ह्या मालिकेला वाचकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे.
व्हिगन या शब्दाला वन्यज असा शब्द मी भाग एक मधे सुचवला होता.
एटम यांनी हरिताहार हा शब्द सुचवला असला तरी हा शब्द फक्त आहारापुरताच आहे त्यातुन जिवनशैली प्रतित होत नाही. हरेकृष्णाजींनी त्यांच्या भाषा विशारद स्नेह्यांचा सल्ला विचारला, त्यानुसार वन्यज हा शब्दच योग्य आहे.
प्रशांत यांनी विरोपाद्वारे हरितज हा शब्द सुचवला आहे. तसेच वजन्य हा थोडा फेरफार केलेला पर्याय मला सुचला आहे. एटम यांनी व्हिगन हाच शब्द जसाच्या तसा मराठीत वापरायला हरकत नाही असे (अप्रकाशित प्रतिसादाद्वारे) सुचवले आहे. हरितज हा शब्द मलाही आवडला आहे. अर्थात दोन -तीन प्रतिशब्द असायलाही काही हरकत नाही. तुम्हाला काय वाटते ते जरूर कळवा.
अश्विनीने पोलेंटा, स्ट्रॉंबोली,कुसकुस,सैटान,राईसब्रान, एक्स्ट्रा वर्जिन ऑलोव्ह ऑइल, काळे तांदुळ, हातसडीचे तांदुळ व एव्होकॅडो या विषयी अधिक माहिती विचारली आहे. ती पुढील भागांमधुन प्रकाशित करेन.
एका वाचकांनी विरोपाद्वारे ही एक नविन पाककृती पाठवली आहे. ती कशी वाटली ते कळवा. वाचकाच्या इच्छेनुसार त्यांचे नाव प्रसिद्ध केलेले नाही.
पौष्टिक उसळ
साहित्य:सर्व प्रकारच्या डाळी (प्रत्येकी एक मूठ), पाणी (डाळी भिजवायला), तेल १-२ डाव, तिखट, मीठ, हळद, हिंग, जिरे, मोहरी, दोन हिरव्या मिरच्या, कढिपत्ता, आलं (एक चहाचा चमचाभर किसून), कांदा (बारीक चिरून), कोथिंबीर (चिरून)
कृती:सर्व डाळी अर्धवट शिजवून घेणे. (साधारणपणे दाताने सहज चावता येतील पण बोटाने दाबल्यास पीट होणार नाहीत इतपत शिजवाव्या.) मायक्रोवेव असल्यास पाण्यात भिजवून ३-७ मिनिटे (डाळीच्याप्रकारानुसार) मायक्रोवेव्ह मध्ये गरम केल्यास अर्धवट शिजतात. चण्याच्या डाळीला शिजायला जास्त वेळ लागतो, मसूर डाळ खूप लवकर शिजते, त्यामुळे आवश्यक असल्यास डाळी स्वतंत्र शिजवाव्या. नॉनस्टिक पॅनमध्ये किंवा कढईत तेल मध्यम आचेवर गरम करावे. त्यात मोहरी टाकावी. मोहरी तडतडल्यावर जिरे, मिरची, कढिपत्ता, आलं टाकून थोडं हलवावं. नंतर कांदा टाकून लालसर होईपर्यंत परतावा. त्यानंतर हळद, हिंग घालावे व अर्धवट शिजवलेल्या सर्व डाळी घालाव्यात. थोडं परतल्यावर चवीनुसार मीठ व तिखट घालावे. व थोडं पाणी शिंपडून अर्धी कोथींबीर घालावी. मंद आचेवर २ मिनिटात एक वाफ आली की कढई स्टोव्हवरून उतरवावी व उरलेली कोथींबीर घालावी.ही उसळ गरम गरम खायला चांगली लागते.
टीप:
१. सर्व डाळी पौष्टिक असल्या, तरी त्या पचणं तितकच महत्त्वाचं आहे. पचनाच्या व पौष्टिकतेच्या दृषिने उतरता क्रम मूग, उडीद, तूर, चणे, मसूर, असा आहे. त्यात राजमा, वाटाणे यांची भर घालता येईल. पचनशक्तीनुसार व आवडीनुसार डाळींचं प्रमाण बदलावे.
२. आवडत असल्यास खोबर्याचा कीस (किंवा खवलेला नारळ), शेंगदाणे, घालावे. मस्त चव येते. दाणे घालायचे असल्यास उकडून घ्यावे.
३. ही उसळ रेफ़्रीजरेटरमध्ये आठवडाभर तिकते. त्यामुळे जास्त प्रमाणात करून ठेवता येते.
४. याच उसळीत पाणी घालुन शिजवल्यास मिश्र डाळींच वरण तयार होईल. त्यात चिंच, गूळ घालून लज्जत वाढवता येईल. (परदेशात राहणार्या स्वयंपाक करावा लागणार्या पुरुषांना हे अत्यंत सोयीचं आहे.)५. या उसळीत चिवडा, कॉर्नफ़्लेक्स, कछ कांदा, चाट मसाला घालून 'भेळ'सदृश चटपटीत पदार्थ बनवता येतो.
६.शेंगदाण्याऐवजी बदामाचे काप, मनुका वगैरे सुका मेवा घाता येईल (भारतातील टी.व्ही.वरील पाकक्रियांचे कार्यक्रम स्टाईल :) )