Sunday, March 15, 2009

बाळाचे आगमन - भाग ४

आता फार दिवस पोट लपवणे शक्य नव्हतेच त्यामुळे सर्व नातेवाईक व मित्रमैत्रिणींना आमचे गुपित सांगून टाकले. शिवाय जर्मनीला जाण्याचे दिवसही जवळ येत होते. जुलै महिना आला तशी जर्मनी ट्रिपची तयारी सुरू झाली. त्यावेळी मला चार महिने संपत येणार होते. त्या वेळी प्रवास करायला काहीच हरकत नाही असे डॉक्टरांनी सांगितले. शिवाय घरातल्या बांधकामाला आम्ही कंटाळलो होतो. त्यामुळे बाहेरगावी जाण्याची कल्पना फारच अपिलिंग वाटत होती.

ड्रेस्डन येथे वर्ल्ड व्हेजिटेरियन कॉंग्रेसमधे नवरा उद्घाटनाचे भाषण देणार होता. माझी ही पहिलीच वर्ल्ड व्हेजिटेरियन कॉंग्रेस. तेथे अनेक नामवंत न्युट्रिशनिस्ट व इतर तज्ञांची भाषणे ऐकायला मिळाली. डॉ. नंदिता शहा यांची ओळख तिथेच झाली. त्या भारतात करत असलेल्या कौतुकास्पद कार्याबद्दल चांगली माहिती मिळाली. तसेच प्रख्यात न्युट्रिशनिस्ट
ब्रेंडा डेव्हिस वसांटो मेलिना यांच्याशीही खूप छान ओळख झाली.


या दोघींनी व्हिगन न्युट्रिशनवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. इतर पुस्तकांबरोबर वसांटो यांनी Raisging Vegetarian Children हे पुस्तकही लिहिले आहे. त्यांच्याकडून बरेच मार्गदर्शन मिळाले.


कॉन्फरंस आटोपल्यावर आम्ही प्रागला प्रयाण केले. मग जर्मनीत परत येऊन लाय्पझिग, बर्लिन असा टूर केला. बहुतेक ठिकाणी सर्व्हास होस्ट्सच्या घरी पाहुणचार घेतला. मी प्रेग्नंट असल्याने सर्वांना माझे केवढे कोड कौतुक होते!!


साधारण दोन आठवड्याचा हा टूर आटोपून आम्ही घरी आलो. एव्हाना बांधकाम संपले असेल ही आशा अगदी फोल ठरली. उलट आमच्या अनुपस्थितीत त्यांनी काहीच फारसे काम केले नव्हते. खरं तर जुलैअखेर काम पूर्ण संपणे अपेक्षित होते, पण अजून तर नुसता सांगाडाच दिसत होता, भिंतीचाही पत्त नव्हता. आमच्याकडे लवकरच बाळ येणार आहे तेव्हा काम लवकर आटपा अशी विनंती त्यांना केली.

No comments: