फुलफ्रेम २००८ - ट्विन टॉवरचा डोंबारी, अर्थात "मॅन ऑन वायर"
नुकत्याच झालेल्या ऑस्कर अवार्ड नाईटमधे मॅन ऑन वायरला सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार देण्यात आला. त्या निमित्त या माहितीपटावर आधीच प्रकाशित केलेला लेख पुनःप्रकाशित करत आहे:
१९६८ साल. पॅरिसमधली एक सकाळ....
लहानगा फिलिप पेटिट दातांच्या दवाखान्यात डॉक्टरांची वाट पहात बसलेला. सहज चाळायला घेतलेल्या मासिकातल्या एका लेखाकडे त्याचे लक्ष वेधले जाते - "न्यूयॉर्क शहरात जगातील सर्वात उंच इमारती बांधण्यात येत आहेत..." वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सची ती प्रस्तावित चित्रे पाहून तो इतका भारावला होता की चक्कं ते पानच फाडून खिशात घातले. घरी आणून ते चित्रं समोर दिसेल असे टांगले. मनाशी निर्धार केला - हेच माझे ध्येय.. टॉवर बांधून पूर्ण झाली रे झाली, की या टॉवरपासून त्या टॉवरपर्यंत एक दोर बांधायचा, तो ही सर्वात वरच्या मजल्यावर आणि त्यावर डोंबार्याचा खेळ करायचा. त्या दिवसापासूनच फिलिपचा सराव सुरू होतो.
मोठा होत होत, रस्त्यावर जादूचे, डोंबार्याचे खेळ करत करत, तर कधी चक्क खिसे कापत पै पै जमा करायचा. न्यूयॉर्कला जाऊन इमारतींचे बांधकाम कसे सुरू आहे ते बघायचे, तिथल्या कामगारांचा पोषाख कसा, ते वस्तूंची ने-आण कशी करतात, ऑफिसात काम करणारे कसे वागतात, इत्यादी बारीक सारीक तपशील गोळा करायला सुरूवात होते.
उद्दिष्ट सोपे तर नव्हतेच, पण बेकायदेशीरही होते, पण त्यातच तर खरी मजा होती नं! त्याची मैत्रिण व काही मित्रं खंबीरपणे पाठीशी उभे, तर काही सुरवातीला उत्साह दाखवून मधेच पाचावर धारण बसणारे. "तुझं काही बरं वाईट झालं तर माझ्यावर खापर नको" असं म्हणत माघार घेणारे काही, तर "माझ्याने हे होणार नाही" अशी स्पष्ट कबूली देणारे काही.
एका कानाची दुसर्या कानाला खबर लागणार नाही अशी गुप्तता बाळगायची. खोटी ओळख पत्रे मिळवून इमारतीत प्रवेश करायचा. सुरक्षा सैनिकांना चकमा देत छतावर पोचायचे व पहाणी करायची. हे सर्व करण्यात काही वर्ष जातात.
१२ ऑगस्ट १९७४, ट्विन टॉवर्सवर ढळणारी मध्यरात्रं...
कुणालाही कळू नं देता, दोन इमारतींच्या मधे ४५० पाऊंडांची केबल एका रात्रीत बांधायची. सकाळ झाली की तोल सावरत त्या दोरखंडावर प्रकट व्हायचे अचानक. नुसते चालत नव्हे तर नाच करत! सकाळी सकाळी कामाला निघालेल्या चाकरमान्यांना अगदी ध्यानीमनी नसताना एक अजब अदाकारी दाखवायची.
काय स्वप्नं पडतात नाही लोकांना? इतकं करून अगदी चांगल्यात चांगलं निष्पन्नं म्हणजे पोलिस पकडून जेलमधे टाकणार. इतर शक्याशक्यतेची तर कल्पनाही करवत नाही.
११ सप्टेंबर २००१ ट्विन टॉवर्सवर उगवत्या सूर्याची उन्हे.
या दिवशी घडलेल्या घटनेने फिलिपच्या त्या धाडसाचे, वर्षानुवर्ष उराशी बाळगलेल्या एका वेड्या स्वप्नाचे सर्व आयाम बदलले. गुप्तता तीच, कार्यपद्धतीही बहुदा तीच, हेतू मात्रं अगदी वेगळे!
"मॅन ऑन वायर" - एखाद्या हॉलीवुड थरारपटाच्या थोबाडीत मारेल असा हा माहितीपट फुलफ्रेम डॉक्युमेंटरी फिल्म फेस्टिवलमधे बघायला मिळाला. प्रेक्षकांच्या पसंतीचे बक्षीसही याच माहितीपटाला मिळाले. (माझ्या हातून सहजा-सहजी ६-७ च्या वर मार्क सुटत नाहीत, पण मीही याला १० पैकी १० मार्क दिलेत.)
फिलिप आणि त्याच्या मित्र मंडळींची मोहिमेची तयारी, भांडणे , अडचणी, कामातील जोखीम ह्या सर्वातुन हा बेत तडीला जातो का...? पुढे काय होते..? एरवी मी पूर्ण कथानक लिहीले असते, कारण इथे दाखवण्यात येणारे बरेचसे माहितीपट रिलीज होण्याची फारशी शक्यता नसते. पण तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे हा चित्रपट लवकरच येत आहे - अगदी तुमच्या जवळच्या थिएटरमधे का काय म्हणतात तसा, असं ऐकलं आहे.
अर्थातच ही सत्य घटना आहे व त्यासंबंधीची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे, पण सिनेमाची खरी मजा अनुभवायची असेल तर सिनेमा बघेपर्यंत पाटी कोरी ठेवा हा कसंकायचा अधिकृत सल्ला....
मूळ लेख प्रकाशन : ४/१०/०८ ९:४२