Saturday, April 28, 2007

फुलफ्रेम भाग ४ (अंतिम)

फुलफ्रेमच्या अंतिम भागात मला आवडलेल्या डॉक्युमेंटरींविषयी थोडक्यात सांगणार आहे. वाचकांना जरा काही हलकं फुलकं सांगावं आणि स्वतःच्या डोक्यावरचा ताणही कमी व्हावा या दृष्टीने पहिले दोन भाग लिहिले होते. तुमच्या प्रतिक्रियांबद्द्ल धन्यवाद. पण बहुतेक डॉक्यु.मधे अतिशय गंभीर,भयानक परिस्थितीचे चित्रण केलेले आहे. हया भागात काही हिंसक, पाशवी घटनांचे वर्णन असू शकते ह्याची नोंद घेऊनच पुढे वाचा (अथवा वाचू नका). हे सिनेमे वाचकांना एरवी बघायला मिळणार नाहीत म्हणून सगळीच स्टोरी थोडक्यात लिहिली आहे.

For the Bible Tells Me So:
अमेरिकन समाजात सुरू असलेला गे राईटसा झगडा या चित्रपटात दाखवला आहे. एकीकडे सनातन ख्रिश्चन लोक गे लोकांना लग्नं करण्याचा अधिकार द्यायला तयार नाहीत. दुसरीकडे वैज्ञानिक संशोधन जीन्सकडे बोट दाखवते आहे. माना अथवा मानू नका, पण बर्‍याच लोकांना हा मुद्दा इतका महत्वाचा वाटतो की निवडणुकांमधे तो इराक युद्धापेक्षाही महत्वाचा ठरतो!

The Rape of Europa:
या सिनेमाचे वर्णन मी एक क्लासिक डॉक्युमेंटरी असं करीन. दुसर्‍या महायुद्धात हिटलर आणि त्याच्या जनरलसनी पादाक्रांत केलेल्या देशातून कलाकृतींची चोरी करून कशी केली आणि जर्मनीचा पराभव झाल्यानंतर दोस्तं राष्ट्रांनी ती लूट कशी परत मिळवली याचे फार रंजक वर्णन केले आहे.
हा सिनेमा बघताना माझ्या डोक्यात काही वेगळेच किडे वळवळत होते. स्वतःच्या देशातून चोरी गेलेल्या संग्रहणिय वस्तू परत मिळवण्यात हे देश इतके तत्पर असताना स्वतः चोरून आणलेल्या वस्तूंबाबत मात्रं बोलायला तयार नाहीत. (उदा. कोहिनूर, भवानी तलवार इ) मात्रं हा मुद्दा बाजूला ठेवला तर हा अतिशय बघण्यासारखा सिनेमा आहे.

Angels in the Dust:

जोहानिसबर्ग मधील एक गोरे कुटंब आपली होती नव्हती ती संपत्ती विकून काळ्या आफ्रिकन मुलांसाठी शाळा काढायचे ठरवते. शाळा सुरू झाल्यावर मात्रं त्या मुलांचे गंभीर प्रश्न बघून आपली त्यांना नुसती शिकण्याकरताच नव्हे तर नुसते तगण्याकरता आवश्यकता आहे हे लक्षात येते. मग एक अनाथाश्रमच सुरू होतो. एडसने बर्‍याच मुलांना अनाथ केले आहे. गरिबीने ग्रासले आहे. लहान लहान मुली बलात्काराच्या बळी पडत आहेत - कारण अनाघ्रात स्त्रीशी सलगी केल्याने एडस बरा होतो अशी अंधश्रद्धा आहे. प्रत्येक मुला मुलीला समजता क्षणी एकच प्रश्न पडलेला असतो - मी एच आय व्ही बाधित आहे का नाही? असल्यास पुढचा नंबर माझा तर नाही ना? आया जगण्यासाठी मुलींना विकायला निघाल्या आहेत. अनाथाश्रमाचा एक महत्वाचा खर्च म्हणजे शवपेट्यांची खरेदी.
अशा परिस्थीत हे गोरे कुटंबा आपले सगळे अस्तित्वपणाला लावून त्या परिस्थितीशी झगडते आहे.

The Ants:

जपानच्या इंपिरियल आर्मीमधे जपानी तरूणांची जबरजस्तीने खोगीर भरती करून घ्यायचे. मग या तरूणांकडून सगळ्यात निर्घुण कामे करून घेतली जात. या सैनिकांना ant solders असे नाव होते. अशापैकी एक बटालियन दुसर्‍या महायुद्धात चीनमधे लढत होती. युद्ध संपले तरी त्यांना लढत रहाण्याचे आदेश दिले गेले. अखेर त्यांना युद्धकैदी म्हणून पकडण्यात आले. सुटका झाल्यावर ते जेव्हा मायदेशी परत गेले तेव्हा जपानने त्यांना सन्मानाने तर वागवले नाहीच, पण हे सैनिक कुठल्याही आदेशाशिवाय स्वतःहून लढत होते अशी भूमिका घेतली. १९५४ मधे युद्धावरून परतलेल्या वायची ओकुमुरा यांची ही गोष्टं. न्याय मिळवण्यासाठी म्हातारपणी न्यायालयाचे दरवाजे ठोठवणार्‍या वायचींची कथा फार हृदयद्रावक आहे. आयुष्यात कोणाची काडी ही वाकडी नं करणार्‍या या व्यक्तीला सैन्यात भरती व्हावे लागले. प्रशिक्षाणाचा एक भाग म्हणून निरपराध चिनी शेतकरी, मजूरांना पकडून आणायचे. तलवार, चाकू अशा शस्त्रांनी त्यांना ठार मारायचा सराव करायचा. या दिव्यातून गेलेले वायची पुरावा मिळवण्यासाठी चीनमधे परत जातात. जिथे त्यांची छावणी होती त्या गावात जाऊन वैयक्तिक पातळीवर त्यांची माफी मागतात. पुरावे तपासले असता त्यांचा कमांडर युद्धातल्या अत्याचाराच्या चौकशीतून वाचण्यासाठी नाव बदलून पळून जातो. जातान जपानमधून अधिक कुमक घेऊन येतो - तोपर्यंत तुम्ही लढत रहा असा आदेश देऊन जातात. हे सगळे पुरावे घेऊन वायची परत जातात. नविन पिढी वायचींवर विश्वास ठेवत नाही कारण हा सगळा इतिहास मुलांना शाळेत शिकवलाच जात नाही. वायचींच्या लढ्याचे हे एक विदारक चित्रण.

The Devil Came on Horseback:

"Never Again" असं सगळ्या देशांनी म्हटलं - दुसर्‍या महायुद्धानंतर. एखाद्या वंशाचा कोणी नाश करायला निघाले तर ते कदापिही खपवून घेतले जाणार नाही अशी सगळ्यांनी प्रतिज्ञा केली. पुढे काय झाले? काही नाही. आफ्रिकेमधे सतत वंशनाश सुरू आहे. दारफूरमधे सरकारी आशिर्वादाने सुरू असलेल्या वंशनाशाचे हे विदारक चित्रण. एकिकडे गावामागून गावे बेचिराख होत असताना इतर जग हातावर हात ठेवून बसले आहे. आफ्रिकन युनियनचा प्रतिनिधी म्हणून गेलेल्या एका माजी अमेरिकन सैनिकाने घेतलेले फोटी आणि चित्रफिती तुम्हाला अगदी दारफूरच्या संघर्षात प्रत्यक्ष जाऊन आल्याचा अनुभव देते.

Blockade:

दुसर्‍या म.यु.त जर्मन सैन्याने लेनिनग्राडला (सेंट पिटर्स्बर्ग) वेढा टाकले त्याचे अतिशय दुर्मिळ चित्रं. एका हसत्या खेळत्या शहराची काय वाट लागली त्याचे विदारक चित्रण. हल्ले सुरू होतात. सगळीकडे जाळपोळ, नासधूस. लोक शहराबाहेर जायचा प्रयत्नं करतात. बर्फ पडू लागतं. अन्नं नाही,पाणि नाही. अखेर मृतदेह हलवायचे त्राणही शिल्लक रहात नाही. प्रेते आणि जिवंत माणसे यांच्यात फारसा फरक रहात नाही. अखेर रेड आर्मीच्या युद्धनौका येतात आणि
जर्मन सैन्याला माघार घ्यावी लागले. दु.म.यु.ची ही एक निर्णायक लढाई. सरकारी कॅमेर्‍यातून घेतलेले हे फुटेज कोणी कसे मिळवले कुणास ठाऊक!

War Dance:

उत्तर युगांडामधील पटोंगा रेफ्युजी कॅंप. लॉर्डस रेझिस्टन्स आर्मी (एल. आर. ए)नावाच्या अतिरेकी संघटनेच्या कारवायांनी त्रस्त अचोली जमात. एल. आर. ए ची एक नविनच नीती आहे. एका गावावर ह्ल्ला करायचा. त्या गावातल्या मुलांना पकडायचे. त्यांच्या हातूनच त्या गावातल्या लोकांची हत्या करायची आणि मग त्या मुलांना आपल्या दलात भरती करायचे. या परिस्थितीतही स्वतःची संस्कृती जपण्याची धडपड अचोली जमात करते आहे. शाळेतील मुलांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अतिशय कठिण परिस्थितीचा सामना करत स्पर्धेची तयारी करत आहेत. ते करत असतानाच आपल्या हरवलेल्या नातेवाइकांचा शोध घेताहेत. कुणाचा भाऊ मारल्या गेल्याचे कळते तर कुणाची आई दुसर्‍या रेफ्युजी कॅंपमधे सुरक्षित असल्याचे कळते. स्पर्धेसाठी कंपालाला गेलेल्या या मुलांनी सुरक्षितता पहिल्यांदा अनुभवली. शहरी मुलांना बघून बावरली. एकमेकांना धीर देत राहिली. अचोलींचे नाव सार्थ करायचेच या जिद्दीने पेटली आणि बरीच बक्षिसे मिळवली. सिनेमेटोग्राफि बघण्यासारखी आहे.

Run Granny Run

निवडणुका हा फार खर्चिक प्रकार आहे. तितका पैसा उभा करण्यासाठी उमेदवारांना व्यापारी कंपन्यांकडे याचना करावी लागते. एकदा ते झाले की निवडून आलेला उमेदवार जनतेचे प्रतिनिधित्व नं करता दात्यांचे प्रतिनिधीत्व करेल हे उघड आहे. ह्या व्यवस्थेला लोकशाही म्हणणेच चुकीचे आहे. या विचाराने ९० वर्षाच्या डोरिस - लोकप्रिय नाव ग्रॅनी डी राजकारणात पडतात. उमेदवारांचा खर्च सरकारने करावा हा कायदा पास व्हावा म्हणून अख्ख्या देशाची पदयात्रा करतात आणि अखेर निवडणूकही लढवतात. सर्वांनी बघावा असा हा सिनेमा.

Photo Credits: Full Frame Documentary Film Festival. Used with their permission

Thursday, April 26, 2007

फुलफ्रेम भाग ३ - आमच्या एरियलचा A Promise to the Dead - The Exile Journey of Ariel Dorfman (Work in Progress)

एरियल डॉर्फमन हे नाव डरहॅमच्या सामाजिक वर्तुळात नविन नाहीत. साधारण पासष्टी-सत्तरीतलं वय. आपल्या हसतमुख व्यक्तिमत्वाने सगळ्यांना आपलंसं करून सोडणारे. लहान-मोठ्या सगळ्यांशी तितक्याच आपुलकीने वागणारे. इथल्या ड्युक विद्यापिठात ते प्राध्यापक आहेत. एक प्रथितयश लेखक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या लिखाणावरून Death and the Meaden सारखे सिनेमे तयार झाले आहेत. तरी दरवर्षी फुलफ्रेममधे ते इतर प्रेक्षकांसारखे रांगेत बिंगेत उभे रहातात. या त्यांच्या साधेपणामुळे मला नेहेमीच त्यांच्याबद्दल जरा जास्तच आदर वाटतो. त्यांच्या मुलगा रॉड्रीग्जही सुफी कार्यक्रमात आम्हाला नेहेमी भेटतो.
त्यांच्या कुटुंबाला चिले या देशातल्या राजकिय घडामोडींमुळे देशोधडीचा सामना करावा लागला हे ही माहित होते. पण जेव्हा एरियल यांच्या जीवनावरच सिनेमा तयार होतो आहे हे कळले तेव्हा जरा आश्चर्य वाटले आणि जरा जास्तीच होतं आहे असंही कुठेतरी वाटलं - तरी उत्सुकतेपोटी गेले. थिएटरकडे जाणारा जिना उतरताना बघितले तर एरियल माझ्या बाजूलाच होते. नेहेमीप्रमाणे मनमोकळे हसले माझ्याकडे बघून.
सिनेमाबद्दल सांगण्याआधी चिलेचा थोडा इतिहास सांगायला पाहिजे.(या विषयावरचा Battle of Chile हा सिनेमा जरूर बघावा.) साल्वाडोर आलंदे हे १९७० मधे अध्यक्ष म्हणून निवडून आले, लोकशाही पदधतीने. परंतू त्यांच्या मार्कसिस्ट विचारसरणीने त्यांनी अमेरिकेचा रोष ओढवून घेतला. शितयुद्ध सुरू होतेच. त्यात आलंदेंनी क्युबा आणि उ. कोरिया इ देशाशी संबध प्रस्थापित करायला सुरूवात केली आणि प्रमुख उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरणही करायला सुरूवात केली. म्हणजे अमेरिकन कंपन्यांना आव्हानच दिले. मागे एका लेखात मी सी.आय.ए. ने इराणच्या लोकशाहीचा सत्यानाशकरून लष्करशहांना गादीवर बसवल्याचे सांगितलेच आहे. सी.आय.ए. चा ते पहिले यशस्वी सत्तांतर होते. १९७० उजाडेपर्यंत सी.आय.ए. नी ही कला अगदी हातचा मळ असल्यासारखी आत्मसात केली होती. अमेरिकेच्या मित्रं अथवा शत्रू राष्ट्रांमधे आजतागायत लोकशाहीचा दुष्काळ आहे हा योगायोग नाही. आता डिक्लासिफाईड झालेल्या कागदपत्रांवरून निक्सन यांच्या आदेशावरून हेन्री किसिंजर यांनी या कामात पुढाकार घेतला. तीन वर्ष सतत प्रयत्नं करून अखेर ११ सप्टेंबर १९७३(ह्याला दैवदुर्विलास म्हणायचे की इतिहासाने मारलेली चपराक समजायचे?) रोजी आलंदेंचे सरकार बरखास्तं करून लष्करशहा पिनोचे गादीवर बसले. आलंदेंना देश सोडून जाण्याची संधी देण्यात आली, ती नाकारून त्यांनी मरणाचा मार्ग पत्करला. आलंदे आणि त्यांच्या समर्थेकांना अतिशय हाल करून ठार करण्यात आले. बर्‍याच जणांच्या पार्थिवाचाही पत्ता लागला नाही.
एरियल डॉर्फमन आर्जेटिनामधे जन्माला आले. तिथल्या राजकिय परिस्थितीमुळे त्यांच्या वडिलांनी चिलेमधे आसरा घेतला. त्यांच्या विचारसरणीमुळे पुन्हा एकदा चिले सोडायची पाळी आली. एरियल लहान असतानाच अमेरिकेत आश्रय मिळाला. न्यूयॉर्कमधे एरियल लहानाचे मोठे होत असताना पुन्हा एकदा त्यांच्या वडिलांना कम्युनिस्ट असल्याच्या संशयावरून अमेरिका सोडावी लागली. मग पुन्हा कधी चिले कधी आर्जेंटिना. तरूण एरियल आलंदेंच्या विचार शैलीकडे आकर्षित झाले. विचारांचा सामना विचाराने करायचा ही आलंदेंची भूमिका त्यांना मनापासून पटल्याने ते आलंदेंच्या आंदोलनात सहभागी झाले.
आता मूळ विषयाकडे वळू या. सिनेमा सुरू होतो तेव्हा एरियल राजधानी सॅंतियॅगोमधी काही जुन्या मित्रांशी त्या काळाबद्दल बोलताना दाखवले आहेत. मग त्या आठवणी सांगता सांगता मधेच त्या काळतले फुटेज दाखवले जाते. आलंदेंची लोकप्रियता किती होती ते त्या फुटेजवरून कळते. आपण या रस्त्यावरून मोर्चा काढला, आलंदे त्या खिडकीत उभे होते अशा आठवणींच्या वेळी त्या काळातल्या फुटेजचा बेमालूम उपयोग केला आहे. मग आलंदे सत्तेवर आल्यावर आमचे एरियल सांस्कृतिक मंत्री बनले. ते मंत्रीपद मिळाल्यावरोबर पुस्तके विकत घेऊन शाळांच्या वाचनालयात प्रचंड भर टाकण्याचे काम एरियलनी सुरू केले. शिवाय स्वतःच्या लिखाणाने इतरांवर प्रभाव टाकणे सुरू होतेच. सत्तेवर आल्यानंतर आधीच्या सरकारवर कुठल्याही प्रकारचा सूड घ्यायचा नसल्याने विकास कामांना लगेच गती मिळाली. अमेरिकन साम्राज्यवादाला दूर ठेवण्यासाठी (बनाना रिपब्लिक होऊ नये म्हणून) खाजगीकरण सुरू केले आणि इथेच संघर्षाची ठिणगी पडली. कामगारांचा संप, आलंदेंच्या विश्वासातील माणसे मारली जाणे असे प्रकार घडू लागले.
ऑगस्ट १९७३ मधे एक अयशस्वी प्रयत्नं करण्यात आला. त्यावेळी आपले सरकार फार दिवस टिकणार नाही हे आलंदेंना कळून चुकले होते. अमेरिकन युद्ध नौका येऊन दाखल झाल्याच होत्या. १० सप्टेंबरला लष्कराने निरोप पाठवला. उद्या आम्ही सत्ता ताब्यात घॆणार. ते करण्यात आम्ही यशस्वी झालो तर तुमच्या सगळया मंत्री मंडळाला बोलावणे पाठवू. पुढची बोलणी करायला सगळ्यांनी येणे आवश्यक आहे.
त्याप्रमाणे ११ सप्टेंबरच्या सकाळी मंत्रीमंडळातल्या सगळ्यांना निरोप गेले - फक्त एक व्यक्ती सोडून - ती म्हणजे आमचे एरियल. ज्यांना निरोप गेले त्यातली एकही व्यक्ति जिवंत बाहेर आली नाही. त्यानंतर बरेच वर्षांनी एरियल निरोप पाठवणार्‍या व्यक्तिला भेटले आणि "मला का बोलावलं नाही?" असं विचारलं. त्यानी सांगितलं - "सम बडी हॅड टू टेल द स्टोरी". म्हणजे केवळ त्या एका व्यक्तिच्या भलेपणामुळे त्यांचा जीव वाचला होता. त्यानंतर चिलेमधे आलंदे समर्थकांची धरपकड सुरू झाली. बायका मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवून एरियल आर्जेटिनाच्या दूतावासात गेले. आर्जेंटिनामधे जन्म झाला असल्याने तिथे त्यांना आश्रय मिळाला. पुन्हा एकदा जीव वाचला. दोन दिवसानी आर्जेंटिनात जायचे कागदपत्रं तयार झाले आणि मग बायका मुलांना न्यायला निघाले. जाताना रस्त्यात एका ठिकाणी आलंदे समर्थक आणि लष्करात खडाजंगी सुरू होती. आता पर्यंत नशिबाने वाचवले होते. पण आता मात्रं "मी चक्कं घाबरलो म्हणून तिकडे गेलो नाही आणि पुन्हा एकदा वाचलो" अशी कबूली एरियल देतात. पण त्यानंतर मात्रं या कार्यासाठी आपला देह ठेवला त्यांच्यासाठी हा लढा सुरूच ठेवायचा निर्धार केला.
१९८९ मधे चिलेमधे पुन्हा एकदा लोकशाहीची स्थापना झाली. त्यानंतर त्यांचे पुन्हा चिलेमधे जाणे येणे सुरू झाले. मानवी हक्क संघटनांचे त्यांचे काम आजही सुरू आहे.
अशा अनेक आठवणी सांगत एरियल त्यांचा जिवनपट आपल्यासमोर मांडतात. डरहॅमच्या रेल्वे स्टेशनवर एरियल येतात तिथे सिनेमा संपतो.
सिनेमा संपल्यावर एरियल आणि सिनेमाचे डायरेक्टर पिटर रेमॉंट यांनी प्रश्नांना उत्तरे दिली. स्टेजवर बसलेल्या साधारण दिसणार्‍या त्या व्यक्तीकडे मी भारावल्यासारखी बघत बसले.

Sunday, April 22, 2007

फुलफ्रेम भाग २ - Nomadak Tx

चलापार्टा (इंग्रजी स्पेलिंग Txalaparta) नावाचे एक ताल वाद्यं आहे. दोघांनी मिळून वाजवायचे असते. हजारो वर्षापूर्वी पूर्व युरोपातील बास्क कंट्रीतील आदिवासी लोक दूरसंदेशासाठी या वाद्याचा उपयोग करायचे. मधल्या शतकात चलापार्टा जवळ जवळ अस्तंगत झाले होते. १९५० साली बास्क कंट्रीमधे केवळ २ चलापार्टा उरले होते. त्यानंतर कोणीतरी त्याचे पुनरूज्जीवन करायचे ठरवले. आज चलापार्टा वाजवणारे बरेच वादक तयार झाले आहेत. हरकाईट्झ आणि इगोर हे पंचविशीतले दोन हुन्नरी तरूण त्यातलेच. मूळ्चे आदिवासी वाद्य असल्याने खर्‍याखुर्‍या आदिवासी लोकसंगीतात याचा उपयोग करावा आणि काय होते ते बघावे असा विचार करून हे दोघे तरूण घराबाहेर पडले - आदिवासींच्या शोधात.
पहिला मुक्काम भारत. जिथे जमेल तिथे मैफिल जमवायची. मुंबईतील काही शास्त्रिय संगीत वाजवणार्‍या कलाकारांसमवेत वाजवण्याचा प्रयोग केला. एक कार्यक्रमही दिला.
नंतर गुजरातमधील एक आदिवासी खेडे तिथल्या आदिवासी संगीतात चलापार्टा अगदी चपखल बसते. पारंपारिक प्रथेप्रमाणे हे वाद्य आजूबाजूच्या परिसरात सापडणार्‍या साधनांपासून बनवायचे असते. गुजराथी खेड्यासाठी सागाच्या लाकडापासून चलापार्टा बनवण्यात आला होता.
दुसरा मुक्काम आर्क्टिक सर्कल. स्कॅंडेनेव्हियातील सामी जमात ही युरोपमधील मूळ आदिवासी जमात आहे असे मानले जाते. बहुतेक सामी आता आधुनिक झाले असले तरी काही लोक रेनडियर पालन करून उदर निर्वाह करताहेत. हरकाईट्झ आणि इगोर बर्फातून मार्ग काढत सामींना भेटायला जातात. जरा स्थिरस्थावर होतात, अंघोळी बिंघोळी आटपून लगेच कामाला लागतात.
आधी चलापार्टा बनवायला पाहिजे नाही का? तो ही आजूबाजूच्या परिसरात मिळेल ती सामुग्री घेऊन.
मग सामींबरोबर प्रॅक्टिस सुरू आणि ही बघा कार्यक्रमाची तयारी.

तिसरा मुक्काम मोरोक्को. इथे आफ्रिकेत आदिवासींची कमी नाही. शिवाय इतर भागात चाललेल्या संघर्षांमुळे सुदान, युगांडाचे शरणार्थी आदिवासीही इथे आले आहेत.

या वाळवंटात दगडाचा चलापार्टा बनवायला हवा.


चौथा मुक्काम मंगोलिया. इथले बांबू किंवा तत्सम प्रकारातून चलापार्टा बनला.


टाळ्यांच्या गजरात सिनेमा संपला. थिएटरमधले दिवे लागले - हर्काईट्झ आणि इगोर प्रत्यक्ष चलापर्टा घेऊन हजर होते. एक छोटा कार्यक्रम झाल्यावर त्यांनी प्रेक्षकांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली.

सिनेमाचे ट्रेलर इथे बघा:
http://www.nomadaktx.com/english/pelicula/principal.html
(शेवटचा फोटो नवर्‍याने काढला आहे. इतर सर्व फोटो नोमॅडक च्या वेबसाईटवरून त्यांच्या परवानगीने घेतले आहेत.)

Tuesday, April 17, 2007

फुलफ्रेम भाग १ - कॉमरेडस इन ड्रिम्स

गेल्या ४ दिवसात जवळपास २०-२५ डॉक्युमेंटर्‍या बघितल्या. भारतात असताना सिनेम्याच्या आधी "फिल्म्स डिव्हिजनकी भेंट" म्हणून बघाव्या(च) लागणार्‍या या प्रकाराकडे मी पुढे इतकी आकर्षित होईन असे वाटले नव्हते (कधी कधी ती पाच दहा मिनिटे पुढच्या पिळवणूकीपेक्षा बरी होती असे म्हणायची पाळी तेव्हाही यायची.)
माहितीपट या प्रकारात आता बरीच क्रांती झाली आहे. मायकेल मूरचा फॅरेनाईट ९/११, अल गोर यांचे इन्कन्हिनियंट ट्रूथ इ. माहितीपट थेट सिनेमा हॉलमधे प्रदर्शित झाले आहेत. आणखी एक महत्वाचा बदल म्हणजे "घडणार्‍या घटनांची नोंद करणे" ही मूळ व्याख्या आता मागे पडली आहे. डायरेक्टरने सिनेमातले एक पात्रं बनून एक नविन इतिहास बनवणे हा पायंडा पडायला सुरुवात झाली आहे. अशा प्रकारच्या माहितीपटाला काही वेगळा शब्द आहे की नाही हे मला माहित नाही. पण यंदाच्या महोत्सवात हा प्रकार प्रामुख्याने आढळला. महोत्सवाचा एक महत्वाचा भाग म्हणजे बरेचदा दिग्दर्शक उपस्थित असतात आणि सिनेमा संपल्यावर प्रश्नोत्तरांना खास वेळ दिला जातो.
For the Bible Tells Me So, The rape of Europa,Nomadak Tx, Angels in the Dust, Every Thing is Cool,The Devil Came on horseback, Run Granny Run, A Promise to the Dead,The Ants, War Dance हे माहितीपट मला विशेष आवडले. दुसरे महायुद्ध, आणि आफ्रिकेत सुरू असलेल्या संघर्षांची आता मला नको इतकी माहिती झाली आहे. आफ्रिकेतल्या कुठल्या देशात कुठली जमात कुठल्या जमातीशी मारामारी करते आहे ते कळले, इतकेच नाही तर कदाचित नुसता चेहरा पाहून जमातीचे नाव सांगू शकेन असे वाटायला लागले आहे. आता हा गमतीचा भाग सोडला तरी डोके सुन्नं करणारे ते सिनेमे पाहताना मात्रं चांगलेच डिप्रेशन आले होते.

पण आजच्या लेखामधे मी सांगणार आहे जर्मन दिग्दर्शक Uli Gaulke च्या Comrades in Dreams बद्दल.
सिनेमाचा विषय साधा - टुरिंग टॉकिजेस - फिरती सिनेमागृहे. उली आपल्याला घेऊन जातात चार वेगवेगळ्या देशांमधे - पहिले टॉकिज महाराष्ट्रातल्या वडुजच्या अनुप जगदाळेचे. दुसरे टॉकिज नॉर्थ कोरियातल्या हॅन यॉंग सुन या तरुणीचे (अर्थातच टॉकिज तिचे नाही. सिनेमे दाखवणे हे तिचे काम आहे), तिसरे टॉकिज बुर्किना फासोच्या लस्साने,ल्युक आणि झकेरिया यांचे. आणि चौथे चक्कं अमेरिकेतल्या वायोमिंग राज्यातल्या पेनीचे.
अनुपचा एक ताफाच आहे. समोर मोठ्या अक्षरात अनुप वडुज असे लिहिलेला ट्रक आणि त्याच्या मागे प्रचंड आकाराचे तंबू आणि इतर सामुग्री ने आण करायचे एक की दोन ट्रक आणि मोटरसायकलवरचा अनुप हा जथ्था बघायला मजा येते.
दिग्दर्शकाने "टायटॅनिक" ही थिम मनात ठरवली असावी. उत्तर कोरियात टायटॅनिक दाखवणे शक्यच नाही. अनुपच्यामते त्याच्या प्रेक्षकांना टायटॅनिक बघण्यात काहीच स्वारस्य असणार नव्हते. पैसे खर्च करून सिनेमा बघितल्यावर घरी येऊन स्टोरी काय सांगणार? तर म्हणे एक जहाज होते, ते आपटले आणि बुडले. ते काही पटण्यासारखे नव्हते. हे स्वतः अनुपचे स्पष्टीकरण. म्हणून त्याने काळूबाईचं चांगभलं दाखवण्याचा निर्णय घेतला. (जमलेल्या गर्दीवरून त्याचा निर्णय चुकीचा नव्हता हे पटले!) काळूबाईचे चांगभलं करणार्‍या सिनेमातले मुख्य कलाकारही या माहितीपटात हजेरी लावतात. अनुपच्या म्हणण्याला दुजोराही देतात.
उ. कोरियातला भाग अतिशय मजेदार आहे, त्यासाठी सिनेमाच बघायला हवा. आणि या देशाची माहिती असेल तर आणखीच मजा येते.
बुर्किना फासो आणि वायोमिंगमधे मात्रं टायटॅनिक दाखवला जातो. हे सगळं दाखवत असतान दिग्दर्शक ते सिनेमे पहाणारे प्रेक्षक आणि दाखवणारे मालक यांच्याभवती एक सुंदर कथा विणत जातात. प्रेक्षक म्हणजे समाज - आणि त्या पार्श्वभूमीवर अनुप आणि इतर मंडळींची वैयक्तिक आयुष्ये तुमच्या समोर येतात. २५ वर्षांच्या अनुपला लग्नं करायचे आहे तर इकडे पेनी एकटेपणा जाणवू नये म्हणून स्वतःला गुंतवण्यासाठी तीन वेगवेगळ्या नोकर्‍या करते आहे. हॅन यॉंग सुनचा नवरा त्यांचा देशाच्या "महान नेत्याला" महत्वाची मदत करण्यासाठी दुसर्‍या गावी गेला आहे. एकटेपणाला तिच्याकडे सिनेमे दाखवणे हा एक चांगला उपाय आहे. लस्साने, ल्युक आणि झकेरिया हे थिएटरचा धंदा इतका यशस्वी करण्यासाठी दिवसरात्रं झटताहेत. घरात लक्षं द्यायला त्यांना मुळीच वेळ नाही ही त्यांच्या बायकांची तक्रार.
त्या त्या देशातली अगदी प्रातिनिधिक चित्रे आहेत असे मला तरी वाटले. एकीकडे अनुपसाठी वधू संशोधन करण्यात त्याचे सगे-सोयरे गुंतले आहेत आणि दुसर्‍या टोकाला पेनीने एकटेपणाला हार मानून स्वतःला इतर व्यापात गुंतवून घेतले आहे. गरीब आणि श्रीमंत देशातला हा महत्वाचा फरक इतक्या सहजतेने मांडलेला क्वचितच आढळतो. अर्थात दिग्दर्शकाला नेमके हेच दाखवायचे होते की माझ्या वैयक्तिक अनुभवामुळे मी तसा अर्थ काढला हे सांगायला दिग्दर्शक उपस्थित नव्हते.
अधिक माहितीसाठी: http://flyingmoon.com/engl/dreams_e_neu.html
(Photo Credit:Flying Moon Filmproduktion and Axel Schneppat)

Thursday, April 12, 2007

फुल फ्रेम

आजपासून डरहॅम मधे फुल फ्रेम डॉक्युमेंटरी फिल्म फेस्टिवल सुरु होतो आहे. पास आधीच काढून ठेवला आहे. ऑफिसला दोन दिवस दांडीही मारणार आहे. पण त्या गडबडीत लिहिणे जमणार नाही. पण आवडलेल्या सिनेम्यांबद्द्ल नक्की लिहीणार आहे. आणि काही खूप इंटरेस्टिंग गोष्टीपण घडणार आहेत त्याबद्द्लही लिहीणार आहे. Stay Tuned...:)
http://fullframefest.org/festival/schedule.php

Wednesday, April 11, 2007

एक प्रदेश फुलांचा आणि कवितांचा

ओळखा पाहू हा देश - गुलाबांचा आणि कवितांचा म्हणून याची ख्याती आहे. इथल्या प्राचिन संस्कृतीचा आणि धर्माचा प्रभाव जगातल्या सर्व प्रमुख संस्कृती आणि धर्मांवर पडला आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इथल्या विचारवंतांवर साम्यवादाचा आणि धर्मनिरपेक्षतेचा पगडा होता. इथल्या पुरोगामी नेत्यांनी १९०७ साली लोकशाहीची स्थापना केली आणि १९२५-२८ या दरम्यान धर्मनिरपेक्षं घटना अंगिकारली. न्यायव्यवस्थेला धर्मगुरूंच्या कचाट्यातून मुक्तं केले. स्त्रीयांना जाचक बंधनातून मुक्तं केले. तर असा हा देश कोणता असेल?
लक्षात येतंय का? विचार करा जरा हवं तर...



लक्षात आलं असेल (किंवा नसेलही) तर उत्तर पहाण्यासाठी खाली जा....




उत्तर आहे इराण! होय इराण! तुमच्या इतकंच मी ही दचकले होते. इराण म्हटलं की डोळ्यासमोर प्रतिमा येते ती दाढीवाल्या, उग्र चेहेर्‍याच्या खोमेनीसारख्या नेत्यांची आणि बुरख्यातल्या बायकांची - किंवा फारच झालं तर नोबेल विजेत्या शिरीन इबादींची. पण ह्या स्टिरियोटाइपच्या पलिकडे जाऊन तिथल्या सामान्य माणसांचा परिचय करून दिला तो ओमिद साफि या व्यक्त्यानी. अमेरिका आणि इराणचे युद्ध होण्याची दाट शक्यता असल्याने इथल्या काही शांतीवादी संघटना सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्नं करत आहेत. त्या प्रयत्नाचा भाग म्हणून हे व्याख्यान आयोजित केले होते.
इराणच्या सद्ध्याच्या राजकिय परिस्थितीमुळे देशोधडीला लागलेल्यांची संख्या इथे खूप आहे. अशा परिस्थितीत देश सोडावा लागणार्‍या लोकांकडून तटस्थ मतांची अपेक्षा करणे जरा अतीच होते. शिवाय भारत-इराण, तसेच अमेरिका-इराण सांस्कृतिक संपर्क जवळजवळ अस्तित्वात नाहीत. त्यामुळे भारतिय किंवा अमेरिकन लोकांकडून सत्य परिस्थिती कळणे कठीणच. पण त्या दिवशीचे वक्ते मात्रं या विषयातले तज्ञ होते आणि बर्‍यापैकी तटस्थ दृष्टिकोनातून माहिती देत होते.
"मग अशा या पुरोगामी देशाचा आत्यंतिक प्रतिगामीपणाकडे प्रवास कसा झाला? कोणती परिस्थिती आणि कोणते देश याला कारणीभूत आहेत?" वक्ते ओमिद साफि श्रोत्यांशी संवाद साधू लागले.
वर उल्लेखलेली धर्मनिरपेक्ष घटना बहुतांश कागदोपत्रीच राहिली कारण इराण बनला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा बळी. एकीकडे प्रभावशाली शेजारी रशिया आणि दुसरीकडे ब्रिटीश राजवट यांच्यातील रस्सीखेचीत पार भरडला गेला. रशियन साम्यवादाचा पगडा कमी करण्यासाठी इंग्लंडने त्यावेळी अगदी प्रभावहीन असलेल्या उलेमांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली.
लोकनियुक्त प्रतिनिधी एकीकडे आधुनिकीकरणासाठी झटत असताना ब्रिटीशांच्या मदतीने उलेमांची ताकद वाढत गेली.
या खेळाचा एक महत्वाचा मोहोरा म्हणजे मोहम्मद मोसाद्दिक. शिक्षक,विचारवंत,लेखक असे अनेक पैलू असलेले हे व्यक्तिमत्व. पार्लमेंटचे सदस्य,अर्थमंत्री अशी अनेक पदे सांभाळून १९५१ साली ते पंतप्रधानपदावर निवडून आले. त्यांच्या कारकिर्दीतीत त्यांनी एकीकडे देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा प्रयत्नं केला, तर दुसरीकडे ब्रिटिश साम्राज्याला थोपवण्याचेही प्रयत्नं केले. त्यावेळी ऍंग्लो ब्रिटिश ऑईल कंपनीत ब्रिटीश सरकारची ५१% भागीदारी होती. परंतू तेलाच्या निर्मितीतून मिळालेला जेमतेम १६% नफा इराणला मिळत होता. शिवाय ब्रिटीश सरकार सतत राजकिय ढवळाढवळ करत असे. मोसाद्दिकांनी तेल व्यवसाय सरकारी नियंत्राणाखाली आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. हा निर्णय अर्थातच ब्रिटीश सरकारला मानवणारा नव्हता. त्यामुळे इराणच्या तेलावर आंतर राष्ट्रीय बंदी घालण्यात आली. ब्रिटीश युद्धनौका इराणच्या आखातात दाखल झाल्या. दुसर्‍या महायुद्धानंतर इस्त्रायलची निर्मीती झाली होती,आणि शीतयुद्धही सुरू झाले होते. या दोन कारणांसाठी अमेरिका या खेळात सामिल झाली.
अखेर १९५३ साली अमेरिका (सी आय ए)आणि इंग्लंड या दोन देशांनी मिळून मोसाद्दिकांना पदच्युत केले. मोसाद्दिक समर्थकांचे अतिशय क्रूरपणे हाल करण्यात आले. अमेरिका आणि इंग्लंडला धार्जिण्या असलेल्या शहांना सत्तेवर बसवण्यात आले. इराणी जनतेला ते पसंत नव्हते. शिवाय शहांच्या राज्यात विरोधकांना हालअपेष्टा,तुरुंगवास व तडीपारीचा सामना करावा लागला. या तडीपार लोकांमधील एक नाव म्हणजे आयातुल्ला खोमेनी. आयातुल्ला काशनी हे खोमेनींच्या क्रांतीची प्रेरणा होते. (ब्रिटीश सरकारने १९४० मधे काशनींना समर्थन दिले होते).
ओमिद साफिंच्या मते खोमेनींची क्रांती ही चुकीच्या मार्गानी गेली आहे आणि फसली आहे, तरी तिची सुरवातीची उद्दीष्टे मात्रं योग्य होती. इराणच्या इस्त्रायल द्वेषाबद्दल साफि म्हणाले की इराणी लोक एकूणच इतर लोकांना सहसा सामावून घेत नाहीत, या बाबतीत सुधारणा होण्याची नक्कीच गरज आहे. पण अशा प्रकारचे पूर्वग्रह जगात सगळीकडे आढळतात.
इराकच्या सद्ध्याच्या परिस्थितीवर ते म्हणाले अमेरिका आलीच मुळी शिया-सुन्नी या शब्दांचा जप करत. समविचारी इराकी लोकांना राजकिय पक्ष स्थापन करायची संधीच मिळाली नाही.
अशी आणि इतर बरीच नवीन माहिती मिळाली. अर्थात साफिंनी एकच बाजू मांडली हे मान्य केले, तरी एकूण अमेरिका आणि इंग्लंड या दोन देशांचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ बघितला तर हे वर्णन अगदी सुसंगत वाटते.

इराणच्या जनजिवनाची ही काही चित्रे मला एका मैत्रिणीने पाठवली आहे.













जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी सामान्य माणसं सगळी एकाच मातीची बनलेली असतात, त्यांची स्वप्नं एक सारखीच असतात. स्टिरियोटाईप तयार केले की आपले आणि त्यांचे असे भेद तयार होतात...
(Photos are from unknown source. I will be happy to credit if the source is known.)

Wednesday, April 04, 2007

मिखाइल, पं हरिप्रसाद आणि कौस्तुभची प्रतिक्रिया

काल ऑफिसमधे गेल्या गेल्या मिखाइलची इमेल आलेली बघितली. बर्‍याच दिवसानी मिखाइलकडून काहीतरी आल्याचे पाहून लगेच उघडून बघितली. इमेलमधे पं हरिप्रसाद चौरासियांची मिश्रं पिलू रागाची MP3 होती.
मिखाइलच्याच शब्दात सांगायचं तर -
If don't have this CD, try just this file. It is absolutely amasing what he's building. ....
As for the file - I incidentally inserted this CD into my stereo this Sun, and apparently it was a good time for it. Listening how he's developing the theme, it is something that only in music could happen. And not always it works.
संध्याकाळी काम संपल्यावर ती MP3 ऐकायला घेतली.
मिखाइल आणि मी दोन तीन वर्षांपूर्वी एकाच प्रोजेक्टवर काम करत होतो. मोडकं तोडकं इंग्लिश बोलणारा मिखाइल कामात एकदम गड्डा आहे (विदर्भात हा शब्द एखाद्या विषयाचा अर्क कोळून प्यायलेल्या माणसासाठी वापरतात).विशेष काही नं बोलता खाली मान घालून आपलं काम करणारा. पण हा माणूस पाश्चिमात्य(बरोक,क्लासिकल,रशियन इ.इ.) संगीताचाही गड्डा आहे हे हळूहळू कळले. त्यानंतर आमची या विषयावर बरीच देवाण-घेवाण सुरू झाली. नेमके माझे त्यावेळचे गुरू पं हबिबखान शार्लेटमधे कार्यक्रम देणार होते. त्या कार्यक्रमाला मिखाइल आला. हिंदुस्थानी संगीताचा आणि त्याचा प्रत्यक्ष परिचय व्हायला तेव्हा सुरूवात झाली. त्या वेळी सुरवातीचा तबल्याशिवाय केलेला विस्तार - आलाप, जोड इ. त्याच्या अजिबात पचनी पडले नाही. पण गत, ताना इ. भाग मात्रं त्यानी अगदी मनसोक्तं एन्जॉय केला. त्याचबरोबर माझ्या गुरूजींचे वादन हे ब्रोकन हार्मोनीचे उदाहरण आहे, ती ब्रोकन हार्मोनी कानाला गोड वाटत नसली तरी गुरुजींची तयारी आणि कसब वाखाणण्यासारखे आहे हे ही सांगितले.
त्याचा एक प्रश्नं म्हणजे तुझे गुरुजी इतक्या मोठ्या रचना पाठ कशा करतात? त्यावेळी मी त्याला हिंदुस्थानी संगीतातील इम्प्रोव्हायझेनबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमात जे काही वाजवलं गेलं ते कलाकाराने तिथल्या तिथे ऐन वेळेवर ठरवलं हे त्याला त्यावेळी फारसं पटलं नाही किंवा ती कल्पनाही फारशी आवडली नाही. पण तो स्वतःहून बराच अभ्यास करू लागला.
त्यानंतर काही दिवसांनी आम्ही शार्लेटच्या मंडळींनी एक कार्यक्रम दिला. तेव्हा त्यानी माझे सतारवादन पहिल्यांदा ऐकले. त्या कार्यक्रमाचे परिक्षण करण्याची जबाबदारी मी त्याला दिली होती. त्याची मुख्य प्रतिक्रिया ही होती - "सगळे कलाकार हौशी असले तरी त्यांचे प्रयत्नं खूप जेन्युइन होते. त्यामुळे कार्यक्रम फार श्रवणिय झाला" विशेष म्हणजे भिमसेनजींच्या शैलीने गाणार्‍या मिलींद दिक्षीतांचे गाणे त्याला विशेष भावले.
त्यानंतर मी मिखाइलला भिमसेनजींसहित इतर कलाकारांच्या सिडीज ऐकायला दिल्या. भिमसेनजींचे गाणे त्याला फारसे कळले नाही, पण चौरासियांच्या मात्र तो प्रेमात पडला.
त्यानंतर माझे प्रोजेक्ट बदलले आणि आमचा संपर्क कमी झाला. आमच्या लग्नात मात्रं आवर्जून आला आणि भेट म्हणून अर्थातच पंडितजींच्या सिडीजचा एक संच दिला.
काही महिन्यांपूर्वी पूर्बायनच्या कार्यक्रमात पुन्हा भेट झाली. त्यावेळी तो म्हणाला की आता त्याला आलाप ह्या प्रकाराची गोडी लागली आहे, कारण ते खरं अगदी हृदयापासून निघालेलं संगीत असतं, बाकी सगळा तंत्र आणि तयारीचा भाग असतो. गेल्या वर्ष-दीड वर्षात त्याने केलेला हा प्रवास बघून मी थक्कं झाले होते. तो माझ्याकडून इतकं शिकला होता, पण मी मात्रं त्याच्याकडून विशेष शिकले नाही ही खंत जाणवली.
असो, फ्लॅशबॅक संपवून वर्तमानकाळात येते. मिश्रं पिलू ऐकता ऐकता मराठी ब्लॉग्ज वाचत होते. आणि योगायोगाने प्रियाच्या ब्लॉगवर कौस्तुभची ही प्रतिक्रिया वाचायला मिळाली:
"चारू आणि माझ्या संगीतावर जेव्हा गप्पा होतात तेव्हा बऱ्याचदा हाच निष्कर्ष निघतो की संगीत हे जितकं जास्त सहजपणे आल्यासारखं वाटतं, तितकं ते जास्त भिडतं.
शास्त्रीय संगीताच्या बाबतीत ही गोष्ट जास्त जाणवते. म्हणजे राग, आलाप यातल्या कठिणपणामुळेच बऱ्याचदा आपण त्याचं कौतुक करतो. अर्थात शास्त्रीय संगीत हा फार वरचा प्रकार आहे, पण त्यात एकप्रकारचा सहजपणा जाणवत नाही. माझं अगदी वैयक्तिक मत आहे हे, त्यामुळे गैरसमज नको. "

हममम....
मी शक्यतो कुठलाही पूर्वग्रह नं ठेवता वेगवेगळ्या प्रकारचं संगीत ऐकायचा प्रयत्नं करते - अगदी हिपहॉपही ऐकू शकते, पण हिंदुस्थानी संगीतात श्रोत्यांचा soul elevate करायचं , बसल्या जागी त्यांना एका दुसर्‍याच दुनियेत नेण्याचं जे सामर्थ्य आहे ते इतर ठिकाणी कमी अनुभवायला मिळालं आहे.
संगीत हा एक वैयक्तिक आवडीच प्रश्नं आहे. हलक्या फुलक्या चालींमुळे सहजपणा वाटू शकतो, पण प्रत्यक्षात तितक्या सहजपणे गाणं बाहेर पडलं असेलच का? आता हिंदुस्थानी (मला कर्नाटक संगीतातलं फारसं कळत नाही, म्हणून हा शब्दं वापरते आहे.) संगीतातील उस्फूर्तता बघा:
मुख्य कलाकार आणि त्याचे सहकारी बरेचदा पहिल्यांदा स्टेजवरच भेटतात.
बरेच कसलेले कलाकार तानपूरा जसा लागेल त्यावरून कोणता राग गायचा ते ठरवतात. तसेच षड्ज जरा खाली वर करण्याची मुभा त्यांना असते. अती कसलेले कलाकार मधेच षड्ज बदलू ही शकतात. श्रोत्यांचा प्रतिसाद आणि साथ-संगत यांनी प्रेरित होऊन भिन्नं कसब दाखवू शकतात, सवाल-जवाब करू शकतात. एक छंद घेऊन त्यावर भर कार्यक्रामात नवीन ताना बनवू शकतात. नुकताच संजीव अभ्यंकरांचा कार्यक्रम ऐकण्याचा योग आला. त्यांनी देस अंगाचा जयजयवंती गाऊन मग पुन्हा कोमल गंधाराचा उपयोग करून एकदम मूड कसा बदलतो त्याचं प्रात्यक्षिकच दिलं. हे सगळे nuances जाणून घेण्याची गरज नाही, पण त्यातही एक प्रकारचं आव्हान आहे, गंमत आहे.
मनाची कवाडेच बंद केलीत तर "माझी झोपडीच बरी" असे वाटेल. या उलट माझी झोपडी तर चांगली आहेच पण बाजूच्या या दाराआड काय दडलं आहे? ही उत्सुकता ठेवली तर कदाचित एखाद्या महालाची दारेही उघडली जाऊ शकतात नाही का?