Tuesday, December 04, 2007

नरो वा कुंजरोवा?

मैत्रिण बार्बरा हल्ली बराच काळ टांझानियात घालवते आहे.
गेल्या खेपेला भेट झाली तेव्हा तिने एक विचित्रं गोष्ट सांगितली - आफ्रिकेतील हत्ती र्‍हायनोसॉर्सवर बलात्कार करून त्यांना ठार मारताहेत. त्यानंतर काही दिवसांनी फुलफ्रेममधे बघितलेल्या एका माहितीपटातही त्याचा उल्लेख होता. एनिमल प्लॅनेटवरही ह्या विषयावर एक कार्यक्रम आला होता असे ऐकण्यात आले. कसंकायने या विषयावर अधिक माहिती संकलित करायचे ठरवले:

१९९० पासुन हत्ती अधिक आक्रमक झाल्याच्या नोंदी जगभरात सगळीकडे होत आहेत. हत्तींचा अभ्यास करणार्‍यांनी आता मानव-हत्ती संघर्ष अर्थात एका वेगळ्याच अर्थानी नरो वा कुंजरोवा या नविन विषयावर अभ्यास करायला सुरूवात केली आहे.
झारखंडमधे २००० ते २००४ या दरम्यान हत्तींनी ३०० माणसांचा बळी घेतला. २००१ नंतर आसाममधे हत्तींनी मारलेल्या माणसांची संख्या २३९ आहे. (अर्थात चवताळलेल्या माणसांनी हत्तींचा पुरेपूर बदला घेतला हे सांगणे न लगे.)

आफ्रिकेतील अनेक गावात हत्तींनी हल्ला करून ग्रामस्थांना पळता भुई थोडी केली आहे. कधी कधी हल्ले पूर्वनियोजित असतात. हत्तींनी गावाला वेढा घालुन सर्व पळवाटा बंद केल्याच्या नोंदी आहेत.(माणसाशी माणसासारखेच वागावे लागेल हे त्यांना कळले असेल का?)
या बदलत्या वर्तणुकीमागचे नक्की कारण काय असावे ते अजुन आपल्याला कळलेले नाही, कदाचित कधीच कळणार नाही. अंदाज लावणे मात्रं सहज शक्य आहे.
हत्तींचा कळप हा दाट ऋणानुबंधांनी जोडलेला एक अनुभवी समाज असतो. ह्या समाजाचे तानेबाने फार गुंतागंतीचे असतात. लहान पिल्लं ही आई, आजी, आत्या, काकुं,मोठ्या बहिणींच्या देखरेखीखाली वाढतात. ही नातीगोती आयुष्यभर - सुमारे सत्तर एक वर्षे जपली जातात. जन्मापासून आठ वर्षांचे होईपर्यंत पिलु आईला सतत बिलगलेले असते. त्यानंतर मादी पिल्लांची इतर तरूण माद्यांच्या गटात तर नर पिल्लांची तरूण नरांच्या गटात तालिम सुरू होते. वयात आल्यावर पुन्हा ते प्रौढांच्या गटात सामिल होतात.

हत्ती समाजात एक प्रगत संदेशवहन प्रक्रिया अस्तित्वात आहे. जवळच्या संदेश वहनासाठी विविध प्रकारचे आवाज, शारिरिक हालचाली- सोंड, शेपटी हालवणे, अंग घासणे इ चा उपयोग करण्यात येतो.

दूर संदेशवहनासाठी सबसॉनिक लहरींचा वापर करण्यात येतो. कित्येक मैलांवर असलेले हत्ती एकमेकांना धोक्याची सुचना, कार्यक्रमातिल बदल किंवा कुणाच्या मृत्युची वार्ता कळवु शकतात. तळव्यांच्या गुबगुबीत भागात हया लहरीं ग्रहण करण्याची क्षमता असते.
कळपातील हत्तीचा मृत्यु झाल्यावर एक आठवडाभर अंतक्रियेचा विधी चालतो. या दरम्यान शवाची सतत राखण केली जाते. मृतदेह नीट माती व फांद्यांनी झाकला जातो. त्यानंतर अनेक वर्षे समाधीस्थळाला नियमित भेट दिली जाते. या भेटी दरम्यान मृत हत्तीच्या हाडांना स्पर्ष करून अभिवादन केले जाते.

असे हे विलक्षण, सुंदर, बुद्धिमान, संवेदनक्षम हत्ती अचानक असे का वागत असावेत? उत्तर तुम्ही ओळखलं असेलच. एका विशिष्ट प्राण्याने क्षुद्र गरजा भागवण्यासाठी, मनोरंजनासाठी हत्तींना बंदीवान करणे, मारणे, जंगले नष्टं करणे सातत्याने सुरू ठेवले असल्यामुळे हत्तींच्या समाज जीवनावर दुष्परिणाम होतो आहे. वरील कारणांमुळे कळपाची वाताहात झाली की पिल्लांना प्रौढ हत्तींचे मार्गदर्शन नं मिळाल्याने त्यांच्या सामाजिक व नैतिक जाणिवा अप्रगत रहातात.

युगांडातील नॅशनल पार्कमधे अशा आक्रमक हत्तींना प्रौढ नरहत्तींमधे सोडण्यात आले. हळुह्ळु त्यांच्या व्यक्तिमत्वात सुधारणा होऊन आक्रमकपणा नाहीसा झाल्याचे लक्षात आले आहे.

तुर्तास तरी प्रश्नावर तोडगा सापडला असला तरी पुढे असे घडणार नाही याचीही शाश्वती देता येत नाही. प्राण्यांना आपल्याशी बोलता येत नाही असे आपल्याला वाटत असले तरी ते आपल्याला सतत काही तरी सांगत आहेत. आपल्याच ते ध्यानात येत नाही. हत्तींना आपला विनाश कोणाच्या हातुन होतो आहे याची जाणिव झाली असावी का? अस्तित्वासाठी लढाई लढण्याचे त्यांनी ठरवले असेल का?...नाही सांगता येत.

17 comments:

Prashant Uday Manohar said...

हत्तींच्या आक्रमकतेवरून आठवलं. मुंबईत बिबट्या शिरल्याच्या नोंदी आहेत. स्वार्थासाठी पर्यावरण नष्ट केल्याने आणखी काय होणार? हत्ती हा सर्वात प्रगत प्राणी मानला जातो. आक्रमणातील नियोजनातून तर हे सिद्ध होतंच. पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन हेच कायमस्वरूपी उपाय आहेत असं वाटतं.
-प्रशांत

HAREKRISHNAJI said...

How shocking. Why does the animals have started behaving like humans.

I have read a good book on elephants by shri Krishnamegh Kunte on Elephants. He stayed few years in the jungle of Masinagudi near Madhumalai and Bandipur to study paracites in the stool of wild dogs. He have mentioned how those hunters brutelly murderes Tuskers.
Recently elephants from Karnataka have started coming out of their teritorry and entering Maharashtra. News Followed by stupid effords done by Govt. to drive them back.

HAREKRISHNAJI said...

Please read "आज रामशास्त्री हवे होते" on my blog.

a Sane man said...

ekandarit kaThin aahe!

ATOM said...

विनोबांचे मधुकर नांवाचे पुस्तक वाचतो आहे. त्यातील एक डोळॆ उघडणारी गोष्ट > "जर एखाद्याच्या घरांत खुप औषधाच्या बाटल्या दिसल्या तर .. आपल्याला वाटते की अरे रे बिचारा रोगी आहे.. आणि जर पुस्तकाचे कपाट भरलेले दिसले तर वाटते की अरे वा ! बुद्धीजीवी असावा या घराचा मालक नतमस्तक व्हावे त्याला! पण मी समजतो की हा देखील रोगीच आहे.. नुसती पुस्तके वाचतो ! आचरण नसल्यास पुस्तके निरर्थक आहेत."
ब्लोग्ज लिहीणारे आणि वाचणार्यंना विनोबांनी काय सुनावले असते ?

तुम्हाला नुसती माहीती गोळा करून एकमेकांना सांगुन धन्यता मानयची आहे हे बरोबर नाही.माहीतीतले नाविन्य संपले तरी प्रश्न संपत नसतात.
जितकया समस्यां बद्द्ल आपण लिहीतो - वाचतो त्यापैकी एकही सोडवण्याची आपल्याला उर्मी व धेय नसेल तर आपाण त्या सर्व समस्यांचा अविभाज्य भाग आहोत . संवेदना , चर्चा, देवाण घेवाण यातून जर एकाही उद्दीष्टाला आपण तयार करीत नासू, तर मग , आपण अंधळ्या ध्रुतराष्ट्राला महाभारताचे रसभरीत वर्णन ऐकवणारा बोंब्ल्या संजय बनू. ध्रुतत्राष्ट्र व संजय ही दोन ही पात्रे महाभारतातील अत्यंत हीन व निष्क्रिय पात्रे आहेत. त्यापेक्षा कौरव सेनेतील एखादे प्यादे सुद्धा श्रेश्ठ दर्जाचे आहे. वारेमाप अरे रे ..खरच किती ..छान मला नव्ह्ते माहीत..तुम्ही खरेच ग्रेट.. कौतुकाचे पेगला आम्ही चटावलो आहोत..हे थोडे कमी करून
ब्लोग्ज आणि चर्चांचा फोलपणा लक्शात येऊन आपल्या कर्तव्याच्या मर्यादेतच का होईना ठोस कार्य येत्या ३६५ दिवसांत जो कोणी करेल तोच खरा ..सुदर्शनधारी ठरेल.. तो पर्यंत आपण सारे संजय! मी सुद्धा अपवाद नाही..

kasakaay said...

एटम,
तुम्ही माझ्यावर नुसतीच पोकळ चर्चा करत असल्याचा आरोप केला आहे. तो मला मुळीच मान्य नाही. पर्यावरण रक्षणासाठी स्वतःच्या दैनंदिन जिवनात अनेक महत्वाचे फेरफार व त्याग मी केलेले आहेत व करते.
काही उदाहरणे:
प्राणिजन्य पदार्थ खाणे व वापरणे सोडले.
दुकानातल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या नं वापरता स्वतःच्या पिशव्या घेऊन जाते.
डिस्पोजेबल वस्तुंचा वापर टाळते. तुम्हाला खोटं वाटेल, पण पार्ट्यांमधे,धार्मिक कार्यक्रमांमधे जेवायला जाताना डिस्पोजेबल ताटांमधे खावे लागु नये म्हणून स्वतःची ताट वाटी पेला चमचा घेऊन जाते.
रेस्टॉरेंटमधे जेवुन झाल्यावर उरलेली शिळावळ (left over) बांधुन आणण्यासाठी डिस्पोजेबल डबे वापरावे लागु नये म्हणून घरून डबे घेऊन जाते.
(वरील गोष्टी करत असताना अनेक कुस्तित नजरा व टोमण्यांचा हसतमुखाने सामना करते.)
स्वयंपाकघरातील कचर्‍यापासून कंपोस्ट खत तयार करते.
इतकंच काय, पण शेअर बाजारात पैसे गुंतवतानासुद्धा ज्या कंपन्यांमुळे पर्यावरणाचा र्‍हास होतो अशा कंपन्यात पैसे गुंतवत नाही, मग भलेही पैसे कमी मिळाले तरी चालतील.
एक ना अनेक. माझ्यामुळे अनेक लोकांनी त्यांच्या सवयी बदलल्या आहेत. माझ्या ऑफिसमधील मित्रमैत्रिणी हल्ली तज्ञांचा घ्यावा तसा माझा सल्ला ह्या विषयावर घेत आहेत.
आत्मपर लेखन करत नसल्यामुळे मी यंव केल न तंव केलं असं सांगत बसत नाही.
ह्या लिखाणामुळे निदान काही जण तरी मानवकेंद्रिततेच्या पलिकडे जाऊन विचार करतील. तसा विचार करायला त्यांना मदत करण्याचे महत्वाचे कार्य मी करते आहे.
तुम्हीसुद्धा एक जबाबदार पृथ्वीवासी या नात्याने तुमच्या आयुष्यात असेच बदल घडवुन आणावे ही कळकळीची विनंती

Lopamudraa said...

तुम्ही पर्यावर्णद्दल लिहिता त्याने खरच स्फ़ुर्ती मिळाली , आज पर्यन्त मी सुध्दा ब-याच गोष्टीत पर्यवारणाचा विचार करायला शिकले आहे.पण तुम्ही इथे जे सगळ्यापर्यन्त पोहचवता आहात ते अतिशय स्तुत्य आहे.
आजपर्यन्त मला हा ब्लोग कसा दिसला नाहि याचे मला दुख होते. अतीशय वाचण्याजोगा...
(Mr. Atom. तुम्ही जे लिहिले ते वाचुन खेद होतो. म्हणजे हे बरय इथे इतके लोक ब्लोग लिहितात पण जे चांगल सांगण्याच प्रय्त्न करता आहेत त्यांच्यावरच आरोप कराय्चा तेही आपले नाव लप्वुन.मला तरि मराठिब्लोग मध्ये इतका सुंदर बोल्ग अजुन दिसला नाहिये. इथे सगळे फ़क्त स्वताबद्दल लिहितात. याला माझ ब्लोग पण अपवाद नाहि)त्यापेकषा तुम्ही सुचावा कोणि काय काय आणि कशी कशी मदत करु शकेल.

ATOM said...

कसकाय ,
आपण माझे म्हणणे जास्त पर्सनली घेतलेले आहे.मी एक सामान्य ब्लौगर असून प्रवाह पतीत असे जिवन जगतो आहे. त्याची मला खंत नाही आणि अभिमानही नाही.मी संजय असल्याची मला जाणीव विनोबां मुळे इतकेच.
तुमचे आचरण हे तुम्ही विश्वास ठेवत असलेल्या थियरीजशी सुसंगत आहे हे चांगले आहे. सगळंयांचे असे असेलच असे नाही.
पर्यावरणावर माणसाच्या तथाकथीत अतीक्रमणाच्या कल्पनेवर माझा अजीबात विश्वास नाही. माणूस हा पर्यावरणाचाच भाग आहे.पर्यावरणाने माणुस बनवला.माणसाने जर नालायकी करून ते नष्ट केले तर त्याला नैतीक द्रुष्ट्या केवळ पर्यावरणच जबाबदार असेल, माणूस नाही. माणुस हा पर्यावरणापुढे नगण्य आहे. पर्यावरणाला स्वत:चे अस्तॊत्व टिकवण्याची सेल्फ रेग्युलेटींग क्षमता आहे.!!
आपण मुळीच काळजी करू नये असे मला वाटते.आपण आपले स्व्त:चे अस्तीत्व कसे टिकून राहील याचा विचार करणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे असा माझा विश्वास आहे.
असो.

kasakaay said...

एटम,
तुमच्या स्वतःच्या मापदंडानुसार तुम्ही संजय अथवा दुर्योधन जे कोणी असाल ते असाल. इतरांबद्दल असंबद्ध मतप्रदर्शने केल्यानी काहीच साध्य होणार नाही.
तुमचा दुसरी प्रतिक्रिया विरोधाभासानी भरलेली आहे.
"आपण आपले स्व्त:चे अस्तीत्व कसे टिकून राहील याचा विचार करणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे असा माझा विश्वास आहे."असे तुम्ही म्हणता. तुमचे अस्तित्व हे तुमच्या हॅबिटॅटच्या अस्तित्वावर अवलंबुन आहे. जे हॅबिटॅट तुम्हाला सद्ध्या प्राणवायु,पाणि व अन्नाचा पुरवठा करते आहे ते एका अतिशय नाजुक अवस्थेत पोचले आहे.
भारतातील मोठ्या शहरांमधे प्रदुषणामुळे लहान मुलांमधील दम्याचे प्रमाण ५०% पर्यंत पोचते आहे. ही तर कुठे सुरूवात आहे. उद्याच्या तरूण पिढीला तिशी गाठायच्या आतच असाध्य रोगांनी ग्रासलेले असणार आहे. असे अस्तित्व तुम्हाला मान्य आहे का?
तुमचे हॅबिटॅट रोज २०० प्रजातींना मुकते आहे. माणूस नावाच्या प्रजातीचा नंबर फार दूर नसावा. त्यामुळे स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्ही आजपासुनच कामाला लागावे हे बरे.

kasakaay said...

लोपामुद्रा,
इतकी छान प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.
तुमचा ब्लॉगही खुप छान आहे.

TheKing said...

Good post!

This reminds me of the petition filed by a retired forest officer against the tourist rides on elephants in the forests to watch tigers.

Over the years, tigers have got used to this custom and just lie around when group of elephants visit them (who are carrying tourists!). Nobody ever found this objectionable but the change in the behaviour of tigers was alarming.

kasakaay said...

The king,
Changes in animal behaviour are alarmaing. They are reacting to the interference caused by human activities.

HAREKRISHNAJI said...

एटम,

कृपा करुन कोणावरही वैयक्तीक टीका करु नकात. आपल्याला एखादा विचार आवडला नाही तर त्या विचारा बद्द्ल लिहा.
पुस्तके नुसतेच वाचली जातात , त्या मधे लिहीलेले आचरणात आणले जाते किंवा नाही याचा न्यायनिवाडा करण्याचा इतरांना काय अधीकार ? त्यात लिहीलेले आपल्याचा पटॆलच असे ही नाही.

प्रत्येक जण आपापल्या परीने समस्या सोडवण्याचा, मांडण्याचा, जन जागॄती करण्याचा, प्रयत्न करत असतो, जगातील सर्वच समस्या आपणच सोडवु हा भ्रम. पण म्हणुन काय त्या बद्द्ल लिहुही नव्हे ?

हाच मापदंड लावायचा झाला तर वर्तमानपत्रात लिहीणाऱ्या संपादकांना, वार्ताहरांनी काय करावे ?

ज्या वेळी आपण एखाद्या समस्येबद्द्ल लिहीतो तेव्हा ती सोडवण्यासाठी टाकलेले ते पहीले पाउल असते. मुळातच अनेकांना ती समस्या आहे याची जाणीवच नसते. बॉग हे एक प्रभावी माध्यम असुन जनजागृती करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग हौ शकतो.

कसकाय ,

आपल्या वागणुकीचे कोणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही असे मला वाटते. आपल्याला जे योग्य वाटते तेच आपण करत असतो. आपली मुल्ये, आपले विचार,आपली तत्व आपण मांडल्यानंतर इतरांना ती पटवुन देण्याची गरजच काय ?

Samved said...

बापरे..हत्तींनी माणसांच्या फारच वाईट सवयी उचलायला सुरुवात केली तर...तसा हत्ती खुपच हुशार, संवेदनाक्षम प्राणी आहे. पण हे जरा अती होतय...

सर्किट said...

एका नव्या ’स्पिन द यार्न’ मध्ये सहभाग घेण्यासाठी तुम्हाला आमंत्रित केले जात आहे. लेखनात भाग घेण्यासाठी, फ़क्त वाचायला नाही काही. :)
http://sty-mar1.blogspot.com/

शमा said...

फारच सुंदर आणि माहितीपूर्ण लेख आहे हा. तुमच्या सगळ्याच पोस्ट्स वाचनीय असतात. विशेषत: पर्यावरणासंदर्भातल्या.

ह्या लेखासंदर्भात मला अजून जास्तं माहिती करुन घ्यायला आवडेल. तुमची काही हरकत नसेल तर अजून थोडी माहिती किंवा ह्यातल्या संदर्भांसंबंधीच्या लिन्क्स आणि असतील तर पुस्तकांची नावे मला उपलब्ध करुन देऊ शकाल का?

पोस्ट उशिरा वाचल्याने प्रतिक्रीया द्यायला उशीरच झालेला आहे. पण पुन्हा एकदा अशा माहितीपूर्ण लेखाबद्दल आभार.

kasakaay said...

शमा,
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
ह्या विषयावर न्युयॉर्क टाइम्समधे An Elephant Crackup? नावाचा एक मोठा लेख प्रसिद्ध झाला होता.
तो इथे वाचा:(कृपया लेख अनेक पानी आहे ह्याची नोंद घ्यावी.)
http://www.nytimes.com/2006/10/08/magazine/08elephant.html?pagewanted=1&_r=1&ei=5070&en=c09919d33b237459&ex=1161748800
शिवाय
http://www.iucn.org/themes/ssc/sgs/afesg/hec/index.html

http://www.panda.org/about_wwf/where_we_work/asia_pacific/our_programmes/areas/issues/elephant_human_conflict/index.cfm

http://www.elephant.se/elephant_human_conflict.php?open=Man%20and%20elephants

http://www.awionline.org/pubs/Quarterly/winter02/humanelephant.htm