kidney Transplant ची शस्त्रक्रीया झाली , वैद्य मुंबईतले आंतरराष्टीय दर्ज्याचे.

मी देखील एका आयुर्वेदतज्ज्ञ कडुन दोन महीने औषध घेतले. कार्यालयातील डॉ. कडे सहज याचा उल्लेख केला. माझ्यावर ते भडकले व त्यांनी ती औषधे बंद करायला लावली.

kasakaay said...

हरेकृष्णाजी,
सद्ध्याच्या वैद्यांबद्दल तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे.
खरं म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टरकीची डिग्री मिळवुन प्रॅक्टिस करणार्‍यांचाही ग्रंथांचा अभ्यास असेलच असे नाही हे लक्षात आले.
पण अर्थात वैद्यांनाच काय दोष लावायचा, आधुनिक वैद्यक शास्त्राने मान्य केलेली heart disease reversal ची एकमेक पद्दत आहे व्हिगन डाएट. डॉ. डिन ऑर्निश यांच्या संशोधनातुन हे निर्विवादपणे सिद्ध होते व वैद्यकशास्त्रानी ते मान्य केले आहे.
असे असुनही "दूध हे आरोग्यासाठी चांगले" असे ऐकत वाढलेल्या रुग्णांना "दूध पिऊ नका" हे सांगणे आधुनिक डॉक्टरांनाही जड जाते.
बहुतेक लोक (वैद्य व डॉक्टरही यात आले) शास्त्रीय माहितीपेक्षा अशास्त्रीय सांगोवांगी माहितीवर जास्त विश्वास ठेवतात.

HAREKRISHNAJI said...

काय योगायोग आहे बघा, मी सद्ध्या डॉ.अभय बंग यांचे "माझा साक्षात्कारी हॄदयरोग" हे पुस्तक वाचायला घेतलय.

त्यात ते म्हणतात जणू नियतीशी माझा करार झाला असावा तसं मी हॉस्पीटलमधे असतानाच एक पुस्तक माझ्या पर्यंत येवुन पोहचलं. डिन ऑर्निश या अमेरीकन डॉक्टरनी लिहीलेलं, ’रिव्हर्सिंग हार्ट डिझीझ" नावाचं पुस्तक.
ते पुढे म्हणतात या पुस्तकाने मला आशा दिली, नव्हे खात्री दिली , की मी हॄदयविकारातून बाहेर पडू शकेन, या पुस्तकाने माझ्या पुढील उपचारात क्रांती केली.

१३ मे ला डिन ऑर्निशचं पुस्तक वाचून संपवले, तिथल्या तिथे पुढील एका वर्षासाठी काही उद्दिष्टे लिहून काढली.

१. वजन ७२ वरून ६५ किलोवर आणणे.
२.आहारात दूध व तूप सोडणे व इतर बदल करणे.

इ.

व त्या क्षणापासून माझा सर्वात प्रिय आहार दूध सोडलं. मी रोज लिटरभर दूध पिणारा. बरेचदां तर दुधाचा गंजच तोडांला लावून रिकामा करणारा.

kasakaay said...

हरेकृष्णाजी,
चांगलाच योगायोग आहे.
कृपया या पुस्तकाबद्दल माहिती आपल्या ब्लॉगवर देत रहा.
ते पुस्तक मी आता "वाचलंच पाहिजे" यादीत टाकलं आहे.

Ashwinis-creations said...

संगीता

डॉ. बंग यांचे हे पुस्तक खूप चांगले आहे. मी तर काही दिवस अगदी भारुन गेले होते. नक्की वाच.

डीन ऑर्निश चे पुस्तक ही मी वाचलेले आहे. ते सुद्धा बरेचसे इंडियन लाईफ स्टाईल व आहार यांचाच पुरस्कार करते.

पण पुण्यातले वैद्य (पक्षी :फॅमिली डॉक्टर व इतर) तर म्हणतात की शास्त्रोक्त रितीने बनविलेले रोज १ चमचा तूप तरी आवश्यक आहे.
दूध तर सर्वच डॉक्टर्स घ्यायला सांगतात गं!

दूध इतर अन्नाबरोबर घेउ नये वगैरे ठीक आहे, पण लोकांमध्ये समजूती इतक्या दृढ आहेत की त्यांना बदलविणं केवळ अशक्य आहे. सकाळी शाळेत जातांना दूध पीत नाही म्हणून आपल्या मुलीला मारहाण करणारे वडील मी पाहीले आहेत.

मला हे सांग की या वैद्यांशी बोलतांना तुम्ही मुळात 'वेगनिझम' चा बुरखा चढविलेला होतात की जस्ट प्लेनली त्यांची मतं विचारत होता? कारण मग तुमच्याशी बोलतांना मतं थोडी बायस्ड होण्याची शक्यता वाढते. आपले बोलणे दुसर्‍याला आवडावे व पटावे ही मानवी टेंडंसी आहे.

मी फक्त माझीच नव्हे तर जनरली सगळ्य़ांची मते मांडते आहे!
वन्यज जीवनपद्धती का? Why veganism? हे अधिक प्रभावी पणे सांगायची गरज आहे!

अश्विनी.

kasakaay said...
This comment has been removed by the author.
kasakaay said...

अश्विनी,
"व्हिगन का व्हावे" याची विविध कारणे माझ्या या पूर्वीच्या अनेक लेखातून आली आहेत.
सद्ध्या व्हिगन बनण्याचा प्रयत्नात असलेल्या वाचकांच्या शंकांना उत्तरे देणे सुरू आहे.त्यातलाच हा एक लेख.तू माझे आधीचे लेख पुन्हा एकदा वाच अशी मी सुचना करते.

वैद्यांशी सुरूवातीची ओळख व संवाद चारूस्मिताच्या माध्यमातून झाला. ती सुरवातीलाच म्हणाली की ते व्हिगनझिमचा पुरस्कार करतील अशी अपेक्षा ठेऊ नको. कारण आयुर्वेद दूध,अंडी,मास,मासे इ. खा किंवा खाऊ नका असे सांगत नाही.
तरीही आयुर्वेदाचे याबाबतीत नक्की म्हणणे आहे तरी काय तेच मला जाणून घ्यायचे होते, भलेही त्यांनी रोज दूध प्या असे सांगितले तरी चालणार होते, त्यामुळे माझी काहीच हरकत नव्हती. प्रश्नावली पाठवताना संदर्भासाठी हे प्रश्नं त्यांना का विचारते आहे याची कारणे मात्रं दिली होती.

हे तुझॆ वैद्य "शास्त्रोक्त पद्धतीने" बनवलेले तूप खा असं सांगतात त्याचा अर्थ काय? ती पद्धत कुठल्या ग्रंथात लिहीली आहे व तूप खाताना ते शास्त्रीय पद्धतीने बनवले आहे ह्या बाबतीत तू कन्व्हिंस झाली असतेस का?

लोकांमधे चुकीचे समज दृढ झाले आहेत म्हणुन मी ही ते करून घ्यावेत का? थोडा जरी logical, objective विचार केला तर प्राणीजन्य पदार्थ व्हेजिटेरिन आहारात असायलाच नको. conversly, जी व्यक्ती प्राणीजन्यपदार्थ खाते ती व्हेजिटेरियन असू शकत नाही. ह्यात समजण्याला कठिण,कन्व्हिंस करावे लागेल असे काहीही नाही.
डिन् ऑर्निशच्या म्हणण्याप्रमाणे Heart Disease Reversal साठी low fat, mostly plant based diet, moderate exercise and relaxation techniques like meditation हे करायला हवे. भारतीय आहार हा high fat, heavy use of dairy या व्याख्येत बसतो. व्यायाम हा प्रकार प्रचलित भारतीय लाईफ स्टाईल मधे मुळीच बसत नाही. त्यामुळे डिन ऑर्निश भारतीय लाईफ स्टाईलचा पुरस्कार करतात हा आणखीन एक गैरसमज आहे.

नवजात अर्भकाने मातेचे दूध पिणे यापेक्षा मूलभूत असे जगात दुसरे काहीही नाही. त्या दुधावर आपण जेव्हा डल्ला मारतो, तेव्हा केवळ वासराला त्याच्या नैसर्गिक आहारापासून वंचित ठेवले जाते असे नाही, तर मातेला मातृसुखापासून व तिच्या नवजात अर्भकाला ममतेपासून वंचित केले जाते. एका मातेच्या वात्सल्याच्या हक्कापुढे आपली वाफाळलेल्या चहाची (तो ही दूध घातलेलाच )किंवा थंड ताकाची गरज जास्त महत्वाची कशी हे तू मला कृपया कव्हिंस करून सांग.
मी ज्या समाजात वाढले त्या समाजाने मला "दूध व्हेजिटेरियन आहे" असे सांगितले. त्याचे कुठलेही संयुक्तिक कारण दिले नाही. आता मी दूध व्हिजिटेरियन नाही असं म्हणत त्याच समाजाला आव्हान देते आहे. त्यामुळे संयुक्तिक कारणे द्यायची पाळी समाजाची आहे.

HAREKRISHNAJI said...

संगीता / अश्विनी
डिन ऑर्निश चे पुस्तक मुंबई,पुण्यात कोठे मिळेल ? वाचायचय म्हणतोय.
मनेका गांधींच्या दुधा वरील एका विधानाने वादळ उठल्याचे स्मरते. त्या असे काही तरी म्हणाल्या होत्या की प्रयोगशाळेत दूध तपासले तर त्यात गाईच्या रक्ताचा अंश सापडतो.
माझे शाकाहारी शेजारी चीनला गेले होते ते दूध पिताना बघुन त्या लोकांना आश्चर्य वाटले त्यांनी विचारले सुद्धा की तुम्ही तर शाकाहार मग दूध कसे पितात ?

मधाबद्द्ल आपली काय राय आहे ?

HAREKRISHNAJI said...

अश्विनी
मनेका गांधींची मुलाखात येथे आहे.
http://www.veganforum.com/forums/archive/index.php/t-4049.html

kasakaay said...

हरेकृष्णाजी,
जिथे दूध मशीननी काढले जाते तिथे रक्तं निघाल्याशिवाय काढणे थांबत नाही, कारण रक्त निघणे ही आचळातले दूध पूर्ण संपल्याची खूण आहे.
ह्यामुळे गायींना ज्या जखमा होतात त्या बर्‍या होण्यासाठी गाईंना एंटिबायोटिक दिले जाते.
तसेच वासरू हरपलेली माय मनाने कोलमडते. तेव्हा तिला एंटिडिप्रेसंट दिले जाते.

मध व्हिगन नाही. मधात माशीची लाळ व उलटी मिसळलेली असते. कामकरी माशी फुलातुन काढलेले मध आपल्या पोटात साठवते. मग पोळ्यात परत आल्यावर दुसर्‍या माशीच्या तोंडात ओकते. त्यानंतर ते मिश्रण पोळ्यात भरले जाते.

मी स्वतः मुद्दाम मध खात नाही. पण बाहेर गेल्यावर एखाद्या पदार्थात थोडासा मध असेल तर चालवुन घेते.

प्रशांत उदय मनोहर (Prashant Uday Manohar) said...

अश्विनी,
पुण्यात असताना मीही "फॅमिली डॉक्टर" नियमित वाचायचो व त्यात दूध व दुग्धजन्य आहाराविषयी बरंच वाचल्यावर confuse झालो होतो. पण साधारण ३-४ महिन्यांपूर्वी दुग्धजन्य पदार्थांवर एक संपूर्ण पुरवणी आली होती ती ई-सकाळमध्ये वाचली. (आता ती internetवर उपलब्ध नाही.) त्यात, संकरीत गायीच्या रंगावरून आणि प्रजातीवरून दुधाचे गुणधर्म सांगितले होते. संकरित गायींचे दूध अपायकारक आहे असंही सांगितलं होतं. तुम्ही पुण्यात असाल, तर सकाळ कार्यालयात ती पुरवणी मिळेल. दुध काढण्याच्या पद्धतीबद्दल त्यात दिलं होतं की नाही हे आठवत नाही. पण तुपाच्या वापरासंबंधी लिहिताना "आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले तूप" असा स्पष्ट उल्लेख वेळोवेळी केला आहे. एखादा अन्न पदार्थ आपण खातो तेव्हा त्यात सुकामेवा, तूप इत्यादि पौष्टिक गोष्टी असताना ते महाग असणारच अशा संदर्भाचंही एका पुरवणीत मी वाचलं. आज सर्वांना परवडणार्‍या किंमतीत दूध-तूप मिळतं तेव्हा ते आयुर्वेदाच्या दृष्टीने कितपत सुसंगत आहे याची अटवलेल्या दुधाहून दाट शंका आहे.
आणि १५-२० वर्षांपूर्वी दुधातुपाची इतकी रेलचेल कुठे होती? निदान मध्यमवर्गीयांकडे तरी गुळाची पोळी, पुरणपोळी असं काही असेल तरच तूप जास्त प्रमाणात वापरलं जायचं. श्रीखंड, बासुंदी वर्षातून एकदा किंवा फार फार तर दोनदा व्हायचं.
इतर पक्वान्नांमध्ये वनस्पती तुपाचा वापर व्हायचा. केवळ प्रसादाच्या शिर्‍यात साजुक तूप पडायचं.
साजुक तूप रोज सर्वांना थोडं थोडं मिळावं म्हणून अनेकांकडे साजुक तूपात वनस्पती तूप मिसळून ठेवत असत. ज्यांच्या घरी गायी-म्हशी असत, त्यांच्याकडेच दुधाचा जास्त प्रमाणात वापर व्हायचा. तात्पर्य, पूर्वी आयुर्वेदाला संमत असलेलं दूध उपलब्ध असतानासुद्धा त्याचा प्रचंड वापर होत नसे. आणि त्या परिस्थितीत लोक आजच्यापेक्षा जास्त सुदृढ, निरोगी होते.
असो.
एखादी गोष्ट औषध म्हणून घेणे, पथ्य म्हणून घेणे आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी घेणे यात खूप फरक आहे. मी व्हिगन नाही त्यामुळे व्हिगन व्हा असा सल्ला देणार नाही. पण सोयाबीनचे दूध घालून बनवलेला चहा गेल्या महिन्यापासून घेतोय. भारतीय पद्धतीने भरपूर उकळून केलेला चहा असेल तर सोयाबीनची चव कळतसुद्धा नाही. त्यात आलं, वेलची घातली तर त्या चहात सोयाबीन आहे असं सांगूनसुद्धा खरं नाही वाटणार.

Ashwinis-creations said...

प्रशांत,

तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे.
पूर्वी खरंच एव्हढं दूध तूप नसायचं. महाराष्ट्र शासनाची "दुधाचा महापूर " का कायशी योजना होती ना तिचा परिणाम असावा.
संकरीत गायींबद्दल ही माहिती नव्हती. आणि तसेही अनेक गायींचे दूध एकत्र करुन तर पिऊच नये म्हणतात. मग आपल्याला तर डेअरीतून हजारो गायींचे दूध एकत्र प्रोसेस करुन मिळत असणार!

सोया दूध पुण्यात मिळते की नाही ठाऊक नाही.
इतक्या लोकांच्या इतक्या वर्षांच्या समजूती बदलविणं खूप अवघड काम आहे. हजारो -लाखो कप केवळ चहाची उलाढाल असणार्‍या या विशाल खंडप्राय देशात तर ते नेक्स्ट टू इंपॉसिबल आहे.
त्याचे अनेक पैलू आहेत जसे आर्थिक साखळी, सामाजिक धार्मिक संदर्भ, समजूती, रोजगार इ इ

फॅमिली डॉ. ही पुरवणी पुण्यातल्या तब्येतीला अती जपणार्‍या ज्येष्ठ नागरिकांची मानसिकता विचारात घेऊन लिहीलि जाते असे माझे मत आहे. त्यामूळे वन्यज जीवनपद्धतीचा ते पुरस्कार करतील हे सर्वथा अशक्यच आहे.

हरेक्रिश्नाजी,

डीन ऑर्निश चे पुस्तक पॉप्युलर मध्ये मिळायला हवे, किंवा क्रॉसवर्ड मध्येही ट्राय करून पहा.

kasakaay said...

अश्विनी,
सोया दूध अमरावतीतही मिळते, पुण्यात मिळत असणारच.
समजुती बदलणं अवघड आहे, अशक्य नाही. मराठी लोक पुरोगामी असतात. अस्पृश्यता निवारण, स्त्री शिक्षण या त्याहून कितीतरी पटीने अशक्यप्राय वाटणार्‍या प्रथांना विरोध करणारे क्रांतीकारी नेतृत्व महाराष्ट्रात होते हे विसरून चालणार नाही. अर्थात आजकालच्या पुढार्‍यांकडून तशा काssही अपेक्षा नाहीत. हे काम आपल्यासारख्या सामान्यानाच जनजागृतीच्या माध्यमातून करावे लागणार आहे.
व्हिगन होणे म्हणजे चहा सोडणे असा अर्थ होत नाही. एकदा प्युअर काळ्या चहाची चव कळली की दूध व साखरेनी चव खराब होते असेच वाटायला लागते. तरीही प्रशांतने सांगितल्याप्रमाणॆ सोया दूध किंवा क्रिमर वापरायला हरकत नाही.
उलाढालीचा प्रश्न वाटतो तितका अवघड नाही. "मोकळे आभाळ" या मालिकेत दाखवल्याप्रमाणे पर्यायी पदार्थांनी उलाढाल व रोजगार वाढायलाच मदत होईल.

प्रशांत उदय मनोहर (Prashant Uday Manohar) said...

कसंकाय,
आज सहज या पोस्टांवरील अभिप्राय वाचलेत. त्यात, मी पूर्वी पाठवलेल्या अभिप्रायात चुकून
"संकरीत गायीच्या रंगावरून आणि प्रजातीवरून दुधाचे गुणधर्म सांगितले होते." असं लिहिलं गेलंय. मला "गायीच्या रंगावरून आणि प्रजातीवरून दुधाचे गुणधर्म सांगितले होते." असं म्हणायचं होतं. पूर्वीच्या चुकीमुळे गैरसमज होऊ शकतात. त्या चुकीकडे दुर्लक्ष्य झाल्याबद्दल दिलगीर आहे.
-प्रशांत