इटली - भाग ३ (फेरफटका फिरेंजेचा)
रात्री साधारण ११ च्या सुमाराला गाडी फिरेंजेला पोचली. आमचे मीरा-कारा नावाचे हॉटेल स्टेशनपासून जवळच असल्याने आम्ही तिथे पायीच जायचे ठरवले. हॉटेल सापडायला फार कठीण नव्हते, पण फुटपाथ खडबडीत होता आणि आमच्या बॅगांची चाके तुटतील की काय अशी भिती वाटत होती. शहराच्या मध्यवर्ती भागातील एका बोळीतले हे इटालियन हॉटेल मी इंटरनेट्वर शोधून काढले होते. (हसू नका, नवर्याच्या असंभव वाटणार्या सगळ्या अटी पूर्ण होतील अशी जागा मिळणे किती कठीण आहे हे तुम्हाला माहित असते तर हे हॉटेल शोधून काढल्याबद्दल मी बढाया का मारते आहे हे तुम्हाला कळले असते. हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.)
आता एका दिवसात कोमो, मिलानो ही दोन शहरे बघून, दोन तास बसचा आणि तीन तासाचा आगगाडीचा प्रवास करुन रात्री बारा वाजता हॉटेलमधे स्थिर-स्थावर झाल्यावर तुम्ही काय कराल? झोपायची तयारी कराल, हो की नाही? पण यावेळी नवर्याच्या अंगात फार उत्साह संचारलेला होता. झोपायच्या आधी जरा फिरेंजेचा एक फेरफटका मारुन येण्याची इच्छा त्याने प्रदर्शित केली. डाऊनटाऊनमधे हॉटेल असल्याचा त्याला पुरेपूर फायदा उचलायचा होता. घासाघीस करत एका तासात परत येण्याच्या बोलीवर मी त्याच्याबरोबर जायला संमती दिली.
दोन चार पावलं चाललो असू, तेव्हढ्यात एक इंटरनेट कॅफे दिसला. तिथे जाऊन सासरी आणि माहेरी खुषाली कळवली. मग रमत गमत पुढे गेलो. चार-पाच चौक ओलांडले असतील तेव्ह्ढ्यात फ़िरेंजेचा डुओमो दिसला. (आजचा तिसरा डुओमो). डुओमो अर्थातच बंद होता, पण बाहेरच्या बाजूचे नक्षीकाम पहाण्यासारखे होते. नवरा नेहेमीप्रमाणे नुसते फोटो घेत सुटला. ह्ळुहळू माझी एक तासाची मुदत संपत आली तशी मी परत जाण्याची भुणभूण त्याच्या मागे लावली. काही वेळानी तो तयार झाला परत जायला. माझे दिशाद्न्यान त्याच्यापेक्षा चांगले असल्यानी अशा नविन गावात आल्यावर मी माग काढ्त समोर जायचे आणि त्यानी माझ्या मागे यायचे हा शिरस्ता. अशावेळी मी पण माझे कसब दाखवायला उत्सुक असते. पण यावेळी मात्रं स्वत:च्या दिशाद्न्यानाचा फाजील अभिमान मला नडला. परतीचा रस्ता काही केल्या सापडेना. नवर्याचं चांगलंच फावलं. मी आपली रस्ता शोधून काढायच्या प्रयत्नात भटकत होते आणि हा शांतपणे फोटो काढ्त सुटला होता. अखेरचा उपाय म्हणून आम्ही एका दुसर्याच हॉटेलमधे शिरलो आणि त्यांना कसं जायचं ते विचारलं. त्यांनी आम्हाला एक नकाशाही दिला. नकाशा बघून मी रस्ता का चुकत होते ते कळले. रस्ते एकमेकांना समांतर नसून वर्तुळाला छेद देणारे आहेत. आणि पावलागणिक असलेल्या पियाझ्झांमधे चार पेक्षा जास्तं किंवा कमी रस्ते मिळत असल्यामुळे फ़िरेंजेहा एक भूलभुलैया आहे हे लक्षात आले. नविन गावात गेल्यावर नकाशा घेतल्याशिवाय बाहेर पाऊल टाकणार नाही (duh...) अशी शपथ घेऊन आम्ही हॉटेलकडे रवाना झालो.
अखेर पाठ टेकली तेव्हा रात्रीचे दोन-अडीच तरी वाजले होते......
११ ऑक्टोबर २००६
सकाळी ९.३० ला नाश्ताकरुन आम्ही बाहेर पडलो (अर्थात नकाशा हातात घेऊन). १२ वाजताचे आकाडेमिया गॅलरीचे रिझर्वेशन होते. त्याच्या आधी आम्ही बरीच पायपीट केली आणि precious gems गॅलरी बघायला गेलो. या गॅलरीत मेडिची (रिनासंस) काळातील मोझेक कलाकृतींचे संकलन आहे. (आपल्याकडेही ताजमहाल आणि इतर ठिकाणी या पद्धतीची कलाकुसर आढळते.) विविध रंगी दगडांचे अगदी लहान लहान पापुद्रे काढून त्यांना एकत्र चिकटवून त्यामाध्यमात कलाकुसर केली जाते.
तुकडे मागच्या बाजूने डिंकाने चिकटवलेले असतात. वैशिष्ट्य म्हणजे बघणार्याला ते एकसंध चित्रं असल्यासारखेच वाटते.
मग दुपारी बाराच्या सुमाराला आकॅडेमियाच्या लाईनीत उभे राहिलो. आधीच रिझर्वेशन केले होते म्हणून बरे, नाहीतर तासन तास ताटकळत उभे रहावे लागले असते.
आकॅडेमिया हे पूर्वीच्या काळी वास्तुकला चित्रकला व शिल्पकला शिकवण्याचे ठिकाण होते. आज तिथे बहुतांशी ऐतिहासिक काळातील चर्चमधील कलाकुसरींचे संकलन केले आहे. आत जाऊन आम्ही तिथला ऑडियो टूर भाड्यानी घेतला. ते उपकरण हातात घेऊन आणि त्याला जोडलेले हेड सेट कानाला लावून आम्ही पहिल्या दालनात शिरलो. या दालनात येशूच्या जीवनावरील चित्रे आहेत. त्यातले येशूला क्रॉसवरून खाली काढतानाचे चित्रं मला विशेष आवडले. त्या दालानातील चित्रांचा आस्वाद घेऊन झाल्यावर आम्ही दुसर्या दालनात शिरलो. तिथली सुरवातीची एक दोन शिल्पे बघत असतानाच आमचे लक्ष दालनाच्या दुसर्या टोकाला गेले आणि इतर सर्व सोडून आम्ही मंत्रमुग्ध होऊन त्याच्याकडे बघू लागलो. फिरेंजेचा हिरो, ज्याला बघायाला आमच्यासारखे १० लाख लोक दरवर्षी इथे येतात आणि तासनतास रांगेत उभे रहाता - तो मिकेलएंजेलोचा डेव्हिड! साडेपाच मीटर उंचीच्या, साईड फेसिंग नग्नाकॄती पुतळ्याचा फोटो मी किती वेळातरी पाहिला आहे, पण प्रत्यक्ष बघितल्याशिवाय त्याच्या भव्यतेची आणि अप्रतिमतेची कल्पनाही करता येत नाही. संगमरवराचा तो दगड जणू युगानु-युगे मिकेलएंजेलोचीच वाट बघत होता. दोन कलाकारांनी अर्धवट प्रयत्नं करुन सोडून दिलेला तो दगड इ. १५०१ मधे मिकेलएंजेलोच्या ताब्यात आला. १५०४ मधे पुतळा पूर्ण झाला. त्याबरोबरच मिकेलएंजेलो आणि डेव्हिड हे पश्चिमी संस्कृतीचे मानबिंदु म्हणुन कायमचे इतिहासात जाऊन बसले.
उजवा पाय सरळ, डावा पाय वाकवलेला, चेहरा जरासा वळवून डावीकडे बघणारा डेव्हिड म्हणजे एक अद्भूत शिल्पं आहे. चेहर्यावर एकाच वेळी निरागसता आणि गोलायाथसारख्या राक्षसाला पराभूत केल्याचा आत्मविश्वास, डाव्या खांद्यावरून पाठीवर रुळून उजव्या हाताकडे येणारे वस्त्र. शारिराच्या नसा, खळगे, हाडे, मांसलभाग, भुवया, नखे इतकी हुबेहूब की हे दगडातुन साकारले आही यावर विश्वास बसणे कठिण! म्युझियममधील इतर शिल्पे व चित्रेही अप्रतिम आहेत, पण ती अक्षरश: उरकून आम्ही पुन्हा डेव्हिडसमोर येऊन बसलो. तास-दोन तास तरी तिथे बसून अखेर आम्ही बाहेर पडलो.
संध्याकाळी साडेचार वाजता इथली सर्व्हास सदस्य व्हिक्टोरिया आम्हाला सिनोरिया नावाच्या जागी भेटणार होती म्हणून आम्ही तिकडे जायला निघालो. मी नकाशामधे बघत मार्ग काढत पुढे आणि नवरा फोटो काढत काढ्त माझ्यामागे अशी आमची वाटचाल सुरु झाली. आता मला साधारण शहराच्या रचनेची कल्पना आली आहे, तरी मी सारखा नकाशा बघून खात्री करून घेत होते. ठरलेल्या जागी पोचायला जरा उशीरच झाला. व्हिक्टोरिया सिनोरियाच्या समोर आमची वाट्च बघत होती. सिनोरिया ही एक ऐतिहासिक वास्तु आहे. मिडिव्हल काळात सरकारी निवासस्थान, रिनंसन्स काळात मिडिची खानदानाचा महाल आणि आजच्या काळातील मेयरचे घर. व्हिक्टोरिया माहिती देऊ लागली. सिनोरियाच्या दारासमोर डेव्हिडच्या पुतळ्याची प्रतिकॄती आहे. मूळ कलाकॄती आधी इथेच होती, पण एका दंगलीमधे पुतळ्याची हानी झाल्यमुळे तो आकडेमियामधे हलवण्यात आला.
अर्नो नदी फिरेंजेच्या मधून वहाते. नदीवर अनेक पूल आहेत. व्हिक्टोरिया बरोबर चालत आम्ही त्यातल्या सगळ्यात महत्वाच्या पूलावर - पॉन्टेव्हॅकियो वर आलो. एकीकडे सिनोरिया आणि दुसरीकडे पिलात्झो पिट्टी या दोन राजमहालांना जोडणार्या या पूलाचे ऐतिहासिक महत्व इतके आहे की दुसर्या महायुद्धात अर्नोच्या पलिकडे असलेल्या जर्मन लोकांनी या पूलाची हानी होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली. त्यावेळच्या हाणामारीत पॉन्टेव्हॅकियो सोडून इतर सर्व पूल उध्वस्तं झाले. आज पॉन्टेव्हॅकियो पूलावर दोन्ही बाजूनी सोनारांची दुकाने आहे. त्या झगमगाटाने रस्ता उजळून निघाला होता.
पॉन्टेव्हॅकियोवरून अर्नो नदीचा काढलेला फोटो या लेखाच्या सुरवातीला दिला आहे.
अर्नोच्या पलिकडे आल्यावर आम्हाला एक मोझेक कलाकृतीचे दुकान दिसले आणि आम्ही सहज म्हणून आत शिरलो. तिथले मिझेक खूप छान होते पण फार महाग होते. शिवाय आम्हाला त्यातले काही कळत नाही. म्हणून व्हिक्टोरियाला विचारले. तर ती म्हणाली, "माझी एक मैत्रीण मोझेक बनवणार्या स्टुडियोअमधे काम करते. मी तिला फोन करून विचारते" त्याप्रमाणे व्हिक्टोरियाने फोन करून आम्हाला तिथे न्यायचे ठरवले. मोझेकचा तो स्टुडियो गावाच्या दुसर्या टोकावर होता. चालता चालता आमच्या गप्पा रंगल्या. व्हिक्टोरिया अनेकदा भारतात जाऊन आली आहे. भारतात गेल्यावर तिथले अनोळखी लोकही खूपदा तिच्याबरोबर फोटो काढून घेण्याची इच्छा प्रदर्शित करतात असं ती म्हणाली. त्याचं कारण काय हे तिला कळलेलं नाही. भारतातल्या लोकांना गोर्या कातडीचे खूप आकर्षण आहे असे मला सुचलेले कारण मी तिला सांगितले. (ती सांगते ते खोटे नाही हे आम्हाला माहित होते, कारण उदयपूरमधे फिरताना अनेक भारतिय प्रवासी गोर्या प्रवाशांबरोबर फोटो काढून घेताना आम्ही पाहिले होते.) रस्त्यात एका जिलाटेरियामधे थांबून विसावा (आणि जिलाटोही) घेतला. साधारण अर्धा तास चालल्यावर आम्ही स्टुडिअयोमधे पोचलो. तिथे जाऊन आम्ही मोझेक निर्मितीची प्रक्रिया पाहिली.
व्हिक्टोरियाची मैत्रिण योको खास ती कला शिकण्यासाठी जपानमधून इटलीमधे येऊन राहिली आहे. गेल्या काही वर्षात तिला इटालियन भाषाही चांगली अवगत झाली आहे. उद्या कदाचित पुन्हा इथे परत येऊन त्यांच्याकडून एखादे मोझेक विकत घेऊ असे ठरवून आम्ही तिथून बाहेर पडलो.
व्हिक्टोरियाचा निरोप घेऊन आम्ही पुन्हा मध्यवर्ती भागाकडे जायला निघालो. तेव्हा आमच्या लक्षात आले की स्टुडियो अगदी इटलीतल्या अस्सल पेठेत असल्यासारख्या जागी आहे. आजूबाजूला आमच्या शिवाय एकही टूरिस्ट नव्हता. व्हिक्टोरिया नसती तर अशी जागा आम्हाला कधीही बघायला मिळाली निसती. पुन्हा एकदा सर्व्हासचे गुणगान करत आम्ही वाटचाल करू लागलो.
एव्हाना चांगलाच अंधार पडला होता आणि मला जाम भूक लागली होती. आज आम्ही इथल्या शाकाहारी रेस्टॉरेंट्मधे जायचे ठरवले होते. ते अगदी दुसर्या टोकाला होते. तिथे जायलाच अर्धा-पाऊण तास लागणार होता. म्हणून मी नवर्याला म्हंटलं की तू प्लिज पावला-पावलावर फोटो काढू नकोस, आधीच भूकेने जीव कासविस झाला आहे. पण ऐकेल तर तो नवरा कसला? "आपण इथे पुन्हा कधी येणार? एक दिवस भूक सहन केली तर काही बिघडणार नाही" हे ऐकवून त्याने उलट मलाच गप्पं केले. चालत चालत आम्ही डुओमो पर्यंत येऊन पोचलो. आता तर तो अगदी पावलापावलावर थांबून फोटो काढू लागला. त्यामुळे आमच्या प्रवास जास्तच कूर्मगतीने सुरू झाला. अजून खूप पल्ला शिल्लक आहे असं मी त्याला बजावलं तरी त्याच्या चेंगटपणात काही फरक पडला नाही. असो.
जेवण यथातथाच होते, सांगण्यासारखे काही नाही. त्याऐवजी जवळच कुठे तरी जेवलो असतो तर बरं झालं असतं असं वाटलं. मग थकलेल्या पायांनी पुन्हा हॉटेलात जायला निघालो. हॉटेलच्या गल्लीच्या कोपर्यावर विसावून जिलाटोचा आस्वाद घेतला. उद्या उफ़्फ़िझी म्युझियममधे काय काय बघायला मिळेल त्याची स्वप्नं रंगवत असतानाच डोळा लागला.