बाळाचे आगमन: भाग १
एप्रिल २००८ महिन्याच्या सुरुवातीला आम्ही बाल्टीमोअरला गेलो होतो. परत निघताना बराच उशीर झाला होता. वॉशिंग्टन डि. सी. मधे ड्युपॉंट सर्कलमधून जात असताना सि व्हि एस फार्मसीचे दुकान उघडे दिसले. नवर्याला गाडी थांबवायला सांगितली.
त्याने विचारले "कशाला? "
"मला प्रेग्नन्सी डिटेक्शन किट घ्यायची आहे".
"कशाला?" त्याच्या चेहेर्यावर "वेड लागलं का?" आणि "बिच्चारी..." असे दोन्ही भाव एकत्रितपणे उमटलेले दिसले.
"उगाच...??"
"बरं.."
किट विकत घेतली आणि पर्समधे ठेवली.
दुसर्या दिवशी टेस्ट केली तोपर्यंत नवरा बाहेर गेला होता. त्याला फोन केला.
"माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे..."
"क्क्काय सांगतेस?.."
डॉक्टरांना फोन करून अपॉईंमेंट घेतली. अल्ट्रा साऊंडकरून झाल्यावर त्यांनी आमचे अभिनंदन केले. बाळाच्या अगामनाची तारीख १५ डिसेंबर आहे असे सांगितले.
दोघांनाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता, तरी कॉशसली ऑप्टिमिस्टिक रहायचे ठरवले.
आई वडिलांना फोन करून सांगावे असे सारखे वाटत होते, पण निदान सहा आठवडे तरी कोणालाच काहीच सांगायचे नाही असे ठरले. इतकी महत्वाची बातमी पोटात (पन इंटेंडेड) ठेवणे फार कठिण असते.
बाळाची चाहूल तशी अनपेक्षितच होती, त्यामुळे आता आपल्या काय काय बेत बदलावे लागतील याचा आढावा घेतला. जूनमधे एका कॉन्फरन्ससाठी सॅन फ्रॅन. ला जायचे होते. तो तिसराच महिना असल्याने जायला काहीच हरकत नव्हती. जुलॅ अखेरीस वर्ल्ड व्हेजिटेरियन कॉन्फरन्सला जायचे होते. तेव्हाही चौथा महिनाअखेर असेल म्हणून काही हरकत नाही. जायच्या आधी एकदा डॉक्टरांना विचारून जायचे असे ठरवले.
घरात नुकतेच मोठे बांधकाम काढले होते. ते जुलैमधे संपेल म्हणून त्याची काळजी नव्हती. पण प्रश्न दुसरा होता. बांधकामामुळे मी घरून काम नं करता सासरी जाऊन काम करणार होते. मग तिथे गेल्यावर उलट्या बिलट्या झाल्या तर सासूबाईंपासून लपून रहाणार नाही असे मी नवर्याला म्हंटल,
नो बिग डिल एनी हाऊ...
पण इतक्यात त्यांना सांगू नकोस, काही झालं तर त्यांना उगीच काळजी वाटेल.... तो म्हणाला...
क्रमशः