बाळाचे आगमन - भाग ५ - इतरांचे सल्ले, अपेक्षा आणि आपली उद्दिष्टे
चॅपेल बाईंकडे आता महिन्यातून एक तपासणी सुरू होती. या तपासणीत युरिन टेस्टमधे साखर व प्रोटिनचे प्रमाण पाहिले जाते, वजन आणि गर्भाशयाची लांबी मोजून बाळाची योग्य वाढ होत असल्याची खातरी करून घेतात. बाकी मला काहीच त्रास नसल्याने ही तपासणी १५ मिनिटात संपत असे.
सहावा महिना लागला तसं पोट जरा दिसायला लागलं. कपडे घट्टं व्हायला लागले होतेच. आतापर्यंत पँटच्या, स्कर्टच्या काजांना रबरबँड लावून एक्स्टेंड करून काम भागले होते त्यानंतर मात्रं मॅटर्निटी स्टोअरमधे जाऊन खास गर्भारपणीचे कपडे विकत आणणे सुरू केले.
व्यायाम करण्याची क्षमता पहिलेपेक्षा फारच कमी झाली. प्रिनेटल योगा नियमितपणे करायला सुरूवात केली. इथे प्रिनेटल योगाचे क्लासेस होते, पण आठवड्यातून काही दिवस क्लासला जाण्यापेक्षा मी एक व्हिडिओ विकत घेतली. त्यामुळे घरच्या घरी नियमितपणे योगासने करता येऊ लागली.
त्याशिवाय रोज चालणे किंवा पोहणे होतेच. व्यायाम, योगासाने व केगल ह्याचा मला खूप फायदा झाला.
दरम्यान नवर्याने वाचनालयातून या विषयावर अनेक पुस्तके व व्हिडिओ आणायला सुरूवात केली. त्यामुळे आम्हाला बरीच शास्त्रोक्त माहिती मिळाली. शिवाय इंटरनेटवर दर आठवड्याला बाळाची काय प्रगती होते ह्याचे वेळापत्रक देणार्या साईटस आहेत. दर सोमवारी ते उघडून मागच्या आठवड्यात काय बदल झाला असेल आणि आता या आठवड्यात काय प्रगती होणार आहे हे वाचायला मला खूप मजा वाटायची. शिवाय माझ्या इन्श्युरंस कंपनीनेही बरीच माहिती पाठवली. ती ही खूप उपयुक्त होती.
ही सर्व माहिती मिळाल्यावर एकूणच काय अपेक्षा करायची याचा अंदाज आला.
या माहितीच्या आधारावर मी माझ्या ३ अपेक्षा किंवा उद्दिष्टे ठरवलीत:
१. फुल टर्म प्रेग्नन्सी
२. नैसर्गिक बाळंतपण
३. बाळाला पहिले सहा महिने फक्त आणि फक्त आईचे दूधच पाजायचे. (दुधाव्यतिरिक्त दुसरे काहीही अगदी पाणीदेखील पाजायचे नाही)
ही माझी उद्दिष्टे पूर्ण झालीत की नाही हे पुढील भागात तुम्हाला कळेलच.
आता एका महत्वाच्या मुद्याला हात घालते. तो म्हणजे शुभचिंतकांचे सल्ले.
हे माझॆ पहिलेच बाळंतपण असल्याने मला अर्थातच या विषयात शून्य माहिती होती. माझी आई व सासूबाई यांना अनुभव असला तरी इतक्या वर्षांनतर त्यांना फारसे काही आठवत नाहीये आणि आता बराच बदल झाला आहे, या दोन गोष्टी माझ्या लक्षात आल्या.
इतर माझ्या पिढीतल्या बहुतांश नातलग व मैत्रिणींमधे सिझेरियनचेच प्रमाण फारच जास्त आहे आणि स्तनपानाचे प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे मला हवा असलेला सल्ला यांच्याकडून फारसा मिळणार नाही हे मी जाणून होते.
बरेच नातेवाईक बोलताना कधी कधी माझे सिझेरियनच होणार हे गृहित धरायचे. असे कोणी म्हटले की मला वाईट वाटायचे व चिडचिड व्हायची. या अवस्थेत स्त्रीच्या शरीरात हार्मोन्सची सारखी उलथापालथ होत असते त्यामुळे तिचा स्वभाव अकारण चिडका, उदास होऊ शकतो. आजूबाजूच्या मंडळींचे उद्देश चांगले असले तरी अशा अवस्थेतील स्त्रीला कशा प्रकारे मदत व सहकार्य करायचे याचे बहुतेकांना अजिबात ज्ञान नसते.
त्यामुळे मी सर्व बाबतीत तज्ञांचाच सल्ला घ्यायचा असे ठरवले होते.
वर्ल्ड व्हेजिटेरियन कॉंग्रेसमधे माझ्या सर्व शंकांचे निरसन झालेले असल्यामुळे मी व्हिगनच रहायचे ठरवले. त्याविषयीही मला बरेच ऐकून घ्यावे लागले. "दूध पीत जा" हा सल्ला मला त्याकाळात व अजूनही अधून मधून मिळतच असतो. गर्भारपणी खानपानात कुठलाही बदल करू नये हे ही त्यांना माहित नसायचे. अखेर अशा सल्ल्यांकडे दुर्लक्ष करायची सवय झाली. आपल्याला त्यांचा सल्ला नको असला तरी त्यामागची त्यांची भावना चांगलीच आहे हे समजून घेतले की त्रास कमी व्हायचा.