तातियानाची अमानुष हत्या
जीवात जीव असेपर्यंत स्वातंत्र्यासाठी प्रयत्नं करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.
स्वातंत्र्याची आयती संधी चालुन आली असेल तर तिचा पुरेपूर फायदा उठवावा.
गुलामगिरीच्या काळात असहायतेचा फायदा उठवणार्या शक्तिंना नामोहरम करावे.
ख्रिसमसच्या दिवशी ईश्वराची प्रार्थना करण्याचे सोडुन आपल्या मुलांना "करमणुकीसाठी" प्राण्यांच्या कारागृहात (गोंडस नाव: प्राणिसंग्रहालय) नेणार्याबद्दल मुळीच सहानुभुती वाटण्याचे कारण नाही. निष्पाप मुलांवर बिकट प्रसंग ओढवला ही चुकही वडिलांचीच.
ख्रिसमसच्या दिवशी सॅनफ्रॅन्सिस्कोच्या प्राण्यांच्या तुरूंगात बघ्यांनी काहीतरी उपद्व्याप केले. त्याचा फायदा घेऊन स्वतःची मुक्तता करू पहाणार्या तातियाना वाघिणीने एकाला ठार व दोघांना जखमी केले आहे.
वन्य प्राण्यांपासून एक सुरक्षित अंतर राखायलाच हवे. त्यांनी जे क्षेत्रं आपले समजले आहे, त्याचे रक्षण करण्याची त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती असते. तिथे अनाहुताचा शिरकाव ते सहन करू शकत नाहीत.
तातियानाने पळून जाऊ नये म्हणून तिच्या सेल भोवती एक खंदक खोदला होता तसेच खंदकाच्या बाहेर जाडजुड,उंच कुंपणही लावले होते. कोणी तरी कुंपणावर चढुन खंदकावर लोंबकळल्याचा पोलिसांचा संशय आहे. कुंपण आणि खंदकाच्यामधे एक जोडा आणि रक्तं आढळले आहे. तसेच जोड्याचे ठसे कुंपणावर आढळले आहेत. जोडे घालण्याची पद्धत एका विशिष्ट प्राण्यामधेच असल्यानी तुरुंगातील इतर कैद्यांचा या प्रकरणात हात (अथवा पाय,शिंग,शेपूट वा पंख) असण्याची शक्यता फेटाळून लावण्यात येत आहे.
तातियानाने जे केले ते सामान्य व्याघ्रं वर्तन आहे. कारगृहातील अधिकार्यांनी मात्रं कुठलीही चौकशी नं करता ताबडतोब तातियानाची गोळी घालुन हत्या केली. स्वतःला स्वातंत्र्यप्रेमी,बुद्धिमान,न्यायप्रेमी,नितीवान अशी अनेकानेक बिरुदे चिकटवुन घेणार्या मनुष्याला मात्रं हे वर्तन शोभले नाही.
वरील प्रसंगावरून आपल्या प्राणिविषयक कायद्यात काही सुधारणा सुचवाव्याशा वाटतात:
१. कधी कधी अपरिहार्य कारणामुळे काही वन्यप्राण्यांच्या पोषणाची जबाबदारी आपल्यावर येऊन पडु शकते. अशा परिस्थितीतील प्राण्यांसाठी एक सुरक्षित निवासस्थान करावे. तेथील रहिवाशांचे पोषण, आरोग्य व सुरक्षिततेची काळजी घेणे हे तिथल्या कर्मचार्यांचे एकमेव कार्य असावे.
बघ्यांनी या निवासात स्वतःच्या जोखमीवर शिरावे. तसा काही प्रसंग उद्भवलाच तर कर्मचार्यानी रहिवाशांना कुठलीही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
२. शिक्षण, संशोधन अशा गोंडस नावाखालीही त्यांचे शोषण करू नये. प्राण्यांवर संशोधन करायचेच असेल तर त्या प्राण्याचे कल्याण हा त्यामागचा एकमेव हेतु असावा. तसेच संशोधनात प्राण्याला काडीचीही इजा होऊन नये याची दक्षता घ्यावी.
३. लहान मुलांना स्वतःचे हित कळत नाही व स्वतःची बाजु मांडता येत नाही. त्यामुळे कायद्याने त्यांना विशेष संरक्षण दिले जाते. प्राण्यांसाठीही तसेच करावे. त्यांच्या वतीने बाजु मांडतील, त्यांच्या हितासाठी जबाबदार असतील अशी माणसे नियुक्तं करावीत.
आपल्या नितीमत्तेचे वर्तुळ अधिक विस्तृत करायची वेळ आली आहे....