इंग्लंडमधे झालेल्या अतिरेक्यांच्या अपयशी हल्ल्यात उच्चंशिक्षित भारतिय तरूण संशयित म्हणून पकडल्या गेले आहेत. हे वृत्त वाचुन काहींना आश्चर्य वाटलं असेल तर काहींना "बघा आम्ही म्हणत होतो ना? आता तरी जागे व्हा" असंही म्हणावसं वाटत असेल.
आत्मघातकी अतिरेकी म्हणजे "गरीब, अशिक्षित पाकिस्तानातल्या कुठल्या तरी गावातून आलेला, थोड्याश्या पैशांसाठी जीवावर उदार झालेला" ह्या प्रतिमेला आता तडा गेला आहे.
ही बाब फार गंभीर असल्याने जरा खोलात जाऊन कारणे आणि उपाय यावर विचार करायला हवा.
एकविसाव्या शतकातही मानवी समाज हिंसेने प्रश्न सोडवायचा प्रयत्नं करतो आहे. ठोशास ठोसा हा तर सध्याचा आंतरराष्ट्रिय न्याय किंवा परराष्ट्रिय धोरण झाले आहे.
दुसर्या महायुद्धाच्या सुरवातीला अलिप्तं राहणार्या अमेरिकेने पराभूत जपानला सन्मानाची वागणूक देऊन प्रचंड आर्थिक मदत देऊ केली आणि पुनर्निमाणात महत्वाचा हातभार लावला. त्याच अमेरिकेने आता मात्रं "प्रिएम्प्टिव वॉर" सुरू करून सद्दामांना फाशी देण्यापर्यंत पलटी खाल्ली आहे. अबु गरेब आणि ग्वांटानामोच्या तुरुंगातून लाजिरवाण्या छळ्वादाच्या कथा बाहेर येऊनही इंग्लंड आदि देशांनी त्यांना आंधळा पाठिंबा चालूच ठेवला आहे.
इकडे भारतात हिंदु शक्तिप्रदर्शन, राम मंदिर, गुजराथ हत्याकांड,गोध्रा, मुंबईतील स्फोट, स्वामी नारायण मंदिरावरील हल्ला, संसदेवरील हल्ला अशा घटनांनी मने दुभंगली आहेत. आपल्याच देशात पोरकेपणा आणि असहायतेने ग्रासलेल्या हिंदु आणि मुस्लिम समाजाच्या भावनांचा फायदा उठवण्यासाठी कट्टरपंथीय धार्मिक नेते, राजकारणी आणि आय एस आय तयार आहेतच.
युद्ध हा श्रीमंत देशांचा आतंकवाद आहे आणि आतंकवाद हे गरिबांचे युद्ध आहे ही गोष्टं लक्षात ठेवायला हवी. हिंसाचाराचे मूळ धैर्यामधे नसून भितीमधे असते. नष्टं होण्याची भिती माणसाला टोकाची भूमिका घ्यायला लावते. बहुतांशवेळा ती भिती अनाठायीच असते आणि ती दूर होण्यासाठी खरी धैर्याची गरज असते.
आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे आजची प्रसार-माध्यमे. एकतर माध्यमे बहुतांश मॅनेज केलेली आहेत. आणि दुसरे म्हणजे स्पर्धेत टिकण्यासाठी तत्वे सोडून पैशाच्या पाठीमागे लागलेली आहेत. प्रक्षोभक वक्त्यव्ये करणार्यांना जितकी प्रसिद्धी मिळते तितकी शांततामय मार्गाचा अवलंब करणार्यांना मिळत नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमांना आकर्षित करण्यासाठीही हिंसाचाराचा अवलंब केला जातो.
या परिस्थितीत आपल्या मानसिकतेचा जरा विचार करू. भारतात सुरू असलेल्या मुस्लिमेतर आतंकवादाची उदाहरणे घ्या - तामिळ दहशतवाद्यांचा राजीव गांधींवर प्राणघातक हल्ला, आसाममधे प्रांतवादातून उफाळलेला हिंसाचार, तसेच इतर भागात नक्षलवाद्यांनी आणि माओवाद्यांनी केलेले हल्ले. अशा घटनांची संख्या खरे तर मुस्लिम आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यापेक्षा जास्तं आहे. पण त्या बातम्यावाचून आपल्या भावना भडकत नाहीत. प्रसारमाध्यमेही त्याचे फार भांडवल करत नाहीत. याचे कारण काय असावे? शासन, सुरक्षा यंत्रणा अथवा लष्कर या बंडाचा आज ना उद्या बिमोड करेल असा आपल्याला कुठे तरी एक विश्वास आहे. मात्रं मुसलमान भडकले तर कोणीही आपल्याला वाचवू शकणार नाही ही भिती हिंदूच्या मनात कायम आहे. आणि हा देश हिंदुंचा असल्याने वेळ प्रसंगी आपलेच शेजारी मित्रं आपल्यावर उलटतीत आणि सरकारही आपल्या मदतीला येणार नाही ही भावना मुसलमानांच्या मनात घर करून आहे. इतिहास आणि पूर्वग्रह भितीच्या या मानसिकतेला खतपाणी घालतातच.
ही मानसिकता सोडण्यासाठी सर्व थरावर सतत सुसंवाद साधण्याची गरज आहे. मुसलमानांना हिंदु वस्तीत घर भाड्याने अथवा विकत मिळणे कठीण आहे. तसेच मुसलमान वस्तीत एकटे जायला हिंदु धजत नाहीत. ही परिस्थिती बदलायला हवी. जाती धर्माधारित वस्त्या हळुहळु कमी करत प्रसंगी कायद्याचा वापर करून नाहीशा कराव्यात. एकमेकांशी मोकळेपणाने चर्चा करण्याचे व्यासपिठ उपलब्ध असावे. अन्यायाविरुद्ध शांततापूर्ण आंदोलन उभे करावे. अविश्वास, भितीची जागा विश्वास आणि धैर्याने घ्यावी. जामा मस्जिदीतील धर्मगुरूच्या व्यतिरिक्त इतर मुसलमानांची मते जाणून घ्यायचा प्रयत्नं प्रसारमाध्यमांनी करावा. पुरोगामी विचाराच्या लोकांनी एकत्रं येऊन कट्टरपंथीयांना एकटे पाडावे. मवाळांनी गप्पं राहू नये.
उभयपक्षांनी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. विषय कठीण असला तरी पेपर सोडवायलाच हवा.