Tuesday, November 06, 2007

मंजुसाठी मुलगा पहा.....

कुणासाठी स्थळबिळ बघण्याइतकी मॅच्युरिटी माझ्यात मुळीच नाही. त्यातुन या मनस्वी मुलीसाठी स्थळ बघायची वेळ माझ्यावर यायलाच नको होती. मंजु एका चांगल्या घरातली मुलगी आहे,म्हणजे तिच्या वागण्यावरूनच तसं लक्षात येतं. उंचीपुरी, देखणी आहे. मी तिच्या हातचा चविष्टं स्वयंपाक चाखला आहे, रांगोळ्या, मेंदीची कलाकुसरही बघितली आहे.
बडनेरा स्टेशन. रात्रीचे १२ वाजुन गेलेले. बडनेर्‍याचं एक बरं आहे. दोनच प्लॅटफॉर्म्स आहेत. एका बाजुला मुंबईहुन येणार्‍या गाड्या आणि दुसर्‍या बाजुला मुंबईला जाणार्‍या गाड्या. नाही म्हणायला तिसरा एक प्लॅटफॉर्म आहे - खास अमरावतीच्या गाडीसाठी!
स्टेशनवर जरा अंधारच होता. पोचे-पोचे पर्यंत आम्हाला उशीरच झाला होता. पुलावरून खाली गाडी उभी असलेली दिसत होती. प्लॅटफॉर्मवर आलो तर ही गाडी आमची नसल्याचं लक्षात आलं (नशीब लक्षात आलं !)
सेवाग्राम एक्स्प्रेसमधे आपला डबा कुठे येणार तो अंदाज करून त्या दिशेनी चालु लागलो. अंधारात समोर दोन-चार आकृत्या दिसल्या. चक्कं ओळखीच्या वाटणार्‍या. तेच का ते? जरा डोळे चोळल्यासारखे करून बघितले. हो. तेच ते. मंजुचे बाबा श्री शंकर पापळकर मंजुशी खाणाखुणा करून काही तरी बोलत होते. बरोबर आणखीही काही लोक होते. बापरे, म्हणजे ही सगळी मंडळी मला निरोप देण्यासाठी चक्कं वझ्झरहुन खास आली होती.
आम्हाला बघताच ही मंडळी पुढे सरसावली. मंजुच्या हातात फुलांचा गुच्छ होता, आणि बाबांच्या हातात तिचा फोटो. नमस्कार चमत्कार झाले.
मंजुशी बोलायचा मी एक केविलवाणा प्रयत्नं केला. तिची खाणाखुणांची भाषा काही मला येत नाही. मंजुच्या बाबांच्या मध्यस्थीनेच तिच्याशी संवाद साधावा लागतो. तिच्या बाबांनी आधी अक्षता टाकल्याची आणि मग विमान उडाल्याची खूण केली.
या क्षणी मंजुच्या डोक्यात भविष्याबद्दल काय काय कल्पना आहेत आणि माझ्याकडनं काय अपेक्षा आहेत हया विचारानी खरं तर मला दडपणच आलं. पण चेहेर्‍यावर तसं नं दाखवता तिचा फोटो नीट पर्समधे ठेवला.
"ताई, इथेच याच स्टेशनवर मंजुला पहिल्यांदा घ्यायला आलो होतो मी."मंजुचे बाबा म्हणाले.
तेव्हढ्यात कोणीतरी चहा-बिहा मागवल्यामुळे विषयांतर झाले. पापळकर जरा जुन्या आठवणींमधे रमले.
"मुंबईच्या गाड्या कमी होत्या ताई आधी. तिकीटासाठी स्टेशनमास्तरच्या खोलीत जायचो आम्ही, तेव्हा प्रतिभाताई पण असायच्या लायनीत."
गाडी हलायची लक्षणे दिसु लागताच मंजुचे बाबा पुन्हा मुळ मुद्यावर आले.

"ताई, तिकडचं एखादं स्थळ बघाच मंजुसाठी. किती मोठी गोष्ट आहे ताई, तुम्हीच सांगा, किती मोठं नाव होईल आपलं! पापळकरांची मुलगी लग्नं होऊन अमेरिकेत गेली म्हणजे आज काही साधी गोष्टं नाही..."
काय बोलावे ते मला सुचेना. मी आपलं हो ला हो लावत होते.

गाडी सुटली. वरच्या बर्थवर स्थिरस्थावर झाले. डोळ्यात जबरदस्तं झोप होती. फुलांचा गुच्छ उशाशी होता. त्या गुच्छातुन अपेक्षप्रमाणे तिखाडीच्या गवताचा सुगंध येत होता. हा सुगंध माझ्या चांगला ओळखीचा आहे. हा अगदी टिपिकल वझ्झरचा वास आहे. लोक कुलदैवताला जातात तशी मी वझ्झरला पापळकरांच्या इथे जात आले आहे. अमेरिकेत येण्याच्या आधीपासुनच तिथल्या भेटी ठरलेल्या आहेत.

मंजुचे बाबा शंकर पापळकर म्हणजे काही साधीसुधी व्यक्ती नाही. आधी एक, नंतर दोन, असे करत करत थोड्या-थोडक्या नव्हे तर शहात्तर मुलांना त्यांनी दत्तक घेतले आहे. प्रत्येक मुलाला कसले तरी शारिरिक अथवा मानसिक आव्हान आहे. काहींचा बुदध्यांक शुन्याच्या जवळपास आहे. अख्ख्या महाराष्ट्रात अपंग अनाथ मुलांसाठी असलेले हे एकमेव रिमांड होम आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातुन किंवा बाहेरूनही ही मुले इथे आली आहेत.
त्या प्रत्येकाची कथा त्यांचे बाबा सांगु शकतात. कोण अनाथ, कोणाला जन्मदात्यांनी कुठे टाकले, बाबांकडे ते कसे आले, कोण ब्राम्हणाचा मुलगा, कोण मुसलमान, कोण एड्सग्रस्त. बहुतेक मुले अगदी तान्ही असतानाच त्यांच्याकडे आलेली आहेत.
बाबांच्या संगोपनात लहानाचे मोठी होऊन बर्‍याच जणांनी आपले संसारही थाटले आहेत. मतिमंद मुली सुखाचा संसार करताहेत, त्यांना निरोगी मुले-बाळेही झाली आहेत.
त्या सर्व कथा सांगताना बाबांचा चेहेरा अभिमानानी फुलतो.


बाबांच्या पंखाखाली मंजु आली तेव्हा चौदा पंधरा वर्षाची होती. आल्यापासूनच तिने घरचा बराच भार उचलला आहे. आतलं बाहेरचं सगळंच बघण्याची जबाबदारी तिच्यावर असते. गेल्या दोन-तीन वर्षापासुन तिच्या लग्नाची खटपट बाबा करतायेत. मंजु अतिशय स्वाभिमानी आहे आणि आत्तापर्यंत दोन मुलांना तिने नाकारले आहे! त्यामुळे सहाजिकच बाबा जरा अस्वस्थ आहेत.

पापळकरांचे कार्य म्हणजे खरं तर आमट्यांच्या तोडीचे आहे. त्यांचा जग प्रसिद्ध होण्याचा दिवस यायचा आहे एव्हढेच. आनंदवनाचा जसा कुष्ठंरोग्यांनी कायापालट केला आहे, तसाच या परिसराचा कायापालटही या अनाथ,अपंग मतिमंद मुलांनी केला आहे. एकेकाळी उघडे-बोडके असलेले ते डोंगर आता विविध वृक्षवल्लींनी नटले आहेत.

बाबांचा स्वभाव प्रसिद्धि परांगमुख म्हणा किंवा प्रसिद्धीवर ते नियंत्रण ठेवतात म्हणा. परवानगीशिवाय आश्रमात कोणी आलेले त्यांना आवडत नाही. मुलांसाठी पाहुण्यांनी काय खाऊ आणावा हे सुद्धा एक जागरूक वडिल या नात्यानी तेच सांगतात.

त्यांच्याच इच्छेला मान देऊन इतके दिवस मी त्यांच्या विषयी लेख लिहिण्याचा मोह टाळत आले आहे. पण आता मात्रं त्यांनी माझ्यावर इतकी मोठी जबाबदारी टाकली आहे. ती पार पाडण्यासाठी मला तुम्हा सगळ्यांच्या मदतीची नितांत आवश्यकता आहे.

मंजुसाठी मुलगा पहा. फार पैसेवाला नसला तरी चालेल. होतकरू, सालस, गुणी मेहेनती हवा. अमेरिकेतच असायला हवा असं काही नाही हं...कृपया माझं एव्हढं काम करा. कोणी चांगला मुलगा लक्षात आला तर मला kasakaay@gmail.com वर जरूर कळवा.

9 comments:

कोहम said...

anubhav avadala....

Abhijit Bathe said...

असल्या जबरा ’हटके’ लेखाबद्दल अभिनंदन.
कितपत मदत करु शकेल याबद्दल शंका आहे, पण लेख बरेच दिवस डोक्यात राहील याबद्दल शंका नाही.

priyadarshan said...

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Anonymous said...

गेल्य अनेक वर्षां पासुन मी या २१व्या शतकातील महामानवाला जवळून पहात आहे. त्यांचे कार्य हे श्ब्दां मधे अथवा ब्लोग्ज मधे वर्णन करणे केवळ अशक्य आहे. मंजुचे भविष्य उज्ज्वल आहेच, ते लवकर प्रत्यक्षात यावे हीच परमेष्वरा चरनी प्रार्थना !

TheKing said...

Not sure if I can help, but lekhachi bhatti mast jamli ahe. Would love to know more about Papalkar.

HAREKRISHNAJI said...

मंजुसाठी मुलगा पहा, हे शिर्षक वाचल्यावर मला आधी वाटले की बऱ्याच लोकांना अमेरीकेत आपली मुलगी लग्न करुन पाठवण्याची हौस असते त्यातलाच हा प्रकार आहे की काय ? पण संपुर्ण वाचल्या नंतर भ्रमनिरास झाला.

श्री शंकर पापळकर सारख्या महान विभुतींमुळेच या समाजपुरुषाचा गाडा चालु आहे. अनेक थोर व्यक्‍तींना आपल्या कार्याचा उदौउदो करायला, त्यातुन पैसे कमवायला, पुरस्कार घ्यायला आवडात नसते, या गोष्टींना त्यांचा सक्त विरोध असतो.

आपला स्वताचा मुलगा / मुलगी शारीरीक , मानसिक रिता अपंग असतील तर त्यांना सांभाळणेच सक्ख्या आईवडलींना किती कठीण असते. अश्या वेळी या मुलांना नुसतेच दत्तक घेवुन नव्हे तर त्यांचे पुढील आयुष्य देखील सुरळीत पार पडावे या साठी धडपडणारे, श्री शंकर पापळकर सारख्यांचे कार्य महान असते.

आशा जोगळेकर said...

मंजू साठी तरी एखादा मुलगा आपल्याला लक्षात यावा असं खूप वाटलं . फण तुमचा लेख अन् श्री पापळकरांचे कार्याविषयी वाचून आश्चर्य चकित झाले. कसे लोक आपलं जीवन सर्वस्वी अशा एखाद्या कार्याला वाहून टाकतात ! प्रेरणा वेणारा लेख .

sangeetagod said...

कोहम,अभिजित,प्रियदर्शन,अनामिक,हरेकृष्णाजी,द किंग व आशाताई,
आभिप्रायांबद्दल धन्यवाद.
पापळकरांचे कार्य भारावुन टाकणारे आहे.
द किंग त्यांच्यावर एक स्वतंत्रं लेख खरं तर लिहायचा आहे. पण त्यासाठी मला नीट माहिती गोळा करण्यासाठी खुद्द पापळकरांचेच सहकार्य मिळेल की नाही याची शंका आहे.
मागे एकदा मी इंटरनेटवर माहिती टाकण्याची सुचना केली होती, पण त्यांना ते मान्य नसल्याचे त्यांनी मला लगेच सांगितले.
पुन्हा एकदा विचारून पाहिन.

Samved said...

wow! I was not knowing this at all...