दिसामाजी काहीतरी....पण काय? भाग २
ट्युलिपने हयात नसलेल्या लेखकांच्या रचनांबद्दल प्रश्न विचारला आहे. सर्वांच्या सोयीसाठी त्यासंबंधीची माहिती स्वतंत्रं पोस्टमधे देते आहे:
मी काही कोणी वकील बिकील नाही, पण इंटरनेटवर, विशेषतः या दुव्यावर जी माहिती मिळाली ती थोडक्यात मराठीत देत आहे:
सद्ध्याचा आंतरराष्ट्रिय प्रताधिकार कायदा, ज्यावर जगातल्या बहुतेक देशांनी सह्या केल्या आहेत, त्यानुसार:
१. कुठल्याही रचनेचे प्रताधिकार रचना मुर्त स्वरूपात उतरल्या क्षणापासुन रचनाकाराच्या मृत्युनंतर ७० वर्षे पर्यंत रचनाकाराकडेच रहातात.
२. रचनाकार "ही रचना सार्वजनिक वापरासाठी आहे" असे सांगु शकतात, मात्रं तसे त्यांनी निःसंदिग्धपणे सांगितलेले असावे लागते. तसे सांगितल्यावर अर्थातच रचनाकाराच्या हयातीतही त्या विशिष्ट रचनेची प्रत करता येते.
३. रचनाकार प्रताधिकार इतरांना (वारस, ट्रस्ट किंवा प्रकाशक) देण्याचा करार करू शकतात. सर्व हक्कं स्वाधिन करण्यासाठी कायदेशीर लिखित करार करणे आवश्यक आहे.
४. प्रताधिकार वैयक्तिक संपत्तीत बसत असल्याने रचनाकाराच्या मृत्युनंतर ते हक्कं त्याच्या/तिच्या कायदेशीर वारसाकडे हस्तांतरित होतात. ह्यासंबंधी त्या त्या देशातील कायदे लागु पडतात.
५. कायदेशीर वारस नसलेले रचनाकार बहुदा मृत्युनंतरचे हक्कं प्रकाशक किंवा एखाद्या ट्रस्टकडे देऊन ठेवतात.
६. रचनाकारास कायदेशीर वारस नसेल व मृत्युनंतर हक्कं कुणला दिले नसतील तरी ही मृत्युनंतर ७० वर्षेपर्यंत कोणीही प्रती काढु शकत नाही.