गावो विश्वस्य मातरः भाग ५ आयुर्वेद संदर्भ
गावो विश्वस्य मातरः भाग ४ मधील प्रश्नोत्तरांचे संदर्भ या लेखात दिले आहेत. वैद्यांशी फोनवर बोलताना लिहून व रेकॉर्ड करून घेतलेली माहिती योग्य रितीने संपादित करायला जरा वेळ लागला. मला संस्कृत येत नाही, शिवाय मूळ ग्रंथ हाताशी नव्हते. त्यामुळे जे ऐकले आहे ते बरोबर उतरवले आहेत की नाही ही मोठी शंका होती. या श्लोकांचा अर्थ लावणे, व्याकरण तपासणे, संधी-विग्रह करणे या कामात बहुमोल मदत केल्याबद्दल प्रशांतचे आभार. वैद्य श्री अनंता धर्माधिकारी यांचे पुन्हा एकदा आभार.
संदर्भ क्रं १
आमाभिभूतकोष्ठस्य क्षीरं विषमहेरिव
(अष्टाङ्गहृदय चिकित्सास्थान अध्याय १, श्लोक १९)
[कोष्ठ=कोठा; क्षीर=दूध]
अर्थ
शरीराच्या पचनसंस्थेमधे नं पचलेल्या अन्नाचे कण असतील आणि त्यात दूध टाकलं गेलं तर ते अन्नंही खराब होतं व दूधही खराब होतं. पहिलं खाल्लेलं पूर्ण पचल्याशिवाय दूध प्यायचं नाही हा नियम नेहमी पाळावा.
संदर्भ क्रं २
जीर्णे अष्णीयात्
(चरक विमानस्थान अध्याय १, श्लोक २५/४)अर्थ
पहिलं अन्नं संपूर्ण पचल्याशिवाय दुसरं अन्नं पोटात टाकायचं नाही.
संदर्भ क्रं ३
प्रातराशे त्वजीर्णेऽपि सामयाशो न दुष्यति
(चरक चिकित्सास्थान अध्याय १५, श्लोक २३७,२४१,२४२,२४३)
[प्रातराशे (प्रात: + आशे - सकाळी घेतलेले)
त्वजीर्णेऽपि (तु + अजीर्णे + अपि) --तु= परंतु, अपि=सुद्धा, अजीर्णे= न पचलेले
सायमाशो न(सायम् + अश: + न -- विसर्गाचा ओ होण्याचा नियम इथे लागु होतो)-- सायंकाळचा आहार (घेणे) त्याप्रमाणेच दुसर्या ओळीत सायम् आशे अजीर्णे तु प्रात: आशो प्रदुश्यति अशी फोड होईल.]
अर्थ
विशेषतः सकाळी दूध पिताना हा विचार प्रामुख्याने करावा की रात्री खाल्लेलं पूर्ण जिरलं आहे की नाही. एखाद्या वेळी सकाळचं खाल्लेलं अन्नं पचलं नसेल आणि त्यावर चुकून काही खाल्लं किंवा दूध प्यायलं गेलं तर फारसं बिघडत नाही, पण रात्री खाल्लेलं जर पचलं नसेल तर त्यावर सकाळी काही खाल्लं किंवा दूध प्यायलं तर मात्रं ते नक्कीच खराब होतं व त्यामुळे रोग होतात.
संदर्भ क्रं ४
दिवाकर अभितप्ताणां व्यायाम अनिल सेवनात्
वातानुलोमी श्रान्तिघ्नं चक्षुष्यं च अपरान्हिकम्
(सुश्रुत सूत्रस्थान अध्याय ४५, श्लोक ६०,६१)
अर्थ
ज्या गाई दिवसभर सूर्याच्या प्रकाशाने तप्त होतात, भरपूर फिरतात अशा गाईंच दुपारी काढलेले दूध हे अत्यंत आरोग्यकारक असतं आणि ते नेहेमी उकळून घ्यावं
संदर्भ क्रं ५
व्यायाम दीप्ताग्नि वयस्थ बलशालिनां विरोधि अपि न पीडायै:
(अष्टांगहृदय सूत्रस्थान अध्याय ७, श्लोक ४७)
अर्थ
जे तरूण आहेत, नेहेमी व्यायाम करतात, ज्यांची पचनक्रिया (अग्नी) उत्तम आहे अशांच्या प्रकृतीला दूध (पचायला जड असलं तरी) विरोध करत नाही.